न आकळलेलं काही…

ऑक्टोबर 8, 2008

एखाद्या गोष्टीचा आणि आपला ऋणानुबंध का जुळावा हे नेहमीच सांगता येत नसतं. आवड वगैरे कारणं ठीक आहेत. पण ऋणानुबंध त्या पलीकडे असतोच. त्या गोष्टीनं नादावलं जाण्याचं, तिनं मनात घर करण्याचं कारण कोणतं असं विचारलं तर त्याचं गणिती उत्तर शक्य नसतं. सूर, रंग, रेषा, आकार या चारापैकी किमान एक तरी मिती तिथं असते आणि या चारांमधूनच स्वतःला साकारणारी आणि तरीही स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व ठेवणारी निसर्ग नावाची एक किमया शिल्लक राहतेच; ती तर पाचवी मिती! काहींचा या चारही मितींमध्ये लीलया संचार होतो, ही मंडळी स्वर्गीय काही तरी घेऊन जन्माला आलेली असतात; त्यांचं जगणं बहुतेकदा पाचव्या मितीमध्ये होत असावं. काहींना सूर नादावतो. काहींना रंग, काहींना रेषा तर काहींना आकार. पुन्हा या प्रत्येक मितीमध्ये नादावले जाण्याचेही दोन प्रकार असतात. एक ग्रहण करण्याच्या संदर्भात किंवा मग दुसरा आविष्कार करण्याच्या संदर्भात. या दोन्हींनी जे नादावले जातात ते भाग्यवानच. अशा भाग्यवानांची संख्या तशी कमीच. मग राहतो ते तुम्ही-आम्ही. त्यातही उतरंड असतेच. त्यातल्या अगदी बालवाडीच्या पायरीवरून हे आत भिडलेले, पण न आकळलेले काही…

नुकताच आंघोळ करून बाहेर आलोय. माझा भ्रमणध्वनी खणखणतो. क्रमांक पाहतो. ००१२०******८५!!! पहिल्या तीन आकड्यातून कळतं की अमेरिका. घड्याळाकडं पाहतो. अकरा. म्हणजे जिथून हा कॉल आलाय तिथं मध्यरात्रीचे किमान सव्वादोन ते अडीच झालेले आहेत. माझ्या सकाळच्या आणि त्याच्या मध्यरात्रीच्या या वेळेस ‘सोशल अँथ्रॉपॉलॉजी’ हा काही चर्चेचा विषय असू शकत नाही. या मित्राचा अभ्यास त्या विषयातला आहे. माझ्या कपाळावरच्या रेषा किंचित ताणल्या जातात, पण इतक्या रात्री तिथून कॉल येतोय म्हणजे विषय वेगळा असणार हे नक्की. मी कॉल घेतो. एक महत्त्वाचा निरोप असतो; तो देऊन झाल्यानंतर मित्र म्हणतो, “अजून एक गोष्ट शेअर करायचीये…”
“बोल ना. काय?”
“मी शामच्या वेळेला यमन शिकायला सुरवात केली…”
(हा मुलगा कटाक्षाने मराठीत बोलण्याचा प्रयत्न करतो, पण आहे हिंदी भाषिक. त्यामुळे हा संवाद त्याच्याच भाषेत.)
अत्यंत आनंदाने मी “व्वा. क्या बात है!” म्हणतो.
“एक नोट लागत नव्हती नीट. बराच काल प्रयत्न केला. मग जमली. मग मी फुल्ल थ्रोटेड… इतका आनंद झालाय… (मी मनातल्या मनात म्हणतो, तू शिकू लागल्यानंच मलाच इथं इतका आनंद झालाय की तुझा आनंद काय वर्णावा?)
“…एकदम फ्रेश. कालपर्यंतचे तीन दिवस फेसबुकवर होतो नुसता. आय वॉज कर्सिंग मायसेल्फ फॉर वेस्टिंग द टाईम… बट नाऊ आय हॅव डिसायडेड, अबकी बार कसल्याही डायव्हर्शनकडे मन गेलं तर यमन…”
मी त्याला म्हटलं “अरे, हे लिही.”
“लिही? शब्दच नाहीत. मराठी, हिंदी, इंग्रजी… कोणत्याही भाषेत!”
शब्दांच्या पलीकडला हा अनुभव काय असावा याची कल्पना मला क्षणार्धात येते. गेल्या वीसेक वर्षांचा प्रवास आठवताना.

आठवतं तसं, मी ऐकायला सुरवात केली त्याला आता वीसेक वर्षे झाली असतील. त्याआधी गाणं ऐकणं हा काही छंद वगैरे नव्हता, आवड तर नाहीच. ती अचानक उद्भवण्याचं कारण बहुदा हुबळीत झालेला एक कार्यक्रम असावा. गंगूबाई हनगल यांच्या अमृतमहोत्सवाचा. नवी नोकरी, त्यामुळं अंगावर आलेलं काम टाळायचं नाही हे मनावर पक्कं बिंबलेलं. त्या कार्यक्रमाला जावं लागलं ते असं कामानिमित्त. तीन दिवसांचा महोत्सव होता तो. सगळ्या मातब्बर कलाकारांची मांदियाळी होती. शास्त्रीय संगीत, आणि त्यातही गायकी, ही थोडी लांबच ठेवण्याची गोष्ट अशी आजवरची स्थिती होती माझी. पण काम म्हणून त्या सभागृहात असणं आवश्यक होतं. कलाकार आठवत नाही, पण पहिल्याच दुपारी संतूरवादन ऐकलं आणि ध्यानी आलं की, अरे हा प्रांत आपण समजतो तसा नाही. ऐकायला काही हरकत नाही. समजत नसलं तरी. ठाऊक नव्हतं की ही धारणा त्या थोर कलाकाराच्या सांगण्यातून अधिक पक्की होणार आहे. हुबळीत नव्यानंच मित्र झालेल्या दोघा-चौघांनी संध्याकाळी मला गंगूबाईंकडं नेलं आणि ओळख करून दिली. माझं वय वीस. म्हातारी उत्सवमूर्ती होती, तशीच उत्साहमूर्तीदेखील. प्रसन्न हसत तिनं हात जोडून नमस्कार केला आणि त्याकडं पहातच मी पदस्पर्श केला. “शास्त्रीय समजतं का?” बाकी काही बोलण्याआधीच त्यांचा प्रश्न तीरासारखा आला (एखाद्या धारदार तानेसारखा होता तो, हे नंतर खूप काळानं उमजत चाललंय).
“नाही. पण ऐकतो.” माझी आठवण पक्की आहे कारण मी खोटं बोललो होतो. उत्तराचा उत्तरार्ध खोटा होता. ऐकलं होतं ते फक्त त्या दुपारी संतूर.
“ऐकत जा. समजून घेण्याचाही प्रयत्न कर.” म्हातारीचा आशीर्वादवजा आदेश. मान डोलावण्यापलीकडं होतं तरी काय त्या वयात?
तासभर गेला असेल नसेल आणि आम्ही मंडळी सामोरे गेलो ते एच. वाय. शारदाप्रसाद यांना. दिल्लीतले हे बडे प्रस्थ (अतिशय चांगल्या अर्थी हा शब्द वापरतोय) आणि तरीही विलक्षण डाऊन टू अर्थ व्यक्ती म्हणून त्यांचा परिचय आधी वाचनातून झाला होता (अलीकडेच त्यांचं निधन झालं. विस्मृतीत गेलेल्या या माणसाच्या स्मृती माझ्या मनात त्यावेळी जाग्या झाल्या ते हुबळीतील त्या मैफिलीच्या चौकटीतच). ते या मैफिलीत? माझ्यासमोरचा प्रश्न. अज्ञानातून आलेला. कारण ते त्या कार्यक्रमाचे एक प्रमुख आयोजक होते. त्यांच्यात हाही एक रसिक दडला होता ते माझ्याबरोबरीच्या ज्येष्ठ व्यक्तींना ठाऊक होतं. शारदाप्रसादांबरोबर या ज्येष्ठांच्या संगीत या विषयाला धरून झालेल्या चर्चेनं पुन्हा डोक्यात सूर घुमू लागले ते दुपारी ऐकलेल्या संतूरचेच.
नेमकं काय झालं होतं ते आठवत नाही. पण संतूरच्या त्या सुरावटी मला कुठंतरी एखाद्या प्रसन्न अशा झऱ्याच्या काठी आपण बसलो आहोत अशा वातावरणात घेऊन गेल्या होत्या. झऱ्याचा खळखळाट आणि त्या सुरावटी यांचं काही तरी नातं असावं. किती तरी काळ त्या सुरावटी माझ्या मनात जाग्या होत्या. त्या यायच्या त्याच मुळी माझ्या शहरी गजबजाटापासून मला दूर नेत. निसर्गाच्या सान्निध्याची अनुभूती देत.
मग लक्षात येत गेलं, की हे ऐकलं पाहिजे. यात काही तरी निश्चितपणे आहे. त्यामुळं ऐकणं महत्त्वाचं. निदान वाद्यसंगीत तरी. निर्णय झाला. त्या मैफिलीची ही देणगी पुढं आजवरच्या जगण्याला सावरून धरत गेली.

मिरज. खांसाहेब अब्दुल करीम खां यांच्या स्मृतिप्रित्यर्थ होणारा संगीत महोत्सव. हुबळीतील निर्णयानंतर मिरज गाठणं सोपं होतं. मिरजेचा हा महोत्सव तेथील एका दर्ग्यात भरतो. या महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कितीही चमकदार कामगिरी गायक-वादकानं केली तरी टाळ्या वाजवता येत नाहीत. हा संकेत तिथला. त्याचं कारण त्या काळी कळलं होतं, पण आत्ता आठवत नाही (महोत्सवाची ती परंपरा आज तेथे कायम आहे की नाही याचाही पत्ता नाही). टाळ्या नाहीत; तरीही संगीताची मैफील? पुन्हा एक प्रश्न. प्रत्यक्ष मैफिलीत गेल्यावर त्याचा सच्चेपणा पटला. सुरांच्या सच्च्या भक्तांसाठी टाळ्यांची गरज नसते. मान डोलावण्यातूनही काय घडतं त्याचा अनुभव त्या तीन रात्री तिथं घेतला.
रागदारी कळण्याचा प्रश्न त्याही वेळी नव्हता (आजही नाहीच). दुसऱ्या रात्री गणपती भट यांचं गायन होतं. त्यावेळी उदयोन्मुख आश्वासक गायकांच्या यादीत आघाडीवर नाव असायचं त्यांचं. पावणेदोन तास हा तरूण गायक गायला. या मैफिलीपर्यंत तरी मी शास्त्रीय गायन या प्रकाराकडं फारसा आकृष्ट झालेलो नव्हतोच. हुबळीतील तीन रात्रींमध्ये गायनाच्या वेळेस बऱ्याचदा मी डुलक्या काढल्या होत्या. वाद्यसंगीत आलं की मात्र झोप उडायची. गणपती भट यांच्या गायनाला डोळे उघडे ठेवण्याची एक प्रकारे कसरत करावी लागली होती. कारण मित्रांसमवेत मी बसलो होतो ते पहिल्याच रांगेत. मित्र माझ्याच वयाचे, पण शास्त्रीय संगीतात माझ्यापेक्षा कित्येक पावलं पुढं असणारे. कोणी तबल्यात तर कोणी हार्मोनियमवर. कोणी गायन करणारा. तेवढी एकच गोष्ट डोळे उघडे ठेवण्यास पुरेशी होती. आरंभीचं गायन मी ऐकलं. सूक्ष्म स्वरूपात सूर कळण्याचा प्रश्नच नव्हता. पण मध्येच कुठं तरी आतमध्ये काही तरी व्हायचं. अंगावर रोमांच यायचे एखाद्या तानेनंतर. गायनाच्या अखेरीला वीज चमकावी तशी एक तान घेत त्यांनी तराणा सुरू केला आणि मी उडालो. मनात खोलवर काही तरी झालं. डोळे मिटले गेले आणि एखाद्या पहाडावर आपण आहोत अशी प्रतिमा डोळ्यांपुढं आली. खाली खोलवर दरी आहे, समोरचा सुळका आकाशात घुसला आहे. आपण या पहाडाच्या कडेवरच आहोत…
बाहेर तराण्याची लय वाढत गेली. डोळ्यांसमोरच्या पहाडाची जागा हळूवारपणे फुलांचा एका ताटव्याने घेतली. काही क्षणांतच तो पूर्ण फुललेला ताटवा डोळ्यांसमोर उभा राहिला. दरी बेपत्ता, समोरचा पहाड बेपत्ता आणि विशेष म्हणजे मी उभा होतो तो पहाडही नव्हताच मुळी; ती सपाटीच होती. ताटव्याला जोडणारी. तराणा थांबल्यानंतर बराच काळ कानात ते सूर घुमत होते. डोळे मिटले की, त्या सुरांना साथ देत ताटवा समोर यायचा. केवळ अद्भूत.
आजही सकाळच्या संवादातून हे आठवलं तसं अंगावर रोमांच उठताहेत सारखे.
इथं मनःपटलावर काही प्रतिमा उभ्या राहिल्या म्हणून वर्णन करण्यासाठी शब्द सापडताहेत. एरवी सूरही कळत नसताना, ते कळू शकणाऱ्याचीही ‘शब्दच नाहीत’ अशी स्थिती होत असेल तर, आपलं काय? पुन्हा एक प्रश्नच.

