आठवण

मे 22, 2007

गाव सोडून वीसेक वर्षं झाली असावीत. काल अचानक पुन्हा ते आठवणीत आलं. निमित्त साधंच होतं. एका मित्रासोबत संध्याकाळी गप्पा करीत बसलो होतो. अचानक कानांवर गोवावेस हा शब्द पडला आणि माझं लक्ष तिकडं वळलं.

शेजारच्या टेबलावर काही मंडळी बसली होती. त्यांच्या गप्पातून निसटलेला तो शब्द माझ्या कानावर आला होता. या शब्दाचं आणि माझ्या गावाचं नातं असल्यानं त्यांच्यापैकी कोणी तिथला आहे का याचा कानोसा मी घेऊ लागलो; पण त्यात काही यश आलं नाही. मंडळी काही क्षणात गोवावेशीतून पुन्हा त्यांच्या आज्ञावली, जाल अशा विश्वात रमली.

पण त्या शब्दानं त्याचं काम केलं होतं, मला पुन्हा माझ्या गावात नेऊन सोडलं होतं. मित्राच्या ध्यानी आलं की स्वारी कुठंतरी हरवली आहे. त्यानं शांतपणे मला निरोप दिला. तो गेला आणि पुन्हा मनात तो गोवावेस हा शब्द नांदू लागला. डोळ्यांसमोर वीसेक वर्षांपूर्वीचं तिथलं चित्र उभं राहिलं.

पाठीशी ब्रिज (याला मराठी प्रतिशब्द आहे, पण इथं तो टाकला तर लेखात उल्लेखिलेलं गाव ज्यांना माहिती असेल ते वाचक मला वेड्यात काढतील. कारण त्याला ब्रिज असंच म्हंटलं जायचं, आत्ताही तसंच असावं) घेऊन उभी असलेली ती गोवावेस म्हणजे काही गोव्याची वेस रुढार्थानं नव्हती. गोव्याला जाणारा रस्ता तिथं इतर दोन रस्त्यांपासून वेगळा व्हायचा इतकंच. वेशीतून एक रस्ता जायचा डावीकडं उपनगरांसाठी, दुसरा उजवीकडं दुसऱ्या एका उपनगराकडं जायचा. डावीकडं गेलेल्या रस्त्याला पुढं पुन्हा चार फाटे फुटायचे. एक जायचा तिथल्या बाजाराच्या दिशेनं, दुसरा जायचा तिथल्या प्रसिद्ध अशा एका बेकरीवरून पुढं तयार कपड्यांच्या कारखान्यांच्या वस्तीकडं, तिसरा रस्ता किंचीत डावीकडं वळून फुटायचा तो एका उपनगरात आणि त्यापासूनच आणखी एक रस्ता सरळ निघायचा तिथल्या उच्चभ्रूंच्या वस्तीत आणि तिथून पुढं कॉलेजांकडं पोचायचा. अर्थात, रस्त्यांची ही वळणं तशी अगदी ढोबळच म्हणायची कारण प्रत्येक रस्त्यावरून गल्ल्या निघायच्या. त्या एकमेकीचा हात धरून चालल्यागत असायच्या आणि पुढं त्याच रस्त्याच्या शेवटांना भिडवणाऱ्या एकाद्या सामायीक रस्त्याला जाऊन भेटायच्या. एक वर्तुळ त्यातून पूर्ण व्हायचं.

माझ्या भावविश्वाशी संबंधित मुख्य रस्ते दोनच. एक गोव्याकडं जाणारा आणि दुसऱ्या आमच्या वसाहतीत येणारा. या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये आमचं सारं आयुष्य गुंतलेलं असायचं.

गोवावेशीत येऊन भेटायच्या एकमेकीच्या सख्या असल्यासारख्या वर्षानुवर्षे तिथं नांदणाऱ्या पाच पेठा. प्रत्येकीचं नाव एकेका वारावरून. पहिली सोमवार, ही सर्वात लांब. दुसरी मंगळवार, तिसरी बुधवार, चौथी गुरुवार; या प्रत्येकी क्रमानं थोड्या-थोड्या लहान होत जायच्या. पाचवी शुक्रवार पेठ. ही पुन्हा लांबीची. म्हणजे हिलाच आधी मंगळवार, बुधवार, गुरुवार पेठा भेटायच्या. मग या तिघींनाही हाताला धरून शुक्रवार पेठ उतरायची गोवावेशीत, तिथं तिला सोमवार पेठ येऊन भेटायची. बहुदा त्या तिथं गुजगोष्टी करीत असाव्यात. कारण गोवावेशीत तशी वस्ती नव्हती. त्यामुळं माझ्यासारख्या मुलांचा ताप त्यांना तिथं होत नसावा.

या पाचही जणी गोव्याला जाणाऱ्या रस्त्याला समांतर होत्या. पेठांचं एक टोक गोवावेशीत असायचं. पहिल्या चारही पेठांचं दुसरं टोक शाळांपाशी असायचं. त्या टोकाला दोन प्राथमिक, आणि तीन माध्यमिक शाळा होत्या. गावच्या दोन्ही भाषांसाठी.

बुधवार पेठेच्या शाळेकडेच्या टोकाला व्यायामशाळा होती. तिच्या डोक्यावर बॅडमिण्टन हॉल होता. ज्या इमारतीत या दोन्ही संस्था नांदायच्या, त्याच इमारतीनं प्रभू रामचंद्रालाही आसरा दिला होता. या इमारतींना खेटून होती फक्त मुलींची शाळा. या शाळेच्या पाठीला पाठ लावून मंगळवार पेठेच्या टोकाला येईल अशी होती, मुलांची शाळा. मुलांच्या शाळेला जोडून दुसरी शाळा होती ती मात्र मुला-मुलींची आणि दुसऱ्या भाषेची. तिचं तोंड यायचं ते सोमवार पेठेच्या टोकाशी. या दोन्ही शाळांसाठी एकच सामायीक मैदान होतं. नंतर केंव्हा तरी त्या मैदानाच्या अर्ध्या भागात दुसरी एक शाळा उभी राहिली.

या शाळांचं मैदान संपलं की दक्षिणेला रस्ता आणि पलिकडं एक आमराई. ती आमराई मात्र मुलांना दुर्लभच होती. पक्कं कुंपण तिची राखण करत असायचे. त्यामुळं ते आंबे मुलांनी आंबटच ठरवलेले असायचे. मुलांची अंब्यांची तल्लफ भागली जायची ती तिथलं रेल्वे गेट ओलांडून पुढं गेलं की मग लागणाऱ्या एका सरकारी संस्थेच्या मागं असणाऱ्या आमराईत. त्या संस्थेत लशींचं संशोधन व्हायचं. शाळेच्या अभ्यासेतर अभ्यासाचा एक भाग म्हणून एकदा त्या संस्थेत भेट झाली की मग एरवी बंदिस्त असणाऱ्या त्या संस्थेच्या आवाराच्या कुंपणाला असणारी भगदाडं मुलांना खुणवू लागायची.

शाळांच्या पुढं नैऋत्येकडून वायव्येकडे जाणारी घळ होती आणि तीमधून गेला होता रेल्वेरूळ. सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेस एक एक्सप्रेस धडाडत जायची. या शाळांच्या आधी साधारण फर्लांगभर अंतरावर एक, त्या मागं पुन्हा तितक्याच अंतरावर आणखी एक गेट होतं. तिथं आलं की त्या गाडीचे चालक हॉर्न द्यायचे. कधी-कधी त्या मार्गावरून नेमकी शाळेची दुपारची सुट्टी झालेली असताना `साहेबाची गाडी’ जायची. गेटमधून ती गाडी येताना दिसली की मुलांची टोळी खाली रुळांपाशी जाऊन थांबायची. साहेब आला की त्याला सलाम ठोकण्यासाठी. तो त्याच्या मस्तीत गर्क असायचा. पण मुलांना त्याचं काहीही नसायचं. खाली जाऊन कल्ला करत त्याला सलाम ठोकायचा हेच त्यांच्यासाठी महत्त्वाचं असायचं. थोडं अंतर त्याच्या गाडीचा पाठलागही करता यायचा.

