काही नोंदी अशातशाच… ४

ऑगस्ट 15, 2010

आपण सेवा करतो त्या समुदायाचा जीवनस्तर उंचावणे हे आमचे ध्येय आहे… आपण जे काही कमावतो, त्यातून त्या समाजाला परतफेड देण्याचा वारसा आम्हाला लाभला असल्याने त्यातूनच ग्राहक, कर्मचारी, भागधारक आणि समाज यांच्यात आमच्याप्रती विश्वास निर्माण झाला आहे. कर्मचारी आणि समुहातील कंपन्यांनी अत्युच्च दर्जाचा कारभार करावा यासाठी सातत्याने मापदंड विकसीत करण्यातून हा वारसा जपला जात आहे…

सकाळी आठच्या सुमारास लोणावळा शहराच्या वेशीवर गाडीनं एका हॉटेलच्या आवारात प्रवेश केला. साडेसहाला पुण्याहून निघालो होतो. चहाची गरज होतीच. जमल्यास थोडी पोटपुजाही करायची होती. हॉटेलच्या दारापाशी पाणी टाकून सफाई सुरू होती. शंका आल्यानं विचारलं, “हॉटेल सुरू आहे का?” “हो, या” असं उत्तर आल्यानं आत शिरलो. इतक्या सकाळी सेल्फ सर्व्हिस म्हटलं की माझं डोकं फिरतं. तसं ते फिरलं. पण इलाज नव्हता. त्यामुळं प्रत्येकाला हवं-नको त्याची ऑर्डर देऊन तयारी होईतो आत जाऊन बसलो. निघालो होतो स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमालाच. लोणावळ्याच्या परिसरातील वेगवेगळ्या डोंगरी गावांमध्ये असणाऱ्या ‘भूसंपादनग्रस्त’ समुहांमध्ये मिसळून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी. पण एकूण वातावरण असं होतं की, त्या दिवसाची जाणीव वेगळी होत नव्हतीच. पण त्या हॉटेलात स्पीकर ओरडत होते… वो भारत देश है मेरा… आणि देशभक्तीची इतर चित्रगीते. कॅसेट शंभर टक्के बनावट होती. भक्ती असेलही खरी, पण मूळ गायकांचे आवाज बेपत्ता होते. त्यामुळं त्या भक्तीत शिरणं मुश्कील होत होतं. मग शेवटी नेहमीप्रमाणे वाद्यांकडं लक्ष घातलं. समोर आलेल्या त्या मिसळपाव या पदार्थाचा अवमान करणाऱ्या पदार्थावर लक्ष केंद्रीत केलं आणि थोड्या वेळानं ‘स्वातंत्र्यदिन’ अंगात शिरला. ६० वर्षं, ६२ वर्षं वगैरे हिशेब मी करत नाही. पण एकूणच पुढं वाढून ठेवलेल्या स्वातंत्र्यदिनामुळं विचार सुरू झालेच.
महामार्गावरच्या त्या हॉटेलात गर्दी नव्हती. लोणावळा, शनिवार (आणि हो, स्वातंत्र्यदिनाचीही सुटी) असूनही गर्दी नव्हती. तरीही सर्व्हिसची बोंब असल्यानं मी विचारलं, “हॉटेल मराठी माणसाचं आहे का?” होकारार्थी उत्तर आलं. मग म्हटलं, “ठीक आहे. आमचाच दोष आहे इथं आलो ते.” उत्तर आलं, “सफाई करावी लागते, अन्यथा स्वाईन फ्ल्यू व्हायचा…” हा ‘मराठी माणूस’ या टोल्यावरचा परतावा होता. त्यातून स्वाईन फ्ल्यूही आला. या सफाईचा आणि सेवेचा, सेवेचा आणि स्वाईन फ्ल्यूचा संबंध काय? पण तरी तो आलाच. एकूण, माणूस मराठी असल्याची खात्री पटली. गुमान बाहेर पडलो.
जाताजाता लोणावळ्यात गर्दी नसण्याचं कारण समजून गेलं. स्वाईन फ्ल्यू. म्हणजे, हल्ली लोक आवाहनं वगैरे पाळतात म्हणायचं!

लोणावळ्याच्या पश्चिमेला साधारण पाचेक किलोमीटर अंतरावर धरणाचा पाणलोट आलेला आहे. रस्ता बऱ्यापैकी झाडीतून जाणारा. मध्ये एक-दोन ठिकाणी तो रस्ता आहे याची निखळ कल्पना वाटसरूंना यावी अशी स्थिती. म्हणजेच, खड्डे, डांबर उखडलेलं असणं वगैरे. एका छोट्या पुलावरून गाडी थोडी वर गेली आणि डाव्या हाताला पठारी भाग दिसू लागला. दूरवर, साधारण किलोमीटरभर अंतरावर पाणी दिसत होतं. संथ पाणी.
पठारी भागात अगदी काही अंतरावरच काही मंडळी बसली होती. एक ध्वजदंड उभा होता. तिथं काही जणं ध्वजाची तयारी करीत होते. गाडी थांबली तिथं आणि आम्ही उतरलो. इथंच स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम होता. साठ-सत्तर जण होते. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय. उभं राहण्यासाठी चुन्यानं रांगा आखल्या होत्या. ध्वज लावण्याचं काम सुरू होतं.
रस्त्यावरून त्या जागेत जाताना तारेचं एक कुंपण ओलांडलं होतं. आधी त्याची वेगळी नोंद मनात झालीच नाही. आत गेल्यानंतर इकडे-तिकडे करू लागलो तसं ते कुंपण डोळ्यांत बसलं (आधी बसलं, त्यानं काही विचार पेटवले आणि संध्याकाळपर्यंत ते खुपायलाही लागलं होतं…). प्रचंड लांबवर हे कुंपण दिसत होतं. आम्ही ज्या पुलावरून आलो होतो, त्याच्या आतल्या बाजूला एख जुनाट भिंत होती. साधारणपणे अडीचशे मीटर लांबीची. तिच्या आग्नेय टोकावर एक पिवळी गोल खोली बांधलेली दिसत होती. लांबसडक अशी ही भिंत म्हणजेच जुन्या काळचं एक धरण होतं हे कळायला थोडा वेळ जावा लागला. थोडा वेळ म्हणजे तिथल्या एका कार्यकर्त्यानं सांगितल्यावर. त्या भिंतीच्या पश्चिम टोकावर ते कुंपण सुरू झालं होतं आणि पुढं पश्चिमेला डोंगरांच्या रांगात खोलवर घुसलं होतं. एखादं फार्महाऊस, एखादं मोठं शेत मी समजू शकत होतो. हे मात्र त्यापैकी नव्हतं. डोंगररांगांमध्ये खोलवर ते शिरलं होतं. म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासून ते थेट पाणवठ्याच्या कडेपर्यंतची ही जमीन आमचीच आहे हे सांगणारं कुंपण.
काही मंडळींना येण्यास अजून वेळ होता. म्हणून मग मी लोकांशी बोलू लागलो.
“ही जमीन इथल्या मूळच्या मंडळींची. स्वातंत्र्याच्या आधीच कंपनीनं धरणासाठी घेतली. ही जमीन प्रत्यक्षात धरणाच्या पाणलोटात बुडत नाही. त्यामुळं मूळ मालकांना ती परत केली पाहिजे. पण तसं होतं नाही. ज्यांची जमीन आहे मूळची, त्यांना मात्र रोजच्या भाकरीसाठी कष्टात पडावं लागलं आहे. ना पुनर्वसन, ना जमीन… कायद्यानुसार ही जमीन परत त्यांच्या हाती आली पाहिजे. पण सरकार दाद देत नाही, कंपनी तर नाहीच नाही…”
मूळच्या मालकांचे काही वारसदार तेथे हजर होते. त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार होतं. त्यात एक म्हातारपणाकडं झुकलेली महिला.
कार्यक्रम अगदी स्वच्छ होता – कंपनीच्या ताब्यात असलेली ही अतिरिक्त जमीन आपल्याला परत मिळावी यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही ती न मिळाल्यानं आता कब्जा घ्यायचा जमिनीचा. दोन बैल, नांगर तयार होता. झेंडावंदन केल्यानंतर त्या वारसदारांनी – आणि अर्थातच काही पाहुण्यांनी – एका बाजूनं नांगर घातला त्या जमिनीत. साधारण एकरभर आकाराचा चौकोन – त्याच्या सीमारेषा फक्त नांगरून आखून घेतल्या. बाकी काम नंतर. बाकी म्हणजे अशा पाच आखणी तिथं करायच्या होत्या. त्या दिवशीचं तितकं वाटप.

या भूसंपादनग्रस्तांच्या समितीतर्फे एक ७-१२ उतारा तयार करण्यात आला आहे. तो देण्याआधी शपथविधी होतो. एक प्रकारे हमीपत्र. जमीन ज्यांना दिली जात होती, त्यांच्याकडून. जमीनीवरून या भूसंपादनग्रस्तांमध्ये थोडं इकडं-तिकडं होतंच. त्यामुळं मग प्राधान्यक्रम होता. आधी भूमीहीन, मग केवळ महिला वगैरे क्रमाने. हमी इतकीच की, ही जमीन आपण कसणार आहोत. विकणार नाही. सरकारने जमिनीपोटी उद्या पैसे मागितले तर, पूर्वी जेव्हा जमीन घेतली तेव्हा ज्या पद्धतीने सरकारने पैसे दिले होते, तसेच दिले जातील. जमीनीचे तुकडे करणार नाही. जमीन भाड्याने देणार नाही वगैरे…
शपथेतील प्रत्येक गोष्टीचे उल्लंघन केले तर होणारा फायदा? वेल, त्या क्षणी शून्य. कारण जमीन खऱ्या अर्थाने अद्याप नावे झालेली नाही. जेव्हा होईल तेव्हा? लोणावळ्याच्या साधारण पाच किलोमीटर अंतरात. डोंगराच्या पायथ्याशी!!! फायद्याचे बाकी काही वर्णन नकोय.
माझी नजर जाते तिथंच असलेल्या काही मंडळींकडं. सहज एका नजरेत ही मंडळी ‘इतर’ आहेत हे ध्यानी येतंच. कारण म्हटलं तर ती सत्ताधारी मंडळी आहेत. पण अशा एका कार्यक्रमात सहभागी होण्याचा खटाटोप आहे की जो कार्यक्रम मुळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आखलेला आहे. हेतू काय असेल? अनेकानेक शक्यता… प्रामाणिक हेतू असेल. न-प्रामाणिक असेल, अप्रामाणिकही असेल… संध्याकाळी उशीरा अर्थ लागतो त्या कार्यक्रमांमध्ये वारंवार होत असलेल्या “मूळच्या, जुन्या धरणग्रस्तांनी फॉर्म भरायचा आहे… त्यांचीच दखल घेतली जाईल…” वगैरे घोषणांचा.

रा. वि. भुस्कुटे. वय पंच्याहत्तरीच्या पुढचं. ज्या धरणांच्या क्षेत्रात आम्ही आहोत, त्या मालिकेतील एक मोठं धरण म्हणजे मुळशीचं. सेनापती बापटांनी त्याविरोधात सत्याग्रह केला होता. भुस्कुटे भाऊंचे वडील त्या सत्याग्रहात होते. त्यांच्याच भाषणातून आलं की, त्यांच्या आईनाही त्यावेळी अटक झाली. पुढे भाऊ सरकारी नोकरीत होते. तहसीलदार म्हणून निवृत्त झाले. जमीन महसूल संहिता, भूसंपादन कायदा आणि एकूणच जमिनीशी संबंधित प्रत्येक कायदा, त्यामागील विचार, त्यात काय आहे आणि काय नाही – अर्थातच वंचित समुदायांच्या लेखी – हे सांगणारा हा चालता-बोलता ज्ञानकोश. भाऊंच्याच हस्ते ७-१२ उताऱ्याचं वाटप झालं होतं.
“कायद्यानुसार या अतिरिक्त जमिनी सरकारनं ताब्यात घेऊन मूळ जमीनमालकांना परत केल्या पाहिजेत. विशेष म्हणजे या जमिनीसाठी सरकारनं कंपनीशी केलेला करार केव्हाच संपला आहे. तरीही हे सारं सुरू आहे. १९४७ साली या दिवशी गोरे गेले. काळे आले…” भाऊंना कदाचित तसं म्हणायचं नसावं, पण ‘काळे’ या शब्दांत त्यांनी नेमकं वर्णन केलं की काय? मी विचारात.
कारण सांगू? प्रांताधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वीच म्हणे या अतिरिक्त जमिनी ताब्यात घेऊन मूळ जमिनमालकांना वाटण्याचा आदेश तहसीलदारांना दिला आहे. तरीही हे झालेलं नाही. म्हणूनच स्वातंत्र्यदिनी हा कब्जा सत्याग्रह होता. आणखी एक आहे. या सत्याग्रहासाठी ७-१२ देण्याकरीता त्यावर सर्वे क्रमांक टाकण्याचा संघटनेचा इरादा होता. तो मात्र तिथे त्या क्षणी नव्हता. “तहसीलदारांना विचारून घ्यायचा सर्वे क्रमांक काय आहे ते…” एक जण सुचवतात. “या जमिनीचे सर्वे क्रमांक तहसीलदारांकडे नाहीत. ते कंपनीकडे आहेत,” उत्तर येतं आणि तो विषय त्या क्षणापुरता तरी निकालात निघतो.
भाऊ सांगतात, “यात आपण काहीही बेकायदा करीत नाही. बेकायदा वर्तन असेल तर ते कंपनीचं आणि सरकारचं. आपण फक्त कायद्यानं जे सरकारनं करायचं असतं ते करायला सांगतो आहोत. एक कृती करून. त्यासाठी आपण यापुढे कायद्याशीच बांधील राहण्याचं वचन देत आहोत…”
स्वातंत्र्यदिनाचा संदर्भ येणारच. भाऊंच्या आणि मेधा पाटकरांच्या भाषणात तो आलाच. आज दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याला आपण सुरवात करतोय. हे स्वातंत्र्य आहे माणसांचे शोषण करणाऱ्या व्यवस्थेपासूनचं. टाळ्या होतात.
‘झिंदाबाद’चा नारा होतो. ‘कोण म्हणतो…’चा नारा होतो. ‘जमीन आमच्या हक्काची’चा नारा होतो.
गांधींनी सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गानंच लढा सुरू ठेवण्याचा फैसला होतो.
हे सगळं सुरू होण्याआधी अर्थातच ध्वजारोहण झालं. त्याच्या काही क्षण आधीच पाऊस सुरू झाला. जगात पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील अशा १२ ‘हॉट स्पॉट’पैकी एक असलेल्या सह्याद्रीच्या या रांगांमधले पावसाचं विक्राळ रूप काय असू शकतं याची फक्त झलक. यंदाच्या पावसाळ्यातील अतीशय जोराचा पाऊस मी प्रथमच अनुभवला. पण तो एरवी पुण्यात पडेल त्यापेक्षा कडक होता. थेंब बडवायचे अंगावर. आणि क्षणार्धात पावसाचा जोर असा यायचा की, “साठ सेकंदात टॉप गिअर”!!! नांगरून झालं आणि पावसानंही विश्रांती घेतली.
आम्ही पुढं निघतो.

लोणावळ्याच्या पूर्वेला कामशेत ओलांडून पुढे. एका फाट्यावर रस्ता चुकतो. नाही… रस्ता चुकत नाही. गावच चुकतं. ज्या गावी जायचं होतं, त्याऐवजी आम्ही भलत्याच गावाचं नाव घेतो. त्याच गावी जाऊन पोचतो. डेड एंड. समोर अक्राळविक्राळ लांब पसरलेली धरणाची भिंती. भिंतीची लांबी नजरेच्या अंदाजात सांगायची तर किलोमीटर तरी असावी. हेही त्या मालिकेतील एक धरण. किलोमीटरभर लांबीच्या या भिंतीच्या दोन्ही बाजूंना सह्याद्रीच्या रांगेतील डोंगर आहेत. प्रचंड मोहात होतो मी धरणाच्या भिंतीवर जाण्याच्या. पण आत्ताचा कार्यक्रम इथं नव्हता. त्यामुळं तिथं थांबून चालणार नव्हतं. तसेच मागे वळलो. फाट्यावरून दुसरी दिशा धरली. याच रस्त्यात एके ठिकाणी कंपनीचा एक सेटअप होता. कारंजे उडत होते. त्या सेटअपच्या पलीकडे दूरवर जलाशयाचे पाणी दिसत होते. त्याच पाण्याचे हे कारंजे होते. कंपनीच्या थोडं पुढं एका फार्मची पाटी लक्ष वेधत होती. आणखी काही अंतर गेल्यानंतर रस्त्यातच एक समूह बसलेला दिसला. आमचीच मंडळी होती.
रस्त्याच्या उजव्या हाताला डोंगराच्या रांगा खाली उतरत जातात. उजव्या हाताला पश्चिमेला दुसरं धरण आहे. ते हल्ली सरकारनं बांधलं आहे म्हणतात. त्याच्या पाठीमागे कंपनीचं एक धरण आहे. या रस्त्यापासून थोडं आतवर डोंगराचा उतार सुरू होतो तिथंपर्यंत, म्हणजे साधारण शंभर ते दोनेकशे फूट अंतरापर्यंत सपाटी आहे. ती सपाटी संपते तिथं, काही वेळेस त्याच्या आधीच तारेचं कुंपण. मघासारखंच लांबवर पसरलेलं. हजारो फुटांचं. आम्ही कुंपणाच्या आतल्या जमिनीवरच.
कहाणी थोडी वेगळी. अर्थात, वेगळी म्हणजे स्थानसापेक्ष नव्हे. ही चित्रं इथं सर्वत्र पसरलेली आहेत. समोर एखाद्या ठिकाणी येतील, एखाद्या नाही इतकंच. एके ठिकाणी अशीच अतिरिक्त जमीन आहे. पसरलेली. ती जमीन कंपनीनं मूळ मालक किंवा इतरांना खंडानं दिली आहे. खंड वगैरे आपल्या हिशेबात किरकोळ वाटतो. पण हातावर पोट असणाऱ्यांसाठी तो असतोच असतो आणि त्यातही आपल्याच जमिनीवर आपणच खंड द्यायचा हा एक भाग असतोच. मान खाली घालायला लावणारा.
या जमिनींचा खंड नोंदवणं कंपनीनं काही काळापासून बंद केलं आहे. काही काळापासून म्हणजे साधारण जमीनीची मागणी जाहीरपणे आंदोलनात्मक पवित्रा घेतल्यापासून. स्वाभाविकच आहे ते.
आता पुढचं पाऊल टाकलं गेलं आहे. या जमिनींवर वृक्षारोपण केलं जाऊ लागलं आहे. म्हणजे मागणीकर्त्यांचा दावा निखालस निकालात काढण्याचा एक मार्ग. सत्याग्रह पुन्हा तोच. त्या रोपांना कायम ठेवतच आजूबाजूला नांगर चालवून ही जमीन कसायला घ्यायची. आपला दावा कायम ठेवायचा हा त्यामागील हेतू. अर्थातच, कब्जा करून.

सकाळी पहिल्या कार्यक्रमावेळी दोन्ही बैल तसे शिस्तशीर होते. दुपारच्या या वेळी मात्र एक बैल नाठाळ होता. चांगलाच. सहजच मनात नोंद झाली, त्याचा रंग काळा होता याची; कारण दुसरा पांढरा होता (आपलेही पूर्वग्रह कसे असतात याचे एक भान त्यानिमित्तानं येऊन गेलं हे वेगळं). काही झालं तरी हा गडी सरळ चालायचाच नाही. तिरकाच. बरोबरचा सरळ चालायचा, पण हा तिरका. इतका तिरका चालायचा की औत निसटायचाच. त्यामुळं नांगरणं नीट होत नव्हतं. हाकारे दिले, छत्री बाजूला नेऊन लावली तरीही तिला ढकलत तिरकी चाल. हा अनुभव थोडा विलक्षण.
काही तरी करून मंडळींनी त्याला नियंत्रणात आणलं आणि ती जमीनही पंधराएक मिनिटं नांगरून घेतली.
आम्ही बऱ्यापैकी उंचीवर होतो. रस्त्याच्या उत्तरेला डोंगरांच्या रांगा. मागे दक्षिणेला हा कार्यक्रम. माझी नजर चहूकडे जात होती. दुपारचे अडीच-तीन झाले होते. डोंगर हिरवेगार आहेत. पावसाचे दिवस आहेत. श्रावणाचा महिना आहे. पण सूर्याचे दर्शन नाही. त्यामुळे हवा एकूण भरून गेलेली.
बैलांनी नांगर ओढायला सुरवात करण्याआधी भाषणं होतात. फार नाही. दहा-एक मिनिटं. भाषणापेक्षा त्यात इथल्या मंडळींना प्रश्न विचारून त्यांचे गाऱ्हाणे समजून घेण्याचाच भाग मोठा.
हे सुरू होतं तेव्हा पाऊस सुरू झाला होताच. छत्र्या घेऊन लोक उभे होते. माझ्या शेजारीच एका छत्रीत पाच चिमुरडे होते. मी थोडं बारकाईनं पाहिलं तर लक्षात आलं की ते चक्क चिंब भिजलेले होते आणि तरीही दाटीवाटीनं छत्रीखाली होते. कारण काय असावं? मग लक्षात आलं, रेनकोट असूनही मी आमच्या गाडीच्या आसऱ्याला उभा होतो. पावसाच्या थेंबाचे बोचकारे चुकवण्यासाठी. रेनकोट म्हणजे केवळ अंगरखा. त्यामुळं गुडघ्याच्या खाली पँट भिजलेलीच होती माझीही. तरीही हा आसरा. हे इथल्या पावसाचं वैशिष्ट्य असावं. तो पडतो असा की, त्या थेंबांनी बोचकारलं पाहिजे आपल्याला. सकाळीही तेच झालं होतं, आत्ताही तेच झालं. संध्याकाळी एक सूक्ष्म गोष्ट ध्यानी आली. दिवसभरात एकूण तीन ठिकाणी आम्ही होतो. तिन्ही ठिकाणी मुख्य सत्याग्रहाच्या वेळी असा पाऊस पडला होता. काही क्षण त्यानं सत्याग्रह रोखला होता हे पक्कं. पण तो पूर्ण रोखला गेला नाही. पाऊस थांबला की सत्याग्रह सुरूच. आणि एवीतेवीही हा सत्याग्रह म्हणजे काही एक घटना नव्हतीच. ती तर एक प्रक्रियाच आहे या लोकांसाठी. गेल्या पन्नासहून अधिक वर्षांपासून चालत आलेली. आधी सत्याग्रह म्हटलं जात नव्हतं. कृती तीच होती, आत्ता सत्याग्रह म्हटलं जातंय. कृती तीच आहे.
सगळं गाव महादेव कोळी समुदायाचं. सारेच आदिवासी. त्यांच्यासंदर्भात तर जमिनीचे कायदे आणखी थोडे वेगळे. अलीकडेच त्यांना ‘अतिक्रमीत’ जमीनी नावावर करून देण्याचा कायदा झाला आहे. भाऊंच्या भाषणात तो संदर्भ येतोच. या जमिनी त्यांच्या नावे झाल्या पाहिजेत हे खरं. एवीतेवी कंपनीच्या धरणातही त्या बुडालेल्या नाहीत. मग त्या या भूमीहिनांना, खरं तर मूळ मालकांना, द्यायला काय हरकत आहे? कंपनीनं किंवा तिच्याकडून घेऊन सरकारनंही? माझ्यासमोरचा प्रश्न साधा असतो. उत्तर मघाशीच मिळालेलं असतं. येताना रस्त्यात एका फार्म हाऊसची पाटी दिसलेली असते. आणखी काही काळात अशा आणखी काही पाट्या इथे आल्या तर… तर नवल वाटू नये. याच काळानंतर आपल्याला आणखी थोडे स्वस्त मजूर उपलब्ध झाले तर… तरीही आश्चर्य वाटू नये.

गावात एक देऊळ आहे. तिथं बसून चर्चा होते. पुढं काय करायचं याविषयी. अशा चर्चेत केवळ भूमीसंपादन, त्या जमिनी परत मिळवणं, उपोषण, सत्याग्रह असेच विषय असतात असा एक समज असावा. तसं नसतं. गावात शाळा आहे का, दवाखाना आहे का हे प्राथमिक प्रश्न असतात त्यात. त्यापलीकडे गोष्टी जातात. दवाखाना नसेल तर आरोग्याच्या हक्कासाठी काय करायचं? शाळा नसेल तर काय करायचं? कुठले अर्ज भरायचे, ते कुठं न्यायचे, त्यांचा पाठपुरावा कसा करायचा? अर्ज लिहिण्यापासून ते इतर गोष्टी. कुणी काय करायचं वगैरे तपशीलही.
यातच एक गोष्ट समोर येते. या भागात काही आरोग्य सुविधा पुरवण्याच्या जबाबदाऱ्या कंपनीवर आहेत. त्या तिनं स्वीकारल्याही आहेत. प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या मात्र नाहीत. मग त्याचाही पंचनामा करावा लागतोच. तेही ठरतं. इथंही ठरलं. आरोग्य, शिक्षण हे गावाचे हक्क. पंचायत राज व्यवस्थेत ते कसे आहेत वगैरे गोष्टी ग्रामस्थांना समजावूनही सांगितल्या जातात.
थोड्या वेळानं मी त्या बैठकीपासून देवळाच चक्कर मारतो. देवळाच्या अंगणाच्या शेवटी दगडांची उतरंड आहे. तिथं एक आश्चर्य माझ्यासाठी असतं. दगडांच्या त्या उतरंडीतून एक झाड चक्क जमिनीला समांतर उगवलेलं आहे. कसलं ते ठाऊक नाही. आंब्याच्या पानांसारखी पानं आहेत. चांगलं वाढलेलं आहे. उंची साधारण दहा एक फूट असावी. पण आधी आडवी लांबी. तीही साधारण सहा ते सात फूट. खोडाचा व्यास फूटभर. मी किंचित चकीत आहे. पण माझा मित्र म्हणतो, त्यात विशेष काही नाही. केरळात नागमंदिरे असतात. तेथे असे एक झाड असते. पवित्र झाड. ते म्हणे असे आडवेच उगवते.
मूळ केरळचा हा मित्र मराठी बोलतो तेव्हा तो महाराष्ट्राबाहेरचा आहे ही शंका यावी इतक्याच चुका करतो. त्या चुकाही लिंगभेदापेक्षा सुराच्या जास्त असतात. आमच्या अशा प्रत्येक दौऱ्यात तो असतोच. कुठल्याही आंदोलनात्मक कार्यक्रमात तो सहभागी असतो, हे माझ्या ध्यानी येतं. मी आंदोलनात्मक कार्यक्रमात नसतो हेही ध्यानी येतंच.