ऐकण्याचा (फक्त ऐकण्याचा, समजून घेऊन ऐकण्याचा नव्हे) प्रवास सुरू झाला तेव्हा सुरवात झाली ती काही अल्बम्सनी. एखादी थीम घेऊन केलेल्या अल्बम्सचा काळ तो. कोल्हापुरात शाहुपुरीत रहायचो. जायऱ्यायचा रस्ता एस. टी. स्टँडसमोरून. तिथं आतल्या बाजूला एका दुकानात कॅसेट लावून ठेवलेल्या असायच्या शेल्फवर. आधीच्या दीडेक वर्षांत केव्हाही तिकडं पावलं वळली नव्हती. वळायची ती त्याच्या शेजारी असलेल्या हॉटेलकडं. कारण मिसळ हा त्यावेळचा आम्हा मित्रांचा पूर्ण आहार असायचा. रात्रीदेखील त्यासाठी आम्ही राजवाडा चौक गाठायचो. किंवा मग स्टँडवर बिर्याणी. त्या कॅसेटच्या दुकानाकडं पावलं वळली पहिल्यांदा तेव्हा खिशात एकूण होते शंभर रुपये. पुढच्या पंधरवड्याचा बसप्रवास आणि इतर खर्चासाठीचे. खाटकन त्या दिवशी तीस रुपये गेले. ‘कॉल ऑफ व्हॅली’वर. चहा-बिस्कीटांवर दिवस कसे असतात त्याचा एक अनुभव नंतरच्या पंधरवड्यात त्या तीस रुपड्यांनी दिला. पण त्याच तीस रुपड्यांनी दिलेला दुसरा अनुभव अनमोल होता. तो अनुभव खर्चात पाडत गेला, कमावण्याची अक्कलही देत गेला.
‘कॉल ऑफ व्हॅली’. अल्बम जुनाच; पण माझ्यासाठी नवा. हाती कॅसेट आल्यानंतर मी तडक खोली गाठली आणि वॉकमन सुरू केला. पूर्ण कॅसेट ऐकून काढली. आधी काहीही प्रतिक्रियाच उमटली नाही मनातून. कॅसेटचं कव्हर काढलं आणि पाहिलं तर सारी भाषा सांगीतिक. रागांची नावं. एक क्षण वाटलं तीस रुपये वाया गेले की काय? पुन्हा कॅसेट टाकली. ऐकू लागलो. बासरी आहे आणि संतूर आहे हे कलाकारांच्या नावावरून समजत होतं. पण ब्रिजभुषण काब्रा? यांचं वाद्य कुठलं? पुन्हा प्रश्नांची मालिका. पण त्याकडं दुर्लक्ष करून ऐकत गेलो. पहाडीमधल्या संतूरनं कब्जा केला आणि पाठोपाठ पिलू. दोन्हींमधून उमटणारी प्रतिबिंबं पुन्हा पहाडाचीच. हा पहाड सारखा का येतोय? धून पहाडीतील आहे म्हणून? केवळ तेवढंच असणार नाही. कारण पहाडी राग नसतानाही पहाड उभा राहतोच डोळ्यांसमोर. गणपतीच्या तराण्यानं उभा केला होता आणि तो तराणा पहाडीतला नव्हता एवढं निश्चित.
ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, स्वतःला बजावत गेलो. मग आणखी एक गोष्ट लक्षात येत गेली. हा वॉकमन कानाला असेल आणि त्यातून अशा काही सुरावटी असतील तर हातातलं काम सोपं ठरतंय. लेखन असो वा वाचन. दोन्ही. सुरावटींकडं ध्यान असतं का? खचितच नाही. पण त्यातलं काही समजत नव्हतंच. त्यामुळं ध्यान देण्याची गरज वाटत नव्हती. कारण प्राधान्याचं काम होतं हातातलं. लेखन किंवा वाचन (या प्रवासात आजही बालवाडीतच राहण्याचं कारण त्यावेळच्या त्या प्राधान्यक्रमात असावं कदाचित). मग ती एक गुरूकिल्ली ठरली. लेखन-वाचन करताना संगत हवी ती सुरावटींचीच. आणि सुरू झाला एक सिलसिला सुरावटींशी. त्यानिमित्तानं केलेल्या खरेदीशी.
‘पंचमहाभूत’ या संकल्पनेवर आधारलेले वेगवेगळे अल्बम कॅसेटच्या रुपानं आले. हे काही अस्सल शास्त्रीय स्वरूपातले आहेत का, तर काहींच्या मते नाहीतही. पण ते खोलीवर आले. संतूर आवडू लागलं म्हणून शिवकुमारांच्या काही कॅसेट्स आल्या. मध्ये धाडस करून एकदा सरोद आणि सतारही आणली. ही दोन्ही वाद्यं मला तरी संतूरपेक्षा ऐकण्यास जड वाटत आली होती. पण तीही ऐकली. एकदा-दोनदा नाही. वेगवेगळ्या वेळी बऱ्याच वेळेस ऐकली. पण मनात मात्र घर केलं होतं संतूरनंच. सनई हे वाद्य तसं या ऐकण्याच्या संदर्भात अतिपरिचयात-अवज्ञा अशा स्वरूपाचं ठरलं होतं. पण इतर काही कॅसेट आल्या. त्यात शोभा गुर्टूंचा समावेश होता. ठुमरी.
ऐकत होतो. रात्रपाळी झाली की, तेव्हा रेडिओवर उशीरा शास्त्रीय संगीत राष्ट्रीय केंद्रावर चालायचं. तेही ऐकायचो आवडीनं. सोबत काम करणाऱ्यांपैकी एक-दोघे ज्येष्ठ कर्मचारी थोडं फार कळणाऱ्यापैकी होते. त्यांच्या चर्चा सीमेवरून ऐकायच्या.
पण जाण? नाहीच.

रागसंगीत आणि त्याचं काळाशी नातं हा विषय आता समोर आला. रागाचं, त्यातल्या सुरांच्या क्रमाचं नातं प्रत्येक प्रहराशी असतं असं कोणी तरी सांगितल्याचं ऐकलं. या विषयावरच्या चर्चांच्या सीमेवर राहण्याचा तो काळ. त्यामुळं ती ऐकून आपण काय ऐकतोय त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न एवढंच त्याचं महत्त्व. म्हणजे असं की, मी शास्त्रीय संगीत ऐकतो म्हणजे काय करतो, असं एकदा या विषयाशी दुरान्वयानंही संबंध नसणाऱ्या मित्रानं विचारलं. त्याच्यासमोर फेकण्यासाठी आपण एक वाक्य तयार करू शकतो असा हा प्रयत्न. पंडित जसराजांच्या ‘अष्ट प्रहर’ या चार कॅसेट दाखल झाल्या संग्रहामध्ये, त्यामागचं कारण तेच. समजून घेण्याचा प्रयत्न करू, ही भावना. हे अशा स्वरूपाचं ऐकण्याचा तो पहिलाच प्रयत्न. आधी प्रहर वगैरेंकडे लक्ष देण्याचा उगाचच प्रयत्न केला, पण एकूण कानाची बैठकच अशी की, त्यांची गायन सुरू करण्याआधी श्लोक सादर करण्याची पद्धतीच भाव खाऊन गेली (पुढे हा श्लोक आणि त्यांचं ते आधीचं “जय हो” यांचा पगडा अधिक… मग त्यावरची टीकाही कानी आली… असो). प्रहर आणि त्यानुसार राग ऐकणं नंतर बाजूला पडलं. पुढं माझ्या ध्यानी आलं की, आपलं चुकतंय. हा प्रांत आपल्यासाठी तरी स्वयंसाधनेचा नाही. कारण सूरच कळत नाहीत. तेव्हा इथं आपल्याला गुरूच करावा लागेल. हा ‘साक्षात्कार’ झाला तेव्हा मात्र त्या कॅसेट सरळ उचलून शास्त्रीय संगीत कळतं अशा एका ज्येष्ठ स्नेह्याला देऊन टाकल्या आणि शास्त्रीय संगीत समजून घेण्याचा तो एक प्रयत्न सुरू होण्याआधीच विझून गेला.
पण ऐकणं थांबलं नाहीच. त्यातून मनात प्रतिमा, प्रतिबिंबं निर्माण होणं तर थांबलं नाहीच.
त्याचाच हा पुढचा अनुभव. पुन्हा इथं संतूरच आहे. पण अनुभव वेगळा. माझी ती मर्यादा असावी कदाचित. ‘म्युझिक ऑफ माऊंटन्स’ नावाचा एक अल्बम आहे शिवकुमारांचा. त्यातल्या रचना आजही मी असंख्यवेळेस आवडीने ऐकतो. अनेक जण ऐकत असतील. या रचना मी आधी त्यांची नावं न पाहताच ऐकायचो. ज्या क्रमानं अल्बममधून येतील त्याच क्रमानं. एके दिवशी रात्री काम करीत बसलो होतो. झोपण्याची चिन्हं नव्हती. बराच काळ गेला आणि तो अल्बम सुरू झाला. काही वेळानं अचानक कान टवकारले. नवी सुरावट कानी घुमू लागली. पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकू आला. सकाळ झाली की काय म्हणून चमकून मी पाहिलं, बाहेर अंधार दिसत होता. घड्याळाकडं पाहिलं, काटे पाचच्या आसपास होते. लक्ष सुरावटीकडं वळवलं. तिचं नाव होतं ‘हिमालयन डॉन’. पहाटेची ही अनुभूती वेगळीच होती. मग बारकाईनं पुन्हा सारी नावं पाहिली तर त्यात चक्क अष्टप्रहर गुंतलेले होते. सनराईज ऑन द पीक्स, ट्वायलाईट झोन, इव्हनिंग प्रेयर (आता ट्वायलाईट आधी की इव्हनिंग प्रेयर? माझ्या मते, माझा क्रम बरोबर आहे), शिकारा बाय मूनलाईट… मध्ये इतर. अर्रे!!! हे तर अशा क्रमानं ऐकलं पाहिजे एकदा. एकदा कशाला? त्याच क्षणी पुन्हा रचना फेरमांडणी करून घेतल्या आणि हातचं काम बाजूला ठेवून ऐकत बसलो. साधारण तासाभराचा काळ होता तो आणि पहाटेच्या त्या प्रहरी प्रसन्न अनुभव घेत मी झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी पुन्हा इतर रचनांची नावं पाहिली. त्या रचनांची नावं बॅलड, एकोज फ्रॉम द व्हॅली, स्प्रिंगटाईम, माऊंटन लव्ह सॉंग, स्पिरिट ऑफ कश्मीर अशी आहेत. त्यावरून ना त्यांचा प्रहर कळतो, ना राग. पण अनेकदा ऐकल्यानंतर काही ठोकताळे बसले आणि या साऱ्या रचना काळानं वर्णन होणाऱ्या रचनांच्या मध्येच कुठंतरी बसतात असं वाटू लागलं. आजही ऐकतो ते त्याच क्रमानं. हे बरोबर आहे की चूक? ठाऊक नाही. राग कळणारा एखादा त्यातलं बरोबर काय आणि चूक काय हे सांगून त्याचा नवा क्रम समजावून देऊही शकेल. पण… पण हिमालयन डॉन ऐकताना झालेली पहाटेची अनुभूती? तिचं काय? तो माझ्यासाठी नुसताच अज्ञानातील आनंद नाही तर अज्ञातातील आनंदही आहे. तो आता बुद्धीच्या कसोटीवर कसा तपासून पहायचा?