शाळांच्या इमारतींना लागूनच सगळ्या पेठांना जोडणारा एक रस्ता जायचा. बुधवारात्ल्या टोकावर गावातल्या प्रसिद्ध उद्योगपतींचा बंगला दिमाखात उभा असायचा. मंगळवार आणि सोमवार या दोन पेठांच्या मध्ये त्या रस्त्यावर असलेल्या बंगल्यात त्या काळी एक वेडा क्रिकेट शौकीन रहायचा. प्रत्येक कसोटीवेळी (हो, तो काळ झटपट क्रिकेटचा नव्हता) तो बंगल्याच्या गॅरेजमध्ये बसायचा. मोठ्यानं ट्रांझिस्टर लावलेला असायचा. दर पाच-दहा मिनिटांनी तो गॅरेजमधून बाहेर गेटपाशी यायचा आणि तिथं ठेवलेल्या एका काळ्या फलकावर ताजा स्कोअर लिहायचा. शाळेच्या त्या बाजुच्या वर्गांच्या खिडक्यातून तो पाहून मग इतर वर्गात ते आकडे फिरायचे. क्वचित एखादे शिक्षक क्रिकेटप्रेमी असले की, मग हा उद्योग चोरून करावा लागत नसे. तेंव्हाच्या आठवणीतली एक कसोटी आहे कलकत्त्याची (तेंव्हाचे, आत्ता इतर अनेक बदलांप्रमाणे त्याचेही कोलकता झाले आहे). त्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात गावसकर आणि वेंगसरकरने शतके ठोकली होती. त्या दिवशी आमच्या वर्गावर ते क्रिकेटप्रेमी मास्तरच होते. त्यामुळे त्या क्रिकेटवेड्याच्या फलकावरून ती शतकं आमच्या वर्गांनं `पाहिली’ होती.

सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार पेठांच्या त्या टोकाला शाळा होत्या, तशीच एक शाळा शुक्रवार पेठेला गोवावेशीकडच्याच भागात होती. या पेठेला जिथं मंगळवार पेठ भेटायची त्या कोपऱ्यातून एक पाच-सहा फुटी पायवाट उत्तरेच्या दिशेनं निघाली होती. तो कोपरा त्याकाळी अनेक मुलांचा नाजूक कोपरा होता. त्या पायवाटेवरून पुढं गेलं की तिचा प्रवेश व्हायचा डीपी हायस्कूलमध्ये. डी म्हणजे डिव्हाईन आणि पी म्हणजे प्रॉव्हिडन्स. पण ती माहिती त्याकाळी कोणाच्याही दृष्टीनं फारशी महत्त्वाची नसणार. कारण ती शाळा फक्त मुलींची होती आणि इंग्रजी माध्यमाची, हे महत्त्वाचं असायचं.

गंमत अशी की, पायवाटेचा एक भाग त्या शाळेच्या आवारात प्रवेश करीत असला तरी दुसरा तिथून पुढं शेतात निघायचा. त्या शेतात मारुतीचं एक मंदीर होतं. तिथं कोणी जायचंही नाही. सारे थांबायचे त्या `नाजूक’ कोपऱ्यावर. ती शाळा सकाळी इतर शाळांच्या आधी सुरू व्हायची. नऊच्या सुमाराला तो कोपरा गजबजू लागायचा. तेव्हढ्या लवकर तिथं इकडच्या शाळांची मुलं कशी येतात, हे कोडं उलगडलं तेंव्हा अनेकांना कळलं की `शाळेत आधी जाऊन अभ्यासही करायचा असतो’. इतका अभ्यास करणारी ती मुलं नंबरात मात्र कशी येत नव्हती हे कोडं उलगडण्याचं कारण आमच्यापुरतं राहिलेलं नव्हतंच. संध्याकाळी ती शाळा लवकर सुटायची तेंव्हाही आपले शेवटचे खेळ किंवा भूगोल असले तास बुडवून तिथं येणारे महभागही होतेच. मुलं रस्त्याच्या या बाजुला आणि शाळेच्या मुली त्या बाजूंनी जाताहेत हे दृष्य करमणूक करणारं असायचं. रस्ताही ओलांडण्याचं धाडस त्यांच्यातील कोणी केलं नसावं. ही मुलं मग शाळेत आली की त्यावरून त्यांची माफक चेष्टाही व्हायची. रस्त्याच्या या बाजूला ही मुलं आणि तिकडच्या त्या बाजूला मुली असा हा एकतर्फी मामला अखेर अपेशीच ठरायचा हे नक्की.

`डीपी’पाशी डाळ न शिजलेली मुलं मग काही काळानं, या सगळ्या पेठांना मधोमध जोडणाऱ्या रस्त्यावर संध्याकाळी तेंव्हाच्या ताज्या स्टाईलीत भांग पाडून फिरताना दिसत. हा जोडरस्ता गोव्याला जाणारा रस्ता ओलांडून कॉलेजांकडे जायचा. गोवा रस्त्यापासून या रस्त्यावरून चालत सुटायचं आणि थेट शुक्रवार पेठ जिथं सुरु होते त्या रेल्वे गेटपाशी यायचं. तिथं भाजीबाजाराच्या आवाराला लागून असलेल्या पटांगणात पावभाजी मिळायची. ही `बाळूची पावभाजी’ त्या काळात अनेकांना चटक लावून गेली (तिचा आस्वाद फारसा न मिळलेल्यांना तिनं चटका लावला होता). पावभाजी खायची आणि, किंवा आधी, पुढं जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायचं. मुलांची ही धार्मिकता तेव्हढ्यापुरतीच असायची. कारण त्या चालण्याचं लक्ष्य काही साईबाबा नसायचे, रस्त्यात दिसणारे चेहरे हेच अनेकांचं लक्ष्य असायचं. त्यामुळं ती धार्मिकताही चेष्टेचा विषय व्हायची. `साईमंदिरात जाणं’ याला छद्मी अर्थ प्राप्त झालेला तो काळ होता.

बुधवार पेठ जिथं संपायची तिथं तिच्या आणि मंगळवार पेठेच्या मध्ये एक बाग आहे. `वाघ-सिंहांची बाग’ ही तिची ओळख तिच्या `महात्मा गांधी उद्यान’ या नावावर अन्याय करणारी आहे हे काही कोणालाही जाणवलंही नसावं. वाघ-सिंह काही खरे नव्हते. वाघ, सिंह, हत्ती, गवा आणि आणखी एक कसलासा प्राणी यांच्या चेहऱ्यांचे मोठे मुखवटे सिमेण्टनं वर्तुळाकार बांधून काढलेले होते. मधल्या वर्तुळात वाळु टाकलेली असायची. प्रत्येक प्राण्याच्या चेहऱ्याच्या पाठीमागे ठेवलेल्या भगदाडातून आत शिरायचं, तोंडातून बाहेर आलं की वाळुवर खेळायला मोकळे. बाग मोठी होती. तिच्या दुसऱ्या टोकाला एक महाकाय कासव बांधलेलं होतं. आतून पोकळ. लपंडावासाठी उत्तम. लहान मुलं त्या बागेत आधी या प्राण्यांच्या माध्यमातून खेळायची, लपंडाव वगैरे. वय वाढलं की त्याच बागेतल्या अंब्याच्या आणि चिकुच्या झाडांकडे त्यांचं लक्ष जायचं. फळांच्या हंगामात बागेच्या माळ्याला चुकवत झाडांची लूट व्हायची. काही पराक्रमींनी तर लोणच्याच्या कैऱ्यांचा खर्च त्या बागेतूनच वाचवलेला असायचा. फळांचा हंगाम नसेल तेंव्हा मात्र त्या झाडांच्या आधारानं इतर खेळ चालायचे. अभ्यासासाठी गर्द सावलीही ती झाडं द्यायची, त्यामुळं त्या पेठांमध्ये राहणाऱ्या मुलांचं आणि त्या झाडांचं नातं घट्ट विणलेलं असायचं. अशीच एक बाग बुधवार आणि गुरूवार पेठांच्या मध्ये वाघ-सिंहांच्या बागेच्या विरुद्ध टोकाला होती. तिथं मात्र असलं काही आकर्षण नव्हतं. त्यामुळं नुसतीच जाऊन बसण्यासाठीची किंवा फक्त लेकुरवाळ्या माऊल्यांनी कडेवरच्यांना आणण्याची ती बाग झाली होती. तिची कळाही साहजिकच तशीच असायची. झाडं वगैरे फुललेली असायची, पण ते फुलणंही उदास वाटायचं.