ही धरणं एकूण आहेत सहा. त्यासाठी कंपनीला पन्नास-साठ वर्षांपूर्वी या भागातील जमीन दिली गेली. जमीन संपादित करताना अगदी पन्नास पैसे प्रतीएकर पासूनचा दर दिला गेला आहे. अनेक गावं उठली. पुनर्वसन झालेले नाही हेही नक्की. रिलोकेशन झाले आहे. जुन्या आणि सरकारी संदर्भात रिलोकेशन. म्हणजेच जगायचं असेल तर आपले-आपले जीवनस्रोत पहायचे. संपादित केलेला आणि कंपनीच्या ताब्यात दिलेला बराचसा भूभाग प्रत्यक्ष धरणाच्या पाणलोटात बुडालेला नाही. त्यामुळे ती जमीन परत मिळावी अशी या भूसंपादनग्रस्तांची मागणी आहे. का? साधं आहे – तो त्यांच्यासाठी ‘किमान जीवनस्रोत’ ठरू शकतो. कायद्यात तर तशी तरतूद आहे असं भाऊ जेव्हा सांगतात तेव्हा त्यावर विश्वास ठेवला जातो. अगदी सरकारी अधिकारीही भाऊंचं नाव आलं की खासगीत हे सारं मान्य करतात. मंत्रीही मान्य करतात. कारण ते भाऊ बोलत नसतात. कायदाच बोलत असतो.
मग या जमिनी का मिळत नाहीत या ग्रामस्थांना? ठाऊक नाही. अनेक ठिकाणी कंपनीनं त्याच जमिनी पुन्हा ग्रामस्थांना खंडानं दिल्या आहेत. ते त्या कसताहेत. आता मात्र कुंपण घालण्याचं काम सुरू आहे. सकाळी आणि दुपारी पाहिलं ते तारेचं कुंपण होतं. संध्याकाळी ज्या गावात गेलो तिथं कॉक्रीटची भिंत होती!!!
खरं तर, ही भिंत तोडण्याचाच सत्याग्रह होणार होता. पण तो टाळला. कायद्यानं, शांततापूर्ण मार्गानं जायचं हा निर्णय असल्यानं थेट भिंत न तोडता कंपनीला नोटीस द्यायची असं ठरलं.
आम्ही भिंतीकडून गावात परतलो. पुन्हा एक छोटेखानी बैठक. मी बाहेरच थांबणं पसंत करतो. स्वाभाविक आहे – चहूबाजूला सह्याद्री उधळलेला असतो. पाऊस आहेच. बोचरा. दक्षिणेला सह्याद्रीची शिखरं खुणावताहेत. पाच वाजून गेले आहेत. सूर्याचा दिवसभरात पत्ता नव्हता, आत्ताही नाही. पण प्रकाश आहे बऱ्यापैकी. दक्षिणेकडचं ते शिखर काही वेळातच ढगांनी वेढलं जातं. अगदी डोळ्यांसमोर. पाच-सात मिनिटांचा खेळ असेल तो. गर्द ढग. आणि तसे आम्ही असतो तेथून फार तर शंभर फूट उंचीवर. आमच्या डोक्यावर मात्र नाहीत. त्या शिखराच्या पाशीच. त्या शिखराच्या खालीच तिथलं धरण आहे.
सह्याद्रीच्या इथल्या शिखरांवर आता हिरवळ चांगली रंग धरते आहे. शिखराकडं पाहताना माझं लक्ष जातं गावात रस्त्यावरचे दिव्यांचे खांब आहेत. त्यावरून घरांमध्येही वायर गेल्या आहेत. आपल्या नावे नसलेल्या जमिनी कसत त्यातून येईल ते पोटात ढकलत जगणाऱ्यांसाठी ही एक सोय मात्र आहे. त्या दिव्यांच्या प्रकाशात अभ्यास करणारे तिथून शहरांमध्ये जातात. लोणावळ्यात, पुण्यात, मुंबईत ते भेटत असतीलही. एखाद्या टपरीवर, कामगार म्हणून किंवा अशाच काही भूमिकेत. मालकाचे मजूर बनवलेले…
बाहेर पूर्ण प्रकाश आहे, पण रस्त्यावरचे दिवे पेटलेले आहेत. बाहेरच्या प्रकाशात ते फक्त पांढरे दिसतात. त्या दिव्यात असणारी ही वीज हाच तर या धरणांचा उपयोग आहे. या सहाही धरणांच्या पाण्यातून वीजच निर्माण होते.
आत्ता याचवेळी याच धरणांच्या पाण्यातून तयार होणारी वीज मुंबईला झळाळी देत असेल…

तिन्ही ठिकाणी आम्हाला पूर्ण ‘संरक्षण’ होतं. आदलेच दिवशी असं-असं आंदोलन होणार आहे हे पोलिसांना, सरकारला कळवण्यात आलं होतं. त्यामुळं खाकी गणवेषधारी होतेच. तिघे जण. एका कागदावर काही नोंदी करून ते प्रत्येक ठिकाणाहून आम्ही निघायचो तेव्हा निघायचे. काय असेल त्या कागदात? त्या कागदाची खरंच गरज आहे का? कारण, जे होणार आहे ते आधी कळवलेलं आहे. किमान पाच वर्षे गाऱ्हाण्यांचा इतिहास आहे. गरज आहे ती फक्त फैसल्याची. त्यासाठी हे करावं लागतं का?
असाच आणखी एक प्रश्न. कंपनी जेव्हा उच्च मापदंड ठरवते तेव्हा त्यात त्यात हे कुंपण वगैरे असतं का? असेल तर त्याची किंमत काय असते? कंपनी ती कशी वसूल करत असेल? शिवाय, अशा संघर्षात कागदी घोडेही खूप नाचवावे लागतात. त्याचाही खर्च मोठा असेलच ना? तरीही कंपन्या फायद्यात चालतात म्हणजे हा खर्च कुठून तरी वसूल होत असेलच. कुठून?

या लेखाच्या अगदी सुरवातीला एक उद्धृत आहे. तो मजकूर या कंपनीच्या आपलं उद्दिष्ट्य किंवा ध्येय सांगणाऱ्या निवेदनातील आहे.
गाऱ्हाणी साधी आहेत – अतिरिक्त जमीन परत द्या, आधी घेतलेल्या जमिनीची योग्य भरपाई द्या, गावठाणं द्या… थोडक्यात, ‘किमान’ जगू द्या. मिनिमलीस्ट जगणं या अर्थानं किमान हा शब्द आहे म्हणून त्याला अवतरण.
गाऱ्हाणी पूर्ण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. कंपनीचीही आहे. म्हणूनच कंपनीचं ध्येय वगैरे पाहिलं. खरं तर, पाहण्याची गरज नाही. ही कंपनी आहे ‘टाटा’ समुहातील. किमान काही चारित्र्य असणारा, अशी ज्यांची ख्याती आहे त्या समुहातील. पण…
जमिनी हिसकावताना पाहिलं. जमिनी हिसकावल्यानंतर लगेचचं जगणं पाहिलं. पुनर्वसनासाठी जमिनी दिल्यानंतरचंही पाहिलं. इथं एक वेगळं पहायला मिळालं. जमिनी परत मिळण्याची व्यवस्था असूनही पदरी वंचित जिणं आल्याचा हा अनुभव. ही सगळी व्यवस्था. काही देण्याची… किंबहुना बरंच काही काढून घेण्याची!
हा सारा कागदांचा खेळ. कायद्यात तरतूद आहे, त्यानुसार वागायचे हे सरकारचे काम. इतके सारे सोपे असते खरे तर. पण कागद आणि कायदा येतो तेव्हा ‘का’ आलेलाच असतो. मग त्यापाठोपाठ ‘काय’, ‘कसे’, ‘कधी’, ‘कोणी’, ‘कोठे’ असे प्रश्न येतात. सारं काही अडतं. खेळ मोठा होतो. जीवनमरणाचा होतो. या भूमीपुत्रांसाठी तो झाला आहेच.
थंड हवेचं ठिकाण म्हणून लोणावळा असेलही प्रसिद्ध. पण त्याच्या शेजारच्या परिसराचा ‘हॉट स्पॉट’ असाही होतो आहे आता!!!

Advertisements

काही नोंदी अशातशाच… – ३

ऑगस्ट 15, 2010

त्या नगरीत जाण्यासाठी प्रवेश मिळत नाही, त्यामुळं तुम्ही नदीला उजवीकडे ठेवून त्या रस्त्यानं पुढं जा आणि धरण ओंलांडून मागील बाजूनं गावात पोचा, असा सल्ला एरवी माझ्या या उद्योगांशी थेट संबंध नसलेल्या मित्रानं दिला तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. त्या नगरीची तीच ‘खासीयत’ आहे. तिच्याविरोधातील अनेक गाऱ्हाण्यांपैकी हे एक महत्त्वाचे गाऱ्हाणे, नगरीच्या आतल्या बाजूला असलेल्या गावातील ग्रामस्थांचे. ग्रामस्थांची संख्या किती वगैरे तपशिलांमध्ये पडण्यात अर्थ नाही. एका ग्रामस्थाचा रस्ता बंद असला काय किंवा आणखी काही. परिणाम एकच असतो. मी त्या क्षणी त्या मित्राला एवढंच सांगितलं की, मला रस्ता ठाऊक नाही. सोबतचे सहकारी नेतील बरोबर. गाडीतून आम्ही निघालो तेव्हा पहिल्याच टोलनाक्याला एक छोटी घटना घडलीच. आमच्यासमवेत आतल्या एका गावातील ग्रामस्थ होते, ते म्हणत होते गावाचं नाव सांगा, टोल देऊ नका. गाडीच्या चालकाला ते नको होतं. त्यांनी शांतपणे पैसे काढले आणि दिले. मला काही तरी आठवलं. मला सल्ला देणाऱ्या याच मित्रासोबत मी त्याच्या गावी गेलो होतो त्याच मार्गावरून. त्यावेळी आम्ही टोल दिला नव्हता. मीही काही बोललो नव्हतो. माझ्या ध्यानी इतकंच होतं की, इथून पुढं असलेल्या गावांमधल्या रहिवाशांना रोज पुण्याला यायचं असतं, रोजच्या वापराबद्दल यांनी टोल द्यायचा झाला तर रस्त्याचा वापर त्यांना कितीत पडेल? पण आत्ता टोल दिला गेला. थोडे अंतर काटून गेलो आणि सहप्रवाशाकडून माहिती आली – या रस्त्यासाठी त्या नगरीच्या प्रवेशद्वारापर्यंतच्या कामासाठी खासदार आणि आमदार निधीतून पैसा आला होताच. तरीही टोल? बहुदा, त्या निधीतून आलेल्या पैशातून रस्ता तसाच झाला असावा, जसा तो होतो आणि पुढे खासगीतून रस्ता करूया म्हणायला भाग पाडतो. म्हणून टोल असावा.
आपण टोलसमर्थक आहोत की विरोधक या प्रश्नाचे उत्तर मला आजवर गवसलेले नाही. इतर अनेक संभ्रमांपैकी, विचारांतील गोंधळांपैकी हे एक नाहीये. कारण हा संभ्रम आहे तो आपण नेमक्या कोणत्या व्यवस्थेचे समर्थक आहोत हा. तो गंभीर आहे आणि सोडवावा लागेल असं मनालाच बजावत असतानाच माझ्या ध्यानी येतं, याही मामल्यात ‘युनिफाईड फील्ड थेअरी’ शक्य नाहीये!

आमच्याबरोबर अमेरिकेतून आलेली एक युवती आहे. एका एक्स्चेंज कार्यक्रमात एक वर्ष येथे राहून ती विविध सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास करणार आहे. तशी कल्पना एकूण तिच्या आविर्भावावरून येतेच, पण तरीही मी संध्याकाळी खात्री करून घेतो. आपण कोणत्या भागात चाललो आहे, तिथे काय आहे वगैरे प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा सुरू झालेली असते. सहप्रवासी तिला त्यासंबंधी माहिती देत असतात. भारत, भारतातील दारिद्र्य, विकासाची कल्पना, शेती अशा मुद्यांना स्पर्श करीत चर्चा सुरू असते. लोकांची लढण्याची क्षमता वगैरे विषयही चर्चेत असतात. त्यात अर्थातच, लोकांच्या परिस्थितीचा मुद्दा असतोच. बोलता-बोलता एक सहप्रवासी म्हणतो, भारतात “थर्स्ट अँड हंगर” खूप आहे. ताकद कमी पडणे असे काही त्याला सुचवायचे असते. लगेचच दुसरा सहप्रवासी म्हणतो, “थर्स्ट अँड हंगर वगैरे नाही. साधनस्रोतांचे वितरण/वाटप असमान झाले आहे. विषमता आहे ही फक्त.” पहिला त्याला मान डोलावत असतानाच तिसऱ्याकडून प्रश्न येतो, “पण थर्स्ट अँड हंगर म्हणणार तरी कशाला?”
खरं असतं ते. नेमकी, आवश्यक आणि रास्त संदर्भचौकटीतून पाहिलं तरच, अर्थात. म्हणजे, मला आठवतं त्यानुसार सातपुड्यात डोंगर उतरून पाणी आणावयास लागते म्हणून त्यांचे पुनर्वसन झालेच पाहिजे असे म्हणणारे मुंबईकर (हे केवळ उदाहरणासाठी, वास्तवातील एका घटनेच्या आधारे) लोकलमधून लटकत करीत असतात. ती पाहून सातपुड्यातील तो आदिवासी तसेच काहीसे म्हणत असावा – यांचंही यांच्या गावातून ते इतके लटकत जिथे जातात तिथं पुनर्वसन केलं पाहिजे. तसंच हे. दारिद्र्य कशाला म्हणायचं? समृद्धी म्हणजे काय? सुखी-समाधानी जीवन कशाला म्हणायचं? प्रश्न इथे येऊन पोचतातच. सुरवात मारे जमीनीच्या कब्जावरून झाली असेल, पाण्यावरून असेल किंवा आणखी कशावरूनही. प्रश्न पुढे तिथंच येऊन थांबतात. विकास म्हणजे काय?

गावकऱ्यांच्या तक्रारी तशा आधीही ऐकल्या होत्याच. कागदपत्रेही पाहिली होती. पण प्रत्यक्ष जाऊन परिस्थिती पाहणे हे वेगळंच. दौऱ्याचा हेतू तेवढाच. त्यानिमित्ताने इतरही अनेक गोष्टी कळतात. मुख्य म्हणजे अशा प्रक्रियांचंही एक वेगळंच ‘इकॉनॉमिक्स’ असतं. या प्रक्रियांच्या हाती असलेली हत्यारे, भांडवल वगैरेंचा त्यात समावेश असतो. या गोष्टी पैशांच्या भाषेत मोजता येत नसतात. एखाद्या संघर्षामध्ये महिलांची शक्ती हे भांडवल असतं, एखाद्या संघर्षामध्ये वकीलांची ताकद हे भांडवल असू शकतं. कुठं सत्याग्रह हे हत्यार असेल, तर कुठं उपोषण. कोणी नुसताच अॅडव्होकसीला असं हत्यार मानत असेल. त्याहीपलीकडे एक महत्त्वाचं भांडवल या संघर्षामध्ये असावं लागतं. ते म्हणजे प्रत्यक्ष प्रभावित जनतेचा सहभाग. तो मात्र प्रत्यक्ष आघाडीवर गेल्याखेरीज पूर्ण समजत नसतो. हे दौरे त्यासाठी कामी येतात. इथं आमच्यासमोरचा समुदाय शंभराच्या घरात होता.
गाऱ्हाणं प्रामुख्यानं सारखंच – जमिनीशी संबंधित. “आमची जमीन हिरावली गेली आहे. खासगी जमीन असून, त्यातून रस्ते काढले जाताहेत किंवा मग शेजारी सुरू असलेल्या सुरूंगफोडीमुळे आमची घरं मोडकळीस आली आहेत.” मग कागदपत्रं समोर येतात. त्यात अर्थातच ७/१२ उतारा असतोच. चारेक दिवसांपूर्वी एक ७/१२ पाहिला होता. तो होता एका आदिवासीच्या जमिनीचा. आदिवासीची जमीन बिगरआदिवासीला खरेदी करताच येत नाही. कायद्यानेच त्याला बंदी आहे. पंधरा वर्षांची ही धारणा त्या दिवशी क्षणात कोलमडली होती. त्या ७/१२ उताऱ्यावर चक्क एका ख्रिश्चनाचे नाव होते. चक्क अशासाठी की या गावाचा ख्रिश्चनांशी संबंध आला असेलच तर तो त्यांच्या फिरतीतूनच. आज समोरचा ७/१२ वेगळीच कहाणी सांगत होता. नावं हिंदूच होती. पण थेट आंध्र प्रदेशातील. एक सिंधी आडनावही दिसलं. या भागातील जमिनींच्या खरेदीत दलालांचा मोठा सुळसुळाट झाल्याचे ऐकून होतो. त्या नगरीची उभारणी करणाऱ्या कंपनीने त्यांचा ‘सुयोग्य’ वापर केल्याचे आरोप होतेच. आता इथं समोर आलेली नावं पाहून तो आरोप नव्हे, वस्तुस्थिती आहे असे म्हणण्याची वेळ आली. सामाजिक प्रक्रियातील ‘इकॉनॉमिक्स’ तपासता-तपासता व्यावसायीक इकॉनॉमिक्सचा हा आविष्कार नवे संदर्भ देऊन गेला त्या तपासणीसाठी.

सरकारी काम आणि सहा महिने थांब हा तुमचा – आमचा अनुभव. सरकारचा एक फास्ट ट्रॅकही असतो. अधिकृत आणि अनधिकृत – दोन्हीही. इथं या प्रकल्पात फास्ट ट्रॅक आहे. तो अनधिकृत आहे. फास्ट ट्रॅकचा अर्थ केवळ प्रक्रियेची गतीमानता असा नाही. पुरूषी व्यवस्थेत ‘शी इज फास्ट’ यातल्या ‘फास्ट’मध्ये जे अभिप्रेत असतं ते इथं आहे. सरकार असंही फास्ट असतंच. जमिनीसंदर्भातील म्युटेशनच्या नोंदी एरवी सहा-सहा महिने होणं मुश्कील असतं. इथं एक प्रकरण असं आहे की जिथं या नोंदी एका दिवसात झाल्या आहेत.
लोकच सांगतात, कंपनीसाठी खरेदीखत एका रात्रीत करून देतात, पण आमच्या घराचा काही विषय असला की मग मात्र वेळ. किती ते मोजायचं नाही. ब्लास्टिंगमुळं घरांची मोडतोड झाल्याचा विषय पंधरवड्यापासून आहे, पण यंत्रणा हलत नाही. ना कंपनीची, ना सरकारची. एका प्रकरणात खासगी जागेतील झाड कंपनीनं कापल्याचा आक्षेप आहे. तशी तक्रार दिली पोलिसांकडं तर त्यांचे हात वर. फास्ट सरकार हे असं आहे.
कागदपत्रं पाहिली तर इतर काही गोष्टी स्पष्ट होतात. कंपनीचा मुद्रांकमाफीसाठी अर्ज आला आणि दुसऱ्याच दिवशी माफी मिळालीदेखील. पाण्याचा वापर, त्यावरील अधिकार वगैरे बांबीसंबंधातील परवाने कंपनीला कसे मिळाले आहेत हे पाहिलं की सरकारी यंत्रणा काय क्षमतेनं काम करू शकते हे कळतं. आणि तिनं तसं काम केलं तर या देशाची महासत्ता होण्याची स्वप्नं वगैरे पाहण्याची वेळ येणार नाही. ती आधीच झालेली असेल.
प्रश्न असतो वंगणाचा. ते पुरेसं असलं, की मग एरवीचा वेग पाहिला तर या यंत्रणेचा वेग त्यावेळी प्रकाशाचा वेग असतो असं म्हणायला हरकत नाही. सापेक्ष वेग!

महिलांची संख्या, महिलांचा आक्रमकपणा, महिलांची कल्पकता हे अशा अनेक संघर्षांमध्ये एक मोठं भांडवल असतं. कर्जाऊ भांडवलं नव्हे. घरचं भांडवल. त्यांच्या डोक्यातून येणाऱ्या कल्पना, त्यांच्याकडून उत्स्फूर्तपणे होणाऱ्या गोष्टी या संघर्षांची हत्यारं असतात. दणादण बोलणाऱ्या महिला हीच इथलीही ताकद असावी. त्या बोलतात तेव्हा समोरच्याचं काम फक्त आपलं बोलणं ऐकावं हेच असतं हीच त्यांची समजूत असते. पुन्हा समोरची व्यक्ती ऐकत असो वा नसो, आपलं गाऱ्हाणं मोठ्या आवाजात त्या मांडत राहतात. सारखं-सारखं “ए, गपाआ…” असं दामटावं लागत होतं. एक-दोन मिनिटांची शांतता आणि पुन्हा त्यांचे आवाज घुमायचे. कलकलाटही वाटायचा काही वेळेस. बहुतेक महिला विशी-तिशीतल्या. एक-दोघी पन्नाशी ओलांडलेल्या. बोलण्यात सगळ्याच सारख्या. म्हणजे, त्यांच्यापैकी प्रत्येकीनं नुसतं बोलायचं ठरवलं तरी समोरचा निम्मा होऊन जाईल. पण एकमेकींशी एकाचवेळी बोलण्याच्या चावडी पद्धतीमुळं त्या निष्प्रभ ठरण्याचा धोका होता. अर्थात, ही सगळी हत्यारं कशी वापरावयाची असतात याचं भान या सामाजिक संघर्षांना आपसूकही येत असतंच. मी इथं टिपतोय ही तशी प्राथमिक अवस्था आहे.
सगळ्या महिलांबाबत एक गोष्ट लक्षवेधी होती. प्रत्येकीच्या अंबाड्यावर फुलांची एक वेणी होती. चांदीच्या कलाबूताची पेरणी असलेली. पांढरी, लाल, पिवळी, निळी अशी फुलं. लांबून पाहिलं तर वाटावं नैसर्गिकच आहेत. पण वास्तवात कृत्रिम. अर्थात, ही माहिती मला तिथल्याच एकानं दिली. प्रत्येकीच्या कपाळावर ठसठशीत कुंकू. चापूनचोपून बसवलेले केस. हमखाल तेल लावलेले. अगदी एका साताठ वर्षाच्या चिमुरडीपासून साठीवरच्या एका म्हातारीपर्यंत. एकूण साधासाच मेकअप. पण जाणीवपूर्वक केलेला. आणि त्यांचा तो मूळचा काळा-सावळा वर्ण त्यात खुलून दिसायचा. त्या रंगाला लाभलेलं ते एरवी न दिसणारं विलक्षण तेज या साध्या मेकअपमुळं आलं आहे की, मूळचंच हा प्रश्न अनुत्तरित राहिला.

एखाद्या मोठ्या प्रकल्पाची उभारणी सुरू असते तेव्हा तेथील काही समस्या साऱख्याच असतात. एक तर या प्रकल्पांमुळे तिथं येणाऱ्यांची संस्कृती भिन्न असते. त्यामुळे सांस्कृतिक अभिसरणाची एक प्रक्रियाही कमी-अधिक प्रमाणात तेथे होत असते अनेकदा त्याला सांस्कृतिक संघर्षाची किनारही लाभलेली असते. असे अनुभव याआधी मी घेतले आहेत. येथे एक अनुभव होता जो आजच्या पूर्वी काही दशके शोभला असता. हा संघर्ष सांस्कृतिक आहे, आर्थिक आहे, एक वेगळा वर्गसंघर्षही असावा. कंपनीराज असं त्याचं वर्णन करता येऊ शकतं. खोलात जाऊन पाहिलं तर अनेकदा ब्रिटिशांचं परवडलं, पण स्वतंत्र भारतातले हे ब्रिटिश नकोत असंही वाटून जावं.
चर्चा सुरू असतानाच एका बाईचा आवाज एकदम चढला. मी इतर कोणाशी तरी बोलत होतो. त्या आवाजाने एकदम लक्ष वेधलं गेलं. मी पुढं सरकून बारकाईनं ऐकू लागलो. त्या नगरीची उभारणी करणाऱ्या कंपनीशी सुरू असलेला हा संघर्ष, त्यामुळं गाऱ्हाणं कंपनीविरोधातीलच, पण स्वरूप वेगळं. या कंपनीनं त्या पहाडी परिसरात लांबवर पक्की, बऱ्यापैकी दर्जाची (बऱ्यापैकी म्हणजे, अशा नगरींमध्ये असतात तशी, गुळगुळीत) डांबरी सडक केली आहे. या सडकेवरून डंपर, ट्रक, ट्रॅक्टर या मालवाहू आणि स्कॉर्पिओ, क्वालीस, सुमो, सिटी यासारख्या माणसांना वाहून नेणाऱ्या गाड्यांची भरधाव ये-जा सुरू असते. लोकांच्या म्हणण्यानुसार अनेकदा या गाड्यांनी रस्त्यावरच्या उतारूंना धक्के मारून पाडलं आहे. अशा काही घटनांनतर मग गावची पोरं चिडतात. गाडी अडवतात आणि धरून ठोकतात ड्रायव्हरला. अशाच एका प्रकरणात या माऊलीच्या पोरावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केस घातली. पोलिसांनी पैशांची मागणी केली आणि अन्यथा खेटे घालावे लागतील असं सांगितलं. इथंपर्यंत ठीक होतं. मी मागं लोकांच्या वर्तुळात होतो. त्यातून आणखी एक वेगळीच गोष्ट समोर आली. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी कंपनीच्या गाडीच्या ड्रायव्हरलाच ‘तोडलं’ होतं. एख लाखाचा व्यवहार झाला होता म्हणे तो. असो.
अपघातांचं हे अर्थकारण नाहीये नुसतं. अशी एकाददुसरी केस टाकली गेली की, लढणाऱ्यानं चक्रव्यूहाच्या पहिल्या व्यूहात प्रवेश केला हे गृहीत धरावं. पुन्हा इथं ताकदीची विषमता प्रचंड असते. सारी सरकारी यंत्रणा कंपनीच्या बाजूला, पोलीस त्यांचेच. सामग्री त्यांच्याकडे. पस्तीस मैल अंतरावरच्या कोर्टात जायचं म्हटलं की हातावर पोट असलेल्यांच्या पोटात गोळा येतोच. मग या विषमतेवर मात करण्यासाठी संघटित शक्ती हाच मार्ग मानायचा. संघटित म्हटलं की पुन्हा खर्चाचा प्रश्न आला. वाढतच जातं हेदेखील. या विश्वाचा सातत्याने विस्तार होतोय असं म्हणतात. ही विस्ताराची किमया किंचित वेगळ्या अर्थाने भांडवलशाहीत तर अंगभूतच आहे. त्याविरोधात उभे राहू पाहणाऱ्यांनाही हा साधनस्रोत विनियोगाचा ‘विस्तार’ चुकलेला नाहीच तर…!