कुमार गंधर्व गेले त्या दिवशीची गोष्ट. दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवर असताना ती बातमी आली. काही क्षण सुन्न मनस्थितीत गेले. ऑफिस आणि माझी खोली यातलं अंतर वीस पावलांचं. त्यामुळं तडक खोली गाठली. ती कॅसेट काढली आणि ऑफिसात काम करताना शेजारी टेप ठेवून ती लावली. त्या मनस्थितीत कसलंही काम करणं शक्य झालं नाही. सारं काही सहकाऱ्यावर सोपवून मी शांतपणे ती भजनं ऐकून काढण्यात वेळ घालवला. ही भजनं मनात घर करून गेली होती ती त्यांच्या वेगळ्या जातकुळीतल्या गायनानं. जातकुळी वेगळी आहे हे समजलं होतं तेही त्यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वाचल्यानंच. आधी ते वाचनातून समजलं आणि मग तौलनीक स्वरूपात काही ऐकत गेलो त्यातून आकळत गेलं. पण तेवढंच आकळणं. त्यापलीकडं त्याचं वेगळेपण सांग असं कुणी म्हटलं तर हात टेकलेलेच असायचे. मनात म्हणायचो, माझ्यासारखे कान करा, कदाचित वेगळेपण कळेल. पण हे उघड बोलणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा आपण अज्ञानी आहोत हे कबूल करून टाकणं सोपं…
त्याच रात्री वीणा सहस्रबुद्धे यांची मैफल होती. ती होईल की नाही अशी धाकधूक होतीच. तरीही सभागृह गाठलं. अपेक्षेप्रमाणे शंभर-सव्वाशेच मंडळी होती. वीणाताई आल्या आणि आम्ही हुश्श केलं.
मैफल सुरू झाली. एक राग झाला. मध्ये एक नाट्यगीत घेतलं त्यांनी. मध्यंतर आणि पुन्हा एक राग. एव्हाना गायन ऐकताना झोप वगैरे प्रश्न राहिले नव्हते. ऐकायचं, नीट ऐकायचं. मध्ये एखादा सूर, तान आत जाते. भिडते. छातीत कळसुद्धा आल्यासारखं वाटतं असं चक्र आता सुरू होतं. त्याच अवस्थेत त्या रात्रीही वीणाताईंचं गायन ऐकत गेलो.
पावणेबाराच्या सुमारास वीणाताई बोलल्या. कुमारांचं निधन झाल्याचं सांगून म्हणाल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मैफल थांबवते. आणि सुरू झालं “उड जायेगा… हंस अकेला….” अनेक श्रोत्यांचे हात डोळ्यांकडे गेले. माझेही. हंस उडताना पाहिलाय का, या एरवीही अनेकदा ते भजन ऐकताना गंमत्या स्वभावातून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या रात्री मिळालं. उडणाऱ्या हंसासोबत कुमारांचे प्रत्यक्ष सूरही त्याच भजनाचा हात धरून त्या दिवशी अनंतात विलीन झाले असावेत. डोळ्यांसमोर तीच प्रतिमा. हंस उडतोय… मध्येच कुमारांचा चेहरा. त्यांची ती ‘सह्याद्री’वरची मुलाखत. बोलताना अनेकदा दिसणारं त्यांच्यातलं लहान मूल. आणि कानात बाहेरून वीणाताईंचा तर आत पार्श्वभूमीवर त्या दुपारी आणि आधी अनेकदा ऐकलेल्या कुमारांच्या भजनाचा सूर. अस्वस्थ… केवळ अस्वस्थ.
पु्न्हा मनात प्रश्न… काय नातं आहे कुमारांच्या त्या सुरांशी? इतकं गहिरं काही, की ते गेल्याचं जाणवून असं अस्वस्थ वाटावं… हे काय आहे नेमकं? उत्तर नाहीच. पुन्हा कान फक्त काही ऐकण्याकडंच वळतात.

नोकरी नसलेल्या मधल्या काळात स्वयंरोजगाराचा प्रयत्न सुरू होता. प्रशासकीय स्वरूपाच्या एका पुस्तकासंबंधीचं काम करीत होतो. अजब होतं ते सारं. आम्ही एका लॉजमध्ये खोली घेऊन तिथंच या कामाचा संसार थाटला होता. सकाळी अकराच्या सुमारास काम सुरू करायचो ते रात्री बारापर्यंत चालायचं. तेव्हा संगणकावर गाणी हा प्रकार ठाऊकही नव्हता. त्यामुळे सोबत असायचा टेप आणि भारंभार कॅसेट्स. त्या ऐकत काम चालायचं. लक्ष कामाकडं होतं तसं गाण्याकडंही होतं. मंतरलेल्या त्या काळात त्या पुस्तकाच्या लेखकासमवेत खरी साथ दिली ती सुरांनी. इतकी की प्रशासकीय नियम, सेवाशर्ती, न्यायालयीन निकाल असे रुक्ष विषय असूनही त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत उल्लेख झाला तो गायक-वादकांचा. त्यांनी, म्हणजेच त्यांच्या सुरावटींनी दिलेल्या साथीचा. त्यात जसराज होते, परवीन सुलताना होत्या, आणखीही काही मंडळी होती.
का असं वाटलं असावं आम्हाला की त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावेत? त्यांच्या सुरांनी दिलेली साथ हे एक कारण होतंच. पण त्याहून महत्त्वाचं ठरलं होतं म्हणजे त्या सुरांच्या साथीत झालेल्या कामाचा तो एकूण अनुभव. हा निष्कर्ष केवळ दोनेक वाक्यातून निघाला होता आणि प्रस्तावनेच्या पहिल्या परिच्छेदात आधी नावं आली या कलाकारांची.
ऐकण्याचा हा असा फायदा? एक सुंदर अनुभव घेण्याचा? तेही जे ऐकतोय त्यातलं काहीही कळत नसताना?

माझ्या कादंबरीच्या लेखनाचा काळ. पहिला मसुदा मी अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केला होता. पण एका मित्रानं जमिनीवर आणलं. म्हणाला, “सिद्धहस्त नाहीस. थोडा वेळ घे.” दीडेक महिन्याचा खंड टाकला आणि पुन्हा त्यावर काम करणं सुरू केलं. आता सारं काही संगणकावरच होतं. सोबतीला सुरावटी असतात. एमपीथ्रीचं वेड लागून त्यातूनही बाहेर आलेला हा काळ होता. हे लेखन करताना सुरावटींचीच साथ होती. कारण हे असलं लेखन म्हणजे जीवघेणं असतं. जीव जाऊ द्यायचा नसेल तर साथ हवीच. ती सुरावटींची.
‘सेलेब्रेशन’ हा हरिप्रसाद चौरसियांचा अल्बम तेव्हा असाच हाती लागला होता. त्यातलं ‘शेफर्ड सॉंग’ आणि त्याला जोडून असलेल्या ‘क्रेसेंडो’ आणि ‘फ्री स्पिरीट’ या नावाच्या दोन धून. बास्स. आधीच बासरी आणि त्यात हे असं धनगरी/गुराख्याची धून वगैरे. मन राहतंय कशाला थाऱ्यावर. कादंबरीची पार्श्वभूमी आदिवासी जनसमुहांची. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या चिरंतनपणे चालत आलेल्या संगीताचा आस्वाद घेण्याची अनेकदा संधी मिळाली होतीच. त्यातल्या पाव्याच्या सुरांचं नातं इथं या ‘शेफर्ड सॉंग’शी जमायचं. सूर ऐकण्याचे दोन्ही स्तर वेगळेच. एक त्या तिथं, कुठंतरी कित्येक मैलांचं अंतर चालत कापून ऐकलेला, दुसरा इथं सगळ्या सोयी-सुविधांच्या जगात आधुनिक साधनांच्या साह्यानं ऐकलेला. पहिल्या स्तरावर डोळ्यांपुढं केव्हा तरी येऊन गेलेला तो आदिवासी गुराखी; गुरांचा कळप, त्यापाठोपाठ काखेत काठी धरून मनमुराद, निश्चिंतपणे पावा वाजवत निघालेला. त्याच्या त्या सुरावटीमध्ये काही क्रम वगैरे नसावा, चाल वगैरेही नसावी. किंवा माझ्या कंडीशनींग झालेल्या मनात ते उमटत नसावं. तो सूर बेगुमानपणे उधळून देत चालला होता. त्याच्या मागं एक दरी आणि तिच्यापलीकडं संध्याकाळच्या प्रवासाला लागलेला सूर्य. तांबडाबुंद. मी असतो इथं घरी. वेळ आहे रात्री केव्हा तरी किंवा सकाळ-दुपारची. ‘शेफर्ड सॉंग’ ऐकू लागलो की हमखास ते दृष्य डोळ्यांसमोर येतं. मग त्यापुढच्या ‘क्रेसेंडो’ या काहीशा फ्यूजनकडं झुकणाऱ्या सुरावटीनं मन आक्रंदून निघतं. पुढच्या “फ्री स्पिरीट” सुरावटीच्या वेळी म्हणतं, चल तिकडं जाऊ, त्या भागात. नागरी जीवनातील गजबजाटापासून मुक्ती, स्वातंत्र्य देणारं जगणं माझ्यादृष्टीनं तिथं होतं. तीच भावना नेमकी त्या ‘फ्री स्पिरीट’मधून कशी येते बाहेर मनाच्या उंबरठ्यापर्यंत?
असं का, पुन्हा प्रश्न. सूर हे त्यावरचं उत्तर हे मान्य. पण म्हणजे काय?

प्रश्नांच्या या भेंडोळ्यात सापडलो असतानाच मध्यंतरी एकदा शौनक अभिषेकी यांच्याशी बोलण्याचा योग आला. बोलता-बोलता शास्त्रीय संगीताविषयी जितेंद्र अभिषेकी यांचे विचार त्यांनी सांगितले. “थोडी वैचारिक बैठक असणाराच शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकतो.” बुवांचं हे विधान. खरंच असावं, हे मनात पक्कं झालं. एव्हाना त्यांनी ‘कट्यार’मध्ये केलेले प्रयोग वगैरे ऐकलं होतं. भैरवीनंच ‘कट्यार’चा आरंभ हा तो एक प्रयोग. इतरही आहेत. भैरवीनंच आरंभ करण्याच्या प्रयोगाचा अर्थ कळत नव्हता. भैरवी सकाळच्या आरंभीच्या प्रहरी किंवा पहाट ते सकाळ या सीमेवर गायची किंवा मैफिलीचा समारोप करण्याची रागिणी इतकंच काहीसं ठाऊक होतं. (प्रश्न असायचेच, बौद्धीक कसरतीतून आलेले. रागिणी सकाळची असेल आणि मैफल संध्याकाळी संपणारी असेल तर काय?) पण त्यामुळं ‘कट्यार’च्या अनुभूतीत कसा फरक पडतो? पडत असावा. पुढं हे नाटक दोनदा पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवली. या नाटकाचा आरंभच मुळात एक मैफल संपतानाचा आहे. तेव्हा सुरवात भैरवीनं करण्यामागचं प्रयोजन बरोबर असणार इतकंच लक्षात आलं. आता हे असं इतरही अनेकांच्या ध्यानी आलं असेलच. पण…
हा पण काही पिच्छा सोडत नाही.