या बागेच्या शेजारी एक बंगला होता. तो होता क्लब. पण तिथं प्रवेश फक्त मोठ्यानाच. बाहेर टेनीसची दोन कोर्ट होती. त्यांचंच दर्शन काय ते व्हायचं. तिथं खेळणाऱ्यांच्या हाती असलेल्या टेनीस बॉलची संख्याच मुलांना अचंबीत करून जायची. त्या बंगल्यात काय चालतं हे कुतुहल काही त्या वयात कधीच शमलं नाही.

शुक्रवारात कलामंदिर होतं. नाव कलामंदिर, पण तिथं तसे कलेचे कार्यक्रम म्हणजे हिंदी वाद्यवृंदांचेच कार्यक्रम व्हायचे. आणखी एक कार्यक्रम तिथं दर वर्षाचं आकर्षण असायचा, शरीरसौष्ठव स्पर्धा. कलामंदिराशेजारी एक चित्रपटगृह होतं. त्याच्या पुढं डीपी हायस्कूलपर्यंत शेत पसरलं होतं. ताजे फ्लॉवर आणि कोबी तिथून मिळायचे. त्या भाज्या आणायची जबाबदारी मुलांवर अगदी निकर असेल तरच यायची, कारण खरेदी करून आणताना मुलं त्या भाज्या कच्च्याच खात यायची. घरी पोचेतो किलोभर भाजी फक्त पाऊण किंवा अर्धा किलो शिल्लक राहिलेली असायची.

या सगळ्या पेठांमधील बंगल्यांमध्ये किमान थोडी तरी मोकळी जागा असायची. एक – दोन अपवाद सोडले तर ते बंगले लोकांनी गजबजलेले असायचे. कारण त्यांना बंगले म्हंटलं तरी तिथं नांदायची ती वाडा संस्कृतीच. म्हणूनच तर तिथल्या प्रत्येक मुलाच्या, आणि मुलीच्याही मनात, आपल्या पेठेविषयी एक आपुलकीचा भाव असायचा. तुझी पेठ श्रेष्ठ की माझी हे वाद त्या पेठांनी कितीकदा ऐकले असतील त्याची मोजदादही नसावी. ही श्रेष्ठत्त्वाची चुरस दिवाळीत होणारे किल्ले, एरवी केंव्हाही रंगणारे क्रिकेटचे सामने, होळी आणि वर्षाअखेरीला होणारा `ओल्ड मॅन’ जाळण्याचा कार्यक्रम यातूनही व्यक्त होत असायची. मग त्यातून काहीवेळा खुन्नसही व्हायची आणि पुन्हा सारं विसरून मुलं एक यायचीही. मुलींचे असे वेगळे सोहळे मात्र आता आठवणीतून निघून गेले आहेत. हादगा एक असावा, आणि क्वचित भातुकली.

दिवस निघून गेले तसं तिथलंही वातावरण बदलू लागलं. बंगल्यांची जागा अपार्टमेण्ट घेऊ लागल्या. मुलांमधला एकजिनसीपणाही नंतर संपत गेला. बहुदा अनेक मुलंच तिथून उठून बाहेर गेली. जी राहिली ती त्यांच्या-त्यांच्या व्यापांमध्ये. पुढच्या पिढ्यांसाठी इतर साधनं आली करमणुकीसाठी तसा तिथला जिवंतपणाचं स्वरूप बदलून गेलं.

काही दिवसांपूर्वी तिथं गेलो होतो. शुक्रवार पेठेतून आधी चक्कर मारली. तिथं असलेल्या चित्रपटगृहाची जागा आता एका व्यापारी संकुलानं घेतली होती. समोर एक बारही आला होता. वाघ-सिंहांच्या बागेतली झाडं म्हातारी झाल्यासारखी दिसत होती. वाडेवजा असणाऱ्या बंगल्यांची जागा अपार्टमेण्टनी घेतली होती. त्या पेठा तेंव्हा आपल्याच वयाच्या मैत्रिणींसारख्या वाटायच्या, आता मात्र त्या अपार्टमेण्ट अंगावर वागवताना प्रौढ कुमारिका वाटत होत्या. त्यांचं वय वाढलं असावं असा विचार मनात आला तेंव्हाच लक्षात आलं, अरे आपलंही वय वाढलंच आहे की!

Advertisements

नदी

मार्च 29, 2007

त्या धरणावर ज्या-ज्या वेळी गेलो त्या-त्या वेळी न चुकता मी तो उंचवटा गाठायचो. धरणाची भिंत जिथं सुरू होते, तिथंच तो होता. तिथं थांबलं की नदी अशी सामोरी यायची. तिथून तिचं दर्शन घेण्याची उर्मी मला कधीही आवरता आली नव्हती. जितक्या वेळेस इथं आलो त्या प्रत्येक वेळी ही इच्छा मी हट्टानं पूर्ण करून घ्यायचो. याहीवेळी अपवाद होणार नव्हता. मला जायचं होतं पुढं गावांमध्ये. तरीही वाट थोडी वाकडी करून मी तिथं गेलोच.

असं म्हणतात की, तिच्या केवळ दर्शनानंच पापक्षालन होते. मी त्यावरून गंमतही करायचो. वर्षाकाठी एक-दोनदा इथं येऊन तिचं दर्शन घ्यावं म्हणजे पापक्षालन होईल आणि आपण पुन्हा नवी पापं करण्यास सज्ज होऊ, असं म्हणायचो. `बदमाष आहेस,’ असा एका मित्राचा रागही त्यावरून मी झेलला होता. ती नदी काहीतरी करायची हे नक्की. कारण इथं येऊन गेलं की मी ताजातवाना व्हायचो. उत्साह यायचा नवं काही करायला.

पहिल्याच भेटीत या नदीशी काही नातं जुळल्यासारखं झालं होतं. असं वाटायचं की तिच्याशी आपल्याला बोलता येतं. ती आपल्याला तिची कहाणी सांगते. कहाणी मी वाचलेली असायची. इथं नदीपाशी आलो की ते शब्द मनात जागे व्हायचे आणि नदीच्या रुपानं, तिच्या प्रवाहाच्या खळखळाटातून माझ्याशी बोलू लागायचे. तिची वळणं मला त्या कहाण्यांतील तिच्या जीवनप्रवासातील चढ-उतारांची याद द्यायची.

तिची सगळी वळणं दोनी बाजूना असणाऱ्या पहाडांमुळं होती. पहाड फोडूनच ती बाहेर पडते, असं म्हंटलं जायचं. धरणाच्या बाजूनं प्रवास सुरू करून मागं जाऊ लागलो की ते किती खरं आहे हे पटायचं. डाव्या बाजूचा पहाड उंचीनं कमी होता तर उजव्या बाजूचा तसा थोडा मोठा.

मागच्या दिशेनं प्रवास सुरू झाला की डोळ्यांपुढं एक प्रतिमा नेहमी उभी रहायची. विवाहाच्या प्रसंगी मामा आणि वडील किंवा भाऊ यांच्या मधून अधोमुखानं येणारी वधू! हे दोन्ही पहाड त्याच भूमिकेत असावेत असं वाटायचं. नदीही तशी अधोमुखच वाटायची; फक्त त्या वधूच्या चालीत असणारा संथपणा मात्र इथं नसायचा. एवितेवी ती नदी तिच्या जीवनसाथीला, म्हणजेच सागराला, भेटण्यासाठीच असोसून निघालेली एक कहाणी होतीच. तिची त्यासाठी तिच्या बहिणीशीच स्पर्धा होती, असंही ती कहाणी सांगायची. त्यामुळं तिचं चालणं नसायचं तर धावणंच असायचं. त्या कहाणीत त्या पहाडांना तशी काही भूमिका नव्हती; पण इथं मात्र ते वधूला घेऊन येणाऱ्या मामा आणि वडील किंवा भावासारखे भासायचे.