संघर्षातील साधनस्रोतांचा एक वेगळाच खेळ बैठकीतच पहायला मिळाला. ही बैठक सुरू असतानाच बाहेर रस्त्यालगत एख मोठी गाडी येऊन थांबली. एक पन्नाशीचे चष्मेवाले गृहस्थ त्यातून आले. आरामात किंचित डुलक्या चालीनं येऊन ते लोकांच्या रिंगणातच बैठक मारून बसले. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी आहेत असा खुलासा लोकांतून झाला. आपण हे काय सुरू आहे ते समजून घेण्यासाठी आलोय असा खुलासा त्या अधिकाऱ्यानेही दिला. पण त्यांना स्पष्ट कल्पना दिली गेली लोकांच्या प्रतिनिधींकडून, “ही ग्रामस्थांची मिटिंग आहे. या मिटिंगमध्ये त्यांची उपस्थिती अपेक्षित नाही. ही मिटिंग झाल्यानंतर भेटता येईल. नव्हे काही इश्यूज असल्याने भेटूच.”
जनसंपर्काचं आपलं काम वगैरे ते बोलू लागले. दोन-चार वाक्यं ऐकून घेऊन त्यांना संयमानं परत पाठवण्यात आलं. आले तसे ते चेहऱ्यावर काहीही न दाखवता परतले.
सहजच काही जुन्या गोष्टी आठवल्या. अशा बैठकांना एलआयबी या सरकारच्या, माझ्या लेखी हेरगिरीसाठी अत्यंत निर्बुद्ध, खात्याचे कर्मचारी असतात. बैठकीच्या ठिकाणी चपला बाहेर काढून ते आत येतात, तेव्हाच समजतं हे एलआयबीचे लोक आहेत. आणि मग बैठकीचा सूर बदलतो. स्वाभाविकच आहे. सरकारला अशा मूव्हमेंट्समध्ये आत काय चालतं हे न कळण्याचं, आणि कदाचित या अज्ञानापोटीच अनुचित प्रतिसाद मिळण्याचं, कारण काय असावं हे यातून कळावं.
हे लढे म्हणजे एक युद्धच असतं. त्यात साऱ्याच युद्धसदृष्य गोष्टी घडतात. हेरगिरी त्याला अपवाद कशी असावी? कधी ती डिप्लोमसीचं रुप घेते, कधी अंडरकव्हर मार्गानं चालते इतकंच.

गाऱ्हाणी ऐकल्यानंतर लोकांच्या एकूण असं लक्षात आलं की, कंपनीला जाऊन गाठावं लागेलच. एव्हाना लोकांची संख्या थोडी घटली होती. निघालो. अंतर दहा किलोमीटरचं. काही मंडळी चालत निघाली, काही जिपनं. मी जिपमध्ये पुढं होतं. दोनेक किलोमीटर अंतर गेलो आणि जीप थांबवली आमच्याच मंडळींनी. आम्ही उतरलो. एख ट्रक मागून येत होता. तो अडवून जायचं असं ठरलं. जीप पुन्हा इतरांना घेण्यासाठी माघारी. रस्ताच असा की, जिपला वाकडं वळण घेऊन जावं लागलं आणि तोवर मागून निघालेली मंडळी चालत आता वाहनांसाठी बंद केलेल्या रस्त्यावरून आलीदेखील. एक ट्रक थांबवून त्यातून सारे निघालो. कंपनीच्या ऑफिसचे नाव नगरभवन आहे. गोंडस नाव. अलीकडेच एक आलीशान हॉटेल. त्या ऑफिसच्या अलीकडे दीडेक किलोमीटरवर थांबून तेथून चालत निघालो.
आलीशान गाड्या रस्त्यावरून पळताहेत. हेल्मेट घातलेले अधिकारी, कर्मचारी सगळीकडे. सुरक्षेची व्यवस्था कडेकोट. सहा फुटाच्या वरचे करारी आणि करड्या नजरेचे सुरक्षा रक्षक चहुकडे. चारी बाजूंनी केवळ काचा असलेली एक आलीशान छोटीशी बस त्या हॉटेलच्या शेजारी थांबलेली असते. माझा सहप्रवासी माहिती देतो, कंपनीचे अध्यक्ष हेलिकॉप्टरने येतात. उजवीकडे वर खूण करून तो सांगतो, तिथं हेलिपॅड आहे. तेथून ते या बसने येतात. चारी बाजूंनी काचा. त्यामुळे चहुकडे काय सुरू आहे हे त्यांना कळतं. तिथंच एक छोटी आगगाडी आहे. रस्त्यावर धावू शकणारी. पर्यटकांसाठी.
नगरभवनमध्ये प्रवेश करतो तेव्हा तेथे गर्दी असते. दोन्ही कॉन्फरन्स रूम भरलेल्या असतात. आम्ही बाहेर स्वागत कक्षातच असतो. एका क्षणात लक्षात येतं की अरे इथं तर आपल्याकडे प्रत्येक जण एखाद्या परग्रहावरून आल्यासारख्या नजरेनंच सारे पाहताहेत. मग कळतं की आम्ही तिथं अगदी ऑड असतो (माझ्या सहकाऱ्यांना हे पटणार नाही, ते म्हणतील आपण बरोबर आहोत, ऑड असतील तर तेच आहेत तिथले लोक). खेडवळपणा, पुरूषांच्या डोक्यावर गांधीटोप्या, बायकांच्या अंबाड्यातील त्या चकाकत्या वेण्या, पायात काही आहे-नाही. हे आमचे वेष. तिथं सारं कसं चकचकीत. इन केलेले शर्ट, पट्टा, कमरेला मोबाईल, वॉकी-टॉकी. हातात नोटपॅड, काहींच्या हाती लॅपटॉप वगैरे. मी विचार करतोय हे सांधणारा पूल तरी असू शकतो का?
पहिला अर्धा तास पाणीदेखील मिळत नाही. सांगावं लागतं, किमान बाबांनो पाणी पाजा. मग चार ग्लासच्या तीन-चार फेऱ्या होतात. भागली तेवढ्यांची तहान भागली.
काही वेळातच कंपनीचे एक अधिकारी येतात. चर्चा करावयाची असे ठरते. त्यासाठी एकही कॉन्फरन्स रूम नसतेच. मग मंडळी खाली एका मोकळ्या जागेत जातात. गावकरी फरशीवरच बसतात, अधिकारी उभेच. वर मान करून बोलायला गावकऱ्यांना भाग पाडून अधिकाऱ्यांनी पहिला डाव जिंकलेला असतो. अर्थात, इथं वर मान किंवा खाली मान मानणाऱ्यांपैकी गावकरी नसल्यानं ते यश तसं निर्भेळ नसतं हे पुढं कळतं.
काही वेळातच ट्रॅक स्यूट आणि जर्किन घातलेले पाच-सहा तरूण तिथं येतात. मला आधी कळतच नाही इथं खेळाडू कुठून आले? बारकाईनं पाहतो तेव्हा ध्यानी येतं, हे खेळाडू नव्हेत. खिलाडी आहेत. सेक्युरिटी. सहा फुटांवरचीच उंची. कमांडो भासावेत असे. करड्या नजरेनंच त्यांच्या खाणाखुणा सुरू असतात. मी उभा असतो तिथून एकाला जायचं असतं. तो इतक्या कणखरपणे मला लोटतो की त्या बळाची चांगलीच जाणीव होऊन जाते.
बळाची हा जाणीव एका गोष्टीची कल्पना देते, या लोकांचा इथला संघर्ष काय असावा! इथं माझा कसलाही हितसंबंध नसताना हा बळाचा प्रयोग. ज्यांचा हितसंबंध कंपनीच्या हितसंबंधाच्या विरोधात जातो त्यांच्याबाबत काय होत असेल? विशेषतः कमरेला रिव्हॉल्वर लावून येणाऱ्या सुरक्षा रक्षकाला पाहून…
मी विचार करणं सोडून देतो.
कंपनीकडून चहा येतो साऱ्यांसाठी. फोटोही काढले जातात. नावं, फोन नंबर टिपले जातात. एकूण बिझनेस इण्टिलिजन्समध्ये थोडी भर पडली असावी. थोडं सीएसआरही झालं असावं.

हे “कंपनी राज” आहे. १९४७ च्या आधीचं काय असावं हे ज्यांना ठाऊक नाही, त्यांनी इथं येऊन जरूर राहून पाहावं असं. कंपनी राजच असल्यामुळं इथली सारीच मंडळी निर्दोष, निष्पाप आहेत असं खचितच नाही. त्यावेळी कंपनीविरुद्ध झगडताना काही पॅसिव्ह होते, काही लढतच नव्हते, काही लढायचं कशाला म्हणायचे, तसे इथेही आहेतच. पण म्हणून स्वातंत्र्य मागणारे चुकीचे होते असं म्हणता येत नाही. तसंच इथंही आहे.
चर्चा संपते आणि आम्ही निघण्याच्या तयारीत असतो. गावकऱ्यांचा आवाज वाढलेलाच असतो, काही गोष्टी आपापसात सुरू असतात. माझ्या सहप्रवाशाबरोबर बोलत असतो. इथंही एक युद्ध असतंच. हितसंबंधांचं. मी म्हणतो, धिस टू इज अ क्लास वॉर. शेती असणारा विरुद्ध नसणारा, शेती कंपनीला दिलेला विरुद्ध न दिलेला, पाणी असणारा विरुद्ध नसणारा अशा या लढाया. तो मित्र सहजच बोलून एक वास्तव सांगून जातो, “अ कास्ट वॉर टू.”
मी फक्त मान डोलावतो.
सामाजिक की राजकीय संघर्ष आधी? चिरंतन चालत आलेला प्रश्न. इथं तरी तो का सुटावा? शेवटी मी आरंभी म्हटलं तसं, याही मामल्यात एक म्हणून उत्तर नसतंच…


काही नोंदी अशातशाच… २

ऑगस्ट 15, 2010

‘कोकणकडा’ एवढाच शब्द खरं तर या प्रवासाला जाण्यासाठी पुरेसा होता. पण तेवढंच नव्हतं. त्याहीपलीकडे काही गोष्टी होत्या. पहिली म्हणजे जायचं होतं तो भाग आंबेगाव तालुक्यातला होता. जैववैविध्याच्या दृष्टीने सह्याद्रीच्या रांगा या विश्वातील मोजक्या ‘हॉटस्पॉट’पैकी एक. त्यात भीमाशंकरचं अरण्य (सरकारदरबारी ते ‘अभयारण्य’ही आहे) महत्त्वाचं. त्याचा थोडा भाग पाहण्याची ही संधी होती. दुसरं कारण होतं डिंभे धरण. कधी तरी एकदा पूर्ण पुनर्वसन झालेलं धरण असं त्याचं वर्णन झाल्याची बातमी वाचली होती. वास्तव अर्थातच वेगळं होतं. निघालो होतो ते धरणाच्या आतल्या गावांमध्येच. जाण्याचं ठरलं तेव्हा थोडी चौकशी केली. त्यावेळी समोर आलेली माहिती हलवून टाकणारी होती. ‘लोकसत्ता’मधील (बहुदा पांडुरंग गायकवाड या माझ्या मित्रानंच लिहिलेली) ‘कोंडलेली गावं’ ही वृत्तमालिका या गावांनी रस्त्यासाठी केलेल्या संघर्षावर आधारलेली होती. तिची आठवण निघाली. त्यामुळंही जाण्याचं नक्की झालं. महादेव कोळी आणि कातकऱ्यांची या भागात वस्ती. याआधी पावऱ्यांमध्ये गेलो होतो, कोकण्यांमध्ये गेलो होतो, भिल्लांमध्ये गेलो होतो. महादेव कोळी आणि कातकरी मात्र राहिले होते (तसे अजूनही बरेच राहिले आहेत). मिलिंद बोकिलांच्या ‘कातकरी: विकास की विस्थापन’ या पुस्तकातून कातकऱ्यांची थोडी ओळख झाली होती. त्याआधी अर्थातच ‘जेव्हा माणूस…’मधून. या साऱ्यांनाही व्यापून घेणारं आणखी एक कारण म्हणजे देवराई पहायची संधी. ही सगळी कारणं टप्प्याटप्प्याने पूर्ण होत गेली.

साधारण चौतीस वर्षांपूर्वीची ही घटना आहे. खरगपूरच्या आयआयटीमधून आनंद हा युवक पुण्यात आला. कँपस इंटरव्ह्यूतून टेल्कोत त्याची निवड झाली होती. टेल्कोत काम करताना तो डेक्कन वगैरे परिसरात बॅचलर्स लाईफ जगायचा. सामाजिक भान होतं. त्यामुळं त्यातूनच टेल्कोतील कामगारांशी, पुण्यातील इतर अशाच जनसमुदायांशी नातं निर्माण करावं असं त्याला वाटू लागलं. अडचण एकच होती, हा सारा वर्ग बोलायचा मराठीमध्ये. आनंदचा मराठीशी संबंध कुठला? मग त्यानं ठरवलं मराठी शिकून घ्यायची. स्वारी शोध घेत आपटे प्रशालेत जाऊन पोचली. तेथे कुसुम नावाची शिक्षिका होती. तिच्याकडे आनंदनं मराठीचा पाठ लावला. अर्थात, आधी कुसुमनं विचारून घेतलं होतं. “परीक्षा वगैरे द्यावयाची आहे का?” आनंदचं उत्तर अर्थातच ‘नाही’ हे होतं. “खूप परीक्षा दिल्यात, आता नाही. भाषा शिकायची आहे.” मग कुसुमनं मराठीची ओळख करून दिली आणि आनंदला थेट मराठी भावविश्वाच्याच ‘दरबारा’त नेलं. त्यात पु. ल. होते, मराठी नाटकं होती, इतर असंख्य पुस्तकंही असावीत. आनंद मराठी शिकत गेला. आज तो इतका मराठी आहे की उच्चारांमधील मराठीपणाचा किंचित अभाव सोडला तर एरवी संशयदेखील येणार नाही.
आनंदला सारे मामा म्हणतात. का ते ठाऊक नाही. पण साऱ्यांचंच पाहून मीही त्याला ‘आनंदमामा’ म्हटलं तेव्हा, “केला का माझा मामा?” असं विचारण्याइतका तो मराठी आहे.
आनंद म्हणजे ‘शाश्वत’ आणि ‘एकजूट’च्या दोन आधारस्तंभांपैकी एक – आनंद कपूर. दुसरा आधारस्तंभ म्हणजे कुसुम कर्णीक. आपटे प्रशालेतील तीच शिक्षिका. आंबेगाव तालुक्यातील असंख्य कातकरी, महादेव कोळ्यांच्या कुसुमताई!
‘शाश्वत’ ही संस्था, तर ‘एकजूट’ ही संघटना. ‘एकजूट’ संघर्षाच्या मार्गावर, त्या मार्गाला पूरक विकासाचे काम ‘शाश्वत’चे.

आघाण्याच्या शाळेत आम्हा पाहुण्यांची सोय होती. हे गाव अवघ्या शंभरेक (अधिकतम) लोकवस्तीचं. शाळेचं नाव वनदेव विद्यामंदीर. त्यासाठी गावातीलच कोणा सहृदय माणसानं जमीन देणगी दिल्याचा फलक आपले स्वागत करतो. “ही जमीन गावकऱ्यांच्या नावावर आहे. उताऱ्यावर आम्ही ग्रामस्थ, आघाणे असंच नाव टाकून घेतलं आहे,” आनंद कपूर माहिती देत असतात. मी चकीत. अशी नोंद कशी काय होऊ शकते? “केली आहे ना. त्यामागच्या उद्देश स्पष्ट आहे. या जमिनीचा कसलाही व्यवहार करावयाचा असेल तर तो ग्रामस्थांच्या मान्यतेनेच व्हावा लागेल.” ही शाळा शाश्वत-एकजूट या संस्था-संघटनांच्या माध्यमातूनच चालवली जाते. पटसंख्या ४८ त्यात २७ विद्यार्थिनीच. सारे कातकरी-महादेव कोळी. शाळा मान्यताप्राप्त आहे, पण विनाअनुदानीत. त्यामुळं हात पसरून निधी उभा करतच या निवासी शाळेचे व्यवस्थापन करावं लागतं. परिसरातील १० गावांतील मुलं या शाळेत शिकतात.
शाळेच्या भिंती रंगवण्यासाठी अतिरिक्त खर्च कशाला करा, असं म्हणत शाळेच्या शिक्षकांनीच महात्मा फुले वगैरेंची चित्रे काढून भिंतींना शोभा आणली होती. चित्रांच्या दर्जापेक्षा त्यामागच्या विचारांचा दर्जा उच्च आणि म्हणून भावणारा.

आघाणे येथेच ‘गावविकास नियोजन शिबिर’ होतं. गावाच्या विकासाचं नियोजन कसं करावं, त्यात कोणकोणती जीवनक्षेत्रे असावीत वगैरे मुद्यांचा समावेश होता दोन दिवसांच्या कार्यक्रमात. शेती, पाणी, वनसंपदा, गावातील मनुष्यबळ, शिक्षण अशा या गोष्टी. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून काही संस्था-संघटनांचे प्रतिनिधी त्यासाठी आले होते. आघाण्याची देवराई हीच शिबिराची जागा. वनदेव विद्यामंदिरातून वायव्येच्या दिशेला ही देवराई. पाच एकरांवर पसरलेली. घनगर्द. जैववैविध्यानं समृद्ध. जुनी. काही झाडं किमान दोनशे वर्षांची वगैरे असावीत. आंबा, बेहडा वगैरे झाडं होती. पण त्या वर्णनापेक्षा कुसुमताईंच्या शब्दांतील “चारस्तरीय जंगल” हे वर्णन समर्पक ठरावं. मोठी झाडे, मध्यम झाडे, लहान झाडे आणि गवत-पाचोळा असे हे चार स्तर. वर्षाकाठी २५० इंच पाऊस झेलायचा असेल तर हे वैविध्य हवंच.
देवराई हे या भागातील नाव, एका व्यवस्थेचं. परंपरागत चालत आलेली ही व्यवस्था. देवाच्या नावानं राखलेलं जंगल असं त्याचं साध्या-सोप्या शब्दांतील वर्णन. ते ऐकत होतो तेव्हाच मनात आतून हसतही होतो. काही वर्षांपूर्वी पर्यावरणीय नीतीशास्त्र या नव्या अभ्यासाची ओळख झाली होती. माणसाच्या आजच्या पर्यावरणीय (खरं तर पारिसरीक म्हटलं पाहिजे, कारण पर्यावरण ही एक मानवी व्यवस्थापनातील गोष्ट झाल्यासारखी झाली आहे आजकाल) समस्येवर मात करावयाची असेल तर पर्यावरणीय स्वरूपाचे नीतीशास्त्र असले पाहिजे असा या अभ्यासाचा विचार. आल्डो लिओपोल्ड (अ सँड काऊंटी अल्मानाक हे त्याचे या विषयावरील पुस्तक, त्यातील लँड एथिक या शीर्षकाचा निबंध वाचनीय) हा या अभ्यासविषयाचा जनक मानला जातो. या अभ्यासात सध्या सुरू असलेल्या वादाचे स्वरूप पाहिले की चक्रावून जायला होते. त्यावेळी मीही तसाच चक्रावून गेलो होतो. पर्यावरणीय नीतीशास्त्र कोणत्या दृष्टिकोनातून असावे हा या वादाचा मुद्दा. मनुष्यकेंद्री दृष्टिकोन असावा की नको; प्राणीहक्काच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे पहावे का; प्राणीकल्याण हा दृष्टिकोनच कसा उपयुक्त; छे, या सगळ्या विचाराच्या मुळाशी जैवकेंद्रितता असली पाहिजे; नाहीच, हा प्रश्न स्त्रीवादी दृष्टिकोनातूनच हाताळला जावा… हे आणि असे युक्तिवाद. साऱ्यांचे उद्दिष्ट्य एकच – जैववैविध्य टिकवत पर्यावरणाचे संवर्धन करावे!
आजदेखील सुरू असलेल्या या वादाच्या कानफटात छानपैकी लगावून देणारं एक नीतीशास्त्र माझ्यासमोर जितं-जागतं उभं होतं. मनातल्या मनात मी हसण्याचं कारण तेच. देवराई! देवराई म्हणजे एक नीतीशास्त्र अशासाठी की, देवराई राखण्यासाठीचे नियम पक्के. देवराईतून काहीही घेतलं जात नाही. गळून पडलेलं झाडाचं पानदेखील. मग लाकूडफाटा-फळं वगैरे तर लांबच. देवराईत शिकार होत नाही. देवराईत प्रवेश करताना चप्पला घालता येत नसत पूर्वी. आता तो नियम थोडा शिथील झाला असला तरी, अनेक ठिकाणी काटेकोर पाळला जातो. हे दोन्ही नियम तसे सोपे. “या भागातील लोक तंबाखू खातात, पण बिडी ओढत नाहीत. माचीस हा प्रकार नाही. कारण या देवरायांचं आगीपासून रक्षण करायचं असतं. इथं आपल्यासारख्या बाहेरच्या मंडळींनीच सिगरेट आणली. पण ग्रामस्थांनी त्यांची चौकट सोडलेली नाही,” आनंद कपूर सांगत असतात. इतकंच काय, काही गावांमध्ये रॉकेलचा दिवादेखील वापरला जात नाही. ही त्यांचीच पुस्ती. या देवरायांची रचनादेखील कशी आहे पहा. कुसुमताई सांगतात, “सूर्यप्रकाशावर जीवन आधारलेली झाडं (सनलव्हिंग स्पेशीज) देवरायांच्या सीमेवर असतात. छाया हाच जीवनाधार असलेली झाडं (शॅडोलव्हिंग स्पेशीज) आतल्या बाजूला.”
मला कळले ते हे इतकेच नियम. पण एकदा तिथं बैठक मारून आणखी नियमांचा शोध जरूर घ्यावा असं सुचवणारे.
पर्यावरणीय नीतीशास्त्र याहून वेगळं काय असू शकेल असा सवाल मनात उभा राहतो आणि त्यावर मनच उत्तर देतं, “दुसरं काही नाही. कारण हाच भाग वृक्षवल्ली आम्हा सोयरे… म्हणणारा आहे.”

वनदेव विद्यामंदिरापासून थोडं चालत पुढं पन्नासेक फूट खाली उतरलं की मध्यभागी एक छोटं मैदान. दोन्ही बाजूला पाण्याचे दोन टाके. मुळात आघाणे उंचावर. त्यामुळे वाऱ्याचा सर्वत्र मुक्तसंचार. हवा गार. ऐन उन्हाळ्यातही गार. त्यात देवराईत उतरल्यावर तर वातावरणात एकदम बदल. चहुबाजूंना असलेल्या झाडोऱ्याचा एक विशिष्ट सुगंध तिथं दरवळत होता. सूर्याची किरणं अधूनमधूनच जमिनीचे चुंबन घेण्यापुरतीच खाली उतरायची. पायाखालची माती आख्खी लाल. शिबिराचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी अगदी बाहेरच्या बाजूला बसलो होतो. देवराईतील थंडावा, झाडांचा मंद सुगंध अंगभर भरून घेत. कार्यक्रमातून लक्ष उडायला फारसा वेळ लागलाच नाही. काही क्षणांत देवराईतील वेगवेगळ्या मंजूळ आवाजांनी माझा कब्जा घेतला. सारे पक्ष्यांचे आवाज. कोणता पक्षी वगैरे सांगता येणार नाही. पक्षी दिसायचेही कमीच. कारण झाडोरा अगदी गर्द.
एका कोपऱ्यातून प्चींपींपींयू… असा आवाज आला. लक्ष तिकडं गेलं. कुठल्या तरी झाडाच्या पानांच्या गच्च संभारातून ती सुरावट उमटत होती. तिथं लक्ष स्थिरावतं न स्थिरावतं तोच दुसऱ्या भागातून च्युंइंक, चीचीची… असा आवाज आला. लगेच डोकं तिकडं वळलं. इकडं मागून मघाचा प्चींपींपींयू… सुरूच होतं. तेवढ्यात कुकुर्र, कुकुर्र असा आवाज आला. मी बसलो होतो तिथून मागूनच. पन्नासेक फुटांवरून असावा. लगेच लक्ष तिकडं. पोटापासून वरचा भाग असा सारखा वर्तुळाकार हलू लागला माझा. प्रत्येक आवाज टिपण्यासाठी. कारण सारं काही मुक्तसंगीतच.
हातातील वहीत ते आवाज टिपण्याची कसरत सुरू होती. आत्ता इथं लिहिलेली ही अक्षरं वहीत आहेत. पण त्यावेळी जाणवलं ते इतकंच की हे आवाज आपल्या अक्षरांमध्ये मांडता येणारच नाहीत. त्यात काही ना काही न्यून राहतेच आहे. माणसाशी संबंधित सारे आवाज कदाचित या अक्षरांतून टिपता येतील, पण या सुरावटी? छे, शक्य नाही. हे जाणवलं आणि मग ते टिपण्याचं काम बंद करून मी शांतपणे त्या सुरावटी मनात साठवून घेण्यात गर्क झालो. तासाभराने तिथून उठताना हे सूर टिपणं हे मेंदूचं काम नाही इतकं कळलं.

या देवराईत किती जैववैविध्य असावं असा विचार करत होतो तेवढ्यात हातावर सळसळ झाली. पाहिलं तर झाडावरून ‘उतरलेली’ एक सहस्रपाद गोम. सरसर करीत पुढं सरकत होती. क्षणभरातच लक्षात आलं आणि मी हात झटकला. ती पडली खाली आणि सरसरतच पानाखाली निघून गेली. खरं तर, तिनं मला काहीही केलं नव्हतं. पण तिच्याविषयीची मनात बसलेली भीतीच हाताला झटका देऊन गेली. तिच्यालेखी माझा हात हा सरसरण्यासाठीचा एक पृष्ठभागच असावा. मी तिला काही करत नव्हतो तोवर ती सरसरत फिरणार होती, तिच्या-तिच्या जगण्याच्या प्रवासाचा तो एक भाग. माझ्यालेखी तिचा संभाव्य दंशच महत्त्वाचा. आणि हात झटकला गेला.
बसलो होतो त्याच्या मागच्या बाजूला गावकऱ्यांनी बांधलेलं पाण्याचं टाकं होतं. तिथं मधमाशांचं एक पोळं होतं. माशा घोंगावर होत्या. शिबिराच्या कार्यक्रमात त्यांचा ‘व्यत्यय’ नको म्हणून तिथं साखरेचा पाक ठेवण्यात आला होता. त्याभोवती त्यांची फिरफिर सुरू होती. त्याच टाक्यावरून आमच्यासाठी पाणी आणायचं होतं. कोणी जाऊन हापसा मारून पाणी आणलं, पण त्याच्यापाठोपाठ त्या माशा इकडं आल्या. अर्थात, कोणी उठलं नाही. बसलेल्या ग्रामस्थांनी शांतपणे डोक्यावरून रुमाल वगैरे घेतला. माझ्यासमोर एक माशी आली. हातातील वहीनं मी ती झटकण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेजारी बसलेल्या गृहस्थानं मला रोखलं. “काही करू नकोस. शांत बस. उगा हालचाल नको. ती निघून जाईल. एरवी तुझ्या मागं लागेल.”
हे जंगल शेकरूसाठी प्रसिद्ध. एखादं पहायला मिळावं ही इच्छा होती. पण त्या देवराईत आमचा आवाजच इतका होता की, बिचारं झाडावर आलंही नसावं. एका उंच झाडावर त्याचं घर दिसत होतं. तशीच आणखी दोन-चार घरं दृष्टीस पडली. पण शेकरू मात्र नाही. माणसाचं अस्तित्त्वच म्हणे अनेकदा त्याला ‘लपवून टाकतं.’