शास्त्रीय नाही, पण तोच पक्का आधार असलेली दोन गाणी आहेत. “हे सुरांनो चंद्र व्हा…” आणि “रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी…” दोन्हींना माझ्या माहितीप्रमाणे संगीत आहे ते अभिषेकींचंच. एक ‘ययाती’मधलं आणि दुसरं… ठाऊक नाही. इतकंच कळतं की ही गझलेच्या अंगानं जाणारी रचना असावी. शंकर रामाणी यांची कविता. माझ्याकडं “हे सुरांनो…” बहुदा अर्चना कान्हेरे यांच्या आवाजातलं आहे. राग बहुदा चारुकेशी. जीवघेणी पेशकारी. कमालीची आर्तता आणि विनवणी. सूर साक्षात उभे राहिले आणि ती आर्तता त्यांनी ऐकली तर कदाचित त्या आर्ततेपोटीच प्रियकराकडं धावत जाऊन चांदण्यांचे ते कोष पोचवतील. “रंध्रात पेरिली मी आषाढ दर्द गाणी…” आवाज बुवांचाच. हे गीत सरळसरळ विरहानं व्याकूळ झालेल्या प्रियकराच्या आक्रोशाचं आहे, हे माझं आकलन. अर्थ वेगळाही असू शकेल. पण माझं या गीताशी जुळलेलं नातं “हे सुरांनो” सोबतच येत गेलं. कारण संगणकावर ऐकताना एका फोल्डरमध्ये ते त्याच क्रमानं येत गेलं. त्यामुळं तो अर्थ. आता या गाण्यातले शब्द समजतात आणि अर्थ लागतो असं म्हणणं इतक्या काळानंतर सोपंच आहे. पण सुरवातीला माझं ध्यान त्या शब्दांकडं फारसं नसायचंच. अनेकदा तर ‘हे सुरांनो’मधील “वाट एकाकी तमाची…” याऐवजी मी “वाट एकाकीच माझी…” असं घेऊन बसायचो. कारण मनात घर केलं होतं ते त्यातल्या सुरांच्या आर्ततेनं. मग शब्दांकडे ध्यान जायचंच नाही. तीच गोष्ट ‘रंध्रात’ची. त्यातली आर्तता अनुभवायची असेल, आक्रोश समजून घ्यायचा असेल तर प्रेमविरह हवाच का? नाहीच. ती पोचतेच त्याविनाही. त्या, आपण स्वतः नसलेल्या, प्रेयसी आणि प्रियकराच्या भूमिकेत हे सूर नेतातच.
आणखी एक. राग भूप. किशोरीताई. “सहेला रे”. केवळ अनुभवण्याची चीज (हा शब्द त्या अर्थानं नाही. एक गोष्ट या अर्थानं). ‘सहेला’सोबत सप्तसूर, त्यांचं ज्ञान करून घेणं. मुळात कल्पनाच जीवघेणी. त्यातल्या “आ मिल गाये” मधल्या “आ” मधला पुकार… वेगवेगळ्या धर्तीचा. मघाचे ते “चांदण्यांचे कोष” पोचवणारे सूर आता इथं प्रियकरालाच समोर आणून उभे करतात. शब्दच नाहीत, असा हा अनुभव येतोच.
कशामुळं घडतं हे? काय करतात हे सूर नेमकं आपल्याला?
दाखले असे द्यावेत तरी किती? एकेक रचना, मनात जाऊन बसलेल्या, बाहेर काढायच्या ठरवल्या तरी प्रश्नांचं स्वरूप तेच राहतं. मग ते रागदारी गायन असो, शुद्ध रागदारी किंवा फ्यूजन प्रकारातलं वाद्यसंगीत असो, ठुमऱ्या असो, दादरा तालातल्या रचना किंवा अनंत गझला. भावगीतेही आहेत. त्यातलीही एखादी जागा अशी मनात जाऊन बसलेली असते. सोबत तिच्या अशा खास आठवणी असतात.

ही एक अशीच गोष्ट. मध्यंतरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातला काही अनुवाद करण्याची एक संधी मिळाली होती. त्यातून माणसासमोर चिरंतन काळापासून असलेले काही मूलभूत प्रश्न समजत गेले. हे सारं गद्यातून लिहिलं गेलेलं. कधी कल्पनाही केली नव्हती की त्यातील काही पायाभूत प्रश्न संगीताच्या रूपानं आपल्या डोक्यात थोडा प्रकाश टाकून जातील. संतांच्या रचना आहेतच. त्या ऐकल्याही होत्या. पण तशा अर्थानं ते प्रश्न आत जाऊन पूर्ण भिडलेले नव्हते. उदाहरणार्थ, “वृक्षवल्ली आम्हा सोयरे…” यात किंवा “पसायदान”मध्ये वैश्विक मुद्यांचीच हाताळणी झाली आहे. त्या अर्थानं ते तत्वज्ञानच. आणि त्या संताच्या संपूर्ण कृतींचा विचार करून त्या रचना पाहिल्या तर पूर्ण तत्त्वज्ञान असंही म्हणता येतं. पण माणसापुढं वैयक्तिक स्वरूपातला प्रश्न असतो त्याची मांडणी माझ्या ध्यानी आली ती जितेंद्र अभिषेकी यांनीच गायलेल्या एका भैरवीतून. रचना कबीरांची आहे. “मेरा तेरा मनवा कैसा एक होय रे…” बास्स. या एका प्रश्नात खरं तर कबीरांनी सारं काही सांगून टाकलंय, पण ते ज्यानं थोडं तत्त्वज्ञान वाचलंय त्याच्यासाठी. इतरांचं काय? पुढचा दोहा आहे, “मैं कहता अखियन देखी, तू कहता कागजकी लिखी…” हेही उत्तर पुरत नसेल तर पुढच्या एका दोह्यात कबीर अगदी अंतिम स्वरूपाचा पर्याय सांगून जातात. म्हणतात, “मै कहता तू जागत रहीयो, तू रहता है सोयी रे…!” अभिषेकी आणि बहुदा शौनक या दोघांनी त्यात ‘जागत’ आणि ‘सोयी’ या दोन शब्दांवर जो काही स्वरांचा – सुरांचा खेळ केला आहे काही क्षणांसाठी, तो तिथंच मनाचा प्रवास थांबवतो त्या काळासाठी. पुढं सरकावंसं वाटू नये असं काय आहे त्या शब्दांमध्ये? आहे ते, त्या शब्दांच्या अली-पलीकडील शब्दांतून येतंच. पण तरी मन तिथंच थांबू पाहतं. थांबत असलं तरी, त्या दोह्याचा अर्थ पक्का सांगून जातं. मग विपश्यना म्हणजे काय हे समजू लागतं, ध्यान म्हणजे काय हे समजू लागतं. ध्यान किंवा विपश्यना भले जमणार नाही, पण त्याचं तंत्र समजल्यानं एकदम बुद्धाला क्वांटम फिजिक्स कळलं असेल का, असा भलताच प्रश्न डोक्यात जागा होऊन जातो. ही केवळ त्या ‘जागत’ आणि ‘सोयी’ या दोन शब्दांवर झालेल्या सूर-तालाच्या करामतीची किमया आहे का? पुन्हा इथं तेच. इतर काही रचनांतून न भावलेलं वैश्विक सत्य इथं या रचनेतच का भावावं? रचना भैरवीत आहे. पण भैरवी तर मला ओळखताही येत नाही. पण मग शब्दांचा अर्थ एरवी जितक्या ताकदीनं संप्रेषित होत नाही तितका इथंच का होतोय? सुरांची ताकद हे उत्तर ठीक. पण म्हणजे काय?
तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून म्हणे, खरं तर कोणत्याच प्रश्नाची उत्तरं मिळत नसतात. प्रश्नांच्या उत्तरांचा शोध कुठं थांबवायचा याचं प्रत्येकाचं आकलन त्यातून तयार होतं. हे असंच संगीताचं असावं बहुदा…

संगीत समजून ऐकणं आणि न आकळताही संगीत ऐकणं हे द्वंद्व माझ्या मनात कायमचं घर करून बसलंय. मन आणि मेंदू यातलं हे द्वंद्व आहे का? असावं बहुदा. ऐकताना कुठंही काहीही कमी वाटत नाही. तरी जे ऐकतोय त्यातून निर्माण होणाऱ्या अनुभूतीचा अर्थ लावण्यासाठी मनाला पुरेशी ताकद लागते ती मिळत नाही. ती बुद्धीची ताकद असं तर नाही? तिथं मेंदू कामाला येतो का? म्हणजे तो सूर, ताल, लय, स्वर वगैरेंचं विश्लेषण करून मनापर्यंत पोचवत असावा का? गुरू केल्याशिवाय हे झेपणे नाही हे उत्तर देऊन तात्पुरतं मनाचं समाधान होतं, पण तो प्रयत्न होत नाही आणि मग पुन्हा असं काही ऐकलं की जिवाची घालमेल होतेच. अशी अनुभूती चित्रगीत, भावगीत यासंबंधात होते का? माझा अनुभव असा आहे की, होतो; पण तेथे त्याचा गहिरेपणा अपवादात्मकच असतो. अपवादाचीच गोष्ट सुरू आहे म्हणून त्यापैकी दोन गीतांचा उल्लेख करावा लागेल. एक आहे चित्रगीत “कभी तनहाईमें यूँ”, संगीत स्नेहल भाटकरांचं; आणि दुसरी आहे गुलाम अलींच्या (थोरल्या नव्हे; छोट्या) आवाजातली एक ठुमरी, “गोरी तोरे नैना…” पारंपरिक पद्धतीनं पेश केलेली आणि सोबत तिचा दादरा. या दोन्ही रचनांमध्ये काय भिडतं आत जाऊन? सांगणं शक्य नाही. पण वेडावतात या दोन्ही रचना. यातली पहिली अनेकांना आवडत असेल. “गोरी तोरे नैना” ही ठुमरी सगळ्यांनाच भावते की नाही ठाऊक नाही.
अशाच एका चर्चेत माझ्या मित्रानं सांगितलं होतं, या अपवादाचा नियम करावयाचा असेल तर थोडं शास्त्रीय संगीत शिकून घ्यावंच लागेल तुला. त्यासाठीचा दाखला साधा सरळ होता. आमच्याच संवादातला. मी म्हणालो होतो, अनेकदा सुरेश वाडकरांच्या ‘ओंकार स्वरूपा’मधल्या काही रचना सकाळी ऐकल्या की खूप प्रसन्न वाटतं. त्यानं ताडकन सांगितलं होतं, “कारण त्या सकाळच्या रागांमध्ये बांधलेल्या आहेत.”
पुन्हा संगीत, सूर, लय, ताल आणि काळाचं नातं…
म्हणजे काय, तर प्रश्नच.
त्या मित्रानंच पुलंच्या एका दाखल्याचा आधार घेत सांगितलं, “न समजताही संगीत ऐकणं आणि त्यातला आनंद मिळवणं, शोधणं हे ठीक. पण ते कसं आहे की आंधळ्या शिल्पप्रेमीसारखं. तो आपला शिल्प चाचपडत राहतो, त्यातलं शिल्प त्याच्या हाती लागतंही. पण ते त्याला दिसत नसतं. शिल्पाचा आनंद त्याच्यालेखी स्पर्शाचाच असतो. तो असेलही त्याच्यापुरता पूर्ण; पण नेत्राच्या पातळीवर तो येत नाही. तसा आला नाही की हे असे प्रश्न येतात. तसंच हे तुझं.” पुलंच्या बंगचित्रंमध्ये या चित्रकाराचा दाखला असावा. अंध असूनही तो हातानं दाखवत चित्र करून घेतो असा काहीसा. तसं हे माझं. तो चित्रकार तिथं चित्र काढतानाचा आनंद जरूर मिळवतो. पण तयार चित्रकृतीचा दृष्टीसुखाला मात्र तो तसा पारखाच असतो.
हे द्वंद्व असं सुटणार नाही हे नक्की.
पटतं की, गुरूच हवा.
प्रश्नांच्या उत्तराचा शोध इथंच थांबवावा काय?
हाही एक प्रश्नच…

Advertisements

मैत्र!