धरणाच्या आणखी थोडं पुढं गेलो की नदीनं डावीकडं घेतलेलं एक बाकदार वळण होतं. ते घेतलं की पुढं उजवीकडं डोंगरातून टुमदार घरं डोकं वर काढायची. एकाद्या लहान मुलाला `भुक’ करण्यासाठी आपण दरवाजामागून जितकं डोकं बाहेर काढू तेवढीच. पुढं गेलं की ती मोठी होत जायची आणि डोळ्यांसमोर गाव उभा राहायचा. घरं, शेतं दिसायची. क्वचित आपण नशीबवान असलो तर ढोल वाजवत, पावे फुंकत फेर धरून सुरू असलेला निसर्गाच्या मुलांचा मन गुंगवून टाकणारा नाचही दिसायचा. ती गावं आणि ते जीवन म्हणजे त्या पहाडांची आभूषणंच. अगदी विवाहाप्रसंगी जशी गळ्यांत साखळी असते, बोटात अंगठ्या असतात तशीच.

प्रवाहात मधूनच महाकाय कातळ डोकं वर काढून बसलेले असायचे. त्यांचं एक असायचं. नेहमीच. `या, बसा’ हे आमंत्रण! त्यामुळं आपण केंव्हाही त्यांच्या अंगावर स्थानापन्न होऊ शकायचो. एकाद्या नातवानं लाडात येत आजोबांच्या पोटावर बसावं तसं. बसूनच आपला त्यांच्याशीही संवाद व्हायचा. तेही सांगायचे मग तिची कहाणी. बसल्याबसल्याच आपण एकादा खडा तिच्या पात्रात फेकला की मग जी आवर्तनं सुरू व्हायची ती लांबपर्यंत जाताना आपलं लक्ष वेधून घ्यायची. सूर्यही मावळताना तिच्या पात्रात आपलं प्रतिबिंब टाकून जायचा. त्याच्याकडं थेट पाहण्यापेक्षा ते प्रतिबिंबच पाहाण्यासारखं असायचं. `प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ची ती वेगळीच अनुभूती असायची.

नदीचा उगमापासून इथंपर्यंतचा प्रवास हजार-एक मैलांचा तरी असावा. अशा प्रवासानंतर येणारा थकवा तिच्या हालचालीत कुठंही दिसायचा नाही. वेग तोच, आवेगही तोच. पण या थकव्यानं चेहऱ्यावर एक संयत भाव आणलेला असतो. तो इथं दिसायचा तो तिच्या पात्राच्या आटोपशीरपणात. पात्र होतं आटोपशीर, पण त्याची खोली वरूनही जाणवायची. ती खोली म्हणजेच तिची प्रगल्भता असावी. प्रगल्भ माणसं जशी पहिल्याच दर्शनात तुमच्या मनत एक कायमचा ठसा उमटवून जातात, तशी ती नदीही ठसा उमटवून जायची.

पहिल्या दर्शनानं निर्माण केलेल्या तिच्या या प्रतिमा नंतर मात्र टिकल्या नाहित.

धरण पूर्णत्वाकडं चाललं होतं. मागं नदीचा मूळ प्रवाह आता कोणालाही समजणार नव्हता. कारण साठलेल्या पाण्यालाच इतका फुगवटा आला होता की, नदीचं मूळ पात्र जितकं होतं त्याच्या दहा पट तरी त्या फुगवट्याची रुंदी झाली होती.

धरणाची भिंत जशी-जशी वर सरकत गेली होती, तसा तिच्या प्रवाहातील जीवंतपणा कमी-कमी होत गेला. बांधच घातला म्ह्टलं की ते होणारच होतं. पण मला त्याचं अधिक वैषम्य वाटायचं ते तिच्या त्या थांबण्यानं तिचा माझ्याशी होणारा संवाद थांबत जातोय यामुळं. तिचा तो मीटर-मीटरनं होणारा `मृत्यू’ मीही सोसतच होतो.

आजही मी जसा त्या उंचवट्यावर गेलो तसं वेगळं काहीही झालं नाही. तिचं माझ्याशी बोलणं आणखी काही काळानं खुंटणारच होतं. ते वास्तव मला स्वीकारावंच लागणार होतं. कदाचीत त्याचीच मानसीक तयारी आपली बदलती रूपं दाखवून ती माझ्याकडून करून घेत असावी. तिचं रूप बदललं होतं. सळसळ किंवा पहिल्यांदा अनुभवलं होतं ते चैतन्य आता दिसत नव्हतं. मला माझ्या आजीची आठवण झाली. आजोबा गेल्यानंतर हिनं एकटीच्या जीवावर सारं काही केलं होतं. शेताचा खटला एकटीनं लढवला होता. त्याच्या कथा ऐकल्या होत्या. नंतर आमचे लाड करताना तिला पाहिलं होतं. कष्ट उपसून आम्हा नातवंडांचा आनंद आपल्या नजरेत साठवून घेतानाही तिला अनुभवलं होतं. या नदीचं पहिलं दर्शन तसं होतं.

अखेरच्या दिवसात आजी एकदम शांत झाली होती. अनेकदा ती मोजकंच बोलायची. नदीचं आत्ताचं रूप तसं होतं. ती शांत होती. निशब्दही. पण अजून प्राण होतेच. ते जाण्याची वेळ आली नव्हती. ती येण्यास अजून किमान चार वर्षं आहेत हे मला महिती होतं. तिला ते माहित होतं का? असेलही कदाचित. तिनं ते मला काही बोलून दाखवलं नाही. माझीच काळजी ती अधिक करत असावी, म्हणून. तिचा तो हळुहळू होत जाणारा मृत्यूच मी पचवू शकेन असं तिला वाटत नसावं. एकदम मृत्यू सहन करणं कदाचित मला शक्य झालं नसतंही.

आजी गेली तेंव्हा मी त्या नदीच्या किनारीच होतो. आजी गेल्याचं मला तिथं माहितही होणं शक्य नव्हतं. त्यावेळी नदीनं एक वेगळं रूप दाखवलेलं मला आठवतंय. कधी नव्हे असा पाऊस त्या काळात झाला होता. एरवीही पावसात तिला पूर यायचाच. पण यावेळी गोष्ट थोडी वेगळी वाटली मला. धरण पूर्ण होणार हे आता नक्की झालं होतं. त्यामुळं तो पूर वेगळा होता. महाप्रचंड वृक्ष वाहून आणताना ती भयंकर वेगानं सुसाट सुटली होती. तिचा तसा वेग पूर्वी कधीही मी अनुभवला नव्हता. सागराला भेटण्याची जणू ही शेवटची संधीच असेल हे, हे तिला कळलं होतं. पुढच्या वर्षीपासून ही भेट शक्य होणार नव्हती. धरण तिला त्याच्यापासून तोडणार होतं; कायमचंच! त्यामुळेच शक्य तेवढ्या लवकर सागराच्या कुशीत जाऊन पडण्याची तिची तगमग त्या सुसाट वेगामागं असावी. तिची ती असोशी समजून घेण्यापलीकडं माझ्या हातीही काही नव्हतं. कहाण्यांमध्ये तिच्या बहिणीनं तिला हरवलं होतं. आता पुन्हा हार डोळ्यांसमोर होती. ही हार तर कायमच्या ताटातुटीची होती. तेही त्या आवेगाचं एक कारण असावं.

तिथून परतलो आणि आईच्या पत्रातून आजी गेल्याचं कळलं. मला पुन्हा त्या नदीपाशीच जावंसं वाटत होतं; पण ते शक्य नव्हतं.

आत्ता मी तिथं पुन्हा गेलो; असं कळलं की तेंव्हा अनुभवलेला तिचा वेग गेल्या काही वर्षात कायम होता. ती त्याच वेगानं तिच्या लाडक्या सागराकडं जात होती. यावेळी तिची आणि त्याची कायमची ताटातूट झाल्याचं दु:ख तिच्या अंगांगांवर दिसून येत होतं. ती ताटातूट होती. काही काळाचा विरह नव्हता तो. तिच्या नि:शब्द असण्यातून तेच कळायचं. बोलणं तिला शक्यच नव्हतं. मी कितीही प्रयत्न केला तरीही. वीस वर्षांच्या झुंजीत तिला हार पत्करावी लागली होती आणि थकून नि:शब्द होत तीही थांबून गेली होती. सतरा वर्षांपूर्वी सुरू झालेला माझा एक संवादही थांबून गेला होता.