आहुपे हे गाव सह्याद्रीच्या कड्यावरचं. टोकाचं. कोकणकडा म्हणतात त्या सीमेवरचं. “(इथून) इंदवीला हाक मारून बोलवूया का?” गंमतीनं आमच्यातील कोणी तरी म्हणालं. इंदवी म्हणजे इंदवी तुळपुळे. त्या मुरबाडला असतात. आम्ही होतो तिथून खाली सुमारे तीनेक हजार फुटांवर मुरबाड तालुका. खाली समोर नजर जाईल तेवढं अंतर कोकण पसरलेलं होतं. एखाद्या स्वच्छ दिवशी सागराचं ओझरतं दर्शन घडतही असावं तिथून.
आम्ही उभे होतो त्या मैदानावर जागोजागी बिळं होती. मी कोड्यात. शेकडोंच्या संख्येत बिळं. “खेकड्यांची बिळं आहेत ही,” कुसुमताई सांगतात. आणि मग एक कुतुहलजनक गोष्ट पुढं येते. पुन्हा तिचा संबंध तसा पर्यावरणाशीच. इथले आदिवासी या बिळातून खेकडे ‘दळून काढतात’. हे तिथलं खास परंपरागत ज्ञान-कौशल्य आहे. ही बिळं ओली असली की त्यात खेकडा आहे हे नक्की. अशावेळी बिळाच्या शेजारी एक चपटा-सपाट दगड ठेवला जातो. त्यावर एक गोल दगड जातं फिरवल्यासारखा फिरवून घरघर असा आवाज काढला जातो. तो आवाज आला की, बिळातून खेकडा बाहेर येतो. आला की, पकडून त्याचा चट्टामट्टा केला जातो. त्या काळात खेकड्याच्या मादीच्या पोटात अंडी असतात. तीही या क्रियेत मरतात आणि खेकड्यांची संख्या आटोक्यात राहते. खेकडा हा भातशेताचा शत्रू. या भागात होणारं पिक भातच. बिळं करून-करून खेकडे खाचरं उध्वस्त करतात, त्यावर काढलेला हा असा उपाय.
पण घरघर आवाज ऐकून खेकडा वर येतो कसा? नेमकं सांगता यायचं नाही, पण त्या घरघरीचा आवाज त्याच्या बिळात आभाळाच्या गडगडाटासारखा होत असावा आणि म्हणून तो बाहेर येत असावा हा एक अंदाज. खेकडे दळणे किंवा दळून काढणे असंच म्हणतात या शिकारीला.

आहुप्याची देवराई पाहण्यासाठी तिथं गेलो होतो. या गावात दोन देवराया आहेत. परिसरातील आणखी एक-दोन गावांमध्ये तर तीन-तीन देवराया आहेत. आहुप्याची ही देवराई आघाण्यापेक्षा किंचित मोठी असावी. देवराईच्या पूर्व भागातून घोड नदीचा उगम आहे. तिथं खोलवर दरी आहे, पण गर्द झाडी. त्यामुळं ती पटकन कळून येत नाही. या भागात ‘शाश्वत-एकजूट’चं काम सुरू झाल्यानंतर काही काळानं या देवराईसंबंधात पुण्याच्या आघारकर संस्थेच्या मदतीनं एक अभ्यास करण्यात आला. त्यातून असं दिसून आलं की, या देवराईतील एक वेल तब्बल आठशेहून अधिक वर्षांची आहे. या वेलीच्या खोडाचा व्यासच सव्वाफुटापेक्षाही जास्त आहे. जमिनीत एके ठिकाणी प्रश्नचिन्हाचा आकार घेऊन रुजत, ही वेल पुढे आकाशाच्या दिशेनं झेपावते. पहात रहावी अशी. या वेलीचं नाव काटेकोंभळ.
माणूस हाच अनेक गोष्टींचं कारण कसं असतो याचा एक दाखला या देवराईच्या निमित्तानं मिळतो. देवराईचं नीतीशास्त्र न कळत का होईना माणसानंच आकाराला आणलं. त्याची मोडतोड करण्याची वृत्तीही त्याच्यातूनच जन्माला येत असते. आणि मग देवराई विकण्याचा प्रयत्न होतो. आहुप्यात तो झाला.
पूर्वी केव्हा तरी, ही देवराई अवघ्या ७२ हजार रुपयांमध्ये विकण्याचा उद्योग गावातील पुढाऱ्यांनी केला. ग्रामस्थांना एकत्र करून हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आणि म्हणून आज ही देवराई दिसते. “तीनशे ट्रक लाकूड या देवराईतून निघालं असतं,” आनंद कपूर माहिती पुरवतात. आपण अवाक् होतो. ७२ हजार रुपयांत तीनशे ट्रक लाकूड. सौदा फायद्याचा तरी किती असावा?

आहुप्याच्या देवराईच्या थोडं बाहेर आल्यावर आग्नेय दिशेला एक डोंगरकडा दिसतो. “वर्षातील तीन महिने या गावच्या लोकांना पाण्यासाठी त्या डोंगराच्या पलीकडे जावं लागत असे…” त्या कड्याकडं बोट करून आनंद कपूर सांगतात तेव्हा आपल्या तोंडून शब्द फुटणं अशक्य असतं. “हाती काही नसताना चालत तो कडा ओलांडून पलीकडं झऱ्यावर जाण्यासाठी पाऊण ते एक तास मला लागला होता. तिथून पाणी आणणं हा महापराक्रम. गुरांसाठी तर या गावची मंडळी तीन महिने तिकडेच मुक्काम करत,” आनंद यांची पुस्ती. कितीही केलं तरी, माझ्या डोळ्यांपुढं एखादी स्त्री किंवा पुरूषदेखील डोक्यावर हंडा घेऊन तिथून पाणी घेऊन येतोय ही प्रतिमाच उभी राहू शकत नाही. महापराक्रम थोडाच याआधी पाहिला होता, अशी प्रतिमा उभी रहायला!
गावाजवळ पाण्याचा एक स्रोत होता. त्या तीन महिन्याच्या काळात वाटी-वाटीनं पाणी मिळवलं जायचं. त्या स्रोतातून. हा प्रश्न सोडवण्यासाठी काही केलं पाहिजे असं म्हणून सारे कामाला लागले आणि पुढे गावातच एक टाकं करण्यात आलं. त्या स्रोताच्या जवळच (अर्थात, हे टाकं आणि शाश्वत-एकजूटनं या भागात केलेली इतर कामं हा स्वतंत्र लेखाचाच विषय). त्या पाण्यावरच आज गाव चालतं.
हे सारं ऐकलं आणि आघाण्यात पाण्याची सोय काय असावी याचा विचार करू लागलो. रात्री त्याचं उत्तर मिळालं. वनदेव विद्यामंदिरातून हंडे घेऊन रात्री ग्रामस्थ पाणी भरत होते. सुमारे दोनेकशे पावलं चालून पाणी मिळवायचं आणि ते माघारी आणून पिपांमध्ये भरून ठेवायचं. सकाळी पाहुणे उठले की, त्यांना पाणी लागेलच ना?
माझ्यासमवेत धनंजय वैद्य होता. शिक्षणाने आर्किटेक्ट. पत्नी पल्लवी आर्किटेक्ट. दोघंही आजरा तालुक्यात (जिल्हा कोल्हापूर) एका पुनर्वसन वसाहतीत राहतात. भाड्याच्या घरात. केवळ वैयक्तिक जगणं म्हणून. कोणतीही संस्था-संघटना नाही. जे जगायचं आहे ते वेगळं, निसर्गसंवादी असावं या उर्मीतून. आर्किटेक्चरचं सारं करियर सोडून देऊन.
कुठून येतं हे भान, हा प्रश्न मी त्याच्या पुढील भेटीतील मुलाखतीसाठी राखून ठेवला आहे. त्याच्या गावी जाऊन तीनेक दिवस राहून, बाहेरून का होईना, त्याचं जगणं अनुभवण्याचा शब्दही देऊन ठेवला आहे.
रात्रीचं ते पाणी भरणं पाहात असताना दुपारचं धनंजयचं वाक्य आठवलं, “आल्या-आल्या आधी मी पाणी कुठून आणि किती मिळतं याची माहिती घेतली आणि आपण किती पाणी वापरायचं हे ठरवून टाकलं.”

एक धरण, त्याचा प्रचंड पसरलेला जलाशय कुशीत असणाऱ्या या गावांमध्ये पाण्याचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं एक रूप पाहून पुण्यात परतलो. शिवाजीगनरहून पीएमटीने निघालो. महापालिका पुलावर बस आली तेव्हा नदी या नावाखाली असलेला प्रवाह पाहूनच धनंजय म्हणाला, “गटारच आहे ही. या शहराला विकसीत, प्रगत कसं म्हणायचं?”
डोक्यात तो प्रश्न घुमत असतानाच घरी पोचलो. सोसायटीत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. आमच्या घराच्या पुढील भागात असणाऱ्या एका बड्या सोसायटीला पूर्ण दाबानं पाणी दिलं जात असल्यानं आपल्याला कमी मिळतंय, असं काही तरी आई म्हणाली. बेसीनला पाणी नाही म्हणजे माझी चिडचिड होते. वास्तवात आईनं पुरेसा पाणीसाठी करून ठेवला होता. पण बेसीन, टॉयलेटमध्ये नळ चालू नसेल तर फ्रेश वाटत नाही… मी विचारामध्येच होतो आणि इतक्यात गेले दोन दिवस आठवले. तिथं कुठं नळ होते? माझा स्वतःलाच प्रश्न. पाणी मुबलक तर नव्हतंच. नव्हे, वापरतानाही आपण काटकसरीनंच वापरलं होतं.
आणि एक ध्यानी येतं, पाण्याची मुबलकता म्हणजेच स्वच्छता व फ्रेशनेस हे मानसीकच असतं. त्यावर मात करायची असेल तर ती मनातूनच करावी लागेल.
आजअखेर पाण्याचा हा प्रश्न सोसायटीत कायम आहे. तरीही मी फ्रेश आहे!


काही नोंदी, अशातशाच… १

ऑगस्ट 15, 2010

शहाद्याहून धडगावच्या दिशेने एस.टी. निघाली. अंतर साधारण पासष्ठ किलोमीटरचे. त्यापैकी सुमारे चाळीस किलोमीटरचा रस्ता घाटाचाच. सातपुड्याचं पहिलं पूड चढून गेल्यानंतर काही काळात मोबाईलची रेंज जाते. त्यामुळं अगदी न कळतच माझी नजर मोबाईलच्या स्क्रीनवर गेली. बॅटरी पूर्ण होती. म्हणजे मोबाईल चालू-बंद असा करीत वापरला तर तीन दिवस त्याची साथ-सोबत होण्यास हरकत नव्हती. निश्चिंत होऊन मी बाहेर नजर वळवली.
बसनं घाटाचा मध्य गाठला तेव्हा पुन्हा एकदा माझं लक्ष मोबाईलवर गेलं आणि चमकलो. मोबाईलची रेंज आली होती. अर्थातच, माझ्या सेवादात्याची नव्हे तर दुसऱ्याच सेवादात्याची. दोघंही खासगी क्षेत्रातीलच. सामान्यपणे, धडगावात पोचेपर्यंत मधल्या या घाटरस्त्यात कोणाचाही रेंज नसते. तिथं पोचल्यानंतरही बीएसएनएल सोडली तर इतर कोणतीही सेवा मोबाईलवर उपलब्ध होत नाही. गेल्या सहा महिन्यात हा विकास झाला असावा. काकरदा येथे गाडीचा चहाचा थांबा आहे. तिथं चहा घेत असतानाच एक कॉल आला आणि रेंजमध्ये असूनही कट झाला. विकास अद्याप पूर्ण व्हावयाचा असावा.
पण येत्या काही काळात हा विकास इथं पूर्ण होणार हे मात्र आता निश्चित झालं आहे. म्हणजे आता धडगावात पोचल्यावरही बाहेरच्या जगाशी संपर्क ठेवता येईल.
त्या भागात मोबाईलची रेंज मिळणे ही म्हटलं तर सुखाची, म्हटलं तर नकोशी गोष्ट.

बिलगावात याआधी मी गेलो होतो त्याला आता सहा महिने होत आले आहेत. त्यावेळी जीपनं जाताना रस्त्यातील प्रत्येक खड्डा तिथल्या विकासाची अडथळ्याची शर्यत कशा स्वरूपाची आहे हे अंगांगांना सांगून जात होता. आधीच सगळा रस्ता डोंगरांतून. त्यामुळं वळणांचा हिशेब नाही. चढ-उतार हाच रस्त्याचा स्थायीभाव. त्यात खड्डे, मध्येच खडी टाकून ठेवलेले पॅचेस. काही बोलायची सोय नव्हती त्यावेळी. आम्ही बिलगावच्याही पुढे भुशाला गेलो होतो. बिलगावपर्यंतचा रस्ता बरा म्हणायची वेळ पुढच्या रस्त्यानं आणली होती.
गेल्या सहा महिन्यात रस्त्याच्या आघाडीवर थोडा बदल झालेला दिसला. यावेळी बिलगापर्यंतच गेलो होतो. तिथंपर्यंतच्या रस्त्यावर तरी डांबराचा एक थर देण्यात आला असावा. अनेक ‘चाळण्या-गाळण्या’तून जात ‘कायद्या(य)चे’ अवलंबन करीत तो थर पडला असावा हे नक्की. तरीही बिलगावपर्यंतचा प्रवास बराच सुखाचा झाला. जीपनं धडगाव ते बिलगाव हे साधारण वीस किलोमीटरचं अंतर पाऊण तासात कापलं गेलं. कुतहूल हेच होतं की भुशापर्यंतचा रस्ता आता कसा असेल आणि आणखी सहा महिन्यांनी कसा असेल? सहा महिन्यांनी पुन्हा त्या रस्त्यावरून जावं लागणार आहेच…
रस्ता गरजेचीच गोष्ट. मोबाईलपेक्षाही महत्त्वाची. पण सगळीकडं ती असेलच असं नाही. किंबहुना ती नसतेच. त्याचेच हे काही दाखले.

तुम्हा-मला मोबाईल हवा असो वा नसो. दळणवळणाच्या अशा साधनाचं महत्त्व दुर्गम भागांत वेगळेच. आमच्या या गटामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी आहेत. मुक्काम जिथं आहे त्यांच्याकडे तरंग सेवेचा दूरध्वनी आहे. तीच गोष्ट गावातील आणखी एका प्रमुखाच्या घराची. तिथंही तसा दूरध्वनी आहे.
आम्हा बाहेरून आलेल्या मंडळींपैकी काहींना तेथे कॉल आले दोन-चार, तेव्हा उडालेली धावपळ – दोन्ही अर्थानं, दूरध्वनी गाठण्यासाठीही आणि आपल्याला दूरध्वनी आला आहे या आनंदातून झालेलीही – पाहिली तर या साधनाचं त्या भागातील महत्त्व कळावं. पण…
गावातून आदल्या काही दिवसातच धुळ्याच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात एक रुग्ण रवाना करण्यात आला आहे. त्याची चिंता असणारे पालक बिलगावात भेटतात. बिलगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रेवती जोशी यांच्या म्हणण्यानुसार हा साडेचार वर्षाचा मुलगा. चारेक दिवसांपूर्वी सावऱ्या दिगर या आपल्या गावातच त्याला लाकडी दरवाजा लागून जखम झाली. आरंभी बुडव्याकडून (भगत, वैदू) उपचार करण्यात आले. हे उपचार काय असू शकतील हे सांगण्याची गरजच नाही, कारण पुढे मुलाला धनुर्वात झाला. उचलून आधी ग्रामीण रुग्णालयाला आणि तिथून धुळ्याला पाठवावं लागलं. एकटाच मुलगा धुळ्याला गेला. पालक जाऊ शकले नाहीत. कारणं नेहमीचीच. पुरेशा साधनस्रोतांअभावी वंचित जिण्याचा परिणाम तो. आता गावी जाऊन सोय करून घेऊन ते परत आले आहेत मुलाकडं जाण्यासाठी. मधल्या काळात काय घडलं असावं हे रेवतींच्या मोबाईलमुळेच कळू शकलं. मुलगा आयसोलेशन वॉर्डमध्ये आहे, काळजी नको असे म्हणत रेवती त्यांना धीर देताहेत.
“मुलगा अंगावरच्या कपड्यांनिशी गेला आहे. एकटाच आहे तेथे,” त्या प्रा. शाम पाटलांना सांगत असतात. शाम धुळ्याचे. त्यांच्याच गाडीतून पालकांना रवाना करावं का याचा विचार सुरू असतो. पण शाम यांना पोचण्यास मध्यरात्र होणार आहे हे ध्यानी येताच तो विचार थांबतो. एव्हाना धुळ्याकडं जाण्यासाठी बस उपलब्ध नाही हे स्पष्ट होतं, पालकांचं जाणं दुसऱ्या दिवसावर जातं. दरम्यानच्या काळात मुलासाठी मी कपडे नेऊन देईन, असं शाम यांनी त्यांना आश्वस्त केलं हाच दिलासा.

संध्याकाळी समोरच घडलेली ही घटना आहे. लांब उडीच्या स्पर्धेत उडी मारताना ही चिमुरडी हातावर पडली. मनगटाच्या किंचित वरच्या बाजूला हात तुटला. रेवती तिथंच कुठं तरी होत्या. पण शोधायचं कुठं? अर्थातच, इतक्या मोठ्या कार्यक्रमासाठी आणलेल्या माईकचा उपयोग होतो. रेवती येतात, दरम्यान मुलीला उचलून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेनं कार्यकर्त्यांनी नेलं. केंद्रात मोठ्या सोयी नाहीत. त्यामुळं हात बांधून त्या मुलीला आधी धडगाव आणि तिथून शहाद्याला पाठवलं जातं. दुसऱ्या दिवशी धडगावात गेल्यानंतर कळतं की शहाद्यातही तिच्या हाताला अद्याप प्लॅस्टर घातलं गेलं नाहीये. ते त्या दिवशी संध्याकाळी घातलं जाईल… दरम्यान त्या मुलीची अवस्था काय झाली असावी? प्रश्न टोचून जातो. पण तेवढंच, त्यापलीकडं हातात काहीही नसल्यासारखी हतबल स्थिती.

रेवती यांच्यशी बोलणं होतं. अर्थातच त्यांच्या कामाविषयी. बिलगाव आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात महिन्याला एक तरी फेरी करावी ही साधी अपेक्षा. रेवती ती पूर्ण करतात हे विशेष. काही गावं अशी आहेत की जिथं जाण्यासाठी २० ते २२ किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागते. डोंगर चढायचे, उतरायचे. सर्वाधिक लांब गाव इतक्या अंतरावर आहे. रेवती ही पायपीट करत असतात.
आमच्या चर्चेत सहज विचार येतो, हे कष्ट उपसणाऱ्या रेवती यांना असे कष्ट उपसावे न लागणाऱ्या, पण तिच्यासारखीच नोकरी करणाऱ्या इतरांपेक्षा वेगळं काय मिळत असावं? पण त्याहीपलीकडं विचार येऊन थांबतो तो वेगळ्याच मुद्यावर. असं मोठं अंतर कापून रेवती एखाद्या गावात जातात तेव्हा तिथं एखादी ‘इमर्जन्सी’ असेल तर नेमकं काय करत असतील? मग सुमारे अठरा वर्षांपूर्वी गोळा झालेली माहिती आठवते, झोळी करून माणसाला त्यात टाकायचं आणि दोघा-तिघांनी मिळून डोंगरांची चढ-उतार करत, धावत-चालत आरोग्य केंद्र गाठायचं. आजही तोच मार्ग तिथे अवलंबला जातो. अर्थात, विकासाची हीच गती तिथं आहे.

जीवनशाळाच्या मुलांचा मेळावा असा हा कार्यक्रम आहे. १३ जीवनशाळांची मुलं एकत्र आली आहेत. सहजच काही सांख्यिकी गोळा होते. एकूण १३ जीवनशाळांत मिळून १७०० मुलं शिक्षण घेताहेत. ७० गावांना या शाळा जोडल्या आहेत. शाळांमध्ये ४२ शिक्षक आणि ४० इतर मंडळी. या मंडळींना कर्मचारी म्हणणं हा त्यांचा अवमान असेल. आठशे आणि हजार रुपये महिना मानधनावर ही मंडळी हे काम करतात. काही कामाठी आहेत, काही इतर. मुलांसाठी स्वैपाक, त्यांची व्यवस्था अशी यांची कामं. शिक्षक शब्दात तसा थोडा मान-आदर आहे म्हणून इथं तो शब्द वापरायचा. हे शिक्षकही महिना दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या मानधनावर काम करतात. एकूण साडेतीन लाख लोकसंख्येला जीवनशाळांचा फायदा मिळू शकतो असा कामाचा व्याप. मी योगिनीला विचारतो, या क्षेत्रात सरकारी शाळांची संख्या किती? आठ! एका क्षणात उत्तर येतं. या आठही शाळा आणि त्यातील शिक्षक-कर्मचारी कागदावर आहेत. सुखेनैव नांदताहेत. पगार मिळतो, अनुदानं निघतात, सारं काही होतं. मुलांना शिकवण्याचं काम हाच काय तो अपवाद. म्हणूनच तर या स्वयंसेवी जीवनशाळा चालवाव्या लागतात आणि दरवर्षी परीक्षांना बसण्याची परवानगी शासनाकडून मिळावी म्हणून याच विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागतो, लडाई-पढाई साथ-साथ ही घोषणा अगदी नकोशा रीतीने सार्थ ठरवत.
कागदावरच्या या सरकारी शाळा राज्याच्या, देशाच्या विकासविषयक निर्देशांकात भर टाकत असतात हे मात्र नक्की.

गेल्या पाचेक वर्षातील तीन मेळाव्यांचा अनुभव घेतला तेव्हा असं स्पष्ट जाणवायचं की, अद्याप कच्चेपणा आहे. मुलं खेळाच्या स्पर्धात पुढं असतात. नाटक आणि गाणी यात तो कच्चेपणा दिसायचा. नाटक लिहिलेलं असायचं ते शिक्षकानीच. सादर मुलांनी करायचं. कल्पकतेला वाव खूप. तुलनात्मक कल्पकता दिसायची मात्र कमी. यंदा मात्र तसं नव्हतं. गाण्याच्या स्पर्धेत नदीच्या देवत्त्वाविषयीची एक प्रार्थना होती. त्यात जगण्याच्या प्रत्येक क्षेत्राचं भान दाखवून दिलं रचनाकारानं. एक नाटक तर अगदी सफाईदार वाटावं असं होतं. ही मुलं पुनर्वसन वसाहतीतील. शिक्षकानं लिहिलेल्या नाटकात मूळ गाव आणि पुनर्वसीत गाव यांची तुलना केली होती. पुनर्वसीत गावात पैसा आला, पैशाच्या रूपानं इतर गोष्टी आयुष्यात शिरल्या; समाधान हिरावलं गेलं अशी काहीशी मांडणी. त्यात एक प्रसंग होता मोटरसायकलवरून फिरण्याचा. स्टेजवर एका मुलानं वाकून आपल्या अंगाचीच मोटरसायकल केली. तोंडातून तिचा व्यवस्थित आवाज. ती सुरू करतानाचं फायरिंग, ती धावताना गियर बदलतानाचं वेगळं फायरिंग असं सारं काही. मुलांनी त्यातून आपली निरिक्षणक्षमताच सिद्ध केली एक प्रकारे. सादरीकरणातील कच्चेपणा जाऊन पक्केपणा येणं ही त्यांची प्रगती. गेल्या पाचेक वर्षांत अशी इतरही प्रगती झाली असणारच.

एरवी बिलगाव किंवा त्यापुढं गेलं की, तितका काळा टीव्ही आयुष्यातून हद्दपार झाल्यासारखा असतो. यावेळी तसं नव्हतं. बिलगावात जिथं मुक्काम होता तिथं टीव्ही होता. तरंगसारखीच डिश. त्यामुळे काही इतर वाहिन्याही. संध्याकाळी बातम्या बघण्याची संधी मिळाली आणि आपण “आपल्याच” जगात आहोत याची खात्री झाली. सगळं राजकारण समोर येत होतं. म्हणजे आता परतल्यावर एकदम चार दिवसांची वृत्तपत्रं समोर घेऊन बसण्याची गरज नाही तर… मनाशीच म्हटलं.
या टीव्हीवरून सुरू झालेली चर्चा. मला आठवलेला एक किस्सा मी सांगितला बरोबरच्या दोघांना तेव्हा ते अचंबितच झाले. “वडछील या शहाद्याजवळच्या खेड्यात मी रिकी पॉण्टिंगला भेटलो आहे,” असं मी म्हणालो. त्या दोघांना काही कळेनासंच झालं. मग खुलासा केला, त्या वसाहतीतील एका मुलाचं नाव रिकिपॉण्टिंग आहे. अवघ्या दशकभरापूर्वीपर्यंत ज्यांचा क्रिकेटशी संबंध नव्हता, टीव्ही ज्यांना ठाऊक नव्हता, वर्ल्ड कप वगैरे तर लांबच, अशांच्या आयुष्यात झालेला हा बदल होता. गेल्या वर्ल्ड कपवेळी वडछीलमधल्या एका घरात तरुण आणि लहान मुलांनी क्रिकेटचे सारे सामने पहात दिवस काढले होते. त्याच काळात जन्माला आलेल्या एका मुलाचं नाव रिकीपॉण्टिंग ठेवलं गेलं होतं. नट्यांची नावं वगैरे तर अगदी सामान्य गोष्ट झाल्यासारखी आहे.
टीव्हीचाच आणखी एक परिणाम. उकाडा असल्याने रात्री आम्ही पांघरुणं न घेताच पडलो होतो. माझ्यासमवेत होते माधव गुरव. कलाकार माणूस. गाणं वगैरे. ज्या घरी मुक्कामाला होतो तिथल्या घरधनिणीनं आमच्या अंगावर पांघरुणं घातली. माधवरावांच्या तोंडून अभावितपणे निघून गेलं, “थँक्यू भाभी…”
मराठी तशी दूरच, इतर भाषांचा प्रश्न नाही असं ते घर. आम्ही बोलायचंच तर पावरी शिकून बोलावं. पण तोंडून निघून गेलं थँक्यू.
आणि दोनेक मिनिटात आमच्या पाठून एक छानशी खसखस सुरू झाली. त्या भाभी सांगत होत्या माधवरावांनी थँक्यू म्हटल्याचं. आणि त्यावरून सुरू असलेलं मनमोकळं हसणं. थँक्यूचा अर्थ त्यांना कळला होता याचा आनंद मानावा की, आपल्याला थँक्यू म्हटल्यानं त्यांना जे वेगळं वाटत होतं त्यातून येणारं हसणं एन्जॉय करावं? आम्हीही हसून घेतलं.