जून 4, 2008

तो आणि मी…
आम्हा दोघांचं मैत्र केव्हापासूचं?
मला तरी सांगता येणार नाही…
मीही तुमच्यासारखाच…
त्याच्या प्रेमात पडलेला…
वेगवेगळ्या रुपात तो भेटतो… तुम्हाला तसाच मलाही…
लहानपणापासून भेटत आलाय…
तो… पाऊस…

गावची माती लाल. त्यामुळं तिथल्या पावसाच्या आठवणी त्या लाल रंगाशिवाय कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत. तेव्हा गावाचं कॉंक्रिटचं जंगल झालेलं नव्हतं. त्यामुळं आम्ही रहायचो त्या पेठांमधल्या वाड्यांमध्ये पावसाळ्यात तळी साचू शकायची. ही तळी स्वच्छ असायची. त्यांचा लाल रंगच त्यांच्या स्वच्छतेची खात्री द्यायचा. तळी म्हणजे माझ्या तेव्हाच्या – सहा-सात वर्षे – वयाच्या आकाराला साजेशी तळी. शेजाऱ्यांच्या आवारात असलेलं चिकूचं झाड अर्धं आमच्या आवारात आलेलं होतं. ते बरोबर माझ्या घराच्या दारासमोर यायचं. तिथं एका शेजाऱ्यांचीच चारचाकी लावलेली असायची. तिच्यापुढं एक रिक्षा. या दोन्ही गाड्यांच्या चाकांचे पट्टे तयार झालेले असायचे त्या पावसाळ्याच्या दिवसात. त्या पट्ट्यांमधून दुपारी आलेला पाऊस पाणी ठेवून जायचा. पावसाचा जोरही अगदी मध्यम असायचा. त्यामुळं पाणी साचायचं ते केवळ त्या चाकांच्या पट्ट्यांपुरतं आणि शेजारी घराच्या भिंतीना लागून फुलझाडांसाठी केलेल्या वाफ्यांमधल्या तळ्यांपुरतं. ते पट्टे वाहून जाणार नाहीत याची तो आम्हा मुलांसाठी खबरदारी घेत असावा. त्या पट्ट्यांच्या नद्या आमच्या कागदी नावा फिरण्यासाठी पुरायच्या. त्या नद्यांमधून शेजारी तळ्यांपर्यंत वाट काढून नावा तिथून चालवत न्यायच्या. या खेळात आम्ही इतके गर्क होऊन जायचो की, कपड्यांना मातीचा लाल रंग कधी लागला, आपले हात-पाय आणि बहुतेकदा तोंडही त्या रंगानं कसं माखून गेलंय हे कळायचं तेव्हा आईचं ओरडणं खावं लागलेलं असायचं. तेव्हाच्या पावसाची आज लक्षात राहिलेली आठवण ही एवढीच. अगदी निरागसपणे घर करून बसलेली. तिला मनातून काढणं शक्य झालेलं नाही हे मात्र खरं.
अर्थात हे दिवस होते अगदी प्राथमिक शाळेतले. नंतरच्या वर्षांमध्ये गावाच्या परिसरातील खेड्यांना सायकलींवरून भेटी देण्याचा एक छंद आम्हा तिघा-चौघांना जडलेला होता. हे एक गाव मनात घर करून बसलंय ते तिथल्या आंब्याच्या झाडांमुळं. मोसमात तिथं जाऊन जमिनीपर्यंत रेंगाळत आलेल्या फांद्यांना लागलेल्या कैऱ्या तेव्हा अक्षरशः झोपून खाल्ल्या आहेत, तशा परत कधीही चाखायला मिळाल्या नाहीत. एकदा ते कळल्यानंतर किमान तीन वर्षं दर उन्हाळ्यात तो कार्यक्रम एकदा तरी केलाच आहे. अशाच एका दिवशी हा भेटला, भर रस्त्यात. जाताना एक टेकडी लागायची. रस्ता टेकडीवरून गेला असल्यानं ती चढती त्या भागात प्रसिद्ध. त्या चढावरच त्या दिवशी वळवानं आम्हाला गाठलं. त्या टेकडीवर कुठंही कसलाही आडोसा नव्हता. एकही झाड नव्हतं. त्यामुळं भर रस्त्यात थांबून आम्ही त्याच्याकडून झोडपून घेतलं होतं. दुपारी साडेबाराची वेळ असावी. घरापासून साधारण दहा मैल अंतरावर होतो. जिथं जायचं होतं ते गाव आणखी दोन मैलांवर होतं. पाऊस असा तोंडावर येत होता की चढावर पुढं सरकणं मुश्कील झालं होतं. सायकलींना स्टॅंड लावला तरी त्या पडायच्या. चाक मागं सरकू नये म्हणून कुलपं घालून त्या धरून ठेवल्या होत्या तिघांनीही. पावसानं जराही दयामाया न दाखवता झोडपलं असलं तरी सुदैवानं वारं नव्हतं. अन्यथा आमची पंचाईतच होती.
दुपारी पावसाकडून झोडपून घेतल्यानंतरही कैऱ्यांच्या मेजवानीचा उत्साह कायम होता. तो उरकून संध्याकाळी पाच-साडेपाचला घरी आलो ते फटके खाण्याच्या तयारीतच. पोटभर शाब्दिक फटके खाल्ले आणि मान खाली घालून अभ्यासाला लागलो (हो तेव्हा सुटीतही ठराविक अभ्यास करावा लागायचाच) तेव्हा पुन्हा एकदा वाकुल्या दाखवत पाऊस बरसून गेला होता. संध्याकाळ अशीच वाया घालवून…
त्या गावातला आणखी एक पाऊस आठवतोय. तेव्हा मी चौदा-पंधरा वर्षांचा असावा. आठवतंय त्यानुसार तेव्हा तो सलग चार दिवस कोसळत होता. शाळांना सुट्या वगैरे तर मिळाल्या होत्याच, पण त्या दिवसांकडं नंतर मागं वळून पाहिलं तेव्हा जनजीवन ठप्प होणं म्हणजे काय हे मला समजलं होतं. ते तीन दिवस आम्ही घरांतून बाहेर पडलो नव्हतो. दूध घरात नसणं म्हणजे काय याचा अनुभव तेव्हाच मिळाला. तीच गोष्ट भाज्यांची. भाजी खरेदी रोजचीरोज करण्याचे ते दिवस होते. त्या पावसानं घरांची दारं उघडण्याची फुरसतही तेव्हा दिली नव्हती. असं म्हणतात की, गावात शतकातील सर्वाधिक पावसाचा विक्रम तेव्हा झाला होता. मला आठवतं त्यानुसार आमच्या शाळेच्या ग्राऊंडवर चौथ्या दिवशी संध्याकाळी पाऊस पूर्ण थांबल्यावर आम्ही गेलो तेव्हा सगळा चिखल झालेला होता. पुढं तीन-चार दिवस चांगला सूर्यप्रकाश पडेपर्यंत तिथं खेळणं अशक्य झालं होतं.

श्रावणातला एक सुरेख पाऊस मला भेटला होता सापुताऱ्यात. व्यवस्थापनाशी संघर्ष करून बदली ओढवून घेतली होती. पण त्यातही एक माज अनुभवत होतो. वयानुसार असणारी झिंगही होती. वर्षाकाठी मिळणाऱ्या चारापैकी एक सुटी १५ ऑगस्टची. नव्यानं त्या गावात आलो होतो. नवे सवंगडी भेटले होते. सुटी म्हटल्यावर सापुतारा असा कार्यक्रम ठरला. सकाळी साडेआठच्या सुमारासच टप्पा-टप्पा करत गाडी निघाली. सापुतारा गाठेपर्यंत पावसानं आम्हाला गाठलं होतं. मग काय घाट येण्याचीच काय ती प्रतिक्षा होती. घाट सुरू झाला तसा गाडीचा वेग कमी झाला आणि सारं टोळकं खाली उतरलं. भर पावसात फेर धरून घाटात आम्ही किती वेळ रिंगण करून नाचत होतो याचं भान कोणालाही नव्हतं. तसं नाचत, चालत, पळत, कडेच्या झाडांवर काही मिळतं का ते पहातच आमची एन्जॉयमेंट सुरू होती. पाय थकल्यासारखे वाटले की गाडीत बसायचं आणि पुन्हा उतरायचं. घाट उतरायला त्यादिवशी आम्ही जो वेळ घेतला तो आमच्या गाडीच्या चालकाच्या लेखी विक्रम होता. आम्हाला त्याची फिकीर नव्हती. पाऊसच तसा होता. एक तर घाट, त्यात झाडोरा छानपैकी होता. मधूनच सूर्याला डोकं बाहेर काढता येत होतं. आणि श्रावणातला तो उन-पावसाचा खेळ. बेधुंद करून टाकणारा. कसं ते ठाऊक नाही, पण त्यादिवशी कुणीतरी गाडीत झाकीरच्या काही कॅसेट ठेवल्या होत्या. घाटाच्या ऐन मध्यावर नकळतच त्यापैकी एक कोणीतरी लावली आणि स्पिकरचा आवाज मोठा केला. तबल्यावर वेगवेगळे बोल काढणाऱ्या सुरावटी निनादू लागल्या आणि पावसाचा आनंद द्विगुणीत होऊन गेला. त्या बोलांच्या तालावर एका टोळक्यानं आदिवासींच्या नृत्याची एक झलक पेश केली तेव्हा आम्हा इतरांच्या अंगावर रोमांच फुलले होते. टाळ्यांनी त्या सुरावटीत केव्हा सूर मिळवला हे कळलंदेखील नाही. त्या अशा उत्स्फुर्त नाचाला वन्समोअर मिळाला होता त्यादिवशी. आजही श्रावणातल्या एखाद्या पावसात तो पाऊस डोळ्यांपुढं फेर धरतो. रपरप करीत कोसळणारी एखादी सर. मग सुरेख उन्हाची सोनेरी उधळण. पुन्हा थोडं अंतर गेलं की रपरप करीत बरसात आणि पुन्हा सोनेरी उन्हाचा एक पट्टा. कानात तबल्याच्या त्या सुरावटी घुमू लागतात आणि त्या आठवणी मन जागं करून जातात पुन्हा एकदा.