आता पुन्हा तिथं जाताना मी, नि:शब्द राहण्याचीच तयारी ठेव, असं मनाला बजावतो. ते ऐकून घेतं आणि मग स्वतःशीच बोलत बसतं, तिच्याशी झालेले संवाद स्वतःलाच सांगत बसतं!


नर्मदाई

मार्च 29, 2007

सकाळी सात वाजता जीपने गरुडेश्वराचा पूल ओलांडला आणि ती उजवीकडे वळली. पुढं गरुडेश्वराचं मंदीर होतं आणि मंदिराखालीच घाट. आम्ही खरं तर रेस्ट हाऊसवर जाणार होतो; पण पुलाखालून वाहणारी नदी पाहताच जोडीदार मूडमध्ये आला. त्यानं जीपवाल्याला गाडी मंदिरापाशी लावण्यास सांगितली. मी त्याच्याकडं पाहू लागलो.

`चल, जरा पोहून घेऊ; रेस्ट हाऊसच्या साचलेल्या पाण्यापेक्षा इथंच छानशी आंघोळ होऊन जाईल.’

प्रवास सुरू करून आठ तास झाले होते. अंगं आंबली होती; त्यामुळं आंघोळ आवश्यकच होती. रेस्ट हाऊसवर कसं तेवढीच पटकन झाली असती. इथं ही सगळी पोहत बसणार. मला पोहता येत नाही. त्यामुळं असले छंद करणं शक्य नव्हतं. पुढचं गाव गाठायचं असल्यानं थोडी घाईही होती. माझ्या चेहऱ्यावर नाराजीची रेष उमटली असणार. तो म्हणालाच, `तू पोहू नकोस. काठावर बस आणि बूडबूड कर. आम्ही जरा पोहतो.’

माझी तयारी नव्हतीच; पण त्याच्या सुरात इतरांनीही सूर मिसळताच मी अल्पमतात गेलो आणि मान तुकवावीच लागली.

तासाभरानं आम्ही तिथून निघालो आणि मैलभर अंतर कापून एका टपरीवर गाडी थांबवली. कांदापोहे आणि चहा झाला आणि पुन्हा गाडीचे गियर टाकले. अर्ध्या तासानं धरणाची भिंत दिसू लागली. तिच्या अलीकडूनच आम्हाला पुन्हा नदी ओलांडायची होती. पण आता माझ्या मनात त्यांच्या पोहण्याचे उट्टे काढण्याचा विचार आला होता. मला माहित होतं की, त्या तिघांनाही गावात जाण्याची घाई असणार. मी म्हणालो,

`गाडी सरळ पुढं साईटवर घेऊया आणि थोडं काम पाहून मग मागं येऊन गावात जाऊ.’

बहुमत त्यांचं असलं तरी त्यांना माझं ऐकावंच लागणार होतं. कारण गावातला त्यांचा एकप्रकारचा मध्यस्थ मीच होतो. मला `नाराज’ करून चालणार नव्हतं. त्यामुळं स्वतः थोडं नाराज होत त्यांनी होकार भरला.

धरणाच्या अलीकडं काही अंतरावर आम्ही थांबलो. काम वेगात आलं होतं. सहा महिन्यांपूर्वी मी आलो होतो तेव्हापेक्षा आता भिंत चारेक मीटरनं उंचावली होती. भिंत जिथं सुरू होते त्याच्या अलीकडं एक उंचवटा होता. तिथं थांबलं की मागं नदी दिसायची. तिच्याकडं पहात मी विचारात पडलो. आठवणी होत्या तिच्या वेगवेगळ्या रूपाच्या. इथं आलं की असं व्हायचं माझं. हा नेहमीचाच अनुभव होता. जोडीदारानंच मला त्या `ध्याना’तून बाहेर काढलं.

`काय विचार करतोयस?’

मी फक्त मान डोलावली. पण त्यानं हट्ट सोडला नाही.

`सांग मला काय विचार करतोयस त्याचा.’

`अरे काही नाही; या नदीची बदलती रूपं आठवत होतो.’

मी थोडक्यातच उत्तर दिलं आणि त्यानंही पुढं ताणलं नाही. आम्ही मागं फिरलो. गाडीनं धरणाला डावीकडं ठेवून त्याच्या भिंतीवरून वाहात येणारा प्रवाह ओलांडला आणि ती पुढं जंगलात शिरली. मग डावीकडं वळली. रस्ता कच्चाच होता. अलीकडंच तयार केला होता. गावं उठवायची असल्यानं. फोर-व्हील क्षमता असलेल्या गाड्याच जाऊ शकत अशी अशक्य वळणं आणि चढ-उतार त्यावर होते. असं पंधरा किलोमीटर अंतर आम्हाला कापायचं होतं. रस्त्याच्या एका बाजूला दरी, कधी ती डाव्या हाताला यायची तर कधी उजव्या. दुसऱ्या बाजूला वर सरकत गेलेलं जंगल. दिवस उन्हाळ्याचे असल्यानं झाडोरा विशेष दिसत नव्हताच. त्यामुळं जीपही तापू लागली होती. अधुनमधून नदीचं दर्शन व्हायचं. एकाद्या डोंगरावर पूर्ण उंचीवर गेलं की तिचं पात्र अगदी छोटं दिसायचं. खाली उतरू लागलं की ते विस्तारत जायचं. चालकाची सुकाणूशी कसरत सुरू होती. मार्ग काढणं म्हणजे काय याचा तो शब्दशः अनुभव घेत होता.

सव्वा तासानं आम्ही देवनदीत प्रवेश केला. आता तिथं पाणी नव्हतं, त्यामुळं पात्रातून जीप जात होती. एरवी जीप अलीकडंच थांबवायची आणि नदी ओलांडून गावात शिरावं लागायचं.

गाव उदास होतं. सगळीकडं हालचाल होती ती फक्त घरं उठत असल्याची.

वेशीवर असलेल्या शूलपाणेश्वर मंदिरापाशी जीप थांबली. आम्ही उतरलो. मंदिराच्या पाठीमागं दोनेकशे फुटांवर `ती’ उभी होती: नर्मदाई! साधारण तीनशे फुटांचा तिचा विस्तार होता. तिची उभारणी झाल्याचा अनुभव काही मी घेतला नव्हता. चारही बाजूंनी भिंत शाकारलेली होती. बहुदा त्या भिंतीत तिथं मिळणाऱ्या प्रत्येक झाडाची एकेक फांदी असावी. छतातही तिथं मिळणाऱ्या प्रत्येक पानाचा आणि गवताचा सहभाग असणारं. गावकऱ्यांनी श्रमदान करून ते घर उभारलं होतं हे मात्र मला माहित होतं. तिच्या डोक्यावर एक झेंडा डोकं वर काढत असे. तिला ओळखण्याची खूण तो झेंडाच होता. तिथं आमच्यातील प्रत्येकानं एकदा तरी वास्तव्य केलं होतंच. तिच्या जिवंतपणाचं लक्षण म्हणजे तिचं अस्तित्व होतं. `ती’ आहे याचा अर्थ अजून सारं काही संपलेलं नाही, असं सारेच मानायचे. गावकरीही आणि त्यांना उठवू पाहणारं सरकारही.

ती उभी होती ते पाठिशी राईनीचं एक भरगच्च झाड घेऊन. हे झाड पाहताक्षणी लक्ष वेधून घ्यायचं. त्याचा घेर मोठा होता हे तर त्याचं कारण होतंच शिवाय त्या घेराचा आकारही. अगदी आखल्यासारखं ते झाड वर्तुळाकार फेर धरून होतं. फांद्या जमिनीपासून पाच फुटांपर्यंत होत्या. गेली चार वर्षं मी ते झाड तसंच पाहात होतो. उन्हाळ्यात त्याच्या सावलीत पहुडून वातानुकूलन यंत्रालाही लाजवेल असा गारवा मी अनुभवला होता. त्यामुळं ते झाड माझ्याच नव्हे तर तिथं येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेलं आहे हे मला ठाऊक होतं.