सकाळी फिरताना गावात एक-दोन सौरशेगड्यांचे सांगाडे दिसले. शाम पाटलांच्या प्रयोगाचा तो एक भाग. शाम आणि त्यांचे धुळ्यातील काही सहकारी मिळून या तेरा जीवनशाळांसाठी काही प्रयोग करताहेत. उर्जेशी संबंधित. या शाळातील मुलांसाठीचा स्वयंपाक हा एक मोठा व्याप असतो. त्यासाठी या शेगड्या. किमान भात शिजवता यावा अशी त्यामागची कल्पना. हा मजकूर प्रसिद्ध होईपर्यंत तिकडे एखाद्या शाळेत या शेगडीचा उपयोग सुरूदेखील झाला असावा. स्वयंपाकाच्या कामावर असणाऱ्या त्या मुलींच्या हातांना त्यातून थोडा दिलासा मिळाला असावाही.
याच भागात मिळणाऱ्या बायोमासचा वापर करून आणखी काही गोष्टी करण्याचा शाम आणि चमूचा विचार सुरू आहे. आज लाकूडफाट्यावर अवलंबून असणारी ही स्वयंपाकाची व्यवस्था त्यातून निर्धूर होण्याकडे वाटचाल करू लागेल हा त्यांचा आत्मविश्वास. त्या निर्धूर होण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे अशा व्यवस्थेमुळे ऊरस्फोड कष्टातून त्या मुलींची होणारी मुक्तता.

रात्री नाटकांच्या वगैरे स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम करताना मोबाईलचा एक उपयोग कामी आला. नाटक, गाणं यासाठी मुदत असते. पाच मिनिटं, पंधरा मिनिटं अशी. मोबाईलमधील टायमर त्यावेळी उपयोगी पडला. विश्रांतीच्या वेळेत हाच मोबाईल बॅटरी म्हणूनही कामी आला. थोडं चालत गावाबाहेर पडलो त्या बॅटरीच्या प्रकाशात. चहुबाजूंनी सावलीसारखे डोंगर दिसत होते. दूरवर पश्चिमेला आणि उत्तरेला डोंगरातून मध्येच प्रकाश चमकायचा तेव्हा लक्षात यायचं, अंधारात बॅटरी घेऊन कोणीतरी पायपीट करीत चाललंय. कदाचित जिल्ह्याच्या गावी जाऊन परतत असेल, कदाचित तालुक्यालाच जाऊन येत असेल किंवा आणखी काही.
डोंगरातूनच एखाद्या गावातून प्रकाशाचे तीर आकाशात घुसलेले असायचे. त्या गावांमध्ये सौरदिवे पोचले आहेत असा त्याचा अर्थ. इथं बिलगावात मात्र पूर्ण अंधार आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हेच गाव प्रकाशमान होतं. केरळमधून आलेल्या काही उत्साही अभियंत्यांनी इथंच एक लघुजलविद्युत प्रकल्प केला होता. उदय नदीवर. नदीच्या नावाशी नातं जोडणारा प्रकल्प. ‘स्वदेस’ची प्रेरणा ती हीच. या केंद्रातून तयार होणाऱ्या वीजेच्या जोरावर गाव प्रकाशमान झालं होतं. आश्रमशाळेतील मुलांना रात्रीही अभ्यास करता येऊ लागला होता. आणि हा खरा विकास आहे असं म्हणत असतानाच ते लघुजलविद्युत केंद्र सरदार सरोवर धरणाच्या पाण्यात बुडून गेलंदेखील. जिथं पाणी येणारच नव्हतं तिथंही ते आलं आणि केंद्र बुडालं, गावाला अंधारात लोटून…
आता गावाला अंधारच ‘एन्जॉय’ करावा लागतोय…!


न आकळलेलं काही…

ऑक्टोबर 8, 2008

एखाद्या गोष्टीचा आणि आपला ऋणानुबंध का जुळावा हे नेहमीच सांगता येत नसतं. आवड वगैरे कारणं ठीक आहेत. पण ऋणानुबंध त्या पलीकडे असतोच. त्या गोष्टीनं नादावलं जाण्याचं, तिनं मनात घर करण्याचं कारण कोणतं असं विचारलं तर त्याचं गणिती उत्तर शक्य नसतं. सूर, रंग, रेषा, आकार या चारापैकी किमान एक तरी मिती तिथं असते आणि या चारांमधूनच स्वतःला साकारणारी आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणारी निसर्ग नावाची एक किमया शिल्लक राहतेच; ती तर पाचवी मिती! काहींचा या चारही मितींमध्ये लीलया संचार होतो, ही मंडळी स्वर्गीय काही तरी घेऊन जन्माला आलेली असतात; त्यांचं जगणं बहुतेकदा पाचव्या मितीमध्ये होत असावं. काहींना सूर नादावतो. काहींना रंग, काहींना रेषा तर काहींना आकार. पुन्हा या प्रत्येक मितीमध्ये नादावले जाण्याचेही दोन प्रकार असतात. एक ग्रहण करण्याच्या संदर्भात किंवा मग दुसरा आविष्कार करण्याच्या संदर्भात. या दोन्हींनी जे नादावले जातात ते भाग्यवानच. अशा भाग्यवानांची संख्या तशी कमीच. मग राहतो ते तुम्ही-आम्ही. त्यातही उतरंड असतेच. त्यातल्या अगदी बालवाडीच्या पायरीवरून हे आत भिडलेले, पण न आकळलेले काही…

नुकताच आंघोळ करून बाहेर आलोय. माझा भ्रमणध्वनी खणखणतो. क्रमांक पाहतो. ००१२०******८५!!! पहिल्या तीन आकड्यातून कळतं की अमेरिका. घड्याळाकडं पाहतो. अकरा. म्हणजे जिथून हा कॉल आलाय तिथं मध्यरात्रीचे किमान सव्वादोन ते अडीच झालेले आहेत. माझ्या सकाळच्या आणि त्याच्या मध्यरात्रीच्या या वेळेस ‘सोशल अँथ्रॉपॉलॉजी’ हा काही चर्चेचा विषय असू शकत नाही. या मित्राचा अभ्यास त्या विषयातला आहे. माझ्या कपाळावरच्या रेषा किंचित ताणल्या जातात, पण इतक्या रात्री तिथून कॉल येतोय म्हणजे विषय वेगळा असणार हे नक्की. मी कॉल घेतो. एक महत्त्वाचा निरोप असतो; तो देऊन झाल्यानंतर मित्र म्हणतो, “अजून एक गोष्ट शेअर करायचीये…”
“बोल ना. काय?”
“मी शामच्या वेळेला यमन शिकायला सुरवात केली…”
(हा मुलगा कटाक्षाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण आहे हिंदी भाषिक. त्यामुळे हा संवाद त्याच्याच भाषेत.)
अत्यंत आनंदाने मी “व्वा. क्या बात है!” म्हणतो.
“एक नोट लागत नव्हती नीट. बराच काल प्रयत्न केला. मग जमली. मग मी फुल्ल थ्रोटेड… इतका आनंद झालाय… (मी मनातल्या मनात म्हणतो, तू शिकू लागल्यानंच मलाच इथं इतका आनंद झालाय की तुझा आनंद काय वर्णावा?)
“…एकदम फ्रेश. कालपर्यंतचे तीन दिवस फेसबुकवर होतो नुसता. आय वॉज कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग द टाईम… बट नाऊ आय हॅव डिसायडेड, अबकी बार कसल्याही डायव्हर्शनकडे मन गेलं तर यमन…”
मी त्याला म्हटलं “अरे, हे लिही.”
“लिही? शब्दच नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी… कोणत्याही भाषेत!”
शब्दांच्या पलीकडला हा अनुभव काय असावा याची कल्पना मला क्षणार्धात येते. गेल्या वीसेक वर्षांचा प्रवास आठवताना.

आठवतं तसं, मी ऐकायला सुरवात केली त्याला आता वीसेक वर्षे झाली असतील. त्याआधी गाणं ऐकणं हा काही छंद वगैरे नव्हता, आवड तर नाहीच. ती अचानक उद्भवण्याचं कारण बहुदा हुबळीत झालेला एक कार्यक्रम असावा. गंगूबाई हनगल यांच्या अमृतमहोत्सवाचा. नवी नोकरी, त्यामुळं अंगावर आलेलं काम टाळायचं नाही हे मनावर पक्कं बिंबलेलं. त्या कार्यक्रमाला जावं लागलं ते असं कामानिमित्त. तीन दिवसांचा महोत्सव होता तो. सगळ्या मातब्बर कलाकारांची मांदियाळी होती. शास्त्रीय संगीत, आणि त्यातही गायकी, ही थोडी लांबच ठेवण्याची गोष्ट अशी आजवरची स्थिती होती माझी. पण काम म्हणून त्या सभागृहात असणं आवश्यक होतं. कलाकार आठवत नाही, पण पहिल्याच दुपारी संतूरवादन ऐकलं आणि ध्यानी आलं की, अरे हा प्रांत आपण समजतो तसा नाही. ऐकायला काही हरकत नाही. समजत नसलं तरी. ठाऊक नव्हतं की ही धारणा त्या थोर कलाकाराच्या सांगण्यातून अधिक पक्की होणार आहे. हुबळीत नव्यानंच मित्र झालेल्या दोघा-चौघांनी संध्याकाळी मला गंगूबाईंकडं नेलं आणि ओळख करून दिली. माझं वय वीस. म्हातारी उत्सवमूर्ती होती, तशीच उत्साहमूर्तीदेखील. प्रसन्न हसत तिनं हात जोडून नमस्कार केला आणि त्याकडं पहातच मी पदस्पर्श केला. “शास्त्रीय समजतं का?” बाकी काही बोलण्याआधीच त्यांचा प्रश्न तीरासारखा आला (एखाद्या धारदार तानेसारखा होता तो, हे नंतर खूप काळानं उमजत चाललंय).
“नाही. पण ऐकतो.” माझी आठवण पक्की आहे कारण मी खोटं बोललो होतो. उत्तराचा उत्तरार्ध खोटा होता. ऐकलं होतं ते फक्त त्या दुपारी संतूर.
“ऐकत जा. समजून घेण्याचाही प्रयत्न कर.” म्हातारीचा आशीर्वादवजा आदेश. मान डोलावण्यापलीकडं होतं तरी काय त्या वयात?
तासभर गेला असेल नसेल आणि आम्ही मंडळी सामोरे गेलो ते एच. वाय. शारदाप्रसाद यांना. दिल्लीतले हे बडे प्रस्थ (अतिशय चांगल्या अर्थी हा शब्द वापरतोय) आणि तरीही विलक्षण डाऊन टू अर्थ व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आधी वाचनातून झाला होता (अलीकडेच त्यांचं निधन झालं. विस्मृतीत गेलेल्या या माणसाच्या स्मृती माझ्या मनात त्यावेळी जाग्या झाल्या ते हुबळीतील त्या मैफिलीच्या चौकटीतच). ते या मैफिलीत? माझ्यासमोरचा प्रश्न. अज्ञानातून आलेला. कारण ते त्या कार्यक्रमाचे एक प्रमुख आयोजक होते. त्यांच्यात हाही एक रसिक दडला होता ते माझ्याबरोबरीच्या ज्येष्ठ व्यक्तींना ठाऊक होतं. शारदाप्रसादांबरोबर या ज्येष्ठांच्या संगीत या विषयाला धरून झालेल्या चर्चेनं पुन्हा डोक्यात सूर घुमू लागले ते दुपारी ऐकलेल्या संतूरचेच.
नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण संतूरच्या त्या सुरावटी मला कुठंतरी एखाद्या प्रसन्न अशा झऱ्याच्या काठी आपण बसलो आहोत अशा वातावरणात घेऊन गेल्या होत्या. झऱ्याचा खळखळाट आणि त्या सुरावटी यांचं काही तरी नातं असावं. किती तरी काळ त्या सुरावटी माझ्या मनात जाग्या होत्या. त्या यायच्या त्याच मुळी माझ्या शहरी गजबजाटापासून मला दूर नेत. निसर्गाच्या सान्निध्याची अनुभूती देत.
मग लक्षात येत गेलं, की हे ऐकलं पाहिजे. यात काही तरी निश्चितपणे आहे. त्यामुळं ऐकणं महत्त्वाचं. निदान वाद्यसंगीत तरी. निर्णय झाला. त्या मैफिलीची ही देणगी पुढं आजवरच्या जगण्याला सावरून धरत गेली.

मिरज. खांसाहेब अब्दुल करीम खां यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणारा संगीत महोत्सव. हुबळीतील निर्णयानंतर मिरज गाठणं सोपं होतं. मिरजेचा हा महोत्सव तेथील एका दर्ग्यात भरतो. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही चमकदार कामगिरी गायक-वादकानं केली तरी टाळ्या वाजवता येत नाहीत. हा संकेत तिथला. त्याचं कारण त्या काळी कळलं होतं, पण आत्ता आठवत नाही (महोत्सवाची ती परंपरा आज तेथे कायम आहे की नाही याचाही पत्ता नाही). टाळ्या नाहीत; तरीही संगीताची मैफील? पुन्हा एक प्रश्न. प्रत्यक्ष मैफिलीत गेल्यावर त्याचा सच्चेपणा पटला. सुरांच्या सच्च्या भक्तांसाठी टाळ्यांची गरज नसते. मान डोलावण्यातूनही काय घडतं त्याचा अनुभव त्या तीन रात्री तिथं घेतला.
रागदारी कळण्याचा प्रश्न त्याही वेळी नव्हता (आजही नाहीच). दुसऱ्या रात्री गणपती भट यांचं गायन होतं. त्यावेळी उदयोन्मुख आश्वासक गायकांच्या यादीत आघाडीवर नाव असायचं त्यांचं. पावणेदोन तास हा तरूण गायक गायला. या मैफिलीपर्यंत तरी मी शास्त्रीय गायन या प्रकाराकडं फारसा आकृष्ट झालेलो नव्हतोच. हुबळीतील तीन रात्रींमध्ये गायनाच्या वेळेस बऱ्याचदा मी डुलक्या काढल्या होत्या. वाद्यसंगीत आलं की मात्र झोप उडायची. गणपती भट यांच्या गायनाला डोळे उघडे ठेवण्याची एक प्रकारे कसरत करावी लागली होती. कारण मित्रांसमवेत मी बसलो होतो ते पहिल्याच रांगेत. मित्र माझ्याच वयाचे, पण शास्त्रीय संगीतात माझ्यापेक्षा कित्येक पावलं पुढं असणारे. कोणी तबल्यात तर कोणी हार्मोनियमवर. कोणी गायन करणारा. तेवढी एकच गोष्ट डोळे उघडे ठेवण्यास पुरेशी होती. आरंभीचं गायन मी ऐकलं. सूक्ष्म स्वरूपात सूर कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण मध्येच कुठं तरी आतमध्ये काही तरी व्हायचं. अंगावर रोमांच यायचे एखाद्या तानेनंतर. गायनाच्या अखेरीला वीज चमकावी तशी एक तान घेत त्यांनी तराणा सुरू केला आणि मी उडालो. मनात खोलवर काही तरी झालं. डोळे मिटले गेले आणि एखाद्या पहाडावर आपण आहोत अशी प्रतिमा डोळ्यांपुढं आली. खाली खोलवर दरी आहे, समोरचा सुळका आकाशात घुसला आहे. आपण या पहाडाच्या कडेवरच आहोत…
बाहेर तराण्याची लय वाढत गेली. डोळ्यांसमोरच्या पहाडाची जागा हळूवारपणे फुलांचा एका ताटव्याने घेतली. काही क्षणांतच तो पूर्ण फुललेला ताटवा डोळ्यांसमोर उभा राहिला. दरी बेपत्ता, समोरचा पहाड बेपत्ता आणि विशेष म्हणजे मी उभा होतो तो पहाडही नव्हताच मुळी; ती सपाटीच होती. ताटव्याला जोडणारी. तराणा थांबल्यानंतर बराच काळ कानात ते सूर घुमत होते. डोळे मिटले की, त्या सुरांना साथ देत ताटवा समोर यायचा. केवळ अद्भूत.
आजही सकाळच्या संवादातून हे आठवलं तसं अंगावर रोमांच उठताहेत सारखे.
इथं मनःपटलावर काही प्रतिमा उभ्या राहिल्या म्हणून वर्णन करण्यासाठी शब्द सापडताहेत. एरवी सूरही कळत नसताना, ते कळू शकणाऱ्याचीही ‘शब्दच नाहीत’ अशी स्थिती होत असेल तर, आपलं काय? पुन्हा एक प्रश्नच.

ऐकण्याचा (फक्त ऐकण्याचा, समजून घेऊन ऐकण्याचा नव्हे) प्रवास सुरू झाला तेव्हा सुरवात झाली ती काही अल्बम्सनी. एखादी थीम घेऊन केलेल्या अल्बम्सचा काळ तो. कोल्हापुरात शाहुपुरीत रहायचो. जायऱ्यायचा रस्ता एस. टी. स्टँडसमोरून. तिथं आतल्या बाजूला एका दुकानात कॅसेट लावून ठेवलेल्या असायच्या शेल्फवर. आधीच्या दीडेक वर्षांत केव्हाही तिकडं पावलं वळली नव्हती. वळायची ती त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलकडं. कारण मिसळ हा त्यावेळचा आम्हा मित्रांचा पूर्ण आहार असायचा. रात्रीदेखील त्यासाठी आम्ही राजवाडा चौक गाठायचो. किंवा मग स्टँडवर बिर्याणी. त्या कॅसेटच्या दुकानाकडं पावलं वळली पहिल्यांदा तेव्हा खिशात एकूण होते शंभर रुपये. पुढच्या पंधरवड्याचा बसप्रवास आणि इतर खर्चासाठीचे. खाटकन त्या दिवशी तीस रुपये गेले. ‘कॉल ऑफ व्हॅली’वर. चहा-बिस्कीटांवर दिवस कसे असतात त्याचा एक अनुभव नंतरच्या पंधरवड्यात त्या तीस रुपड्यांनी दिला. पण त्याच तीस रुपड्यांनी दिलेला दुसरा अनुभव अनमोल होता. तो अनुभव खर्चात पाडत गेला, कमावण्याची अक्कलही देत गेला.
‘कॉल ऑफ व्हॅली’. अल्बम जुनाच; पण माझ्यासाठी नवा. हाती कॅसेट आल्यानंतर मी तडक खोली गाठली आणि वॉकमन सुरू केला. पूर्ण कॅसेट ऐकून काढली. आधी काहीही प्रतिक्रियाच उमटली नाही मनातून. कॅसेटचं कव्हर काढलं आणि पाहिलं तर सारी भाषा सांगीतिक. रागांची नावं. एक क्षण वाटलं तीस रुपये वाया गेले की काय? पुन्हा कॅसेट टाकली. ऐकू लागलो. बासरी आहे आणि संतूर आहे हे कलाकारांच्या नावावरून समजत होतं. पण ब्रिजभुषण काब्रा? यांचं वाद्य कुठलं? पुन्हा प्रश्नांची मालिका. पण त्याकडं दुर्लक्ष करून ऐकत गेलो. पहाडीमधल्या संतूरनं कब्जा केला आणि पाठोपाठ पिलू. दोन्हींमधून उमटणारी प्रतिबिंबं पुन्हा पहाडाचीच. हा पहाड सारखा का येतोय? धून पहाडीतील आहे म्हणून? केवळ तेवढंच असणार नाही. कारण पहाडी राग नसतानाही पहाड उभा राहतोच डोळ्यांसमोर. गणपतीच्या तराण्यानं उभा केला होता आणि तो तराणा पहाडीतला नव्हता एवढं निश्चित.
ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, स्वतःला बजावत गेलो. मग आणखी एक गोष्ट लक्षात येत गेली. हा वॉकमन कानाला असेल आणि त्यातून अशा काही सुरावटी असतील तर हातातलं काम सोपं ठरतंय. लेखन असो वा वाचन. दोन्ही. सुरावटींकडं ध्यान असतं का? खचितच नाही. पण त्यातलं काही समजत नव्हतंच. त्यामुळं ध्यान देण्याची गरज वाटत नव्हती. कारण प्राधान्याचं काम होतं हातातलं. लेखन किंवा वाचन (या प्रवासात आजही बालवाडीतच राहण्याचं कारण त्यावेळच्या त्या प्राधान्यक्रमात असावं कदाचित). मग ती एक गुरूकिल्ली ठरली. लेखन-वाचन करताना संगत हवी ती सुरावटींचीच. आणि सुरू झाला एक सिलसिला सुरावटींशी. त्यानिमित्तानं केलेल्या खरेदीशी.
‘पंचमहाभूत’ या संकल्पनेवर आधारलेले वेगवेगळे अल्बम कॅसेटच्या रुपानं आले. हे काही अस्सल शास्त्रीय स्वरूपातले आहेत का, तर काहींच्या मते नाहीतही. पण ते खोलीवर आले. संतूर आवडू लागलं म्हणून शिवकुमारांच्या काही कॅसेट्स आल्या. मध्ये धाडस करून एकदा सरोद आणि सतारही आणली. ही दोन्ही वाद्यं मला तरी संतूरपेक्षा ऐकण्यास जड वाटत आली होती. पण तीही ऐकली. एकदा-दोनदा नाही. वेगवेगळ्या वेळी बऱ्याच वेळेस ऐकली. पण मनात मात्र घर केलं होतं संतूरनंच. सनई हे वाद्य तसं या ऐकण्याच्या संदर्भात अतिपरिचयात-अवज्ञा अशा स्वरूपाचं ठरलं होतं. पण इतर काही कॅसेट आल्या. त्यात शोभा गुर्टूंचा समावेश होता. ठुमरी.
ऐकत होतो. रात्रपाळी झाली की, तेव्हा रेडिओवर उशीरा शास्त्रीय संगीत राष्ट्रीय केंद्रावर चालायचं. तेही ऐकायचो आवडीनं. सोबत काम करणाऱ्यांपैकी एक-दोघे ज्येष्ठ कर्मचारी थोडं फार कळणाऱ्यापैकी होते. त्यांच्या चर्चा सीमेवरून ऐकायच्या.
पण जाण? नाहीच.

रागसंगीत आणि त्याचं काळाशी नातं हा विषय आता समोर आला. रागाचं, त्यातल्या सुरांच्या क्रमाचं नातं प्रत्येक प्रहराशी असतं असं कोणी तरी सांगितल्याचं ऐकलं. या विषयावरच्या चर्चांच्या सीमेवर राहण्याचा तो काळ. त्यामुळं ती ऐकून आपण काय ऐकतोय त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न एवढंच त्याचं महत्त्व. म्हणजे असं की, मी शास्त्रीय संगीत ऐकतो म्हणजे काय करतो, असं एकदा या विषयाशी दुरान्वयानंही संबंध नसणाऱ्या मित्रानं विचारलं. त्याच्यासमोर फेकण्यासाठी आपण एक वाक्य तयार करू शकतो असा हा प्रयत्न. पंडित जसराजांच्या ‘अष्ट प्रहर’ या चार कॅसेट दाखल झाल्या संग्रहामध्ये, त्यामागचं कारण तेच. समजून घेण्याचा प्रयत्न करू, ही भावना. हे अशा स्वरूपाचं ऐकण्याचा तो पहिलाच प्रयत्न. आधी प्रहर वगैरेंकडे लक्ष देण्याचा उगाचच प्रयत्न केला, पण एकूण कानाची बैठकच अशी की, त्यांची गायन सुरू करण्याआधी श्लोक सादर करण्याची पद्धतीच भाव खाऊन गेली (पुढे हा श्लोक आणि त्यांचं ते आधीचं “जय हो” यांचा पगडा अधिक… मग त्यावरची टीकाही कानी आली… असो). प्रहर आणि त्यानुसार राग ऐकणं नंतर बाजूला पडलं. पुढं माझ्या ध्यानी आलं की, आपलं चुकतंय. हा प्रांत आपल्यासाठी तरी स्वयंसाधनेचा नाही. कारण सूरच कळत नाहीत. तेव्हा इथं आपल्याला गुरूच करावा लागेल. हा ‘साक्षात्कार’ झाला तेव्हा मात्र त्या कॅसेट सरळ उचलून शास्त्रीय संगीत कळतं अशा एका ज्येष्ठ स्नेह्याला देऊन टाकल्या आणि शास्त्रीय संगीत समजून घेण्याचा तो एक प्रयत्न सुरू होण्याआधीच विझून गेला.
पण ऐकणं थांबलं नाहीच. त्यातून मनात प्रतिमा, प्रतिबिंबं निर्माण होणं तर थांबलं नाहीच.
त्याचाच हा पुढचा अनुभव. पुन्हा इथं संतूरच आहे. पण अनुभव वेगळा. माझी ती मर्यादा असावी कदाचित. ‘म्युझिक ऑफ माऊंटन्स’ नावाचा एक अल्बम आहे शिवकुमारांचा. त्यातल्या रचना आजही मी असंख्यवेळेस आवडीने ऐकतो. अनेक जण ऐकत असतील. या रचना मी आधी त्यांची नावं न पाहताच ऐकायचो. ज्या क्रमानं अल्बममधून येतील त्याच क्रमानं. एके दिवशी रात्री काम करीत बसलो होतो. झोपण्याची चिन्हं नव्हती. बराच काळ गेला आणि तो अल्बम सुरू झाला. काही वेळानं अचानक कान टवकारले. नवी सुरावट कानी घुमू लागली. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला. सकाळ झाली की काय म्हणून चमकून मी पाहिलं, बाहेर अंधार दिसत होता. घड्याळाकडं पाहिलं, काटे पाचच्या आसपास होते. लक्ष सुरावटीकडं वळवलं. तिचं नाव होतं ‘हिमालयन डॉन’. पहाटेची ही अनुभूती वेगळीच होती. मग बारकाईनं पुन्हा सारी नावं पाहिली तर त्यात चक्क अष्टप्रहर गुंतलेले होते. सनराईज ऑन द पीक्स, ट्वायलाईट झोन, इव्हनिंग प्रेयर (आता ट्वायलाईट आधी की इव्हनिंग प्रेयर? माझ्या मते, माझा क्रम बरोबर आहे), शिकारा बाय मूनलाईट… मध्ये इतर. अर्रे!!! हे तर अशा क्रमानं ऐकलं पाहिजे एकदा. एकदा कशाला? त्याच क्षणी पुन्हा रचना फेरमांडणी करून घेतल्या आणि हातचं काम बाजूला ठेवून ऐकत बसलो. साधारण तासाभराचा काळ होता तो आणि पहाटेच्या त्या प्रहरी प्रसन्न अनुभव घेत मी झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा इतर रचनांची नावं पाहिली. त्या रचनांची नावं बॅलड, एकोज फ्रॉम द व्हॅली, स्प्रिंगटाईम, माऊंटन लव्ह सॉंग, स्पिरिट ऑफ कश्मीर अशी आहेत. त्यावरून ना त्यांचा प्रहर कळतो, ना राग. पण अनेकदा ऐकल्यानंतर काही ठोकताळे बसले आणि या साऱ्या रचना काळानं वर्णन होणाऱ्या रचनांच्या मध्येच कुठंतरी बसतात असं वाटू लागलं. आजही ऐकतो ते त्याच क्रमानं. हे बरोबर आहे की चूक? ठाऊक नाही. राग कळणारा एखादा त्यातलं बरोबर काय आणि चूक काय हे सांगून त्याचा नवा क्रम समजावून देऊही शकेल. पण… पण हिमालयन डॉन ऐकताना झालेली पहाटेची अनुभूती? तिचं काय? तो माझ्यासाठी नुसताच अज्ञानातील आनंद नाही तर अज्ञातातील आनंदही आहे. तो आता बुद्धीच्या कसोटीवर कसा तपासून पहायचा?

कुमार गंधर्व गेले त्या दिवशीची गोष्ट. दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवर असताना ती बातमी आली. काही क्षण सुन्न मनस्थितीत गेले. ऑफिस आणि माझी खोली यातलं अंतर वीस पावलांचं. त्यामुळं तडक खोली गाठली. ती कॅसेट काढली आणि ऑफिसात काम करताना शेजारी टेप ठेवून ती लावली. त्या मनस्थितीत कसलंही काम करणं शक्य झालं नाही. सारं काही सहकाऱ्यावर सोपवून मी शांतपणे ती भजनं ऐकून काढण्यात वेळ घालवला. ही भजनं मनात घर करून गेली होती ती त्यांच्या वेगळ्या जातकुळीतल्या गायनानं. जातकुळी वेगळी आहे हे समजलं होतं तेही त्यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वाचल्यानंच. आधी ते वाचनातून समजलं आणि मग तौलनीक स्वरूपात काही ऐकत गेलो त्यातून आकळत गेलं. पण तेवढंच आकळणं. त्यापलीकडं त्याचं वेगळेपण सांग असं कुणी म्हटलं तर हात टेकलेलेच असायचे. मनात म्हणायचो, माझ्यासारखे कान करा, कदाचित वेगळेपण कळेल. पण हे उघड बोलणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा आपण अज्ञानी आहोत हे कबूल करून टाकणं सोपं…
त्याच रात्री वीणा सहस्रबुद्धे यांची मैफल होती. ती होईल की नाही अशी धाकधूक होतीच. तरीही सभागृह गाठलं. अपेक्षेप्रमाणे शंभर-सव्वाशेच मंडळी होती. वीणाताई आल्या आणि आम्ही हुश्श केलं.
मैफल सुरू झाली. एक राग झाला. मध्ये एक नाट्यगीत घेतलं त्यांनी. मध्यंतर आणि पुन्हा एक राग. एव्हाना गायन ऐकताना झोप वगैरे प्रश्न राहिले नव्हते. ऐकायचं, नीट ऐकायचं. मध्ये एखादा सूर, तान आत जाते. भिडते. छातीत कळसुद्धा आल्यासारखं वाटतं असं चक्र आता सुरू होतं. त्याच अवस्थेत त्या रात्रीही वीणाताईंचं गायन ऐकत गेलो.
पावणेबाराच्या सुमारास वीणाताई बोलल्या. कुमारांचं निधन झाल्याचं सांगून म्हणाल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मैफल थांबवते. आणि सुरू झालं “उड जायेगा… हंस अकेला….” अनेक श्रोत्यांचे हात डोळ्यांकडे गेले. माझेही. हंस उडताना पाहिलाय का, या एरवीही अनेकदा ते भजन ऐकताना गंमत्या स्वभावातून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या रात्री मिळालं. उडणाऱ्या हंसासोबत कुमारांचे प्रत्यक्ष सूरही त्याच भजनाचा हात धरून त्या दिवशी अनंतात विलीन झाले असावेत. डोळ्यांसमोर तीच प्रतिमा. हंस उडतोय… मध्येच कुमारांचा चेहरा. त्यांची ती ‘सह्याद्री’वरची मुलाखत. बोलताना अनेकदा दिसणारं त्यांच्यातलं लहान मूल. आणि कानात बाहेरून वीणाताईंचा तर आत पार्श्वभूमीवर त्या दुपारी आणि आधी अनेकदा ऐकलेल्या कुमारांच्या भजनाचा सूर. अस्वस्थ… केवळ अस्वस्थ.
पु्न्हा मनात प्रश्न… काय नातं आहे कुमारांच्या त्या सुरांशी? इतकं गहिरं काही, की ते गेल्याचं जाणवून असं अस्वस्थ वाटावं… हे काय आहे नेमकं? उत्तर नाहीच. पुन्हा कान फक्त काही ऐकण्याकडंच वळतात.

नोकरी नसलेल्या मधल्या काळात स्वयंरोजगाराचा प्रयत्न सुरू होता. प्रशासकीय स्वरूपाच्या एका पुस्तकासंबंधीचं काम करीत होतो. अजब होतं ते सारं. आम्ही एका लॉजमध्ये खोली घेऊन तिथंच या कामाचा संसार थाटला होता. सकाळी अकराच्या सुमारास काम सुरू करायचो ते रात्री बारापर्यंत चालायचं. तेव्हा संगणकावर गाणी हा प्रकार ठाऊकही नव्हता. त्यामुळे सोबत असायचा टेप आणि भारंभार कॅसेट्स. त्या ऐकत काम चालायचं. लक्ष कामाकडं होतं तसं गाण्याकडंही होतं. मंतरलेल्या त्या काळात त्या पुस्तकाच्या लेखकासमवेत खरी साथ दिली ती सुरांनी. इतकी की प्रशासकीय नियम, सेवाशर्ती, न्यायालयीन निकाल असे रुक्ष विषय असूनही त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत उल्लेख झाला तो गायक-वादकांचा. त्यांनी, म्हणजेच त्यांच्या सुरावटींनी दिलेल्या साथीचा. त्यात जसराज होते, परवीन सुलताना होत्या, आणखीही काही मंडळी होती.
का असं वाटलं असावं आम्हाला की त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावेत? त्यांच्या सुरांनी दिलेली साथ हे एक कारण होतंच. पण त्याहून महत्त्वाचं ठरलं होतं म्हणजे त्या सुरांच्या साथीत झालेल्या कामाचा तो एकूण अनुभव. हा निष्कर्ष केवळ दोनेक वाक्यातून निघाला होता आणि प्रस्तावनेच्या पहिल्या परिच्छेदात आधी नावं आली या कलाकारांची.
ऐकण्याचा हा असा फायदा? एक सुंदर अनुभव घेण्याचा? तेही जे ऐकतोय त्यातलं काहीही कळत नसताना?

माझ्या कादंबरीच्या लेखनाचा काळ. पहिला मसुदा मी अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केला होता. पण एका मित्रानं जमिनीवर आणलं. म्हणाला, “सिद्धहस्त नाहीस. थोडा वेळ घे.” दीडेक महिन्याचा खंड टाकला आणि पुन्हा त्यावर काम करणं सुरू केलं. आता सारं काही संगणकावरच होतं. सोबतीला सुरावटी असतात. एमपीथ्रीचं वेड लागून त्यातूनही बाहेर आलेला हा काळ होता. हे लेखन करताना सुरावटींचीच साथ होती. कारण हे असलं लेखन म्हणजे जीवघेणं असतं. जीव जाऊ द्यायचा नसेल तर साथ हवीच. ती सुरावटींची.
‘सेलेब्रेशन’ हा हरिप्रसाद चौरसियांचा अल्बम तेव्हा असाच हाती लागला होता. त्यातलं ‘शेफर्ड सॉंग’ आणि त्याला जोडून असलेल्या ‘क्रेसेंडो’ आणि ‘फ्री स्पिरीट’ या नावाच्या दोन धून. बास्स. आधीच बासरी आणि त्यात हे असं धनगरी/गुराख्याची धून वगैरे. मन राहतंय कशाला थाऱ्यावर. कादंबरीची पार्श्वभूमी आदिवासी जनसमुहांची. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या चिरंतनपणे चालत आलेल्या संगीताचा आस्वाद घेण्याची अनेकदा संधी मिळाली होतीच. त्यातल्या पाव्याच्या सुरांचं नातं इथं या ‘शेफर्ड सॉंग’शी जमायचं. सूर ऐकण्याचे दोन्ही स्तर वेगळेच. एक त्या तिथं, कुठंतरी कित्येक मैलांचं अंतर चालत कापून ऐकलेला, दुसरा इथं सगळ्या सोयी-सुविधांच्या जगात आधुनिक साधनांच्या साह्यानं ऐकलेला. पहिल्या स्तरावर डोळ्यांपुढं केव्हा तरी येऊन गेलेला तो आदिवासी गुराखी; गुरांचा कळप, त्यापाठोपाठ काखेत काठी धरून मनमुराद, निश्चिंतपणे पावा वाजवत निघालेला. त्याच्या त्या सुरावटीमध्ये काही क्रम वगैरे नसावा, चाल वगैरेही नसावी. किंवा माझ्या कंडीशनींग झालेल्या मनात ते उमटत नसावं. तो सूर बेगुमानपणे उधळून देत चालला होता. त्याच्या मागं एक दरी आणि तिच्यापलीकडं संध्याकाळच्या प्रवासाला लागलेला सूर्य. तांबडाबुंद. मी असतो इथं घरी. वेळ आहे रात्री केव्हा तरी किंवा सकाळ-दुपारची. ‘शेफर्ड सॉंग’ ऐकू लागलो की हमखास ते दृष्य डोळ्यांसमोर येतं. मग त्यापुढच्या ‘क्रेसेंडो’ या काहीशा फ्यूजनकडं झुकणाऱ्या सुरावटीनं मन आक्रंदून निघतं. पुढच्या “फ्री स्पिरीट” सुरावटीच्या वेळी म्हणतं, चल तिकडं जाऊ, त्या भागात. नागरी जीवनातील गजबजाटापासून मुक्ती, स्वातंत्र्य देणारं जगणं माझ्यादृष्टीनं तिथं होतं. तीच भावना नेमकी त्या ‘फ्री स्पिरीट’मधून कशी येते बाहेर मनाच्या उंबरठ्यापर्यंत?
असं का, पुन्हा प्रश्न. सूर हे त्यावरचं उत्तर हे मान्य. पण म्हणजे काय?

प्रश्नांच्या या भेंडोळ्यात सापडलो असतानाच मध्यंतरी एकदा शौनक अभिषेकी यांच्याशी बोलण्याचा योग आला. बोलता-बोलता शास्त्रीय संगीताविषयी जितेंद्र अभिषेकी यांचे विचार त्यांनी सांगितले. “थोडी वैचारिक बैठक असणाराच शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकतो.” बुवांचं हे विधान. खरंच असावं, हे मनात पक्कं झालं. एव्हाना त्यांनी ‘कट्यार’मध्ये केलेले प्रयोग वगैरे ऐकलं होतं. भैरवीनंच ‘कट्यार’चा आरंभ हा तो एक प्रयोग. इतरही आहेत. भैरवीनंच आरंभ करण्याच्या प्रयोगाचा अर्थ कळत नव्हता. भैरवी सकाळच्या आरंभीच्या प्रहरी किंवा पहाट ते सकाळ या सीमेवर गायची किंवा मैफिलीचा समारोप करण्याची रागिणी इतकंच काहीसं ठाऊक होतं. (प्रश्न असायचेच, बौद्धीक कसरतीतून आलेले. रागिणी सकाळची असेल आणि मैफल संध्याकाळी संपणारी असेल तर काय?) पण त्यामुळं ‘कट्यार’च्या अनुभूतीत कसा फरक पडतो? पडत असावा. पुढं हे नाटक दोनदा पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवली. या नाटकाचा आरंभच मुळात एक मैफल संपतानाचा आहे. तेव्हा सुरवात भैरवीनं करण्यामागचं प्रयोजन बरोबर असणार इतकंच लक्षात आलं. आता हे असं इतरही अनेकांच्या ध्यानी आलं असेलच. पण…
हा पण काही पिच्छा सोडत नाही.

शास्त्रीय नाही, पण तोच पक्का आधार असलेली दोन गाणी आहेत. “हे सुरांनो चंद्र व्हा…” आणि “रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी…” दोन्हींना माझ्या माहितीप्रमाणे संगीत आहे ते अभिषेकींचंच. एक ‘ययाती’मधलं आणि दुसरं… ठाऊक नाही. इतकंच कळतं की ही गझलेच्या अंगानं जाणारी रचना असावी. शंकर रामाणी यांची कविता. माझ्याकडं “हे सुरांनो…” बहुदा अर्चना कान्हेरे यांच्या आवाजातलं आहे. राग बहुदा चारुकेशी. जीवघेणी पेशकारी. कमालीची आर्तता आणि विनवणी. सूर साक्षात उभे राहिले आणि ती आर्तता त्यांनी ऐकली तर कदाचित त्या आर्ततेपोटीच प्रियकराकडं धावत जाऊन चांदण्यांचे ते कोष पोचवतील. “रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी…” आवाज बुवांचाच. हे गीत सरळसरळ विरहानं व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या आक्रोशाचं आहे, हे माझं आकलन. अर्थ वेगळाही असू शकेल. पण माझं या गीताशी जुळलेलं नातं “हे सुरांनो” सोबतच येत गेलं. कारण संगणकावर ऐकताना एका फोल्डरमध्ये ते त्याच क्रमानं येत गेलं. त्यामुळं तो अर्थ. आता या गाण्यातले शब्द समजतात आणि अर्थ लागतो असं म्हणणं इतक्या काळानंतर सोपंच आहे. पण सुरवातीला माझं ध्यान त्या शब्दांकडं फारसं नसायचंच. अनेकदा तर ‘हे सुरांनो’मधील “वाट एकाकी तमाची…” याऐवजी मी “वाट एकाकीच माझी…” असं घेऊन बसायचो. कारण मनात घर केलं होतं ते त्यातल्या सुरांच्या आर्ततेनं. मग शब्दांकडे ध्यान जायचंच नाही. तीच गोष्ट ‘रंध्रात’ची. त्यातली आर्तता अनुभवायची असेल, आक्रोश समजून घ्यायचा असेल तर प्रेमविरह हवाच का? नाहीच. ती पोचतेच त्याविनाही. त्या, आपण स्वतः नसलेल्या, प्रेयसी आणि प्रियकराच्या भूमिकेत हे सूर नेतातच.
आणखी एक. राग भूप. किशोरीताई. “सहेला रे”. केवळ अनुभवण्याची चीज (हा शब्द त्या अर्थानं नाही. एक गोष्ट या अर्थानं). ‘सहेला’सोबत सप्तसूर, त्यांचं ज्ञान करून घेणं. मुळात कल्पनाच जीवघेणी. त्यातल्या “आ मिल गाये” मधल्या “आ” मधला पुकार… वेगवेगळ्या धर्तीचा. मघाचे ते “चांदण्यांचे कोष” पोचवणारे सूर आता इथं प्रियकरालाच समोर आणून उभे करतात. शब्दच नाहीत, असा हा अनुभव येतोच.
कशामुळं घडतं हे? काय करतात हे सूर नेमकं आपल्याला?
दाखले असे द्यावेत तरी किती? एकेक रचना, मनात जाऊन बसलेल्या, बाहेर काढायच्या ठरवल्या तरी प्रश्नांचं स्वरूप तेच राहतं. मग ते रागदारी गायन असो, शुद्ध रागदारी किंवा फ्यूजन प्रकारातलं वाद्यसंगीत असो, ठुमऱ्या असो, दादरा तालातल्या रचना किंवा अनंत गझला. भावगीतेही आहेत. त्यातलीही एखादी जागा अशी मनात जाऊन बसलेली असते. सोबत तिच्या अशा खास आठवणी असतात.

ही एक अशीच गोष्ट. मध्यंतरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला काही अनुवाद करण्याची एक संधी मिळाली होती. त्यातून माणसासमोर चिरंतन काळापासून असलेले काही मूलभूत प्रश्न समजत गेले. हे सारं गद्यातून लिहिलं गेलेलं. कधी कल्पनाही केली नव्हती की त्यातील काही पायाभूत प्रश्न संगीताच्या रूपानं आपल्या डोक्यात थोडा प्रकाश टाकून जातील. संतांच्या रचना आहेतच. त्या ऐकल्याही होत्या. पण तशा अर्थानं ते प्रश्न आत जाऊन पूर्ण भिडलेले नव्हते. उदाहरणार्थ, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे…” यात किंवा “पसायदान”मध्ये वैश्विक मुद्यांचीच हाताळणी झाली आहे. त्या अर्थानं ते तत्वज्ञानच. आणि त्या संताच्या संपूर्ण कृतींचा विचार करून त्या रचना पाहिल्या तर पूर्ण तत्त्वज्ञान असंही म्हणता येतं. पण माणसापुढं वैयक्तिक स्वरूपातला प्रश्न असतो त्याची मांडणी माझ्या ध्यानी आली ती जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलेल्या एका भैरवीतून. रचना कबीरांची आहे. “मेरा तेरा मनवा कैसा एक होय रे…” बास्स. या एका प्रश्नात खरं तर कबीरांनी सारं काही सांगून टाकलंय, पण ते ज्यानं थोडं तत्त्वज्ञान वाचलंय त्याच्यासाठी. इतरांचं काय? पुढचा दोहा आहे, “मैं कहता अखियन देखी, तू कहता कागजकी लिखी…” हेही उत्तर पुरत नसेल तर पुढच्या एका दोह्यात कबीर अगदी अंतिम स्वरूपाचा पर्याय सांगून जातात. म्हणतात, “मै कहता तू जागत रहीयो, तू रहता है सोयी रे…!” अभिषेकी आणि बहुदा शौनक या दोघांनी त्यात ‘जागत’ आणि ‘सोयी’ या दोन शब्दांवर जो काही स्वरांचा – सुरांचा खेळ केला आहे काही क्षणांसाठी, तो तिथंच मनाचा प्रवास थांबवतो त्या काळासाठी. पुढं सरकावंसं वाटू नये असं काय आहे त्या शब्दांमध्ये? आहे ते, त्या शब्दांच्या अली-पलीकडील शब्दांतून येतंच. पण तरी मन तिथंच थांबू पाहतं. थांबत असलं तरी, त्या दोह्याचा अर्थ पक्का सांगून जातं. मग विपश्यना म्हणजे काय हे समजू लागतं, ध्यान म्हणजे काय हे समजू लागतं. ध्यान किंवा विपश्यना भले जमणार नाही, पण त्याचं तंत्र समजल्यानं एकदम बुद्धाला क्वांटम फिजिक्स कळलं असेल का, असा भलताच प्रश्न डोक्यात जागा होऊन जातो. ही केवळ त्या ‘जागत’ आणि ‘सोयी’ या दोन शब्दांवर झालेल्या सूर-तालाच्या करामतीची किमया आहे का? पुन्हा इथं तेच. इतर काही रचनांतून न भावलेलं वैश्विक सत्य इथं या रचनेतच का भावावं? रचना भैरवीत आहे. पण भैरवी तर मला ओळखताही येत नाही. पण मग शब्दांचा अर्थ एरवी जितक्या ताकदीनं संप्रेषित होत नाही तितका इथंच का होतोय? सुरांची ताकद हे उत्तर ठीक. पण म्हणजे काय?
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून म्हणे, खरं तर कोणत्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठं थांबवायचा याचं प्रत्येकाचं आकलन त्यातून तयार होतं. हे असंच संगीताचं असावं बहुदा…

संगीत समजून ऐकणं आणि न आकळताही संगीत ऐकणं हे द्वंद्व माझ्या मनात कायमचं घर करून बसलंय. मन आणि मेंदू यातलं हे द्वंद्व आहे का? असावं बहुदा. ऐकताना कुठंही काहीही कमी वाटत नाही. तरी जे ऐकतोय त्यातून निर्माण होणाऱ्या अनुभूतीचा अर्थ लावण्यासाठी मनाला पुरेशी ताकद लागते ती मिळत नाही. ती बुद्धीची ताकद असं तर नाही? तिथं मेंदू कामाला येतो का? म्हणजे तो सूर, ताल, लय, स्वर वगैरेंचं विश्लेषण करून मनापर्यंत पोचवत असावा का? गुरू केल्याशिवाय हे झेपणे नाही हे उत्तर देऊन तात्पुरतं मनाचं समाधान होतं, पण तो प्रयत्न होत नाही आणि मग पुन्हा असं काही ऐकलं की जिवाची घालमेल होतेच. अशी अनुभूती चित्रगीत, भावगीत यासंबंधात होते का? माझा अनुभव असा आहे की, होतो; पण तेथे त्याचा गहिरेपणा अपवादात्मकच असतो. अपवादाचीच गोष्ट सुरू आहे म्हणून त्यापैकी दोन गीतांचा उल्लेख करावा लागेल. एक आहे चित्रगीत “कभी तनहाईमें यूँ”, संगीत स्नेहल भाटकरांचं; आणि दुसरी आहे गुलाम अलींच्या (थोरल्या नव्हे; छोट्या) आवाजातली एक ठुमरी, “गोरी तोरे नैना…” पारंपरिक पद्धतीनं पेश केलेली आणि सोबत तिचा दादरा. या दोन्ही रचनांमध्ये काय भिडतं आत जाऊन? सांगणं शक्य नाही. पण वेडावतात या दोन्ही रचना. यातली पहिली अनेकांना आवडत असेल. “गोरी तोरे नैना” ही ठुमरी सगळ्यांनाच भावते की नाही ठाऊक नाही.
अशाच एका चर्चेत माझ्या मित्रानं सांगितलं होतं, या अपवादाचा नियम करावयाचा असेल तर थोडं शास्त्रीय संगीत शिकून घ्यावंच लागेल तुला. त्यासाठीचा दाखला साधा सरळ होता. आमच्याच संवादातला. मी म्हणालो होतो, अनेकदा सुरेश वाडकरांच्या ‘ओंकार स्वरूपा’मधल्या काही रचना सकाळी ऐकल्या की खूप प्रसन्न वाटतं. त्यानं ताडकन सांगितलं होतं, “कारण त्या सकाळच्या रागांमध्ये बांधलेल्या आहेत.”
पुन्हा संगीत, सूर, लय, ताल आणि काळाचं नातं…
म्हणजे काय, तर प्रश्नच.
त्या मित्रानंच पुलंच्या एका दाखल्याचा आधार घेत सांगितलं, “न समजताही संगीत ऐकणं आणि त्यातला आनंद मिळवणं, शोधणं हे ठीक. पण ते कसं आहे की आंधळ्या शिल्पप्रेमीसारखं. तो आपला शिल्प चाचपडत राहतो, त्यातलं शिल्प त्याच्या हाती लागतंही. पण ते त्याला दिसत नसतं. शिल्पाचा आनंद त्याच्यालेखी स्पर्शाचाच असतो. तो असेलही त्याच्यापुरता पूर्ण; पण नेत्राच्या पातळीवर तो येत नाही. तसा आला नाही की हे असे प्रश्न येतात. तसंच हे तुझं.” पुलंच्या बंगचित्रंमध्ये या चित्रकाराचा दाखला असावा. अंध असूनही तो हातानं दाखवत चित्र करून घेतो असा काहीसा. तसं हे माझं. तो चित्रकार तिथं चित्र काढतानाचा आनंद जरूर मिळवतो. पण तयार चित्रकृतीचा दृष्टीसुखाला मात्र तो तसा पारखाच असतो.
हे द्वंद्व असं सुटणार नाही हे नक्की.
पटतं की, गुरूच हवा.
प्रश्नांच्या उत्तराचा शोध इथंच थांबवावा काय?
हाही एक प्रश्नच…


प्रवास

ऑगस्ट 11, 2008

तो अनादी आहे. अनंतही असेल. असावाच. कारण आपल्याला अंत आहे.
तो. काळ.


संध्याकाळ. ५. ३०.
संध्याकाळ श्रावणातली असली तरी, श्रावणाचा कुठंही मागमूस नाहीये. ना पावसाची रिपरिप आहे, ना मधूनच येणारा उन्हाचा कवडसा. फक्त आभाळ गच्च भरलेलं आहे. पण ते कोंडलेलं आहे. कोणत्याही क्षणी मुक्तपणे उधळण करू शकण्याच्या परिस्थितीत नाही हे लगेचच जाणवून जातं. आम्ही दुष्काळी भागातच आहोत, हे दाखवण्यासाठी आणखी कशाचीही आवश्यकता नाही.
बलवडी येथे संपतराव (पवार) यांनी आयोजित केलेल्या एक सुंदर कार्यक्रमासाठी मी तेथील क्रांती स्मृतिवनात पोचलो आहे. रस्त्यावरून साधारण फर्लांगभर अंतर आत गेलं की क्रांती स्मृतिवनाची सीमा सुरू होते. घनगर्द झाडी. वेगवेगळी झाडं. पावसानं चिखलमय केलेल्या पायवाटेवर अनेक फुलांची उधळण निसर्गानंच करून ठेवलेली. पारिजातक, मोगरा हीही त्यात आहेतच. त्यांचा गंध वातावरणात भरून राहिलेला आहे, असं म्हणता येईलही आणि नाहीही. कारण मधूनच तो गंध तुमच्या नाकपुड्या उल्हासित करून जातो आणि पुढच्याच क्षणी पुन्हा अस्सल पावसाळी वातावरणाचा गंध तुमचा ताबा घेतो. स्मृतिवनाच्या उंबऱ्यशी पोचलो आणि मोराची केका वातावरणात घुमली. येताना रस्त्यातच चांगला साडेतीन फुटांचा पिसारा मिरवत असलेल्या एका मोरानं दर्शन दिलं होतं. आता इथं पुन्हा केका. एकूण थोडासा श्रावणाचा फील त्यातून यावा.
स्मृतिवनाच्या उंबऱ्यापासून आत शिरलो ते भजनाच्या सुरांनी कब्जा केला. ‘लहानपण देगा देवा’ची आळवणी सुरू होती. इतक्या विविध प्रकारे की, सांगता सोय नाही. साथीला पेटी आणि मृदंग. त्या सुरावटींवर स्वार होतच आम्ही पुढं सरकतो. एकूण तीन नवे वृक्ष त्या ठिकाणी लावण्याचा हा कार्यक्रम आहे. मेधा पाटकर यांच्या हस्ते तिन्हीचं वृक्षारोपण होतं. शिवाय संजय संगवई मंचाचं भूमिपूजनही. वृक्षारोपणाच्या जागा आणि मंचाची जागा यामध्ये अंतर आहे. संजयच्या आईंचा, विजयाताईंचा, संतसाहित्याचा अभ्यास. त्यामुळं भजनाची योजना. त्यांच्यासमवेतच वृक्षारोपणाच्या जागी आणि मंचाच्या जागी अभंग गातच दिंडीनं जाण्याची कल्पकताही संपतरावच दाखवू जाणे. आम्ही तशा दिंडीनंच त्या वनात फिरलो.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस या भागात बरसलेलाच नाही. जो काही झाला तो अगदी माती भिजवण्यापुरताच. त्यामुळं पलीकडं येरळा नदीच्या पात्रात वाळूचंच दर्शन होतंय. वनाच्या कडेला थांबून मी येरळेकडे पाहतो. पश्चिमेला फर्लांगभर अंतरावर बळीराजा बंधारा दिसतो. कोरडा ठाक. कधीकाळी सामुदायीक स्वरूपात पाण्याची सोय करण्याचा एक आदर्श म्हणून ज्याचा उल्लेख झाला तो ‘बळीराजा’. दुष्काळानंच माणसाच्या या शक्तीवरही मात करून ठेवल्याचा हा आणखी एक दाखला.
लक्ष पूर्वेच्या दिशेनं वळतं. समोरचं एक डबकं साचलेलं आहे. त्याच्या काठाशी बसून एक मोर पाणी पितोय. आमच्यापासून अंतर बरंच आहे, त्यामुळं निर्धोक स्थितीत त्याचा वावर सुरू आहे. पिसारा फुलावा ही माझी इच्छा. पण पावसानंच अंतर दिल्यानं तो तरी बिचारा काय करेल? मघा रस्त्यात भेटलेल्या मोराप्रमाणेच हाही त्या पिसाऱ्याला नुसतंच आपल्या पाठी मिरवत फिरतोय.

रात्र. ९. ००.
संपतरावांच्या घरी जेवण करून आम्ही बसलो आहोत. समोर कात्रणांच्या, निवेदनांच्या असंख्य फायली. बळीराजाचा संघर्ष जसा त्यातून समोर उभा राहतोय, तसाच उभा राहतोय तो क्रांती स्मृतिवनाचाही संघर्ष. संपतरावांच्या एका चिरंजिवांच्या अकाली जाण्याची नोंदही त्या कात्रणातून समोर येतेच.
सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी कात्रणं आहेत ती संपतरावांनी पाणीनियोजनाच्या अनुषंगानं केलेल्या लेखनाची. आपल्या या प्रदेशात पाण्याचं नियोजन स्थानिक स्रोतांच्या संवर्धनाच्या अनुषंगानंच व्हावं अशीच त्यांची सारी मांडणी आहे. दुष्काळी भागात पाण्याचं नियोजन सरधोपट मार्गानं करून चालणार नाही. त्यासाठी पाण्याचे स्रोत, त्यातील पाण्याची उपलब्धी आणि त्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्याच्या हाती उत्पन्न ठेवणारी पीकव्यवस्था आणि त्या पिकांना उत्पादन खर्चानुसार भाव ही त्यांच्या या मांडणीची चतुःसूत्री.
संपतराव बोलू लागतात तेव्हा या चतुःसूत्रीचा एकेक पैलू समोर येत जातो. ऊस ही पाणी पिऊन घेणारी पीकव्यवस्था. तिचा पुरस्कार केल्यानं शेतकऱ्याच्या हाती थोडी वरकड आली असली तरी, पाण्याच्या व्यवस्थेचे तीनतेरा वाजलेत हे ते सांगत जातात. त्यांचा एकेक लेख या मांडणीचा विस्तारच असतो. कधी या लेखातून तर कधी त्या लेखातून एखाद्या मुद्याचा विस्तार होत जातो. आमची चर्चा नंतर वळते ती दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाकडे आणि तिथून बोलता-बोलता झोप आमच्यावर स्वार होते.

सकाळ. ८. १५.
आटपाडीच्या दिशेनं आमची गाडी निघते. ‘आंदोलन’ मासिकाच्या सुनीती सु. र., संपतराव आणि संजय संगवई अभ्यासवृत्तीधारक अभ्यासक दीपक पवार यांच्यासमवेत मी आहे. गाडीचे (सं)चालक सागर साळुंखे. आमची चर्चा पाणी, कालवा, धरण अशा चौकटीतच असते. ती ऐकून त्यांना त्यात रस निर्माण होतो. त्यांच्याकडून प्रश्नांची सरबत्ती सुरू होते. मी ऐकण्याच्या भूमिकेत आहे. त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांचंच उत्तर मिळावं अशा बेतानं चर्चा सुरू ठेवण्याकडंच माझा कल. हेतू शुद्ध आहे, इथल्या लोकांनाच किती माहिती आहे त्यांच्या प्रश्नांची आणि त्यावरील उत्तरांची, हे मला पहायचं आहे. ते बोलत जातात. तालुक्यात मोठा जलाशय झाला पाहिजे, पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी रोखलं पाहिजे वगैरै मुद्दे. त्याला एक डिसक्लेमर. “मी माझ्या अकलेनुसार हे बोलतोय. तुमच्या इतका माझा अभ्यास नाही. त्यामुळं यात चुकाही असतील.”

सकाळ. १०. ००.
आटपाडी ग्रामपंचायतीमध्ये काही मंडळी जमली आहेत. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आहेत, काही पत्रकार आहेत, काही राजकीय कार्यकर्ते आहेत. परिचय करून घेऊन चर्चा सुरू होते.
“मान्सून आमच्याइथं तसा येतच नाही. पहिला येतो तो आमच्यापासून पश्चिमेला थांबतो, नंतर येतो तो पूर्वेलाच सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर थांबतो.” एका वाक्यात पावसाच्या स्थितीचं वर्णन होतं.
दर वर्षी जुलै ते सप्टेंबर हे महिने हे गाव पाण्याचा दुष्काळ अनुभवतं. वरच्या पट्ट्यात जोराचा पाऊस झाला की, पुराचं पाणी या गावाच्या वेशीला लागतंच; पण ते वाहून जातं. पुढं पुन्हा दुष्काळ.
“हा तालुका कायम दुष्काळी आहे कारण तो पर्जन्यछायेत येतो,” माझ्याशेजारी बसलेले पत्रकार मला सांगू लागतात.
मी त्यांना विचारतो, “त्यावर मार्ग काय?”
“बाहेरून पाणी आणून इथं ते पुरवणं.”
त्याविषयीच अधिक चर्चेची आमची अपेक्षा असते. बाहेरून म्हणजे कुठून, ते कसं आणायचं हे त्यातले कळीचे प्रश्न नाहीत. बाहेरूनच का आणायचं, स्थानिक स्रोतांतून पाण्याची उपलब्धता करता येणार नाही का, हा आमचा प्रश्न असतो. पण चर्चा आधी “बाहेरून पाणी” या मुद्याकडंच जातं. टेंभू पाणी योजना हा त्यावरचा सर्वश्रृत पर्याय. कऱ्हाड जवळ टेंभू गावापासून कृष्णेचं पाणी उचलायचं आणि ते आटपाडीमार्गे सांगोल्याला न्यायचं अशी ही योजना आहे. सुमारे शंभरावर किलोमीटर लांबीचा कालवा त्यासाठी करावा लागणार आहे. त्यापैकी काही भागांत कालवा खणून तयार आहेदेखील. एक बोगदाही आहे मध्ये. तोही तयार आहे. पाणी उचलण्याची यंत्रणा मात्र अद्याप कार्यान्वित झालेली नाही. ती होण्याची शक्यता नजिकच्या भविष्यात तरी इथल्या मंडळींना दिसत नाही. चर्चा इथं येऊन थांबते आणि प्रश्न येतो, स्थानिक स्रोतांचं काय?
तालुक्यात असलेल्या प्रत्येक नदी-ओढ्यामध्ये गाळ भरला आहे. तो काढून टाकला पाहिजे. एक सूचना येते. एव्हाना या चर्चेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रामभाऊ पाटील सहभागी झालेले असतात. हातात सोनेरी पट्ट्याचं घड्याळ, बोटांमध्ये अंगठ्या, खिशात मोबाईल. शुभ्र पांढरा वेष. शर्ट आणि पँट.
“गाळ काढण्याचं नियोजन सरकारी पातळीवर झालं आहे,” ते सांगू लागतात. त्यांच्या या मताशी समोर असलेल्यांपैकी काही जण सहमत नाहीत. त्या नियोजनाचे वाभाडे काढण्यास सुरवात होते तेव्हा रामभाऊ सूर बदलतात, “गाळ काढण्याची दुसरी बाजूही ध्यानी घेतली पाहिजे. तो गाळ टाकायचा कुठं?” माझ्याकडं पाहून त्यांचा हा प्रश्न असतो. माझ्या चेहऱ्यावर बहुदा छद्मी हास्य येतं. सरकारी नियोजनाचा पुरस्कार करणारा माणूस क्षणात त्यातील अडचणी सांगू लागलेला पाहूनच ते हास्य आलं असावं. रामभाऊ विषय पुन्हा टेंभूवर नेतात.
“टेंभूतून तरी तुमच्या तोंडी पाणी येणार आहे का?” माझ्या मनातील प्रश्न मनातच राहतो, कारण संपतराव बोलू लागतात. टेंभूला जलआयोगाची मान्यताच नाही हा त्यांचा बिनतोड मुद्दा असतो. रामभाऊ म्हणतात, “म्हणूनच एक पर्याची योजनाही सादर करण्यात आली आहे शासनाला. वरच्या भागातून पावसाच्या काळात वाहून जाणारं पाणी इथं आणून देण्याची.” त्याची टिप्पणी संपतरावांकडं असतेच. त्यामुळं त्या योजनेवर पुढं चर्चा होत नाही.
“आटपाडीत स्थानिक स्तरावरच पाण्याचं नियोजन होऊ शकतं की, नाही?” सुनीती यांचा प्रश्न.
उत्तर होकारार्थीच असतं. इतकंच नाही तर पाण्याच्या या प्रश्नावर आम्ही सारे एक आहोत, असंही सांगितलं जातं. पाणी मिळावं यासाठीची ही एकी आहे, ते कसं मिळावं याविषयी नाही हा या चर्चेचा निष्कर्ष मी मनातच नोंदवून ठेवतो.
निघतानाच मी आणखीही एक नोंद करतो. तिथल्या फलकावर सरपंच म्हणून एका महिलेचं नाव आहे. आमच्या या चर्चेवेळी एकही महिला तिथं उपस्थित नसते. अपवाद मी ज्यांच्यासमवेत आहे त्या सुनीती यांचा.

सकाळ. ११. ३०.
आटपाडीहून करगणीकडे आम्ही निघतो. मुख्य रस्त्यावरचंच हे गाव. पण आम्हाला मुख्य रस्त्यावरून जवळच्या एका वाडीवर जायचं असतं. तिथं डाळिंब उत्पादकांची एक कार्यशाळा सुरू आहे. त्याच ठिकाणी लोकांशी अधिक उपयुक्त चर्चा होऊ शकते यासाठी.
करगणीच्या बाजारपेठेतच अण्णा पत्की आम्हाला येऊन मिळतात. तेच पुढचा रस्ता दाखवणार आहेत. बहात्तर वर्षांचा हा वृद्ध गृहस्थ पूर्वी जिल्हा परिषदेचा सदस्य होता. स्वच्छ पांढरं धोतर, पांढचा अंगरखा. डोक्यावर विरळ झालेल्या श्वेत छटा, गांधी टोपीतून डोकावणाऱ्या.
अण्णा येण्याआधी गाडीत आमची चर्चा सुरू असतेच. या भागाच्या दुष्काळाचा इतिहास किती जुना आहे या अनुषंगानं. या चर्चेत अर्थातच पूर्वीची पाण्याची परिस्थिती, त्या अनुषंगानं असणारी पीकव्यवस्था असे मुद्दे असतात. संपतराव सांगत असतात त्यानुसार पूर्वी स्थिती वेगळी होतीच. पण ते हा विषयच अण्णांच्या दरबारात नेण्याचं सुचवतात.
अण्णांचा आणि माझा पूर्वपरिचय काहीही नाही. त्यामुळं मी अगदी बाळबोध पद्धतीनं प्रश्न विचारू लागतो.
“अण्णा, तुमचं वय किती?”
“बहात्तर वर्षं.” हे उत्तर सुखावणारं असतं. कारण किमान अडीच पिढ्यांची माहिती हा गृहस्थ देऊ शकेल हे निश्चित असतं.
“पूर्वी, म्हणजे तुमच्या लहानपणी, काय स्थिती होती इथं पाण्याची आणि पिकांची.”
इथं लहानपणी हा शब्दप्रयोग मी उगाचच केला आहे हे पुढं अण्णांच्या उत्तरातून सिद्ध होतं.
“विहिरी होत्या इथं. या गावात चाळीस-एक तरी नक्कीच. त्यावर बागायती व्हायची. देशी ऊस…” अण्णा पिकांची नावं सांगू लागतात, पण त्याची गरज नसते. देशी ऊस होईल इतकं विहिरींना पाणी असेल तर प्रश्नच निकालात निघत होता.
“पुढं काय झालं?”
मग सुरू होते ती दुष्काळ कसा-कसा येत गेला त्याची कहाणी. सुरवातीला दहा-पंधरा फुटांवर असणारं विहिरीचं पाणी आधी ऑईल इंजीन आणि मग वीजेचे पंप आल्यावर कसं खोल गेलं, पाहता-पाहता विहिरी कशा खोलवर न्याव्या लागल्या, त्याच काळात झाडोऱ्याची तोडणी कशी वाढत गेली आणि पुढे पाऊसमान कसं कमी होत गेलं याची ही कहाणी असते. अण्णा त्यांच्या वयाच्या टप्प्यानुसार सांगतील अशी माझी अपेक्षा असते. पण ते थेट सालांनुसार सारं सांगत जातात आणि माझा त्यांच्याविषयीचा भ्रम दूर होतो. या माणसाचा अभ्यास आहे, हे पटतं आणि मी मनोमनच खजील होतो.

दुपार. १२. ००.
करगणीच्या पुढं ज्या वस्तीवर आम्ही गेलो तिला वस्ती का म्हणायचं? साधारण फर्लांगभराची त्रिज्या घेतली तर एकही घर नाहीये. या एकाकी घराच्या पटांगणात पंचवीसेक मंडळी बसली आहेत. राहुरी कृषी विद्यापीठाच्या वतीने मार्गदर्शनासाठी ही कार्यशाळा आहे. सरकारचे दोनेक कर्मचारीही आहेत. या दुष्काळी भागात डाळिंबाच्या बागा आता मोठ्या प्रमाणात फुलताहेत. गेल्या चार वर्षांतील ही घडामोड. पहिल्या दोन वर्षांत डाळिंबाचा भाव पडला आणि इथल्या डाळिंब उत्पादकांच्या तोंडचं पाणी पळालं होतं (किती सहजगत्या हे मी लिहून जातोय. या भागात तोंडचं पळण्यासाठीही पाणी नसतं हे माझ्या गावीही नाही). पण गेल्या आणि यंदाच्या वर्षी त्यांना थोडा दिलासा मिळालेला दिसतोय असा आमचा पहिला पाठ.
आधी होतो तो स्वागताचा कार्यक्रम. मला फेटा बांधला जातो. माझी ओळख करून देताना संपतराव म्हणतात, “तो श्रावण तसा येत नाही, हा आलाय.” आधीच फेट्यामुळं मी नतमस्तक झालेला असतो. त्यात ही तुलना. कसंबसं हसून प्रतिसाद देतानाही मला माझ्या खुजेपणाची परत जाणीव होते. निसर्गतःच असलेला ‘श्रावण’ इथं काही करू शकत नाही यातून आलेली जाणीव.
डाळिंबाचं पीक इथं कसं घेतलं जात असावं?
“लहानपणी सांगलीला गेलो होतो. तिथं सापांच्या सान्निध्यात… तास असे बोर्ड पाहिले. ते पाहण्यास गेलो. सापांच्या सान्निध्यात खरंच एक माणूस बसला होता. सगळीकडं साप. कोणत्या सापाचं तोंड कुठं सुरू होतं आणि कुठं संपतं हेच कळत नव्हतं. इथं तेच आहे. पाण्यासाठीच्या पाईपलाईन. कुठून कुठं गेल्या असतील सांगता येत नाही. आपण समोर पाहतोय ती डाळिंबाची बाग साडेतीन किलोमीटर अंतरावरून पाईपलाईननं पाणी आणून उभी केली आहे.” वकील खिलारे सांगतात.
अगदी चपखल वर्णन असावं हे. कारण पाईपलाईन हा विषय आमच्यासमोर एका सरकारी अहवालातून आलेला असतोच.
“इथला दुष्काळ…” फारसं बोलावं लागतच नाही.
खिलारेच पावसाचं वर्णन करतात जे याआधी आटपाडीत आम्ही ऐकलेलं होतंच. फरक इतकाच की खिलारे नेमकेपणाने मॉन्सून आणि रिटर्न मॉन्सून या शब्दांचा प्रयोग करतात. किंवा नैऋत्य मॉन्सून आणि ईशान्य मॉन्सून अशा शब्दांमध्ये.
“काय केलं जातंय नेमकं?”
“शेततळी हा एक पर्याय आहे. पण सरकारची त्याला पुरेशी साथ नाही. नद्या आणि ओढ्यांवर बंधारे झाले आहेत, पण ते गाळानं भरले आहेत. गाळ असल्यानं पुढं पाणीच नाही. त्या प्रवाहात पाणी नाही म्हणून मग विहिरी, इतर पाणवठेही कोरडे पडले आहेत…” अण्णा सांगत असतात.
कोणीतरी त्यांना रोखतो, “टेंभूचं बोला.”
त्याचा तो आक्रमक सूर पाहून पाणी कसं पेटू शकतं याची कल्पना यावी. अण्णा थोडे डिफेन्सीव्ह होतात. “तेही आहेच. ”
“तुम्हाला टेंभू योजनेचं कसं समजलं? योजनेची आखणी होत असताना तुमच्याशी तज्ज्ञांनी चर्चा वगैरे केली होती का?” मी विचारतो.
“नाही. इथं एक मेळावा झाला, त्यात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. स्थानिक आमदारांनी आयोजित केलेला मेळावा होता तो.”
मग स्थानिक राजकारणाचा एक पाठ होतो. या दुष्काळी भागांतील काही तालुक्यांचे अपक्ष आमदार. त्यांनी सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यात या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची अट टाकलेली असते. त्यातून या टेंभूची योजना तयार झाली. एक तप झालं त्याला. रयतेचा ताप मात्र तसाच आहे.
“काय करावं लागेल?”
“तुम्हीच सांगा काही तरी. आम्ही एक आहोत.” अण्णा बोलतात. पुन्हा एकवार आमची चर्चा थांबते.

संध्याकाळ. ५. ००.
परतीच्या प्रवासात काही गावांमध्ये नवेकोरे, पक्क्या बांधकामाचे, सुंदर रंगसंगती असणारे बंगले आमचे लक्ष वेधून घेतात. स्वाभाविक प्रश्न येतोच. दुष्काळी भागात हे कसं?
त्या बंगल्यांची कहाणी वेगळीच आहे. या भागातील किमान पन्नास हजार मंडळी अशी आहेत की ज्यांनी देशाटन केलं आहे. म्हणजेच ती मंडळी इतर राज्यांत गेली आहेत. तिथं ती सोनं गाळण्याचं अगदी खास काम करतात. त्यातून आलेल्या ‘समृद्धी’ची ही फळं आहेत. संपतराव त्या मंडळींचं वर्णन करतात, “ही मंडळी सोन्याची माती करतात आणि मातीचं सोनं.” मला आधी हे अलंकारीक बोलणं वाटलं होतं. पण वास्तवात तसं नाहीये. हे कारागीर सोन्याची खरंच राख करतात आणि त्यातून पुन्हा सोनं मिळवतात. रासायनिक प्रक्रियेच्या आधारे.
असाच आणखी एक वर्ग इथं आहे. हे आहेत मुंबईच्या गोदीतील कामगार. या भागातील प्रत्येक खेड्यातून तालुक्याच्या ठिकाणी जाण्यास भले एस. टी. नसेल, पण मुंबईसाठी हमखास आहे. तेच पुण्याबाबत. तिथले अनेक बांधकाम मजूर या भागातलेच.
दुष्काळ आणि सुकाळ यांच्यातील सीमेवरचे हे दोन वर्ग. पहिल्या वर्गाचं वास्तव्य सीमेच्या त्या बाजूलाच अधिक. दुसऱ्या वर्गाचं वास्तव्य या बाजूलाच अधिक. हाच वर्ग संख्येनं मोठा.

संध्याकाळ. ६. ००.
परतीच्या प्रवासात आम्हाला किमान सहा ठिकाणी टेंभू योजनेचा कालवा आडवा आला. खोलवर गेलेला. काही ठिकाणी पंधरा मीटरपर्यंतची खोली. काही ठिकाणी त्यापेक्षा कमी. काही भागांत पाणी साचलेलं आहे तर काही ठिकाणी तळाचा खडक दिसतोय. या तालुक्याच्या जमिनीवर ही कालव्याची रांग तर जमिनीखाली पाईपलाईनची. दोन्ही कोरडेच. वरून दुष्काळ.
या योजनेच्या विहिरीपाशी आम्ही पोचलो. तिथं थोडं पाणी दिसत होतं. बांधकामदेखील वरपर्यंत चढलेलं पण अपुरंच. त्यामुळं कोरडा कालवा आणि कोरड्या पाईपलाईन पाहत आशेची किरणं धुंडाळत बसणारे गावकरी.
काळाच्या अव्याहत प्रवासातला हा दुष्काळाचा एक टप्पा. त्याच्यासाठी छोटासा. तुम्हा-आम्हासाठी पिढ्या-न-पिढ्यांचा.

दुपारची एक आठवण. वैयक्तिक.
करगणीच्या त्या वस्तीवर माझा परिचय नावासह करून दिलेला असतो. जेवण संपल्यावर अण्णा मला त्या घराच्या मागील बाजूला बोलावतात. पूर्वेला दूरवर डोंगरांची रांग असते. त्या दिशेनं बोट करतात.
“हा आडवा डोंगर म्हणजे कावडीची दांडी. त्या दोन टेकड्या म्हणजे कावडीची पात्रं. ही श्रावणाची कावड.”
त्या डोंगराच्या अलीकडं. कावडतळं आहे. तिथंच आपल्या आईवडिलांसाठी पाणी भरण्यासाठी श्रावण गेला होता. तिथंच दशरथाचा बाण लागून त्यानं प्राण सोडला, अण्णा सांगतात.
आता माझ्याकडं शब्द नसतात.
त्या काळी घागर बुडताना “बुडबुड” आवाज येण्याइतकं तरी पाणी इथं असावं…


मैत्र!

जून 4, 2008

तो आणि मी…
आम्हा दोघांचं मैत्र केव्हापासूचं?
मला तरी सांगता येणार नाही…
मीही तुमच्यासारखाच…
त्याच्या प्रेमात पडलेला…
वेगवेगळ्या रुपात तो भेटतो… तुम्हाला तसाच मलाही…
लहानपणापासून भेटत आलाय…
तो… पाऊस…

गावची माती लाल. त्यामुळं तिथल्या पावसाच्या आठवणी त्या लाल रंगाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. तेव्हा गावाचं कॉंक्रिटचं जंगल झालेलं नव्हतं. त्यामुळं आम्ही रहायचो त्या पेठांमधल्या वाड्यांमध्ये पावसाळ्यात तळी साचू शकायची. ही तळी स्वच्छ असायची. त्यांचा लाल रंगच त्यांच्या स्वच्छतेची खात्री द्यायचा. तळी म्हणजे माझ्या तेव्हाच्या – सहा-सात वर्षे – वयाच्या आकाराला साजेशी तळी. शेजाऱ्यांच्या आवारात असलेलं चिकूचं झाड अर्धं आमच्या आवारात आलेलं होतं. ते बरोबर माझ्या घराच्या दारासमोर यायचं. तिथं एका शेजाऱ्यांचीच चारचाकी लावलेली असायची. तिच्यापुढं एक रिक्षा. या दोन्ही गाड्यांच्या चाकांचे पट्टे तयार झालेले असायचे त्या पावसाळ्याच्या दिवसात. त्या पट्ट्यांमधून दुपारी आलेला पाऊस पाणी ठेवून जायचा. पावसाचा जोरही अगदी मध्यम असायचा. त्यामुळं पाणी साचायचं ते केवळ त्या चाकांच्या पट्ट्यांपुरतं आणि शेजारी घराच्या भिंतीना लागून फुलझाडांसाठी केलेल्या वाफ्यांमधल्या तळ्यांपुरतं. ते पट्टे वाहून जाणार नाहीत याची तो आम्हा मुलांसाठी खबरदारी घेत असावा. त्या पट्ट्यांच्या नद्या आमच्या कागदी नावा फिरण्यासाठी पुरायच्या. त्या नद्यांमधून शेजारी तळ्यांपर्यंत वाट काढून नावा तिथून चालवत न्यायच्या. या खेळात आम्ही इतके गर्क होऊन जायचो की, कपड्यांना मातीचा लाल रंग कधी लागला, आपले हात-पाय आणि बहुतेकदा तोंडही त्या रंगानं कसं माखून गेलंय हे कळायचं तेव्हा आईचं ओरडणं खावं लागलेलं असायचं. तेव्हाच्या पावसाची आज लक्षात राहिलेली आठवण ही एवढीच. अगदी निरागसपणे घर करून बसलेली. तिला मनातून काढणं शक्य झालेलं नाही हे मात्र खरं.
अर्थात हे दिवस होते अगदी प्राथमिक शाळेतले. नंतरच्या वर्षांमध्ये गावाच्या परिसरातील खेड्यांना सायकलींवरून भेटी देण्याचा एक छंद आम्हा तिघा-चौघांना जडलेला होता. हे एक गाव मनात घर करून बसलंय ते तिथल्या आंब्याच्या झाडांमुळं. मोसमात तिथं जाऊन जमिनीपर्यंत रेंगाळत आलेल्या फांद्यांना लागलेल्या कैऱ्या तेव्हा अक्षरशः झोपून खाल्ल्या आहेत, तशा परत कधीही चाखायला मिळाल्या नाहीत. एकदा ते कळल्यानंतर किमान तीन वर्षं दर उन्हाळ्यात तो कार्यक्रम एकदा तरी केलाच आहे. अशाच एका दिवशी हा भेटला, भर रस्त्यात. जाताना एक टेकडी लागायची. रस्ता टेकडीवरून गेला असल्यानं ती चढती त्या भागात प्रसिद्ध. त्या चढावरच त्या दिवशी वळवानं आम्हाला गाठलं. त्या टेकडीवर कुठंही कसलाही आडोसा नव्हता. एकही झाड नव्हतं. त्यामुळं भर रस्त्यात थांबून आम्ही त्याच्याकडून झोडपून घेतलं होतं. दुपारी साडेबाराची वेळ असावी. घरापासून साधारण दहा मैल अंतरावर होतो. जिथं जायचं होतं ते गाव आणखी दोन मैलांवर होतं. पाऊस असा तोंडावर येत होता की चढावर पुढं सरकणं मुश्कील झालं होतं. सायकलींना स्टॅंड लावला तरी त्या पडायच्या. चाक मागं सरकू नये म्हणून कुलपं घालून त्या धरून ठेवल्या होत्या तिघांनीही. पावसानं जराही दयामाया न दाखवता झोडपलं असलं तरी सुदैवानं वारं नव्हतं. अन्यथा आमची पंचाईतच होती.
दुपारी पावसाकडून झोडपून घेतल्यानंतरही कैऱ्यांच्या मेजवानीचा उत्साह कायम होता. तो उरकून संध्याकाळी पाच-साडेपाचला घरी आलो ते फटके खाण्याच्या तयारीतच. पोटभर शाब्दिक फटके खाल्ले आणि मान खाली घालून अभ्यासाला लागलो (हो तेव्हा सुटीतही ठराविक अभ्यास करावा लागायचाच) तेव्हा पुन्हा एकदा वाकुल्या दाखवत पाऊस बरसून गेला होता. संध्याकाळ अशीच वाया घालवून…
त्या गावातला आणखी एक पाऊस आठवतोय. तेव्हा मी चौदा-पंधरा वर्षांचा असावा. आठवतंय त्यानुसार तेव्हा तो सलग चार दिवस कोसळत होता. शाळांना सुट्या वगैरे तर मिळाल्या होत्याच, पण त्या दिवसांकडं नंतर मागं वळून पाहिलं तेव्हा जनजीवन ठप्प होणं म्हणजे काय हे मला समजलं होतं. ते तीन दिवस आम्ही घरांतून बाहेर पडलो नव्हतो. दूध घरात नसणं म्हणजे काय याचा अनुभव तेव्हाच मिळाला. तीच गोष्ट भाज्यांची. भाजी खरेदी रोजचीरोज करण्याचे ते दिवस होते. त्या पावसानं घरांची दारं उघडण्याची फुरसतही तेव्हा दिली नव्हती. असं म्हणतात की, गावात शतकातील सर्वाधिक पावसाचा विक्रम तेव्हा झाला होता. मला आठवतं त्यानुसार आमच्या शाळेच्या ग्राऊंडवर चौथ्या दिवशी संध्याकाळी पाऊस पूर्ण थांबल्यावर आम्ही गेलो तेव्हा सगळा चिखल झालेला होता. पुढं तीन-चार दिवस चांगला सूर्यप्रकाश पडेपर्यंत तिथं खेळणं अशक्य झालं होतं.