पावसाची रुपं अनेक. प्रत्येकाला वेगवेगळ्या वेळी भेटणारी. आणि अगदी हमखास भेटणारीच. कधी प्रेमळ, कधी हसरा-खेळकर, कधी संतापलेला, तर कधी नुसताच कंटाळवाणा. कधी रौद्ररूप घेऊनही तो येतो. त्यातलाच हा एक प्रसंग. दीड वर्षं झाली त्या आठवणीला. ऐन पावसाळ्यातच हा दौरा होता नर्मदाकाठचा. आम्ही सारे संध्याकाळच्या सुमारास नर्मदेच्या एका उपनदीच्या किनाऱ्यावर उतरलो. मोटरबोट होती पुढच्या प्रवासाला. पन्नास-एक मंडळी बसतील अशा त्या बोटीत आम्ही होतो पंचवीस जण. बोटीचा प्रवास सुरू झाला तेव्हा ढग नव्हते. पण बोटीनं दहा एक मिनिटांनी नर्मदेच्या विशाल पात्रात प्रवेश केला तेव्हा काळोखून गेलं होतं. आणि आमची बोट पूर्वेच्या दिशेला प्रवाहाच्या विरोधात वळवली तेव्हाच पाऊस कोसळू लागला. इंजिनाच्या टोकाला मी आणि आणखी दोन-तीन मित्र बसलो होतो. दुसऱ्या टोकाला बरोबरची मंडळी. प्रवास साधारण दीडेक तासांचा होता. साडेसहाच्या सुमारास आम्ही नर्मदेत प्रवेश केला होता. आठपर्यंत इच्छित गावी पोचायचं होतं. पण…
पाऊस… नर्मदेच्या पात्राची रुंदी त्यावेळी काही नाही म्हटलं तरी पाऊण-एक किलोमीटर सहज असावी. खोली किमान शंभर मीटर. या आकड्यांची कल्पना असणारे बोटीत मोजकेच होते. पण ती चर्चा झालीच सुरू आणि हळुहळू गांभीर्याची जाणीव एकेकाच्या डोक्यावर स्वार होऊ लागली. काहींच्याबाबत तिचं रुपांतर पाहता-पाहता भीतीमध्ये झालं. इतक्या रुंदीच्या पात्रावर वाऱ्याला भयंकर वेग प्राप्त होत असतो. तसा तो झाला होता. बोटीला वरून घातलेल्या आवरणाला काहीही अर्थ राहिला नव्हता. पावसाचे टप्पोरे थेंब बोटीच्या एका बाजूकडून आत प्रवेश करू लागले होते. अंधाराचं साम्राज्य तर केव्हाच पसरलं होतं. बोटीच्या उजवीकडून वाकून बाहेर पाहिलं की, थोड्या अंतरावर डोंगराची कड तेवढी दिसायची. आणि ती हरेक दर्शनासोबत भीतीमध्ये पुरेशी वाढ करून जायची. कारण तितकं अंतर किनारा दूर आहे याची जाणीव ती कड करून द्यायची.
बोटीच्या दुसऱ्या टोकावरून मला कोणीतरी हाक मारल्यासारखं वाटलं. या टोकाकडून कसाबसा मार्ग काढत मी चार पावलं पुढं टाकली. ‘बोट अगदी डोंगराच्या कडेनं घ्यायला सांगा,’ मला निरोप मिळाला. मी मागं नावाड्याकडं आलो. त्याला निरोप सांगितला. त्यानं मान डोलावली. मी त्याच्या बाजूनं मागं पाहिलं. दूरवर कुठं तरी डोंगरात उंचीवर एखादा दिवा चमकल्याचा भास झाला. पाऊस थांबतोय की काय असं मला उगाचच वाटून गेलं. पण ती केवळ वादळापूर्वीची शांतता होती. पाचेक मिनिटं गेली असावीत. एव्हाना आम्ही कसंबसं बोटीचं आवरण एका बाजूनं बांधण्यात यशस्वी झालो होतो. आत भरू लागलेलं पाणी काढून टाकण्यासाठी एकावेळी चार-पाच जणांचे प्रयत्न सुरू होते. आणि पावसानं सुसाट मारा सुरू केला. आपण पावसात झोडपले जातोय इतकंच आमच्या ध्यानी येत होतं. बोटीचं इंजिन सुरू होतं. त्यामुळं ओरडल्याशिवाय कुणाचंच बोलणं कळत नव्हतं. थोडा वेळ गेला असाच हेलकावे खाण्यात आणि पाऊस कधी कमी होणार आहे याच्या अटकळी बांधण्यात. मी सहज दक्षिणेच्या दिशेला वळून पाहिलं. मला धक्काच बसला. बोट तर डोंगरापासून पुन्हा पात्रात आतमध्ये आली होती. वाऱ्याचा तडाखा जाणवण्याचं कारण आता कुठं मला उमगू लागलं. नावाडी आणि माझ्यात केवळ चारेक फुटांचं अंतर होतं. तिथं बोटीवरचं आवरण नसल्यानं पावसात भिजावं लागणार होतं, पण एवीतेवी आता आतमध्ये कपडे ओले झालेच होते. माझेच नव्हे तर बहुतेक साऱ्यांचेच. गेलो त्याच्याकडं. तो उभा राहून बॅटरीचा झोत डोंगराकडं टाकत होता. मी एक क्षणभर थांबलो. त्यानं सहकाऱ्याला हाक दिली आणि हळुवार सुकाणू वळवून बोट डोंगराच्या दिशेला वळवली. आता पावसाचा तडाखा बोटीला एका कडेवरून बसू लागला. हेलकावे वाढले होते. सहा-सात मिनिटांनी बोट डोंगराच्या कडेला लागली. नावाडी आणि त्याच्या सहकाऱ्यानं त्या किर्र अंधारात जंगलात उडी मारून बोटीवरून दोर घेतला आणि ती बांधून घातली.
‘इथंच थांबावं लागेल,’ नावाडी. त्याच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत कोणाचीही नव्हती. कारण तिथं बांधलेल्या अवस्थेतही बोटीची होत असलेली हालचाल पुरेशी बोलकी होती. त्यामुळं प्रवाशांनी मौनच धारण केलं होतं. इंजिन बंद झाल्यानं आता पावसाचा आवाज नीट कळू लागला. धुंवाधार पाऊस सुरू होता. नदीच्या पात्रावर पडणाऱ्या थेंबांचाही नाद कर्कश्श वाटू लागला होता एव्हाना. त्यात भर होती ती वाऱ्याच्या गोंगाटाची. सरळसोट किलोमीटरभर रुंदीचा पट्टा त्याला फिरायला मिळाला होता. त्यामुळं त्याच्या उन्मादाला थांगच नव्हता. निघाल्यापासून अवघ्या पाऊण तासात हे नाट्य आम्ही अनुभवत होतो. आणि मग पुढं आमच्यासमोर काहीही पर्याय राहिला नाही. रात्रीच्या किर्र अंधारात आपण कुठं आहोत याचा नेमका अंदाज आम्हाला येतही नव्हता. आला तरी आमच्यातील अनेकांच्या लेखी तो प्रदेशच अनोळखी असल्यानं फारसा उपयोगही झाला नसता. वेळ घालवण्यासाठी आणि धीर निर्माण करण्यासाठी बोटीमध्ये उंच आवाजात गाणी सुरू झाली होती. मां रेवा हे गाणं त्यादिवशी पूर्ण ऐकलं. त्याचा आविष्कार वेगळाच होता. बाहेरच्या पावसाची त्याला साथ होती. अत्यंत उग्र अशी. मला नेमकं का ते सांगता येणार नाही, पण त्यादिवशी मां रेवा ही नर्मदेची प्रार्थना त्या सुरात सूर मिसळत मी प्रथमच गायलो. सुमारे दीड तास आम्ही तिथं तसे टांगलेल्या स्थितीत होतो. चोहीकडे अंधार होता. बोट बांधताना बोटीच्या नाकासमोर असणारा डोंगर मध्येच केव्हातरी बोटीच्या कडेला आला होता. बोट कशी हालते आहे हे समजलं की अंगावर काटा यायचा. जिथं बोट होती तिथंच पाणी किमान दहाएक मीटर खोल होतं. त्या अंधारात डोंगरावर दिसायच्या त्या झाडांच्या सावल्याच. दोन्ही बाजूला किमान मैलभर अंतरावर तरी वस्ती नव्हती हे मात्र माझ्यासह काहींच्या लक्षात आलं होतं. त्यामुळं चिंताही दाटून आली होती.
गाण्यांच्या भरातच केव्हा तरी बोटीचे हेलकावे आता कमी झाले आहेत हे जाणवलं. पावणेनऊनंतर केव्हा तरी पाऊस ओसरला. वारं थांबण्याची चिन्हं नव्हती. पण पाऊस थांबलाय म्हणजे वारंही थांबेल असं म्हणत नावाड्यानं बोट पुन्हा पात्रात आणली आणि आम्ही चिंब भिजलेल्या स्थितीत पुढचा प्रवास सुरू केला… अनेक निःश्वास त्यावेळी त्या वाऱ्याच्या गोंगाटातही स्पष्ट ऐकू येत होते.
त्या भर पावसात बोट पुन्हा पात्रात मध्ये घेण्याचं कारण पुढं एका दौऱ्यात मला समजलं. अशा पावसात वाऱ्याचा वेग असताना एकूणच बोटीचं सुकाणू चालवणं अवघड असतंच. त्यात अशा ठिकाणी पात्रात अनेकदा अर्धवट बुडालेल्या डोंगरांची टोकं वर आलेली असतात. त्यामुळं बोट पात्राच्या मध्यावरूनच नेणं केव्हाही श्रेयस्कर. नावाड्याचं हे म्हणणं त्याच्या नौकानयनशास्त्राला धरून आहे. पण मी अनेकदा विचार करतो, अशा पावसात पुन्हा सापडलो आणि बोट पात्राच्या मध्यावर असेल तर… आत्ता हे लिहितानाही अंगावर काटा आला आहे.

पावसाला त्याच्यासारखं उंच होऊन उराउरी भेटल्याचा अनुभव एकदा मिळून गेला तो अगदी अपघातानंच. सातपुड्यात फिरायला गेलो होतो. गाव उंचावर होतं. उंचावर म्हणजे संध्याकाळी गावातल्या माझ्या स्नेह्यांच्या घरी जाण्यासाठी मला डोंगर चढायलाच दहा मिनिटं लागली होती. त्यात एकदा पाय घसरून पडता-पडता वाचलो होतो. संध्याकाळी पाऊस नव्हता. त्यानं दुपारी त्याची हजेरी पुरेशा प्रमाणात लावलेली होती. दिवस जुलैचे. म्हणजे पावसाचा अगदी भरात येण्याचा काळ होता. तरीही संध्याकाळी त्यानं उसंत घेतल्यानं मीही थोडा सुखावलो होतो. आधीच्या चार दिवसात त्यानं भिजवून काढलं होतं. आजचा दिवस काय तो कोरड्या कपड्यानिशी चालण्याचा होता.
सकाळी सहाच्या सुमारास जाग आली आणि मी घराचं दार उघडून बाहेर आलो. पाहतो तो काय रात्री केव्हा तरी मी झोपी गेल्यानंतर पावसाची रिपरीप सुरू झाली होती ती थांबलीच नव्हती. घराच्या मागल्या बाजूला पाहिलं. बोडख्या डोंगरावर ढग होते आणि धाराही होत्या. मी तसाच तिथं घुसलो. धुक्यात शिरल्यासारखा अनुभव घेत असतानाच पावसाचे थेंबही अंगभर खेळू लागले. हे थेंब अंगाला बिलगतच खाली उतरत होते. घरंगळतच म्हणा ना. काही क्षणात मी चिंब भिजून गेलो. समोरचं चारेक फुटांवरचंही काही दिसत नव्हतं. फार पुढं जाण्याची भीती वाटू लागली होती. दिसेनासं झालं खरोखरच आणि कुठं दिशा चुकली तर… ही जाणीव जबाबदारीचं भान देऊन गेली. तिथंच थांबलो. पाचेक मिनिटं इकडंतिकडं केलं आणि आलेल्या दिशेनं माघारी वळून डोंगर उतरू लागलो. काही पावलांतच त्या दाट धुक्यातून बाहेर येत विरळ धुक्यात प्रवेश केला. घर दिसू लागलं. धीर आला. डोंगरानं आपल्याला कितीही उंची दिली तरी हे मन आपली खरी उंची केव्हाही आणि कुठंही जाणवून देऊ शकतं एवढं आभाळज्ञान पावसाशी झालेल्या त्या उराउरी भेटीनं दिलं त्यादिवशी.

मनात घर करून बसलेली ही पावसाची एक आठवण मात्र आताशा सारखी मनात रुंजी घालत असते. कारण ठाऊक नाही. तेव्हा मी नोकरी सोडली होती. एक नवा प्रकल्प ड़ोक्यात घेतला होता आणि त्या आवेशातच नोकरीला रामराम केला होता. नोकरी सोडण्याची तारीखही भन्नाट. १ एप्रिल. ३१ मार्चला राजीनामा हातात ठेवला होता व्यवस्थापनाच्या. त्याच दिवशी हट्ट धरून रिलीव्ह झालो. एप्रिल महिना प्रकल्पाच्या आखणीत गेला आणि मेच्या पहिल्या आठवड्याच डोळे खाडकन उघडले. हे तर जमण्यासारखं नाही… डोळे उघडले तसा एक हादरा बसला जोरदार. मनाला आणि त्यामुळंच आत्मविश्वासालाही. तशाच स्थितीत दिवस जात होते. मेचा तिसरा आठवडा असावा. सुन्न मनस्थितीत त्याआधीची आठेक वर्षं आठवू लागलो. घरापासून दूर असलेली. दूर राहण्याचं निमित्त नोकरीचंच. पण वयाच्या सतराव्या वर्षापासूनची ती आठ वर्षं होती. हाती शिक्षण काहीही नव्हतं. नोकरी सुटली होती. पुढचं सारं अंधुक होतं. त्या दिवशी संध्याकाळी असाच खिन्न होऊन बसलो होतो. हाती प्रभाकर पेंढारकरांचं ‘रारंगढांग’ होतं. त्या काळात बऱ्यापैकी गाजत असलेली ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ ही कॅसेट तेव्हा मी सारखी ऐकायचो. तीच सुरू होती. साडेसातचा सुमार असावा. पद्मजाच्या आवाजात,
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दुःखाच्या मंद सुराने
सुरू होतं. आणि एकदम हवा कुंद झाली. पाहता-पाहता खोलीच्या छतावर पावसाची टपटप ऐकू येऊ लागली. इकडं हे गाणं आणि बाहेर कुंद हवा. खोलीत मी एकटा. मनाची घालमेल सुरू झाली. भविष्याची चिंता होतीच, शिवाय नोकरी सोडल्यानंतर घरी रहायला न जाण्यातली एक टोचणीही असावी. घरच्यांपासून निर्माण झालेला दुरावा खाऊ लागला असावा. मनसोक्त रडावंसं वाटत होतं, पण काही केल्या रडू फुटत नव्हतं. पुस्तकातील तो कडा मनाच्या दाराशी येऊन बसल्यासारखा झाला होता. “‘आपण’ ‘रडायचं'”, हा प्रश्न तिथं कोणीही नसलं तरी माझ्या मनाच्याच एका बाजूला पडला होता आणि दुसरी बाजू तिच्यापुढं कमकुवत होत गेली. पाऊसही असा की, धड कोसळत नव्हता किंवा हलक्या सरींमधून येऊन दिलासाही देत नव्हता. मध्यम रिपरिप. कशाचंही काहीही सुचेनासं झालं होतं त्या पावसानं. मनात द्वंद्व. बाहेर ही स्थिती. त्या द्वंद्वामध्ये असतानाच पाऊस थांबला हे मात्र समजून आलं नाही. द्वंद्वाचा फैसला काय झाला ते आठवत नाही. आठवतं ते इतकंच की डोळे कोरडेच राहिले. बहुदा मन आणखी कंगोरेदार होऊन गेलं असावं…

या पावसानं कायमची हुरहूर लावलेली त्याची आणि माझी ही भेट तशी अलीकडची. दुपारची वेळ होती. आम्हा दोघांना एका परिचितांकडं जायचं होतं. दोघंही एका मध्यवर्ती ठिकाणी आधी भेटलो होतो. गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींनी एक प्रकारचं अंतर दोघांनाही जाणवत होतं. त्यामुळं दोघंही मौनाची भाषांतरं करीत होतो. बोलायचं खूप होतं. कुणी आधी बोलावं हाही प्रश्न असण्याची शक्यता नव्हती. काय आधी बोलायचं हाच बहुदा पेच असावा. त्या परिचितांच्या घराचा निम्मा रस्ता कापला आणि अचानक काळोखून आलं. काही क्षणांत गाडीसमोरचं आठ-दहा फुटांवरचं दिसेनासंही होऊन गेलं.
आडोसा पाहण्याचीही संधी न देता पावसानं बरसायला सुरवात केली. दुपारी दीड ते तीन. दीड तास तो कोसळत होता. सरींच्या पहिल्या काही वर्षावामध्येच नखशिखांत भिजून आम्ही दोघंही एका इमारतीच्या कंपाऊंडमध्ये पारिजातकाच्या झाडाखाली उभे होतो. हे झाड दोस्त म्हणून कधी आयुष्यात येईल असं वाटलं नव्हतं. त्या दिवशी त्या भूमिकेत होतं. तिथं जाऊन उभे राहिलो आणि काही क्षणातच एक पान-फूल घरंगळत खाली आलं आणि तिच्या कपाळावरील केसांवर विसावलं. तिच्या ते ध्यानीही नव्हतं. मी हळूवारपणे ते तिथून काढलं आणि ओंजळीत धरून तिच्यापुढं केलं. तेवढा क्षण पुरेसा होता. दोघांनाही. नंतर रंगले ते माफीनामे… कोसळणाऱ्या पावसाच्या गतीनंच. तो थांबला तेव्हा तिथून निघण्याचं भानही राहिलं नव्हतं इतकं आम्ही बोलू लागलो होतो. पाऊस येण्याच्या आधीचा सुमारे एक तास ओढून-ताणून केलेल्या संवादात गेला होता. पावसात भिजल्यानंतर काय चमत्कार झाला कोणास ठाऊक? पावसाच्या कोसळणाऱ्या सरींसारखेच शब्दही कोसळत होते एकमेकांवर. रागावणारे, चिडवणारे, प्रेमही व्यक्त करणारे. मध्येच सांभाळून घेण्याची भाषा करणारे. त्या सरीही तशाच होत्या. आम्ही उभे होतो त्या पारिजातकाच्या झाडांमधून वाट काढत येऊन भिडत होत्या आम्हाला… कधी समजावणीची भाषा करीत, झाडाला वाऱ्यानं हलवलं की अगदी रागावत, तर कधी प्रेमात आल्यासारख्या…
तो दिवसच तसा होता. तिला सोडून नंतर घरी गेलो. घराचा सारा परिसर कोरडा होता. कपडे बदलले आणि ऑफिस गाठलं. तिथंही सारं वातावरण कोरडं ठाक. दुपारचा पाऊस शहराच्या एका भागातच कोसळला होता. संध्याकाळी तो ऑफिसच्या भागांत हजेरी लावून गेला. पण ती हजेरी अगदी श्रावणातल्या सरींसारखी. मधूनच उन्हाचे सोनेरी कवडसे चमकत आणि एखादी छोटीशी पण मनमुराद कोसळणारी सर. साडेपाच ते संध्याकाळी सात हा खेळ सुरू होता. त्यावेळी दाटून आलेल्या तिच्या आठवणी मात्र ‘हुई है शाम तो आखोंमे बस गया फिर तू,’ अशी कातरता आणणाऱ्या होत्या…
माझ्यासोबत पावसात भिजायचं होतं तिला. ती आणि मी एकत्र असताना एरवी कधीही तो आला नाही. ऐन पावसाळ्यात मी तिच्या गावी असायचो तेव्हाही त्यानं हुलकावणी दिलेली होती. ती तिच्या कामात किंवा मग मी कुठंतरी कामानिमित्तानं जवळपासच्या एखाद्या गावात. त्यामुळं पाऊस, ती आणि मी हे त्रैराशीक कधी जुळलंच नाही. ती सोबत असताना तो आला तो फक्त त्यादिवशीच… पण तो निरोपाचाच दिवस ठरला…

सरत्या उन्हाळ्यातील संध्याकाळ असावी. आपण एकटंच असावं. हवा स्वच्छ असावी. अशातच काही कारणानं एखाद्या जुन्या आठवणीनं मनात काहूर निर्माण करावं. बेचैन मनाला आवर घालण्यासाठी एखादं असंच हुरहूर लावणारं पुस्तक हाती घ्यावं. शेजारी छानशा गाण्यांची सुरावट असावी. एखादा पेग भरून घ्यावा. वाचनात गर्क व्हावं. दीड-दोन तास कसे गेले ते कळू नये. साडेसहाच्या सुमारास बाहेर पहावं तर एकदम अंधारून आलेलं दिसावं. हवा कुंद झालेली असावी. हातातल्या पुस्तकातलं वातावरणही आता त्याच सुरावटी छेडत असावं. भरून आलेलं आभाळ बाहेर, तसंच मनातही, अशा स्थितीत असतानाच अचानक गुलाम अलींचे सूर कानी पडू लागावेत…
ले चला जान मेरी रुठके जाना तेरा
ऐसे आनेसे तो बेहतर था न आना तेरा…
आता ध्यानी येऊ लागतं की, बरसात दोन स्तरांवर होणार आहे. बाहेरच्या टपटपीसोबत प्रवास करताना मनातही कितीतरी काळापासून दाटून असलेले सारे कढ उसळ्या मारू लागावेत. इतका वेळ आवरून ठेवलेला एखादा थेंब नकळतच डोळ्यांतून ओघळावा. गालांवरून ओठांपाशी यावा आपली खारट चव घेऊन. बाहेर नजर जावी तर धारा लागलेल्या असाव्यात. ढग गडगडत असावेत. कंठाच्या उंबरठ्याशी रोखून धरलेला हुंदका उसळून बाहेर फुटावा… आणि मग बाहेरच्या गडगडाटात मनातून उसळून-उसळून येणारे हुंदक्यांचे आवाज विरून जावेत…
‘मी मला आक्रंदताना पाहिले’ अशी ही अवस्था अर्धापाऊण तास असते. ती संपते तेव्हा आपण डोळे पुसतो. दार उघडून बाहेर येतो. टपटप थांबलेली असते. नशिबात असेल तर मृदगंध आपला कब्जा घेतो. अंगणात एखादं झाड असेल आणि वाऱ्याची झुळूक आली तर पाना-फुला-झाडांवरून पडणारे थेंब आपल्या अंगांगांवर उतरतात. एक बारीकशी शिरशिरी येते. रोमांच फुलतात आठवणींचे. सभोवार मोकळं असेल तर वर नजर जाते. सारं आकाश स्वच्छ असतं. शेकडो चांदण्या लुकलुकू लागलेल्या असतात…
आणि अचानक ध्यानी येतं, इथं आत मनातही आता सारं कसं निरभ्र झालेलं असतं… आशेच्या शेकडो चांदण्या मनातही लुकलुकू लागलेल्या असतात…


नावात काय नाही?

एप्रिल 20, 2008

काही कामानिमित्त परवा एका स्नेह्यांच्या घरी फोन केला. त्यांच्या कन्येनं – ओजसनं – फोन घेतला.

‘मोडक बोलतोय. आई आहे?’

‘थांबा हं. देते.’ असं म्हणत तिनं आईकडं फोन दिला.

त्यांनी फोन घेतला तेव्हा पहिलंच वाक्य होतं, ‘ओजस म्हणतेय की, यांचं नाव इतकं सुंदर असून हे मोडक असं का सांगतात?’

‘बऱ्याच वर्षांपासून ती एक सवय बसली आहे. काही केल्या जात नाही…’

मी उत्तर देऊन मोकळा झालो. हा अनुभव काही पहिलाच नव्हता. याआधीही एकदा असा अनुभव आला होता. त्यावेळी मी एका लोकसंघटनेसोबत जोडून घेतलं होतं. तिथं एका कार्यकर्तीनं ‘यांना तुम्ही मोडक असं का म्हणता, श्रावण का नाही?’ असा प्रश्न थेट मला उद्देशून नाही, पण तिथल्या साथींना उद्देशून केला होता. त्यांच्यापैकी एकीनं, ‘बघ ना. पण ते कधीच त्यांचं नाव श्रावण असं सांगत नाहीत,’ असं उत्तर देऊन माझ्याकडं कटाक्ष टाकला होता. त्याहीवेळी मी दिलेलं उत्तर आत्ताच्या उत्तरापेक्षा काही वेगळं नव्हतं. तेव्हा त्याविषयी फार विचार करण्यास वेळही मिळालेला नव्हता. आत्ता मात्र तसं नव्हतं. आत्ता विचारात पडलो आणि मागं मागं जात राहिलो. त्या सवयीच्या मुळाच्या शोधात. हाती फारसं काही गवसलं नाही.

खरं तर, हाती काहीही गवसत नाही म्हंटल्यावर तिथंच थांबायला हवं होतं. पण मनोव्यापार इतके सरळ नसतात. एखाद्या गोष्टीवरून सुरू झालेला तो व्यापार कुठं जाईल हे सांगता येत नसतं. तसंच इथंही झालं आणि दुसरा रस्ता फुटला. मी स्वतःची ओळख करून देताना फक्त नावाचा उच्चार करत नसेनही पण इतरांना संबोधताना काय करतो, हा भुंगा सुरू झाला आणि एकेक पैलू समोर येत गेला.

पाहता-पाहता एकेक व्यक्ती डोळ्यांसमोर येत गेली. त्यांची नावं येत गेली. त्यांना मी कोणत्या नावानं केव्हा संबोधतो, त्यामागील भावना काय असतात हे सगळं स्वच्छ डोळ्यांसमोर येत गेलं. त्या-त्यावेळी आपल्या व्यक्तिमत्त्वातील एकेक पैलू त्यासंबोधनातही कसे दडलेले असतात हे अगदी स्वच्छ होत गेलं तसं नावात काय आहे या प्रश्नाचं एक वेगळंच उत्तर समोर आलं.

हाक मारण्याचं नाव आणि खरं नाव वेगळं असू शकतात. माझीही अशी दोन नावं आहेत. त्यापैकी एक नाव पूर्णपणे कौटुंबीक. तेही इतकं रुजलेलं आहे की, श्रावण म्हटलं की अनेकांना माझी ओळखही लागत नाही. मग पुन्हा घरचं नाव घेऊन सांगावं लागतं तेव्हा कुठं ओळख पटते. हा अर्थात झाला स्वतंत्र विषय. पण त्याहीपलीकडं नावाची मोडतोड आपण करत नसतोच का?

नावांच्या मोडतोडीमागं नेमकं काय-काय दडलेलं असतं हे त्या मनोप्रवासात ध्यानी येत गेलं. माणसाच्या मनात निर्माण होणारी जवळपास प्रत्येक भावना (अगदी वैषयिकसुद्धा) त्यामागं असतेच. आणि त्या-त्या भावनेतून त्या नावांची वेगवेगळी रुपं आविष्कृत होत जातात बहुदा.

माझ्या एका अगदी जवळच्या मित्राचं नाव राहूल आहे. त्याचा उल्लेख मी केव्हाही राहूल असाच करेन. पण काही विशिष्ट वेळी आपण त्याला रावल्या असंही म्हणतो, हे माझ्या लक्षात आलं. एक तर त्याचा उल्लेख आमच्या काही सामायीक मित्रांमध्ये करताना किंवा मग मोठेपणाच्या अधिकारात त्याला काही सांगायचं असेल किंवा सुनावायचं असेल तर त्या रावल्याला एक वेगळीच छटा प्राप्त होत असते, हे काही दाखल्यांवरून माझ्या लक्षात आलं. परदेशी शिक्षणाला जाण्याचा ओढा असलेला हा मुलगा पक्का बेशिस्तीचा. दिलेल्या वेळेवर कुठं हजर झाला तर शप्पथ. असं काही त्यानं केलं की, मग मोबाईलवर बोलताना किंचित रागानं त्याचा रावल्या व्हायचा. लिहिताना त्याच्या हातून काही अगदी भोंगळ चुका झालेल्या दिसल्या की, मी रावल्याच म्हणायचो; पण त्यात संताप खचाखच भरलेला असायचा.

आणखी एक वेगळं उदाहरण आहे. या मित्राचं नाव महत्त्वाचं नाही. कारण नावाबाबत नेहमीचीची गोष्ट आहे. अगदी नेहमीच्या परिस्थितीत मी त्याला नावानंच हाक मारतो. तो माझा वरिष्ठ सहकारी आहे. पण हा वरिष्ठपणा कार्यालयाच्या संदर्भात. तसे आम्ही खूप जुने मित्र. आडनाव जोशी. जोशी म्हटलं की येणारे गुण त्याला अगदी चिकटलेले आहेत, असं मी नेहमी त्याला खिजवत असतो, पण तोही भाग वेगळा. या मित्राशी एरवी केव्हाही बोलताना त्याचं नाव घेणारा मी मध्येच केव्हा तरी, ‘जोशीबुवा…’ अशी सुरवात करतो. मग असे एकेक प्रसंग आठवू लागलो तेव्हा लक्षात आलं की, या संबोधनानंतर मी त्याच्याशी जे काही बोलतो ते हमखास उपरोधीक असतं. उपरोधाचं ते वाक्य संपलं की मी लगेचच पुन्हा त्याच्या नावावरच येतो. जोशीबुवाच्या मागं दडलेली दुसरी भावना असते ती त्याला काही तरी शिकवण्याची. हे शिकवणंही उपरोधाचंच. एकदा त्याच्यासमोर प्रश्न पडला, मिठी हा शब्द वापरू की आलिंगन हा! अंगभूत खवटपणातून त्यामागील हेतू माझ्या लक्षात आला. म्हणालो, ‘जोशीबुवा, मिठीत रस आहेच, आलिंगनात तर लिंगच आहे.’ हेतू पक्का समजून घेऊन मी दिलेल्या त्या उत्तरातील उपरोधही कुठल्याकुठं मावळून जात तो खळाळून हसला.

मघा मी म्हटलं तसं, माणसाच्या मनात निर्माण होणारी प्रत्येक भावना संबोधनातून व्यक्त होतेच. हे एक वेगळं उदाहरण आहे. अगदी वैयक्तिक. ही माझी प्रेयसी. प्रेम अव्यक्त असलेला तो काळ होता. त्यावेळी केव्हा तरी एकदा तिला इमेल लिहिताना मी तिच्या नावाचं पहिलं अक्षर कंसात टाकून बाहेर मिता असा उल्लेख केला. तिनं मेल उघडली तेव्हा आजूबाजूला तिचे मित्र-मैत्रिण होते. तिनं नंतर सांगितलं, ‘माझ्या नावाचं ते रूप पाहूनच तिथं इतका विशिष्ट हशा उसळला की, लाजून चूर व्हायची वेळ आली.’ तिनं हे सांगितलं तेव्हा माझ्या डोक्यातही प्रकाश पडला.
मी तो शब्द-अक्षराचा खेळ सहजच केला होता अशी माझी तोवर समजूत होती. तिनं हे सांगितलं तेव्हा आमचं प्रेम व्यक्त झालं होतं आणि त्यावेळी मागं वळून पाहताना माझ्या लक्षात आलं की, अरे आपण तो सहजच केलेला खेळ नव्हता. माझ्या प्रेमाच्या विश्वातलं तिचं नाव मिताच तर त्यावेळीही होतं (आजही आहेच). ती लाजून चूर झाल्यानंतर तिच्या मित्र-मैत्रिणींना तिच्या माझ्याविषयीच्या भावनाही समजून गेल्या होत्या. शिवाय, ती मेल चार-चौघात उघडलेली असल्यानं माझं मनही तसंच उघडं झालं होतं हे समजलं तसं लाजण्याची वेळ माझ्यावर आली. कारण मधल्या काळात त्या मंडळींचा माझ्याबरोबरचा संवाद-व्यवहार अगदी सूक्ष्मपणे बदललेला होता. पुढं एकदा केव्हा तरी तिला काही समजून सांगताना तिला मी ‘राणी’ असं म्हटलं तेव्हा तिच्या अंगावर उठलेले रोमांच आजही आठवतात.

एखाद्याविषयीचं प्रेम व्यक्त करण्यासाठी नावांचा किती सुरेख आविष्कार माणूस करत असतो. मीना किंवा मिनलचं मीनू असं जेव्हा होतं तेव्हा त्या मीनूतून मनीमाऊ समोर आलीच पाहिजे. त्या मनीमाऊचे जसे लाड करावेसे वाटतात तसेच या मीनूचेही होत असावेत. हे फक्त स्त्रीच्याचसंदर्भात नाही. अगदी पुरषांच्याही संदर्भात होत असतंच. एखाद्या विनयचं जेव्हा विनोबा होतं तेव्हा हाक मारणारा त्याला बोका ठरवतोय की काय, अशी शंका येऊन जाते. पण त्याही हाकेमध्ये प्रामाणिकपणा भरलेला असेल तर असंही कदाचित ध्यानी यावं की, वयानं मोठी असूनही त्या व्यक्तीला त्या विनयकडून काही मार्गदर्शन, सल्ला हवा असावा.

हे सगळं माझ्या अगदी घनिष्ट वर्तुळातील मंडळींचं. बाहेर काय? तिथंही भावभावनांचा खेळ या संबोधनातून सुरूच असतो. कार्यालयात मी बहुतेकांचा उल्लेख आडनावानंच करतो. अपवादात्मक काहींचा नावानं. त्या नावांची केव्हाही मोडतोड न करता. ही मंडळी डोळ्यांसमोर आली तशी ती दोन स्वतंत्र रांगांमध्येच उभी राहिली. आडनावानं उल्लेख करतो त्यांच्याशी असलेलं नातं केवळ व्यावसायिक असतं. नावानं उल्लेख करतो तिथं निश्चितपण थोडा वैयक्तिक ओलावा असतो. हा भेद करणार कसा? मग लक्षात येतं की, निखळ व्यावसायिक नात्यामध्ये कामापुरतंच सारं काही असतं. नावानं संबोधतो त्यांच्याबाबत मात्र कामाच्याहीपुढं थोडा व्यवहार होत असतो. मग तो त्यांच्या कारकिर्दीविषयीच्या मार्गदर्शनाचा असो किंवा एखाद्या वैयक्तिक बाबीमधलं शेअरिंग असो. याच संदर्भात दुसरीही एक गोष्ट अशीच लक्षात येते. सहसा साहेब किंवा सर या उपाध्या नावाना लागत नाहीतच माझ्याकडून. तिथं आडनावच येतं. तिथं दुरावाही तसाच असतो.

माझे एक वयानं मोठे असणारे स्नेही आहेत. त्यांना मी नेहमी रमेशभाई म्हणतो. एरवी सारेच त्यांना अण्णा म्हणतात. पण माझ्या तोंडून कधीही अण्णा हा शब्द गेला नाही. कधी वाटलंच नाही तसं. या माणसानं मला आमच्या दैनंदिन संपर्काच्या पाचेक वर्षांच्या स्नेहामध्ये मला अशी साथ दिली की, हा माणूस माझ्यासाठी भाईच (नव्या अर्थानं नव्हे; तसल्या भाईंनी हा शब्द बदनाम करून टाकला आहे) राहिला. एरवीही घरगुती नात्यांव्यतिरिक्त अण्णा, दादा ही संबोधनं मला तरी थोडं अंतर राखून ठेवणारीच वाटत आली आहेत.

व्यवहारात माणसं नावाना भाऊ, भाई असंही काही तरी जोडत असतात. मला मोडकभाऊ म्हणणारे बरेच आहेत. मोडकसर तर असतंच. श्रावणभाऊही काही जण म्हणतात. श्रावणसर म्हणणाराही एक मित्र आहे. पण त्याच्या त्या सरमध्ये इंग्रजी सर नसतो. श्रावणातली पावसाची सर ही भावनाच त्यात असते, असा तो उच्चार असतो. त्यात असतं ते माझ्याविषयीचं प्रेम. एरवी माझा साहेब किंवा सर होतो तो फक्त मोडक या आडनावाला जोडूनच. हे आडनाव माझ्यासाठी इतकं सरळ झालं आहे.

आरंभी एका राहूलचं उदाहरण दिलं होतं. त्याच्या नावाचं जे तेच निखिलचं, तेच अभयचंही. आपण ज्यांच्यावर फारसं चिडू शकत नाही, अशा व्यक्तिमत्त्वाची काही मंडळी असतात, त्यापैकीच ही तिघंही. पण यातही राहूल, किंवा निखिलच्या नावाची मोडतोड जशी भावनेनुरूप होईल, तशी अभयची होत नाही. त्याला मी कधी अभ्या म्हटलेलं मला आठवत नाही. पण त्याचं कारण त्याच्या व्यक्तिमत्त्वात दडलेलं आहे. वयानं माझ्यापेक्षा लहान असलेल्या या मुलाच्या बुद्धिमत्तेविषयी, त्याच्याकडं असलेल्या ज्ञानाविषयी मला प्रचंड आदर. त्यातूनच कदाचित त्याचा कधीही अभ्या झाला नसावा. बहुदा हे खरंही असावं. त्याचंही एक कारण आहे. या अभयची माझ्या एका मित्राशी – समीरशी – ओळख करून दिली तेव्हा हा समीरही त्याला काही वेळात अभ्या म्हणू लागला होता. आम्ही तिघंही बऱ्याच लांबच्या प्रवासाला निघालो होतो. प्रवासाच्या अखेरीच्या सुमारास केव्हातरी समीरच्याही लेखी तो पुन्हा अभय झाला होता.

आणि आत्ता ही आठवण झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं, आदर परिपूर्ण असला की नावाची मोडतोड होत नसावी बहुदा. आणि हे ध्यानी आलं त्याचक्षणी मी माझा उल्लेख नावानं न करण्याचं कारणही डोळ्यांसमोर आलं. मला माझ्या नावानं वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासून व्यावहारिक आयुष्यात फारसं कोणी संबोधलेलंच नाहीये. खऱ्या नावाच्या संदर्भात हे मी बोलतोय. घरगुती नाव तर वेगळंच आहे. मग हेही लक्षात आलं की, अरे आपण तर व्यावहारिक जगात एका व्यवसायाचं प्रतिनिधीत्त्व करतोय, ज्याच्याकडं पाहिलं तर नावानिशी कोणी उल्लेख करणं शक्यच नाही. त्यातच त्याच काळात कितीही नाही म्हटलं तरी साहेबी चिकटलेली होतीच. कारण हाताखाली काम करणाऱ्या तीन विभागांतील माणसांची संख्या मोठी. आणि मग हेही लक्षात आलं की, आपली ती प्रतिमाच आपल्याला कोणीही नावानं संबोधित न करण्याचं कारण आहे. पु. लं. नी लेखकाचा लेखकराव होणं याविषयी लिहिलं होतं, त्याची आठवण झाली. आपण अकारणच राव झालो हे समजलं आणि नावानिशी संबोधन न होण्यातून काय-काय गमावलं असावं याचं एक नवं चित्र डोळ्यांसमोर उभं राहू लागलं…!