त्या झाडाशी नातं जुळायला कारणीभूत मात्र `ती’ होती. तिथं गावकऱ्यांचं सारं काही होतं. कार्यकर्त्यांचंही. तिथं बसून कितिक ठराव झाले असतील याचि मोजदाद नव्हती. तिच्या समोरच रंगलेल्या नाचांनी अनेकांची मनं प्रसन्न केली होती. तिथं गाजलेल्या ढोलांचा आवाज अगदी भरून राहिलेला असायचा. आपल्या ऐक्याची ताकद दाखवण्यासाठी झालेल्या होळीचीही ती साक्षी होती. सारं काही ती साक्षीभावानंच होऊ देत असावी. पण एक होतं. ती होती, ही बाबच ती एकजूट टिकवून धरण्यास, त्यांचा निर्धार हर आव्हानासमोर तितकाच कडवा करण्यास जबाबदार होती. ती जबाबदारी तिच्यावर कोणीही लादलेली नव्हती. तीदेखील ती जबाबदारी आपलं कर्तव्यच असल्यासारखं मानून पार पाडत होती.

डावीकडं खाली शंभर-एक फुटांवर नदी होती. किनाऱ्यावर काही मुलं खेळत होती. मंदिराच्या पाठीमागं पोलिसांचे तंबू होते.

गावातील घरं काढून घेण्याची प्रक्रिया सुरूच होती. आम्ही होतो त्या भागात आता केवळ तीन घरं होती आणि `ती’ होती. गावात एक चक्कर मारून आम्ही परतलो. थोडं लोकांशी बोलणंही झालं.

आम्ही आधी मंदिरात शिरलो. मला माहिती होतं की किमान तीन वरिष्ठ अधिकारी गावात आहेत. ते मंदिरात असावेत हाच माझा अंदाज होता. तो खराही ठरला. आम्हाला पाहताच त्यांच्यातले जिल्हा पोलीस प्रमुख पुढं आले. सोबत होते एक विशेष महानिरिक्षक आणि एक सचिव. आमच्या गप्पा सुरू झाल्या. चर्चेचा विषय वळला तो पाठीमागच्या टेकाडावर दिसणाऱ्या घरांकडं.

`आम्हाला घाई नाही ती घरं काढण्याची. पहिलं प्राधान्य असेल ते इथली घरं हलवण्याला…’ ते सांगू लागले. आम्ही ऐकू लागलो.

`इथं सगळंच शांततेत चाललं आहे असं दिसतंय. तरीही तुम्ही इथं कसे?’ माझ्या जोडीदारानं विचारलं.

`शांतता आहे म्हणूनच तर आलो. लोकांना काय म्हणायचं आहे ते याचवेळी नीट समजून घेता येतं.’ त्यांच्यातल्या एकानं उत्तर दिलं.

`काय-काय समजून घेता आलं?’ मी थोडा खवटपणा केला. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

`खरं तर तुम्ही ज्याला शांतता म्हणताय ती का आहे हे समजून घ्या, म्हणजे आम्ही काय समजून घेतलंय ते कळेल.’ ते म्हणाले. माझा डाव साध्य झाल्यासारखाच होता. त्यांना मला डिवचायचं होतं आणि ते डिवचले गेले होते. त्यामुळं मी गप्प बसलो.

अर्धा-एक तास आम्ही बोलत होतो. आता त्यांच्यात थोडी अस्वस्थता आली होती. काही क्षण गेले आणि सर्वात आधी आम्हाला सामोरे आले होते, ते अधिकारी पुढं आले.

`पुढं कुठं जाणार आहात?’

इतर कोणी काही बोलायच्या आत मी उत्तरलो, `छे, छे! कुठंच नाही. इथंच. मग परत कॉलनीत.’

त्यांनी मग त्यांच्या वरिष्ठांकडं मोर्चा वळवला. `साब, खाना…’ त्यांनी घास घेण्याची खूण करत त्यांना विचारलं. माझ्या लक्षात आलं की आमचं बोलणं आता संपवावं याचीच ती खूण आहे. त्यांच्या साहेबांनी मान डोलावलीही, तोवर आम्ही उठलो.

आमचा निरोप घेण्यासाठी ते बाहेर आले. आमच्या पोटात कावळे ओरडू लागले होते, त्यामुळे कॉलनीकडं जायची घाई आम्हालाही होती.

`परत कधी निघणार आहात?’ त्यांनी विचारलं.

`नक्की नाही. तुमच्यावरच अवलंबून आहे.’ मी उगाच टोला टाकला.

`आम्ही कोण तुम्हाला रोखणारे?’ हसत-हसत ते म्हणाले. मीही तो विषय तिथंच संपवला.

आम्ही निघालो. दुपारी साडेतीनच्या सुमारास कॉलनीत पोचलो; आधी पोटपूजा केली आणि मग ताणून दिली.

दोनेक तासांच्या विश्रांतीनंतर उठून आम्ही फोन करण्यासाठी बाहेर पडलो. मुख्य बाजारात आलो. फोन हुडकत असतानाच तो दिसला. आधी कधीही आमची आणि त्याची भेट झाली नव्हती. बोलणं झालं होतं ते फोनवरच. त्याच्या वेषावरून मला शंका होती की हा तोच असावा. फोन असलेल्या दुकानातच तो बसला होता.

पुढं होत मी त्याचं नाव घेतलं. त्यानं माझ्याकडं पाहिलं. क्षणभरात त्यालाही ओळख पटली असावी. फोनवर आम्ही इतका संवाद साधलेला होता की, खूप जुने मित्र असल्यासारखे आम्ही भेटलो. मी माझ्या जोडीदारांची आणि त्याची ओळख करून दिली.

`केंव्हा आलात? बरं झालं तुम्ही भेटलात ते. मोठी घडामोड आहे.’ तो म्हणाला.

आमचे चेहरे प्रश्नचिन्हांकीत झाले. काय घडलं असावं, हाच प्रश्न प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता. तरीही मी म्हणालो, `सकाळीच आलो. गावात गेलो होतो. काय हालचाल?’

`अरे, आपली नर्मदाई आज पाडली सरकारनं.’

मी उडालोच. तीच स्थिती माझ्याबरोबरच्या प्रत्येकाची होती. दुपारीच आम्ही तिला डौलानं उभी असलेली पाहिली होती. झेंडाही फडकत होता. तिचं असणं कसं महत्त्वाचं होतं याची आवर्तनं प्रत्येकाच्या मनात होऊन गेली होती. आणि हा सांगतोय की ती आता नाहिये?

`काय सांगतोयेस? केंव्हा?’

`आत्ताच, तासापूर्वी पाडून पूर्ण झाली.’ मग त्यानं त्या तीनही अधिकाऱ्यांची नावं घेतली आणि प्रत्यक्ष त्यांच्या नजरेखाली ही कारवाई झाली ते सांगितलं.

`केंव्हा सुरू केलं पाडायला?’

त्यानं वेळ सांगितली; आम्ही गावातून निघालो तीच वेळ होती ती.

गेल्या चार-पाच वर्षातल्या तिनं पाहिलेल्या घडामोडी नदीच्या एकेका वळणासारख्याच होत्या. त्या प्रत्येक घडामोडीत तिचं एक स्थान होतं. ती त्या घडामोडींची मूक साक्षीदार होतीच, पण नुसती साक्षीदारही नव्हती. त्या घडामोडींची प्रेरणाही होती. बोलताबोलता त्याचा आवाज कातर झाला. नर्मादाईविषयी दूरवर राहूनही आम्हाला इतकं काही वाटायचं तर त्याची स्थिती आमच्यापेक्षा अधिकच कातर असावी यात नवल नव्हतं.

तिच्याबरोबरच राईनीचं ते झाडही पाडून टाकण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिथं गेलो तेंव्हा ते पठार भुंडं दिसत होतं. रया गेलेलं. तिथून पाहताना मंदीरही उदास वाटत होतं. त्याची ती जोडिदारच होती अखेर.

ती पाडली गेली असेल तेंव्हा आम्ही कदाचीत जेवणच करत असू. तिथून आम्हाला खुबीनं बाहेर काढताना त्यांनीही `खाना’ हाच बहाणा केला होता. आमची दांडी गुल केली होती.

ती पडल्यानंतर गाव उठायला वेळ लागला नाही.

अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींची साक्षीदार असलेली नर्मदाई पाडताना कोणालाच साक्षीदार होऊ न देण्यात सरकार यशस्वी झालं होतं. दुसऱ्या दिवशी एका सरकारी अधिकाऱ्याचा हवाला देणारं एक वृत्त आलं होतं: अनधिकृतपणे उभारण्यात आलेली एक झोपडी पाडण्यात आल्याचं त्या अधिकाऱ्यानं सांगितलं होतं. तिच्या `हौतात्म्या’ची ही अशी बेदखलच झाली होती. त्या गावाप्रमाणंच.