श्रावणातला एक सुरेख पाऊस मला भेटला होता सापुताऱ्यात. व्यवस्थापनाशी संघर्ष करून बदली ओढवून घेतली होती. पण त्यातही एक माज अनुभवत होतो. वयानुसार असणारी झिंगही होती. वर्षाकाठी मिळणाऱ्या चारापैकी एक सुटी १५ ऑगस्टची. नव्यानं त्या गावात आलो होतो. नवे सवंगडी भेटले होते. सुटी म्हटल्यावर सापुतारा असा कार्यक्रम ठरला. सकाळी साडेआठच्या सुमारासच टप्पा-टप्पा करत गाडी निघाली. सापुतारा गाठेपर्यंत पावसानं आम्हाला गाठलं होतं. मग काय घाट येण्याचीच काय ती प्रतिक्षा होती. घाट सुरू झाला तसा गाडीचा वेग कमी झाला आणि सारं टोळकं खाली उतरलं. भर पावसात फेर धरून घाटात आम्ही किती वेळ रिंगण करून नाचत होतो याचं भान कोणालाही नव्हतं. तसं नाचत, चालत, पळत, कडेच्या झाडांवर काही मिळतं का ते पहातच आमची एन्जॉयमेंट सुरू होती. पाय थकल्यासारखे वाटले की गाडीत बसायचं आणि पुन्हा उतरायचं. घाट उतरायला त्यादिवशी आम्ही जो वेळ घेतला तो आमच्या गाडीच्या चालकाच्या लेखी विक्रम होता. आम्हाला त्याची फिकीर नव्हती. पाऊसच तसा होता. एक तर घाट, त्यात झाडोरा छानपैकी होता. मधूनच सूर्याला डोकं बाहेर काढता येत होतं. आणि श्रावणातला तो उन-पावसाचा खेळ. बेधुंद करून टाकणारा. कसं ते ठाऊक नाही, पण त्यादिवशी कुणीतरी गाडीत झाकीरच्या काही कॅसेट ठेवल्या होत्या. घाटाच्या ऐन मध्यावर नकळतच त्यापैकी एक कोणीतरी लावली आणि स्पिकरचा आवाज मोठा केला. तबल्यावर वेगवेगळे बोल काढणाऱ्या सुरावटी निनादू लागल्या आणि पावसाचा आनंद द्विगुणीत होऊन गेला. त्या बोलांच्या तालावर एका टोळक्यानं आदिवासींच्या नृत्याची एक झलक पेश केली तेव्हा आम्हा इतरांच्या अंगावर रोमांच फुलले होते. टाळ्यांनी त्या सुरावटीत केव्हा सूर मिळवला हे कळलंदेखील नाही. त्या अशा उत्स्फुर्त नाचाला वन्समोअर मिळाला होता त्यादिवशी. आजही श्रावणातल्या एखाद्या पावसात तो पाऊस डोळ्यांपुढं फेर धरतो. रपरप करीत कोसळणारी एखादी सर. मग सुरेख उन्हाची सोनेरी उधळण. पुन्हा थोडं अंतर गेलं की रपरप करीत बरसात आणि पुन्हा सोनेरी उन्हाचा एक पट्टा. कानात तबल्याच्या त्या सुरावटी घुमू लागतात आणि त्या आठवणी मन जागं करून जातात पुन्हा एकदा.

पावसाची रुपं अनेक. प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी भेटणारी. आणि अगदी हमखास भेटणारीच. कधी प्रेमळ, कधी हसरा-खेळकर, कधी संतापलेला, तर कधी नुसताच कंटाळवाणा. कधी रौद्ररूप घेऊनही तो येतो. त्यातलाच हा एक प्रसंग. दीड वर्षं झाली त्या आठवणीला. ऐन पावसाळ्यातच हा दौरा होता नर्मदाकाठचा. आम्ही सारे संध्याकाळच्या सुमारास नर्मदेच्या एका उपनदीच्या किनाऱ्यावर उतरलो. मोटरबोट होती पुढच्या प्रवासाला. पन्नास-एक मंडळी बसतील अशा त्या बोटीत आम्ही होतो पंचवीस जण. बोटीचा प्रवास सुरू झाला तेव्हा ढग नव्हते. पण बोटीनं दहा एक मिनिटांनी नर्मदेच्या विशाल पात्रात प्रवेश केला तेव्हा काळोखून गेलं होतं. आणि आमची बोट पूर्वेच्या दिशेला प्रवाहाच्या विरोधात वळवली तेव्हाच पाऊस कोसळू लागला. इंजिनाच्या टोकाला मी आणि आणखी दोन-तीन मित्र बसलो होतो. दुसऱ्या टोकाला बरोबरची मंडळी. प्रवास साधारण दीडेक तासांचा होता. साडेसहाच्या सुमारास आम्ही नर्मदेत प्रवेश केला होता. आठपर्यंत इच्छित गावी पोचायचं होतं. पण…
पाऊस… नर्मदेच्या पात्राची रुंदी त्यावेळी काही नाही म्हटलं तरी पाऊण-एक किलोमीटर सहज असावी. खोली किमान शंभर मीटर. या आकड्यांची कल्पना असणारे बोटीत मोजकेच होते. पण ती चर्चा झालीच सुरू आणि हळुहळू गांभीर्याची जाणीव एकेकाच्या डोक्यावर स्वार होऊ लागली. काहींच्याबाबत तिचं रुपांतर पाहता-पाहता भीतीमध्ये झालं. इतक्या रुंदीच्या पात्रावर वाऱ्याला भयंकर वेग प्राप्त होत असतो. तसा तो झाला होता. बोटीला वरून घातलेल्या आवरणाला काहीही अर्थ राहिला नव्हता. पावसाचे टप्पोरे थेंब बोटीच्या एका बाजूकडून आत प्रवेश करू लागले होते. अंधाराचं साम्राज्य तर केव्हाच पसरलं होतं. बोटीच्या उजवीकडून वाकून बाहेर पाहिलं की, थोड्या अंतरावर डोंगराची कड तेवढी दिसायची. आणि ती हरेक दर्शनासोबत भीतीमध्ये पुरेशी वाढ करून जायची. कारण तितकं अंतर किनारा दूर आहे याची जाणीव ती कड करून द्यायची.
बोटीच्या दुसऱ्या टोकावरून मला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. या टोकाकडून कसाबसा मार्ग काढत मी चार पावलं पुढं टाकली. ‘बोट अगदी डोंगराच्या कडेनं घ्यायला सांगा,’ मला निरोप मिळाला. मी मागं नावाड्याकडं आलो. त्याला निरोप सांगितला. त्यानं मान डोलावली. मी त्याच्या बाजूनं मागं पाहिलं. दूरवर कुठं तरी डोंगरात उंचीवर एखादा दिवा चमकल्याचा भास झाला. पाऊस थांबतोय की काय असं मला उगाचच वाटून गेलं. पण ती केवळ वादळापूर्वीची शांतता होती. पाचेक मिनिटं गेली असावीत. एव्हाना आम्ही कसंबसं बोटीचं आवरण एका बाजूनं बांधण्यात यशस्वी झालो होतो. आत भरू लागलेलं पाणी काढून टाकण्यासाठी एकावेळी चार-पाच जणांचे प्रयत्न सुरू होते. आणि पावसानं सुसाट मारा सुरू केला. आपण पावसात झोडपले जातोय इतकंच आमच्या ध्यानी येत होतं. बोटीचं इंजिन सुरू होतं. त्यामुळं ओरडल्याशिवाय कुणाचंच बोलणं कळत नव्हतं. थोडा वेळ गेला असाच हेलकावे खाण्यात आणि पाऊस कधी कमी होणार आहे याच्या अटकळी बांधण्यात. मी सहज दक्षिणेच्या दिशेला वळून पाहिलं. मला धक्काच बसला. बोट तर डोंगरापासून पुन्हा पात्रात आतमध्ये आली होती. वाऱ्याचा तडाखा जाणवण्याचं कारण आता कुठं मला उमगू लागलं. नावाडी आणि माझ्यात केवळ चारेक फुटांचं अंतर होतं. तिथं बोटीवरचं आवरण नसल्यानं पावसात भिजावं लागणार होतं, पण एवीतेवी आता आतमध्ये कपडे ओले झालेच होते. माझेच नव्हे तर बहुतेक साऱ्यांचेच. गेलो त्याच्याकडं. तो उभा राहून बॅटरीचा झोत डोंगराकडं टाकत होता. मी एक क्षणभर थांबलो. त्यानं सहकाऱ्याला हाक दिली आणि हळुवार सुकाणू वळवून बोट डोंगराच्या दिशेला वळवली. आता पावसाचा तडाखा बोटीला एका कडेवरून बसू लागला. हेलकावे वाढले होते. सहा-सात मिनिटांनी बोट डोंगराच्या कडेला लागली. नावाडी आणि त्याच्या सहकाऱ्यानं त्या किर्र अंधारात जंगलात उडी मारून बोटीवरून दोर घेतला आणि ती बांधून घातली.
‘इथंच थांबावं लागेल,’ नावाडी. त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. कारण तिथं बांधलेल्या अवस्थेतही बोटीची होत असलेली हालचाल पुरेशी बोलकी होती. त्यामुळं प्रवाशांनी मौनच धारण केलं होतं. इंजिन बंद झाल्यानं आता पावसाचा आवाज नीट कळू लागला. धुंवाधार पाऊस सुरू होता. नदीच्या पात्रावर पडणाऱ्या थेंबांचाही नाद कर्कश्श वाटू लागला होता एव्हाना. त्यात भर होती ती वाऱ्याच्या गोंगाटाची. सरळसोट किलोमीटरभर रुंदीचा पट्टा त्याला फिरायला मिळाला होता. त्यामुळं त्याच्या उन्मादाला थांगच नव्हता. निघाल्यापासून अवघ्या पाऊण तासात हे नाट्य आम्ही अनुभवत होतो. आणि मग पुढं आमच्यासमोर काहीही पर्याय राहिला नाही. रात्रीच्या किर्र अंधारात आपण कुठं आहोत याचा नेमका अंदाज आम्हाला येतही नव्हता. आला तरी आमच्यातील अनेकांच्या लेखी तो प्रदेशच अनोळखी असल्यानं फारसा उपयोगही झाला नसता. वेळ घालवण्यासाठी आणि धीर निर्माण करण्यासाठी बोटीमध्ये उंच आवाजात गाणी सुरू झाली होती. मां रेवा हे गाणं त्यादिवशी पूर्ण ऐकलं. त्याचा आविष्कार वेगळाच होता. बाहेरच्या पावसाची त्याला साथ होती. अत्यंत उग्र अशी. मला नेमकं का ते सांगता येणार नाही, पण त्यादिवशी मां रेवा ही नर्मदेची प्रार्थना त्या सुरात सूर मिसळत मी प्रथमच गायलो. सुमारे दीड तास आम्ही तिथं तसे टांगलेल्या स्थितीत होतो. चोहीकडे अंधार होता. बोट बांधताना बोटीच्या नाकासमोर असणारा डोंगर मध्येच केव्हातरी बोटीच्या कडेला आला होता. बोट कशी हालते आहे हे समजलं की अंगावर काटा यायचा. जिथं बोट होती तिथंच पाणी किमान दहाएक मीटर खोल होतं. त्या अंधारात डोंगरावर दिसायच्या त्या झाडांच्या सावल्याच. दोन्ही बाजूला किमान मैलभर अंतरावर तरी वस्ती नव्हती हे मात्र माझ्यासह काहींच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं चिंताही दाटून आली होती.
गाण्यांच्या भरातच केव्हा तरी बोटीचे हेलकावे आता कमी झाले आहेत हे जाणवलं. पावणेनऊनंतर केव्हा तरी पाऊस ओसरला. वारं थांबण्याची चिन्हं नव्हती. पण पाऊस थांबलाय म्हणजे वारंही थांबेल असं म्हणत नावाड्यानं बोट पुन्हा पात्रात आणली आणि आम्ही चिंब भिजलेल्या स्थितीत पुढचा प्रवास सुरू केला… अनेक निःश्वास त्यावेळी त्या वाऱ्याच्या गोंगाटातही स्पष्ट ऐकू येत होते.
त्या भर पावसात बोट पुन्हा पात्रात मध्ये घेण्याचं कारण पुढं एका दौऱ्यात मला समजलं. अशा पावसात वाऱ्याचा वेग असताना एकूणच बोटीचं सुकाणू चालवणं अवघड असतंच. त्यात अशा ठिकाणी पात्रात अनेकदा अर्धवट बुडालेल्या डोंगरांची टोकं वर आलेली असतात. त्यामुळं बोट पात्राच्या मध्यावरूनच नेणं केव्हाही श्रेयस्कर. नावाड्याचं हे म्हणणं त्याच्या नौकानयनशास्त्राला धरून आहे. पण मी अनेकदा विचार करतो, अशा पावसात पुन्हा सापडलो आणि बोट पात्राच्या मध्यावर असेल तर… आत्ता हे लिहितानाही अंगावर काटा आला आहे.

पावसाला त्याच्यासारखं उंच होऊन उराउरी भेटल्याचा अनुभव एकदा मिळून गेला तो अगदी अपघातानंच. सातपुड्यात फिरायला गेलो होतो. गाव उंचावर होतं. उंचावर म्हणजे संध्याकाळी गावातल्या माझ्या स्नेह्यांच्या घरी जाण्यासाठी मला डोंगर चढायलाच दहा मिनिटं लागली होती. त्यात एकदा पाय घसरून पडता-पडता वाचलो होतो. संध्याकाळी पाऊस नव्हता. त्यानं दुपारी त्याची हजेरी पुरेशा प्रमाणात लावलेली होती. दिवस जुलैचे. म्हणजे पावसाचा अगदी भरात येण्याचा काळ होता. तरीही संध्याकाळी त्यानं उसंत घेतल्यानं मीही थोडा सुखावलो होतो. आधीच्या चार दिवसात त्यानं भिजवून काढलं होतं. आजचा दिवस काय तो कोरड्या कपड्यानिशी चालण्याचा होता.
सकाळी सहाच्या सुमारास जाग आली आणि मी घराचं दार उघडून बाहेर आलो. पाहतो तो काय रात्री केव्हा तरी मी झोपी गेल्यानंतर पावसाची रिपरीप सुरू झाली होती ती थांबलीच नव्हती. घराच्या मागल्या बाजूला पाहिलं. बोडख्या डोंगरावर ढग होते आणि धाराही होत्या. मी तसाच तिथं घुसलो. धुक्यात शिरल्यासारखा अनुभव घेत असतानाच पावसाचे थेंबही अंगभर खेळू लागले. हे थेंब अंगाला बिलगतच खाली उतरत होते. घरंगळतच म्हणा ना. काही क्षणात मी चिंब भिजून गेलो. समोरचं चारेक फुटांवरचंही काही दिसत नव्हतं. फार पुढं जाण्याची भीती वाटू लागली होती. दिसेनासं झालं खरोखरच आणि कुठं दिशा चुकली तर… ही जाणीव जबाबदारीचं भान देऊन गेली. तिथंच थांबलो. पाचेक मिनिटं इकडंतिकडं केलं आणि आलेल्या दिशेनं माघारी वळून डोंगर उतरू लागलो. काही पावलांतच त्या दाट धुक्यातून बाहेर येत विरळ धुक्यात प्रवेश केला. घर दिसू लागलं. धीर आला. डोंगरानं आपल्याला कितीही उंची दिली तरी हे मन आपली खरी उंची केव्हाही आणि कुठंही जाणवून देऊ शकतं एवढं आभाळज्ञान पावसाशी झालेल्या त्या उराउरी भेटीनं दिलं त्यादिवशी.

मनात घर करून बसलेली ही पावसाची एक आठवण मात्र आताशा सारखी मनात रुंजी घालत असते. कारण ठाऊक नाही. तेव्हा मी नोकरी सोडली होती. एक नवा प्रकल्प ड़ोक्यात घेतला होता आणि त्या आवेशातच नोकरीला रामराम केला होता. नोकरी सोडण्याची तारीखही भन्नाट. १ एप्रिल. ३१ मार्चला राजीनामा हातात ठेवला होता व्यवस्थापनाच्या. त्याच दिवशी हट्ट धरून रिलीव्ह झालो. एप्रिल महिना प्रकल्पाच्या आखणीत गेला आणि मेच्या पहिल्या आठवड्याच डोळे खाडकन उघडले. हे तर जमण्यासारखं नाही… डोळे उघडले तसा एक हादरा बसला जोरदार. मनाला आणि त्यामुळंच आत्मविश्वासालाही. तशाच स्थितीत दिवस जात होते. मेचा तिसरा आठवडा असावा. सुन्न मनस्थितीत त्याआधीची आठेक वर्षं आठवू लागलो. घरापासून दूर असलेली. दूर राहण्याचं निमित्त नोकरीचंच. पण वयाच्या सतराव्या वर्षापासूनची ती आठ वर्षं होती. हाती शिक्षण काहीही नव्हतं. नोकरी सुटली होती. पुढचं सारं अंधुक होतं. त्या दिवशी संध्याकाळी असाच खिन्न होऊन बसलो होतो. हाती प्रभाकर पेंढारकरांचं ‘रारंगढांग’ होतं. त्या काळात बऱ्यापैकी गाजत असलेली ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ ही कॅसेट तेव्हा मी सारखी ऐकायचो. तीच सुरू होती. साडेसातचा सुमार असावा. पद्मजाच्या आवाजात,
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
सुरू होतं. आणि एकदम हवा कुंद झाली. पाहता-पाहता खोलीच्या छतावर पावसाची टपटप ऐकू येऊ लागली. इकडं हे गाणं आणि बाहेर कुंद हवा. खोलीत मी एकटा. मनाची घालमेल सुरू झाली. भविष्याची चिंता होतीच, शिवाय नोकरी सोडल्यानंतर घरी रहायला न जाण्यातली एक टोचणीही असावी. घरच्यांपासून निर्माण झालेला दुरावा खाऊ लागला असावा. मनसोक्त रडावंसं वाटत होतं, पण काही केल्या रडू फुटत नव्हतं. पुस्तकातील तो कडा मनाच्या दाराशी येऊन बसल्यासारखा झाला होता. “‘आपण’ ‘रडायचं'”, हा प्रश्न तिथं कोणीही नसलं तरी माझ्या मनाच्याच एका बाजूला पडला होता आणि दुसरी बाजू तिच्यापुढं कमकुवत होत गेली. पाऊसही असा की, धड कोसळत नव्हता किंवा हलक्या सरींमधून येऊन दिलासाही देत नव्हता. मध्यम रिपरिप. कशाचंही काहीही सुचेनासं झालं होतं त्या पावसानं. मनात द्वंद्व. बाहेर ही स्थिती. त्या द्वंद्वामध्ये असतानाच पाऊस थांबला हे मात्र समजून आलं नाही. द्वंद्वाचा फैसला काय झाला ते आठवत नाही. आठवतं ते इतकंच की डोळे कोरडेच राहिले. बहुदा मन आणखी कंगोरेदार होऊन गेलं असावं…

या पावसानं कायमची हुरहूर लावलेली त्याची आणि माझी ही भेट तशी अलीकडची. दुपारची वेळ होती. आम्हा दोघांना एका परिचितांकडं जायचं होतं. दोघंही एका मध्यवर्ती ठिकाणी आधी भेटलो होतो. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी एक प्रकारचं अंतर दोघांनाही जाणवत होतं. त्यामुळं दोघंही मौनाची भाषांतरं करीत होतो. बोलायचं खूप होतं. कुणी आधी बोलावं हाही प्रश्न असण्याची शक्यता नव्हती. काय आधी बोलायचं हाच बहुदा पेच असावा. त्या परिचितांच्या घराचा निम्मा रस्ता कापला आणि अचानक काळोखून आलं. काही क्षणांत गाडीसमोरचं आठ-दहा फुटांवरचं दिसेनासंही होऊन गेलं.
आडोसा पाहण्याचीही संधी न देता पावसानं बरसायला सुरवात केली. दुपारी दीड ते तीन. दीड तास तो कोसळत होता. सरींच्या पहिल्या काही वर्षावामध्येच नखशिखांत भिजून आम्ही दोघंही एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पारिजातकाच्या झाडाखाली उभे होतो. हे झाड दोस्त म्हणून कधी आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं. त्या दिवशी त्या भूमिकेत होतं. तिथं जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं. तेवढा क्षण पुरेसा होता. दोघांनाही. नंतर रंगले ते माफीनामे… कोसळणाऱ्या पावसाच्या गतीनंच. तो थांबला तेव्हा तिथून निघण्याचं भानही राहिलं नव्हतं इतकं आम्ही बोलू लागलो होतो. पाऊस येण्याच्या आधीचा सुमारे एक तास ओढून-ताणून केलेल्या संवादात गेला होता. पावसात भिजल्यानंतर काय चमत्कार झाला कोणास ठाऊक? पावसाच्या कोसळणाऱ्या सरींसारखेच शब्दही कोसळत होते एकमेकांवर. रागावणारे, चिडवणारे, प्रेमही व्यक्त करणारे. मध्येच सांभाळून घेण्याची भाषा करणारे. त्या सरीही तशाच होत्या. आम्ही उभे होतो त्या पारिजातकाच्या झाडांमधून वाट काढत येऊन भिडत होत्या आम्हाला… कधी समजावणीची भाषा करीत, झाडाला वाऱ्यानं हलवलं की अगदी रागावत, तर कधी प्रेमात आल्यासारख्या…
तो दिवसच तसा होता. तिला सोडून नंतर घरी गेलो. घराचा सारा परिसर कोरडा होता. कपडे बदलले आणि ऑफिस गाठलं. तिथंही सारं वातावरण कोरडं ठाक. दुपारचा पाऊस शहराच्या एका भागातच कोसळला होता. संध्याकाळी तो ऑफिसच्या भागांत हजेरी लावून गेला. पण ती हजेरी अगदी श्रावणातल्या सरींसारखी. मधूनच उन्हाचे सोनेरी कवडसे चमकत आणि एखादी छोटीशी पण मनमुराद कोसळणारी सर. साडेपाच ते संध्याकाळी सात हा खेळ सुरू होता. त्यावेळी दाटून आलेल्या तिच्या आठवणी मात्र ‘हुई है शाम तो आखोंमे बस गया फिर तू,’ अशी कातरता आणणाऱ्या होत्या…
माझ्यासोबत पावसात भिजायचं होतं तिला. ती आणि मी एकत्र असताना एरवी कधीही तो आला नाही. ऐन पावसाळ्यात मी तिच्या गावी असायचो तेव्हाही त्यानं हुलकावणी दिलेली होती. ती तिच्या कामात किंवा मग मी कुठंतरी कामानिमित्तानं जवळपासच्या एखाद्या गावात. त्यामुळं पाऊस, ती आणि मी हे त्रैराशीक कधी जुळलंच नाही. ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच… पण तो निरोपाचाच दिवस ठरला…

सरत्या उन्हाळ्यातील संध्याकाळ असावी. आपण एकटंच असावं. हवा स्वच्छ असावी. अशातच काही कारणानं एखाद्या जुन्या आठवणीनं मनात काहूर निर्माण करावं. बेचैन मनाला आवर घालण्यासाठी एखादं असंच हुरहूर लावणारं पुस्तक हाती घ्यावं. शेजारी छानशा गाण्यांची सुरावट असावी. एखादा पेग भरून घ्यावा. वाचनात गर्क व्हावं. दीड-दोन तास कसे गेले ते कळू नये. साडेसहाच्या सुमारास बाहेर पहावं तर एकदम अंधारून आलेलं दिसावं. हवा कुंद झालेली असावी. हातातल्या पुस्तकातलं वातावरणही आता त्याच सुरावटी छेडत असावं. भरून आलेलं आभाळ बाहेर, तसंच मनातही, अशा स्थितीत असतानाच अचानक गुलाम अलींचे सूर कानी पडू लागावेत…
ले चला जान मेरी रुठके जाना तेरा
ऐसे आनेसे तो बेहतर था न आना तेरा…
आता ध्यानी येऊ लागतं की, बरसात दोन स्तरांवर होणार आहे. बाहेरच्या टपटपीसोबत प्रवास करताना मनातही कितीतरी काळापासून दाटून असलेले सारे कढ उसळ्या मारू लागावेत. इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव घेऊन. बाहेर नजर जावी तर धारा लागलेल्या असाव्यात. ढग गडगडत असावेत. कंठाच्या उंबरठ्याशी रोखून धरलेला हुंदका उसळून बाहेर फुटावा… आणि मग बाहेरच्या गडगडाटात मनातून उसळून-उसळून येणारे हुंदक्यांचे आवाज विरून जावेत…
‘मी मला आक्रंदताना पाहिले’ अशी ही अवस्था अर्धापाऊण तास असते. ती संपते तेव्हा आपण डोळे पुसतो. दार उघडून बाहेर येतो. टपटप थांबलेली असते. नशिबात असेल तर मृदगंध आपला कब्जा घेतो. अंगणात एखादं झाड असेल आणि वाऱ्याची झुळूक आली तर पाना-फुला-झाडांवरून पडणारे थेंब आपल्या अंगांगांवर उतरतात. एक बारीकशी शिरशिरी येते. रोमांच फुलतात आठवणींचे. सभोवार मोकळं असेल तर वर नजर जाते. सारं आकाश स्वच्छ असतं. शेकडो चांदण्या लुकलुकू लागलेल्या असतात…
आणि अचानक ध्यानी येतं, इथं आत मनातही आता सारं कसं निरभ्र झालेलं असतं… आशेच्या शेकडो चांदण्या मनातही लुकलुकू लागलेल्या असतात…