आजही तिचा विचार मनात आला की ती पाडली गेली त्याचा `साक्षीदार’ होता आलं नाही, यापेक्षा आपली दांडी सहज उडाली याचीच आठवण येते; हसूही येतं, हळवंही व्हायला होतं!


धरण झालं रेऽऽऽ

मार्च 22, 2007

तो चिमुरडा जे काही सांगत होता ते ऐकून मला ठीक १७ वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा मणिबेलीत गेलो होतो, त्याची आठवण झाली. तशी ती का व्हावी याला काही कारण नव्हतं. असेलच तर ते माझ्या समोर अथांग पसरलं होतं. १९९० साली मी पहिल्यांदा तिथं गेलो तेंव्हा नदीचं पात्र अवघं २० मीटर खोलीचं होतं. त्यावेळी ते महाकाय धरण अवघ्या २७ मीटरवर होतं. त्यावेळी एका छोट्या डुंगीतून आम्ही ती नदी ओलांडली होती. आता तिथं एक महाकाय जलाशय झाला होता. आता ती नदी डुंगीतून ओलांडण्याची कल्पनाही अंगावर शहारे उमटवून गेली. आणखी एक गोष्ट होती. त्यावेळी ती नदी वहात होती. आत्ता मात्र ती निशब्द होती. तेंव्हा आणि आत्ता समान असणारी एकच गोष्ट होती: युगानुयुगे त्या नदीने आधार दिलेले जीवन आजही तसंच होतं जसं तेंव्हा, १७ वर्षांपूर्वी, मला जाणवलं होतं. तसंच हा शब्द मी अत्यंत जाणीवपूर्वक वापरतोय.

जीवन बदललं आहेही आणि नाहीही. ते तसंच आहे, कारण त्यातील कष्ट आजही तसेच आहेत. ते बदललेलं आहे, कारण इतरांच्या सुखी जीवनासाठी आता त्यांच्यावर कष्ट लादले गेले आहेत. ती घरं त्यांच्या आकारापुरता विचार केला तर तशीच आहेत, जशी तेंव्हा होती. त्यांच्या जागेचा, ठिकाणाचा विचार केला तर मात्र ती बदलली आहेत. आधी ती नदीच्या किनाऱ्यावर होती, आता ती तिथून वर १५० मीटरवर गेली आहेत. नदी तशीच आहे, फक्त पाण्याचा विचार केला तर. प्रवाहाच्या जिवंतपणाचा विचार करायचा झाला तर मात्र नदी बदलली आहे. आता ती वहातच नाही. अन्न तेच आहे, कारण जंगल आहेच. अन्नाची उपलब्धी आणि प्रमाण यात मात्र खचितच बदल झाला आहे. मोसमांचा विचार केला तर शेती तशीच होते. उपज म्हणायची झाली तर मात्र त्यातही बदल झाला आहे. जमीन तर नाहीच. जगण्याविषयीची वृत्ती तशीच असल्यानं जीवन तसंच आहे. भविष्याचा विचार करावयाचा झाला तर मात्र जीवन बदललं आहे. आधी ते चिरंतन आशादायी असायचं, जीवन जो-जो आनंद आणेल तो घ्यायचा, यात आधी कसलीही सीमा नव्हती. आत्ता मात्र तसं नाही. आता जगण्याच्या मर्यादा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ठळकपणे दिसून येतात.

मी भादल या गावांत आहे. त्या धरणाखाली बुडणारं महाराष्ट्रातलं शेवटचं गाव. मी गावात असल्याचाच हा परिणाम असावा की सरकारी हिशेबात हे गाव बुडालंही आहे, हे माझ्या ध्यानातही येत नाहिये. करण नावाच्या या मुलासोबत मी एका ओंडक्यावर बसलो आहे, त्याच्या आवडत्या शाळेपाशी. सुर्य अजून अस्ताला जायचा आहे. पण, त्या आणि त्यासारख्या अनेक धरणांनी आणलेल्या `प्रकाशा’पासून दूर असल्यानं, मी आकाशात अनेक चांदण्या आणि चंद्रालाही पाहू शकतोय. माझ्या घराच्या गच्चीवरून दिसतात त्यापेक्षा अधिकच चांदण्या इथं दिसताहेत. `प्रकाशप्रदुषण’ एक क्षणभर माझ्या मनात चमकून जातं. पण त्या चिमुरड्याच्या गाण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी तो विचार मनाच्या अंधारात झटकून टाकतो. त्या गाण्यात या नदीनं माणसावर उधळून दिलेल्या जीवनानंदाबद्दल स्तुति असते. `मां रेवा…’ अशी त्या गाण्याची सुरवात असते. गाणं शेवटाकडं येतं, तसं नकळत मीही ते म्हणायला लागतो. तो चिमुरडा ज्या पट्टीत ते गात असतो ती काही केल्या मला पकडता येत नाही. माझ्या त्या `अगोचर’पणानंही तो इतका आनंदी झालेला असतो की, तो त्याच्या बोलक्या डोळ्यातून ओसंडून वाहत असतो. काही क्षणांतच त्याचे मित्र आमच्या सुरांत सूर मिसळतात.

गाणं संपतं आणि तो मुलगा मला एक कहाणी सांगू लागतो. भादलच्या या जीवनशाळेत तो त्याच्या मध्य प्रदेशातील गावातून आलाय. दोनच दिवसापूर्वी तो जत्रेसाठी तोरणमाळला गेला होता. अशा एकाद्या मोठ्या जत्रेसाठी जाण्याची त्याची ती पहिलीच वेळ आहे. तिथं पूजा केली आणि मिठाई खाल्ली, असं तो मला सांगतोय. जत्रेनंतर दोन दिवसांची पायपीट करून तो भादलला परतलाय. एकाच ठिकाणी इतकी माणसं पाहिल्याचा आनंद त्याच्या शब्दागणीक व्यक्त होत असतो. पण त्याचवेळी, त्याच्या जीवनशाळांच्या संमेलनाला आपल्याला जाता आलेलं नाही याचं, माझ्या भाषेतलं, वैषम्यही आहेच. मीच त्याला विचारलं होतं, `तू संमेलनात होतास का?’ `नाही, सर, या यात्रेमुळं मला येता आलं नाही,’ तो निराश सुरात सांगतो. मग त्याच्या लक्षात येतं की मी तिथं त्या संमेलनाला होतो. तो एकदम माझी मुलाखत सुरू करतो. कसं झालं संमेलन? काय-काय झालं तिथं? ताई तिथं होती का? (ताई म्हणजे, मेधा पाटकर.) भादलच्या जीवनशाळेच्या मुलांनी काय-काय केलं? बंदुकीतून सुटणाऱ्या गोळीसारखे त्याचे प्रश्न येत असतात. मी एका प्रश्नाचे उत्तर पूर्ण करत नाही, तोवर दुसरा येत असतो.

माझ्या मनात संमेलन जागं होतं. चारशेहून अधिक मुलांसोबत तीन दिवस जगणं इतकं आनंददायी असू शकतं याची मी कल्पनाही केली नव्हती. त्या मुलांना खो-खो, कबड्डी, धावणे यासारख्या स्पर्धांत भाग घेताना पाहणं हा इतका समृद्ध करणारा अनुभव असतो हे त्या दिवसांत मला पहिल्यांदाच उमजलं. सगळी मुलं बुडणाऱ्या किंवा बुडालेल्या गावांतील. दिवस या स्पर्धांचे होते तर रात्री ढोल, गाणी, नाटकं, नाच यांनी सजलेल्या. चहूबाजूंनी सातपुड्याचे डोंगर घेऊन वसलेल्या त्या गावांत. वर आकाशाची सावली. पाठीशी ते डोंगर. गावाचं नावही सुरेख. त्रिशुल. तिन्ही बाजूंनी नद्या वाहात असल्यानं.

संमेलनासाठी काही मुलं दोन दिवसांची पयपीट करून आलेली. संमेलनाची व्यवस्था शिस्तबद्ध. एकेका शाळेची सोय गावातल्या एकेका घरात. आमच्यासारखी पाहुणे मंडळीही अशाच एका घरात. साधंच पण चवदार जेवण. खिचडी, डाळ-रोटु, बिनदुधाचा चहा. तीन दिवसांचं हे संमेलन झाल्यावर आम्ही नदीकिनाऱ्यावरील भुशा या गावी गेलो आणि तिथून भादलला आलोय.

हे सारं मी करणला सांगतोय, तेवढ्यात जेवणासाठी हाळी आली. आम्ही निघालो. माझ्यासमोर एक आश्चर्य उभं आहे. त्या गावच्या कारभाऱ्याचा कुत्रा. `कोप्या’! हे नाव त्याच्या स्वभावावरूनच त्याला पडलंय. माझ्यासाठी आश्चर्य हे आहे की, त्यानं मला ओळखलंय. सहा महिन्यांपूर्वी मी तिथं गेलो होतो, तेंव्हा तो मला भेटला होता. माझ्यासोबत आहे तो त्याचाच मित्र, रोहन. आधी रोहनच्या छातीपर्यंत उड्या मारुन प्रेम व्यक्त केल्यानंतर कोप्या माझ्याकडे वळतो. आधी मी घाबरलो; पण मग त्याने न भुंकता माझ्या छातीपर्यंत उडी मारल्यावर माझ्या ध्यानी येतं की, आपल्याला काही धोका नाही. मी त्याला `कोप्या’ अशी हाक मारतो. तो शेपूट हलवू लागतो.  रोहन मला सांगतो की, कोप्यानं मला ओळखलं आहे बहुदा.

गावातल्या काही लोकांशी गप्पा करत सकाळ सुरू होते. इतके कष्ट असतानाही ते अजून या गावांमध्ये का राहताहेत? अगदी स्वाभावीक प्रश्न आधी येतो. मग सुरू होते एक कहाणी. जंगल आमच्या जगण्यात कसं महत्त्वाचं आहे आणि नेमकं तेच कसं पुनर्वसनाच्या जागी नाहीये आणि म्हणूनच मूळच्या या गावातील कष्टांपेक्षा तिथलं जगणं केवळ अशक्य कसं आहे, याची कहाणी. पुनर्वसनाच्या गावांमध्येही दर पावसाळ्यात `बुडिताचा’ सामना कसा करावा लागतोय हे ती माणसं सांगू लागतात. हा एक मोठा बदल आहे गेल्या १७ वर्षांतील. तेंव्हा ही माणसं म्हणजे नुसत्या सावल्या वाटायच्या, मलाच वाटून गेलं. कहाणी तीच आहे. गेल्या काही वर्षांपासून. फरक इतकाच, की आधी त्यांना पुनर्वसनाची काही आशा होती, आता ती पूर्ण संपून गेलीय.

आम्ही खाली नदीच्या, किंवा आत्ता जे काही आहे त्याच्या, किनाऱ्याशी येतो. प्रवास पुढे सुरू होतो. पहिला थांबा आहे जलसिंधी. असं म्हणतात की,  नदी उगमापासून निघाल्यानंतर आधी इथं थांबली होती. जलसिंधी येताच मला आठवण येते ती १९९७ सालची. पुराचा सामना करत झालेल्या सत्याग्रहाची. हे गाव लुहाऱ्याचे. त्या काळात `टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये पान एकवर आलेल्या एका बातमीचा नायक. आत्ता तो शेतात आहे. त्याला निरोप जातो आणि आम्ही त्याचा भाऊ आणि इतर काही गावकऱ्यांशी बोलत बसतो. एकच वाक्य त्यांची कहाणी सांगण्यास पुरेसं आहे:

`जहां हमारे जानवर चरनेके लिये भी नही जाते थे, वहां हम आज रह रहे है.’

`का?’

`सरकारला विचारा.’

लुहाऱ्या येतो तेंव्हा त्यात आणखी एका वाक्याची भर पडलेली असते.

`यहां लोग लेकरही जाते है, कोइ कुछ देकर नही जाता.’

त्याचे हे उत्तर असते माझ्या एका प्रश्नावर. लुहाऱ्यावर `टाईम्स’मध्ये जशी बातमी आलेली असते, तशीच एक फिल्मही झालेली आहे. ते दोन्ही पाहिल्यावर काय वाटलं, असं मी त्याला विचारलेलं असतं.

पुनर्वसन नाही, बुडित तर दरवर्षीच आहे. या साऱ्या अन्यायाविरुद्ध हाती शस्त्र (इथं त्याचा अर्थ केवळ तीर-कमठा किंवा दांडकी इतकाच असतो, फार तर दगड) घ्यावं असं कधी वाटलं नाही का, मी विचारतो. क्षणाचाही विलंब न लागता उत्तर येतं, `नाही.’

`का?’ मी विचारतो.

`क्या होगा? यहांके चार-पांच और वहांके चार-पांच मारे जायेंगे. उसके बाद तो सरकार फौज लेकरही आयेगी. फिर कहां जायेंगे?’

त्यांची मनस्थिती उमजून मी पुढचा प्रश्न विचारणे टाळतो: सरकारचं संख्याबळ आणि सामर्थ्य यामुळे त्यांनी हिंसाचार केला नाही का?

डनेल या पुढच्या गावात नूरजी या वृद्धाकडून मला याही प्रश्नाचे उत्तर मिळते. काही काळ नूरजीनं कडव्या डाव्या संघटनेत काम केलेलं आहे. तो म्हणतो, `चर्चा केल्यानेच आम्हाला या काळात किमान काही लोकांसाठीचं पुनर्वसन मिळालं आहे. बाकीचे लोक इथं डोंगरांवर वर चढून राहू तरी शकतात. आम्ही हिंसाचार केला असता तर हे शक्य झालंच नसतं. मरण हाच निकाल ठरला असता.’

त्या आधी आम्ही मुखडी या गावात थांबलो होतो. तिथं मला एक `प्रमाणपत्र’ मिळालं होतं. या लोकांच्या आंदोलनातील एक तपोवृद्ध सदस्य राण्या यांच्या घरी आम्ही होतो. बीडी देण्याऐवजी त्यांनी गुडगुडी दिली. माझ्यासोबतच्या मित्रांना झुरकाही घेता आला नाही; मला तो जमला. ते पाहून राण्या म्हणाला, `हा माणूस खरा आदिवासी आहे. बाकी सारे शहरी आहेत.’

मणिबेली हा पुढचा आणि शेवटचा थांबा आहे. हे गाव महाराष्ट्रातील बुडालेलं पहिलं गाव. (इतक्या प्रवासानंतर आणि इतकं ऐकल्यानंतर बहुदा माझ्या धारणेत बदल होऊ लगलेला आहे. म्हणून मी `बुडालेलं’ असा शब्दप्रयोग करतोय.)  आजही तिथंच आहे. १९९० साली मी तिथं भेटलो होतो तेंव्हाचे सरपंच नारायण तडवी यांना. आजही तेही तिथंच आहेत. किमान ५० घरं तिथं आहेत. (मला आठवतं, आम्ही त्यावेळी त्यांना झोपड्या म्हणायचो. ज्यासाठी वापरलेलं सागच मुळी तेंव्हा लाखांत मोजलं जायचं.) रात्रीचा अंधार आहे. वर चंद्रबिंब उगवलंय. या गावात असलेल्या जीवनशाळेची मुलं ढोल वाजवत फेर धरून नाचताहेत. होळीची ती नांदी असते. वातावरणात `भिर्रर्र’ ही शीळ घुमत असते.

जीवन त्याचे खेळ करत असते. ते येताना बुडितही आणते आणि वर डोंगरांवर चढून जगण्याची शक्ती, प्रेरणाही देत असते.

आम्ही परतीच्या प्रवासात आहोत. मोटरबोटीखाली असणारी नदी शांत असते. एका मृत नदीची कल्पनाच मला हादरवून जाते. तिच नदी जी युगानुयुगे काठावरच्या आदिवासींसाठी जीवनदात्री ठरलेली असते.

इथं ताई आली तेंव्हा तिनं एक गाणं रचलं होतं, `धरण आलं रे…’

हा प्रवास आता `धरण झालं रे…’ पर्यंत येऊन पोचला आहे. जीवन तसंच आहे.

पण खरंच तसंच आहे का?

माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं.