पिंजारी

सप्टेंबर 4, 2010

काही वर्षांपूर्वी, उन्हाळ्यात केव्हा तरी, एक फॅक्स…
“नवी गावं आपल्या कामाला जोडून घेतेय. येशील का? पेवलीपासून सुरवात. बऱ्याच दिवसापासून जायचं होतं, राहून गेलं…”
रजनीनं पेवलीत पहिल्यांदा पाऊल टाकलं तेव्हा त्या गावात दुफळी पडल्याचं तिला दिसलं होतं. दुफळी म्हणजे माणसांच्या संदर्भातील नव्हे. गावातून एक ओहोळ जात होता. पुढं तो खाली एका नदीला मिळत होता. या ओहोळाच्या दोन्ही बाजूंना गाव वसलं होतं. ही ती दुफळी.
बचत गट, बालशिक्षण असं काम सुरू करून सहा वर्षे होत आली होती. या काळात काही गावं संस्था-संघटनेला जोडली गेली होती. पहिल्या वीस गावांमध्ये केवळ तेथील लोकांच्या जोरावर उभ्या केलेल्या कामांतून काही गोष्टी पदरी पडल्या होत्या. त्यातच एक म्हणजे बालहक्क समितीकडून मिळालेला अनौपचारिक बालशिक्षणाचा प्रकल्प. त्या जोरावर आणखी काही गावं जोडून घेणं शक्य झालं होतं. आता आणखी विस्तार रजनीला खुणावू लागला होता. त्यामुळं आजवर संस्थेच्या कार्यक्षेत्राच्या परिघावर असलेली गावं जोडून घेण्याचा हा प्रयत्न. त्यातून पेवलीत प्रवेश.
पेवलीचे गुलाबसिंग याआधी रजनीला भेटले होते. “गुलाबकाका”. खरं तर, बऱ्याच ते काळापासून ‘गावी ये’ असं म्हणत होते, ते आजवर जमलं नव्हतं. आता जमलं. तेही पुढच्या गावाला जाण्याचा नेहमीचा वाकडा रस्ता टाळून सरळ रस्त्यानं पण थोडं चालत जाण्याचा निर्णय केल्यानं. गावात आल्यानंतर रजनीला ते चालणं सार्थकी लागल्यासारखं वाटलं. चाळीस उंबऱ्याचं गाव. म्हणजे संघटना उभी करण्यासाठी तसं कठीणच. कारण घरांची संख्या जितकी जास्त, तितका हितसंबंधांचा गोंधळ. उत्तरेला एक मोठी डोंगररांग. त्याच रांगेतून येणारा ओहोळ, आणि तो मिळायचाही त्याच रांगेतून येणाऱ्या नदीला. दक्षिणेकडून गावात शिरलं की, पहिल्या घरापासून डोंगराच्या दिशेनं असलेल्या जमिनीच्या सुमारे दीडेक मैलाच्या विस्तारात शेती. अधूनमधून बऱ्यापैकी टिकलेला झाडोरा. मोह, आंबा, साग. शेती आणि घरं हे अद्वैतच. त्यामुळं एकगठ्ठा वस्ती हा प्रकार नाहीच.
दुपारच्या सुमारास गुलाबकाकांच्या घराच्या पडवीत रजनी पोचली; त्यांनी बाज आणून बाहेर टाकली. पाणी आलं.
“रामराम ताई. आधी जेवून घे. मग लोक येतील. मग बोलू.” गुलाबकाकांनी लोकांना सांगून ठेवलेलं असावं. रजनीच्या चेहऱ्यावर समाधानाची थोडी लाट आली. पाणी घेऊन ती थेट घरात शिरली.
दारातून आत पाऊल टाकलं तसा आधी सामोरा आला अंधार. बाहेरच्या कडक उन्हातून आल्यानं डोळे सरावण्यासाठी थोडा वेळच लागला. मग तिचं लक्ष गेलं. नीट सारवलेली जमीन. मोठ्या विस्ताराची खोली. मध्यभागी दोरीच्याच पाळण्यात एखादं बछडं असावं. तिनं पुढं नजर टाकली. तिशीच्या आसपासची तरुणी समोर आली. हात जोडून नमस्कार करत आणि मनापासून हसत. रजनीनंही हात जोडले आणि पुढं होतं त्या तरुणीचे जोडलेले हात हाती घेतले आणि मग गळाभेट झाली.
“मी पिंजारी,” आवाज दमदार होता.
ही काकी नक्कीच नाही. काका पंचेचाळीशीच्या आसपास आहेत. रजनी विचारात होती तितक्यातच आतून आणखी एक बाई पुढं आल्या. पुन्हा तेच. हात जोडून दिलखुलास हसत नमस्कार वगैरे.
तितक्यात गुलाबकाका आत आले. “ताई, ही माझी बाई, वेरली. ही पिंजारी. आपल्या डोंगऱ्याची मुलगी.”
अच्छा, रजनीला काही तरी अंधुकसं आठवलं. ती विचारात पडली, पण पहिल्या क्षणात काही आठवेनासं झाल्यावर तिनं तो नाद सोडला. काही असेल तर पुढं कळेलच ही नेहमीची वृत्ती. तेवढ्यात काकींनी जेवण वाढल्याचं सांगितलं. जेवण आटोपून सारे बाहेर आले. अंगणातून लोकांचे आवाज यायला सुरवात झाली होती.
रजनी खुश होती. गावातील पहिल्याच बैठकीला पन्नासच्या आसपास उपस्थिती. त्यातही वीसेक महिला. संघटनेच्या ताकदीचं खरं मर्म त्यांच्यातच. गुलाबकाका सुरवातीला बोलले. रजनी कोण वगैरे त्यांनी सांगून घेतलं. संघटनेच्या जोडीनं संस्थेमार्फत सुरू असलेली धान्यबँक, बचतगट यासारखी कामं याविषयी रजनीची सहकारी उर्मिला बोलली. आणि मग रजनीकडं सूत्रं आली.
“मी भाषण करणार नाही. कारण मी भाषण करत नाही. मी तुमच्याशी बोलणार आहे,” अलीकडं ठेवणीत आलेली ही तीन वाक्यं. रजनीला ठाऊक होतं, एकदम तिन्ही वाक्यांचा परिणाम तसा होत नाही. तरीही ती ही वाक्यं तशीच बोलते. मग पदर खोचून घ्यायचा आणि गावातल्या म्होरक्याकडंच मोर्चा वळवायचा. इथंही तेच. गुलाबकाकांकडं पहात तिनं सांगितलं, “काका, तुम्हीच गावाची माहिती द्या. गाव किती मोठं आहे, लोकसंख्या किती आहे, शेती कशी होते, पाणी कुठून येतं, रेशन आहे का, शाळा आहे का…” हे प्रश्न हेच ठेवणीतलं अस्त्र. जरी म्होरक्याला बोलायला सांगितलं तरी, आता गावातला प्रत्येक जण बोलू लागतो आणि त्यातही महिला वर्ग भले आपल्याला उद्देशून नाही, पण ऐकू जाईल अशा आवाजात कुजबूज करू लागतोच. या गावात वेगळं काही होण्याचं कारण नव्हतं.
थोडा वेळ गेला आणि बायकांच्या घोळक्यातून अचानक गाण्याचे सूर उमटले. रजनीनं तिथं पाहिलं. एकच सूर नव्हता, इतरही काही त्यात मिसळत होते. मुख्य सूर मधून येत होता आणि तो चेहरा तर इतर चेहऱ्यांच्या आड होता.
“पुढं ये. सगळ्याच या. आपण सगळे गाणं म्हणूया,” रजनीचं हे आवाहन पुरेसं नव्हतं. काहीच हालचाल नव्हती, पण बोल सुरू होते. पुरूष मंडळींना तोंड त्या दिशेला करण्यास सांगत ती स्वतः घोळक्याकडं गेली आणि चमकली. मघा दमदार वाटलेला आवाज आता गाण्याचा आवाज झाला होता. तिला पुढं आलेलं पाहून पिंजारी लाजली आणि थांबली. रजनीनं पुढं होऊन तिच्या शेजारीच जागा करून घेत बसकण मारली आणि सांगितलं, “म्हण गाणं.”
पिंजारीनं पुन्हा आरंभापासून सुरू केलं. आणि पंधरा मिनिटांत रजनीला गावाची एक वेगळीच सैर घडवून आणली. गाणं उत्स्फूर्तच होतं. या भागातील महिलांच्या अंगी असलेला एक वेगळाच गुण हा. बोलता-बोलता रचना करतच गाणं गात जायचं. त्यातून आपली जीवनकहाणी मांडायची. पिंजारीनं तेच त्या दिवशी त्या गाण्यात केलं होतं. तिनं पेवलीपासून – पेवली म्हणजे या गावाला जिचं नाव मिळालं ती नायिका, या गावाची संस्थापक; तिची कहाणीही विलक्षणच! – तर पेवलीपासून सुरवात करून आजच्या घडीपर्यंतचा गावाचा प्रवास पिंजारीनं मांडला त्या गाण्यातून; मग पेवलीच्या मुलानं लावलेलं एक झाड, त्यातून उभं राहिलेलं आणि पुढं कापलं गेलेलं जंगल, गावाचं जगणं आणि तिचं जगणं, त्यातल्या हाल-अपेष्टा, त्यातली सुखं-दुःखं असं सारं काही त्या गाण्यामध्ये आलं आणि पुढं रजनीला आणखी काही समजून घेण्याची गरज राहिली नाही. पुढच्या प्रक्रिया होण्यास केवळ गावकऱ्यांच्याच होकाराची आवश्यकता होती.
मानव मुक्ती वाहिनीची आणखी एक शाखा त्यादिवशी स्थापन झाली. पेवलीत.
***
पावसाळा, दूरध्वनीवरून…
“तू पेवलीत कधी येणारेस? स्वातंत्र्यदिनी जमव. पिंजारीला भेटलं पाहिजेस. हिरा सापडला आहे आपल्याला…”
स्वातंत्र्याचा वर्धापनदिन शक्य असेल तर नव्यानं जोडलेल्या एखाद्या गावातच करण्याचा एक शिरस्ता रजनीनं पाडून ठेवला होता. स्वाभाविकच त्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनासाठी पेवली. त्यासाठीचं मला निमंत्रण. त्या भागाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अशा कार्यक्रमातून मला खूप काही मिळू शकतं असं रजनी नेहमी म्हणायची. त्यानुसारच आलेलं हे निमंत्रण.
स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी रजनी जाणीवपूर्वक गावात गेली. तयारी अशी मोठी नसते. तिरंगा खादी भांडारातून मिळतो, ध्वजस्तंभ उभा करण्याचं काम अर्ध्या तासाचं. मुलांसाठी जाता-जाता तालुक्याच्या गावातून खाऊ घेता येतो. तरीही बैठक. बैठक घेण्याचं कारण, गावकऱ्यांचा सहभाग. हा कार्यक्रम गावकऱ्यांनीच करावयाचा हा कटाक्ष. त्याच्या तयारीसाठी बैठक. अशी बैठक लावली की माणसांचं मोराल टिकून राहतं, ते वाढवता येतं हे रजनीला ठाऊक होतं.
गुलाबकाकांचं घर हेच आता गावातलं कार्यालय झाल्यासारखं होतं. या गावातली पहिली धान्यबँक स्थापन करून स्वातंत्र्याचा पुकारा करावयाचा असं कार्यक्रमाचं स्वरूप ठरलं. धान्यबँकेसाठी नावं नोंदवणं वगैरे प्रक्रिया सुरू झाली आणि काकांच्या पडवीत पिंजारीसह इतर काही बायकांसमवेत रजनी बसली. सुरू झाल्या एकमेकींना समजून घेणाऱ्या गप्पा. त्यातून पुढं आली पिंजारीची कहाणी.
***
पिंजारी. नावात काय आहे, असं कोणीही म्हणेल. विशेषतः पिंजारी या नावात तर हटकूनच. नुसत्या नावावरून काहीही बोध होणार नाही हे स्पष्ट आहे. वय वर्षं तीस-एकतीस. त्या गावात तिच्या पिढीतील कोणालाही आपलं वय नेमकं सांगता येत नाहीच. कधी-काळी सरकारच्या कृपेनं त्या गावात गेलेल्या डॉक्टरनं शरीरशास्त्राच्या त्याच्या ज्ञानाच्या जोरावर तिच्या पिढीतील प्रत्येकाचं वय अंदाजे काढलेलं असावं. त्या आधारे गावाचा कारभारी प्रत्येकाचं वय सांगतो, तसंच पिंजारीचंही वय रजनीला सांगितलं गेलं आणि म्हणूनच ते समजलं होतं. अन्यथा त्याची नोंद तशी वेगळी करण्यातही फारसं हशील नाही हेही खरंच.
आई पिंजारीच्या लहानपणीच गेली होती. ही एकटी. बाप मजुरीसाठी शहराकडं गेला. येताना आधी दमा घेऊन आला. मग पुढं त्याला झाला क्षय. अर्थात, त्यातही फारसं नवल नव्हतं. त्या परिसरातील अनेकांचा तो जिवाभावाचा साथीदारच होता. त्यामुळं पिंजारीच्या बापावर, म्हणजेच डोंगऱ्यावर, क्षयानं ‘कृपाछत्र’ धरलं तेव्हा त्याची त्या वंचित जगण्यातून सुटका होण्याचीच सुरवात झाली होती – अखेरीचा आरंभच म्हणायचा तो. अर्थात, ही सुटका काही सोपी नसते. जगण्यापासून सुटका करून घेण्याची माणसाची इच्छाशक्ती किती जबरदस्त आहे याचीही तिथं कसोटी पाहिली जाते. तशीच कसोटी डोंगऱ्याचीही पाहिली गेली. एक-दोन नाही; सहा वर्षं! त्याचीच एकट्याची नाही. त्या क्षयानं पिंजारीच्या जगण्याच्या इच्छाशक्तीचीही पुरेपूर कसोटी पाहिली. बापाची शुश्रुषा, आपलं वंचित जगणं सावरण्याचा प्रयत्न अशा दोन आघाड्यांवरच्या लढाईतून तरून राहण्याची तिची इच्छाशक्ती. त्या इच्छाशक्तीची कसोटी.
या सहा वर्षात डोंगऱ्या आणि पिंजारी हीच काय ती त्यांच्या उंबऱ्यात असणारी माणसं होती. बाकी गुलाबकाका, काकी येऊन-जाऊन असायचे. इतर मंडळी आपापल्या व्यापात. बापाचं दुखणं पिंजारीनं एकटीनं काढलं. शेत सांभाळून. त्याचं औषधपाणी करण्यासाठी दर महिन्याला ती पंधरा मैल चालत जायची तालुक्याच्या गावाला – रामपूरला. सकाळी निघायची आणि संध्याकाळी औषध घेऊन परतायची. शेतीचं काम करण्यासाठी गुलाबकाका आणि एक-दोन घरांची मदत. बाकी मात्र एकटीच्या बळावर. डोंगऱ्या अखेर त्या कसोटीला उतरला आणि क्षयानं त्याची सुटका केली. पिंजारीही सुटली एक प्रकारे. डोंगऱ्या गेला आणि पिंजारीला गुलाबसिंग हा एकमेव आधार राहिला.
***
पिंजारीसंबंधी आधीच्या काळात झालेल्या चर्चेत ती मध्यंतरी एक वर्ष गावात नव्हती याचा उल्लेख वारंवार होत असे. त्या काळात पिंजारी गावात नव्हती असंच गावकरी सांगायचे. पिंजारीही तसंच सांगायची. ती गेली होती मजुरीसाठी शहरात. पेवली किंवा त्या परिसरातील, खरं तर त्याच परिसरातील कशाला, देशातील कोणत्याही खेड्याच्या नशिबी असणारे भोग ज्यांना ठाऊक आहेत ते म्हणतील की, पिंजारी वर्षभर मजुरीसाठी शहरात गेली यात नवल काय? रजनीला त्यात नवल वाटलं होतं. त्याचं कारण होतं. पिंजारीची चौकशी तिनं सुरू केली तेव्हा प्रत्येकाकडून तिला, ती एक वर्ष गावात नव्हती, हे आवर्जून सांगितलं जात होतं. त्यामुळंच तिचं ते निसर्गदत्त, आणि स्वतःच्या स्वभावातून निर्माण झालेलं, कुतूहल अधिकच चाळवलं गेलं होतं.
ते एक वर्ष पिंजारीसाठी आणि पेवलीसाठीही खास होतं. पिंजारीसाठी त्या वर्षाचं खासपण अगदी वैयक्तिक स्वरूपाचं होतं. गावासाठी मात्र ती मिरवण्याची बाब होती.
पिंजारी गावातील एक प्रमुख कार्यकर्ती होती हे त्यामागचं कारण होतंच. शिवाय अलीकडं संस्थेच्या या कामाच्या निमित्तानं, तसंच इतरही कारणांमुळं वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गावात अनेकांची ये-जा होऊ लागल्यानंतर संस्कृतीची जी काही चर्चा चालायची, त्यात पिंजारीच्या त्या एका वर्षाला एक वेगळं महत्त्व आहे, हेही गावकऱ्यांच्या ध्यानी येऊन चुकलं होतं.
आजच्या कहाणीत तो मुद्दा अनायासे आला तर… रजनी विचारात होतीच.
***
“मला जुवान्या आवडू लागला. जंगलात गेलो फुलं गोळा करायला की आम्ही भेटायचो. आम्ही लग्न करायचं ठरवलं. लग्नासाठी गावजेवण द्यायचं होतं. तेच अवघड होतं. जुवान्याकडं होते. पण माझ्या वाट्याचे नव्हते. त्यामुळं लग्न होईना…” स्वतः पिंजारीच सांगू लागली. अर्थातच, इतर बायकांनी केलेल्या आग्रहामुळंच तिची भीड चेपली होती, हेही खरं. प्रथेनुसार दोन्ही बाजूंनी सारख्याच प्रमाणात जे काय करायचं ते करायचं होतं आणि ते कमीतकमी करायचं असं ठरलं होतं.
दोघं एकमेकाच्या प्रेमात पडून एक वर्ष झालं तरी लग्नासाठीचे पैसे जमण्याचं चिन्ह नव्हतं.
जुवान्याला त्याच्या बापानं अद्याप शेत वेगळं काढून दिलं नव्हतं. मुळात त्याच्याकडंही पोराला वेगळं शेत काढून देण्याइतकी फार मोठी शेती होती असंही नव्हतं. त्यामुळं तोही प्रश्नच होता. त्याच्या बापाच्या पिढीसारखी स्थिती आता नव्हती. तेव्हा शेत काढून देणं आजच्या तुलनेत सोपं होतं. आपल्याकडं पुरेसं शेत नसेल तर गावाच्या संमतीनं जंगल काढून नवं शेत करता यायचं. ते आता शक्य नव्हतं.
डोंगऱ्या असता तर त्यानं जुवान्याकडं पिंजारी त्याला दिल्याबद्दल पैसे मागितले असतेच. ती प्रथाच होती. पण आता डोंगऱ्या नव्हता. पिंजारी तर एकटीच होती.
“माझं शेत होतं, पण तेही तोकडंच. त्यामुळं वरकड काहीच नाही. उन्हाळ्यात तर जंगलच कामाला येतं. त्यामुळं पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न होता. शेवटी आम्ही तसंच एकत्र रहायचं ठरवलं आणि माझ्याच घरी संसार सुरू केला. लग्न झालेलं नव्हतंच. आणि ते करावं तर लागणार होतंच…”
दोन वर्षं अशी गेली. जुवान्या आणि पिंजारीला या काळात एक मूलदेखील झालं. पण लग्न झालेलं नव्हतं आणि लग्न झालं नाही म्हणजे गावात प्रतिष्ठा नाही.
“गावजेवणाला लागणार होते दोन हजार रुपये. इतके पैसे कसे आणायचे? मुलगा दीड वर्षाचा झाला तेव्हा मात्र मी ठरवून टाकलं, काहीही करून येत्या वर्षात पैसे उभे करायचे आणि गावजेवण घालून लग्न करायचं…”
पिंजारीनं एक धाडसी निर्णय केला. तिनं गाव सोडलं. वर्षभरासाठी. ती गेली मांडणगावाला. तिथं एक वर्ष एका शेतावर मजुरी करून तिनं दोन हजार रुपये कमावले आणि गावी परतल्यावर या दोघांनी गावजेवण दिलं.
साडेतीन वर्षांची प्रतीक्षा, वर्षभराचे उरस्फोड कष्ट आणि त्यानंतर लग्न. हा सारा मान्यतेसाठीचा संघर्ष. त्यात आणखी एक दडलेला पदर होताच. पिंजारीची जमीन. बाप गेल्यानंतर जमीन तीच करीत होती, पण ती किती काळ टिकेल याची खात्री नव्हती. तिच्यावरची मालकी स्थापित करावयाची झाली तर हे लग्नही आवश्यक होतं. म्हणजे मग ती जमीन पिंजारी-जुवान्या यांची झाली असती.
पोट भरलेल्या गावाची मान्यता मिळाली पिंजारी आणि जुवान्याच्या लग्नाला. आणि त्याच लग्नात हजर असलेल्या त्यांच्या मुलालाही.
पिंजारीच्या या निर्णयाचं धाडस बाहेरून येणाऱ्या मंडळींना भारावून टाकायचं. तिचा परिचय या कहाणीशिवाय होतच नसे. आणि मग ही कहाणी सांगितली जाऊ लागली.
***
गावात संघटना-संस्थेची शाखा स्थापन झाल्यापासून पिंजारीनं त्यासाठी वाहून घेतलं. धान्य बँकेसाठी नावनोंदणी करणं, त्यासाठी शेजारच्या गावात जाऊन तिथलं काम पाहून त्यातून शिकणं हे सारं तिनं एकहाती केलं होतं. आता आपल्या मोठ्या अक्षरात ती काळ्या फलकांवर बैठकीचा वगैरे मजकूर लिहूही लागली होती. बैठकीत बोलू लागली होती. झिंदाबादचा नारा देण्यासाठी, संघटनेचं गाणं गाण्यासाठी पुढं येऊ लागली होती. डोक्यावरून घट्ट घेतलेला पदर – गर्द रंगाचा, त्याविरुद्ध गर्द रंगाचं लुगडं, तजेलदार गोरापान चेहरा, मूठ करून उंचावलेला हात ही तिची मूर्ती आता डोळ्यांपुढं आणणं सोपं जात होतं. संस्थेच्या कार्यालयात वृत्तपत्रीय कात्रणातून तशी छायाचित्रं झळकत. त्यातून ती दिसायची.
स्वातंत्र्यदिनी गावात स्थापन झालेल्या धान्यबँकेची प्रमुख म्हणून पिंजारीची निवड झाली. कारण तिला लिहिता-वाचता येत होतं. दोनचार यत्ता शाळेत गेली होती ती. त्यापलीकडं तसा शिक्षणाशी संबंध नाही, पण अक्षरांशी झालेला परिचय कायम राहिला होता. रजनीच्या संपर्कात आल्यानंतर तो घट्ट होत चालला होता आणि तेवढं या कामासाठी पुरेसं होतं.
***
होळीचे दिवस, फॅक्स…
“पेवलीत बंधारा होतोय. विस्थापन शून्य…”
पेवलीची शेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून होती. गेल्या काही वर्षातील पावसाची स्थिती पाहता पाण्याची काही कायमस्वरूपी सोय आवश्यक होती आणि जलसंधारणाचं काम संस्थेच्या मार्फत, गावकऱ्यांच्या श्रमदानातूनच करण्यापर्यंतचा विचार होत आला होता. होळीच्या आधी धान्य बँकेद्वारे धान्य वाटपाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पत्रकारांसमवेत गावकऱ्यांचा संवाद सुरू होता. गावाचा महत्त्वाचा प्रश्न कोणता, या पत्रकारांच्या प्रश्नावर ‘पाणी’ हे उत्तर प्रश्न म्हणून पुढं येणार होतं आणि तेच आलं.
“गावच्या बंधाऱ्याचं काय झालं?” ‘लोकमानस’च्या गोपीचंदचा प्रश्न.
बंधारा? रजनीला काहीही कळेना. पण गोपीचंद उगाच काही विचारणार नाही. तिला वाटून गेलं क्षणभर की, हाही बंधारा कागदोपत्री पूर्ण झालाय की काय? पण नाही. खुलासेवार बोलणं झालं तेव्हा गोपीचंदच म्हणाला, “प्रशासकीय मंजुरी मिळाली होती, पुढचं पाहून घे तू एकदा. बहुदा अर्थसंकल्पीय मंजुरी झालेली नसावी आत्तापर्यंत. कारण कोणी फॉलोअप केला नसणार.”
“पुनर्वसन…” रजनी बोलू लागली, पण तिला अर्ध्यावर तोडत गोपीचंदच म्हणाला, “नाही. पुनर्वसन नाही. साधा बंधारा आहे. या गावापुरता विचार केलेला. दरबारसिंग आमदार होते तेव्हाचा.”
रजनीनं मान डोलावतानाच ठरवून टाकलं, हा बंधारा प्रत्यक्ष आणायचा.
जिल्हा परिषद, पाटबंधारे खाते, जलसंधारण महामंडळ असं करत रजनी मंत्रालय स्तरापर्यंत जाऊन पोचली तेव्हा काही गोष्टी स्पष्ट झाल्या. गोपीचंद म्हणाला होता त्याप्रमाणे या बंधाऱ्याला अर्थसंकल्पीय मंजुरी मिळाली नव्हतीच. पण बंधाऱ्याची बाकी रूपरेषा पक्की झालेली होती. पेवलीच्या गरजेपुरतं पाणी त्यातून येणार होतं. त्या भागांतील वेगवेगळ्या गावांसाठी असे बंधारे घेण्याची कल्पना दरबारसिंग नाईक यांनी मांडली होती. त्यापैकी एकाही बंधाऱ्यात बुडित होणार नाही आणि गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल अशी ती योजना. ती प्रत्यक्षात आलीच नव्हती, यात काहीही नवल नव्हतं. त्याच योजनेत पेवलीला हा बंधारा मिळाला होता. रजनीला हे काहीच ठाऊक नव्हतं. इतक्या वर्षांतील कामादरम्यानही कुणी बोललं नव्हतं. पण ती योजना उचलून धरायची आणि आरंभ पेवलीतून करायचा हे तिनं मनाशी पक्कं केलं.
पण… पेवली या गावाला हा शब्द एरवीही नवा नव्हता.
“मी तपास सुरू केला आणि चाकं फिरली. दरबारसिंग यांच्या या योजनेत एकाही गावात विस्थापन न होता सिंचनाची सोय होणार होती. म्हणून आम्ही त्या योजनेच्या प्रेमात पडलो होतो. दरबारसिंग यांचा काळ वेगळा, आजचा वेगळा…” रजनी सांगायची.
बंधाऱ्याविषयीच्या हालचालींना वेग आला तशा गावकऱ्यांच्या आशा पालवू लागल्या. गेल्या काही वर्षांपासून तहानलेली शेतं पाणी पिण्याची शक्यता त्यांना दिसू लागली. काही गावकरी तर असे वेडे की, त्यांनी स्वप्नंही पाहणं सुरू केलं होतं. पिंजारीही त्यापैकीच. आपल्या शेतात पाणी आलंय, शेत पिकलंय हे तिचं नेहमीचं स्वप्न.
एक पेवलीच नव्हे तर परिसरातील काही गावंही या हालचालींसाठी एकत्र आली. धरणे, मोर्चा, सभा, पदयात्रा यांच्या जोडीनंच पिकलेल्या शेताची स्वप्नं पाहण्यात दंग होऊन गेली.
***
वर्षानंतरचा उन्हाळा, दूरध्वनीवरून…
“पेवलीचा बंधारा रद्द, पुढं मोठं धरण. पुन्हा मरण. कारण पुनर्वसनाचा प्लॅनच नाही…”
दरबारसिंग नाईक यांनी मांडलेल्या योजनेची चर्चा जोरात सुरू झाली आणि रजनीच्या संघटनेमागं लोकांची ताकद उभी राहू लागली.
“योजनेसाठी आम्ही पेवलीतून सुरवात केली. नेहमीप्रमाणे आधी निवेदन, आपल्या समर्थक आमदारांकडून विधिमंडळात प्रश्न हे उपाय झाले आणि शेवटी संघर्षाचा पवित्रा घेतला. पण तो पेवलीपुरताच मर्यादित न ठेवता असे बंधारे होणाऱ्या इतर गावांनाही जोडून घेतलं…”
मांडणगावात रजनीच्या पुढाकारानं निघालेल्या मोर्चात सुमारे पाच हजार गावकरी होते. मोर्चातून रजनीच्या संघटनेची ताकद दिसून आली आणि हालचालींना वेग आला.
“पालकमंत्र्यांनी या योजनेचा विचार करू असं आश्वासन दिलं आणि पाटबंधारे खात्यालाच योजनेवर टिपण देण्यास सांगितलं. तिथंच सारं फसलं. या छोट्या बावीस बंधाऱ्यांची योजना दरबारसिंगांनी मांडली होती. त्या बंधाऱ्यांना येणाऱ्या खर्चाचा अंदाज खात्यानं काढला. मग सुरू झाली लाभ-हानीची आकडेमोड.
“पालकमंत्र्यांचा या योजनेला विरोध होताच. कारण त्याचं श्रेय नायकांना गेलं असतं आणि त्यांच्या आता मृतवत झालेल्या पक्षानं कदाचित उचल खाल्ली असती ही भीती त्यांना होती. त्याहीपलीकडं एक मोठी भीती होती. असे बंधारे झाले तर त्या भागातील वंचित जगण्यातून लोक बाहेर पडतील आणि तसं झालं तर आपली राजकीय पकड ढिली होईल ही खरी भीती. पेवली आणि परिसरातून आम्हाला मिळणारा पाठिंबा त्यांच्या डोळ्यांत भरला होताच…”
पुढं काय घडलं हे खरं तर रजनीनं सांगण्याचीही आवश्यकता नव्हती. तो अंदाज कुणीही बांधू शकतो. दरबारसिंग नाईकांची योजना रेंगाळत गेली. रजनीच्या संघटनेची संघर्षाची ताकद शासनापुढं मर्यादितच होती.
“लाभ-हानीच्या आकडेमोडीतून मग ही कल्पना पुढं आली. पेवली आणि इतर गावांच्या बंधाऱ्यांऐवजी पेवलीच्या खाली धरणच बांधायचं. कारण ते दरबारसिंगांच्या योजनेवर येणाऱ्या खर्चापेक्षा कितीतरी कमी खर्चात पुनर्वसनासह बसत होतं, असं पाटबंधारे खात्यानं लिहून टाकलं…”
विषय धरणाचा आणि इतक्या झटपट, हा कोणाच्याही मनात उमटणारा साधा प्रश्न.
“इथंच तर मेख आहे. दरबारसिंगांनी ती योजना सांगण्याच्या आधी या धरणाचा विचार सुरू झाला होता. ती कागदपत्रं मस्तपैकी उकरून काढण्यात आली. त्या आधारावर आराखडा आणि बाकी गोष्टी कागदावर मांडायला किती वेळ लागतो? अर्थातच सगळ्या हालचाली झटपट झाल्या…”
आणि ओहोळावरचा बंधारा रद्द झाला. तो ओहोळ पुढं ज्या नदीला मिळतो त्या नदीवर थोडं खाली मोठं धरण बांधण्याचं ठरलं. पण इथून प्रश्न नव्यानं सुरू झाला. धरणात काही गावं बुडत होती आणि त्यात पेवली होतं. ‘इथून उठून दुसरीकडं जावं लागेल तुम्हाला,’ सरकारचा कागद आला एक दिवस आणि गावात लगबग उठली.
गाव उठायचं म्हणजे, जायचं कुठं, तिथं काय असणार वगैरे प्रश्नांचा भुंगा सुरू झाला आणि तो गावासाठी स्वाभाविकच जीवनमरणाचा ठरला. पण तसं फारसं काही वावगं वाटलं नाही. कोणालाही. कारण आधीही एवीतेवी मरणाशीच लढाई सुरू होती दोनेक पिढ्या. त्यात ही भर. त्यामुळं गाव उठायला तयारच होतं. जिथं जायचं आहे तिथं काही तरी इथल्यापेक्षा बरं मिळेल ही आशा होती. आणि तसं काही मिळणार असेल तर ते हवंही होतं.
“आधी आमच्याकडं पाणी नव्हतं, पाणी येणार म्हणून भांडलो तर गावातून उठवायचं ठरवलं. गावातून उठायला तयार आहो, पण जायचं कुठं?” पिंजारीचा रोखठोक सवाल.
पाचेकशे बायकांच्या एका सभेपुढं पिंजारी बोलते आहे असं छायाचित्र आणि त्याखाली तिच्याच या सवालाचं शीर्षक केलेली बातमी वाचकाशी बोलत असायची.
“मी पेवलीत भाषण केलं, मांडणगावात केलं. पेवलीच्या आजूबाजूच्या सगळ्या गावांत जाऊन मी बायकांशी बोलले. प्रत्येक गावात सभा झाली. सगळ्या बायका गोळा झाल्या. आम्ही मांडणगावला जाऊन घेराव घातला इंजिनियरला… रामपूरच्या मोर्चावेळी लाठ्या खाल्ल्या आम्ही बायकांनीपण..” भेटली की मग पिंजारी जोशात सांगू लागायची. नेतृत्त्वाच्या नवेपणापेक्षा आपला संघर्ष सांगण्याची ओढच त्यात अधिक.
वैयक्तिक संघर्षही सुरूच असायचा. त्याविषयीही ती बोलायची. तो संघर्ष नवा नव्हे, जुनाच. संदर्भाची चौकट आता नवीन असायची. संघर्ष जुना म्हणजे वंचित जगण्याचा. तोकडी शेती, त्यावर आधारलेलं जगणं. आता नवी संदर्भचौकट म्हणजे या आंदोलनामुळं पायाला लागलेली भिंगरी. त्या जगण्यात या भिंगरीतून कशा एकेक गोष्टी अधिक पेचदार होत गेल्या त्याची ही कहाणी. हे सारं का? तर पुढं मागं तरी चांगलं आयुष्य मिळेल, आपल्याला नाही तर पुढच्या पिढ्यांना तरी.
“तुझ्यासारखं व्हावं असं इथल्या मुलीला वाटत नसेल का? वाटतंच की. मांडणगावात शाळेसमोरून मोर्चा जात होता तर आपल्या मुली कितीतरी वेळ तिथं मैदानात खेळणाऱ्या मुलींकडंच पहात उभ्या राहिल्या होत्या. एकेकीला ओढून पुढं न्यावं लागलं…” मोहाची फुलं निवडता-निवडता पिंजारी सहज बोलून जायची.
“कुठं वेळ असतो त्यांच्याकडं. इथं शेत म्हणून नाही, जंगल म्हणून नाही. कामंच कामं. पोटाला मिळायचं कसं त्याशिवाय? रजनीताई सांगते ते बरोबरच असतं. म्हणून हा झगडा.”
एक-दोन तुटक वाक्यातून आपल्या जगण्याचं सार मांडून पिंजारी पुढं सरकायची.
***
वर्षानंतरचे होळीचेच दिवस, फॅक्स…
“मांडणगावात मोर्चावर लाठीहल्ला, ५५ जखमी”
बातमी ठळक होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच मोर्चाला झोडपून काढलं होतं पोलिसांनी. दहा जणांचं शिष्टमंडळ आत न्यायचं की पंचवीस जणांचं यावरून वाद आणि मग रेटारेटी होऊन पोलिसांचं कडं मोडलं गेलं. लाठीहल्ला. लाठीहल्लाच तो. वर्णनावरून तरी नक्कीच. फॅक्सच्या तळाशी निरोप – प्लीज, सर्क्युलेट कर.
गंभीर जखमींच्या यादीत पिंजारी. जिल्हा रुग्णालयात दाखल होती. हाताच्या कोपरावर टाके घालावे लागले होते. पळापळीत पडून झालेली जखम. कदाचित फरफटही झाली असावी. गुलाबकाका, काकी यांचीही नावं जखमींमध्ये होती. रजनीही जखमी होती.
राज्यभरात या लाठीहल्ल्याची बातमी झाली आणि व्हायचा तो परिणाम झाला.
“लाठीहल्ल्याची चौकशी करण्याची मागणी आज सीएमनी मान्य केली. शिष्टमंडळ भेटलं तेव्हा ते चांगलेच वरमले होते…” चार दिवसांनी मंत्रालयात झालेल्या या घडामोडी. रजनी सांगत होती.
“पिंजारीनं भलतीच कल्पना लढवली. नेहमी शिष्टमंडळात आपण बोलू शकणाऱ्या व्यक्तींना ठेवतो. यावेळी पिंजारीनं सुचवलं की, त्याऐवजी जखमी झालेल्या माणसाना शिष्टमंडळात घ्यायचं. जखमाच बोलल्या पाहिजेत…”
“हो ताई. एरवी बोलणारी असतातच कारण तिथं बोलण्याचं कामच असतंय. पण आत्ता इथं जखमाच दाखवल्या पाहिजेत त्यांना. म्हणून…” पिंजारीची पुस्ती. हे कुठून तुझ्या डोक्यात आलं असं विचारल्यावरची.
“कलेक्टरसायेबच चौकशी करतील. त्यांच्यापुढं आपण साक्ष द्यायची आहे. संघटनेचं निवेदनपण जाईल.” आता तिला ही प्रक्रियाही ठाऊक झालेली असते.
“सीएमनी एकूण लाठीहल्ल्याचं चित्रच पाहिलं माणसा-माणसांच्या अंगावर. त्यामुळं त्यांना या प्रश्नाचंही गांभीर्य समजलं. त्यांनी लगोलग पुनर्वसनाचा आराखडाही तयार करायला सांगितलाय…” ही खरी आश्वासक घडामोड होती. त्यातही संघटनेला काही स्पेसिफिक मागण्या असतील तर त्या द्यायला सांगितलं गेलं होतं. त्याच्याही तयारीत आता ताकद लावावी लागणार होती.
“जमिनीच्या बदली जमीन हे तर आहेच. पण गावठाण एकत्र करून घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलंय. मूळ गावात जशी घरं आणि शेती एकच होती, तसंच इथंही हवंय. म्हणूनच आपण झऱ्याच्या कडेनं लांबसडक जागा मागितली आहे. प्रत्येकाला पाण्याचा स्रोत मिळावा म्हणून…” पिंजारीच्या डोक्यात हेही असायचं.
शाळा, दवाखाना हेच फक्त सामायीक जागेत असावं अशी काहीशी ही सूचना होती.
पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्हं आहेत हे पिंजारी किंवा रजनीनं स्पष्ट बोलून दाखवण्याची गरज नव्हती. दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या ब्रीफिंगच्या बातम्यातून ते स्पष्ट झालं होतं.
“पुनर्वसनाचा आराखडा तयार करणार, उपमुख्यमंत्र्यांकडं समन्वयाची जबाबदारी” हे बातमीचं शीर्षक.
इथंही त्यांनी चलाख राजकारण खेळून घेतलं होतं. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पक्ष एकच. म्हणजेच तुमचं तुम्ही सांभाळा.
पंधरवड्यातच जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचा अहवाल आलादेखील. पोलिसांनी बळाचा अवाजवी वापर केल्याचा ठपका, उपअधीक्षकांच्या बदलीची शिफारस वगैरे.
“हा आमचा विजय म्हणण्यापेक्षा पालकमंत्र्यांचा मोठा पराभव आहे. पण आता आम्हाला आणखी तयारी करावी लागणार. कारण तो पेटून उठणार.” हे मात्र रजनीचं बरोबर होतं. पालकमंत्र्यांचा एकूण स्वभाव पाहता ते पेटून उठणार हे नक्की.
“…त्यात त्यांनी आवर्जून आणलेल्या उपअधीक्षकाची बदली हा किती नाही म्हटलं तरी वर्मी लागलेला घाव असणार.”
एकूण पुढचा मार्ग खडतर होता.
***
दिवाळी, प्रत्यक्ष भेट…
“पिंजारीनं आज कमाल केली. पुनर्वसनात झाडांची मागणी डेप्युटी सीएमला मान्य करावी लागली तिच्यामुळं…”
मांडणगावचा जिल्हाधिकारी तरूण होता. आयएएसबरोबरच त्यानं एमबीएही केलं होतं. पुनर्वसनाचा आराखडा बनवण्याचं काम त्याच्यावरच सोपवण्यात आलं होतं. सलग बैठका, स्पष्ट कार्यक्रम हे त्याचं वैशिष्ट्य.
“त्याचं एक बरं असतं. आठवड्याचे पहिले दोन दिवस तो बैठका लावतो. त्यातला पहिला दिवस असतो तो आधीच्या आठवड्यात केलेल्या कामाचा आढावा घेत त्यातल्या दुरूस्त्या करण्यासाठी. दुसरा दिवस पुढच्या चार दिवसांचं काम ठरवण्यासाठी,” रजनी किती नाही म्हटलं तरी प्रभावित झालेली होतीच. पण इतकं सलग काम काय असणार?
“तेच त्याचं वैशिष्ट्य. छोट्या तुकड्यात काम. त्याच्या म्हणण्यानुसार आराखडा बनवण्यासाठी एकूण सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे. तेवढा पुरेसा आहे. पेवली हे गावच डोळ्यासमोर ठेवून सारं करूया, कारण तेच पहिलं बुडणारं गाव आहे. त्यानंतर बाकीच्या गावांसाठी तेच मॉ़डेल पुढं नेता येतं.”
पर्ट मॉडेलचा वापर करून तो हा आराखडा बनवत होता. कारण स्वाभाविक होतं त्याच्या लेखी. पुनर्वसन बुडिताच्या आधी पूर्ण करावयाचं असल्याने एकेक प्रक्रिया नीट आखून वेळापत्रकात बसवून करणं भाग आहे, असं तो म्हणायचा. त्याच्या तोंडून वारंवार हे पर्ट मॉडेल शब्द यायचे आणि पिंजारी, गुलाबकाका वगैरेंची पंचाईत व्हायची.
“सायब, ते आम्हाला समजत नाही. कळतं ते इतकंच की पाणी येण्याच्या आधी आम्ही तिथून उठून नवीन जागी बसलो पाहिजे आणि पाणी येण्याचे तुमचे अंदाज चुकतात. कागद घ्या, तक्ते आखा किंवा आणखी काय करा,” पिंजारी आता ठणकावून बोलायला शिकलेली होती.
“पाण्याचा अंदाज चुकू नये यासाठी आपण पावसाचाही अंदाज घेऊया…” कलेक्टरची सारवासारव, पण काही सावरलं जाण्याऐवजी तेथे लोक हसलेच.
“गेल्या वर्षी सीईओनं पावसाचा अंदाज घेतला होता सर. नेहमीपेक्षा कमी पाऊस म्हणून. प्रत्यक्षात काय झालं? तुमच्या त्या अंदाजांपेक्षा आमच्या डुव्या कारभाऱ्याचा अंदाज बरोबर निघाला. तो म्हणाला होता, पाऊस जादा आहे यंदाचा असं…” गुलाबकाका.
एकेका मुद्याची अशी चिरफाड करीत आराखडा बनवण्याचं काम सहा महिने सुरू राहिलं. जिल्हाधिकाऱ्यानं ही प्रक्रिया पारदर्शक ठेवली होती, कारण त्यालाही पालकमंत्र्याचा दबाव नकोच होता. त्यामुळं प्रत्येक बैठकीनंतर काय ठरलं याची टिप्पणी संघटनेला द्यायची, त्यांच्याकडून घ्यायची आणि तिसऱ्याच दिवशी ठरलेल्या गोष्टींचं उभयपक्षी मंजूर टिपण तयार करायचं असं तो करायचा. ते टिपण प्रेसकडंही जायचं. बातम्या काही नेहमीच यायच्या असं नव्हतं, पण आपण पारदर्शक आहोत, हा त्याचा संदेश जाऊन पोचायचाच. बहुदा संघटनेच्या मागण्यांमध्ये सातत्य रहावं हाही त्यामागं त्याचा हेतू असावाच.
गावठाणासाठी सरकारच्याच ताब्यात असलेली जमीन द्यायचं नक्की झालं होतं. शेतीही सलग होती. सगळं जमून आराखडा आता अंतिम स्वरूपात तयार होणार असं चित्र असतानाच एके दिवशी पिंजारीनं नवा मुद्दा काढला.
“गावठाणाभोवती दहा हजार झाडं सरकारनं लावून द्यावी. आंबा, मोह, चारोळी वगैरे…”
जिल्हाधिकारी चमकला. हे नवं होतं.
“त्याची तरतूद नाही. आणि आपण जमीन घेतली आहे त्याभोवती जंगल आहेच.” त्याचा युक्तिवाद.
“जंगल तुमचंच आहे. आम्हाला गावासाठी झाडं लावून पाहिजेत. आमच्या मूळ गावात आमची गावाची म्हणून झाडं आहेत.” मुद्दा बिनतोड होता. गावाची म्हणून असणाऱ्या झाडांचा हिशेब भरपाईत कुठंच नव्हता.
जिल्हाधिकारी मात्र त्याला तयार होतच नव्हता. “दहा हजार झाडं काही सरकारला जड नाहीत…” रजनीनं सांगून पाहिलं, पण तो ऐकत नव्हता आणि आराखड्यातील बाकी मुद्यावर सहमती आणि हा मु्दा मतभेदाचा ठेवायचा यावरच शेवटी एकमत करावं लागलं. चेंडू उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात गेला.
मंत्रालयातल्या बैठकीवेळी रजनीसह दहा जण होते. उपमुख्यमंत्री, पुनर्वसन आणि वन खात्याचे सचिव, जिल्हाधिकारी, सीईओ अशी मंडळी सरकारी बाजूनं.
आराखड्यावर प्राथमिक चर्चा झाली. किती गावठाणांना मिळून एक शाळा, एक दवाखाना वगैरे प्रश्न उपमुख्यमंत्र्यांनी विचारले. जिल्हाधिकाऱ्यांनी लोकसंख्येचे गुणोत्तर सांगून त्यांचं समाधान केलं. आश्रमशाळा स्वतंत्रपणे रजनीच्या संस्थेलाच देऊया असंही उपमुख्यमंत्र्यांनी बोलून घेतलं. त्यानिमित्तानं झाला थोडा संघटनेचा सूर मवाळ तर हवाच ही भूमिका.
“त्यावर नंतर बोलू, आधी झाडांचा मुद्दा.” रजनी सावध असावी.
“झाडांचं काय?” उपमुख्यमंत्र्यांचं बेरकी अज्ञान. कारण प्रश्न विचारतानाच हळूच त्यांनी अधिकाऱ्यांना गप्प राहण्याचीही खूण केली होती हे रजनीच्या नजरेनं टिपलं होतंच. पण ती सरळ बोलण्याच्याच पक्षाची.
“गावठाणाभोवती दहा हजार झाडं सरकारनं लावून द्यावीत. त्यांची निगराणी करावी. ती झाडं गावाच्या मालकीची असतील.”
झाडं लावणं इतकाच हा मुद्दा नव्हता. झाडं लावायची म्हणजे त्यासाठी जमीन आली आणि तीच देण्याची सरकारची तयारी नव्हती हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. कारण एकट्या पेवलीचा हा प्रश्न नव्हता.
“गावठाणाची जागा जंगलाला लागूनच आहे.” उपमुख्यमंत्री. ठरलेला सरकारी पवित्रा.
“जंगलात आम्हाला थोडंच जाऊ दिलं जातं. पडलेलं फळ उचललं तरी फॉरीष्ट पकडतो. पन्नास रुपये मोजावे लागतात…” पिंजारी.
वन खात्याचे सचिव काही बोलू पहात होते, पण त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी रोखलं.
या चर्चची हकीकत रजनीच सांगत होती. “झाडांचा इतका का आग्रह, असं उपमुख्यमंत्र्यांनी विचारलं. एकाचवेळी गुलाबकाका, जात्र्या वगैरे बोलू लागले. आपल्या तिघीजणी होत्या. त्या किंचित गप्पच होत्या. ते पाहून उपमुख्यमंत्रीच म्हणाले की, त्यांनाही बोलू द्या. पिंजारीच बोलू लागली. उन्हाळा, शेतीचा प्रश्न, अशावेळी जंगलातील कंदमुळांवरच कसं जगावं लागतं आणि म्हणून झाडं कशी आवश्यक वगैरे ती सांगू लागली. उपमुख्यमंत्री ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आम्ही रोजगाराची कामं काढू वगैरे ते सांगू लागले…”
हा नेहमीचाच सरकारी युक्तिवाद असतो. रोजगारासाठी मागणी करायची, रेशनसाठीही मागणी करायची, त्यासाठीही आंदोलनं करायची हे रजनीला नवं नव्हतंच.
“टेबलाच्या त्या बाजूला उपमुख्यमंत्री. इकडे आम्ही. त्यांच्या उजव्या हाताला सगळे अधिकारी. डावीकडे स्टेनो. अचानक पिंजारी उठली आणि वाकून तिनं उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ते नोट्स घेत असलेले कागदच हिसकावून घेतलं. ती आक्रमक झाली असं वाटून, स्टेनो, इतर अधिकारी पुढं सरसावले. उपमुख्यमंत्र्यांनीच त्यांना रोखलं. मीही पुढं झाले, पण तेवढ्यात पिंजारीचे शब्द आले…
“पिंजारी म्हणाली, ‘सायब, या कागदांवर एक सही करून तुम्ही गाव उठवलं. आता मी कागद काढून घेतले, आता दाखवा तुमचं काम होतं का ते? तुमचा रोजगार तसा असतो. तो कामाचा नाही…’ उपमुख्यमंत्र्यांनी हात पुढे करून पिंजारीकडं कागद मागितले. पण ती ऐकायला तयार नव्हती. ‘जंगलात राहणाऱ्या माणसांना झाडंच वाचवतात. जंगल नसेल तर आम्ही उन्हाळ्यात जावं कुठं. रेशनच्या मागं लागून लाठ्या खाल्ल्या तरी पोटात अन्न पडत नाही.’ पिंजारी कुणालाही बोलू देत नव्हती. एव्हाना तिच्या सुरात इतरांनीही सूर मिसळायला सुरवात केली. त्यांच्या बोलण्यातली खोच उपमुख्यमंत्र्यांच्या बहुदा ध्यानी आली.”
काही काळाच्या चर्चेनंतर गावाभोवती दहा हजार झाडं लावण्याचा निर्णय झाला. गावठाणांच्या जागेचा विस्तार झाला. तोच फॉर्म्यूला इतर गावांसाठी लागू करायचं ठरलं आणि पुनर्वसनाचा आराखडा तयार झाला.
बुडित न आणणारा बांध व्हावा येथून सुरू झालेलं एक आंदोलन आता बुडिताचा आणि म्हणून पुर्वसनाचाही स्वीकार करून थांबण्याची चिन्हे दिसू लागली होती.
सरकार खुश होतं, काही चांगल्या गोष्टी पदरी पडतील म्हणून ही मंडळीही खुश झाली होती. बऱ्याच काळापासून पाहिलेल्या स्वप्नांना एक उभारी मिळू लागली होती.
***
वर्षानंतरची देवदिवाळी, एसएमएस…
“हे तुला पेवलीचं आमंत्रण. नव्या गावठाणात कुदळ मारली जातेय. येत्या पावसाळ्यानंतर हे गाव असणार नाही…”
पेवली. डाकीण म्हणवल्या गेलेल्या बाईनं एकाकी पडल्यानंतर गावातून दोन बछड्यांसह पळून जाऊन उभं केलेलं गाव. हे गाव तर पहायचं होतंच शिवाय, पिंजारी या मर्दानीलाही तिच्या गावातच एकदा भेटायचं होतं. याआधी तिची भेट झाली होती ती मांडणगाव किंवा माझ्याकडंच. तिच्याच गावात तिला भेटून समजून घेणं वेगळंच.
पेवली काही दिवसांत उठणार होतं. त्यामुळं तिथं जाऊन मी गाव डोळे भरून पाहून घेतलं. गावकऱ्यांना भेटले, बोलले. पेवलीला समजून घेण्याचा प्रयत्न केला. सारं काही भरभरून घेतलं, गावातील त्या झऱ्याच्या काठी बसून. संध्याकाळच्या सुमारास ढोल घुमत होते त्या सुरांच्या पार्श्वभूमीवर. पाव्याच्या सुरावटींवर मनाला स्वार होऊ देत.
पाऊस बरा झाला होता. त्यामुळं झऱ्यात पाणी टिकून होतं. गुलाबकाकांच्या घराच्या पाठच्या अंगाला झऱ्याच्या पात्रात आणि काठावरही कातळ होते. पाण्यात पाय सोडून त्यावर आम्ही बसलो होतो.
“चार वर्षं कशी गेली काही समजलंच नाही…” पिंजारीच्या बोलण्यात सफाई येऊ लागली होती थोडीथोडी.
चार वर्षं म्हणजे पेवलीत रजनीच्या संघटनेची शाखा सुरू होणं, धान्यबँक वगैरेचं काम उभं राहणं. त्यातून सावकारीच्या पाशातून काही कुटुंबांची झालेली मुक्ती, मग बंधाऱ्यासाठी संघर्ष, त्यातून पुढं धरण, पुनर्वसन वगैरे. पिंजारी भरभरून सांगायची. सगळ्या सांगण्यात असायचा तो मात्र भविष्याचा वेध. आपल्या पोरांकडं बोट करून म्हणायची, “त्यांच्यासाठी.”
“खायची आजही मारामार आहे ताई. पण आता एक समाधान आहे. काही मिळण्याची शक्यता नक्की आहे. लोकांनी एकी टिकवून धरली तर खूप काही मिळेल…
“तिथं सोपं नाही, पण इथंही सोपं नव्हतंच… कारण आता इथंही जंगल राहिलं नव्हतंच. कष्ट तिथले वेगळे,” हा सगळा संदर्भ पुनर्वसनाच्या गावठाणापाशी अद्याप आपलं जंगल नसण्याच्या मुद्याचा. आता सारं काही शेतात राबूनच करावं लागणार होतं. झालंच तर पुढच्या पिढीला शाळा वगैरे करावीच लागणार होती.
पिंजारी म्हणाली, “शाळा, दवाखाना आणि पाणी या तीन गोष्टी तिथं मिळाल्या की बास्स.”
पुनर्वसनाचा आराखडा होता तसा. दवाखाना आणि शाळा यांच्या जोडीनं वनीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निघालेल्या मोर्चावेळी लाठीमार झाला होता मांडणगावात. तेव्हा झालेल्या धडपडीत पडून हाताच्या कोपराला झालेल्या जखमेचे व्रण दाखवत गप्पांच्या शेवटी पिंजारी म्हणाली, “लाठ्या खाल्ल्या, पण हक्क मिळवला आम्ही.”
***
गाव उठलं. पुनर्वसनासाठी ते जिथं गेलं होतं, तिथून ते पुन्हा विखरून गेलं.
पुनर्वसन झालं त्यावेळी आश्वासन मिळालं होतं, शेतापर्यंत पाणी आणण्याचं. ते काही आलं नाही. झाडांचंही असंच काहीतरी झालं. कारण काही खास नाहीच. सरकारी अनास्था म्हणता येईल, लालफित म्हणता येईल किंवा एकूणच बेपर्वाईही म्हणता येईल. गावकऱ्यांच्या संघर्षाच्या ताकदीची मर्यादा हेही एक कारणच. मग गावाला रोजगारासाठी बाहेर पडावंच लागलं. असं म्हणतात की, त्यावेळी पिंजारी आणि जुवान्यानंही आपल्या दोन पोरांसह गाव सोडला. पुढं केव्हा तरी एकदा ते जवळच्या शहरात बांधकामांवर मजुरी करत असल्याची खबर आली. पण त्या खबरीला तसा अर्थ नव्हता. कारण ती ज्यांच्यापर्यंत पोचल्यानं काही झालं असतं, ती या गावाचा लढा चालवणारी संघटनाही तोवर अस्ताला गेली होती. गाव उठल्याचा तो परिणाम होता असंही म्हणता येतं किंवा रजनीला नव्या भागातील नव्या प्रकल्पांच्या वाटा खुणावू लागल्याचा परिणाम होता असंही म्हणता येतं. एकूण तिथून पुढं पिंजारीचा माग तसा राहिलाच नाही.
***
एका वर्षापूर्वी, एसएमएस…
“पिंजारी गेली. कॅन्सर. शेवटच्या स्टेजलाच समजलं. काही करता आलं नाही…”
पुनर्वसन वसाहतीतून बांधकामाच्या मजुरीवर गेली आणि तिथंच कर्करोगाची शिकार झाली पिंजारी. काही करणं ना जुवान्याला शक्य झालं, ना इतर कोणाला. पोट दुखतंय हे आणि इतकंच कारण, त्यावरचे जुजबी उपचार. गेल्यानंतरच तिच्या कर्करोगाचं निदान झालं.
पिंजारी. बापाचा आजार एकटीच्या जोरावर काढणारी. लग्न न करता जीवनसाथीसमवेत एकत्र राहण्याचं धाडस दाखवणारी. मग तेच लग्न करण्यासाठी तितकाच धाडसी निर्णय घेत एकटीनं शहर गाठून वर्षभर मजुरी करणारी. सार्वजनिक कामात पडल्यानंतर आपल्यातील उपजत गुणांच्या जोरावर पुढं येणारी. पुढच्या पिढीसाठी असं म्हणत त्या कामात झोकून देणारी. संघर्षासाठी गावकऱ्यांना एकत्र बांधून ठेवणारी. उपमुख्यमंत्र्याच्या हातातले कागद काढून घेऊन आपल्या मुद्याचं महत्त्व त्यांच्यावर ठसवू पाहणारी.
पेवलीच्या जोडीनं पिंजारीचीही एक कहाणीच आता राहिली आहे. क्वचित कधी त्या गावातला कोणी वृद्ध असाच कुठं तरी भेटला तर त्याच्याकडून आवर्जून ऐकावी अशी.

Advertisements

निरोप

सप्टेंबर 4, 2010

रेस्ट हाऊसवरून स्पेशल आयजींची गाडी बाहेर पडली आणि त्यापाठोपाठ पत्रकारांचा जत्था बाहेर पडला. डावीकडच्या गेटमधून सारे बाहेर आले. त्या क्षणी त्यांच्यापैकी कोणाच्याही हाती काहीही बातमी नव्हती.
स्पेशल आयजींची बैठक सुमारे सव्वादोन तास सुरू होती. बैठकीत एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्याचं फक्त स्पेशल आयजींनी सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात होती. वाटाघाटींचा प्रयत्न सुरू असला तरी, जन संघर्ष समितीकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नव्हता; मात्र समितीच्या कारवायाही थांबल्या असल्यानं कोंडी फुटण्याची चिन्हं होती.
अर्थात, स्पेशल आयजींनी हे जे काही सांगितलं ते पत्रकारांच्या समोर. मागं बरंच काही घडलं असणार याची किशोरला खात्री होती. किशोरचं काम तेच होतं. मागं जे काही घडलं असेल ते बाहेर काढायचं. तालुक्याच्या ठिकाणी, तेही प्रत्यक्ष संघर्षग्रस्त क्षेत्रात, स्पेशल आयजी येतो, सव्वादोन तास बैठक घेतो आणि फक्त परिस्थितीचा आढावा घेतो यावर त्याचा विश्वास नव्हता. बैठकीला त्यानं एसआरपीही बोलावली होती. एसआरपीचा कमांडंट बैठकीला येण्याची ही पहिलीच वेळ होती, पण ज्याअर्थी तो होता, त्याअर्थी स्पेशल आयजीच्या वरही काही घडलं असलं पाहिजे इतकं त्याला कळत होतं.
साडेचार झाले होते. अंधार पडायला दोन तास बाकी. म्हणजे हाती असलेला वेळ फक्त एका तासाचाच. किशोर रेस्ट हाऊसमधून बाहेर आला आणि त्यानं डावीकडचा रस्ता धरला. फॉरेस्टचं ऑफीस तिथून मैलावर. अर्थात, तिथंपर्यंत जाण्याची गरज नव्हती. अर्ध्या मैलाच्या अंतरावर रस्त्याच्या डावीकडं त्यांचा अड्डा होता. जमणारे सारेच बातमीदार. तिथं बसून बातम्या लिहायच्या. शेजारच्या पीसीओवरून फॅक्सनं पाठवायच्या. पूर्वी फॅक्सच्या आधी एसटीडी करायचे तिथूनच. एका बाजूला पीसीओ. दुसर्‍या बाजूला चहा-भजीची टपरी. दोन्हीच्या मध्ये तीन फूट बाय दहा फुटांची मोकळी जागा. त्या जागेचाच हा अड्डा. सगळ्यांनी मिळून पंचायत सभापती आणि इतरांनाही दमात घेऊन छत टाकून घेतलं. तिथं सगळ्यांना बसण्यासाठी शाळेतल्या बेंचसारखी लांबसडक सोय केली होती. सोपं जायचं. शेजारून चहा यायचा. एकत्र गप्पा करत बातम्याही कळायच्या. आणि मुख्य म्हणजे पीसीओ असल्यानं फोनचा फायदा.
स्पेशल आयजीनं जे सांगितलं होतं, त्याची बातमी किशोरनं सव्वापाचपर्यंतच तयार करून टाकली. त्याच्याकडं ती फार तर दुकॉलमी गेली असती. त्यापलीकडं नाही. त्यामुळं एका पानात त्यानं बातमी संपवली आणि ती पीसीओवर द्यायला तो निघाला तेव्हा तिथूनच बारक्या हाक मारत आला. “फोन आलाय…”किशोर धावत गेला.
“उद्या रात्रीनंतर केव्हाही डामखेड्यापासून सुरवात.” किशोरच्या ‘हॅलो’वर एवढं एक वाक्य उच्चारून फोन बंद झाला.
***
साला… देवरामनं मनातल्या मनातच शिवी हासडून घेतली. जवळपास सव्वापाच होत आले होते. सकाळपास्नं मिटिंगच्या नावाखाली पिट्टा पडला होता. मिटिंगमध्ये आतही शिरता येत नव्हतं. त्यामुळं आधीच आलेला वैताग, आता मिटिंग संपल्यानंतर तास होत आला तरी ही सारी मंडळी रेस्टहाऊसमधून जाण्याचं नाव घेत नसल्यानं, वाढू लागला होता. परिणामी ती शिवी.
दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी मंडळी उठली तेव्हा देवरामला मिटिंगच्या खोलीत घुसण्याची संधी थोडीशी मिळाली होती. त्यावेळी त्याच्या कानावर फक्त डीवायएसपींचं एकच वाक्य पडलं होतं, “सर, डामखेडा जर झालं तर पुढं फारशी अडचण येणार नाही.”
पण त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे मात्र त्याला समजलं नव्हतं. त्यामुळं आतलं काही तरी ऐकणं गरजेचंच होतं. पण ती संधी मिळत नव्हती. मिटिंगच्या हॉलला एकूण तीन दारं. त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वारानंतरच्या व्हरांड्यातील. दुसरं दार होतं ते रेस्टहाऊसकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर उजव्या हाताला असलेल्या व्हीआयपी स्यूटमध्ये उघडणारं. तिसरं दार मागच्या बाजूला. तिन्ही दारं आतून बंद होतीच. शिवाय पुढचा सज्जा आणि मागल्या बाजूला कोठीपर्यंतच्या मोकळ्या जागेत पोलीस होते. तिथं ते कुणालाही फिरकू देत नव्हते. त्यामुळं काही ऐकू येणं मुश्कीलच होतं. जेवणानंतरच्या सत्रात काहीही करून माहिती लागली पाहिजे… देवराम मनाशीच ठरवत होता.
अडीच वाजता देवरामला एका पोलिसानं बोलावलं आणि चहा सांगितला. देवरामच्या वैतागात भर पडली. तीस कप चहा. माणसं तीस, रेस्ट हाऊसवर कप मात्र फक्त बारा. म्हणजे तीन फेर्‍या तर नक्कीच. हा वैताग असायचा. कारण मधल्या काळात चहा गार होणं, एकाचवेळी सारे कप न मिळणं, एखाद-दुसर्‍याची नाराजी… पन्नास भानगडी.
चहाचं आधण टाकून देवराम वळला. कपाटातून त्यानं कप काढले. ट्रे काढला. सिंकवर जाऊन त्यानं कप विसळून घेतले आणि ट्रे घेऊन तो ओट्याकडे येऊ लागला. काय झालं ते त्याला कळलं नाही, पण त्याचा पाय निसटला आणि तोल सावरण्याच्या नादात ट्रेच्या हातात, ट्रेखाली अंगठ्याला अडकवून ठेवलेला कप निसटला, पडला आणि फुटला. क्षणात देवरामनं स्वतःलाच एक सणसणीत शिवी घालून घेतली आणि पुढच्याच क्षणी तो सावध झाला. त्याच्या डोक्यात काही तरी चमकलं आणि चेहरा सैल झाला. देवरामनं स्वतःला सावरलं आणि तो ओट्याकडं सरकला.
चहाचा तिसरा राऊंड होता तो फक्त पुढच्या-पाठीमागच्या बंदोबस्ताच्या पोलिसांसाठी. त्यापैकी पुढं जे तिघे होते, त्यांच्यापैकी एक जण येऊन तीन कप घेऊन गेला. मागचे तिघेच बाकी होते. देवराम त्यांच्यासाठी हातातच कप घेऊन गेला.
देसले हा हवालदार डांबरट आहे हे देवरामला ठाऊक होतं. त्यानं आधी त्याच्याच हाती कप ठेवला. मग तो दोघा कॉन्स्टेबलच्या दिशेनं वळला. आशेनं ते दोघं एकेक पाऊल पुढं आले आणि काही कळायच्या आत देवराम कडमडला आणि पडला. एका कॉन्स्टेबलला दिसलं ते इतकंच – डावीकडून पाठीमागं वळताना देवरामनं फक्त डावा पाय फिरवला असावा आणि उजवा पाय पुढं घेताना तो डाव्या पायाला अडला आणि त्याचा तोल गेला. दोन्ही कप पडले, फुटले. चहा देवरामच्या अंगावर सांडला. दोघांपैकी एक जण आधी पाणी आणायला पळाला. कप पडल्याचा झाला तितकाच आवाज. त्यानंतरच्या हालचाली निःशब्दच. कारण आत मिटिंग सुरू होती. दरवाजा फार काही भक्कम नव्हता. पाणी आलं, कॉन्स्टेबलनं देवरामला उठवलं, दंडाला थोडा चटका बसला होता. पाठीमागंच मिटिंग कक्षाच्या भिंतीला लागून असलेल्या खुर्चीवर त्याला बसवून दुसरा कॉ़न्स्टेबल चहा आणायला निघाला. देवरामनं हळू आवाजात सांगितलं, “काही नाही राव, पाय सटकला. बसतो थोडा वेळ इथंच. चहा घेतला की ठीक.”
देवरामनं डोळे मिटून घेतले होते. त्याचे कान मात्र पूर्ण जागे होते. ज्या खुर्चीवर तो बसला होता, ती खुर्ची बरोबर मिटिंग कक्षात उघडणार्‍या खिडकीपाशी होती आणि खिडकीचं एक दार पूर्ण लागत नव्हतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला तेवढंच हवं होतं. एकेक शब्द तो टिपत राहिला. त्याच्या गावाची लढाई होती अखेर. त्याच्याच गावाची नव्हे तर त्याच्या पंचक्रोशीची. एकदा जमीन गमवावी लागल्यानंतर आलेल्या शहाणपणाला आता समितीच्या कामाची जोड मिळाली होती. पुरेसं होतं देवरामसाठी, त्याच्या गावासाठी काम करण्याकरता.
अर्ध्या तासानं देवराम तिथून उठला. आता ठीक आहे म्हणत त्यानं किचन गाठलं आणि कप धुवायला सुरवात केली.
मिटिंग संपल्यानंतर केव्हा एकदा आपण फोन गाठतो असं देवरामला झालं होतं, पण सव्वापाचपर्यंत ती संधी त्याला मिळाली नाही. डीवायएसपींनी त्याला पुन्हा चहा टाकायला सांगितला होता. चहा घेऊन देवराम मिटिंग कक्षात गेला तेव्हा डीवायएसपींसह सारेच व्हीआयपी स्यूटमध्ये होते. तिथंच त्यानं सार्‍यांना चहा दिला. दार लावलं गेलं, देवराम मिटिंग कक्षात आला. दोनेक मिनिटं तो दाराच्या पुढं दोन पावलं येऊन थांबला आणि ते आता इतक्यात उघडणार नाही याची खात्री झाल्यावर त्याच कक्षात मागल्या खिडकीपाशी असलेल्या फोनकडं वळला.
“किशोरभाईला द्या. मी नरसापूरहून जिवाल्या बोलतोय…” देवरामनं सांगितलं. किशोरला कधीही कोणाचा फोन आहे हे सांगावं लागत नाही हे ठाऊक असूनही त्यानं आपलं ‘नाव’ सांगितलं.
किशोरचा हॅलो ऐकल्यानंतर देवराम बोलू लागला, “उद्या रात्रीनंतर केव्हाही…”
***
जबाबदारी किशोरवर होती. डामखेडा हे समितीचं पक्कं गाव. या गावानंच भूसंपादन रोखून धरलं होतं. सर्वेच होऊ दिला नव्हता. तिथूनच सर्वेची सुरवात सरकार करणार होतं हा त्या खबरीचा अर्थ होता. देवरामनं बाकी काहीही विचारण्याची संधी त्याला दिली नव्हती. ज्या अर्थी त्यानं झटकन फोन बंद केला त्याअर्थी तो रेस्टहाऊसमध्येच होता आणि अद्याप त्यानं तिथून फारसं काही बोलण्याजोगी परिस्थिती नसावी. म्हणजे, पोलीस आणि इतर मंडळी अद्याप तिथंच असावीत. त्यांच्या चहा-पाण्यातून मिळालेल्या सवडीचा देवरामनं निरोप दिला होता हेच महत्त्वाचं. आणि ज्याअर्थी त्यानं संध्याकाळी भेट वगैरे काही सांगितलेलं नव्हतं त्याचा अर्थ इतकाच की त्याच्याकडं तेवढीच माहिती होती.
पोलिसांची पहिली माघार झाली तेव्हाच खरं तर किशोरला संशय आला होता की सरकार गप्प बसणार नाही. ती माघार म्हणजे समितीची जित नव्हतीच. ती त्यांची तात्पुरती माघार होती. पोलीस तिथं असेपर्यंत त्यांना म्हणावे तसे हात-पाय हलवता आले नव्हते. गावात प्रवेशही करणं मुश्कील होतं. कॅप उभे होते आणि उभेच होते. पोलिसांच्या त्या माघारीनंतर प्रेशर वाढवायला हवं होतं. किशोरनं ते बोलूनही दाखवलं होतं, पण… असो. आत्ता गरजेचं होतं माहिती काढणं.
बातमी गेली होती. किशोर पीसीओतून बाहेर पडला. पोलिसांत दोन पर्याय होते. इन्स्पेक्टर गुर्जर किंवा डीवायएसपी जाधव. दोघंही पक्के. ताकास तूर लागू न देणारे. तिसरा पर्याय होता प्रांताधिकारी यंत्रणा. पण तिथंही पंचाईतच. शेवटचा पर्याय होता तो म्हणजे थेट अरवली गाठणं. अरवलीत पोलिसांचा आणि एसआरपीचा एकेक कॅप होता. तिथं हालचाली असणार. उद्यापासूनच काही होणार असेल तर नक्कीच. पण अरवली म्हणजे किशोरलाच परतायला रात्रीचे नऊ वाजणार. त्यानंतर निरोप जायचा कसा पुढं?
थोड्या विमनस्क स्थितीतच तो चालू लागला. स्टँडपर्यंत पोचायला पाचेक मिनिटं लागतात. पलीकडं तिठा. एक रस्ता सरळ अरवली आणि पुढं डामखेड्याकडं जाणारा. डोंगरांमध्ये घेऊन जाणारा. पुढं रस्ता म्हणायचा म्हणूनच. कारण डामखेडा गाठायचं झालं तर किमान सहा मैलांची पायपीट नक्कीच. मोटरसायकल जाऊ शकते, पण सराईतांनाच ते शक्य. तिठ्यावरून दुसरा रस्ता जिल्ह्याकडं. डोंगरांतून बाहेर नेणारा. स्टँडच्या गेटबाहेरच तीन जीप ओळीनं उभ्या होत्या. माल भरला जात होता. किशोरनं स्टँडकडं वळून पाहिलं. जिल्ह्याहून आलेल्या एसटीच्या टपावरून बॉक्स उतरवले जात होते. एक पोलीस व्हॅनही पलीकडं उभी होती. उजवीकडं दूरवर टेकडीच्या बाजूनं जिल्ह्याकडं जाणारा रस्ता दिसत होता. पाचेक मिनिटं तो तिथंच उभा होता. पोलिसांच्या जीपमध्ये सामग्री भरली जात होती. काय करायचं याचा निर्णय होत नव्हता. पण हिय्या करून त्यानं एका ड्रायव्हरला गाठलं.
“काय धावपळ इतकी?”
“आपल्याला काही कळत नाही.” त्याचं तोडून टाकणारं उत्तर.
किशोर इतक्यात हार खाणारा नव्हता. “अरवली का? मला जायचंय तिकडं म्हणून विचारतो.” त्यानं सूर बदलला.
“हो. पण सायबांना विचारा.” या भागात असं अनेकदा जाता येतं एखाद्या सरकारी गाडीतून. त्याचाच फायदा घेण्याचा आपला प्रयत्न आहे असं किशोरनं दाखवलं. ड्रायव्हर किशोरला ओळखत नव्हता.
“उद्या परत येता येईल का? दुपारी दोननंतर बस नाहीये तिथून,” किशोर.
“आता काय सांगावं? उद्या की परवा? मला नाही वाटत…” तो बोलू लागला. किशोरनं त्याला बोलू दिलं. पाच मिनिटांनी तो तिथून निघाला आणि स्टँडच्या दिशेनं वळला. वळतानाच त्याचं लक्ष गेलं जिल्ह्याच्या रस्त्याकडं. ओळीनं व्हॅन्स थांबलेल्या दिसत होत्या. म्हणजे ड्रायव्हरनं दिलेली माहिती नक्की होती. देवरामची माहितीही नक्की होती. आज निरोप पुढं जावाच लागेल. त्याच्या पायांना गती आली. किमान तिघांना भेटावं लागणार होतं.
अड्ड्यावर येताच किशोरनं बारक्याला बोलावलं. एका कागदाचे तीन तुकडे केले. प्रत्येकावर फक्त दुसर्‍या दिवसाची तारीख लिहिली. वकीलांकडं आधी, तिथून त्याच्या दोन खास माणसांकडं – रुपसिंग दुकानदार आणि धनजीसेठ – ही माहिती जाणं गरजेचं होतं. पैसाही महत्त्वाचा आता अशा वेळी; शिवाय धनजीकडून इतर माहितीही मिळणार हे नक्की. चिठ्ठ्या देऊन त्यानं बारक्याला पिटाळलं.
***
रातंब्रीच्या पुढं दोन रस्ते फुटतात. एक खाली उतरतो. खोल खाली. सूर्य मावळण्याच्या साधारण तासभर आधी त्या रस्त्यावरून वाहतूक बंद होते. कुणाचीही. दुसरा रस्ता डावीकडे वळून पुन्हा पहाडात चढतो. घाटाची वळणं घेत चढण संपवतो आणि पठाराला लागतो. तीन गावं ओलांडली की पुन्हा उजवीकडं वळण. एक घाट उतरून तासाभरानंतर तालुक्याचं ठिकाण. आधीच्या फाट्यावरून खाली उतरलेल्या रस्त्यानं मात्र तालुक्याचं ठिकाण गाठायला फक्त वीस मिनिटं लागतात. कारण तो खाली उतरताना पाचेक मैलातच डोंगर संपतो आणि तिथून डावीकडं वळलं की सपाटीचा रस्ता आणि पुढं तालुक्याचंच ठिकाण. पण ते पाचेक मैलांचं अंतर जीवघेणं, अशी त्याची ख्याती. तरसं आणि एखादा बिबटा यांचं क्षेत्र, अशी चर्चा. त्यामुळं मावळतीनंतर कोणीही तिकडून जात नाही. अपवाद दिवा आणि त्याच्या साथीदारांचा. त्यांची खुशाल जा-ये सुरू असते. त्यामुळं, त्यांनीच ती तरस आणि बिबट्याची चर्चा उठवून दिली असावी असं सरकारी लोक नेहमी बोलतात, पण ती चर्चा खोटी ठरवण्यासाठी त्या रस्त्यानं मावळतीनंतर जाण्याचं धाडस दाखवत नाहीत हेही लोकांना पक्कं ठाऊक आहे. अर्थात, लोक या गोष्टींवर अवलंबून नसतात. ते त्यांच्या गतीनं चालत असतात.
दिवा संध्याकाळी सूर्य मावळला की त्याच रस्त्यानं निघतो आणि साडेसातला तालुक्याला पोचतो. आजही तेच. दुपारी तो रातंब्रीच्या पुढं निमखेड्याला गेला होता. तो आणि रामदास. रामदासला मोटरसायकल चालवता येते, पण रस्त्यावर. रातंब्री ते निमखेडा म्हणजे केवळ पायवाट. पायवाट म्हणजे नेहमीच्या पायवाटेपेक्षा रुंद. वाटेत तीन ठिकाणी ओढे ओलांडून जावं लागतं. अंतर सहा मैलांचं. गाडी पहिल्या आणि दुसर्‍या गियरवरच चालवता येते. हे अंतर दिवा कापतो तीस मिनिटांत. मागं बसणार्‍याची तयारी हवी. रामदासची ती आहे. तो नुसता बसत नाही. निमखेडा आणि पुढच्या गावांना न्यायची सामग्री घेऊनच जातो प्रत्येकवेळी. त्यात अगदी वह्या-पुस्तकांपासून काहीही असतं. ‘मसाला’ तर असतोच असतो. अर्थात, ‘मसाला’ असेल त्यावेळी प्रवास रात्रीचा. मोहीमेतील ठिकाणाच्या आधी मैलभर अंतरावर थांबायचं आणि तिथून चालत पुढची वाटचाल.
रातंब्रीच्या फाट्यावरून खाली उतरणार्‍या रस्त्यावरून दिवानं मोटरसायकल काढली आणि रामदासनं काही मिनिटांसाठी दोन्ही बाजूंनी मिळणार्‍या आडोशाचा फायदा घेत बिडी पेटवली.
“अंडी न्यायची का जाताना?” रामदासनं एक झुरका मारून दिवाला विचारलं. तालुक्यालाच मुक्काम करण्याचा त्यांचा विचार होता. दिवानं मान डोलावली. भाकरी आणि अंड्याची भाजी हा बेत रामदासचा आवडता. त्यामुळं स्वारी खुश झाली.
साडेसातला दहा मिनिटं कमी असताना मोटरसायकलनं मधल्या नाल्यावरचा पूल ओलांडला आणि ती डावीकडं गावाच्या दिशेनं वळली. फर्लांगभर अंतर कापलं असेल – नसेल तेवढ्यात दिवाचं लक्ष वेधून घेतलं ते रुपसिंगच्या दुकानावरच्या झेंड्यानं. समितीचा झेंडा. तो त्यावेळी तिथं फडकतोय याचा अर्थ होता की दिवानं तिथंच थांबायचं आहे. किशोरनं आखून दिलेली शिस्त होती ती. दिवानं ब्रेक दाबला. गती कमी झाल्यावर रुपसिंगच्या दुकानाशेजारी असलेल्या बोळात गाडी वळवली, थांबवली आणि तो व रामदास उतरले. दहा एक पावलं चालले आणि रुपसिंगच्या घराच्या मागच्या बाजूला असलेल्या शेतात शिरले. शेत मोठं होतं. डावीकडून चालत ते नाल्याच्या दिशेनं जाऊ लागले. उतार सुरू होतो तिथं चार दांडकी जमिनीत ठोकून चौरस आडोसा तयार केला होता. आतून प्रकाश पाझरत होता याचा अर्थ किशोरभाई आत्ता तिथंच असणार.
“सलाम, किशोरभाई.” दोघंही एकाचवेळी दरवाजातून आत शिरतानाच म्हणाले. किशोरनं हात कपाळापाशी नेला.
औषधाच्या बाटलीतून बाहेर आलेल्या वातीची भगभग सुरू होती. त्या उजेडात तो चिठ्ठी लिहित होता. दोन चिठ्ठ्या लिहून झाल्या होत्या. त्यांच्या घड्या समोर होत्या. दिवा विचारात पडला, किती ठिकाणी जावं लागणार आहे? त्याची ना नव्हती; प्रश्न वेळेचाच असायचा. रात्री किती फिरायचं याला मर्यादा होतीच नाही तरी. साधारण वीसेक मैलांच्या टापूत चार ठिकाणी पोलिसांचे कॅम्प वाटेत लागायचे. तो धोका होता म्हणून. पूर्वी तो रात्रीच्या रात्रीच फिरायचा.
“दिवार्‍या,” किशोर हाच एकटा असा की जो दिवाला त्याच्या पूर्ण नावानं हाक मारायचा, “आज कुठल्याही परिस्थितीत सायगावला जावं लागेल…” किशोर बोलू लागला. दिवानं चमकून त्याच्याकडं पाहिलं. सायगाव म्हणजे डामखेड्याच्या पुढं. जायचं म्हणजे आले त्याच्या विरुद्ध दिशेला. रस्ता ठीक, पण वाटेत सर्वांत मोठा पोलीस कॅम्प. अरवलीचा.
“पर्याय नाही. भाई तिथंच आहे. तो उद्यापर्यंत काही डामखेड्यात येणार नाहीये. उद्या अ‍ॅक्शन सुरू होतीय डामखेड्यातून…” भाई म्हणजे समितीचा सरचिटणीस अनीश रेगे. सध्याचं नाव भाई.
थोडा वेळ सारेच गप्प होते. चर्चा करण्याची गरज नव्हती. भाईपर्यंत निरोप पोचवायचा इतकं पुरे होतं कृती करण्यासाठी. पंधरा मिनिटांनी किशोरनं दिवाच्या हाती तिन्ही चिठ्ठ्या ठेवल्या. एक डामखेड्यात रतीलालला द्यायची होती. ती पूर्वतयारीसाठी असणार. उरलेल्या दोन्ही पुढं सायगावला भाईसाठी. वेगळे विषय असतील तर एकच चिठ्ठी लिहायची नाही; दोन चिठ्ठ्या त्या नियमानुसार.
“आता इथं थांबू नका. आज फौजफाटा आहे इथं. आठनंतर गावांत गाड्या येऊ लागतील. आत्ता बाहेर थांबल्या आहेत…” किशोरनं थांबलेल्या गाड्यांचा उल्लेख केला. गांभीर्य लक्षात येण्यास तेवढं पुरेसं होतं.
किशोरनं गरजेपुरती माहिती त्या दोघांनाही दिली. डामखेड्यात उद्या हजार पोलीस घुसतील. एसआरपीसह. सोबत महसूलची पथकं. तीनशे लोकसंख्येच्या गावाच्या तिप्पट बंदोबस्त. म्हणजे काहीही करून परवा दुपारी मोजणीचा पहिला रिपोर्ट पाठवायचा असणार सरकारला. सुप्रीम कोर्टात चार दिवसांनी सुनावणी. रात्रीच्या सुमारास पोलीस घुसतील. गावात शिरल्यानंतर प्रत्येक घरामागं पोलीस असतील. सोबत एक डेप्युटी कलेक्टर. फायरिंगची ऑर्डर काढणं सोपं. रात्रीतून मोर्चेबांधणी पक्की. सकाळी सगळ्या शेतांची मोजणी सुरू. व्हीडीओ शुटिंग होईल. दुपारपर्यंत डामखेडा पूर्ण करून रिपोर्ट येईल.
दिवा आणि रामदासनं स्वाभाविकच विचारलं, “परत येणार माघारी की…?”
“परत कशाला येतील? पुढचं गाव कळलेलं नाही. पूर्व की पश्चिम इतकाच प्रश्न आहे. उद्या कळेल. निरोप पोचवून तुम्ही दोघंही माघारी या. येताना रस्ता कुठला घ्यायचा हे जाताना परिस्थिती पाहून ठरवा. अरवलीच्या कॅम्पवर हालचाल असेल. त्यातून अंदाज येईल. जमलं तर आरवलीत रामदासला उतरून आत जाऊदे. तासाभरात तो गाव ओलांडून येईल. मग त्याला घे सोबत. तू बाहेरूनच जा…” किशोरच्या सूचना सुरू होत्या.
मोटरसायकल सव्वाआठला तिठ्यावर आली आणि डावीकडं वळून अरवली-डामखेड्याच्या दिशेला लागली.
***
संध्याकाळी साडेसातनंतर स्टँडवर कोणीही असत नाही. शेवटची बस साडेसहालाच गेलेली असते. सात ते सव्वासातच्या दरम्यान दोन गाड्या परत यायच्या असतात. त्या आल्या की सारं सुनसान. पोलीस ठाण्यापासून पाच मिनिटांच्या अंतरावर स्टँड, पण या दिवसांत रोज संध्याकाळी सहानंतर रात्री साडेआठपर्यंत कॉन्स्टेबल पवारची नेमणूक. काम काहीच नाही. चोहीकडं नजर ठेवून रहायचं. कोण येतंय, कोण जातंय हे पहायचं. स्टँडवर फक्त बसायचं नाही. स्टँडच्या समोरून जाणारा रस्ता ते तिठा, तिठ्यावरून माघारी परत स्टँड ते बाजार हा रस्ता आणि त्याला तिथंच डावी-उजवीकडं फुटणारे दोन रस्ते. डावीकडच्या रस्त्यानं नदीकडं जाता येतं. उजवीकडचा रस्ता वसाहतीत. तिथं सरकारी अधिकारी-कर्मचार्‍यांचं वास्तव्य. मुख्य रस्त्यावर स्टँड आणि तिठा यांच्या मध्ये नदीच्या दिशेला एक रस्ता फुटला आहे, तिथं रेस्टहाऊस. तिथंही नजर ठेवायची. बाहेरगावचे पत्रकार रात्रीच गावात पोचतात आणि मुक्कामासाठी रेस्टहाऊसच गाठतात म्हणून.
ठरल्याप्रमाणे बाजार रस्ता, आतले दोन्ही रस्ते करून तो स्टँडवर आला तेव्हा सातचा ठोका झाला. एकटा कंट्रोलर – कंट्रोलर म्हणजे क्लार्कच – होता बसून. त्याच्या शेजारची खुर्ची पवारनं गाठली. खिशातून पुडी काढली. तो तंबाखू मळू लागला. तशी हालचाल नव्हती. त्यामुळं पवार निश्चिंत होता.
पहिली बस यायला दहा मिनिटं लागली. जागेवरूनच पवारला कळलं की बसमध्ये खच्चून सहा-सात जण आहेत. त्यामुळं त्याला उठण्याचीही गरज नव्हती. त्यानं फक्त नजर लावून बारकाईनं पाहिलं. सरपंचाची बायको आणि मेहुणी होती. त्या मेहुणीला पाहताना पवारचा काटा किंचित हलला, पण त्यानं आवरलं. रुपसिंगचा पोरगा होता. तो बहुदा माल घेऊन आला असणार. इतरांमध्ये दोघं तर मास्तरच होते. आज त्यांची मिटिंग असणार झेडपीत. ती उरकून येत असावेत. बाकी एक-दोघं गावकरी. दुसरी बस पाठोपाठच आली. तिच्यातून तर केवळ कंपौंडर उतरला. बस थेट आतमध्ये गेली.
पवारनं हातातल्या कागदावर काही लिहिलं. कंट्रोलरनं पाहिलं पण काही विचारलं नाही. हे आता सवयीचंच होतं. आपला गाशा गुंडाळून तो निघाला.
“ये लवकर उरकलं तर. मी आहे बसलेलो.” कंट्रोलरनं बसलेलो या शब्दावर जोर दिला. अर्थ स्पष्ट होता. गावातल्या एकमेव बारमध्ये. पवारनं मान डोलावली. आणि तोही निघाला.
पवारनं रेस्ट हाऊसचा राऊंड केला. तिथं कोणी आलेलं नव्हतं. एसआरपीचे दोन डेप्युटी कमांडंट सोडले तर. ते सकाळपासूनच होते. देवराम मागं स्वयंपाकाच्या तयारीत होता. आज त्या दोघा कमांडंटच्या जेवणात त्याचं जेवण निघून जाईल. सहजच पवारनं चौकशी केली. कोंबडी होती. देवराम त्याच्याकडं अपेक्षेनं पहात होताच, पण पवारनं स्वतःला आवरलं. बारमध्ये जायचं आहे, हे त्याला आठवलं. तरी देवरामनं आग्रह केलाच. “ये की तिकडून, मी नाही तरी अर्धा किलो जादा आणलंच आहे. तू येशील म्हणून.” देवरामला पक्कं ठाऊक होतं. बारमधून आल्यानं पवार थोडा ढिला होईलच. पुढची कामं मार्गी लावता येतील हा त्याचा विचार.
तिठ्याच्या पलीकडं थोडा उंचवटा आहे. तिथं पोचल्यावर पवार मागं वळला. पंधरा एक पावलं त्यानं कापली असावीत आणि त्याचे डोळे चकाकले. समोरून प्रकाशाचा झोत आला. काही क्षणात मोटरसायकल दिसली आणि ती अरवलीच्या दिशेनं वळली. पवारनं शेजारी शेतात उडी घेतली आणि मधनं धावत त्यानं अरवली रस्ता गाठला. कुंपणाच्या आड असतानाच त्याला चेहरे अर्धवट दिसले – दिवा आणि रामदास! मोटरसायकल निघून गेली आणि पवार वळला. त्यानं पुन्हा आठवून खात्री केली. मोटरसायकलला नंबरप्लेट नव्हती. म्हणजे दिवा आणि रामदासच. आजचं काम संपलं होतं.
रात्रीच्या सुरवातीला दिवा आणि रामदास अरवलीच्या दिशेनं? कुठं निघाले असावेत? ही काही वेळ नाही पहाडात शिरण्याची. अर्थात, समितीच्या लोकांचं काही सांगता येत नाही. ते केव्हाही, कुठूनही उगवतात. हत्यारं असतातच. वेळ आला तर मारायची तयारीही असतेच. पण तरीही…
पवारचं विचारचक्र सुरू होतं. दिवा आणि रामदास हे कधीही सापडत नाहीत. दिसतात सर्वत्र. असतात सर्वत्र. सारी निरोपानिरोपी आणि पोचवापोचवी तेच करतात. या भागांत तरी. आत्ता यावेळी हे दोघं त्या दिशेनं कसे? पवारला आठवलं, दोनेक महिन्यांपूर्वी या दोघांना त्यानं रातंब्रीच्या रस्त्यावर रात्री असंच पाहिलं होतं. ठाण्यात येऊन त्यानं रिपोर्ट केला आणि तो खोलीवर गेला. सकाळी आठ वाजता त्याला कळलं होतं ते इतकंच की रातंब्रीच्या पुढं समितीच्या लोकांनी समरी गावाकडून येणार्‍या पोलीस पार्टीवर हल्ला केला. तिघं मारले गेले. ती पोलीस पार्टी येणार असल्याची खबर दिवा आणि रामदासच घेऊन गेले होते इकडून. पण पुरावा नाही. तेव्हापासून दिवा आणि रामदास यांच्याकडं सारं लक्ष केंद्रित झालं.
डीवायएसपी ऑफीस आणि कंट्रोल रूम. दोन ठिकाणं अशी होती की जिथं दिवा आणि रामदासच्याबाबतीतील निरोप जाणं गरजेचं होतं.
विचारांच्या चक्रातच पवार ठाण्यावर आला. पीआय गुर्जर अद्याप होते. त्यांनाच जाऊन सांगावं, पवारनं ठरवलं.
“सर, दिवा आणि रामदास आत्ता अरवलीकडं गेले. मोटरसायकलवर.”
गुर्जरांनी डोकं वर केलं आणि नजर प्रश्नार्थक केली.
“बाकी काही माहिती नाही. मी तिठ्यावरून परतताना ते वळले तिकडं.”
गुर्जरांनी पुन्हा मान डोलावली. पवार ताठ झाला आणि त्यानं पाऊल मागं टाकलं.
पंधरा मिनिटांत डीवायएसपी, होम डीवायएसपी आणि एसपी या तिघांशीही गुर्जरांचं बोलणं झालं. उद्याची दुपार ही डेडलाईन ठरली, समितीची काय तयारी असेल याची माहिती काढण्याची. अर्थात अ‍ॅक्शन प्रोग्राममध्ये काहीही बदल नाही.
अर्ध्या तासानं गावाबाहेर थांबलेल्या व्हॅन्स गावाच्या दिशेनं सरकू लागल्या.
***
नदीपात्राच्या किनार्‍यावरून वर चढू लागलो की, साधारण दोनशे फुटांवर शेताचा बांध. ते शेत ओलांडलं की गावातलं पहिलं घर. जिवा कारभार्‍याचं. एरवी त्याचं वर्णन झोपडी म्हणूनच होत आलं होतं. बातम्यांमध्ये आणि सरकारी दस्तावेजांमध्ये. पण या घराचं सरकारी कागदपत्रांतील, मोजणी न करताच नोंदलेलं, क्षेत्रफळ सहाशे चौरस फुटांचं. सागाचा वापर. म्हणजे मोल काही लाखांमध्ये जाणारं. नदीकडून वर चढून आलं की घरात प्रवेश करण्याची लाकडी चौकट. सहा फूट रुंदी, आठेक फूट उंची. आत डाव्या हाताला गुरांची जागा. तिच्या पाठच्या बाजूला बहुदा न्हाणीघरासदृष्य सोय असावी. कारण ओल दिसायची. उजव्या बाजूनं घराचा मुख्य भाग. पहिली मोठी खोली. बैठकीची खोली म्हणतो तशी. आत गेलं की कळायचं ही खोली काही स्वतंत्र नाही. सार्‍या घराचीच एक खोली आहे. बाकीच्या सोयी केवळ आडोसा उभा करून आखलेल्या.
रात्री बाराच्या सुमारासही या घराच्या नदीच्या बाजूच्या अंगणात किमान वीसेक डोकी होती. तिघं एका बाजूला होते आणि बाकी सारे त्यांच्यासमोर त्यांचं बोलणं ऐकत असल्यासारखं घोळ करून बसलेले. बाटलीतून काढलेल्या वातीच्या चार ज्योती गरजेपुरता प्रकाश देत होत्या. त्यापैकी दोन या तिघांच्यासमोर ठेवलेल्या. इतर दोन त्या घोळाच्या दोन्ही बाजूंना. हळू आवाजात तिघांचं काही बोलणं सुरू होतं. समोरचे गप्प होते. काही जण हातातील बिड्यांमध्ये गर्क होते. बसलेल्या प्रत्येकाच्या शेजारी त्याचं-त्याचं हत्यार होतं. बहुतेक शस्त्रं बहुदा पोलीसांवर केलेल्या हल्ल्यातून मिळवलेली. ‘मसाला’ नंतर मिळवलेला. शस्त्र आहे म्हणजे नदीच्या पल्याड ‘वर्दीवाला’ म्हणून आणि इकडच्या बाजूला ‘दादा’ म्हणून मिळतो तो मान. घोळक्यापासून सुमारे पन्नास फूट अंतरावर नदीच्या विरुद्ध दिशेला दाट झाडोरा होता हे त्यावेळच्या चांदणप्रकाशातही दिसून येत होतं. त्याच बाजूला आणखी दोन जण होते. गस्तीवर. हातात बंदुका.
पाच-सात मिनिटं कुजबुजीतच गेली आणि त्या तिघांपैकी एकानं तोंड उघडलं.
“रामराम,” समोरच्या घोळक्यातील काही जण नव्यानं आले असावेत. “आत्ताच दिवा आणि रामदास आलेत. एवढ्या रात्री जंगलातला रस्ता कापत आले दोघंही. आपल्यासाठीच. आपलेच आहेत…” आवाज जरबेचा होता. समोर शांतता होती. बसलेल्यांमध्ये काहीही हालचाल नव्हती.
“उद्या, खरं म्हणजे आजच, रात्रीपासून अ‍ॅक्शन घ्यायचं पोलिसांचं ठरलं आहे. डामखेड्यात घुसून मोजणी करणार आहेत. परवा मोजणी पूर्ण करून रिपोर्ट जाईल. त्यानंतर दोनच दिवसांनी कोर्टात केस आहे. तिथं तो सादर केला जाईल…”
बोलता-बोलता तो उठून उभा राहिला. त्याचे हात फिरू लागले. आवाज तापू लागला.
“महिनाभर ठेवलेली शांतता स्वतःच मोडायचं सरकारनं ठरवलंय. आपल्याला उत्तर द्यावं लागेल. उद्याच्या सर्वेतून एका गावाची माहिती सरकार देऊ शकलं तर आपला मुद्दा संपला. काहीही करून उद्या गावात घुसायचं हे त्यांचं ठरलंय. मोजणीसाठी माणसं असतील. हजाराहून जादा पोलीसच आहेत. एसआरपी आहे त्यात. एक डेप्युटी कलेक्टर आहे. फायरिंगची ऑर्डर देण्यासाठी. रात्री घुसायचं आणि परवा सर्वे करून घ्यायचा. हा डाव हाणून पाडावा लागेल…”
जमीन जाऊ द्यायची नाही हे गावकर्‍यांचं पक्कं होतंच. त्यामुळं त्याविषयी फारसं बोलण्याची गरज नव्हती. घर-घर उलथून माती खोदून त्यातून धातू काढण्याचा, म्हणजेच तिथं खाणी काढण्याचा सरकारचा डाव आहे खासगी कंपनीसाठी वगैरे त्यानं काही वाक्यांतच संपवलं. जिओरिसोर्सेस लिमिटेड हे कंपनीचं नाव घेऊन झालं. जिव घेणारी कंपनी असाही उल्लेख झाला. पण ते काही वाक्यांपुरतंच. समितीचं काम आता त्यापुढं आलं होतं याची त्याला जाण होती. नव्हे, परिस्थितीवर त्याचीच मांड पक्की होती. मग चर्चा सुरू झाली. चर्चा एकाच मुद्याची – एकूण किती माणसं डामखेड्यात न्यायची?
अरवलीतून डामखेड्याकडं येताना रस्ता सुटला की सहा मैलांची पायपीट. त्यातल्या मैलभर आधी उजवीकडं वळलं की नदीच्या दिशेनं माणूस जातो. नदीच्या काठावरून एक रस्ता आहे गावात येण्यासाठी. पण ही नदी मगरींची. त्यामुळं तो रस्ता बाद. अरवलीतून मुख्य रस्त्यानंच गावात येणं-जाणं. गाव पहाडात उंचावर आहे. गावात शिरायचं तर तीनेकशे फुटांची चढ आहे. तीनेकशे फूट म्हणजे उंची. अंतर मैलभराचं. ही चढ गाठण्याआधी सखल पठारी भाग. त्यातूनच वाटचाल करत यायचं. या पठारात जंगल नाही. चढ, म्हणजेच डोंगर सुरू होतो तिथं पुन्हा जंगल. त्यामुळं पोलिसांना गाठायचं तर त्या सखल पठारासारखी खिंड नाही. हा प्लॅन पक्का झाला.
डामखेड्यातील वीस जण पक्के होते. आणखी ऐंशी जणांची जुळणी करायची. आजूबाजूच्या गावांतून. शंभर जणांची फौज पुरेशी आहे असं सगळ्याच प्रमुखांना वाटत होतं. त्याच्याशी बाकी सहमत होते. कारण पोलिसांना परतून लावण्याचा फक्त मुद्दा होता आणि आजवरच्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट होती. थोडी जोमाची चढाई केली तर ते ठिकाणच असं आहे की पोलिसांना माघार घ्यावीच लागणार. एकदा का पोलीस इकडं-तिकडं विखुरले गेले की मग विषय संपतो.
“भाई, गोळ्यांचं काय?” एकानं मुद्दा काढला. भाईनं त्याची नोंद केल्याची खूण केली.
बैठकीतूनच जाऊन काही जणांनी जंगलाच्या सीमेवर काही झाडं पाडून रस्ता अडवायचं काम सुरू केलं. जिल्हा कोर्टात जाऊन पोलीस अ‍ॅक्शनला मनाई मिळवण्याचा प्रयत्न करण्याचं ठरलं. हायकोर्टात आणि सुप्रीम कोर्टातही केस सुरू असताना सर्वे करण्याचा सरकारला अधिकार नाही, कारण त्या सर्वेचा अर्थ आमचा मालकी हक्कच नाकारण्याच्या प्रक्रियेची सुरवात वगैरे युक्तिवाद आहे खरा. तरीही मनाई मिळेलच असं नाही, पण कोर्टात गेल्याच्या निमित्तानं बोंबाबोंब करता येणार होती हे नक्की.
शेजारच्या सहा गावांत फौजफाट्यासाठी निरोप रवाना झाले. निरोपे चालतच गेले. चालतच ते थेट डामगावांत येतील.
दिवा व रामदासनं मोटरसायकलला किक मारली तेव्हा पहाटेचे अडीच वाजले होते. जिल्ह्याकडं जायचं होतं – सकाळीच कोर्टात मनाईसाठी अर्ज जावा हा निरोप घेऊन. सोबत काही चिठ्ठ्या होत्याच.
***
जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या समोरचा एसटीडी बूथ शंकरनं उघडला तेव्हा साडेनऊ झाले होते. दुकानाच्या दारात दिवा आणि रामदास थांबले होते. रामदासचा चेहरा ओळखू येत नव्हता. सरदारफेटा डोक्यावर. अंगात टीशर्ट. दिवाच्या डोक्यावर कॅप. त्या दोघांना घेऊन शंकर आतल्या खोलीत गेला. पाचेक मिनिटांतच तो बाहेर आला आणि त्यानं फोन फिरवण्यास सुरवात केली.
सव्वा अकराच्या सुमारास शंकरनं आत जाऊन दिवा आणि रामदासला जागं केलं. कोर्टातली सुनावणी दुपारी होती. त्या दोघांसाठी शंकरनं जेवण मागवलं. जेवून दोघांनीही पुन्हा अंग टाकलं. आधीचा दीड तास आणि आता आणखी अडीचेक तासांची झोप निश्चित होती आणि गरजेचीही होती.
दुकान नोकरावर सोपवून शंकर बाहेर पडला. आज त्याची पायपीट नव्हती. रामदासकडून मोटरसायकलची चावी त्याच्या हाती आली होती. परतताना टाकी फुल्ल करून आणायची होती इतकीच प्रेमाची ‘अट’.
शंकरनं आधी मुख्यालयातच फेरी मारली. एका खोलीत तो शिरला आणि अर्ध्या तासानं बाहेर आला. मग त्यानं गाडीला किक मारली आणि त्यानं नवागावचा रस्ता पकडला. खडबडाटी रस्त्यांवरून आरामात गाडी हाकत तो पोलीस लायनीत एका घरात शिरला. तासाभरानं तेथून तो बाहेर पडला तेव्हा संध्याकाळी पाचनंतर त्याच्या बूथवर येण्याचं त्याच्या मित्राचं आश्वासन त्याच्या हाती होतं.
शंकरनं मग टाकी फुल्ल केली. बूथवर येऊन त्यानं एक फोन आतल्या खोलीत घेतला आणि आतल्या कपाटातून एक डायरी काढली. प्रमुख वृत्तपत्रांतील प्रतिनिधींना निरोप देण्याचं काम त्यानं सुरू केलं.
***
सकाळी सहा वाजता किशोरचा गावात फेरफटका झाला होता तेव्हा एकही व्हॅन त्याला दिसली नाही. याचा अर्थ फौजफाटा अरवलीला गेला होता.
नदीच्या किनारी किशोर भेटला तेव्हा देवरामनं बरोबर दहा मिनिटं पवारनं आदल्या रात्री जे काही सांगितलं होतं त्याची उजळणी केली. त्यानुसार डामखेड्यानंतर राळखेड्याचा नंबर होता. डामखेड्याच्या पश्चिमेला. रेस्टहाऊसवर किशोरनं बारा वाजता चक्कर मारावी असं ठरलं आणि देवराम निघाला तेव्हा साडेसात झाले होते, रेस्ट हाऊसवर एसआरपीचे अधिकारी चहाच्या प्रतीक्षेत होते.
दुपारी बाराच्या सुमारास डीवायएसपींना जिल्हा कोर्टातील अर्जफाट्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं तिकडं धाव घेतली. सुनावणी साडेतीनला होती. त्याच निमित्तानं त्यांनी चौकशी केली तेव्हा समितीनं कोर्ट आणि समर्थकांकडून आवाज उठवणे यावर सारा भर ठेवला असल्याचं त्यांना कळलं. अर्थात, त्यावर त्यांनीही विश्वास ठेवला नाही. तयारी पूर्ण करायचीच होती.
प्रांताधिकार्‍यांनी डेप्युटी कलेक्टरच्या कार्यालयात तीस जणांचं मोजणी पथक हजर केलं तेव्हा अडीच वाजले होते. निघण्यास केवळ दीड तासांचा अवधी होता आणि तेवढाच वेळ कलेक्टरांकडून आलेल्या सूचना अधिक डेप्युटींच्या सूचना यासाठी होता.
रुपसिंग आणि धनजीसेठच्या मागं जिल्ह्यातून आलेल्या पत्रकारांचं पथक रातंब्रीच्या दिशेनं चालू लागलं तेव्हा साडेतीन झाले होते. रातंब्रीमार्गे त्यांना डामखेडा गाठायचं होतं. रातंब्रीच्या पुढं बारा मैलांचं अंतर होतं. काही अंतरावर जीप होती, तिथून ती रातंब्रीच्या थोडं पुढं वेगळ्या वाटेवर नेऊन सोडणार होती. त्यानंतर पायपाटी. ती सारी अंधारात करावयाची होती. काहींच्या पोटात आत्ताच गोळा आला होता. रातंब्रीपासून धनजी आणि रुपसिंग मागं येणार होते, तिथून पुढं समितीच्या हत्यारींच्या ताब्यात पत्रकार जाणार होते.
“पोलिसांचा कोणताही वावगा इरादा नाही, महसूल यंत्रणेचं संरक्षण यासाठीच आम्ही तिथं जाऊ,” पोलिसांचं प्रतिज्ञापत्र मान्य करून, आणि समितीकडून काहीही ठोस पुरावा नसल्यानं, न्यायालयानं सर्वेच्या कारवाईला मनाई हुकूम देण्यास नकार दिला आणि दिवा व रामदास यांनी जिल्ह्याच्या ठिकाणाहून मोटरसायकलला किक मारली. तालुक्यापर्यंत दीड तास आणि त्यानंतर पुढचा वेळ. काहीही झालं तरी मावळतीला अरवली ओलांडलेलं असलं पाहिजे. रामदासनं गाडी सुसाट सोडली तेव्हा सव्वाचार झाले होते.
डेप्युटी आणि प्रांतांच्या पथकासोबत पोलिसांच्या व्हॅन अरवलीच्या दिशेनं निघाल्या तेव्हा पाच वाजले होते.
साडेपाचला किशोरला अड्ड्यावर फोन आला तेव्हा तो नुकताच तिथं पोचला होता. पोचेपर्यंत फोन कट झाला, पण लगेचच पुन्हा रिंग झाली. किशोरनंच फोन उचलला. शंकरचा आवाज. माहिती तीच, ‘डामखेड्यानंतर पश्चिमेकडं. नदीकाठच्या रस्त्यानं; सोबत रस्ता दाखवण्यासाठी फुटके मोती आहेत. फुटके मोती म्हणजे अरवलीचा माजी सरपंच आणि पाटील. समितीतून फुटलेल्यांपैकी दोघं. पश्चिमेकडं म्हणजे राळखेडा हे कन्फर्म.
रेस्टहाऊसच्या मागं नदीच्या किनारी झाडोर्‍यात दिवा आणि रामदास पोचले तेव्हा पावणेसहा झाले होते. सहापर्यंत त्यांनी तिथं थांबायचं होतं. त्यानंतर ते अरवलीच्या दिशेनं जाणार होते.
अस्वस्थ दिवा सारखा घड्याळाकडं पहात होता. सहाला पाच मिनिटं कमी होती. किशोरच्या भेटीशिवाय निघायचं म्हणजे काही घोळ तर नाही? त्याच्या डोक्यात गुंता होऊ लागला होता, पण फार काळ नाही. रेस्ट हाऊसच्या मागून भराभरा चालत येणारी किशोरची मूर्ती दिसली तसा तो स्वस्थ झाला. डामखेड्यानंतर पश्चिमेकडं, हा निरोप सकाळीच गावांत गेला होता. पण अपुरा. आता सविस्तर. पश्चिमेकडंही मोर्चेबांधणी करावी लागणार होती.
नवं आव्हान होतं. पोलिसांनी अरवलीहून कूच करण्याच्या वेळेसच डामखेड्याला पोचण्याचं. कारण तसं झालं तरच पोलिसांच्या ‘स्वागता’ची पश्चिमेच्या गावांतील मोर्चेबांधणी करता येणार होती. अंदाज असा होता की, पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांची पहिली तुकडी आली असेल. गाव वाचवायचं असेल तर दहाच्या आधी गावकर्‍यांची हालचाल सुरू झालेली असली पाहिजे. अशी स्थिती आली की दिवाच्या अंगात यायचं. आत्ताही तेच झालं. गावात निरोप पोचवायचा म्हणजे पोचवायचाच. दहाच्या आतच. त्यानं मोटरसायकलला किक मारली आणि पाहता-पाहता ते तिठ्याच्या पलीकडं दिसेनासे झाले.
***
नदी गावाच्या दक्षिणेकडून यायची आणि गाव वसलेला तिनसाचा डोंगर संपला की किंचित डावीकडं वळून निघायची. नदीच्या पूर्वेकडच्या किनार्‍याकडं जाण्यासाठी हिर्‍या डुंगीतून निघाला तेव्हा स्वच्छ चंद्रप्रकाश पसरला होता. नदीच्या पात्रात आपण दिसू अशी त्याला भीती होती आणि ती साधार होती. पात्र साधारण पन्नासेक मीटर रुंदीचं. तो ते सरळ ओलांडू लागला असता तर पंचाईत नक्कीच होती. त्यामुळं त्यानं नदीच्या प्रवाहात आधी डुंगी टाकली. साधारण मैलभर खाली जाऊन तिथून त्यानं पात्र ओलांडलं आणि समोरच्या बाजूनं तो पुन्हा वर आला. त्या किनार्‍यावर पुढं आत जायचं आणि जाताना इकडच्या किनार्‍यावरच्या रात्रीच्या स्तब्धतेवर नजर ठेवायची. स्तब्धता थोडीजरी विचलीत झाली की काम सुरू. झोप येऊ नये म्हणून बिडी ओढायची. बिडीचा निखारा दिसू नये याची दक्षता घेण्यासाठी उभी ओंजळ बिडीभोवती.
चंद्र डोक्याला तिरपा झाला तेव्हा आपल्याला भूक लागल्याची जाणीव हिर्‍याला झाली. त्यानं डुंगी तिरावर घेतली. बाहेर उडी मारली. डुंगीचा दोर ओढून घेतला आणि काठावरच्या एका बुंध्याला ती बांधली. तो जंगलात शिरला. दहा मिनिटांनी तो पुन्हा डुंगीवर आला तेव्हा त्याचं पोट भरलं होतं. किनार्‍यावर या बाजूला किती वेळ थांबायचं उगाच, असा विचार करून त्यानं डुंगीला थोडी गती दिली. दक्षिणेकडं तो डुंगी हाकू लागला. फर्लांगभर अंतर त्यानं कापलं असेल. नदीच्या पश्चिमेला पठारी भाग सुरू होण्याची चिन्हं होती. कोणत्याही परिस्थितीत डुंगी पश्चिमेच्या तिराला न्यायची नाही असं त्याला भाईनं सांगितलं होतं. त्यामुळं त्यानं डुंगी पूर्वेकडंच ठेवली होती.
डावीकडच्या डोंगरातून एक आवाज हिर्‍याला ऐकू आला. हुंकारासारखा. कोणता तरी प्राणी. अर्थात, हिर्‍याला त्याची भीती नव्हती. तो नदीत होता. पण जिथं हा आवाज ऐकू आला तिथंच त्याला थांबणं भाग होतं. थोडं पुढं मगरींचा टापू. वेळ रात्रीची. त्यामुळं सावधानता अधिक गरजेची. एरवी दिवसा जिथंपर्यंत माणसं जातात, त्याच्या अलीकडंच तो थांबला. त्यानं दूरवर नजर टाकली. अंधारात झाडांच्या फक्त सावल्या दिसत होत्या. हालचाल काहीही नव्हती.
रात्रीच्या वेळी एकट्यानं अशी कामगिरी करण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. त्यामुळं हिर्‍या निवांत होता. एकच अडचण होती, आज त्याला पावा वाजवता येत नव्हता. एरवी अशा वेळी तो निवांत पावा वाजवत असायचा. आज पोलिसांना त्याचं अस्तित्व कळण्याची भीती होती. त्यामुळं फक्त बिडीवर काम भागवावं लागत होतं.
कंटाळा उडवण्यासाठी हिर्‍यानं तोंडावर पाणी मारलं. टॉवेलनं तोंड पुसलं आणि पुन्हा एक बिडी पेटवली. एक दीर्घ झुरका घेतला. धूर सोडत त्यानं समोर दूरवर नजर फेकली आणि तो सावध झाला. दूरवर काही हालचाल दिसू लागली होती. नेमकी कशाची हे कळत नव्हतं. पण हालचाल होती. हिर्‍या टक लावून पाहू लागला. पाचेक मिनिटांत चित्र स्पष्ट झालं. ओळीनं काही माणसं चालत येत होती इतकं त्या सावल्यावरून कळत होतं.
हिर्‍यानं डुंगी वल्हवायला सुरवात केली. लगेच गावात जाणं गरजेचं होतं. ठरवून त्यानं डुंगी पात्रात मध्यावर टाकली आणि तो भराभरा काठीनं पाणी मागं लोटू लागला.
***
डामखेड्यात नैऋत्येला असलेल्या उतारावर दामाचं घर होतं. तिथंच बातमीदारांना थांबवलं होतं. ते पोचले तेव्हा रात्रीचे साडेअकरा झाले होते.
दामाच्या घरापासून पूर्वेला नदी दिसायची. नदीच्या काठाला लागून असणारं जंगल दिसायचं. दक्षिणेला अरवलीहून येणारा रस्ता. त्या रस्त्याच्या अलीकडं असणारंही जंगल दिसायचं. ही मंडळी पोचली तेव्हा मात्र फक्त छाया आणि अंधुक प्रकाशाचा खेळ. त्यावरून अर्थ लावायचा. अरवलीचा रस्ता तिथून जवळ, तर नदीकिनारची वाट लांब. हे ठिकाणच सुरक्षीत आहे, असं बरोबरच्या दादानं सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यापलीकडं जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती.
मध्यरात्रीचे साडेतीन झाले होते. फोटोग्राफरनी सरळ ताणून दिली होती. अंधारात आणि इतक्या अंतरावरून आपला काहीही उपयोग नाही हे त्यांना ठाऊक होतं. ‘अग्निहोत्रीं’च्या गप्पा सुरू झाल्या होत्या. नेहमीच्याच, राजकारणाविषयी. चहाचा, बिनदुधाच्या, एक राऊंड आल्या-आल्या झाला होता. आता दुसरा व्हावा अशी काहींची इच्छा होती. पण तिथली एकूण परिस्थिती पाहता तशी इच्छा व्यक्त करणं मुश्कीलच. एक दोघा अनुभवी मंडळींनी आपल्यासमवेत प्रथमच आलेल्या दोघांचा ‘पाठ घेणं’ सुरू केलं होतं. गंमतीगंमतीत या अशा अनभिज्ञ भागाविषयी, माणसांविषयी काही असे ग्रह करून द्यायचे की हे नवागत काही काळ तरी त्या ‘प्रभावा’तून बाहेर येत नाहीत.
तासभर असाच गेला तेव्हा आत्तापर्यंत डोळे ताणून बसलेल्यांना थोडा पश्चाताप होऊ लागला होता. डोळे ताणण्याऐवजी आल्या-आल्या ताणून दिली असती तर बरं झालं असतं वगैरे त्यांना वाटू लागलं. पण असं करून चालत नसतं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. पोलीस केव्हाही जंगलापलीकडं आणि नदीच्या मधल्या टापूत जमतील आणि त्याचवेळी कदाचित ठिणगी पडेल.
प्रवासात प्रत्येक बातमीदाराला काही गोष्टींची कल्पना समितीकडून स्पष्ट दिली गेली होती. पहिली म्हणजे ते सारे त्यांच्याच जबाबदारीवर तिथं आले आहेत, त्यांना समितीनं आणलेलं नाही. फक्त त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं समितीनं सुरक्षीत रस्त्यावरून त्यांना इथंपर्यंत आणलं आहे. समितीनं हीही दक्षता घेतली होती की, आपल्याकडून त्यांच्या हाती काहीही दिलं जाणार नाही. त्यांची तटस्थता शक्य त्या मार्गानं एस्टॅब्लीश होणं महत्त्वाचं.
सव्वापाचच्या सुमारास उतारावर काही हालचालीची चाहूल लागली. आवाज येऊ लागले. एक हत्यारधारी आधीच त्या दिशेनं गेला होता. आवाजांपाठोपाठ तो धावत आला निरोप घेऊन: “घुसतायेत साले…”
***
हिर्‍या गावात काही मिनिटं थांबला आणि लगेच अरवलीच्या वाटेवर धावत सुटला. साठेक जवान जंगलातच होते. त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे लगेचच.
गावातून त्याचवेळी मेगाफोनवरून एक आवाज आसमंतात घुमला. समितीच्या विजयाचा नारा होता तो. पाठोपाठ दुसरा नारा झाला, “हमारे गावमें हमारा राज”! नारा दिला अनीश रेगेनं, अनुभवी मंडळींनी आवाज ओळखला होता. त्यानंतर अनीशचाच आवाज घुमू लागला.
“सर्वेला सहकार्य केलं जाणार नाही. ताकदीच्या बळावर गावांत घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी करू नये. डेप्युटी कलेक्टर आणि प्रांताधिकार्‍यांनी नोंद घ्यावी की हे प्रकरण हायकोर्टात गेलेलं आहे. तिथं सुनावणी सुरू आहे. अशा स्थितीत सर्वे करण्याचा प्रयत्न म्हणजे कण्टेम्प्ट ऑफ कोर्ट होऊ शकतो…”
मेगाफोन गावात वरच कुठं तरी होता. अंधारात दिसणं शक्य नव्हतं. दहा-पंधरा मिनिटांत झुंजुमुंजू झालं की सारंच स्पष्ट होईल अशा बातमीदार मंडळी होती. बरोबर असणारे दोन्ही तरुण निघून गेले होते. हालचाल करायची तरी कशी हा प्रश्न होता. त्यामुळं तिथंच थांबून राहणं त्यांनी पत्करलं.
सुरवात कशी झाली, काय झालं हे कोणालाही सांगता येणं शक्य नाही. गोंधळ सुरू झाला खाली जंगलापाशी. काही गडबड आहे इतकंच कळत होतं. उजाडलं तेव्हा नदीतीराच्या दिसणार्‍या भागात पोलिसांचीच धावपळ दिसत होती. तिथून अलीकडं फक्त जंगल. पोलिसांकडंही मेगाफोन होता, त्यांचे इशारे समितीच्या पहिल्या घोषणेबरोबरच सुरू झाले होते. त्यामुळं आधी सारंच मेगाफोनचं युद्ध वाटत होतं. आणि त्या युद्धातच केव्हातरी आलेला गोळीचा आवाज विरून गेला. त्यामुळं ती कुठून सुटली, जंगलातून की पठारावरून हे आता कोणालाही सांगता येणं शक्य नव्हतं. एका गोळीनंतर हे आवाज वाढले. पुढं मग फारसं काही कळेनासं झालं. आवाज कानी येत होते. काही कळत नव्हतं, पण त्यांचा अर्थ इतकाच होता की चकमक सुरू आहे.
अंदाज घेत फोटोग्राफर आणि बातमीदार दामाच्या घरापासून खाली उतरू लागले. निघताना त्यांच्यातल्या अनुभवींपैकी कोणी एकानं ओरडून सांगितलं, “काही झालं, एकमेकांना चुकलो तरी ठीक दीड तासानं आहे त्या स्थितीत सगळ्यांनी दामाच्या घरी यायचं. धुमश्चक्री त्याआधी संपली तर आधीच.” किती जणांच्या ते डोक्यात शिरलं हे तपासत बसण्यात अर्थ नव्हता.
खाली उतरता-उतरताच गोळ्यांचा आवाज कानात साठवत कुणी पुढं, कुणी मागं असं करता-करता ते कधी विखुरले गेले ते त्यांनाही कळलं नाही.
***
“सर्वेला विरोध करणार्‍या नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर हल्ला केला. झाडं आडवी टाकून पोलिसांचा रस्ता रोखला होता. पोलिसांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच आधी तुफान दगडफेक करण्यात आली, मग जंगलातून गोळीबार झाला. दीड तासांहून अधिक काळ चकमक सुरू होती. तीन पोलीस मारले गेले. सहा जण जखमी झाले. पथकाला अर्ध्या रस्त्यातूनच माघार घेणं भाग पडलं, कारण सुरक्षीत वाट नक्षलींनी बंद केली होती. मगरींचा संचार होता तिकडून वळून पुढं गावात जाणं शक्य नव्हतं…”
एसपी सांगत होते. घाई दिसत होतीच बोलण्यात, कारण प्राथमिक माहिती देऊन मी घटनास्थळी जाणार आहे असं ते म्हणाले होते. घटनास्थळी म्हणजे अरवली कॅम्पपर्यंत तर नक्की. ब्रीफिंग करताना एसपींनी काहीही मागं ठेवलं नाही. पोलिसी कारवाई फसते आहे हे त्यांनी शांतपणे कबूल केलं. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात समितीचीही हानी झाली आहे इतकंच त्यांना सांगता आलं. प्रत्यक्षात किती आणि काय हे मात्र सांगणं शक्य नव्हतं, कारण ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारला गावात शिरताच आलं नव्हतं. इंडियन मेडिकल असोसिएशनचंच पथक फक्त आत येऊ शकेल असे फलक समितीनं लावले होते. त्याहीपलीकडं, त्या जंगलात अद्याप किमान पंचवीसेक शस्त्रधारी तरी होतेच.
आयएमएचं पथक तिथं पोचेपर्यंत दुपार उजाडणार होती.
***
खडकी, निमखेडामार्गे दिवा एकटाच मोटरसायकलवर आला. रुपसिंगच्या शेतावरच थांबला. किशोर, धनजीसेठ तिथंच होते. निरोप स्वच्छ होता: समितीचा डामखेड्याचा कार्यकारी मंडळ सदस्य वेस्ता आणि सायगावचा सिक्का हे दोघं ‘शहीद’ झाले होते. भाईच्या दंडात आणि मांडीत गोळी घुसली होती. आणखी तिघं जखमी झाले होते. सर्वांना डोली करून निमखेड्याला नेलं होतं. तिथल्या दवाखान्यात उपचार सुरू झाले होते. पोलिसांनी गोळीबार थांबवून मागं जाण्यास सुरवात केली, तसा जंगलातून गावकर्‍यांनीही गोळीबार थांबवला होता. दोन तासांपूर्वीपर्यंत पुढं आलेले सगळे पोलीस अरवली कँपला गेले होते. बातमीदार आणि फोटोग्राफरचं पथकही परस्पर अरवलीला गेलं होतं.
वेस्ता आणि सिक्का यांच्यावर दोन्ही गावांच्या मध्ये जंगलात अंत्यसंस्कार करायचा निर्णय झाला होता.
अंत्यसंस्काराचा निरोप घेऊन समितीचे कार्यकर्ते गावागावांत पोचत होते तेव्हा त्या दोघांच्याही बायका आपले बछडे आणि इतर काहींसमवेत डामखेड्यातच होत्या. दुःखासाठीची उसंत त्यांना अंत्यसंस्कारानंतर मिळणार होती. घरी पोचल्यावरच. ते त्यांनी पत्करलेलं होतं. जमिनीसाठी, कारण एरवीही काही पर्याय नव्हताच, ही त्यांची धारणा होती!
***
कलेक्टर ऑफिसात एकूण रिपोर्ट तयार व्हायला दुसर्‍या दिवसाची दुपार उजाडली. स्वतः कलेक्टर अरवलीपर्यंत जाऊन आले. एसपीही गेले होते. त्यांच्या पाठोपाठ स्पेशल आयजी. नंतरची रिव्ह्यू मिटिंग कलेक्टर ऑफिसलाच झाली. पालकमंत्री दुपारी साडेतीन वाजता तिथं पोचणार होते, नेहमीप्रमाणे त्यांना उशीर झालाच. चार वाजता ते आले तेव्हा स्पेशल आयजींसमवेत कलेक्टर, एसपी अँटे चेंबरमध्ये बसले होते. पालकमंत्री थेट तिथंच गेले.
“नमस्कार. काय परिस्थिती आहे आत्ता?” आत शिरताच पालकमंत्र्यांचा पहिला प्रश्न. कलेक्टर बोलू लागले. मोजक्या पंधरा-वीस वाक्यांत त्यांनी आढावा घेतला.
“पुढं काय? सर्वेला किती दिवसांची स्थगिती आहे?”
“स्थगितीची मुदत नाही. मी आपल्याकडून पुढच्या सूचनांची वाट पाहतोय.” कलेक्टरांचा खुलासा.
“आत्ता घाई नको. सुप्रीम कोर्टच काय ते सांगेल…” पालकमंत्री म्हणाले. कलेक्टरांनी मान डोलावली.
काही औपचारिक चर्चा करून पालकमंत्र्यांनी आतला फोन उचलून सूचना दिली, “रेव्हेन्यू सेक्रेटरींना लाईनवर घ्या.” त्यांचं खातं तेच.
काही क्षणातच फोन लागला. पालकमंत्री इकडून बोलू लागले. पलीकडचं बोलणं ऐकू येणं शक्यच नव्हतं. “तुमच्याकडं प्राथमिक माहिती असेल… कलेक्टरांचा रिपोर्ट येईलच. काय आहे, या कोर्टाच्या ‘जैसे थे’ वगैरे आदेशांनी त्यांना जोर दिला. नाही तर त्यांची ही हिंमत झाली नसती. आता जे झालं ते उत्तम झालं. आय सजेस्ट, वी मस्ट टेक द रिपोर्ट डायरेक्टली टू दिल्ली… सुप्रीम कोर्ट. एकदाचं हायकोर्टातलं लफडंही तिकडं दिल्लीत जाणं गरजेचं आहे. मग या सगळ्यांवर सुप्रीम कोर्ट ऑर्डर देईल. ती काही भूसंपादन करू नका अशी असणार नाही. आत्ता घडलेल्या घटनेतून कोर्टातही गांभीर्य मांडता येईल…”
एसपींना त्याक्षणी मारल्या गेलेल्या तीन पोलिसांची आणि त्यातून एकूण पोलीस दलामध्ये निर्माण होणार्‍या प्रतिक्रियेची चिंता होती. समितीविरुद्ध त्या दुर्गम प्रदेशात झुंजणं सोपं नव्हतं. वर्षभरात बळी पडलेल्या पोलिसांची संख्या आता १२ वर गेली होती.
कलेक्टरांना सर्वे आणखी लांबवता येईल का याची चिंता भेडसावत होती. त्यांना ठाऊक होतं की सर्वे होईलही, पण भूसंपादन शक्य नाही सध्याच्या स्थितीत. पुनर्वसनाचा प्लॅन पक्का नसताना ‘जिओरिसोर्सेस’नं कितीही मोठ्या कल्पना मांडल्या तरी त्या या प्रदेशात प्रत्यक्षात आणणं नेहमीच्या चौपट कामाइतकं होतं.
स्पेशल आयजींचा विचार सुरू होता तो समितीचं कंबरडं कसं मोडायचा याविषयी. जिओरिसोर्सेसच्या एम.डीं.ना दिलेला तो शब्द होता. त्या शब्दावरच पुढं हरिप्रसाद महाराजांचं समाधान अवलंबून होतं. महाराज समाधानी झाले तरच सीबीआयमध्ये जाण्याची संधी, एरवी इथंच राज्यात सडत रहावं लागेल.
“या तीन पोलिसांची नावं काय आहेत?” पालकमंत्र्यांचा अचानक प्रश्न आला एसपींना.
“हेड कॉन्स्टेबल रावण पाटोळे, कॉन्स्टेबल रफीक मुकादम आणि प्रभाकर चव्हाण. तिघंही मुख्यालयातच नेमणुकीला होते.” एसपींनी माहिती पुरवली. पालकमंत्र्यांना नावात काय इंटरेस्ट आहे हे त्यांच्या ध्यानी आलं नाही.
“आपण त्यांच्या घरी जाऊया. भरपाईसाठी मी सीएमसायबांशी बोललो आहे. त्याशिवाय कंपनीही मदत करणार आहे. मुलं केवढी आहेत?”
“तिघंही तरूण होते. मुकादमचा मुलगा आणि चव्हाणची मुलगी बालवाडीत वगैरे आहे. पाटोळ्यांचा मुलगा पुढच्या वर्षी दहावीला जातोय.” एसपी.
“ठीक आहे, त्यांची व्यवस्था करू. जरा डीआयओंना बोलवण्याची व्यवस्था करा…” पालकमंत्र्यांनी जिल्हा माहिती अधिकार्‍यांना बोलावण्याची सूचना केली. उद्याच्या बातम्यांची सोय. चौघंही बाहेर आले.
छोट्याशा औपचारिक बैठकीनंतर मंत्री पुन्हा अँटे चेंबरमध्ये गेले. यावेळी सोबत फक्त कलेक्टर आणि मंत्र्यांचे सचिव व दोन सहायक होते. पाऊण तासानं सारेच बाहेर आले. “चला, आधी पोलिसांच्या कुटुंबियांना भेटून येऊ…” मंत्री म्हणाले.
पत्रकारांना निरोप देण्यासाठी डीआयओंच्या सहायकांची पळापळ सुरू झाली.
***
सचिवालयात महसूल सचिवांच्या दालनांमध्ये नेहमीच्या वेळेनंतरही जाग होती. सुप्रीम कोर्टात सादर करण्याचे प्रतिज्ञापत्र तयार होत होतं. भूसंपादनाला गावकर्‍यांचा विरोध नाही. विरोध आहे तो फक्त समितीचा. समितीच्या शस्त्रांच्या धाकदपटशामुळं गावकरीही दबलेले आहेत. त्यामुळं सर्वंकष कारवाईची गरज आहे असा मुद्दा मांडण्याची सूचना सरकारच्या विशेष वकिलांसाठी त्या प्रतिज्ञापत्रासोबतच्या नोटमध्ये लिहिली गेली होती.
घटनास्थळापाशी केलेल्या व्हिडिओची एक प्रत घेऊन पालकमंत्र्यांचे एक सहायक तिथं पोचण्यास निघाले होते. महसूल सचिवांसाठी निरोप होता, या व्हिडिओवरून ‘आँखो देखा हाल’ तयार करून तो सुप्रीम कोर्टात देण्यासाठी सज्ज ठेवायचा.
***
पालकमंत्र्यांचा ताफा पोलीस लायनीत शिरला. पाटोळे, चव्हाण आणि मुकादमच्या घरांसमोर शोकाकूल मंडळी होती.
विचारपूस करून पालकमंत्री पत्रकारांशी बोलू लागले. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून विशेष घोषणेची अनुमती त्यांना मिळाली होती. तिन्ही पोलिसांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सरकारकडून नियमित मदतीव्यतिरिक्त प्रत्येकी एक लाखाची मदत. तिघांच्या पत्नींना सरकारी नोकरी. तिघांचीही पहिली नावं घेत पालकमंत्री आपुलकीनं बोलले. त्यांचे डोळे पाणावले होते. कॅमेराचे फ्लॅश उडत तेव्हा ते चकाकत!
तिन्ही पोलिसांना श्रद्धांजली वाहून पालकमंत्र्यांनी रेस्टहाऊसकडं कूच केलं.
***
सूर्य मावळतीला निघाला होता तेव्हा पोलीस लायनीपासून साधारण अर्धा फर्लांगभर अंतरावर असलेल्या संस्कार केंद्रातील मुलांना तिथली शिक्षिका प्रार्थना शिकवत होती. तिची आणि त्या मुलांचीही आवडती प्रार्थना,
इतनी शक्ती हमें देना दाता
मनका विश्वास कमजोर हो ना
हम चले नेक रस्तेपे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना…
केंद्रातून बाहेर येणारे शब्द आसमंतात विरून जात होते.
शिक्षिकेच्या आवाजातच दोन चिमुकले आवाजही मिळालेले होते – रोशन मुकादम आणि रेवा चव्हाणचा आवाज!
बापाच्या मृत्यूचा ‘निरोप’ त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी आणखी काळ जाऊ द्यावा लागणार होता.


बांडगूळ!

सप्टेंबर 4, 2010

तो भीषण दुष्काळ पडला नसता तर खान्देशातल्या बोरविहिरच्या रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या आयुष्याचं दान वेगळंच पडत गेलं असतं. म्हणजे तो दुष्काळ पडला नसता तर बोरविहिरमध्ये शेती नीट चालली असती. मग पोटाचा प्रश्र्न निर्माण झाला नसता आणि रामचंद्र साहेबराव बोरसे गावातल्या इतर शेतकर्‍यांमध्ये मिसळून गेले असते. वयात येताच त्यांचं लग्न झालं असतं. संसार फुलला असता, पुढं-मागं गावातल्या राजकारणात ते शिरले असते, कदाचित सरपंच किंवा तत्सम पदापर्यंत पोचले असते. मुलं झाली असती, त्यांची लग्नं झाली असती, रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या अंगा-खांद्यावर नातवंडं खेळली असती, विठ्ठलाचं नाव घेत रामचंद्र साहेबराव बोरसे यांनी आयुष्याची नाव पैलतीरी नेली असती.
पण जगणं इतकं सरळ नसतं. ते एक आडमुठं साल रामचंद्र साहेबराव बोरसे यांच्या आयुष्यात येणार होतं आणि ते आलं. त्या सालानं दुष्काळही आणला.
हा दुष्काळ पडला नसता तर साहेबराव बोरसे यांच्यापुढं कसलाही प्रश्न निर्माण झाला नसता. त्यांच्यापुढं प्रश्न नाही याचाच अर्थ त्याआधीच काही वर्षं मॅट्रिक झालेल्या रामचंद्र बोरसे यांच्यापुढंही प्रश्न निर्माण झाला नसता. अर्थातच, प्रश्न नसल्यानं उत्तराच्या शोधात बोरविहिरहून धुळे आणि तिथून पुढं मुंबई हा त्यांचा प्रवास झाला नसता. हा प्रवास झाला नसता, तर पुढं मुंबईत बाळासाहेब जाधवांशी त्यांची गाठ पडली नसती. ही गाठ नाही म्हणजे मंत्रालय आणि सरकार या एकाच नाण्याच्या दोन बाजू यथास्थित मॅनेज करण्याची हिकमत रामचंद्र बोरसे यांना दाखवावी लागली नसती. त्याचाच अर्थ पुढं आर. एस. बोरसे उर्फ आरेस किंवा रावसाहेब अशा नावानं प्रसिद्ध पावण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती. ही प्रसिद्धी मिळाली नसती, तर पुढं त्यातूनच आलेलं संकट त्यांच्यावर आलं नसतं. ते आलं नसतं तर आजची ही वेळ रावसाहेबांवर कधीही आली नसती…
***
“मॅट्रिक झाला आहेस, आता शेतावर निभावणं मुश्कील. तू बघ कायतरी…” साहेबराव बोरसे यांचे हे शब्द अनपेक्षित नव्हते. आधीच्या तीन वर्षांतील परिस्थिती स्वतः रामचंद्र बोरसे यांनी अनुभवलेलीच होती. बापानं काढलेले कष्ट, वर्षानुवर्षे त्यानंच पेरून ठेवलेल्या पैशाचा आत्ता होत असलेला उपयोग हे सारं त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे, आता पाऊस पडणार नाही आणि पेरा वाया गेला आहे हे त्या वर्षी जेव्हा पक्कं झालं तेव्हा ‘पुढं काय’ हा भारतीय शेतकर्‍यासाठी चिरंतन असलेला प्रश्न उराशी घेऊन बाप-लेक बसले होते.
“मी धुळ्याला जातो. तिथं पाहू. कदाचित नानासाहेबांकडं काही मार्ग निघेल,” रामचंद्र बोरसे यांनी वडिलांना सांगितलं होतं. त्यानुसारच पुढं फारसं काही नाट्य न घडता ते धुळ्याला गेले. तेथे त्यांनी नानासाहेबांची गाठ घ्यायचं ठरवलं होतं. नानासाहेबांच्याच संस्थेच्या शाळेतून रामचंद्र बोरसे यांनी मॅट्रिक केली होती. तिथं त्यांनी आपल्या वक्तृत्त्वाच्या जोरावर नानासाहेबांचं लक्ष एकदा वेधून घेतलं होतं आणि त्यातून ते त्यांचे आवडते विद्यार्थीही झाले होते. त्या जोरावर आता नानासाहेब काही पर्याय आपल्यासमोर ठेवतील असं वाटून रामचंद्र बोरसे यांनी नानासाहेबांना भेटण्यासाठी धुळे गाठलं खरं, पण तिथं त्याच्या पदरी पहिली निराशा येणार होती.
रामचंद्र बोरसे यांनी मॅट्रिक होणं ते आता धुळ्यात येणं या मधल्या काळात झालेल्या उलथापालथीत नानासाहेबांचा संस्थेवरील ताबा सुटला होता. सुटला होता म्हणजे तो हिसकावून घेण्यात आला होता. नानासाहेब शेतकरी कामगार पक्षाशी बांधिलकी मानणारे, आता संस्था ज्यांच्या ताब्यात होती ती मंडळी कॉंग्रेसची. म्हणजे ७० च्या दशकाची कल्पना असलेल्यांसाठी राजकीय पक्षांची ही दोन नावंच नेमकं काय घडलं होतं याची कल्पना येण्यास पुरेशी ठरावीत, रामचंद्र बोरसे यांनाही त्यातून सारं काही समजून गेलं. नानासाहेब सत्तेत नाहीत म्हणजे ते काही करू शकणार नाहीत, हे पक्कं ध्यानी आल्यानं रामचंद्र बोरसे यांनी सरळ मुंबईची वाट धरली. आधी चाळीसगाव आणि तिथून मुंबई. अर्थात, त्याआधी त्यांनी एक केलं. धुळ्यातच ते कॉम्रेड बाबा भदाणेंना यांना भेटले. मिल कामगार संघटनेच्या ऑफिसात. बाबा भदाणे हे रामचंद्र बोरसे यांच्या वडिलांचे मित्र. “मुंबईत आमदार निवासात जा, तिथं कारमपुरींच्या खोलीत तुझी राहण्याची सोय करतो. पण जेवणा-खाण्याचं तुझा तुला पहावं लागेल,” हे बाबा भदाणेंचे शब्द रामचंद्र बोरसे यांना आशीर्वादच वाटले. कारमपुरी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार. भदाणेंचे समकालीक. त्यामुळं त्यांच्या शब्दाचं तिथं वजन होतं.
त्या ऑक्टोबर महिन्यात रामचंद्र बोरसे मुंबईत व्ही.टी.वर उतरले तेव्हा त्यांचं वय होतं २० वर्षे आणि वर चार महिने. हो, त्यांची जन्मतारीख १ जून हीच होती. गावा-गावांतल्या मास्तरांच्या सोयीची. मास्तरांबरोबरच या अशा मुलांचं हितही साधणारी… तर रामचंद्र बोरसे यांनी त्या दिवशी व्ही.टी.च्या बाहेर पाऊल टाकलं आणि रस्त्यांची भव्यता पाहूनच ते चक्रावून गेले. येताना दिसून आलेली या महानगरीची भयंकर लांबी त्यांना घेरून टाकणारी ठरली होतीच. आता हे असं दर्शन. आमदार निवास गाठायचं कसं हा त्यांच्यापुढचा प्रश्न होता. एखाद्याला विचारावं हे उमजण्याइतकंही धैर्य त्यांच्यात त्या वेळी राहिलं नव्हतं.
गर्दी थोडी कमी होईल अशा आशेनं रामचंद्र बोरसे काही वेळ एक कोपरा धरून थांबले. पण अर्धा तास गेला तशी गर्दी तेवढीच आहे किंवा वाढते आहे हे त्यांच्या ध्यानी आलं. त्या एका क्षणानं त्यांच्या जगण्यात एक मोठा बदल घडवून टाकला.
“इथं ही गर्दी अशीच वाढत जाणार असेल तर थांबूनही उपयोग नाही. दोनच रस्ते आहेत – पुढं सरकून आमदार निवास गाठणं किंवा माघारी बोरविहिर. आत्ताच्या घडीला तर दोन्हीकडं उपासच दिसतोय. तिथं इतरही काही नाही. इथं किमान इतक्या गर्दीत काही करता तरी येईल…”
रामचंद्र बोरसे यांचा निर्णय झाला आणि त्यांनी पाऊल पुढं टाकलं. रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसालाच त्यांनी गाठलं आणि आमदार निवासाचा पत्ता विचारला. गबाळ्या अवतारातील अशी काही मंडळी आमदार निवासात येत असतातच, त्यामुळं त्या पोलीसानं हातानं खूण करून रस्ता दाखवला. पहिलं वळण, दुसरं वळण सांगितलं आणि त्यानं लक्ष फिरवलं.
पोलीसानं हात केलेल्या दिशेनं रामचंद्र बोरसे यांनी लक्ष वळवलं आणि पहिलं पाऊल टाकलं, ते प्रथमच एका विश्वासानं. आमदार निवासाच्या दिशेनं. ती वळणं समजून घेत त्यांनी टाकलेलं पाऊल हे त्यांच्या आयुष्यातील पहिलं वळण.
***
दुष्काळाच्या गावी बसलेल्या झळा आणि मुंबईतील वास्तव्यात तुलनेनं आणलेलं सुख यातील नेमका फरक रामचंद्र बोरसे यांच्या ध्यानी यायला वेळ लागला नाही. एकाच राज्यातील ही दोन चित्रं त्यांच्या पटकन ध्यानी आली. गावाकडं दुष्काळामुळं डोक्याला हात लावून बसलेले, पोटात कधी काय जातंय याची प्रतीक्षा करणारे शेतकरी (रामचंद्र बोरसे यांच्या शब्दांत कष्टकरी) आणि त्याचे कुटुंबीय हे चित्र त्यांच्या मनात कोरलं गेलं होतं. मुंबईत त्या चित्राच्या शेजारीच आणखी एक चित्र तयार झालं. नोकरदार मंडळींचं. तुलनेनं समाधानी असणारं. अर्थात, ही सारी या मायापुरीतील पहिलीच प्रतिबिंबं होती. पुढं इतरांच्या मनात अशी अनेक प्रतिबिंबं खुद्द रामचंद्र बोरसे यांना मध्यवर्ती ठेवून उमटणार होती हे त्यावेळी कुणालाही सांगता आलं नसतं इतकं खरं.
आमदार निवासातील पहिला महिना गेला आणि रामचंद्र बोरसे यांच्या एक ध्यानी आलं की, या काळात आपल्याला रोजगार म्हणून काहीही मिळालेला नाही. गावाकडून येताना जे पैसे आणले होते तेही आता संपत आले आहेत आणि पुढं जगायचं असेल तर हात-पाय जोरातच मारावे लागणार आहेत.
“आपल्याकडं आहे ते कौशल्य केवळ लेखन-वाचन इतकंच. डोकं चालतंय, पण ते चालतंय हे दाखवण्याची संधी नाहीये…” स्वतःविषयीच विचार करीत बसलेल्या रामचंद्र बोरसे यांची त्याच मनस्थितीत तेव्हा आमदार असणार्‍या बाळासाहेब जाधवांशी गाठ पडली ती अपघातानंच. ते त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं दुसरं वळण.
“हे निवेदन आपल्याला काहीही करून इंग्रजीत करून घ्यायचं आहे…” साडेसहाफुटी धिप्पाड असं ते व्यक्तिमत्त्व बरोबरच्या कोणाला तरी सांगत होतं. स्वच्छ पांढरं शुभ्र धोतर, झब्बा, डोक्यावर सरळ रेषेत असणारी गांधी टोपी. कपाळावर उभं गंध.
आमदार निवासाच्या कॅण्टिनमध्ये एका टेबलापाशी सुरू असलेला हा संवाद रामचंद्र बोरसे यांच्या कानी पडला, कारण त्यावेळी ते तेथे सकाळचा चहा घेण्यासाठी आले होते. गेल्या महिन्यात रीतसर नोकरीचे अर्ज वगैरे प्रयत्न करूनही पदरी काहीही येत नसल्याने थोडा वैताग आलेलाच होता. माणसं बर्‍याचदा अथक प्रयत्नांती यश न आल्यानं वैतागतात आणि अशा वैतागात काही तरी धाडस करतात. कधी ते अंगाशी येतं तर कधी फायद्यात पडलं. धाडस अंगाशी आलेली माणसं पुढं किरकिरी होत जातात, तर यशस्वी ठरलेली माणसं बहुतेकदा एखाद्या कळसावर जाऊन पोचतात. रामचंद्र बोरसे यांच्या संदर्भात दुसरा प्रकार झाला.
“मी इंग्रजी लिहू शकतो. तुमचं निवेदन तयार करून देऊ शकतो…” काहीही ओळख-देख न करता रामचंद्र बोरसे यांनी त्या माणसाकडं जाऊन थेट सांगितलं. त्या साडेसहाफुटी धिप्पाड व्यक्तीमत्त्वानं त्यांच्याकडं नजर वळवली तेव्हा यांनीही ताकदीनं त्या नजरेला नजर भिडवली. दहा-पंधरा सेकंदांची ती नजरानजर.
“काय नाव?” साडेसहाफुटी आवाज.
“रामचंद्र बोरसे. धुळ्याकडून आलोय. दुष्काळामुळं घरातून बाहेर पडलो. मॅट्रिक झालो आहे. नोकरीचा शोध सुरू आहे. पण काम होत नाहीये. तोवर आधार हवा आहे.” एका दमात त्या व्यक्तीकडून येणार्‍या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊनच रामचंद्र बोरसे थांबले. ते निश्चितपण त्यावेळी दमले असावेत. एक सुस्कारा हळूच सुटलादेखील.
“इंग्रजी येतं?”
“म्हणूनच म्हटलं की, निवेदन लिहून देईन. येतं मला.” हे खरं होतं की रामचंद्र बोरसे यांना इंग्रजी वाक्यं नीट लिहिता यायची. व्याकरणाची चूक होत नसे. पण इंग्रजी येतं असा दावा करण्याइतपत काही ते कौशल्य मानलं जात नसतं हेही खरंच. पण इथं त्यांनी रेटून दिलं.
“कुठं राहतोस?”
रामचंद्र बोरसे यांनी तपशील पुरवला. मग पुढचं सगळं रीतसर झालं. त्या गृहस्थाचं नाव बाळासाहेब जाधव. आमदार. पक्ष अर्थातच कॉंग्रेसच. मातब्बर आसामी. तीन साखर कारखान्यापर्यंत पसरलेली सत्ता. इतर व्यापही मोठा. त्यांनी रामचंद्र बोरसे यांना आपल्या खोलीवर नेलं, निवेदनाचा मसुदा त्यांच्या हाती दिला. रामचंद्र बोरसे यांनी ते इंग्रजीत केलं. अगदी साधंच होतं. मतदार संघात एक मध्यम प्रकल्प होता. त्याच्या कालव्याच्या आखणीबाबतचं पत्र. ते करताना रामचंद्र बोरसे यांच्या तल्लख डोक्यातून किडा चमकून गेला होताच, हे निवेदन इंग्रजीत देण्याचं काहीही कारण नाही, मराठीतच हवं. पण त्यांनी आत्ताच डोकं चालवायचं नाही असं मनाशी ठरवून टाकलं होतं आणि तेच शहाणपणाचं ठरलं हे दुसर्‍या दिवशी त्यांच्या ध्यानी आलं.
“साहेबांनी बोलावलंय…” आदले दिवशी बाळासाहेबांसमवेत असलेला गृहस्थ रामचंद्र बोरसे यांना शोधत होता.
आदल्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला असावा असं समजून रामचंद्र बोरसे गेले.
“कालच्या कामावर आपण खुश आहोत. आपलं असंच काम असतं बरंच. करणार का?” बाळासाहेबांचा प्रश्न. या प्रश्नाचं एकच उत्तर सध्या तरी रामचंद्र बोरसे यांच्याकडं होतं. हो!
“पगार मिळेलच. पण चोवीस तास आपल्याशी बांधिलकी हवी.” बाळासाहेबांनी कामाऐवजी व्यवस्थेची चौकट स्पष्ट केली. रामचंद्र बोरसे यांनी पुन्हा मान डोलावली.
दीडशे रुपये दरमहा. आमदार निवासात बाळासाहेबांच्या खोलीतच राहण्याची सोय, फिरती वगैरे करावी लागलीच तर त्यांच्याच गाडीतून. इतकं पुरेसं होतं रामचंद्र बोरसे यांना.
आणि त्यांच्या हातून खर्‍या अर्थानं पहिलं निवेदन गेलं ते कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना. राज्यातील परिस्थिती बिकट कशी आहे आणि ती हाताळण्याची क्षमता नेतृत्त्वात कशी नाही याचे पाढे वाचणारं निवेदन. आदले दिवशी बाळासाहेबांनी करून घेतलेलं कालव्यासंबंधीचं निवेदन एक चाचणी होती. एका सचिवाला ते निवेदन दाखवून त्यातल्या इंग्रजीची बाळासाहेबांनी खातरजमा करून घेतली होती हे पुढं काळाच्या ओघात उघड झालं खरं, पण रामचंद्र बोरसे यांना या दुसर्‍या निवेदनावेळीच ते समजून चुकलं होतं.
बाळासाहेबांनी अचानक उसळी घेण्याचं कारण पुढं स्पष्ट झालं. मुख्यमंत्र्यांच्याविरोधात पक्षांतर्गत लॉबी सक्रिय झाली होती. गाऱ्हाणी नेहमीचीच. दुष्काळामुळं त्यात भर पडली होती इतकंच. त्यामुळे नेतृत्त्वबदल होणार हे स्पष्ट झालं होतं. हीच वेळ होती, मंत्रीपद पदरात पाडून घेण्याची. भूमिका घेण्याची. बाळासाहेबांनी ती घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात त्यांनी पद नाकारलं होतं, कारण त्यांच्या दुसर्‍या कारखान्याची उभारणी त्यावेळी जोरात सुरू होती आणि तिसर्‍या कारखान्याचा प्रस्ताव मंजुरीच्या वाटेवर होता. आतापर्यंत ही दोन्ही कामं मार्गी लागली होती आणि आता वेळ आली होती काही ठोस करण्याची. मुख्यमंत्र्यांच्या विरोधातील त्यांचं एक निवेदन तसं पुरेसं होतं हे ठोस काम दाखवण्यासाठी. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एकच उमेदवार आणि त्यामुळं तेवढं पत्रच हवं होतं. पाठबळाचा आकडा ठरवणारं पत्र. बाळासाहेबांसोबत सहा आमदार होते.
पक्षाध्यक्षांना निवेदन गेलं. पुढं इतर हालचाली झाल्या, मुख्यमंत्री बदलले, बाळासाहेब नव्या मंत्रिमंडळात महसूल राज्यमंत्री झाले आणि अवघ्या महिन्यापूर्वी एक धाडस करून आमदार निवासाच्या कॅण्टिनमध्ये त्यांच्यासमोर गरजू म्हणून उभ्या राहिलेल्या रामचंद्र बोरसे यांच्या आयुष्यानं तिसरं वळण घेतलं. त्यांना रावसाहेब करणारं वळण ते हेच.
या तीन वळणांपर्यंतचा आपल्या आयुष्याचा रस्ता रावसाहेबांना अगदी स्पष्ट आठवतो. अगदी अर्ध्या रात्रीत त्यांना झोपेतून उठवलं तरी, या वर्णनात फरक पडलेला नाही. या सगळ्या घटना तब्बल बावीस-तेवीस वर्षांपूर्वीच्या. तरीही त्यांना त्या आठवतात. रावसाहेबांच्या संदर्भात केव्हाही कुणालाही ओळख करून दिली जाते ती फक्त त्यांचं बोरविहिरहून धुळेमार्गे मुंबई गाठणं एवढीच. त्यापुढं काही सांगण्याची गरज नसते. कारण तसा हा माणूस म्हणजे ‘ऋषी’च. त्याचं हे कूळच एरवी नवख्यांना ठाऊक नसतं. रावसाहेब किंवा आरएस्स हे पुरेसं असतंच ‘मुंबई – ३२’ या इलाख्यात. मग अशा ओळखीतूनच जेव्हा पुढच्या वाटचालीचा प्रश्न येतो तेव्हा रावसाहेब ही वळणं सांगत जातात. वळणं, प्रत्येक वळणामागं असलेली एक निराशा आणि प्रत्येक वळणापर्यंत आपण कसा तग धरला होता या गोष्टी त्या वर्णनात येतातच. समोरच्यावर आवश्यक ती छाप पडते. ती छाप पाडणं हा काही रावसाहेबांचा हेतू कधीच नसतो. मागं वळून पहाताना रावसाहेब जेव्हा या गोष्टी सांगतात तेव्हा त्यात बराचसा तटस्थपणा असतो यामुळं अनेकांवर प्रभाव पडतो. काहींवर केवळ रावसाहेबांच्या संयमाचा पडतो. थोड्यांवर प्रभाव पडतो तो रावसाहेबांनी हे सगळं करताना दाखवलेल्या कौशल्याचा. फारच थोडे असे असतात की ज्यांना रावसाहेबांची ही वाटचाल नेहमीच रस्त्याच्या विरुद्ध बाजूनं झाली आहे हे कळतं. तसे रावसाहेब उमदे. कोणी ते दाखवून दिलं की मग ते त्यातील पोटवळणं सांगू लागत. मग या कहाणीला रंग लाभत…
***
महसूल राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर बाळासाहेब मंत्र्यांसाठीच्या निवासात गेले, जाताना त्यांनी एक केलं. आमदार निवासातील खोली सरकारकडून भाड्यानं घेतली आणि तिथं रावसाहेबांची व इतर काहींची सोय झाली. परिवर्तन एकच. आधी बाळासाहेब आतल्या खोलीत रहायचे, आता ती खोली रावसाहेबांना एक्स्क्ल्यूझिव्हली मिळाली.
सव्वा वर्षांनी मंत्रिमंडळात खातेपालट झाला. बाळासाहेबांचं प्रमोशन झालं ते कॅबिनेट स्तरावर. रावसाहेबांचंही ‘प्रमोशन’ झालं. ते आता बाळासाहेबांचे सरकारी वेतन घेणारे स्वीय सहाय्यक झाले. रीतसर. म्हणजे झालं असं की बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या एका कारखान्यात लावून घेतलं आणि तिथून त्यांची आपल्या सरकारी स्टाफवर आयात केली. ती करायची कशी हेही त्यांना रावसाहेबांनीच दाखवून दिलं होतं. बाळासाहेबांनीच त्यांना विचारलं होतं, “आरेस्स, तुम्ही आतमध्ये हवे. बाहेरचं काही खरं नाही. काय आहे, किती नाही म्हटलं तरी मी थोडा जुन्या वळणाचाच. त्यामुळं तुम्हाला सारं काही सांगून कामं मार्गी लावणं अवघड जातं. बांधकाम खात्यातून जाधवला घेतला आपण, पण त्याच्याकडं ते नाही…”
“साहेब, काही नाही. आपल्या एका कारखान्यात माझी नियुक्ती दाखवता येईल. तिथून इकडं डेप्युटेशनवर आणता येतं. तेवढा अधिकार तुम्हाला मंत्री म्हणून आहे.”
बाळासाहेबांना शंका होती. त्यांच्या चेहर्‍यावरच ती वाचून रावसाहेब म्हणाले, “साहेब, तसं केलं की तुमचं काम होईल. फक्त त्या बदल्यात तुम्हाला सरकारी खात्यातून कोणी स्वीय सहायक मिळणार नाही. एवढी तडजोड करावी लागेल.”
खात्याचा सचिव आडवा येणार हे रावसाहेबांना ठाऊक होतं. किती झाले तरी ते बाहेरचेच. त्यावरचा तोडगाही त्यांच्याकडे तयार होता. सीएम. बाळासाहेबांकडून प्रस्ताव येताच सीएमची मोहोर उठली. त्यांना आपल्यासोबत ठेवण्याची ती एक किरकोळ किंमत असते, इतर अनेक किंमतींबरोबरच. ती मोजायला सीएम तयार असतातच.
आणि अशा रीतीनं आर. एस. बोरसे यांच्या नावाचा एक आदेश निघाला, आणि त्यांची सोय बाळासाहेबांच्या मुंबईतील ताफ्यात रीतसर झाली. एक पोटवळण त्या प्रवासात असं झालं होतं. आणि या पोटवळणानं आपण स्थिरावतो आहोत, ही भावना रावसाहेबांच्या मनात निर्माण झाली.
***
राजकारण नेहमी बदलत असतं. सत्ता क्षणभंगूर असते, सत्तेबाहेर राहणं हेही क्षणभंगूरच असू शकतं. राजकारणातले हे ‘क्षण’ काही वेळा दिवसांचे असतात, काही वेळेस महिन्यांचे, काही वेळेस वर्षांचे. पण कायम काहीही नसतं. सारं काही बदलतं.
या नोकरीतील पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळेस रावसाहेबांनी बाळासाहेबांच्या मतदार संघात पहिल्यांदा खर्‍या अर्थाने प्रवास केला. याआधी ते त्यांचे सहायक या नात्यानेच होते, मतदार संघाशी संबंध तसा नव्हता. तो आला पहिल्या निवडणुकीच्या निमित्ताने आणि त्याचवेळी रावसाहेबांसमोर काही प्रश्न उभे राहिले.
बाळासाहेबांनी त्यांना एकदा सांगितलं होतं, की ते जुन्या वळणाचे आहेत. माणूस महत्त्वाकांक्षी, पण राजकारण मात्र जुनाट असा त्याचा अर्थ आहे हे मतदार संघात गेल्यानंतर त्यांना कळलं. कदाचित त्याच क्षणी त्यांनी मनाशी काही निर्णय केला असावा.
बदलत्या काळात सहकारी संस्था या राजकीय सत्ताकेंद्रं बनत होत्या, पण त्याकडे सत्ताकेंद्र म्हणून पाहण्याऐवजी कुरण म्हणून पाहण्याची एक प्रथा रुजू लागली होती. बाळासाहेब, खरं तर त्यांची पिल्लावळ त्याला अपवाद नव्हती. आणि एकूणच तीनापैकी पहिल्या कारखान्याचा हिशेब रावसाहेबांसमोर अचानक आला तेव्हा त्यांच्या ते पक्कं ध्यानी आलं.
ऐन निवडणुकीची या धामधूमीतच एके दिवशी कारखान्यावर असताना रावसाहेबांना शोधत तिथल्या पोलीस ठाण्याचे फौजदार आले.
“कंट्रोल रूमवरून मेसेज आहे. सीएमसाहेबांनी औरंगाबादला आज रात्री संपर्क साधायला सांगितले आहे.”
रावसाहेब उडालेच. दस्तुरखुद्द सीएम आपल्याशी बोलू इच्छितात? त्यांच्या मनात वादळं सुरू झाली. एक तर सीएमना काय बोलायचे आहे हे कळलेलेच नव्हते. धामधूम निवडणुकीची आहे. त्यात हे कशासाठी? निवडणुकीशी संबंधित काही? आपल्या हातून काही चूक तर झालेली नाही? खात्याशी संबंधित काही काम? पण त्यासाठी तर बाळासाहेबांशी बोलणं झालं पाहिजे. आपण साधे पीए…
रावसाहेंबानी एक केलं, हा विषय त्यांनी ठरवून बाळासाहेबांकडं काढला नाही. ज्याअर्थी सीएमनी त्यांच्याकरता पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून निरोप पाठवला त्याअर्थी आपण ते बोलू नये हेच उत्तम असा कौल त्यांच्या मनानं दिला होता.
मुख्यमंत्र्यांशी बोलायचं तर कोल्हापूर गाठावं लागणार होतं. जवळचं फोन नीट उपलब्ध असणारं ठिकाण तेच. संध्याकाळपर्यंत कोल्हापूर गाठायचं इतकंच त्यांच्या डोळ्यांसमोर होतं. कारखान्यावरून कोल्हापूर दोन तासांचा रस्ता. मोटरसायकलवरून तो प्रवास करतानाही त्यांच्या डोक्यात कल्लोळ सुरू होताच.
मुख्य अभियंत्याचं ऑफिस उघडून घेण्यास रावसाहेबांना उशीर लागला नाही. औरंगाबादला कॉलही झटपट लागला. पहिल्यांदा बंगल्यावर सीएम अद्याप आलेले नसल्यानं तो दुसर्‍यांदा करायला लागला.
“नमस्कार सर. आर. एस. बोरसे बोलतोय…”
“कुठं आहात आत्ता?”
“कोल्हापूर सर.”
“बाळासाहेबांशी बोललात याविषयी?”
“नाही सर, तशी त्यांची गाठ झाली नाही. ते फेरीवर होते. मी त्यावेळी कारखान्यावर…”
“ठीक आहे…” रावसाहेबांना क्षणभर कळेनासे झाले. सीएमचा सूर एकदम न्यूट्रल होता. आपण केलं त्याचं सीएमनी स्वागत केलं की त्यांचा त्याला विरोध आहे की आणखी काही? ते विचारात पडले तेवढ्यात सीएमनी आपला पॉज सोडून प्रश्न टाकला.
“काय आहे तिथं परिस्थिती?”
“साहेबांना उत्तम. अडचण नाही. एकूण जिल्ह्यात दोन मतदार संघ सोडले तर आपलाच वरचष्मा असेल…”
“माझ्याकडं रिपोर्ट वेगळे आहेत. बाळासाहेबांचा विरोधक… कोण तो…”
“गोविंदराव शिंदे…”
“हां, गोविंदराव. शेकापचा ना तो… मी ऐकलं की जड जातोय. कारखान्यातील लफडी बाळासाहेबांना महाग जाणार…”
रावसाहेब पुन्हा विचारांत. आपण काय बोलावे? छ्या… आपण उगाच या निवडणुकीच्या झमेल्यात पडलो, एक क्षणभर त्यांना वाटून गेलं. सीएमच पुढं बोलले, “आरेस, मोकळेपणानं सांगा. तुम्ही बाळासाहेबांच्या व्यक्तिगत ताफ्यात असलात तरी आता सरकारमध्येही आहात…” सीएमनी वाक्य अर्ध्यावर सोडून दिलं.
झटक्यात रावसाहेबांमधली कोणत्याही परिस्थितीत स्वतःला तगवण्याची इच्छाशक्ती जागी झाली. बोरविहीर ते धुळे, धुळे ते मुंबईत आमदार निवास आणि तिथून आज कोल्हापूर. प्रवास नुसताच झालेला नव्हता. सीएमनी दिलेला संदेश पुरेसा होता.
“सर, अडचण आहे थोडी हे नक्की. गोविंदरावांचा रेटा पाहता ते विरोधी पक्षाचे आहेत की सत्ताधारी हेच कळत नाहीये…”
“तेच म्हणतोय मी…” सीएमनी पुन्हा एक पॉज घेतला. आपण काही बोलावे का या विचारात रावसाहेब काही क्षण होते. पण सीएमनीच त्यांची सुटका केली. “आरेस, असं करा, निकालानंतर येऊन भेटा. तुमच्या कौशल्याचा अधिक चांगला वापर करता येईल…”
“सर, आत्ता काही स्पेसिफिक करण्याजोगं…”
सीएम हसले, “काही नाही आरेस. बाळासाहेबांकडं लक्ष राहू द्या. चिरंजीव त्यांचे काय करतात याकडे लक्ष राहू द्या. ते आले निवडून तर आपल्याला हवेच आहेत.”
ते आले निवडून तर… रावसाहेब विचारांत आणि काही वेळातच सारं काही त्यांच्या लक्षात येऊ लागलं.
***
निवडणुकीचा निकाल ते रावसाहेबांची राज्य लोकसेवा आयोगावर झालेली नियुक्ती यातलं अंतर तसं मोठं, पण रावसाहेबांच्या स्तरावर फारशा घडामोडी नसणारं. राज्याच्या स्तरावर मात्र त्यावेळी घडामोडी झाल्या होत्या. जोरदारच.
सीएमचा पुन्हा शपथविधी झाला. त्यावेळी त्यांनी अवघ्या ८ मंत्र्यांचाच समावेश केला होता मंत्रिमंडळात आणि त्याता बाळासाहेबांचं नाव नव्हतं. बाळासाहेब निवडणुकीत विजयी झाली होते, पण फक्त आठशे मतांनी. निकालापाठोपाठ लगेचच गोविंदरावांनी त्यांच्या इतर काही साथींसह कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आणि ते पाहता बाळासाहेबांच्या भविष्याविषयीच प्रश्न निर्माण झाला होता. कारखान्यातील गैरप्रकारांनी निवडणुकीत फक्त त्यांची बोलीची किंमत घेतली होती, खरी वसुली यापुढे सुरू होणार हे स्पष्ट झालं.
सीएमच्या शपथविधीनंतरच रावसाहेब सीएमना भेटले, तेव्हा सीएमनी त्यांना फक्त इतकंच सांगितलं होतं, “राज्याची यंत्रणा उभी करण्यासाठी भरती आयोगाच्या कामात अधिक गतिमानता आणायची आहे आणि तिथे तुमचा उपयोग होऊ शकतो. विचार करा आणि सांगा.”
रावसाहेबांना विचार करण्याची गरजच नव्हती. कारखाना ते सरकार असा बेभरवशाचा प्रवास करण्यापेक्षा, बाळासाहेबांची हुकमत कमी होत असताना, थेट सरकार हा पर्याय चांगलाच होता.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात बाळासाहेबांचं मंत्रिपद गेलंय, हे नक्की झालं.
कॉंग्रेसमध्ये आलेल्या गोविंदरावांची लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली होती.
रावसाहेबांनी सीएमची पुन्हा भेट मागितली तेव्हा त्यांना तीन दिवस थांबावं लागलं. ठोका चुकलाच. पण तीन दिवसांनी बोलणं झालं आणि सारं स्थिर झालं.
“आरेस, या यंत्रणेला आकार द्यायचा असेल तर आपली मराठी माणसं मोठ्या संख्येनं सरकारमध्ये शिरली पाहिजेत… त्यांना हेरायचं, त्यांच्याकडून तयारी करून घ्यायची आणि पुढं आणायचं हे काम झालं पाहिजे. त्यासाठी तुमच्यासारख्यांची गरज आहे. तुमचा प्रवास मी पाहिलाय. बोरविहीर ते मुंबई. तुम्ही इथं जनसंपर्क अधिकारी म्हणून या. बरंच काही करता येईल…”
सीएमच्या या शब्दांनी रावसाहेबांसमोर मुंबईतील पहिला दिवस उभा राहिला. स्टेशनवरून बाहेर आल्यानंतरचे ते क्षण. त्या पोलिसाला विचारेपर्यंतची धास्तावलेली स्थिती, त्यानंतर टाकलेली पावलं, तिथून बाळासाहेब, मग कारखान्यामार्गे सरकार… आपलं जीवनकार्यच गवसल्यासारखं रावसाहेबांना वाटू लागलं आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी आलं…
“सर…”
“आय अंडरस्टँड. इतक्या संघर्षानंतर इथं पोचताना असं वाटणं स्वाभाविक आहे. पण महत्त्वाचं काम पुढं आहे – जनसंपर्क अधिकारी म्हणून तुम्ही तिथं बरंच काही करू शकाल, पण त्याहीपलीकडं तुमच्याकडून अपेक्षा आहेत. सत्ता राबवणं हे महत्त्वाचं असतं सरकारमध्ये. त्यात तुम्ही इतरत्रही उपयुक्त आहात. तुम्ही कारखाना ते सरकार हा मार्ग जो काढला स्वतःसाठी, असे पर्याय इथं आवश्यक असतात. नवी मंडळी आता मंत्री आहेत. त्यांच्यासाठीही तुमचा उपयोग होईलच…”
हे तर रावसाहेबांच्याच भाषेत ‘ओसरी-पसरी’ होतं. आपल्याकडं असं आहे तरी काय की ही संधी यावी? रावसाहेबांच्या मनात उमटलेल्या या प्रश्नाचं उत्तर सीएमनी दिलं,
“आरेस, तशी ही गोष्ट खूप छोटी आहे, पण मी तुमच्याशी थेट बोलतोय त्यातच समजून घ्या. तुमच्याकडं क्षमता आहेत. त्या योग्यवेळी योग्य पद्धतीनं आपण उपयोगात आणू. सध्या तुमची गरज आहे ती सुधाकररावांना…”
सामान्य प्रशासन खात्याचे राज्यमंत्री सुधाकर मुळक. रत्नागिरी – कोकण. सीएमचा माणूस. त्यांनी स्वतःच पुढे आणलेला. लोकसेवा आयोग ही केवळ सोय? रावसाहेबांनी प्रश्न मनात अगदी खोलवर गाडून दिला आणि ते उठले. टेबलाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सीएमचे पाय धरले…
आर. एस. बोरसे यांच्या आयुष्यातील हे चौथं वळण!
***
मुळकांसोबत रावसाहेब टिकले ते आठ महिने. त्यानंतर लोकसेवा आयोगातही ते राहिले नाहीत. पण या दोन्ही घडामोडींआधी त्यांनी आपल्या पुढच्या रस्त्याची जणू आखणीच केली होती.
घटनांचा अन्वयार्थ रावासाहेबांना लावता येईलच असं म्हणता येणार नाही. म्हणजे त्यांच्या कथनातून तरी तसा तो जाणवत नसायचा. मुळकांना त्यांच्या मतदार संघातील एकाची फौजदारपदी निवड करून हवी होती. ही अगदी त्यांच्याही कारकीर्दीची सुरवात. या निवडीसाठी समितीच्या सदस्यांकडं रावसाहेबांनी शब्द टाकला.
“गरजू आहे. हुशारही आहे. लेखी परीक्षेत थोडा मार खाल्ला आहे… थोडं डावं-उजवं करून त्याचं काम झालं तर बरं होईल…” रावसाहेबांनी केलेला युक्तिवाद असा साधा-सरळ होता. थोडं डावं-उजवं म्हणजे काय हा त्यांच्यासमोर आलेला प्रश्न होता. तेव्हा रावसाहेबांनी स्पष्ट सांगून टाकलं, “तुमच्यासमोर पार्श्वभूमी असते उमेदवारांची… गरज अधिक कोणाची हे ठरवता येतं, गुणवत्ता म्हणाल तर हा मुलगा त्यात बसेलच असं नाही, कारण लेखीत खाल्लेला मार. पण गुणवत्ता इतरही असते. एका परीक्षेवर ती ठरवू नका इतकंच माझं म्हणणं आहे. तोंडी परीक्षा थोडी चोख घ्या.”
रावसाहेबांचा हा युक्तिवाद मान्य झाला किंवा कसे हे त्यांनाही सांगता येणार नाही. इतकं खरं की, हा उमेदवार  – प्रकाश सावंत – निवड झाल्यानंतर रावसाहेबांकडं आला. पाया पडला आणि म्हणाला, “साहेब, तुमच्यामुळं आयुष्याची रांग लागली.”
सुधाकर मुळकांना हे कळलं तेव्हा त्यांनी रावसाहेबांना विचारलं, की हे काम कसं झालं? रावसाहेबांच्या ध्यानी आलं, यातलं त्यांचं कौशल्य केवळ निवड समितीच्या सदस्यांना पटवण्याचं. इतर काही व्यवहार न करता हे झालं होतं हेही त्यांच्या लक्षात आलं.
रावसाहेबांना वाटलं होतं की मुळकांच्या या उमेदवाराची सोय झाली आणि प्रश्न सुटला. पण तसं नव्हतं. हा सावंत सहा महिन्यांनी नोकरीच्या ठिकाणी रुजू झाल्यानंतर पुनश्च एकदा मुंबईत आला तेव्हा रावसाहेबांना भेटला. दोघांची रात्री एक छोटी बैठक झाली. त्या बैठकीत ‘बोलता-बोलता’च त्याच्या तोंडून निघून गेलं,
“युक्तिवाद तुमचा. पण त्यासाठी मी किंमत मोजली रावसाहेब. आठ हजार रुपये…”
रावसाहेबांना कळेना. त्यांनी खोदकाम सुरू केलं आणि मग कळलं, मुळकांच्या निवडणूक लढवण्याच्या क्षमतेत त्या आठ हजारांनी भर पडली आहे. त्या एका क्षणी रावसाहेबांसमोर आणखी काही गोष्टी आल्या – आपल्या जगण्याची पद्धत या काळात बदलली आहे. आपण राहतो आमदार निवासातच, पण आता तिथं पक्के पाय रोवावे लागतील. गरजा बदलल्या आहेत. काही दिवसात आपलं घर असावं लागेल. गावाकडं शेतात पंप बसवायचा आहे. त्याशिवाय पाणी येणं शक्य नाही. जमल्यास बोअर करायची आहे. सरकारी योजनांत आपली जमीन बसत नाही म्हणजे हा खर्च आला.
आपलं काय? प्रश्नाच्या एकेका गुंत्यातून ते पुढं सरकले आणि स्वतःपाशीच येऊन थांबले. लग्न!!! करावं लागेल. बाप केव्हाचा मागं लागलाय. गावाकडं घर वाढवावं लागेलच. बायको तिकडचीच, इकडं येईल याची खात्री नाही…
आणि रावसाहेबांचे काही निर्णय झाले. त्यांच्यासमोरचे हे प्रश्न इतके मोठे की त्यापुढं बाकी सारं किरकोळ ठरलं… म्हणजे अशा भाषेत ते मागं वळून पाहताना बोलत इतकं नक्की. त्याक्षणी त्यांच्यालेखी ते प्रश्नही मोठे असतीलच का? तसंही सांगता येणार नाही. आठवणींचा प्रवास इथवर यायचा तोवर हे युक्तिवाद तयार होत जायचे.
आयोगाची यंत्रणा कधी त्यांच्या कब्जात आली हे त्यांनाही आता सांगता येत नाही. त्यांच्या ‘प्रभावा’मुळं नोकरी लागलेल्यांची संख्याही त्यांना मोजता येत नसावी. सेवाश्रेणी वाढत गेली, तसा त्यांचा कारभार वाढत गेला. निवडपरीक्षांच्या काळात आमदार निवासातील गडबड वाढत गेली. एकट्याच्या हातून रावसाहेबांना सारं काही झेपेनासं झालं. मग त्यांच्या जोडीला एक टीम उभी राहिली. न सांगताच. काही न ठरवताच.
आयोगामार्फत होणारी भरती एवढं एकच क्षेत्र त्यांचं होतं. या आयोगातूनच शासकीय यंत्रणेच्या सगळ्या खात्यांमध्ये भरती होत असे. वेगवेगळ्या स्तरांवर ती असायची कारकूनापासून ते अगदी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत. सगळीकडं रावसाहेबांचं अस्तित्त्व होतं. थेट सीएमपर्यंत ते पोचायचे अगदी लीलया. सीएमची आणि आणखी दोघा-तिघांची नोकर्‍या लावण्यासाठीची ख्याती झाली ती याच काळात. नोकरीचा हा प्रश्न सीएमकडं गेला की निकाली निघतो अशी त्यांची प्रतिमा होती. रावसाहेबांच्या या व्यवहारांची मांडणीच तशी होती. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी मग सीएमचा निरोप यायचा, त्यांनी सांगितलेला आकडा रावसाहेबांनी पूर्ण करायचा इथकं सारं सुरळीत होत गेलं. मुळकही त्या व्यवस्थेत आले. पण कधी काळी रावसाहेबांचे बॉस होते ते, ते आता मात्र त्यांच्या बरोबरीचे आणि काही काळाने दुय्यम झाले. सीएमचा सपोर्ट मग रावसाहेबांच्या दिशेनं वळला.
आधुनिक काळात उद्योगांनी उदारीकरणानंतर आपापले कोअर एरियाज डिफाईन करून घेतले, त्याची रावसाहेब नंतर-नंतर खिल्ली उडवत. ते म्हणायचे, “त्याच काळात मी माझा कोअर एरिया ठरवला होता. मी फक्त भरतीचंच काम करायचो. मंत्रालयातील इतर सेटिंग्ज माझ्यासमोर व्हायची, पण मी त्यात कधीही पडलो नाही. नंतर-नंतर तेच इथलं महत्त्वाचं काम झालं… भरती हे काम दुय्यम होत गेलं…” हे सांगताना त्यांचा सूर बदलायचा. मग त्यावर छेडलं की ते समर्थनं करू लागत,
“मी नोकर्‍या लावल्या शेकडो लोकांना. सगळ्यांकडून पैसे थोडेच घेतले. पैसे घेतले आणि वाटले. माझा एक फ्लॅटही मुंबईत होऊ शकला नाही… शेतासाठी थोडं केलं… अनेकांना मी नोकरीला लावलंय त्यांच्याकडून काहीही न घेता…”
“तुमचीही टेन पर्सेंट स्कीम का?” एखादा विचारी. खोचकपणेच. प्रश्नाचं स्वरूप वेगळं. पण अर्थ असाच. कारण त्याच अर्थानं रावसाहेब बोलायचे मग,
“त्या टेन पर्सेंटमध्ये खरे किती, खोटे किती हे विचारू नकोस…’
काही आकडे एका बैठकीत रावसाहेबांच्या ग्रूपमधील एकानं सांगितले. किमान पन्नासावर उपजिल्हाधिकारी श्रेणीचे अधिकारी, शेकड्यांनी इन्स्पेक्टर, तहसीलदार, फौजदार… आकडे मोठे होते. पण समोरच्याला खरा रस असायचा तो त्या आकड्यात नव्हे. ‘रेट’ काय, हा त्यांचा कळीचा प्रश्न. या ‘रेट’मधील स्थित्यंतरं रावसाहेब सांगायचे. आधी त्यांच्या आणि निवड समिती सदस्यांपुरती ही वाटणी असायची, मग लोकप्रतिनिधींचा रीतसर रेट ठरत गेला. वाटे पोचवण्याची एक व्यवस्था आली. पाहता-पाहता सातआकडी खेळ एकेका स्टेक होल्डरचा होत गेला. स्टेक होल्डर हा रावसाहेबांचाच शब्द.
एक ठरलेलं लग्न मोडल्यानंतर रावसाहेब पुन्हा त्या वाटेला गेले नाहीत. लग्न मोडण्याचं कारण त्यांचं आजवरचं जगणं हेच होतं हे मात्र त्यांना कधीही मान्य व्हायचं नाही.
“मी त्यांच्या उमेदवाराची वर्णी लावली नाही हा त्यांचा राग… त्यांनीच तिच्या घरी जाऊन सगळं काही उलटं-सुलटं सांगितलं.”
ते सांगायचे. एका पुढार्‍याचं नाव घेत. त्यानं मुलीच्या घरी जाऊन रावसाहेब काय उद्योग करतात हे सांगून टाकलं आणि त्यातून लग्न मोडलं असं त्यांचं म्हणणं असायचं.
“मीच वाल्या… म्हणा.” रावसाहेब म्हणायचे, या भरतीचा आणि त्यातील व्यवहारांचा विषय आला की, त्यामागंही तेच कारण असावं. फक्त वेगळ्या संदर्भांच्या चौकटीत.
तेवढंच. त्यापलीकडे काही भावना नाहीत. कारण अशा जगण्याचा माज मात्र कायम होता. टॅक्सी, संध्याकाळी अंधारे, पण खूप काही असणारे बार, उंची सिगरेट, उंची कपडे, उंची अत्तरे. एक विषय न बोलण्याजोगा. मुंबईचं रात्रीचं जगणं आणि त्यातले रावसाहेब. हा एक प्रांत मात्र त्यांनी कटाक्षानं वैयक्तिक ठेवला होता. कळायचं. संध्याकाळी हा गृहस्थ अनेकदा टॅक्सीनं जायचं, मध्यरात्री यायचा. अनेकदा याला पोचवण्यासाठी नंतरच्या कालखंडात उंची गाड्या येत असत. एकूण हा सारा विरोधाभास आपल्यात आहे वगैरेची पर्वाही नसायची.
आमदार निवासातील ती खोली त्यांच्या कब्जात राहिली प्रदीर्घ काळ. तिचं भाडं ते भरायचे म्हणे. पण एकूणच त्यांचा वट असा की, ती शक्यता नसावीच. मग एकदा त्यांच्या तोंडून त्यांचंच एक वर्णन आलं,
“मी एक बांडगूळ आहे…”
हा गृहस्थ खरं बोलला असावा त्यावेळी.
***
मंत्रालय बीट कव्हर करताना निशांत भोसलेला कधी हे वाटलंही नव्हतं की एक काम करायला जाऊन आपल्या हातून काही वेगळंच घडणार आहे. तहसीलदार भरतीचं एक प्रकरण त्याच्याकडं चालत आलं. मराठवाड्यातील. त्या अपंग मुलाची भरती होत नव्हती. सदस्यांच्या काही मागण्या त्याला पूर्ण करता येत नव्हत्या. रखडलेल्या निवडीचं गाऱ्हाणं घेऊन मंत्रालयात पोचलेल्या या तरुणानं निशांतचं लक्ष वेधून घेतलं तेच मुळी आपल्या चेहर्‍यावरील वेदनेनं. सलग चार दिवस मंत्रालयात हा मुलगा दोन्ही खाकांमध्ये कुबड्या घेऊन त्या आधारे हळू गतीनं इकडं-तिकडं फिरत होता. पाचव्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी, त्याच्या चेहर्‍यावरच्या वेदना तीव्र झाल्या होत्या आणि ते पाहूनच निशांतनं ठरवलं, पहायचं काय आहे ते.
“साहेब, तहसीलदाराची परीक्षा पास झालोय, तोंडी परीक्षाही चांगली झाली आहे याची खात्री आहे. पण…”
निशांतनं त्याला पुढं बोलू न देताच विचारलं, “किती मागताहेत?”
“पाच.”
“कुणाला भेटलास?”
“सामान्य प्रशासन राज्यमंत्र्यांकडं जायचा प्रयत्न करतोय, वेळच मिळत नाहीये…”
“तुझ्याकडं सगळ्या पात्रता आहेत?” निशांतनं विचारलं, संदर्भ अर्थातच त्याच्या अपंगत्वाचा.
तो कॉन्फिडण्ट होता. त्याच्या मते या श्रेणीत इतर पदं आहेत जिथं, दंडाधिकारी म्हणून काम करताना जसं त्याचं अपंगत्त्व अडचणीचं ठरेल तसं ठरणार नाही. त्याचा तो आत्मविश्वास चेहर्‍यावरच्या वेदनेच्या अगदी विरोधी होता. त्या संध्याकाळी निशांतच्या त्या स्कूपची बीजं रोवली गेली. या मुलाला घेऊन निशांत थेट राज्यमंत्र्यांकडं गेला. मंत्र्यांनी सांगितलं,
“रावसाहेबांना भेटा. माझं नाव सांगायचं. स्वच्छ सांगायचं. बाकी काही मिळणार नाही हेही स्पष्ट सांगायचं. काम होईल…”
आणि तिसर्‍याच दिवशी निशांतच्या बायलाईनची बातमी मंत्रालयात खळबळ उडवून गेली – “मंत्रालयाच्या बाहेरची सत्ता! – तहसीलदार भरतीत राज्यंमंत्र्यांना लागते एजंटांची मदत”
तपशीलवार वर्णनासह. आमदार निवासातील खोलीचा क्रमांक किंवा रावसाहेबांचं नाव नव्हतं बातमीत. पण संकेत पुरेसे. पुढच्या दोन दिवसातच गुन्हा नोंदला गेला, त्याची पुढची कार्यवाही सुरू झाली…
आणि त्या अपंग तरुणाची नियुक्ती झाली…
***
आझाद मैदान पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना इन्स्पेक्टर मिराशींच्या चेहर्‍यावर प्रचंड ताण होता. एक पेच त्यांच्यासमोर होता: ज्यानं आपल्याला अन्नाला लावलं, त्याला बेड्या टाकायच्या. बेड्या टाकणं हे कर्तव्य आणि अन्नाला लावल्याबद्दलची कृतज्ञता हेही कर्तव्यच. बिन पैशात झालेली आपली भरती हे तिचं मूळ. गुन्ह्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्याच्या नावाखाली त्यांनी दीड तास काढला होता तो याच पेचाचे उत्तर शोधत. जित-हार हा प्रकार नव्हताच. दोन्हीकडं म्हटलं तर हारच होती, म्हटलं तर जित होती.
शेवटी निर्णय झाला त्यावेळी तो मात्र या दोन्ही मुद्यांवर नव्हताच. आपल्या उपजीविकेचं काय असा प्रश्न समोर येताच मिराशींनी निर्णय करून टाकला. जाऊन अटक करायची. त्या निर्णयाच्या पोटात आणखी एक निर्णय झाला होता. यापुढं या नोकरीत कुठंही जाण्याची तयारी ठेवायची. अगदी प्रसंगी चंद्रपूर-गडचिरोली किंवा धुळे-नंदुरबारदेखील!
आमदार निवासातील खोलीत रावसाहेब आरामात बसले होते. त्यांच्या चेहर्‍यावर कसलाही ताण नव्हता. अगदी अपेक्षित आपणच ठरवलेल्या घडामोडी घडत असाव्यात असा त्यांचा चेहरा होता. आणि एका अर्थी ते खरंही होतं. रावसाहेबांसोबत दुसरं कोणीही नव्हतं. कोणी असणं शक्य नव्हतं. त्यांच्यासोबतच्या दोघांनाच आधी पोलिसांनी उचललं होतं आणि त्यांच्याकडून आलेल्या माहितीनुसारच गुन्हा नोंदवला होता. तक्रारदार म्हणून कोणी पुढं आलं नव्हतं. येणं शक्यही नव्हतं. कारण या गटानं कुणाला फसवलं नव्हतं. राजीखुशीचा मामला आणि त्यातही समाधान, असला प्रकार. तरीही गुन्हा नोंदवला होता तो अटक केलेल्यापैकी एकाकडे सापडलेल्या आयोगाच्या काही कागदपत्रांच्या आधारे. त्यामुळं त्यात किती दम होता हा प्रश्नच होता. तरीही गुन्हा नोंदवला गेला हे खरं.
“या मिराशी…” रावसाहेबांनी नेहमीच्या शैलीत त्यांचं स्वागत केलं. अर्थातच, पाण्याचा ग्लासही पुढं केला. मिराशींनी तो बाजूला केला.
“दुसरा काही पर्याय नाहीये रावसाहेब…”
“समजू शकतो. चला. बेड्यांची गरज नाही.”
नाट्य नाही, काही नाही. ही कारवाई अशी उरकेल याचीही कल्पना कुणी केली नव्हतीच. मिराशींनी गाडीत घालून रावसाहेबांना आणलं आणि जिथं अशांची व्यवस्था केली जाते, तिथंच त्यांना बसायला सांगितलं.
‘हाईंडसाईट इज परफेक्ट’ असं कुणी म्हटलंय. रावसाहेबांना त्या खुर्चीत बसल्या-बसल्या पहिल्यांदा आठवलं ते हे. आणि त्यांचा हा प्रवास, त्यातील वळणांसकट त्यांच्यासमोर उभा रहात गेला. कोणत्याही विषादाशिवाय ते तो पहात राहिले…
***
उपसंहार
रावसाहेबांच्या अटकेनंतर साधारण दीडेक महिना वृत्तपत्रांमध्ये याच प्रकरणाचे मथळे होते. ‘मुख्यमंत्र्यांकडे संशयाची सुई’ इथंपर्यंत सारं काही झालं. प्रकरण हळुहळू आधी पान ३ वर गेलं, मग कधी तरी ते पान ६ वर आलं, त्यावेळी या केसचं चार्जशीट झालं होतं. पुढं रावसाहेब सुटले. आरोपी म्हणून ते आणि त्यांचे दोन साथीदारच होते. केस उभी राहणं मुश्कील होतंच. मिराशींनी तेवढं केलं होतं आणि ते नंतर थेट गडचिरोलीला पाठवले गेले.
रावसाहेब सुटले, पण मधल्या काळात व्हायचं ते होऊन गेलं होतं. नंतर आलेल्या दैन्याचं वर्णन करताना ते एकदा म्हणाले, “बांडगुळाचं नशीब हेच असतं. मी ज्यांच्या भरोशावर जगलो, ते इतरांच्या भरोशावर होते. त्यामुळं इतक्या वर्षांच्या या उद्योगातील एकही मंत्री, सीएम यात गुंतला नाही. इतरांनीही त्यांना भरोसा दिला, इतकंच. मुळकांच्या कँडिडेटच्या केसमध्ये चुकलो. चुकलो. संपलं.”
आर. एस. बोरसे यांचा मृतदेह मिळाला त्यादिवशी आझाद मैदान पोलीस ठाण्यात रात्रीच्या ड्यूटीवर विजयसिंह असलेल्या देशमुखांनी त्याची जबाबदारी घेतली. रावसाहेबांच्या जोरावरच भरती झालेल्या आपल्याच काही मित्रांसह मृतदेह गावी नेला. या बाहेरच्या सहा माणसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार झाले तेव्हा साहेबराव बोरसे, सत्तरीच्या उत्तरार्धात, निःशब्द होते.


राजे

सप्टेंबर 4, 2010

मंत्रालयामागचं आमदार निवास. आत शिरलं की डावीकडं स्वागतकक्ष. चारेक पायर्‍या चढून गेलं की, समोर कॅण्टिनकडं जाणारं दार, उजवी-डावीकडं लिफ्ट. आमचा तीन दिवसांचा मुक्काम होता. अशा मुक्कामासाठी आमदार निवासासारखी दुसरी चांगली सोय मुंबईत त्यावेळी नव्हती. सकाळी सहाच्या सुमारास आम्ही चौघं पोचलो. चौघं म्हणजे मी, दादा आणि त्याचा पीए कम कार्यकर्ता अजित व गाडीचा चक्रधर सतीश. दादा जिल्हा परिषदेचा सदस्य होता. पण त्याआधीपासूनचा माझा मित्र.
बाहेर गाडी पार्क करून आम्ही आत प्रवेश केला. उजव्या बाजूच्या लिफ्टपाशी गेलो आणि थांबलो. इंडिकेटरवर तिचा प्रवास दिसत होता. ५,४,३…! काही क्षणांत ती खाली आली आणि दार उघडलं गेलं. नेहमीप्रमाणं गच्च भरलेली होती. बाहेर उभ्या असलेल्या आम्हा मंडळींच्या आपसूकच दोन रांगा झाल्या आणि बाहेर येणारा एकेक जण पुढे सरकू लागला. चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर एक दिमाखदार युवक पुढे झाला आणि क्षणार्धात त्यानं समोरच्या रांगेत दादाला मिठी मारली.
“दादा, किती दिवसांनी?”
दादा थोडा चपापलेला दिसला, पण त्याला ओळख पटली. “राजे? इथं कुठं?”
आम्ही रांगांतून बाहेर आलो. तिथंच थांबलो. कारण ही ‘कृष्ण-सुदामा भेट’ दिसत होती.
“आत्ताच येतोस असं दिसतंय. चलो, चाय मारेंगे,” इति तो देखणा युवक, म्हणजे राजे. दमदार आवाज. खर्जातला वाटावा असा. जबर जरबेचा. कारण दादाही चालू लागला होता.
मी केव्हापासून या क्षणाची वाट पहात होतो. एक तर आमदार निवासापाशी आपण आहोत, बाहेर आलं टाकून होत असलेल्या चहाचा दरवळ आहे, तो दरवळ पुरे नाही म्हणून की काय, पण ती चहा ढवळण्याची डाव पातेल्यावर आपटून साद घातली जात आहे आणि इथं आधी रुम, मग फ्रेश होऊन चहा अशा “आरोग्यं धनसंपदा…” मार्गावर आम्ही होतो. सुटका झाली होती. मी लगेचच दरवाजाच्या दिशेनं पाऊल टाकलं.
ओळखी झाल्या. चहाचे दोन राऊंड झाले. सिगरेट झाली. आणि राजेंच्या पुढाकारानं आम्ही पुन्हा आमदार निवासात गेलो. आम्ही खोली गाठली, राजे त्यांच्या दिशेनं निघून गेले. पण जाण्याआधी एक सांगून,
“संध्याकाळी साडेसातला खाली भेटूया. जेवायला जाऊ.”
दादा काही तरी बोलणार होता तेवढ्यात त्यांनी, “सबबी सांगू नकोस. जाऊ जेवायला” असं आपल्या, बहुदा खास ठेवणीतल्या आवाजात सांगून टाकलं. दादा गप्प झाला.
संध्याकाळचा कार्यक्रम ठरला गेला. मुंबईच्या अशा दौर्‍यात बहुतेक पहिल्याच संध्याकाळी मी ‘चर्चगेट स्टोअर’मध्ये बसून बिअर पिणं पसंत करायचो. तिथं पिचरमधून बिअर मिळते. त्यामुळं ती आवड. त्या दिवशी संध्याकाळीच तिथं जायचं ठरवलं होतं, ते आता कोलमडलं होतं. स्वतःवर चरफडण्याखेरीज हाती काही नव्हतं. हे कोण राजे हे कुतूहल त्या चरफडण्यातूनच जागं झालं. कारण त्यांच्या त्या जरबयुक्त आवाजावर दादानं मान तुकवली होती हे थोडं नवलाचंच होतं. असो. आम्ही दिनक्रमाला लागलो.

राजे. उंची सहा फुटांवर एखाद-दोन इंच. खानदानी देशमुखीला शोभेल असा गौरवर्ण. स्वच्छ चेहरा. तुळतुळीत दाढी केलेली. अगदी रोज. झुबकेदार मिशा. डोक्यावर लष्करातल्या निवृत्त वारिकानं हात फिरवलेला असावा. अगदी बारीक कापलेले केस. प्रमाणबद्ध. तजेलदार डोळे, अर्थात राजे नॉर्मल असतील त्याच दिवशी. म्हणजे दिवसाउजेडी पाहिले तर ते नॉर्मल असतील तेव्हा त्यातील तजेला कळायचा. एरवी तो संध्याकाळी चौपाटीवर मावळत्या सूर्याच्या प्रकाशात पाहण्याची संधी मिळाली तरच.
जशी उंची तगडी तशीच शरीरयष्टीदेखील. मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा या गृहस्थाचं वय होतं सत्तावीस-अठ्ठावीसच्या घरात. पहिल्यांदा पाहिलं की कोणालाही वाटावं हा गृहस्थ एक तर लष्करात कॅप्टन वगैरे असावा किंवा आयपीएस किंवा गेलाबाजार आयएएस. राजेंची ‘कामं’ पाहिली तर त्यांची उडी त्यापेक्षा कित्येक पट लांब होती हे नक्की. अर्थात, त्याविषयी थोडं पुढं.
एकूण राजेंचं व्यक्तिमत्त्व रुबाबदार, पहिल्या दृष्टीभेटीतच प्रेमात पाडणारं.

दिवसभरात मंत्रालयातील दादाची कामं उरकता-उरकता मध्ये जो वेळ मिळाला त्यात राजे समजत गेले. कारण एकच. संध्याकाळी आपण ज्याला भेटणार आहोत, तो गृहस्थ आहे कसा हे कुतूहल. त्यामुळं मधल्या वेळेत चर्चा फक्त राजेंभोवतीच केंद्रित झालेली होती. मध्ये एकदा तिसर्‍या मजल्यावर त्यांचं ओझरतं दर्शनही झालं. शिक्षणमंत्र्यांसमवेत. शिक्षणमंत्री त्यांच्या दालनातून बाहेर आले, पाठोपाठ, जणू किंचीत शेजारीच असल्यासारखे राजे. मग मंत्र्यांचे स्वीय सचिव आणि इतर मंडळी. आम्ही पंधरा-एक पावलांवर होतो. बाहेर येताच दारात थांबून त्यांच्यात काही बोलणं झालं. स्वीय सचिव वाकला होता. मंत्री त्यांच्या त्या वेषात गबाळे म्हणूनच उठून दिसत होते. या सगळ्या घोळक्यात राजे ताठ उभे होते. मंत्र्यांना काही सांगत होते. आम्ही दोन-चार पावलं पुढं टाकली होती. आणि तेवढ्यात राजेंच्या तोंडून वाक्य आलं,
“सर, यू जस्ट एन्शुअर दॅट द स्कूल गेट्स रिकग्नीशन. अ क्वेश्चन ऑफ मोअर दॅन फायूहंड्रेड स्टुडंट्स फ्रॉम रुरल एरिया. ऑल आय वॉंट इज दॅट द इन्स्टिट्यूट इज नॉट आस्क्ड टू फाईल अ‍ॅन अ‍ॅफिडेव्हिट दॅट इट इज एंगेज्ड इन इल्लिगल अ‍ॅक्टिव्हिटी.”
मी उडालोच. शिक्षणमंत्री दिसायला गबाळे होते, पण इंग्रजी अस्खलीत बोलायचे, समजायचं आणि लिहायचेही, शिवाय त्यांचं वाचन दांडगं आहे हेही बर्‍याच जणांना ठाऊक होतं. पण राजे? एव्हाना दादाकडून ऐकलं होतं ते थोडं वेगळंच होतं. मराठवाड्यातून शाळा, औरंगाबादेत महाविद्यालयीन शिक्षण. दादाची आणि त्यांची ओळख महाविद्यालयीन काळातील. विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून एका शिबिरात झालेली. राजे म्हणजे त्यावेळचे हिरो. अभिनय, एकपात्री यात हात धरणारा कोणी नाही वगैरे…! पुढे तारू भरकटलं आणि ते बेपत्ता झाले. मग कानी आलेल्या खबरा म्हणजे कुठे गर्द वगैरेचं व्यसन असल्याचं. त्यानंतर मंत्रालयातील कामांची ‘गुरूकिल्ली’ ही त्यांची ओळख. थोडक्यात या चौकटीतच (खरे तर ही आपलीच चौकट असते, तीही चुकीची) स्वच्छ इंग्रजीत संवाद कुठंही बसत नव्हता. वाया गेलेला माणूस हे तीन शब्द त्या वर्णनाला पुरेसे ठरावेत. दादाच्या म्हणण्यानुसार त्यानंतरची भेट ही सकाळचीच आणि आत्ता हे त्यांचं असं दर्शन.
राजेंचं अस्खलीत, कुठंही न अडकता असं ते इंग्रजी वाक्य ऐकून मी दादाकडं पाहिलं आणि त्यानंही भुवया उडवत माझ्याकडं पाहिलं.
एव्हाना मंत्र्यांनी होकार दिला होता राजेंच्या मागणीवर, आणि वरून “आमच्याकडंही लक्ष ठेवा” अशी पुस्ती जोडली होती. त्यावर चक्क हात जोडत “च्यायला राव, इथं भेटलात हेच पुरं. तिकडं नको!” हा त्याचा टोला मी पहिल्यांदा ऐकला आणि मला वाटलं आता काही तरी गडबड होणार. पण कसचं काय, शिक्षणमंत्री “असं थोडंच सोडेन तुला,” असं म्हणत पुढं निघालेदेखील.
राजे आणि मंत्र्यांच्या वयातलं अंतर किमान तीस वर्षांचं होतं. मंत्री पश्चिम महाराष्ट्रातले तर राजे मराठवाडा. म्हटलं तर राजकीय दृष्ट्या मंत्र्यांनी त्याला पाण्यात पाहिलं असतं, तर आश्चर्य वाटलं नसतं. पण इथं ही मैत्री? मला धक्के बसत होते. मंत्री निघून गेले आणि राजे पुन्हा त्यांच्या दालनात शिरले. आम्ही आमच्या कामाला निघून गेलो.
तर मराठवाड्यातून आलेला हा उमदा – किमान दिसणारा तरी – तरूण आता मंत्रालय परिसरात अनेकांचा अनेक कामांसाठी ‘गुरूकिल्ली’ झाला होता हे अखेर एकदाचं डोक्यात शिरलं त्या प्रसंगातून आणि अंगभूत कुतुहलातून – किंवा भोचकपणातून म्हणा – मी संध्याकाळच्या भेटीकडं नजर लावून बसलो. सकाळी ही भेट ठरताना झालेली चिडचिड आता पळून गेली होती.

संध्याकाळी साडेसात. आमदार निवासाच्या गेटमधून बाहेर पडून उजवीकडे वळलो. राजे समोरच उभे होते. बरोबर कोणी दोघं – तिघं होते. त्यांच्याशी काही वाटाघाटी सुरू असाव्यात. अगदी हळू आवाजात कुजबुज. आम्ही दोनेक पावलं अलीकडंच होतो, त्यामुळं तिथंच थांबलो. काही क्षणांतच त्यांचं आमच्याकडं लक्ष गेलं आणि “अरे यार, या की इकडं,” अशी साद आली. खणखणीत आवाजात. मला वाटतं, रस्त्यावरच्या इकडच्या-तिकडच्या आठ-दहा जणांनी तरी वळून आपल्याला कोण बोलावत नाही ना हे पाहून घेतलं असावं नक्की.
बरोबर असलेल्या मंडळींना निरोप देऊन आम्हाला सोबत घेऊन राजे निघाले. ‘सम्राट’च्या अलीकडं आम्ही रेंगाळलो.
“क्या ख्वाईश है?” राजे.
दादाच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह.
“क्या पिना है?”
दादानं खांदे उडवले आणि मग डावा हात डावीकडे तर उजवा उजवीकडे नेला. अर्थ एकच, काहीही चालेल, फक्त देशी वगैरे नको.
“चलो, मूड है बिअर पिनेका. चर्चगेट स्टोअरमध्ये बसू,”
हा बोनस होता. एकतर हे कॅरॅक्टर समजून घ्यायचं होतं. त्यामुळे व्हिस्की वगैरे पिण्याची इच्छा नव्हती. बिअरच बरी अशा वेळेस. आणि तीच होती.
चर्चगेट स्टोअरमध्ये पोचलो. पाच जणांनी बसावं असं टेबल नव्हतंच. पण, राजे पुढं झाले आणि समोरच्या मागच्या रांगेतली दोन टेबलं जोडली गेली. एकूण त्यांचा तेथे बर्‍यापैकी राबता दिसत होता.
ऑर्डर गेली आणि राजेंचा पहिला प्रश्न आला, “बोल, इथं कसा काय?” दादाला उद्देशूनच.
दादानं कामाची माहिती दिली. राजेंची ‘गुरूकिल्ली’ची भूमिका ठाऊक असल्यानं ती माहिती देताना थोडं हातचं राखून ठेवलं होतं.
काम साधंच होतं. दादाच्या गटात (म्हणजे जिल्हा परिषदेचा मतदार संघ) एक नालाबंडिंगचं काम होतं. त्यावर मंत्रालयातून काही आक्षेप आला होता. त्यामागची कारणं आम्हाला पक्की ठाऊक होती. हा राजकीय ‘आडवा आणि जिरवा’ प्रयत्न होता आणि त्यावरचे तोडगेदेखील दादाला ठाऊक होते. त्यानुसार एक निवेदन त्या दिवशी त्यानं दिलं होतं.
“काय म्हणाला रोकडे?” राजेंचा पुढचा प्रश्न. दादा अवाक्. चेहरा प्रश्नार्थक. रोकडे पाटबंधारे खात्याचा उपसचिव. त्याच्याकडेच दादाचं काम होतं आणि हा तपशील राजेंना ठाऊक असावा हे आश्चर्य होतं.
“वो बात छोड. लिसन, आय नो एव्हरीथिंग अबाऊट यू. आय कॅन टेल यू द नेम ऑफ युवर गट, द व्होटिंग पॅटर्न, अँड इफ यू बी ट्रुथफुल, द अमाऊंट यू स्पेंट इन द लास्ट इलेक्शन, इन्क्लुड़िंग द ‘अदर’ एक्स्पेन्सेस.” अदर शब्दावर जोर.
दादाला पुन्हा एक धक्का. म्हणजे हा माणूस कुंडली ठेवून असतो तर, माझा मनातल्या मनात निष्कर्ष. तो ‘गुरूकिल्ली’ का असतो हे समजून येणं आता मुश्कील नव्हतं.
एकाचवेळी हिंदी, मराठी, इंग्रजी… हे प्रकरण थोडं और होतं. तिन्ही भाषांवर आपली मांड आहे हे दाखवण्याचा त्याचा हेतू नाही हे बोलण्याच्या सहजतेतून दिसून यायचं. अनेकदा तर तो एक वाक्य एका भाषेत आणि एका भावातदेखील पूर्ण करायचा नाही.
एव्हाना दादानं शरणागती पत्करत सारं काही सांगून टाकलं, त्या एकाच कामापुरतं अर्थातच.
“उद्या तुझं काम होऊन जाईल. निवांत जा परत.”
दादा सावध होता, “काय करणार आहेस?”
“काही नाही. रोकडे दोस्त आहे आपला. त्याला विनंती करतो. तो माझी विनंती अव्हेरणार नाही याची खात्री आहे मला.” विनंती, अव्हेरणे वगैरे शब्द अगदी शुद्ध तुपातले.
“रोकडेच्या हाती काही नाही. घोडं अडलंय वर. मोहित्यांकडं. त्यामुळं…” इति दादा. मोहिते म्हणजे पाटबंघारे मंत्री.
“डोण्च्यू वरी. काम होईल. मोहिते असो वा सीएम. तुला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, पॉलिटिकली. मग तर झालं?”
“तुझा इतका काय रस रे साल्या?” दादाचा सवाल.
“बिकॉज आय नो यू सिन्स नाशीक कॅम्प. पीपल लाईक यू शुड बी हिअर. दॅट्स ऑल.”
“विथ पिपल लाईक यू?” दादाच्या तोंडून प्रश्न निघून गेला आणि क्षणात राजेंचा चेहरा दुखावल्यासारखा झाला.
“अ फिक्सर, यू वॉण्ट टू से…” सूरही दुखावलेलाच.
“अं…अं…” दादा.
“छोड दे वो बात. तुझं काम होईल. तुझ्या कोणत्याही तत्वांना मुरड घालावी न लागता.”
बिअरसोबत मागवलेली चिकन चिली आली होती. पहिला संपून दुसरा पिचर आला होता. राजेंनी मोर्चा माझ्याकडं वळवला.
“बोला सरकार. तुम्ही बोला. याच्याकडं फारसं लक्ष देऊ नका. तेव्हापासून पाहतो मी याला, माणसं ओळखण्यात थोडा कमी पडतोच.”
ओह. ठाम शब्दांत राजेंनी निष्कर्ष मांडला. या निष्कर्षाप्रत येण्यास मला स्वतःला दादाच्या सहवासात तीनेक वर्षं काढावी लागली होती. या दोघांची भेट अवघी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच, त्यातही मध्ये मोठा खंड आणि तरीही हा पक्का निष्कर्ष, तोही अचूक!
मी संभावित पवित्रा घेतला, “मी फारसं बोलत नाही. ऐकणं हा माझा छंद आहे.”
“मला राजेच म्हणा. आवडतं ते. असो. तुम्ही ऐकतदेखील नाही. कुंडल्या मांडत बसता. तुमचा धंदा तोच नाही तरी…”
पहिलीच भेट होती, बीअर असली तरी इतक्यात इतकी मोकळीक यावी असं नव्हतं, पण हा गृहस्थ ऐकायला तयारच नसतो, हे माझ्या ध्यानी आलं.
“समजतंय ना ते तुम्हाला. मग बोला तुम्ही. मी ऐकतो.”
बहुदा माझा सूर थोडा चढा लागला असावा. दादा मध्ये आला,
“तुला मघाचं माझं बोलणं लागलेलं दिसतंय. पण त्यात शंकास्पद सूर असण्याचं कारण आहे…”
“मी अमूक ऐकलं आहे वगैरे?” राजे तयारीतच असायचे. दादानं मान डोलावली.
“मग ठीक आहे ना, स्टिक टू व्हॉट यू हॅव हर्ड…”
“दॅट आयम डुईंग. आय वॉण्ट टू नो व्हॉट आय शुड नॉट डू. फ्रॉम द हॉर्सेस माऊथ.” किती नाही म्हटलं तरी दादा त्याच्यापेक्षा वयानं मोठा होताच.
“हाऊ डझ दॅट मॅटर? त्याची काहीही गरज नाही,” इति राजे.
“तुम्ही याच्यावर अन्याय करताय. ऐकीव माहितीवरून तुमच्याविषयी काही बोललं तर तुम्ही दुखावले जाणार आणि समजून घेण्यासाठी विचारलं काही, तर गरज नाही असं म्हणणार,” मी तोंड उघडलं.
“सरकार, बास्स! हे असं काही तरी का होईना बोला की. एरवी तुम्हाला सांगतो, दादानं हे ताणलं नसतं. मी गरज नाही म्हटल्यावर तो गप्प झाला असता. बिअर संपली असती, आम्ही उठलो असतो. पुन्हा भेट झाली तर झाली…”
पुन्हा एकदा अचूक विश्लेषण. दादा राजकारणात पडलाच कशाला असला स्वभाव घेऊन हे माझ्यापुढचं कायमचंच कोडं होतं. तेच कोडं इथं राजेंना सुटल्यासारखं दिसत होतं. जाताजाता त्यांनी मला ‘सरकार’ करून टाकलेलं दिसत होतं. मी पत्रकार असल्यामुळं असावं. मला ते सूक्ष्मपणे खटकलं. पण मी लगेच काही बोललो नाही. माणूस खुला झाला तर ते आधी हवं होतं मला. त्यात पुन्हा “तुम्ही केलेलं लेखनही मी वाचलं आहे,” अशी पुस्ती त्यांनी जोडली होती हे उगाच सुखावून जाणारंही होतं.
राजेंचा ग्लास संपला होता. मी तो भरून दिला. उरलेली थोडी बिअर माझ्या ग्लासात ओतून घेतली आणि वेटरला खूण केली.
काही क्षण तशाच शांततेत गेले. राजेंनी सिगरेट मागवल्या. त्या येताच एक शिलगावली आणि समोर पहात सुरवात केली.

राजेंची कहाणी सुरू झाली.
“शिबिरानंतरचं वर्ष व्यवस्थित, काही कारणानं स्टेज सुटलं, गर्द, नंतर इंजेक्शन्स, मुंबई, अंडरवर्ल्ड, कट्टा किंवा घोडा, रावसाहेबांशी संबंध, व्यसनांतून बाहेर, रावसाहेबांमुळंच मंत्रालय हे ‘करियर’…” राजे.
फक्त स्वल्पविराम असलेलं हे तुटक शब्दांचं वाक्य. आधीच्या प्रत्येक स्वल्पविरामामध्ये खंत, खिन्नता, अपराधीपणा आणि शेवटच्या करियरवर एक छद्मी हास्य. वाक्य बोलून झाल्यानंतर एक दमदार झुरका.
“एव्हरिथिंग इज कव्हर्ड इन धिस सेण्टेन्स. नथिंग मोअर, नो लेस. वोण्ट जस्टिफाय एनिथिंग, वोण्ट फिलोसोफाईज एनीथिंग. आय यूज्ड द वर्ड करियर व्हेरी केअरफुली. मला ठाऊक आहे तुझं आयुष्य कसं घडत गेलं आहे ते. समोर सरकार आहेत. त्यामुळं जबाबदारीनंच शब्द वापरला आहे. त्याचंही मी समर्थन करीत नाही. मी उगाच व्यवस्थेचा बळी वगैरे म्हणणार नाही स्वतःला. मी त्या व्यवस्थेचाच एक भाग आहे इतकंच.”
ओह. हा माणूस ‘ना-ना करते’ शैलीत एखाद्या गोष्टीचं समर्थन देऊ शकतो, तत्त्वज्ञानही करू शकतो, हे या वाक्यांतून सहजी लक्षात येत होतं. तो बारकावा माझ्या ध्यानी आला. तोच धागा पुढं त्याला पेटतं ठेवायला उपयुक्त आहे असं मानून मी म्हणालो, “धिस इटसेल्फ इज अ ह्यूज जस्टिफिकेशन…”
“हाहाहाहाहा…. सरकार, शब्दांत पकडू पाहता, पण मी सापडणार नाही. तुमचे हे उद्योग त्या तिथं वरच्या मजल्यांवर बसतात त्यांच्याकडं,” मंत्रालयाच्या वरच्या मजल्यांकडं बोट करत, माझंच माप काढत राजे म्हणाले, “कारण, मी करतोय ते चुकीचं आहे, न-नैतीक आहे आणि म्हणूनच मी त्या व्यवस्थेचा एक भाग आहे हे स्पष्टपणे सांगून टाकतोय. त्याबद्दल मला कोणी काही सजा दिली तर माझी त्याला खुश्शाल तयारी आहे. आणि एरवीही मी ती भोगतोच आहे. हे “विथ पीपल लाईक यू…” हा त्या सजेचाच एक भाग असतो सरकार. रूढ अर्थानं जिला सजा म्हणता येईल ती केवळ व्यवस्थाच देऊ शकते आणि मी त्या व्यवस्थेचाच भाग असल्याने ती सजा मला मिळत नाही इतकं सरळ आहे हे. त्या व्यवस्थेच्या बाहेर राहून संघर्ष करण्यात मला अर्थ वाटला नाही आणि म्हणून मी तिच्यात शिरकाव केला.”
हे जरा उफराटं होतं. टिपिकल राजकारण्यांसारखं. गुन्हा सिद्ध करा, मी सजा घेतो हाच पवित्रा. स्टेज सुटलं म्हणण्याइतकं काही करू पाहणारा हा माणूस असा का विचार करतोय हा प्रश्न टोचून गेला.
“म्हणजे?” संभाषणाची सूत्रं माझ्याकडं आली होती.
“म्हणजे काही नाही. मी फिक्सर आहे. मी इथं कामं करून देतो. भरती, परवाने, मंजुरी, अडलेले कागद सोडवणं, काही कागद अडवणं, काही कामांसाठी सल्लामसलत आणि मार्गदर्शन.” सल्लामसलत आणि मार्गदर्शन या शब्दांना दोन्ही हातांच्या अंगुलीनंच अवतरणांची खूण करत राजे म्हणाले.
“किंमत किती?”
“कामाच्या मूल्यावर अवलंबून. रेट मी ठरवत नाही. तो ठरलेला असतो. मी त्यात तडजोड घडवून देतो. कधी हजारांत, कधी लाखात. माझे मला पैसे मिळतात. संबंधितांचे त्यांचे त्यांना पोचतात.”
“संबंधित म्हणजे कोणकोण?” माझा प्रश्न.
“सरकार, कायमच आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक रहाता असं दिसतं,” मला पुन्हा एक फटका मारत राजे पुढं म्हणाले, “तिथं त्या मजल्यांवर बसणाऱे, काही अपवाद सोडता सारेच.” इशारा मंत्रालयाकडं.
या उत्तरातून माझ्या ज्ञानात फारशी भर पडली नव्हतीच. कारण ते तर जगाला ठाऊक होतं. पण आता या संवादात मला अधिक रस निर्माण झाला होता. कदाचित तिसर्‍या पिचरचा परिणाम असावा तो.
“इंग्रजी संवादकला वगैरे…”
“सरकार, मी अभिनेता आहे. त्यासाठी बरीच कौशल्यं आवश्यक असतात. त्यातलं ते एक.”
“मधल्या सगळ्या वाटचालीत ते कुठं जमवलं?”
“विशेष काही नाही. गोव्यात पोचलो होतो. भटक्यांमध्ये होतो काही काळ. तिथं त्यांच्याशी बोलत-बोलत भीड चेपून गेली आपल्या गावरानपणाची. मग त्यांच्याच जोडीने वाचनही सुरू झालं. झपाटल्यासारखं. वेगवेगळे विषय…” यावरून कोणालाही थोडक्यात कल्पना यावी.
“रावसाहेब कोण?”
“ओळखत नाही?” राजेंचा थोडा चकीत भाव, “रावसाहेब इज रावसाहेब. राज्यात त्यांचे किमान हजारेक तरी पीएसआय असतील. पीआयही तितकेच. शेकड्यांत मोजता येतील असे एसीपी किंवा डीवायएसपी. कित्येक डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार…” यादी लांबत होती. माझ्यासाठी ही नवी माहिती होती. पण नेमकं कळत नव्हतं.
“इंटरेस्टिंग…” मी.
“अँड फ्रस्ट्रेटिंग टू.” राजे.
मला त्या फ्रस्ट्रेशनमध्ये रस नव्हता. लोकांनी स्वतःच्या पायावर धोंडे मारून घ्यायचे आणि मग दुखतंय म्हणून रडत बसायचं, आणि त्यासाठी माझा खांदा देण्याची माझी तयारी नव्हती.
“दुपारचं काम काय होतं शिक्षणमंत्र्यांकडं? साधारण स्वरूप?”
“काही नाही. बीडच्या एका कोपर्‍यात भटक्या-विमुक्तांसाठी एक संघटना काम करते. ती शाळा चालवते. शाळेला अर्थातच मान्यता नाही. दरवर्षी परीक्षा आल्या की, त्यांच्याकडं अ‍ॅफिडेव्हिट मागतं शिक्षण खातं. आम्ही अनधिकृत शाळा चालवून चूक केली आहे, मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून परीक्षेला बसण्याची परवानगी द्यावी, असं अ‍ॅफिडेव्हिट. म्हणजे गुन्ह्याची कबुली. गेली पाच वर्षे संस्था ते देत आली आहे. यंदा पुन्हा तोच प्रश्न समोर आहे.”
“पाच वर्षे अ‍ॅफिडेव्हिट घेतलं आहे, यंदा कशी काय सूट मिळेल?”
“मिळणार नाही हे मलाही ठाऊक आहे. मला दार किलकिलं करायचं आहे. त्यामुळे सावंतांना थोडं मनूव्हर केलं. त्यांची दोन कामं आहेत माझ्याकडं. त्याबदल्यात त्यांच्याकडं ही मागणी देऊन ठेवली…”
“त्यातून काय होईल?”
“काही नाही. माझी किंमत मी वसूल करेन त्यांच्याकडून. पुढच्या वर्षासाठी त्या संस्थेच्या प्रस्तावाला मान्यता मिळवून देईन मी. शाळा अधिकृत होईल. सावंतांच्या आत्ता लक्षात आलंय की, असं अ‍ॅफिडेव्हिट मागून दरवर्षी एखाद्या संस्थेकडून गुन्ह्याची कबुली घेणं म्हणजे काय असतं ते. मी नीट समजावून दिलं.” समजावून या शब्दावर पुन्हा अवतरणाची खूण दोन्ही हाताच्या अंगुलीनं.
माझ्यातला पत्रकार शांत बसत नव्हता. “तुमचा फायदा काय? की ती संस्थाही काही देणार आहे?”
“छे. ती संस्था मला काय देणार? आणि ती देऊ शकत असली तरी मी घेणार नाही. कारण मला त्याची गरज नाही. पैसे मिळवण्याचे मार्ग इथं खूप आहेत. एक परमीट – परमीट रुमचंच – काढण्यासाठी मदत केली तर मला पन्नास सुटतात.”
“अच्छा, रॉबिन हूड.”
“नॉट एक्झॅक्टली. आय डोण्ट किल एनीबडी. आय डोण्ट लूट. मी कोणालाही धाकदपटशा दाखवत नाही. मी नियम वाकवतो. कारण एरवीही ते वाकवले जाणार असतातच. ते वाकवण्याचं काम परमीट रुमसाठी होतं. शाळेसाठी होत नसतं. तिथं मी ते आणखी सरळ करतो. मग त्या शाळेला मान्यता मिळते.”
“अच्छा, संस्थेची साधनशुचिता…”
“सरकार, त्या संस्थेनं तसंच रहायचं ठरवलं ना, तर वर्षानुवर्षे ही व्यवस्था त्यांच्याकडून फक्त “गुन्हा कबूल”चे अ‍ॅफिडेव्हिट घेत राहील. पुढे कधी तरी संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर आरोप होतील. पोरांच्या शिक्षणाची मधल्या मध्ये वाट लागलेली असेल. ही व्यवस्था वाकवावी लागते तसं होऊ द्यायचं नसेल तर, आणि वाकवण्याचं काम करायचं झालं तर साधनशुचितेला काही वेळेस बगल द्यावी लागते… कारण तिथं बोटं तिरकीच करावी लागतात…”
हे तत्त्वज्ञान भयंकर होतं, माझं मन ते स्वीकारण्यास तयार होत नव्हतं. पण राजेंनी समोर ठेवलेलं व्यवस्थेचं चित्र त्यापेक्षा भयंकर होतं. ही व्यवस्था अशा संघटनेला शाळेची मान्यता देणार नाही, त्या भागांत शाळाही नीट चालवणार नाही. लोकांनी भोग भोगतच मरायचं अशी ही व्यवस्था.
“सावंतांचं तुमच्याकडचं काम परमीट रूमशी संबंधित?”
“हाहाहाहाहा. मी आधीच सांगितलंय, मी न-नैतीक आहे. कारण व्यवस्था न-नैतीकच असते. हे तुम्ही एकदा स्वीकारलंत ना सरकार, तर बरेच प्रश्न आपोआप मार्गी लागतात.” नाही म्हणत हा माणूस पुन्हा तत्त्वज्ञान करीतच होता. ते स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती.
बोलता-बोलता बहुदा बीअरच्या प्रभावाखाली आम्ही एकेरीवर आलो होतो. पण एकमेकांना संबोधताना राजे किंवा सरकार हे शब्द आले की मग मात्र अहो-जाहो. गप्पा सुरू राहिल्या पुढं. सहावा पिचर येईपर्यंत.
रावसाहेबांचा काळ आता संपला होता. आता एजंटगिरी सुरू झाली होती वगैरे गोष्टी तटस्थपणे हा गृहस्थ सांगत होता. कुठंही खंत नाही, कसलंही दुःख नाही. आपण करतो ते बरोबर असा दावा नाही, आपलं सारंच कसं चुकतंय याची रडकथाही नाही. आहे हे असं आहे, मी या व्यवस्थेचाच एक भाग आहे इतकंच पालूपद.
जेवण करून निघालो.
“किती नंबरला आहात?” आमदार निवासाच्या गेटवर राजेंचा प्रश्न.
दादानं सांगितलं.
“वर या मग माझ्याचकडे. तिथं कोणीही नाही. आपण एकटेच असतो.”
“कोणाची आहे रूम?” दादा.
“आपलीच. तुला काहीही राजकीय अडचण होणार नाही. काळजी करू नकोस.” त्याचा ठाम सूर.
माझ्या भुवया उंचावल्या.
“काही विशेष नाही. आपण एका संघटनेचे राज्य प्रमुख आहोत. त्या नावावर ती खोली सरकारकडून भाड्यानं अलॉट करून घेतली आहे. त्यामुळं तिथं कोणीही नसतं. माझ्याकडं सहसा गेस्ट नसतात. आले तरी मी त्यांना त्यांच्या-त्यांच्या आमदारांकडं पाठवतो. रुमवर मी एकटाच आणि कधी आले तर तुमच्यासारखे दोस्त.”
कसं कुणास ठाऊक, पण दादानं त्यांच्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला होता.

आम्ही आमचं सामान घेऊन राजेंची खोली गाठली. आणि पुन्हा एकदा उडण्याची वेळ आली. भारंभार पसरलेली पुस्तकं आणि कॅसेट्स. पुस्तकांचे विषयदेखील अफाटच. ‘द ताओ ऑफ फिजिक्स’पासून ते ‘मी माझा’पर्यंत. काही पुस्तके चक्क झेरॉक्सच्या स्वरूपात होती. पण नीट बांधलेली. कॅसेट्स शास्त्रीय संगीत आणि गझलांच्या. एका कोपर्‍यात हारीने बाटल्या लावून ठेवलेल्या होत्या. सगळ्या रिकाम्या. ही बाहेरची खोली. आतल्या खोलीत सारं ठीकठाक. तिथं माणसाची हालचालही कदाचित नसावी.
तिथल्या कपाटातून रॉयल चॅलेंजची एक बाटली राजेंनी बाहेर काढली. कपाटातूनच तीन ग्लास काढले. स्वतः बाहेर जाऊन जगमध्ये पाणी घेऊन आले. टेपमध्ये कॅसेट टाकली. मैफिलीचा दुसरा डाव सुरू झाला होता.
टेपवरून गझलांचे सूर सुरू होते. बाहेर प्रश्न आणि उत्तरं. कसलाही सूर नसणारी.
“स्टेज का सोडलंस?” दादाचा प्रश्न.
“फर्स्ट आय लॉस्ट द इंटरेस्ट आणि मग मला समजलं की, माझा इंटरेस्ट, स्टेजमधला, जेन्युईन नव्हता.” पुन्हा एकदा कोडंच. दादा हसला.
“हाहाहाहाहा. कुठं ‘फसला’ होतास?”
“हाहाहाहा…” राजेंनी तो प्रश्न हसण्यावारी नेलं. “तसं काही नाही. आपण एकपात्री करायचो, नाटकंही करायचो. पथनाट्यंही केली. त्या सगळ्यात इश्यूबेस्ड काही तरी करतोय हा नशा होता नशा. नशा उतरला. बीए झाल्यावर. मास्तरकीची नोकरी हेच तेव्हाचं ध्येय ना! इश्यूबेस्ड काम करायचं तर नोकरी हवी म्हणून मास्तरकी बरी वाटत होती. तिथंच पहिल्यांदा जेव्हा पंचवीस हजाराची मागणी माझ्याकडं झाली तेव्हा डोळ्यांपुढं काजवे चमकले. नशा उतरला. कुणी मागावेत पैसे? भैय्यासाहेब पुरोहितांनी. ज्यांच्या संस्थेसाठी झालेल्या आंदोलनात आपण मार खाल्ला होता पोलिसांचा. औरंगाबादेत मंत्रीमंडळ बैठकीवेळी. भरतीच्या यादीत पहिल्या नंबरावर होतो. तरीही पंचवीस हजारांची मागणी. पैसे होते. तो प्रश्न नव्हता. पण अंगात भिनलेली सामाजिक कामाची नशा आणि समोर भैय्यासाहेब. काही टोटलच लागेना मला, आपण काय करतोय याची. पैसे द्यायला आणि पर्यायाने त्या नोकरीलाच नकार दिला. शेती होती मजबूत, शेवटी आम्ही देशमुखच. नोकरी करण्याची गरजही नव्हती. पण… कटी रात सारी मेरी मैकदेमें, खुदा याद आया सवेरे सवेरे, अशी अवस्था झाली…”
शेर कोणाचा होता कोणास ठाऊक, पण त्यांना तो आठवला. हा सारा परिणाम मघाची बिअर आणि आत्ताची आरसी यांचा? की हा माझ्यावरचाच परिणाम? म्हणजे हा माणूस जेन्युइनली असा असेलदेखील. त्याला या किकची गरजही नसावी. असो…
“या शेराचा मूळ अर्थ खूप गंभीर आणि वेगळा आहे, पण मी तो उपरोधानं वापरतोय…” हा खुलासादेखील झाला.
“…मग प्रश्न उरला नाही. स्टेज भलतंच दिसू लागलं. आणि ‘ते’ स्टेज सुटलं. मग लक्षात आलं की, त्यातला इंटरेस्ट जेन्युईन नव्हता. त्यातून स्टेजच्या बाहेरचं काही साध्य करायचं होतं. ते इश्यूबेस्ड वगैरे. काय साध्य करायचं होतं ते नेमकं सांगता येत नव्हतं आणि सापडतही नव्हतं. म्हणजे इंटरेस्टविषयी माझाच मला प्रश्न. स्टेज सुटलं एकदाचं.”
मध्ये केव्हा तरी दादानं घरच्यांविषयी विचारलं होतं. तेव्हाही कुठंही भावनिक वगैरे न होता या गृहस्थानं आपण मालमत्तेबाबत डिस्क्लेमर दिला आहे हे सांगून टाकलं. धाकटा भाऊ अभिनेता म्हणूनच रंगभूमीवर धडपडत होता, त्याहून धाकटा वकील झाला होता, कारकीर्दीची सुरवात होती दोघांच्याही. शेती अद्याप टिकून आहे वगैरे माहिती शुष्कपणे देऊन राजेंनी घरगुती स्टोरी संपवली होती. एकूण माणूस घरापासून तुटला होता हे निश्चित. त्यामागचं कारण बहुदा त्याच्या महाविद्यालयीन आयुष्यातील इश्यूबेस्ड, थिएटर, भ्रमनिरास यातच दडलेलं असावं आणि पुढं त्याला गर्द वगैरेची जोड मिळाली असावी असा निष्कर्ष काढून मीही गप्प बसलो.
त्यापुढचं मला दुसर्‍या दिवशी सकाळी फारसं आठवत नव्हतं. सकाळी खोली आवरताना काही कागद मिळाले, माझ्याच हस्ताक्षरातले. त्यावर, रात्री राजेंनी बोलण्याच्या ओघात टाकलेले काही शेर टिपलेले होते. आज हे लिहिताना त्यातले दोनच आठवतात,
जाने किसकिसकी मौत आई है,
आज रुखपे कोई नकाब नही
आणि
वो करम उंगलीयोंपे गिनते है,
जिनके गुनाहोंका हिसाब नही
शायर ठाऊक नाहीत. संदर्भ आठवत नाहीत, कारण ते त्या कागदांवरही नव्हते.
राजेंची ती ‘ओव्हरनाईट’ पहिली भेट त्या दिवशी सकाळी नाश्ता होताच संपली. आम्ही आमच्या मार्गावर, राजे त्यांच्या कामात. निघण्याआधी दादाचं काम करून देण्याचं आश्वासन पुन्हा देण्यास ते विसरले नाहीत.

दुपारी दीडनंतरचा वेळ ऑफिसात तसा निवांतच असायचा. त्या दिवशी जेवण झालं होतं. सिगरेट झाली होती. मुंबईची वृत्तपत्रं येण्याची वाट पहात होतो, तेवढ्यात फोन वाजला. माझ्यासाठीच मुंबईहून आलेल्या पीपी कॉलचे सोपस्कार झाले आणि आवाज आला,
“सरकार, कसे आहात?” राजेच. दुसरं कोण असणार?
“बोला राजे, निवांत आहे. तुम्ही सुनवा.”
“काही नाही. सहज आठवण आली, फोन केला. काय म्हणतोय जिल्हा?”
“काय म्हणणार? नेहमीसारखाच. पाण्याची किती बोंब होणार आहे याचा अंदाज घेत बसलोय आम्ही मंडळी.”
“भरती घोटाळ्याचं काय झालं?”
“काय व्हायचं? देसाई गुंतला आहे हे सार्‍यांना ठाऊक आहे. त्यामुळं कधी तरी दाबला जाणारच आहे. आज ना उद्या.” जिल्ह्यात शिक्षकांच्या भरतीत झालेल्या घोटाळ्यानं राज्यात वादळ उठवलं होतं. त्याविषयी ही विचारपूस होती. देसाई म्हणजे पालकमंत्री.
“तुमच्यासाठी टिप देतोय. तीनेक दिवसांत प्रकरण जातंय सीआयडीकडं…”
“म्हणजेच सारवासारव…” मी.
“अर्थातच. त्यासाठीच. निर्णय झाला आहे. ऑर्डरवर सीएमची सही बाकी आहे.”
“बातमी आहे.”
“म्हणूनच तुम्हाला सांगितली.” एव्हाना राजेंसमवेत माझा संपर्क बर्‍यापैकी झाला होता, तरीही या बातमीची टिप त्यांच्याकडून यावी याचं आश्चर्य वाटून मी क्षणभराचा पॉझ घेतला.
“काळजी करू नका सरकार, तुम्हालाच टिप दिली आहे. दुसर्‍या कोणालाही नाही. आणि बातमी पेरण्याचा हेतू आहे, हेही उघड आहे. बातमी आधी फुटली तर बरं होईल. तो निर्णय हाणून पाडता येऊ शकतो. कारण पोलीस आत्ता ठीक काम करताहेत ना? म्हणूनच…”
मी पुन्हा काही न बोलण्याच्या मनस्थितीतच.
“सरकार, अजून आमच्यावर भरवसा नाही वाटतं. राहू द्या. एवढं लक्षात ठेवा की आम्ही तुमचा वापर कुठंही करणार नाही. हे प्रकरण असं आहे की, इथं काही करण्यासाठी तुमची मदत होईल असं वाटलं इतकंच…”
“तसं नाही राजे. पण ही बातमी एकाच ठिकाणी देऊ नका. चार ठिकाणी येईल असं पहा, म्हणजे तुमच्या हेतूला अधिक पुष्टी मिळेल, असं मला सुचवायचं होतं.” मी मधला मार्ग काढत होतो.
“हाहाहाहाहा. वा सरकार!!! म्हटलं तर तुम्ही हुशार, पण म्हटलं तर बिनकामाचे. कारण हा सल्ला तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी देताय हे कळतं मला. पण समजू शकतो मी. तुम्ही म्हणता तसं करूया. बाळ भोसलेला करतो फोन, आणि वालकरलाही कळवतो…” हे दोघं इतर दोन वृत्तपत्रांचे बातमीदार. या प्रकरणाचा पाठपुरावा करणारे. पण त्यांच्याशी संपर्क साधतो म्हणतानादेखील राजेंनी माझ्या डोक्यातील मूळ व्यूहरचना फाडकन माझ्याच तोंडावर सांगून मला उघडं पाडलं होतं. ती बातमी माझ्याकडे एक्स्क्ल्यूझीव्ह ठरली असती हे खरं, पण त्याचे राजकीय संदर्भ ध्यानी घेता, मी काही भूमिका घेतोय असंही दिसलं असतं आणि ते मला नको होतं. म्हणूनच मी ती बातमी चार ठिकाणी यावी असं सुचवलं होतं.
हा माणूस कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसे, माझा काय ठेवणार? माझ्या सूचनेत तो आरपार पाहू शकत होता.
दुसर्‍या दिवशी माझ्या वृत्तपत्रासह इतर चार ठिकाणी त्या बातम्या होत्या आणि पाहता-पाहता या प्रकरणाने भलताच पेट घेतला. प्रकरणाचा तपास करणार्‍या कडक आणि उजळ प्रतिमेच्या उप अधीक्षकाच्या मागं एकदम जनमत संघटित झालं. विरोधी पक्ष सरसावून उठले आणि असा काही निर्णय झालेलाच नाही, असा खुलासा सरकारला करावा लागला.
ठीक आठवड्यानं पुन्हा राजेंचा फोन.
“सरकार, आता फॅक्स पाठवतोय नीट पाहून घ्या… नंतर पुन्हा फोन करतो.”
पाचच मिनिटांत फॅक्स आला. गृह मंत्रालयानं हे प्रकरण सीआयडीकडं देण्यासाठी तयार केलेली टिप्पणी. सरकारचा खुलासा होता की असा काही निर्णय झालेला नाही आणि इथं तर सरळसरळ टिप्पणी होती.
“काय म्हणता आता?” राजेंचा पुन्हा फोन.
माझ्या हाती बॉम्बच होता. “वाजवू या, मस्तपैकी.” मी.
“सालं तुम्ही कागद पाहिल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही कधीही… असो. पण वाजवा जोरदार…”
“राजे, बातमी वाजवू. पण तुम्हाला विचारतो, तुम्ही इतके हात धुवून का मागं लागला आहात? तुमचा या जिल्ह्याशी काहीही संबंध नाही. देसाई तुम्हाला कुठं आडवं गेलेले नाहीत…”
“भरती कुणाची आहे हे पहा. तेवढं एक कारण मला पुरेसं आहे.”
आणि हे शब्दशः खरं होतं. आत्तापर्यंतच्या संपर्कात एक गोष्ट माझ्यासमोर हळुहळू स्पष्ट होत आली होती. शिक्षण खात्यातलं काहीही असलं तरी हा गृहस्थ तिथं असायचा. दादाच्याच एका समर्थकाच्या संस्थेकरीता त्यानं शाळेची मान्यता मिळवून दिली, एकही पैसा खर्च करावा न लागता. म्युच्युअल बदली हा तर त्याचा खास प्रांत. जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या अशा बदल्यांसाठी दोन्ही जिल्हा परिषदांच्या मुख्य किंवा उप-मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या माध्यमातून तो सारं काही जमवायचा. अगदी सोस असल्यासारखा तो शिक्षण खात्याशी संबंधित मंत्रालयातील त्याच्याकडं आलेली कामं बिनबोभाट आणि पैसे द्यावे न लागता पार करून द्यायचा. ते खातं हा त्याचा वीकपॉईंट होता. त्यामुळं भरतीच्या या घोटाळ्यातही तो मुंबईतून हात धुवून लागलेला होता. कागद काढणं, ते संबंधितांपर्यंत पोचवून गदारोळ उठवणं आणि त्यातून सरकारवर दबाव आणणं असा एककलमी कार्यक्रम त्याच्या पातळीवर सुरू झाला होता. त्यातच ही टिप्पणी त्यानं फोडली होती. त्याची बातमी आल्यानंतर व्हायचं ते झालं. मुख्यमंत्र्यांनाच हस्तक्षेप करीत दिलगिरी व्यक्त करावी लागली. टिप्पणी तयार कशी झाली आणि ती फुटली कशी याची खात्यांतर्गत चौकशी सुरू झाली. देसाईंना राजीनामा देतो, असं म्हणावं लागलं वगैरे. या सगळ्यात राजे कुठंही आनंदी, उत्साही वगैरे नव्हते. तटस्थपणे त्या घडामोडी मला कळवायच्या, चर्चा करायची, जिल्हा स्तरावरच्या घडामोडी समजून घ्यायच्या आणि पुढचे डावपेच आखायचे. एखाद्या मुद्यावर झपाटलेली व्यक्ती एरवी अशी तटस्थ राहू शकत नसते. तिच्या भाव-भावना त्यात गुंतत जातात. राजेंचं वेगळं होतं. एकदम कोरडेपणानं हा गृहस्थ सारं काही करत असायचा.
भैय्यासाहेब पुरोहितांनी दिलेल्या धक्क्याची ही अशी प्रतिक्रिया तर नसावी? मानसशास्त्रज्ञालाच विचारावं का?
—-
दोनेक वर्षांच्या संपर्कानंतर एकदा मी राजेंना म्हटलं, “मला हा व्यवहार प्रत्यक्ष कसा होतो हे पहायचं आहे.”
लाच द्यायचं कसं ठरवतात, पैसे कसे दिले जातात, घेतले जातात हे पहायचं होतं मला. राजेंनी शब्द दिला आणि एकदा मुंबईला बोलावलं. मी गेलो. संध्याकाळी बैठक ठरली होती. दिवसभर इतर काही कार्यक्रम नव्हता. प्रकरण साधंच होतं.
कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात एकाला दारूचं दुकान काढायचं होतं. त्यासाठी आवश्यक एनओसीपैकी काही त्याच्या हाती नव्हत्या. तरीही नियमाला बगल देऊन परवाना देण्याचं मंत्र्यांनी मान्य केलं. सौदा ठरला होता साडेतीन लाखांचा. ठरवणारा होता मंत्र्यांचा पीए. परवान्यासाठी फाईल तयार करण्याचं कामही तोच करून घेणार होता. बोलणं सरळसोट होतं.
“दुकान सुरू करायचं आहे. पोलीस एनओसी आहे. जागामालकाची मिळणं मुश्कील आहे. पण त्याचं ऑब्जेक्शन असणार नाही अशी व्यवस्था आपण केली आहे.”
मला वाटलं होतं इतकं झाल्यानंतर काही संकेत वगैरे केले जातील. पण नाही. मंत्र्यांच्या पीएनं उघडपणे सांगितलं,
“साडेतीन लागतील.”
दुकानदारानं होकार भरला आणि व्यवहार ठरला. दुपारपर्यंत फाईल पुढं सरकवली जाणार होती.
संध्याकाळी पीए पैसे कलेक्ट करणार होता. मुंलुंडच्या एका प्रसिद्ध बारमध्ये ही बैठक ठरली. दुकानदार, राजे आणि मी संध्याकाळी सातच्या सुमारास त्याच्या कारनेच निघालो. बारपाशी पोचलो तेव्हा पीए हजर होता.
बारमध्ये ढणढणाटी संगीत सुरू होतं. कन्यकांचं नृत्य सुरू होतं. बीअरची ऑर्डर गेली. दुपारीच त्या पीएनं मंत्र्यांची सही घेऊन फाईल पुढं पाठवली होती. त्यामुळं दुकान मंजूर झाल्याबद्दल चिअर्स म्हणत बैठक सुरू झाली. दुपारीच माझी ओळख करून देताना राजेंनी नुसतंच “आमचे दोस्त आहेत, तुम्हाला धोका नाही,” इतकंच सांगितलं होतं आणि ते पुरेसं ठरलंही होतं. मी त्याच भूमिकेतून तेथे बिअर न पिता बसून होतो.
पहिला राऊंड संपल्यानंतर पीएनं राजेंकडं प्रश्नार्थक पाहिलं. राजेंनी दुकानदाराला खूण केली आणि एक मोठी सूटकेस पुढं आली. पीएनं ती हळूच मांडीवर घेऊन किलकिली केली आणि मान डोलावली.
काही कळण्याच्या आतच कोपर्‍यातून एक जण पुढं आला आणि ती सुटकेस घेऊन बाहेर पडला. राजे निवांत होते, पण तो दुकानदार किंचित हादरला होता. मला त्यातलं काहीही कळत नसल्यानं मी शांत होतो.
“घाबरू नका. आपलाच माणूस आहे. पैसे सुरक्षित नेण्यासाठी.” पीए.
दुकानदार थोडा स्थिरावला.
पीएनं परत राजेंकडं प्रश्नार्थक पाहिलं.
“च्यायला, साल्या तू सुधारणार नाहीस… इथं भेटलास ते पुरं, तिथं भेटू नकोस.” राजेंचा फटका.
मला काहीही कळत नव्हतं. पण राजेंनी दुकानदाराला खूण केली. त्यानं सफारीच्या खिशातून दहा रुपयांच्या नोटांची दोन बंडलं काढून समोर ठेवली. ती घेऊन तो पीए उठला. नाचणार्‍या मुलींकडं जाऊन त्याचं नोटा उडवणं सुरू झालं.
बास्स. बाकी काही नाही. थोड्या वेळानं आम्ही बाहेर पडलो. तो पीए एका अंबॅसॅडरमधून आला होता. मघा सूटकेस नेणारा त्या गाडीच्या सुकाणूवर बसला होता.
त्या दुकानदारानं आम्हाला आमदार निवासापाशी सोडलं आणि तो निघून गेलादेखील.
“भिक्कारचोट आहे साला. साडेतीन लाखात त्याचा वाटा आहेच पन्नास हजाराचा. तरी वर उडवण्याचे दोन हजार त्यानं मागून घेतले.” खोलीवर आल्या-आल्या बाटली काढून राजे बसले होते. शिव्या त्या पीएला. मला धक्का बसला. मुळात बेकायदा व्यवहार, त्यात या माणसाला प्रोफेशनलिझ्म अपेक्षित होता. बेईमानीका धंदा इमानीसे करना वगैरे. मी बोलून दाखवलं तसं. तर त्यांचं उत्तर होतं, “छ्या. इमानदारी वगैरे नाही. एका मंत्र्याच्या पीएनं असं फुटकळ वागावं याचं वाईट वाटतं. त्यानं साडेतीन लाखाऐवजी तीन लाख ५२ हजार मागून घ्यायचे. हे वर दोन हजार टिप मागितल्यासारखे मागतो तो. मुळात त्यानं पन्नासात ते भागवायला पाहिजे.” आता हद्द होती.
“राजे, कुठं जिरवेल तो हा पैसा आणि हा दुकानदार कुठून कमवेल?”
“कुठं जिरवणार साला. असेच उडवेल, थोडी फार प्रॉपर्टी करेल आणि मग काही रोग लावून घेऊन मरेल. हा दुकानदार उद्या काय करणार आहे हे उघड आहे. त्याच्या गावी कधी जाण्याची वेळ आलीच तर त्याच्या दुकानात माल खरेदी करायचा नाही हे ठरवून टाक आत्ताच.”
“अच्छा. अशी तर तुम्हाला राज्यातील सगळ्या दुकानांची यादी ठाऊक असेल…” माझा खवचटपणा.
“हाहाहाहाहा. सरकार, प्या तुम्ही. ही ओरिजिनल आहे.”
“त्या मंत्र्याची कमाई किती असेल महिन्याकाठी?”
“खरं सांगू का, हे असे हिशेब चुकतात. तुम्ही मंडळी या व्यवहारांचा नीट अभ्यास करत नाही. हा जो व्यवहार आहे तो नेहमीच कॅशमध्ये होत नसतो. अनेक राजकारणी आपला रिसोर्स बेस वाढवतात अशा व्यवहारांतून. हे पैसे शब्दाच्या स्वरूपातच अनेकदा असतात. आणि त्यांचा वापर गरजेनुसार वेळोवेळी होत जातो. त्यामुळे प्रत्यक्ष मंत्र्याच्या हाती सगळे पैसे असतात असं नसतं. त्याची गरज कधी असते, तर निवडणुकीत. त्यावेळी तो मंत्री अशा मंडळींना निरोप पाठवतो आणि ठरलेले पैसे निवडणुकीत जिथं गरज आहे तिथं पाठवून देण्याची व्यवस्था करतो. पैशांचा व्यवहार असा होतो. राजकारण्यांच्या स्तरावर बहुदा हे असंच असतं. ते थेट पैसे घेत नाहीत. थेट पैसे घेणारी जमात म्हणजे ही मधली मंडळी. कारण त्यांचा इंटरेस्ट तेवढाच असतो फक्त. संपत्ती. बास्स. अर्थात, राजकारणी पैसा घेतात याचं मी समर्थन करत नाहीये. मी फक्त त्यांची कार्यपद्धती सांगतोय…”
“व्हॉट डू यू गेट फ्रॉम ऑल धिस?”
“कोण म्हणतं मला काही मिळतं? मला काहीही मिळत नसतं. माझ्या जगण्याचा एक स्रोत आहे तो, बास्स. त्यापलीकडे त्यातून समाधान वगैरे मी शोधत बसत नाही. काम झालं, विषय संपला.”
त्यानंतर पुढच्या दोन दिवसात अशा आणखी दोन सेटिंग्ज त्यांनी मला अनुभवून दिल्या. एकात खुद्द एका आमदारांना पैशांची बॅग घेताना पाहण्याची शिक्षा मी भोगली. शिक्षा अधिक गंभीर अशासाठी की, ती बॅग देणारा होता एक पोलीस निरिक्षक. त्याच्या बदलीसाठी. दुसरी बैठक होती ती कक्ष अधिकार्‍याच्या स्तरावर आणि त्याला लाच देणारे होते एक साखर कारखानदार. कारखान्याच्या चौकशीचा विषय ‘हाताळण्यासाठी’. कक्ष अधिकारी स्तरावरच फक्त. मंत्री वगैरे नाही. दोन्ही रकमा लाखांमध्ये.
याही दोन्ही बैठका बारमध्येच. पैकी एक दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध डान्सबारमध्येच. पण गंमत म्हणजे, त्यादिवशी पैशांची बॅग तिथं दिली गेली नाही. तिथं नुसतंच पिणं. तिथून बाहेर पडल्यावर दादरला कुठल्याशा एका प्रसिद्ध मांसाहारी हॉटेलात आम्ही गेलो. तिथं जेवण झालं आणि मग बाहेर आल्यावर बॅग दिली गेली.
हे असं का, हे काही मला कळलं नव्हतं. राजेंनी ज्ञानात भर टाकली.
“त्या आमदाराकडून बदलीसाठी पत्र हवं होतं. बदली खास ‘कमावत्या’ पोलीस स्टेशनला होती. तो पीआयही तेवढाच खमका होता. आपण जेवण करेपर्यंत तसं पत्र आल्याचं त्याला गृह मंत्रालयातील त्याच्या सोर्सकडून समजलेलं नव्हतं. ते कन्फर्म झाल्यानंतरच पैसे दिले जातील अशी बोली होती. दुसरा एखादा आमदार असता तर त्यानं नाही म्हटलं असतं, पण हा आमदार पैसा म्हटलं की कसाही स्वीकारायला तयार असतो.”
प्रश्न विचारण्यासाठीची लाचखोरी वगैरे अलीकडची. हे असलं सेटिंग मी त्यावेळी पाहिलं होतं. हा आमदार म्हणे विशिष्ट किंमतीला काहीही पत्र द्यायला तयार असायचा.
सगळे व्यवहार राजे म्हणतात तसेच होत असतील का? नाही. राजेंनी दाखवलेले व्यवहार हा एक भाग झाला. पण राजेंची एक खासीयत होती. त्यांनी नंतरच्या काळात इतरही अनुभवांची गाठोडी माझ्यासमोर उघडली. आणि त्यातून हा माणूस केवळ फिक्सर नाही हे उलगडत गेलं. अधिकार्‍यांमध्ये त्यांची उठबस असण्याचं कारण या माणसाची बुद्धिमत्ता असावी हा अंदाज आला आणि पुढं एका प्रसंगात तो खराही ठरला.

राजे आणि मी अशी ही एक भेट. मुंबईतच.
मी काही कामासाठी गेलो होतो. मुक्काम आमदार निवासातच होता, पण राजेंकडे नाही. जाणीवपूर्वकच मी ते टाळलं होतं. पण कसं कोण जाणे मी आल्याचं त्यांना समजलं आणि दुपारच्या सुमारास त्यांनी बरोबर मला ‘चर्चगेट स्टोअर’मध्ये गाठलं.
“क्यूं सरकार, आम्हाला टाळत होता की काय?”
मला खोटं बोलणं जमलंच नाही. हा माणूस आपलं काहीही नुकसान करीत नाही. पैसा कमावतो, पण म्हणून सक्तीनं बिल देण्याचा आग्रहही धरून आपल्याला कानकोंडं करत नाही हे सगळं मनात असल्यानं मी एकदम म्हणालो, “म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही.”
“मग एक शिक्षा आज. आज आमच्याकडून रात्रीभोजन.” हा एक खास शब्द हा गृहस्थ नेहमी वापरायचा.
रात्री मी, माझे दोन स्नेही आणि राजे असे आम्ही जेवण घेतलं त्या हॉटेलवर नेमकी त्याचदिवशी उशीरापर्यंत ते चालू ठेवल्याबद्दल धाड पडायची होती. पण राजे होते आणि तेच परमीट असल्यासारखं होतं आमच्यालेखी. हॉटेलातून आम्ही बाहेर पडलो, तर राजे सरळ पोलीस जीपकडे गेले. नेहमीप्रमाणे अधिकारी बसला होता पुढे.
“ओळखलं?” इति राजे.
“?” अधिकार्‍याच्या चेहर्‍यावर मग्रुरी होतीच.
“देशमुख. विपिनचा दोस्त.” विपिन हे दक्षिण मुंबईच्या त्या झोनच्या डीसीपीचं नाव.
“मी काय करू?” तो इन्स्पेक्टर.
“काही नाही. आम्हाला उगाच लटकवू नका. जेवण करत होतो. उशीर झाला असेल तर तो दोष हॉटेलवाल्याचा आहे. आमचा नाही. त्यानं बसू दिलं, आम्ही बसलो.”
हे बोलणं होतं न होतं तोच डीसीपींचा ताफा तेथे आला. राजेंनी थाप मारली असावी असं वाटून आम्ही थोडे हबकलो होतो, पण तसं नव्हतं. त्यांना पाहताच तो डीसीपी पुढं आला. काही वेळात आम्ही इतरांपासून वेगळे झालो आणि परतीचा मार्ग मोकळा झालादेखील.
“साला, क्यूं रे एकही हॉटेलको पकडता है?” इकडे राजे आणि तो डीसीपी यांच्यात जुंपण्याची चिन्हे होती.
“तुझे छोडा ना. भाग ना फिर.”
“बात वैसी नही है. एकही हॉटेलके पिछे क्यूं लगता है? मै बताऊ?”
डीसीपीच्या चेहर्‍यावर आश्चर्याचे भाव.
“तुझे जॉईंटने बोला होगा. पक्का.” जॉईंट म्हणजे जॉईंट कमिशनर ऑफ पोलीस,
“तू जा ना बाप…” तो डीसीपी एकदम गयावया करण्याच्या परिस्थितीत आला.
“छोड यार. बोल उसको के हॉटेल बंद किया है. छोड दे सब लोगोंको. जाने दे. इतना तू कर सकता है.”
आम्ही वैतागलो होतो. ही समाजसेवा करण्याची अवदसा राजेंना आत्ता कुठून आठवली म्हणून. पण त्या डीसीपीनं खरोखरच सर्वांना सोडून दिलं आणि हॉटेल बंद झाल्याचं पाहून तोही निघाला. जाता-जाता त्याला राजेंनी रोखलं.
“विपिन, एक बोलू तुझे? यू आर टोटली मिसफिट इन द जॉब. यू वुईल सफर…”
ते शब्द मात्र खरे ठरले. पुढे हा अधिकारी सचोटीचा म्हणूनच नावाजला आणि पाहता-पाहता साईड ब्रँच, सेंट्रल डेप्युटेशन असं करत कुठं अडगळीत गेला ते कोणालाही कळलं नाही.
आम्ही रुमवर परतलो. मी अद्यापही कोड्यात होतोच. हॉटेलवरील छाप्यामागील राजकारण राजेंना ठाऊक होतं. माझ्या मध्यमवर्गीय मानसिकतेत तिथल्या जेवणाचं बिल त्यांनी दिलं की नाही हीच टोचणी होती.
“दिया है बिल. धाडीमागचं मला ठाऊक आहे कारण त्या हॉटेलनं त्याच परिसरातील दोन बड्या हॉटेलचा धंदा बसवलाय. त्यांनी गृह राज्यमंत्र्यांना सांगून या हॉटेलला अडचणीत आणायचा प्रयत्न चालवला. जॉईंट सीपी त्याला सामील. चोर साले सगळे.”
“तो नियम तोडतोच ना?” मी.
“तोडतो. करा कारवाई. पण मग सगळ्यांवर करा. डान्सबार चालतात, लेडीज सर्विस बार चालतात, हे फक्त चालत नाही. म्हणूनच मी आडवा गेलो.”
“तुझा विपिनशी काय संबंध?”
“अरे, यू मस्ट बी फ्रेण्ड्स विथ हिम. फिलॉसॉफीवाला आहे. मतलब, एम.ए. फिलॉसॉफी. मग एम.फिल. आणि पीएच.डी. आय वंडर व्हाय ही बिकेम आयपीएस! टोटली अनफिट. काण्ट नेगोशिएट, बार्गेनिंग नाही करत. तत्त्वांना चिकटून. त्याला ही पोस्टिंग मिळाली कशी ठाऊक आहे?”
“?”
“दिल्ली कनेक्शन. कनेक्शन म्हणजे, थेट कॅबिनेट सेक्रेटरी.”
हे थोडं खरं असावं. कारण तेव्हाच्या कॅबिनेट सेक्रेटरींचं अनेक राज्यातील अशा अधिकार्‍यांकडं लक्ष असायचं आणि असे अधिकारी अडगळीत जाऊ नयेत यासाठी ते प्रयत्न करायचे असं बोललं जायचं. त्यात त्यांना किती यश यायचं वगैरे संशोधनाचा विषय.
“पण तुझा काय संबंध त्याच्याशी?”
“फिलॉसॉफी. एका कॉन्फरन्समध्ये तो होता. मी श्रोता होतो. त्यानं काही तरी मुद्दे मांडले. समथिंग अबाऊट बुद्ध अँड गांधी. दोघांना एकत्र आणू पाहणारं काही तरी. मी त्यावर प्रश्न विचारले. बुद्धानं त्या काळी एका व्यवस्थेच्या विरोधात बंड केलं, मूलभूत विचार मांडले. गांधींनी ते थोडंच केलं आहे, गांधींनी व्यवस्थेला नैतीक आयाम देण्याचा प्रयत्न जरूर केला, पण मूळ विचारधारा थोडीच बदलली त्यांनी, असा काहीसा माझा मुद्दा होता. एक छोटी चकमक झाली आमची. आत्ता तपशील आठवत नाहीत…” हे सांगताना ग्लासकडं अंगुलीनिर्देश. बुद्ध आणि गांधी यांच्यासंदर्भात असा तौलनीक विचार मांडतानाच तपशील आठवत नाहीत असं हा माणूस म्हणतो म्हणजे हे तपशील काय असावेत इतकाच माझ्यापुढचा प्रश्न.
“…पण त्या कॉन्फरन्समधून बाहेर पडताना हा आला माझ्याकडं, ओळख करून घेतली आणि भेटायला बोलावलं. ही थॉट आयम अ स्टुडंट ऑफ फिलॉसॉफी. मी त्याचा गैरसमज दूर केला. अर्थात, माझ्याविषयी खरी माहिती सांगितली नव्हतीच. ती पुढं आमच्या भेटी वाढल्या तशी त्याला समजत गेली.”
“तुझ्या ‘करियर’विषयी त्याचं मत काय?”
“ते काय असणार? तो म्हणतो दे सोडून, खासगी क्षेत्रात तुझ्या गुणवत्तेला वाव आहे वगैरे…”
“आणि ते तुला नको आहे…”
“कोण म्हणतं? खासगी क्षेत्रासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत, त्या माझ्याकडं नाहीत, त्या रेसमध्ये मी पडू शकत नाही. कारण तिथं माझ्या गुणवत्तेवर इतर गोष्टींच्या जोरावर मात होऊ शकते आरामात. मग तिथं सडणं नशिबी येईल.”
“हा विरोधाभास आहे राजे. इथंही तुम्ही रिलेशनशिपच्याच जोरावर काही करता. तिथंही तेच करावं लागेल…”
“नाही. मी इथं रिलेशनशिपच्या जोरावर काहीही करत नाही. इथं सरळसोट व्यवहार असतो. दिले-घेतले. बास्स. नातं-बितं, संबंध, मैत्री सारं झूट. ठरलेल्या नोटा मिळाल्या नाहीत तर इथं काम होत नाही. कारण इथलं प्रत्येक काम नियमांत बसवावं लागतं. आणि ते तसं खासगी क्षेत्रात नसतं. तिथं नातं-बितं महत्त्वाचं. ते गोट्या चोळणं आपल्याला जमणार नाही. इथं आपण काम झालं की कुणालाही “वर भेटू नका” असं सुनावतो. फाट्यावर मारतो. तो आपलं काहीही वाकडं करू शकत नाही. आपण आपली न्यूझन्स व्हॅल्यूही इथं निर्माण करतो. ती तिथं नसते…”
माझं बोलणंच खुंटलं. त्यामुळं त्या ‘ओरिजिनल’वर लक्ष केंद्रित करत मी गप्प झालो.
हा माणूस पचवणं अवघड आहे इतकंच काय ते डोक्यात शिरलं त्या रात्री. पुढं आमचा संपर्क राहिला नाही. पण हा माणूस असा आयुष्यातून जाणार नव्हता. त्यानं आधी अनेक धक्के दिले होते. एक राहिला होता. अनेक कल्पनांची मांडणीच विस्कटून टाकणारा.

वर्षापूर्वी काही कामानिमित्त नाशीकला निघालो होतो. रात्री अकराला स्टॅंडवर पोचलो. बाराची गाडी होती. बाथरूमला गेलो, तिथं दारातून बाहेर येणारा एक चेहरा थोडा ओळखीचा वाटला. केस मानेपर्यंत वाढले होते. दाढी चेहरा भरून. चेहरा राकट वाटावा अशी. अंगात विटलेली जीन पँट, निळ्या रंगाची. पांढरा शर्ट. डोळे खोल गेलेले. तो गृहस्थ माझ्या अंगावरून नाशीकच्या फलाटाकडे गेला. मी विचारातच आत शिरलो.
बाहेर आलो तेव्हा डोक्यात प्रकाश पडला होता, हे तर राजे. खोल गेलेल्या डोळ्यांतून व्यक्त होणारा बोलका भाव मला त्यांची ओळख सांगून गेला. मी धावतच नाशीक फलाटाच्या दिशेने गेलो. बसच्या आजूबाजूला पाहू लागलो. कुठंही काही चाहूल नव्हती. भिरभिरणारी नजर डाव्या हाताला फलाटाच्या कोपर्‍याकडं गेली. तिथं एका बाकड्यावर राजे बसले होते. सिगरेट शिलगावलेली होती. बस सुटण्यास वेळ असल्यानं मी त्यांच्याकडं मोर्चा वळवला.
“राजे?”
चेहर्‍यावर कसलेही भाव नाहीत. तो गृहस्थ एकटक माझ्याकडं पहात होता. आपण चुकलो की काय असं मला उगाच वाटून गेलं. पण धीर करून मी पुन्हा “राजे?” असं विचारलं.
“सरकार?”
हुश्श. दरवाजा किलकिला झाला होता. “इथं कुठं?”
“असंच. फिरत-फिरत…”
“कुठं निघाला आहात?”
“कुठंच नाही ठरवलेलं अजून.” मी उडालो. कोड्यात बोलण्याची सवय म्हणावं की नेहमीप्रमाणं ठाम, ठोस विधान हे कळेना.
पण बोलणं तरी सुरू झालं होतं. विचारपूस करता-करता ध्यानी आलं की राजेंनी मुंबई केव्हाच सोडली होती. मंत्रालयातील भरभराट देणारं ‘करियर’ही बंद होतं. उपजीविकेसाठी हल्ली काय करता या प्रश्नाचं उत्तर मात्र त्यांनी दिलं नाही.
गप्पा सुरू झाल्यानं मी बाराची गाडी सोडून द्यायचं ठरवलं.
दोन दिवसांआधीच राजे आले होते. बंगळूरहून. गोवामार्गे. हा संकेत पुरेसा होता. गृहस्थ पुन्हा एकदा भटक्या झाला होता हे निश्चित. घरच्यांनी नाद सोडून कित्येक वर्षं झाली होती. नियमित जगण्याची काही इर्षा, उमेदच राहिली नव्हती. पण भरकटताना जे जगणं झालं होतं ते मात्र भयंकर होतं. सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळापासून ते मुंबईतल्या झोपडपट्टीतलं जीणं, भटक्यांच्या नशाबाजीपासून ते स्टेजच्या सोसापर्यंत, रसीकतेचा कळस गाठणारं जगणं ते अगदी कोठा… सगळी टोकंच. बोलता-बोलता राजे सांगत गेले होते मधल्या काळातली कहाणी.
ठीक एक वर्ष मंत्रालयातील करियर गुंडाळण्यात गेलं. गुंडाळलं म्हणजे त्यांनी एकही पैसे न घेता काही कामं करून दिली. बहुतेक कामं शिक्षण खात्यातली, काही कामं अपंग-बालकल्याण अनुदानाशी संबंधित. मी म्हटलं हे म्हणजे आधीच्या पापातून उतराई होण्याचा प्रकार तर नाही? त्यावर थेट उत्तर, “मी काहीही पाप केलं नाही. त्या व्यवस्थेत मी तेच केलं जे तिथं होणार होतं. त्या व्यवस्थेला मोडून काढत मी काही गोष्टी केल्या. अखेरच्या वर्षांत फक्त तशाच गोष्टी केल्या. ते माझं कर्तव्य होतं. त्यामुळं त्यात माझी काहीही कर्तबगारी नाही.”
मंत्रालयातील करियर सोडल्यानंतर आमदार निवासातून थेट धारावी झोपडपट्टी. का तर, तिथलं जगणं कसं असतं हे अनुभवण्यासाठी. कशासाठी हा अनुभव घ्यायचा, तर केवळ घ्यायचा म्हणून. राजे जे सांगत ते विश्वासार्ह असे म्हणून लिहितो इथं, त्यांनी त्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम केलं होतं. शंभरावर एकर शेतजमीन असलेल्या घरातला हा गृहस्थ. धारावीच्या झोपडपट्टीत घाण साफ करायचं काम करून जगत होता. त्यानंतर थेट बंगळूर. कशासाठी? काही नाही. रेल्वेत बसलो आणि तिथं पोचलो. तिथं एकदम पांढरपेशी काम. एका बांधकाम कंपनीत साईट ऑफिसवर सुपरव्हायजरी काम. मी म्हटलं, सर्टिफिकेट्स वगैरे नसताना नोकरी कशी मिळाली? उत्तर एकच. “आपली कनेक्टिव्हिटी सर्टिफिकेट्सपेक्षाही डीप आहे.” बंगळूरला काही काळ काढल्यानंतर गोवा. किनार्‍यावरच्या एका हॉटेलात वेटर. त्या जोडीनं पुन्हा हिप्पी (राजेंच्या भाषेत भटक्या) समुहांशी संपर्क, त्यातून अंमली पदार्थांच्या जाळ्यात पुन्हा एकदा. त्याच तारेत बहुदा आता इथं.
“आता ठरवलंय, एखादं खेडं गाठून दिवस काढायचे. पैसे आहेत अजून बँकेत. किमान साडेतीन लाख तरी. ते टिकले कारण बँकींग व्यवहारांपासूनही लांबच फेकले गेलो होतो. आता सही तरी नीट करता येईल की नाही ठाऊक नाही. पण एकदा मुंबईत जाऊन तो क्लेम करायचा आहे… मला वाटतं की राक्या मदत करेल त्यासाठी…” या राक्याला झोपडीतून उचलून आणून पुढं शिकवत बँकेत चिकटवून दिला होता राजेंनी. त्याची कहाणी हा तर स्वतंत्र विषय.
माझ्या अंगावर काटा आला. एक क्षणभर वाटलं की या गृहस्थाला घरी न्यावं. काही दिवस राहू द्यावं. पण माझ्या मध्यमवर्गीय मानसीकतेनं त्या इच्छेवर मात केली. त्याचं ते विलक्षण जगणं माझ्या चौकटी उध्वस्त करून जाणारं होतं. त्या चौकटीतीलं माझं जगणं असुरक्षीत होत गेलं असतं…
मी ते टाळलं. म्हणालो, “राजे, पुण्यात राहता आहात कुठं?”
बहुदा हाच प्रश्न त्यांना नकोसा असावा. मी त्याचं जगणं पाहिलं होतं ते शानदार. आत्ताचं तसं नव्हतं.
“वेल, सरकार, यू नो, बर्ड्स लाईक मी नेव्हर नीड अ नेस्ट. दे आर सोलली डिपेण्डण्ट ऑन देअर इन्स्टिंक्ट्स. आयम वेल प्लेस्ड व्हेअर आयम…”
इंग्रजीवरची मूळ मांड कायम होती तर. मी उगाच मनाशी चाळा केला, शेर आणि हिंदीही पूर्वीसारखं असेल का?
“पुढं काय करणार आहात?”
“सांगितलं ना, की एखादं खेडं गाठायचं आहे. खूप पूर्वी नर्मदेच्या किनार्‍यावर मध्य प्रदेशात एकदा भटकत गेलो होतो. एका खेड्यातील एका देवळात एक पुजारी भेटला. मी तिथं आठवडाभर मुक्काम केला होता. त्याच्याशी बोलताना कळलं की तो जुना इंजिनिअर आहे. अस्खलीत भाषा, संस्कृतवर जबर कमांड. टाटांच्या कुठल्याशा कंपनीत होता, तिथल्या स्पर्धेत टिकला नाही. गुणवत्ता असून काही हाती येत नाही याचं फ्रस्ट्रेशन आलं, एकदा हार्ट अटॅक. पुढं थेट अध्यात्मात शिरला, सारं काही सोडून त्या देवळात जाऊन बसला होता. चीज थी, सहनेलायक. क्यूंकी, वो सिस्टमका व्हिक्टिम था. वोही सिस्टम, जिसका मै एक पार्ट हुवा करता था…”
“तो अब क्या उसका व्हिक्टिम हो?”
“नो. नॉट अ‍ॅट ऑल. आयम स्टील द पार्ट ऑफ द सिस्टम. दॅट्स व्हाय आयम व्हेरी अनलाईक यू. आय कॅन स्टिल थिंक ऑफ बीईंग सिस्टमीक अगेन. व्हिच आयम नॉट डुईंग. कारण, यू नो वन थिंग अबाऊट द सिस्टम? जे सिस्टमचा पार्ट असतात ना, ते त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन जातात ते कळत नसतं. त्यामुळं सिस्टमच्या बाहेर असणं किंवा तिचा व्हिक्टिम असणं हे अनेकदा फायद्याचं असतं. आय कान्ट मेक अ चॉईस बीटवीन द थ्री. अँड धिस इज द सिंपल ट्रुथ.”

विषय न वाढवता मी निरोप घेतला. नाशीक गाठलं. काम उरकून तीन दिवसांनी परतलो. आल्यावर आधीच्या तीन दिवसातले पेपर समोर घेऊन बसलो होतो. एका पेपरमध्ये आतल्या पानात बातमी होती, “बसस्थानकात बेवारस मृतदेह”. सोबत अर्धा कॉलम फोटो. फक्त चेहर्‍याचा.
चेहर्‍यावर दाढी. खोल गेलेले डोळे. वेशभूषेचं वर्णन. सारं काही राजेंशी जुळणारं.
दुपारपर्यंत कन्फर्म झालंदेखील. जागीच हृदयविकाराचा झटका. आमची भेट झाली त्याच रात्रीची घटना. एकदा वाटलं आपण पुढं होऊन काही करावं, पण पुन्हा त्यांनी त्यांच्याच शब्दांत सांगितलेल्या सत्याची आठवण झाली आणि मी शांत बसणं पसंत केलं.
“सिस्टमचा पार्ट त्या सिस्टम नामक ब्लॅकहोलमध्ये कधी गुडूप होऊन होऊन जातो ते कळत नसतं…”
(पूर्ण)


नियमांस धरून…

मे 28, 2008

एनडीटीव्ही आणि आयबीएनवर १७० अधिक ५२ असा आकडा आला तेव्हा माधवेंद्र सिन्हांच्या चेहऱ्यावर किंचीत स्मितरेषा उमटली. पण त्यांना पूर्ण खात्री नव्हती. नेमक्या याचवेळी आतमध्ये एसकेंकडचे म्हणजेच श्री कांत आचार्यांकडचे आकडे काय असतील, हे सांगणं मुश्कील होतं. आचार्यांचे कॉण्टॅक्ट्स ध्यानी घेता, ते वेगळे असण्याची शक्यता अधिक होती. शिवाय या दोन्ही चॅनल्सचा कल त्यांना पक्का ठाऊक होता. त्यामुळं त्यांनी एक सावध निर्णय घेतला. ‘आजतक’कडे ते वळले. तिथं १६५ अधिक ५० असे आकडे होते. म्हणजेच येऊन – जाऊन ७ जागांचा फरक होता. क्षणभर त्यांनी काही विचार केला आणि त्यांची पावले आतल्या खोलीकडे वळली.
“या,” आचार्यांनी त्यांचं स्वागत केलं. “काय म्हणतेय परिस्थिती?”
“आकडे स्पष्ट आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युवर न्यू रिस्पॉन्सिबिलिटी सर. अॅज ऑफ नाऊ वी आर क्लोज टू २२५. आणखी ७५ पर्यंतची जमवाजमव झाली की वी वुड बी सेफ अँड स्टेबल.”
“आर यू शुअर?” आचार्यांचा हा प्रश्न केवळ खुंटी हलवून बळकट करून घेण्यासाठीच आहे, हे माधवेंद्रांना पक्कं ठाऊक होतं.
“शुअर. इव्हन इण्टिलिजन्स फिगर्स आर नॉट एनी डिफरण्ट. आपल्या अंदाजापेक्षा आपण कमी आहोत. पण या घडीला, गिव्हन द रिसोर्सेस अव्हेलेबल विथ चॅनल्स, हाच ट्रेंड चालू राहील, असं दिसतंय.”
आचार्यांचा चेहरा खुलला. त्यांनी सकाळीच माधवेंद्रांना सांगून ठेवलं होतं. ज्या क्षणी आपण २२० च्या पुढं सरकतो आहोत, असा अंदाज येईल तेव्हा आपण मंत्रिमंडळाची रचना निश्चित करण्यासाठी बसायचं. त्यासाठी यादी सुरू करा आणि आकड्यांवर लक्ष ठेवा, अशी त्यांची सूचना होती. आचार्यांनी या काळात इतर पक्षांशी बोलणं सुरू केलं असणारच हे माधवेंद्रांना ठाऊक होतंच. त्यामुळं त्यांनी केवळ आचार्यांकडं पाहिलं.
“येस, शुअर, वी कॅन स्टार्ट नाऊ.” आचार्यांचा सूर आश्वासक होता. त्याअर्थी सरकार आपणच बनवतो आहोत याची त्यांना पक्की खात्री झाली आहे, हेही स्पष्ट झालं.
“थ्री एरियाज आय वॉण्ट यू टू फोकस. परराष्ट्र, अर्थ आणि वाणिज्य. या तिन्ही क्षेत्रात आपल्याला बरेच नवे निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी आपल्या नेहमीच्या मंडळींचा फारसा उपयोग नाही. आय वॉण्ट प्रोफेशनल्स.” आचार्यांनी चौकट समोर मांडली. त्या चौकटीतच माधवेंद्रांना नावं द्यावी लागणार होती.
“शुअर सर.” ते म्हणाले आणि पुढच्याच क्षणी आचार्यांचा खमका आवाज आला.
“वेल, या तिन्ही बाबींमध्ये स्वातंत्र्यावेळी होती, तशीच परिस्थिती आत्ताही आहे. स्थित्यंतराचा उंबरठा. इतिहास आपल्याला शिकवतो, माधवेंद्र. परराष्ट्र हे आता मीच हाताळावं. कॉमर्स इज इम्पॉर्टण्ट, बट, तिथं अर्थ खात्याच्या धोरणांची चौकट असतेच. तेव्हा त्याचाही प्रश्न नाही… अॅण्ड यस, नो नीड टू सर मी. जस्ट कॉल एसके. वी आर वर्किंग ऑन अ डिफरण्ट लेव्हल नाऊ.”
आचार्यांचं हे एक खास वैशिष्ट्य होतं. त्यांना ही अनौपचारिकता शोभायचीही. त्यांचा उल्लेख राजकीय वर्तुळात अत्यंत आदरानं आचार्य असाच व्हायचा. केवळ ते त्यांचं आडनाव होतं म्हणून नव्हे तर त्यांच्यातील स्थितप्रज्ञताही त्याला कारणीभूत होती. मुरलेले राजकारणी असल्यानं त्यांनी आपल्या कामकाजात व्यावसायिक स्तरही जपलेला होता. ते अर्थ मंत्री होते तेव्हा त्यांचा आणि माधवेंद्रांचा संबंध आला. तो पुढं दृढ होत गेला. माधवेंद्र नोकरशहा. पण त्यांची कामकाजाची ब्युरोक्रॅटिक न होणारी, व्यावसायिक पद्धत आचार्यांना आवडली आणि ते त्यांच्या आस्थापनेचा एक भाग होऊन गेले. देशाचं नेतृत्त्व करण्याची संधी समोर आली तेव्हा आचार्यांना मुत्सद्दी सल्लागार म्हणून आधी आठवण झाली ती माधवेंद्रांचीच.
परराष्ट्र आणि वाणिज्य या दोन खात्यांसाठी माधवेंद्रांना फारसं काही करावं लागलं नाही. आचार्यांच्या डोक्यात होती तीच नावं माधवेंद्रांनीही ठरवली होती. परराष्ट्र खातं स्वतः आचार्यांकडंच आणि वाणिज्य खातं दिग्वीजय चव्हाण यांच्याकडं जाणार हे निश्चित झालं. प्रश्न होता अर्थ खात्याचाच. माधवेंद्रांनी त्यांच्या मनातली नावं मांडली.
“लुक माधवेंद्र, पटेल, ठाकूर आणि सेन या तिन्ही नावांना माझा तसा आक्षेप नाही. पण…”
त्यांना मध्येच थांबवत माधवेंद्र म्हणाले, “तिघांनाही पॉलिटकल बॅकग्राऊंड नाही. एक तर नोकरशाही किंवा अभ्यासक. त्यामुळं…”
आता त्यांना तोडण्याची वेळ आचार्यांची होती.
“लॅक ऑफ पॉलिटिकल स्किल वुईल नॉट बी अ हॅंडिकॅप. इन फॅक्ट, मला तसंच कोणी तरी हवंय. हाऊएव्हर, ती व्यक्ती आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांपुढं न झुकणारी हवी. कारण आपण जी पावलं उचलू त्यातून निर्माण होणारी ताकद ही त्या व्यक्तीमागं असेल. त्या जोरावर त्या संस्थांनाही काही गोष्टी ठणकावून सांगण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये हवी. तिनं तसं न करणं हे आपल्याला पॉलिटिकली महाग ठरू शकतं. तेव्हा अशा प्रसंगी तिच्यामध्ये नसलेल्या राजकीय कौशल्यांचा भाग आपण सांभाळून घेऊ. द फेलो शुड हॅव थ्रू अँड थ्रू अंडरस्टॅंडिंग ऑफ व्हॉट ईज हॅपनिंग हिअर, आऊटसाईड अँड व्हॉट वी नीड टू डू. ही शुड बी स्ट्रॉंग ऑन द फण्डामेण्टल्स ऑफ व्हॉट वी आर डुईंग.”
“इन दॅट केस, सेन इज आऊट ऑफ क्वेश्चन. ही लॅक्स गट्स. ही इज अ मॅन ऑफ अॅक्शन, बट फाल्टर्स व्हेन द नीड ऑफ स्पिकींग आऊट अरायझेस. वी नीड अ मॅन हू इज मास्टर इन बोथ द एरियाज. पटेल अँड ठाकूर फिट द बील.” माधवेंद्र म्हणाले.
“ठाकूर… नो. नॉट अॅट ऑल. रिझर्व्ह बॅंकेतील डोसियर अजून कुठं तरी असेल. नको. टॉक टू पटेल. हाऊएव्हर, हीज हँडिकॅप इज दॅट ही समटाईम्स टेण्ड्स टू बी टू ब्यूरोक्रॅटिक. असो, आपण पाहून घेऊ”

“मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःस्पृहपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.”
“मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, संघराज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही.”

ईश्वरदास पटेलांनी अर्थ खात्याची सूत्रे स्वीकारल्यानंतरच्या दुसऱया वर्षात भविष्यातील महासत्ता असा देशाचा उल्लेख प्रथमच झाला . त्याचदिवशी संध्याकाळी राधाकृष्ण कर्णिक यांचा साठीनिमित्त पुण्यात सत्कार झाला. वाचकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या या चतुरस्र साहित्यिकाची साठी झोकातच झाली. बालगंधर्व रंगमंदीर ओसंडून वहात होतं. अनपेक्षितपणे आलेला हा श्रोतृसमुदाय संयोजकांना चकीत करून गेला. कर्णिकांचं कर्तृत्त्व मोठं होतं; मात्र गेल्या काही काळात एकूणच वाचन, ग्रंथव्यवहार याविषयी आलेल्या औदासिन्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला झालेली गर्दी विलक्षण ठरली होती. ऐनवेळी बालगंधर्वच्या पटांगणात क्लोज सर्किट टीव्हीची सोय करावी लागावी आणि कार्यक्रमानंतर तिथं होणाऱ्या नाटकाचा प्रयोग पाऊण तासानं लांबणीवर टाकावा लागावा यातच सारं काही यावं.
“भरून पावलो आज,” कर्णिकांनी श्रोतृसमुदायाच्या काळजाला हात घालायला सुरवात केली. बदलता समाज, साहित्यात त्याच्या प्रतिबिंबांचा अभाव, एकीकडे समृद्धी आणि दुसऱ्या बाजूला विपन्नता, आर्थिक-राजकीय धोरणांचा अटळ परिणाम अशा मुद्यांचे विवेचन करता करता त्यांनी ‘विकास, विकास म्हणतोय तो नेमका कोणता’ असा सवाल केला तेव्हा समोरच्या रांगातील उजव्या कोपऱ्यात अनेकांनी एकमेकांकडं अर्थपूर्ण नजरेनं पाहिलं होतं. एका आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेमध्ये प्रदीर्घ काळ विश्लेषक म्हणूनही कर्णिकांची कारकीर्द गाजलेली होती. देशातील मिश्र अर्थव्यवस्था आणि या संस्थेच्या भूमिकेतीलच खुलेपणाचा आग्रह या वातावरणात त्यांनी मांडलेल्या काही भूमिका चर्चिल्याही गेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा सवाल त्या कोपऱ्यामध्ये हालचाल माजवून गेला यात नवल नव्हतं.
कर्णिक सत्काराच्या मुद्यावर आले. “खरं तर मी अशा कार्यक्रमांच्या विरोधात आहे. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद वगैरेंच्या फंदातही मी पडलो नाही. कारण अशावेळी माणूस आधी बोलतो, मग बडबडतो आणि नंतर बरळतो, असंच मला वाटत आलंय. पण आज नाईलाज झाला.”
“साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतला तेव्हाही भावना इतक्या उचंबळून आल्या नव्हत्या. कदाचित, तेव्हाच्या तारूण्याचा तो जोश असावा. माझ्या नाटकांनी शतकांवर शतकं मारली तेव्हाही इतकं भरून आलं नव्हतं. त्यातही आपण हातखंडा नाटककार आहोत या ‘अहं’चा भाग असावा. महाराष्ट्रभूषण घेतला तेव्हा मी या राज्यापुढं नतमस्तक झालो होतो, पण तुमच्या या भरभरून प्रतिसादानं आज त्याहीपलीकडे विनयाची भावना निर्माण झाली आहे,” त्यांनी टेबलावर मांडलेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांच्या रांगांकडं आणि त्यापुढं खाली ठेवलेल्या हारांच्या राशीकडं हात केला. “यामागचं कारण उमजत नाहीये. माणसं आयुष्याच्या अखेरीला अधिक हळवी होतात असं म्हणतात. त्याचाच हा भाग आहे का?” कर्णिक क्षणभर थांबले. उजवीकडे कोपऱ्यात पहिल्या तीन-चार रांगांवर थोडी चुळबूळ झाली. हाती टिपणवह्या घेतलेले दोघं-तिघं तिथून उठून लगबगीनं दाराकडं निघाले.
कर्णिक बोलू लागले, “सांगता येणार नाही. पण हळवा झालोय खरा. मघा बरंच काही बोललो. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. निरोप घेतो.” आणि कुणालाही काही कळण्याच्या आधीच ते माईकपासून दूर होऊन खुर्च्यांकडं वळले.

कर्णिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांनी ‘जागतिक’ या शीर्षकाच्या कादंबरीचा पहिला मसुदा हातावेगळा केला होता. कादंबरीचं बीज केव्हाचं डोक्यात रुजून बसलं होतं. पण निवृत्तीआधीच्या धावपळीत त्यांना तशी निवांत बैठक मिळाली नव्हती. निवृत्तीनंतर मात्र त्या बीजानं पुन्हा उसळी खाल्ली आणि त्यांनी हा विषय हातावेगळा करायचं ठरवलं. धोरणांमधील स्थित्यंतर, समाजजीवनात घडलेले बदल आणि त्याचे एकमेकांना कवेत घेऊ पाहणारे पण एकमेकांपासून निसटणारेही तरंग या कादंबरीतून टिपण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला होता. या कादंबरीसंदर्भात आणखी एक वेगळेपण होतं. प्रथमच कर्णीक एखाद्या साहित्यकृतीसाठी अभ्यास करावयास म्हणून बाहेर पडले होते. देशाच्या निवडक वेगवेगळ्या भागांतील समाजजीवन जवळून पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. याआधी नोकरीनिमित्तानं त्यांनी केलेलं देशाटन एका विशिष्ट वर्तुळातलंच असल्यासारखं होतं. ती खंत त्यांनीही अनेकदा बोलून दाखवली होती. त्यामुळं त्यांच्या या ताज्या देशाटनाला कादंबरीच्या संदर्भासह महत्त्व होतं.
या सगळ्या सायासांमध्ये पोटदुखीकडं थोडं दुर्लक्षच झालं होतं. आणि अगदीच असह्य झालं तेव्हा त्यांनी डॉ. गोडबोल्यांचं हॉस्पिटल गाठलं. त्यालाही कमलताईंचा आग्रहच कारणीभूत होता.
“डायलिसीस करावंच लागेल. त्याला पर्याय नाही.” डॉ. गोडबोल्यांनी उपचारांची योजना सांगितली तेव्हा कर्णिकांपुढं दुसरी काही निवड करण्याची संधी नव्हतीच. मूत्रपिंडं निकामी होत चालली होती. कमलताई सोबत होत्या. विश्वनाथ देसाईही होते. या दोघांनीही मान डोलावली आणि पुढं सरकण्याचा निर्णय झाला.
“इट इज नथिंग. किडनी शरिरात जे काम करेल ते आपण बाहेरून करून घेतो. टेक्नॉलॉजी हॅज अॅड्व्हान्स्ड सो मच दॅट धिस प्रोसिजर इज व्हेरी कॉमन अॅण्ड सेफ नाऊ. त्यामुळं काळजीचं कारण नाही.”
“किती वेळेस करावं लागेल?” देसायांनी विचारलं.
“आय थिंक, गिव्हन द कंडिशन अॅज ऑफ नाऊ, महिन्यात एकदा पुरेसं आहे.” गोडबोल्यांनी सांगितलं.
“खर्चाचं काय?” कमलताईंचा काळजीनं भरलेला सूर आला.
“अक्का, त्याची काळजी तुम्ही करायची नाही. ती आम्ही करू.” देसाई म्हणाले. स्वतः कर्णिकांनीही मान डोलावून पत्नीच्या खांद्यावर थोपटत त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

‘जागतिक’च्या लोकआवृत्तीचे प्रकाशन कर्णिकांच्या घरी एका साध्या समारंभात झालं तेव्हा तिथं उपस्थित असलेल्यांपैकी एकट्या विश्वनाथ देसायांनाच कर्णिकांच्या प्रकृतीची कल्पना होती. डायलिसीस सुरू होऊल चौदा महिने होत आले होते. मधल्या काळात कर्णिकांच्या या नव्या कादंबरीनं यशाची नवी शिखरं गाठली होती. केवळ खप म्हणून नव्हे; तिनं चर्चेतही भर टाकली होती. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतरचा एकही महिना असा गेला नव्हता की, जेव्हा या कादंबरीच्या अनुषंगानं समाजगटांमध्ये चर्चा झाली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर लोकआवृत्तीच्या प्रकाशनाचा सोहळा संपल्यानंतर कमलताईंचा निरोप घेण्यासाठी नाडकर्णी स्वयंपाक घरात गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची खिन्नता त्यांच्यातील संपादकाच्या नजरेनं बरोबर टिपली.
“वहिनी, इतका सुरेख कार्यक्रम झाल्यानंतरही तुम्ही अशा खिन्न का?”
“…” कमलताईंनी नुसतंच त्यांच्याकडं पाहिलं. ते मौन पुरेसं बोलकं होतं. काही तरी घडतंय हे निश्चित, हे नाडकर्ण्यांच्या ध्यानी आलं. डायनिंग टेबलावरची एक खुर्ची ओढून त्यांनी बैठक मारली आणि बाहेर देसायांना हाक मारली. ते आत आले आणि काही काळातच नाडकर्ण्यांसमोर चित्र स्पष्ट झालं.
आरंभी महिन्याला एकवार करावं लागणारं डायलिसीस आता आठवड्याला एकदा करावं लागत होतं. पेन्शन आणि लेखनाचं मानधन यांच्या जोरावर आर्थिक आघाडी सांभाळली जात असली तरी इथून पुढं ती किती निभावली जाईल याची चिंता करण्याची वेळ आली होती. कर्णिकांनी आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थेत काम केलं असल्यानं त्यांना मिळणारी पेन्शन विदेशी चलनातील असली तरी आधीची बचत आता संपत आली होती. यापुढं महिन्याचा खर्च दर महिन्याच्या पेन्शनमधूनच भागवावा लागणार हे दिसत होतं. कमलताईंची घालमेल होत होती. विषय काढला की, कर्णिक लगेचच “आपल्यापुढं खाण्याची चिंता तर निर्माण झालेली नाही ना?” असं विचारून त्यांना गप्प करत. वर “मला हात पसरायचे नाहीत. तुझी सोय आहे. त्याची चिंता करू नकोस,” असंही सांगत; त्यामुळं कमलताईंना बोलणं अशक्य व्हायचं. पण या विषयाची तड लावावी लागेल आणि ऐकतील तर फक्त देसायांचं हे त्यांना पक्कं ठाऊक होतं. अनायासे नाडकर्ण्यांच्या समोर हा विषय खुला झाला आणि त्यांच्या मनावरचं मणामणाचं ओझं एकदम हलकं झालं.

सगळा हिशेब केल्यावर जेव्हा देसायांनी दाखवून दिलं की, केवळ पेन्शनवर आयकराची सूट मिळाली तरी, डायलिसिसचा खर्च भागवून नियमित निर्वाहही स्वबळावर शक्य आहे तेव्हा कुठं दरवाजा थोडा किलकिला झाला. हात पसरायचे नाहीत हा कर्णिकांचा हट्ट मोडून काढणं एकट्या देसायांना शक्यही नव्हतं. नाडकर्ण्यांचं वजन कामी आलं.
“आपण एक करू. अर्थमंत्र्यांना सांगू. विदेशी चलनात मिळणाऱ्या पेन्शनवरील आयकर माफ करण्याची तरतूद काही विशिष्ट संस्थांसाठी आहे. त्याच चौकटीचा आधार घेत तुमच्या पेन्शनवरील आयकर माफ केला जावा अशी व्यवस्था करण्यासाठी त्यांना सांगू. केंद्रीय मंत्री म्हणून त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवर्समध्ये ते बसते,” नाडकर्ण्यांनी सांगितलं तेव्हा कर्णिकांना मान डोलावण्याशिवाय पर्याय राहिलेला नव्हता. पुढच्याच आठवड्यात डायलिसीसचा पुढचा कोर्स आखावा लागेल, असं गोडबोल्यांनी सांगून ठेवलं होतंच.

नाडकर्ण्यांनी दिल्लीला सुधीरला फोन केला तेव्हा तो बाहेर पडण्याच्या तयारीतच होता. नाडकर्ण्यांच्या वृत्तपत्राचा विशेष प्रतिनिधी म्हणून राजकीय वर्तुळात उठबस असल्यानं पटेलांपर्यंत त्याला पोचता येणार होतं.
“बाहेर फारसं कुठं काही कळता कामा नये. कर्णिकांवर डायलिसीस सुरू आहे. पैशांची तजवीज आत्तापर्यंत पेन्शनमधूनच झाली आहे. पण यापुढं थोडं अवघड आहे…”
पलिकडं सुधीर सुन्न झाला असावा. नाडकर्ण्यांना ठाऊक होतं की, सुघीरच्या पिढीवर कर्णिकांचा प्रभाव मोठा होता. केवळ कादंबऱ्या आणि नाटकं यामुळं नव्हे किंवा कर्णिकांच्या विनोदी कथांमुळंही नव्हे. सुधीरसारख्यांवर खरा प्रभाव होता तो कर्णिकांच्या विपुल राजकीय उपहासात्मक लेखनाचा. बाईंची राजवट आणि त्यानंतर आघाडी या गोंडस नावांखाली झालेल्या खिचड्यांच्या प्रयोगांनी कर्णिकांची लेखणी इतकी फुलवली होती की त्या काळात कर्णिक हे गंभीर वृत्तीचे कादंबरीकार आणि नाटककारही आहेत हे विस्मृतीतच गेल्यासारखं झालं होतं. पुढं देशानं धार्मिक आधारावरचं धृवीकरण अनुभवलं तेव्हाही त्या राजकारण्यांची खिल्ली उडवण्यात कर्णिक आघाडीवर होतेच. सुधीरच्या पिढीवर या साऱ्याचा प्रभाव जबरदस्त होता.
“पार्सलमधून अर्ज पाठवतो आहे. पटेलांशी बोलून ठेव. उद्या त्यांच्या हाती अर्ज देता येईल असं पहा,” नाडकर्ण्यांनी सांगितलं. सुधीरनं होकार भरला. “बाकी काय घडामोडी आहेत?” नाडकर्णी कामाकडं वळले.
“विशेष काही नाही. आज चव्हाणांची प्रेस आहे. रुटीन. कॉमर्स मॅटर्स. शिंदे बहुदा आज येथे येताहेत, त्यांचं पहावं लागेल.” प्रदेशाध्यक्षांच्या या दिल्लीवारीत तसं विशेष काही नव्हतं. पण बातमी म्हणून तेवढी घडामोड पुरेशी होती.
“तो येईल आणि परतेल. त्यातून काहीही होणार नाही,” नाडकर्ण्यांनी नेतृत्त्वबदलाच्या हालचालींबाबतची त्यांची नापसंती व्यक्त केली आणि फोन बंद केला.

“कर्णीकांची मराठी मनावर मोहिनी आहे. वन ऑफ द स्टॉलवर्ट्स ऑफ हिज जनरेशन…” नॉर्थ ब्लॉकमध्ये सुधीरनं पटेलांना गाठून कर्णिकांचा अर्ज त्यांच्या हाती ठेवला. सुधीरसारख्या पत्रकारानं पुढं केलेला अर्ज. त्यामुळं पटेलांनी शांतपणे ऐकून घ्यायला सुरवात केली. कामाचं स्वरूप सांगून झाल्यानंतर सुधीर कर्णिकांचं मोठेपण सांगू लागला तेव्हा स्टॉलवर्ट्स या शब्दानंतरच पटेलांनी त्याला रोखलं.
“इफ इट्स जेन्युईन, वील डू इट. आय नो यू आर नॉट गोईंग टू पुट इन अ वर्ड फॉर एनीबडी…”
“नो सर, इन फॅक्ट, त्यांच्यासाठी शब्द टाकावा इतका मी मोठा नाही. त्यांच्यासारख्यांचं माझी पिढी एक देणं लागते म्हणून…”
“ओह, आय अंडरस्टॅंड. वील डू इट. फॉलोअप ठेव. पांडे वील सी इट थ्रू. आय’ल टेल हिम टू टॉक टू यू” पांडे हा पटेलांचा सचिव. पटेलांनी तिथंच अर्जातील आवश्यक त्या मजकुरापाशी खूण करून शेजारी ‘ए’ असं इंग्रजीतील अक्षर लिहिलं. खाली शेरा टाकला, “प्रोसेस अकॉर्डिंग टू रूल्स.” सुधीरच्या खांद्यावर थोपटत पटेलांनी शेजारीच उभ्या असलेल्या खासदारांकडं मोर्चा वळवला.

पंधरवडा उलटून गेला तरी पांडेचा काहीच निरोप न आल्यानं अस्वस्थ झालेल्या सुधीरनं ठरवलं की, प्रत्यक्ष पहायचं. “यू नो सुधीर. सरांनी मार्क केलं आहे त्या अर्जावर. पण त्यांना सगळं कसं नियमांनुसार लागतं. त्यामुळं प्रोसिजरली तो अर्ज प्रोसेस केला जातोय. अॅट प्रेझेंट, अ नोट इज बीईंग प्रिपेअर्ड ऑन दॅट. आय’म ऑल्सो फॉलोईंग इट अप. मी पाहीन तो लवकर जॉईंट सेक्रेटरी आणि सेक्रेटरीकडं कसा जाईल ते.”

सरकारी काम आणि सहा महिने थांब, असं सुधीर नेहमी म्हणायचा. त्याचा अनुभव असाही प्रत्यक्ष स्वतःला घ्यावा लागेल हे मात्र त्याच्यालेखी नवं होतं. महिन्यानंतर त्यानं पुन्हा अर्जाची चौकशी केली तेव्हा तो कर विभागाच्या सचिवांपर्यंत पोचला होता इतकंच त्याला कळलं. बजेटची तयारी सुरू असल्यानं आता पटेलांची भेट मिळणं मुश्कील होतं. त्यामुळं त्यानं कर्णिक कोण, हे काम होणं कसं आवश्यक आहे वगैरे पांडेच्या डोक्यावर बिंबवण्याचा जोरदार प्रयत्न केला. “मी समजू शकतो. पण सरांची कामाची पद्धत तुला मी सांगण्याची गरज नाही. ती वेलनोन आहे.” पांडेच्या या विधानांवर सुधीर किती नाही म्हटलं तरी संतापला होताच. तरीही त्याला आवर घालत त्यानं, “पांडेजी, यहा दिल्लीमें प्रोसेस एक्स्पडाईट भी होती है ना. अशी किती उदाहऱणे देऊ तुम्हाला?” त्याच्या या प्रश्नावर पांडेनं आपल्या वाणीत मिठास आणत, “आय’ल पर्सनली एन्शुअर दॅट इट ईज डन विदिन अ वीक,”असं सांगितलं.
आठवड्यात पुन्हा फॉलोअप घेण्याचं दोघांचंही ठरलं.

“निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून मिळणारे पैसे जनकल्याणाच्या योजनांवर खर्च केले जात असल्यानं त्याला विरोध करण्याचं कारण नाही. किंबहुना यासंबंधी सरकारची बांधिलकी स्पष्ट व्हावी म्हणून निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशांपैकी २५ टक्के रक्कम तात्काळ लोककल्याणाच्या योजनांसाठी, २५ टक्के रक्कम शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रातील पायाभूत संरचनांसाठी वापरण्याचे बंधन टाकणारी तरतूद यासंबंधीच्या कायद्यात केली जाणार आहे. याच अधिवेशनात त्यासंबंधीचे दुरूस्ती विधेयक मांडले जाईल,” अशी घोषणा अर्थसंकल्पाच्या भाषणात पटेलांनी केली तेव्हा लोकसभेत बाके दणाणली. अर्थसंकल्प मांडल्यानंतर दूरचित्रवाहिन्यांवर त्यांचा प्रफुल्ल चेहरा झळकत होता. अर्थकारणाला आणखी एक महत्त्वाचे वळण देणारा निर्णय, अशी त्यांच्या या निर्णयाची वाखणणी सर्वत्र होत होती. निवडणुकांचे पडघम वाजू लागले होते.

दुसरा अर्ज करण्यास किंवा स्मरणपत्र पाठवण्यास कर्णिकांनी नकार देऊन दोन महिने झाले होते. डायलिसीस आता आठवड्यात दोनदा करण्याची गरज होतीच, पण ते आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यानं एकदाच करावयाचं, असं त्यांनी डॉ. गोडबोल्यांना सांगून टाकलं होतं. कमलताईंच्या डोळ्याला धार लागायचीच बाकी होती. अस्वस्थ देसाई आणि नाडकर्णी यांनीही कर्णिकांच्या निर्धारापुढं हात टेकले होते. पण त्यांनी त्यांच्या पातळीवर सुधीरकडून पाठपुरावा सुरू ठेवला होता. नाडकर्ण्यांनी एरवीची त्यांची चौकट बाजूला सारून राज्यातील तिन्ही केंद्रीय मंत्र्यांशी बोलणं करून पाठपुरावा करण्यास सांगितलं होतं. आश्वासनं मिळाली होती; पण त्यातून किती यश येईल याची त्यांना खुद्द खात्री नव्हती. कारण हे तिन्ही मंत्री आणि पटेल यांचा स्तरच अतिशय भिन्न होता.

पुणे (प्रतिनिधी) – ज्येष्ठ साहित्यीक राधाकृष्ण कर्णिक यांचं आज दीर्घ आजारामुळं निधन झालं. मराठी मनावर गेली तीस वर्षे अधिराज्य करणाऱ्या या साहित्यीकाच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे…
…पंतप्रधान श्री कांत आचार्य यांनी कर्णिकांच्या ‘जागतिक’ या कादंबरीचा उल्लेख करून श्रद्धांजली वाहताना सांगितलं की, कर्णिकांसारख्या अर्थतज्ज्ञाची नाळ त्यांच्या साहित्यविषयक जाणिवांमुळे लोकांमध्ये पक्की रुजलेली होती…

अंत्यसंस्कार करून देसाई, नाडकर्णी वगैरे मंडळी कर्णिकांच्या घरी परतली, तेव्हा गेटवरच पोस्टमननं सावधपणे देसायांना बाजूला घेतलं.
“अण्णांसाठी आलेलं पत्र आहे. आत जाऊन देऊ शकणार नाही…” त्यालाही भावनावेग आवरत नव्हता. देसायांनी त्याच्या खांद्यावर थोपटत पाकिट हाती घेतलं. यू.जी.आय.एस.चा शिक्का त्यावर होता. मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही अक्षरं देसायांच्या पाणावलेल्या डोळ्यांनाही नीट दिसली. देसायांनी पाकिट फोडलं. कागद उघडला. राधाकृष्ण कर्णिक यांची साहित्यसेवा ध्यानी घेऊन त्यांना विदेशी चलनात मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावरील आयकर माफ करण्यात येत असल्याचा निर्णय झाला असल्याची माहिती त्यात संदर्भ क्रमांक आणि तारखेसह देण्यात आली होती. प्रत पुण्याच्या मुख्य आयकर आयुक्तांना पाठवल्याचा उल्लेख होता. खाली सचिवांचा शेरा होता, पुण्याच्या आयकर आयुक्तांशी संपर्क साधण्याचा.

“मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक व शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निःस्पृहपणे, तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन.”
“मी, ईश्वरदास पटेल ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, संघराज्याचा पंतप्रधान म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब, असा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीजकरून एरव्ही मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही.”


पाणी

एप्रिल 2, 2007

सलग तिसऱ्या वर्षी पावसानं हुलकावणी दिली तसा गिरधर चिंतेत पडला. असं नव्हतं की, पावसानं सायखेड्याला कधीच हुलकावणी दिली नव्हती. त्याच्या पस्तीस वर्षांच्या आयुष्यात तशी वेळ दोन-चारदा आली होती. पण त्यात पीक-पाण्याचं फारतर दोन-तीन आण्याचंच नुकसान व्हायचं. आत्ता मात्र तसं नव्हतं. दोन वर्षांच्या आधीच्या वर्षी पाऊस पडला; पण कमी. पीकं कशीबशी तगली. गेल्याच्यागेल्या वर्षी पीकं आठ आणेच आली. त्याच्यानंतरही तशीच स्थिती. यावर्षी तर तीही नाही. सगळी रानं करपून गेली पार. बीसुद्धा राहिलं नाही.

यंदा ढग येत होते आणि वाकुल्या दाखवून जात होते. पाण्याची धार कधीच लागली नव्हती. सरपंच जीताबाच्या शब्दात सांगायचं तर, `छ्या, ह्ये काय खरं नाही गड्या. ह्ये काय पाणी म्हणायचं? कुत्रंच मुतयलंय जनू’! त्याचे शब्द त्याच्याच बोलीतले होते; पण खरेही होते.

गेल्या वर्षी गावाला टँकर लागला. याहीवर्षी तीच गत होती.

गिरधर म्हणाला जीताबाला, `सरपंच, आत्ता आहे तोच टँकर पुढं कायम करावा म्हणून अर्ज करून टाका आत्ताच. नदी कोरडी ठाक झालीय.’

सरपंचानं मान डोलावली आणि म्हणाला, `गिरा, ह्ये काय ठीक दिसत नाय माला. तू बग काय करता येतं का ते. येवडा लेका पुन्याला कालीजात व्हतास. तितं असंल की कोनी अशा येळी काय करायचं त्ये सांगनारा.’

गिरधर म्हणाला, `त्याची काय गरज नाय. आपल्याला ठाऊक आहे काय करावं लागनार आहे ते. नदी वरच्या अंगाला अडवावी लागंल. बंधाऱ्याची मागणी करावी लागंल. त्याशिवाय खैर नाही आपली.’

`आरं त्ये करूच. पन बंधारा कायी आसा एका झटक्यात थोडाच व्हनार आहे? त्याचा इतिहास काय तुला माहित नाय?’

`असं म्हणून आपण गप्प बसलो ना तर तेही व्हायचं नाही. असं समज की दोन वर्षं बंधाऱ्याला लागतील. पण आत्तापासूनच मागणी लावून धरायला हवी. ती वर्षं कशीही काढावी लागतील. पाणी टँकरनं मिळेल; पण पोटासाठी काम करावंच लागेल. त्यासाठी गावातच काम काढावं लागेल. खरं तर, गेल्या वर्षीच हालचाल करायला हवी होती आपण. पण असेल एकादं वर्ष त्याचंही खाड्याचं असं म्हणून गप्प बसलो तेच चुकलं.’

`मंग कसं करायचं म्हंतोस?’ जीताबानं विचारलं.

गाव होतं दोनशे उंबऱ्याचं. सगळीच काळ्या आईची लेकरं. त्यामुळं तिथं काही काम असेल, हात राबले तरच पोटात चार घास जातील अशी स्थिती. गिरधरला ही स्थिती सलत होती. त्यावरचा उपायही त्याच्या मनात गेल्याच वर्षी येऊन गेला होता. पण त्यावेळी तोच थोडा बेसावध राहिला होता. जीताबासमोर त्यानं ते कबूलही करुन टाकलं होतं आत्ता.

गावाच्या दक्षिणेकडून तिवई नदी वहायची. तिथं बंधारा करायचा एक जुना प्रस्ताव होताच. तोच आत्ता पुढं करून घ्यावा, असं त्याचं म्हणणं होतं. गिरधरचं आणि सरपंचाचं जमायचं. पुण्यात शिकून आलेला, त्यातही गावाचा पहिलाच ग्रॅज्युएट म्हणून सरपंचाला त्याचं कौतुक होतं. शिवाय बाप गेल्यानंतर गिरधरनं ज्या पद्धतीनं शेती सांभाळली होती, तेही पंचक्रोशीत कौतुकाचं ठरलं होतं. त्यामुळं आता त्यानं जे सांगितलं होतं ते मनावर घ्यायचं सरपंचानं ठरवून टाकलं.

`येतो मी. संध्याकाळला भेटू’ असं म्हणत कट्ट्यावरून जीताबा उठला. गिरधर मात्र विचार करत बसून राहिला. काय करायचं यावर्षी या एकाच प्रश्नानं त्याच्या डोक्यात ठाण मांडलं होतं. बघता-बघता त्या प्रश्नाचं आभाळ झालं, कोरडंच, उत्तर नसलेलं. प्रश्नाची रुपं अनेक होती. प्रश्न फक्त पाण्याचा नव्हता. त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक बाबीचा होता. पोटाचा होता, मुख्य म्हणजे. लोकांसाठी अन्नाचं काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. ती काही त्याची अगदी प्राथमिक जबाबदारी नव्हती; पण गावात तो काहीही पदावर नसला तरी कोणत्याही पदावरच्या व्यक्तीपेक्षा त्याला गावात अधिक मान होता आणि तोच त्याच्यावर त्या जबाबदाऱ्या टाकून जात होता.

मनाशीच काही निर्णय करून गिरधर उठला आणि त्याची पावलं घराकडं वळली. आधी क्षणभर त्यानं रानाकडं जावं असा विचार केला होता. पण तिथं जाऊन सुकलेली, भेगा पडलेली जमीन पाहण्याची कल्पना त्याला घाबरवून गेली आणि त्यानं पावलं घराकडं वळवली.

***

राजपूर तालुक्याच्या रेस्ट हाऊसवर त्यादिवशी गर्दी होती. पालकमंत्री बाबासाहेब देशमुख आले होते. तिथं जमलेल्या प्रत्येकाचं काही – ना – काही गाऱ्हाणं होतं त्यांच्याकडं. ते आले होते खरं तर एका क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी. अशा दौऱ्यात नेहमीच एक किंवा दोन तास राखीव ठेवला जात असतो. लोकांना भेटता यावं यासाठी. साधारणपणे ही वेळ दुपारची असते. मंत्र्यांचं जेवण झालं की. बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की या काळात ते वामकुक्षी घेत असावेत. बाबासाहेब तर त्याविषयी खेदही व्यक्त करायचे जाहीर भाषणात. कारण ते कधीच वामकुक्षी घेत नसत. `या मधल्या वेळेत मी लोकांना भेटतो. त्यामुळं मला त्यांच्या जगण्याची माहिती होते,’ असं ते म्हणायचे. आजही त्याच शिरस्त्याप्रमाणे ते लोकांना भेटत होते.

`सायखेड्याचे काही लोक आलेत.’ स्वीय सहायकानं बाबासाहेबांना सांगितलं आणि त्यांच्या कपाळावरच्या रेषा जरा अधिक स्पष्ट झाल्या. या गावानं कधीही त्यांना `साथ’ दिली नव्हती. तिथली मतपेटी त्यांच्यासाठी कोरी पाटीच असायची.

`काय काम आहे? टँकरचं असेल तर तुम्हीच पाहून घ्या. मला त्यांना भेटायची इच्छा नाहिये.’ बाबासाहेब म्हणाले.

`साहेब तसं नको. भेटून घ्या. प्रश्न नुसता टँकरचा असावा असं मला वाटत नाहिये. तिथं यंदा टिपूसही पडलेलं नाहीये.’

`ते मला माहिती आहे. मी काय करणार त्याला? टँकरची सोय करू आपण. हवं असेल तर चतुरसिंगला सांगून थोडं धान्यवाटपही करू. आपल्या पुण्यात थोडी भर पडेल हवी तर. बाकी त्याचा फायदा काहीही होणार नाही. त्यांचा कल बापूंकडेच राहणार.’

बाबासाहेब एरवी कधीही त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा असा उल्लेख करीत नसत. यावेळी त्यांनी तो केलाय म्हणजे खचितच त्यांच्या मनात या लोकांना भेटायचं नसणार हे स्वीय सहायकानं ओळखलं. त्यांच्याबरोबर सुमारे बारा वर्षं काढल्यानं आता त्यालाही राजकीय चुका कशा आणि कुठं होऊ शकतात हे कळू लागलं होतं. त्यामुळं अधुनमधून तो आपली स्वीय सहायकाची भूमिका थोडी विस्तारून घेत असे. स्वतःच. तसंच आत्ताही त्यानं केलं.

`साहेब असं नको करायला. भेटून घ्या; काय म्हणणं आहे हे तरी समजेल आपल्याला. तुम्ही म्हणता तेवढीच कामं असतील तर ती मी करून टाकेन. पण जर वेगळं काही असेल तर तुम्हालाच विचार करता येईल. पुन्हा असंही आहे की, त्याच कामांसाठी त्यांना आपल्याकडं येण्याची तशी गरज नाहिये. बापूंकडूनच ती त्यांना करून घेता येतील.’

कधी-कधी असं होतं, एखादी तपशीलाची गोष्ट आपल्या लक्षात येत नसते, हे बाबासाहेबांना उमजत होतं. आपला स्वीय सहायक आपण समजतो त्यापेक्षा थोडा अधिक स्वबळावर विचार करणारा आहे असं त्यांच्या अलीकडं लक्षात येऊ लागलं होती. आत्ताही त्यानं त्याच हुशारीचा त्यांना प्रत्यय दिला होता. याचं काही तरी करावं लागेल! त्यांनी स्वतःशीच विचार केला. असं करताना हमखास ते आपल्या दाढीवरून हात फिरवायचे. पण घाई नको. आपण सीएम होऊ तेंव्हा आपोआप त्याचाही फायदा होईलच असं त्यांच्या मनानं घेतलं. म्हणजे त्याला आपल्याच बरोबर ठेवूया; ओएसडी करता येईल, त्यांनी पुढची दिशा ठरवून टाकली. त्यातच सीएमचा विचार डोक्यात आल्यानं त्यांची कळी खुलली.

`ठीकाय. तुम्ही म्हणता आहात इतकं तर घेऊ भेटून.’ त्यांनी संमती दिली. लगेचच विचारून घेतलं, `आणेवारी१ किती आलीय तिथली?’

`मी परवाच कलेक्टरांशी बोललो. चोपन्न आहे, असं म्हणालेत.’

`आणि तुम्ही ऐकून घेतलं?’ त्यांच्यातला मंत्री जागा झाला होता. `पाण्याचा टिपूसही नाही म्हणताय; मग इतकी आणेवारी कशी असेल?’ इतकी आणेवारी असेल तर त्या गावात विशेष वेगळं काही करता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं.

`तेही बोललो मी त्यांच्याशी. ते म्हणालेत की पुन्हा तपासून घेता येईल.’

`ती मंडळी येण्याच्या आधी कलेक्टरांशी फोन जोडून द्यायला सांगा.’ त्यांनी फर्मावलं.

दोन मिनिटांतच त्यांच्या सूटमध्ये फोन वाजला. पलिकडं कलेक्टर होते.

`काय म्हणतीये साहेब आमच्या जिल्ह्याची स्थिती?’ बाबासाहेबांनी विचारलं. सरकारी अधिकारी असला तरी त्याच्याशी थेट कामाचं बोलायचं नाही हा त्यांचा एक शिरस्ता होता. त्यानुसारच कलेक्टरांना पुढं काही बोलण्याची संधीही न देताच ते म्हणाले, `तुमच्या कामाविषयी मी रावसाहेबांशी बोललो आहे. मुलाची ऍडमिशन होऊन जाईल, असा शब्द त्यांनी दिलाय. तुम्ही एक-दोन दिवसात त्यांना फोन करून घ्या.’ बाबासाहेबांनी सांगितलं.

पलीकडं कलेक्टर खूश झाले. मुलाला पुण्यात शिकायची संधी हवी होती. तो नागपूरला कंटाळला होता. जिल्हा कसा आहे, हे ते सांगू लागले. त्यांना एक-दोन बाक्यं पूर्ण करू देऊन बाबासाहेबच म्हणाले,

`ते असो. तुम्ही आहात म्हटल्यावर आम्हाला जिल्ह्याची चिंता नाही. पाऊस आहे बरा हीही एक कृपाच. पण मी म्हणतो, आणेवारी थोडी जास्तच वाटतीये. नजर आणेवारी आपण चाळीसच्या आसपास जिथं काढली होती, तिथं ती एकदम चोपन्न वगैरे झालेली दिसते. काही तरी गडबड आहे असं वाटत नाही तुम्हाला.’

कलेक्टरांच्या ध्यानी आला तो विषय. सायखेडा आणि परिसराचा मुद्दा आहे. त्यांनी क्षणात निर्णय केला आणि म्हणाले, `साहेब, तिथं फेरतपासणी करण्याचा आदेश मी आजच काढणार आहे. प्रांत आज येताहेत. आले की लगेच तोच विषय घेतोय…’

त्यांना रोखत बाबासाहेब म्हणाले, `ते तर करालच तुम्ही; पण माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. जिथं आणेवारी पन्नासच्या खाली येईल, तिथं आपल्याला काही करावं लागेल. मला वाटतं तुम्ही थोडं कामांचं नियोजन करून घ्यावंत. काही कामं रोहयोखाली वेगळी काढता आली तर त्याचा विचार करुया. मी उद्या तिथं येतोय. आल्यावर माझ्या काही कल्पना आहेत, त्या बोलतो तुमच्याशी.’

बाबासाहेबांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून स्वीय सहायकाकडं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटू लागलं होतं.

फोन बंद झाला आणि त्यानं सायखेड्याच्या लोकांना आत बोलावलं. जीताबा आणि गिरधर पुढं होतं. जिताबाला पाहून बाबासाहेब उठले.

`या, या, जिताबा. काय म्हणतोय आमचा गाव? आणि ही जवान पोरंसुद्धा?’ त्यांनी विचारलं.

गिरधरकडं त्यांचा निर्देश होता. आमचा गाव असा शब्दप्रयोग त्यांनी मुद्दाम केला होता. एकेकाळी हे गाव त्यांच्या घराण्याचं मांडलीक असल्यासारखं होतं. बाबासाहेबांनी या गावाला तसं कधीही वागवलं नव्हतं…; पण ती आठवण नकोच, असं मनाशी म्हणत त्यांनी तो विषय बाजूला सारला.

बाबासाहेबांनी आमचा गाव असा उल्लेख करतानाच ही जवान पोरंसुद्धा असंही म्हटलं होतं. त्यामागंही हेतू होता. गिरधरला माहिती होतं की बाबासाहेबांचा आपल्या गावावर जितका राग आहे त्यापेक्षा कांकणभर जस्ती राग गिरधर, शिवाजी, लक्ष्मण यांच्यासारख्यांवर होता. ही पोरंच हे गाव आपल्या मागं येऊ देत नाहीत, हे बाबासाहेबांना माहिती होतं. बापुसाहेबांवर या मुलांची श्रद्धा होती, ते आमदार असल्यापासून. त्यांची आमदारकी बाबासाहेबांनी हिसकावून घेतल्यानंतरही ती टिकून होती. राज्यातली काही मोजकीच गावं अशी होती ज्यांची एकगठ्ठा निष्ठा एखाद्या नेत्याच्या मागं असते. त्यात सायखेडा एक होतं. हे गाव बापुसाहेबांच्या मागं होतं आणि मंत्री झाल्यानंतरही ते आपल्या मागं येत नाही याची खंत बाबासाहेबांच्या मनात होती. कधी-ना-कधी हे गाव मागं आणायचंच असं त्यांनी केंव्हाच ठरवलं होतं; पण त्यात त्यांना यश येत नव्हतं.

बाबासाहेब त्यांच्याकडे पाहात होते. गिरधर म्हणाला,

`काय म्हणणार गाव? टिपूस नाही. तीन वर्षं झाली. कसं करायचं हाच प्रश्न आहे. म्हटलं सरकारलाच विचारावं.’

बाबासाहेबांच्या लक्षात आलं. ही मुलं काही आपल्याला दाद लागू देणार नाहीत. त्यामुळं त्यांनी सूर बदलला आणि मुद्द्याचं बोलण्यास सुरूवात केली. `तेही खरंच. पण त्यासाठी टँकर कायम करून हवा असेल तर देऊ ना! धान्याची सोयही करता येईल.’

जीताबा त्यांना थांबवत म्हणाला, `धान्याची काळजी नाय साहेब, प्रत्येक घरच्या धन्याची हाय. टँकरचं म्हणाल तर तहसीलदार साहेबांनी तेही कबूल करून टाकलंय आत्ता, यांच्यासमोर.’ त्यानं स्वीय सहायकाकडं खूण केली. बाबासाहेबांना हा त्याचा आगाऊपणा वाटून गेला. पण जीताबाच्या पुढच्याच शब्दांनी येऊ पाहणारा राग मावळलाही. `त्ये काम तुमच्याकडून व्हनार ह्ये माहित व्हतंच. आत्ता येगळं काम घ्यून आलोय.’

बाबासाहेबांनी त्यांच्याकडं फक्त प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहिलं. आता गिरधर बोलू लागला.

`साहेब, गावच्या मागं नदीवर आपण बंधारा ठरवला होता. त्याचं काम सुरू करावं असं आमचं म्हणणं आहे. ते झालं तरच आमच्या आणि रायगावच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.’

हा बंधारा बापूसाहेबांच्या काळातच मंजूर झाला होता. तो अडवला गेला होता बाबासाहेबांच्याच काळात. बंधाऱ्याच्या मागच्या वडगावच्या लोकांचा त्याला विरोध होता म्हणून. बंधाऱ्याच्या पाण्यात तिथल्या पाच जणांची जमीन जात होती. त्यांचा त्यामुळं बंधाऱ्याला विरोध होता. त्या पाचही लोकांच्या मागं तकद होती बाबासाहेबांचीच. आणि त्यामागं रायगाव किंवा सायखेड्यातून त्यांची मतपेटी कोरी जात होती ते कारण होतं. खरं तर त्या लोकांना त्यांची जितकी जमीन जाते तितकी काढून द्यायला, तीही बंधाऱ्याखालीच आणि सलग, सायखेड्याची मंडळी तयार होती. त्यासाठी त्यांनी एक वेगळाच निर्णयही केला होता. प्रत्येकाच्या जमिनीतून वाटा काढायचा आणि त्यांना सलग जमीन दिल्यावर आपले बांध सरकवून घेत जायचं. हा निर्णय सोपा नव्हता. तो झाला असूनही वडगावची मंडळी विरोध कायम ठेवून होती.

सौदा सरळ होता. बाबासाहेबांना तरी तो तसा सरळ वाटत होता. रायगाव आणि सायखेड्यानं निष्ठा वहावी, प्रश्न चुटकीसारखा सुटेल. त्यांनी तसं सूचीतही केलं होतं. पण ही दोन्ही गावं त्याला तयार नव्हती आणि बंधारा मात्र अडून पडला होता.

बाबासाहेब म्हणाले, `गिरधरराव, त्या लोकांचं तुम्ही समाधान करा; त्यांचा विरोध संपला की आपण काम सुरू करूच. एवीतेवी त्याचे पैसे आहेतच पडलेले. उलट ते काम सुरू झालं तर माझा तो पैसा मागं जाऊ नये यासाठी होणारा सव्यापसव्य वाचेल.’

त्यांच्या या दांभीकपणाचा गिरधरला प्रचंड संताप आला, पण तो काही करू शकत नव्हता. सरकारनंच त्या लोकांना पटवायचं असतं हे त्याला माहित होतं. त्यानं ते बोलूनही टाकलं.

`ती गोष्ट साहेब तुम्ही मनावर घेतलीत तर अवघड नाही. ती मंडळी तुमच्या ऐकण्यातलीच आहेत.’

मुद्दा आपल्याला हवा तिथंच येतोय हे बाबासाहेबांच्या ध्यानी येण्यास वेळ लागण्याचं कारण नव्हतं. ते म्हणाले, `तसं असतं नं गिरधरराव तर खूप बरं झालं असतं. मग त्यांना सांगणं सोपं गेलं असतं. पण सगळीच मंडळी आमच्या ऐकण्यातली नाहीत ना. हेच तर आमचं दु:ख आहे.’

त्यांना काय म्हणायचं आहे हे लक्षात यायला जीताबा किंवा गिरधरला वेळ लागला नाही. विषय तिथंच येऊन थांबेल असं त्यांना वाटून गेलंही होतं. त्यामुळं त्यांचा जोर ओसरल्यासारखाच झाला होता.

`तरीही तुम्ही मनावर घ्या साहेब. त्यांची – आमची एकदा भेट करून द्या. मार्ग निघेल. आत्ता नाही काढला तर येती वर्षं आम्हाला जगणं कठीण जाईल.’ गिरधर म्हणाला.

`आम्ही तेच म्हणतोय गिरधरराव, तुम्हीही काही गोष्टी मनावर घ्या. मार्ग निघतात.’

गिरधरच्या समोर हा विषय थेट काढायचा नाही असंच बाबासाहेबांनी ठरवलं होतं. त्यामुळं ते तेवढंच सूचक बोलले आणि म्हणाले, `पाहू आपण काय करता येईल ते. मी त्यांच्याशी परत बोलतो. आणखी काही हवंय का?’

गिरधरला, जीताबाला सुटका झाल्यासारखं वाटलं. जीताबा म्हणाला, `गावात यंदा रोजगार लागेल. कामं जवळच मिळाली तर लोकांना सोयीचं होईल.’

`हां, तेही करून टाकू आपण. आत्ताच मी कलेक्टरांशी बोललो आहे. त्यांना उद्या बाकी सांगतोय. पण मला वाटतंय की बंधारा होणार हे गृहीत धरूनच आपण कामांचा विचार करुया. डिस्कोंशी२ मी बोलतो. मृदसंधारणाची कामं काढू काही. ती येत्या वर्षी पुरतील. पुढच्या वर्षीचं त्यावेळी पाहू.’

हे थोडं अनपेक्षीत होतं मंडळींना. इथं त्यांना `पाहू, करू’ असा प्रतिसाद अपेक्षीत होता. बाबासाहेबही आधी त्याच मनस्थितीत होते; पण पाणीच नसल्यानं हे गाव आपल्या बाजूला ओढून घेण्यास हीच योग्य वेळ आहे आणि त्यासाठी आपण पुरता जोर लावायचा हे ठरवूनच ते कलेक्टरांशी बोलले होते. त्यांच्या त्या बोलण्याचा योग्य परिणाम झालेला समोर दिसत होता. मंडळींचे ताणलेले चेहरे आता थोडे सैल झाले होते. ती संधी घेत बाबासाहेबांनी पुढचा डाव केला,

`गिरधरराव, जीताबा, ते बंधाऱ्याचंही मनावर घेतो; पण थोडं इकडं-तिकडं करण्याची तुम्ही तयारी ठेवा. तो बंधारा हे बापूसाहेबांचं स्वप्न आहे; ते आमचे राजकीय विरोधक असले तरी इथं आमची दृष्टीही त्यांच्यासारखीच आहे. त्यामुळं ते काम आपण त्यांच्या डोळ्यांदेखतच पूर्ण करायचं आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात आम्हाला आनंदच आहे, हे ध्यानी घ्या.’

गिरधरच्या सैलावलेल्या चेहऱ्यावर पुन्हा ताण आला. तो किंचित कडवट हसला आणि मागं वळला. त्याला हाक मारत बाबासाहेब म्हणाले, `तुम्ही बापूसाहेबांशीही बोलून घ्या. बंधारा झाला की त्यांच्याच हस्ते जलपूजन करावं म्हणतोय आम्ही.’

आता तिथं थांबणं गिरधरला केवळ अशक्य होतं. अर्थात वेळही संपलेली होती. त्यामुळं मंडळी निघाली.

***

सायखेडा कोरडं झालं होतं. टँकरनं यायचं ते पाणी पिण्यापुरतंच होतं. नदी होती सहा मैल लांब. त्यामुळं तिथून पाणी आणण्याची काही सोयही नव्हती. पाईप टाकायचा झाला तरी मोटरची सुरक्षा कशी करायची हा प्रश्न होता. तोच उपस्थित करत गावात तशी पाणीयोजना करायची झाली तर लोकवर्गणी द्यावी आणि मोटरच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी अटच जिल्हा परिषदेनं टाकली होती आणि त्या योजनेच्या दहा लाखासाठी एक लाख रुपये लोकवर्गणी भरण्याचीही गावाची कुवत नसल्यानं तो प्रस्ताव बारगळून गेला होता. नदीत पाणी असून तहानलेलं राहण्याची वेळ सायखेडाकरांवर आली होती. रायगावकर त्या मानानं सुखी होते. तिथं वापराच्या पाण्याची सोय एका देवस्थानाची एक जुनी विहिर करीत असे. अर्थात सायखेड्याची स्थिती पाहून तेही हादरले होतेच.

काय करावं याचा विचार करत गिरधर कट्ट्यावर बसला होता. सोबत पाच-सहा जण होते.

`मोर्चा काढू बंधाऱ्यासाठी’, भडक माथ्याचा साहेबराव बोलला.

`उपयोग नाही. बंधारा अडला आहे तो वडगावकरांमुळं. सरकार हात वरून मोकळं होतंय.’

`त्यांच्याशी बोलणं करायचं काय ठरलं?’

गिरधरनं मग त्यातलीही पंचाईत सांगितली. बाबासाहेबांनी सांगितल्याशिवाय ती मंडळी पुढं येणारच नव्हती. आपापसातील चर्चा असल्यानं एकानं धाडस केलं.

`काय हवंय बाबासाहेबांना? मतंच ना? देऊ असं सांगू, निवडणूक आली की पाहून घेऊ.’

प्रश्न निष्ठेचा होता. बाबासाहेबांना गावाचा विरोध होता, कारण त्यांच्या बापानं देशमुखीच्या काळात या गावावर केलेल्या अत्याचारांच्या आठवणी कायम होत्या. स्वातंत्र्यानंतरही ती मुजोरी बराच काळ कायम होती. गावाची सारी जमीनच देशमुख सावकारांकडून घेतलेल्या कर्जावर त्यांच्याचकडं अडकलेली होती. थोरले देशमुख असतानाच गावातल्या गिरधरच्या आधीच्या पीढीनं एकदा ठरवलं. `असं पन मरायचं आणि तसं पण मरायचं; मंग मरायचंच असेल तर मान खाली घालून कशापायी?’ स्वतःलाच विचारत एकदा काही जण उठले; पंधरा मैलांवर असलेल्या देशमुखांच्या वाड्यावर चालून गेले. व्हायचं तेच झालं; तिथं गोळीबार झाला त्यांच्या रक्षकांकडून. इकडचे दोघे गेले, संतापून यांच्यातल्या एकानं वाड्यावरच्या एका रखवालदाराच्या डोक्यात दंडुका हाणला आणि तो झाला जखमी पण कलम लागलं खुनाच्या प्रयत्नाचं. सोबत दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा या गावकऱ्यांवर नोंदवला गेला. तिथून सुरू झाली ती एक लढाई. गावाव्र पोलिसी अत्याचार झाले. देशमुखांनीही काहीही करायचं बाकी ठेवलं नाही. अब्रू राखणंही गावासाठी मुश्किल होऊन गेलं. हे सारं-सारं त्याला आठवू लागलं. त्या अन्यायात नदी जवळ केलेल्या काही तरण्या मुलींची आठवण आली तसं त्याला पुन्हा स्वतःचीच लाज वाटून गेली. त्या गोष्टींची कुठं दाद होती, ना फिर्याद.

बापूसाहेबांनी त्यावेळी गावकऱ्यांना साथ दिली. सरकारदरबारी रदबदली करून खुनाच्या प्रयत्नाऐवजी मारहाणीचा गुन्हा करून घेतला, दरोड्याची कलमं वगळली गेली; गावाचा एक फायदा या साऱ्यात झाला. देशमुखांच्या अन्यायाविरुद्ध काही होऊ शकतंय म्ह्टल्यावर बाकी गावंही उठली. दरम्यान, थोरले देशमुख गेले आणि त्यांच्या जागी आलेल्या बाबासाहेबांनी बदलता काळ ओळखून जमीन मोकळी केली. सुमारे हजार एकर शेती मूळ मालकांना मिळाली. बाबासाहेबांची अपेक्षा एकच होती, गावानं आता पुढल्या राजकारणात साथ द्यावी, हा विषय मागं टाकावा. पण गावानं त्यांना दुश्मन ठरवलं ते कायमचंच. एक पिढी संपली तरी ती दुश्मनी राजकीय विरोधाच्या रूपात कायम होती.

बाबासाहेब राजकारणात. ते करताना त्यांनी देशमुखीच्या काळाचा जुना दरारा पुन्हा निर्माण केला होता तो नव्या सत्तेच्या जोरावर. सायखेडा त्यांना वळलं नव्हतं. त्यामुळं त्यांना हे गाव काहीही करून पाठीशी आणायचंच होतं. संधी मिळेल तिथं ते गावाला आडवे येत होते. `मी सगळं देतो, माझ्या मागं या. तो कलंक धुवून निघेल,’ असं ते म्हणायचे. ते सारं माहिती असल्यानं, गिरधरला ती सूचना पसंत पडणं शक्य नव्हतं.

`तुला काय इतिहास माहितच नाही का? तू म्हणतो तसं करण्यासाठी गाव मोठं लागतं तातो; आपण तेवढे मोठे नाहित. बंधाऱ्यावर त्यांचंच नियंत्रण असतंय. मतं दिली नाही की समजायचं पाणी बंद. मग काय कराल? बोंबलत बसायचं?’

गिरधरच्या या प्रश्नावर काय उत्तर देणार कोण? सारेच शांत बसले.

***

फेब्रुवारी उजाडला आणि उन्हाची तलखी सुरू झाली. शेतांमध्ये तर आता भेगाच दिसत होत्या. गावाच्या बाहेरचा झाडोरा मरू घातला होता. माणसांनाच प्यायला पाणी नाही तर त्यांना कुठनं पाणी मिळणार? गावातली कुत्री मिळेल त्या रस्त्यानं नदीकडं जायला लागली होती. गुरांचे हाल पाहवत नव्हते. अनेकांनी सोयऱ्यांकडं त्यांना धाडून दिलं होतं. हे फक्त गुरांपुरतंच नव्हतं. एक-दोघांनी घरंही सोडून देण्याची भाषा सुरू केली होती. छोट्या गावांचं हे एक दुर्दैव असतं. एकानं जरी शेत विकायला काढलं असतं तर त्याची मालीका सुरू झाली असती आणि पाहता-पाहता जमिनीचे भाव कोसळून गेले असते. दुष्काळ म्हणजे काय याची ती नुसती नांदीच होती.

बायकांच्या संयमाचा अंत जवळ येऊ लागला होता. घरोघरी पाण्याची बोंब होत होती. बायका तर सरळ सांगायच्या, `हो म्हणा त्याला. पाणी तर येईल. निष्ठा घेऊन काय तहान भागवता येतीय?’

उत्तर नसायचं. येसूबाईनं एके दिवशी कट्ट्यावर येऊन गिरधर आणि जीताबा यांना सगळ्यांच्या समोर विचारलं, `काय ठरवलंय तुम्ही? उन्हानं पोरं पडू लागली आहेत. गावात चार बाळंतीणी आहेत. दुधं आटण्याची वाट पाहताय काय?’

जीताबा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला तेंव्हा ती उसळलीच. `एवढी निष्ठा जपायची असेल तर हिंमतबी हवी. मग सायकली घेऊन नदीवरून पाणी आणायची हिंमत ठेवायची. टँकरवर आम्हाला जावं लागतंय, तुम्हाला नाही. दोन दिवसांत तुम्ही काय ते ठरवा नाही तर आम्ही बांगड्या उतरवतो, त्या तुम्ही भरा. आम्ही बघतो पुढचं.’

तिचा अवतार पाहूनच कट्ट्यावरील मंडळी हबकली. बहुतेकांनी काढता पाय घेतला. गिरधरला ते लागून गेलं होतं. आपण खरंच हिंमत नसलेलेच आहोत, असं त्याला वाटून गेलं. येसूबाई म्हणते ते खरंच आहे. सगळं काही जपायचं असेल तर हिंमत लागते खरी. आपल्याकडं ती नाही. पुन्हा तो विचारात पडला. मार्ग तर काही दिसत नव्हता.

येसुबाई गेली, डोकं फिरवून, असं त्याला वाटलं. या परिस्थितीतून मार्ग सांगू शकणाऱ्या एकाच माणसाचा चेहरा त्याच्यासमोर आला. आणि त्याला थोडी उभारी आली. जीताबाशी त्यानं ती कल्पना मांडली. त्यानंही ती मान्य केली.

***

`तुमची अडचण मला कळते गिरधर; पण तुम्हाला माहित आहे की त्याच्या शब्दाच्या बाहेर जाण्याची हिंमत कोणीच दाखवत नाही. पुन्हा तो टँकर चालू ठेवतोय. दोनच का असेना! त्याची ती पद्धतच आहे. झोडपायचं; पण रक्तबंबाळ होऊ द्यायचं नाही. गावात त्यानं कामंही मंजूर केली आहेत; म्हणजे त्याच्यावर आरोप नाही करता येत. या परिस्थितीत मला दिसतोय तो मार्ग म्हणजे, त्याचं म्हणणं तुम्ही मान्य करायचं. तो म्हणतो ना, झालं गेलं विसरून जा, विसरून जायचं.’

बापूसाहेबांकडूनच हा सल्ला आला म्हणताना बोलणंच खुंटलं असं गिरधरला वाटलं. गावात आपण जे काही सांगतो, त्याच्या नेमकं विरुद्ध ही गोष्ट होती.

`आम्ही तत्त्वांशी तडजोड करणार नाही बापूसाहेब. मी उद्याच टोळी करतो आणि नदीवरून पाणी आणण्याची व्यवस्था करतो.’ गिरधर म्हणाला.

नदीवरून पाणी आणण्याजोगी गावात येऊन-जाऊन सहा-सात जणंच होती हे बापूसाहेबांनाही माहिती होतं. त्यामुळं त्यांना वाटलं एका दिवसातच या कल्पनेचा निकाल लागेल आणि गाव देशमुखांच्या मागं जाईल. बापूसाहेबांना त्याचं दु:ख नव्हतं. अशा पद्धतीनं लोकांना नमवता येतं हे त्यातून सिद्ध होतं याची त्यांना चिंता अधिक होती. आणि त्याहीपेक्षा त्यांना गावची तहान भागणं महत्त्वाचं वाटत होतं.

त्यांना वाटलं होतं तसं झालं नाही. गिरधरनं खरंच टोळी केली आणि ती नदीवरून पाणी आणू लागली. आठवडा गेला आणि मग मात्र उन्हाच्या तडाख्यानं टोळीतील एकेक जण आजारी पडू लागल्याचं कळलं तसं बापूसाहेब विचारात पडले. देशमुखीविरुद्धच्या लढ्यात सायखेडा इतकं तत्त्वनिष्ठ होण्यास आपणच जबाबदार आहोत, असं त्यांना वाटून गेलं. हा लढा आपणच निवडणुकीच्या आखाड्यात नेऊन देशमुखांना पाणी पाजलं होतं ते याच गावांच्या बळावर, याच्या आठवणी जशा डोळ्यांसमोरून सरकू लागल्या तसे ते अधिकच अस्वस्थ होत गेले.

एक-दोन टँकरवर गाव तगू शकणार नाही हे ध्यानी आलं तसं त्यांच्या डोक्यात रक्त उसळू लागलं. आपण या गावाचा बळी तर देत नाही ना, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. देशमुखीच्या अन्यायाविरुद्धचा लढा असा जिवंत ठेवण्यात आपली काही चूक तर होत नाही ना, असंही ते स्वतःला विचारू लागले. `जुने गेले, नवे आले,’ असं आपण म्हणतोय खरं; पण या नव्यांशी लढण्याची ताकद आपल्याकडं नाही, असं त्यांना वाटून गेलं.

या अशा उद्विग्न विचारातच दिवस गेला. रात्रही गेली; पहाटे त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकली. या गावाला संकटातून बाहेर काढायचं असेल तर आपल्यालाच हात-पाय हलवावे लागतील हे त्यांना पटलं होतंच. नेमकं काय करायचं हे मात्र त्यांना उमजत नव्हतं, ते त्यावेळी डोक्यात चमकून गेलं. त्यांनी गिरधरला निरोप पाठवला. `दोन दिवसांत तुझा प्रश्न सुटेल.’

***

बापूसाहेबांच्याच हस्ते बंधाऱ्याचं काम सुरू झालं त्यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब होते. जिल्हाधिकारीही होते. भाषणात बापूसाहेबांनी घोषणा केली, `मी आता निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही.’

आणि त्या क्षणी गिरधरला समजलं बंधाऱ्याचा मार्ग कसा मोकळा झाला ते. वडगावच्या लोकांनी त्यांचा विरोध एका दिवसात कसा गुंडाळून घेतला ते. बंधाऱ्याच्या कामाला युद्धपातळीवर कशी सुरुवात होतेय तेही त्याला कळलं.

बापूसाहेबांनी गिरधर आणि त्याच्या गावाची सुटका केली होती; पण स्वतःचा बळी देऊन. त्या तालुक्यात त्यांच्याशिवाय कोणीही बाबासाहेबांना विरोध करणारा नव्हताच. पुढची निवडणूक बिनविरोध जिंकण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार होतं, त्या एका निर्णयासरशी. त्यांच्या माथी असलेला घराण्याच्या अन्यायाचा कलंकही, कदाचीत, पुसला जाणार होता, त्याच निर्णयामुळं; पण तो निर्णय होता बापूसाहेबांचा. सायखेडा आणि त्या तालुक्यात केवळ बापूसाहेबांच्या मागं निष्ठा असल्यानं वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत बसलेल्या गावांसाठी घेतलेला.

***

टँकरवर पाच वर्षे काढलेल्या सायखेड्यात त्या दिवशी दिवाळी होती. बंधाऱ्याचं काम सुरू झाल्यापासून गेली तीन वर्षं गावात दहा-दहा टँकर येत होते खरे, पण तूट होतीच. लोक गावांत टिकून राहिले होते ते केवळ तिथं निघालेल्या रोजगाराच्या कामांमुळं. त्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी पाईपलाईननं गावात येणाऱ्या पाण्याचं अप्रूप प्रत्येकाला होतं. शेतं पाच वर्षांनी प्रथमच पाणी पिणार होती.

मुख्यमंत्री बाबासाहेब देशमुखांच्या हस्ते तो बंधारा आणि सिंचन व्यवस्था राज्याला अर्पण करण्यात आली तेंव्हा गिरधर गावात जिथं नळकोंडाळं करण्यात आलं होतं तिथं बसला होता. पलीकडंच जीताबाच्या जमिनीत पाईप पोचले होते. दुपारी दोनच्या सुमारास पाणी त्या पाईपमधून पाणी आलं तसा गावात आनंदोत्सव सुरू झाला. `हिंमत लागते’ म्हणणारी येसुबाई पेढे घेऊन आली होती. तो पेढा गिरधरला घेववेना. त्यानं मान वळवली. बंधाऱ्याचं काम सुरू झाल्यापासून हा असाच येडेपणा करतोय असं म्हणून तिनं त्याचा नाद सोडला. ती गेली.

गिरधरला आठवण झाली ती बापूसाहेबांची. आजच्या कार्यक्रमात ते कुठंही नव्हते. त्यांच्याच हस्ते जलपूजन करण्याचं बाबासाहेब विसरूनही गेले होते. मधल्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडूनही आले होते. आता ते सीएम होते. सारं सारं गिरधरला आठवू लागलं. गेली पाच वर्षं, त्याआधीचीही; देशमुखांशी लढण्यात गेलेली. पाहता-पाहता त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. समोर पाईपमधून पाणी कोसळत होतं आणि ते पाहून गिरधरला आठवलं आपली अशी स्थिती होण्याचं कारण. बाहेर जसं पाणी नव्हतं तसंच आपल्या डोळ्यांमध्येही या काळात पाणी नव्हतंच. टिपूसही बाहेर पडला नव्हता गेल्या पाच वर्षात. आभाळातूनही आणि डोळ्यातूनही. आठवलं आणि त्याच्या डोळ्यातून त्यालाही नकळत पाणी येऊ लागलं. मग त्यानं तो बांध फोडून टाकला. डोळे घळघळा वाहू लागले. गावात आलेल्या पाण्यानं ओठ ओले होण्याआधी याच पाण्यानं ते करून टाकले होते.

***

१. आणेवारी – अनेकांना माहिती असेलही; तरीही खुलासा करतो. या शब्दालाच पैसेवारी असाही शब्द आहे आणि अनेकदा तोही वापरला जातो. पीक साधारण किती आलं आहे याचा अंदाज पूर्वी `बारा आणे’, `सोळा आणे’ अशा शब्दांत शेतकरी देत, तेथे या `आणेवारी’चा संबंध असावा. सरकारही पीकाचा अंदाज काढतं. तो असतं पैशात; खरं तर टक्केवारीत. त्यामागं, पाऊस किती आहे, कोणी कसं पेरलंय, बी कोणतं आहे, खतं किती वापरली आहेत, पाऊस संपल्यानंतर पाण्याची उपलब्धी किती आहे आदी घटक असतात, अशी माझी माहिती आहे. बोलीत ज्यावेळी आणेवारी `चोपन्न’ आहे असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ झालेल्या पेऱ्यातून कमाल उपज क्षमतेच्या ५४ टक्के पीक येणार असा सर्वसाधारण होतो.

२. डिस्को – डिस्ट्रिक्ट सॉईल काँझर्वेशन ऑफिसर या शब्दाचं सरकारी बोलीतील लघुरूप. अर्थात, हे सर्वत्र वापरलं जातंच असं नाही.


पेवली

मार्च 26, 2007

(बऱ्याच वर्षांपूर्वी ही कथा ऐकली होती. प्रत्येक गावाची अशी एक कथा असतेच. मौखीक परंपरेतून या कथा येतात. त्यामुळं इथं लिहिताना काही बदल झाले आहेत. या कथेचा आरंभ आणि अंतही मला जमलेला आहे असं वाटत नाही. बराच विचार केला तरीही. त्यामुळं जसं घडलं गेल्याचं ऐकलं होतं तसंच लिहित गेलोय.)

सूर्य माथ्यावर आला तशी ती थांबली. गावातून ती निघाली तेंव्हा सूर्यानं डोकं वरही काढलेलं नव्हतं. आपण किती काळ धावत होतो आणि किती काळ चालत होतो, तेही तिला सांगता आलं नसतं. पाठीशी झोळीत एक आणि खाली हाताशी एक बछडं होतं. दोघांना सांभाळत तिची पायपीट सुरू होती. काही अंतर धावायचं आणि काही अंतर चालायचं. हाताशी असलेलं बछडं दमलं की थांबावंच लागायचं. मग ती आधी आडोसा शोधायची. गावापासून किती अंतर आपण आलो असू याचा अंदाज ती घ्यायची. स्वतः आणि ही दोन्ही बछडी सुरक्षीत ठेवण्यासाठीची ती धडपड आपल्याला पुढे नेईल की नाही याचीच तिला चिंता लागलेली असायची. मग पुन्हा समोर बछडी दिसली की तिला पुढं सरकायची आठवण यायची. डोळ्यांसमोर यायचा तो धारा१ हाती घेतलेला दीर. कारभारी नसता तर आपला जीव वाचला नसता याची तिला खात्री होतीच. कारभाऱ्यानंच तिला गावाबाहेर काढून दिलेलं होतं; म्हणून ती इथंपर्यंत तरी आली होती. ती धावत सुटली तशी कारभाऱ्यानं तिच्या दीराला रोखलं होतं. तरी तिला खात्री नव्हती की तो पूर्ण रोखला गेला असेल याची. पाठलाग तर होत नाही ना याची भीती मनात ठाण मांडून बसली होती. त्यामुळे भेदरलेल्या स्थितीतच तिची ही धावपळ सुरू होती. कारभाऱ्यानं तिला आदल्याच दिवशी सांगितलं होतं की, ही वेळ तिच्यावर एक-दोन दिवसात येऊ शकते. त्याचा अंदाज एका दिवसानंच चुकला होता. तो दिवस दुसराच ठरला. मग सुरू झाली ती ही पायपीट.

पेवलीनं आजुबाजूला पाहिलं. दूरपर्यंत चहूबाजूंना कोणीही दिसत नव्हतं. डावीकडं खाली खोलवर नदी दिसत होती. तिनं नदीला पुन्हा एकदा नमस्कार केला. आपली जीवनदात्रीच ती, ती मनात म्हणाली. त्या दिशेनं ती थोडी पुढं सरकली. खाली पहाडाला खोल उतार होता. काही अंतर उतरल्यावर तिनं उजवीकडं पाहिलं. बऱ्याच अंतरावर पुढं एक सपाटीची जागा दिसत होती. पेवलीनं क्षणभर विचार केला. आपल्या गावापासून ही जागा दूर आहे. शिवाय, कोणाही गावकऱ्याच्या सहज जाण्या-येण्याच्या रस्त्यावरची नाहीये. म्हणजे आपण इथे आहोत हे दिराला कळण्याची शक्यता तशी कमीच. दरम्यानच्या काळात त्याचा राग मावळला तर ठीकच.

तिनं मागं वळून पाहिलं. चढावर कोणीही दिसत नव्हतं. निश्चिंत मनानं ती आणखी पुढं सरकली. बरंच अंतर चालत गेल्यानंतर सपाटीवर ती पोचली. तिनं पुन्हा एकदा मागं वळून पाहिलं, जंगल किती चढावर आहे ते. एक टेकडी चढली की तिथं झाडोरा दिसत होता. खाली तितकंच अंतर उतरलं की नदी होती. ही जागा तिला तिचं नवं घरकूल करण्यासाठी बरी वाटली. मग तिनं ठरवलं, इथंच आता बसायचं. आपलं जे काही व्हायचं आहे ते इथंच होईल.

सुरूवात कशी करायची? पहिल्याच प्रश्नानं पेवली थोडी भांबावली. एक गोष्ट बरी होती. हाताशी असलेलं बछडं सांगितलं तर एका जागी बसू तरी शकत होतं. घर उभं करणं सोपं नव्हतंच. रोज जंगलात जायचं. लाकूड आणायचं. ते बांधायचं आणि एकेक चौकट उभी करायची. तसाच प्रश्न शेताचाही होताच. तिच्याकडं काहीच नव्हतं. कारभाऱ्यानं मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्याच्याकडं निरोपही कसा द्यायचा हा प्रश्न होता. पण हे सारे नंतरचे प्रश्न झाले. आत्ता पहिला प्रश्न तिला सोडवायचा होता तो रात्रीच्या आडोश्याचा.

पेवलीनं सपाटीवरच्या त्या जागेतलं एक झाड गाठलं. तिनसाचं जवान झाड होतं ते. त्याखाली तिनं हातातलं गाठोडं ठेवलं. बछड्याच्या हातात असलेली कळशी घेतली. त्याला तिथंच बसायला सांगितलं आणि ती नदीकडं निघाली. काही पावलं गेली आणि पुन्हा मागं आली. पाठीवरची झोळी तिनं काढली. बाळाला खाली जमिनीवरच झोळीचं घोंगडं टाकून निजवलं. मग पेवली पाणी घेऊन आली. तिनं दोन्ही मुलांना जेऊ घातलं. येताना आणलेली रोटी संपली होती, त्यामुळं आता तिला रात्रीची सोयही करावी लागणार होती. दोन्ही मुलांना तिनं तिथंच निजवलं आणि तिनं जंगलाचा रस्ता धरला.

जंगल असलेल्या टेकडीवर ती चढली आणि तिनं मागं वळून पाहिलं. मुलं तशीच पडलेली होती. मग ती जंगलात शिरली. मोहाला फळं होती, त्यामुळं तो प्रश्न नव्हता. काही ठिकाणी तिला कंदही मिळाले. त्याचा तिथं इतका साठा होता की तिची पुढच्या काही दिवसांची चिंता मिटणार होती. पण तिनं ठरवलं फक्त कंदांवर दिवस नाही काढायचे. काहीही करून रोटीची किंवा भाताची सोय करायचीच. तिनं मग कमरेला बांधलेला कोयता हाती घेतला. सणसणीत वाढलेलं एक सागाचं झाड बघितलं. तेवढ्यात तिला आठवण झाली आणि ती पुन्हा जंगलाच्या सीमेवर आली. बारीक नजर करून तिनं तिनसाच्या झाडाकडं पाहिलं. तिथं हालचाल होती. मुलं उठली असावीत, हे ध्यानी येऊन तिनं धाव घेतली त्या झाडाकडं.

मुलं उठली होती. मोठा कावराबावरा होऊन इकडं-तिकडं पाहू लागला होता. आई दिसत नसल्यानं रडणाऱ्या लहानग्याकडं पाहात बसण्याखेरीज काही करावं हेही त्याला सुचत नव्हतं. पेवली पोचली. तिनं लहानग्याला कुशीत घेतलं. त्याला शांत केलं.

मुलगा म्हणाला, `कुठं गेली होतीस आम्हाला सोडून?’

`सोडून नाही रे. कंद आणला. लाकूड आणायचं होतं. तेवढ्यात इथं पाहिलं, तुमची हालचाल. म्हणून धावत आले.’ तिनं सांगितलं. पुढं त्याला समजावून सांगत ती म्हणाली, `मी परत जंगलात जातेय. लाकूड आज थोडं तरी आणावंच लागेल. ते आणेपर्यंत इथं याच्यावर लक्ष ठेवून बस. काही झालं तर मला हाळी दे. तो रांगत जाईल इकडं-तिकडं, फार लांब जाऊ देऊ नकोस.’ त्यानं मान डोलावली तशी ती पुन्हा जंगलाच्या दिशेनं गेली.

घरासाठी लागणारे चार खांब काढेपर्यंत पेवली दमून गेली. तरीही तिनं जिद्द सोडली नाही. काही काळ थांबून आणखी दोन खांब तिनं काढलेच. सहाही खांब वाहून नेणंही सोपं नव्हतं. तिनं मग युक्ती केली. चार खांब आडवे खाली टाकले. दोन खांब हातात घेतले. आडव्या टाकलेल्या खांबांच्या दोन्ही टोकांना जोर लावत तिनं ते ढकलण्यास सुरवात केली. तिच्या लक्षात आलं की ही युक्ती काम करतीये. मग तसं रेटतच तिनं ते खांब तिनसाच्या झाडापाशी आणले.

सूर्य मावळतीकडं झुकला होता. तो मावळण्याआधीच तिला ते खांब उभे करायचे होते. तिनं मग पटापट चार खड्डे खोदले. बोटं ते कोपरा एवढे ते खोल करताना तिच्या हाताच्या बोटांची आग सुरू झाली. पण इलाज नव्हता. तिनं काम तसंच रेटलं. सूर्य मावळला तेंव्हा पेवलीनं चारही खांब उभे केले होते. एका बाजूला घोंगडीही लावलेली होती. आडोसा झाला होता. मग दोन्ही मुलांना घेऊन ती नदीवर गेली. हात स्वच्छ धुवून तिनं तिथली माती आणि झाडपाला बोटांना लावला. परत ती वर आली. मुलांना खाऊ घालून झोपवलं.

अंधार दाटू लागला तशी भीतीची एक लहर पुन्हा पेवलीच्या मनात चमकून गेली. तिला जनावरांची भीती वाटत नव्हती. ज्या अनुभवातून ती गेली होती त्यामुळं माणसांचीच भीती अधिक होती. पण आपल्याला माणसांनी मदतही केलीय हे आठवून तिनं ती भीती मागं लोटली. आता चहुकडं शांतता होती. रातकिड्यांचा आवाज होता तेवढाच.

पेवली विचार करू लागली. गेल्या काही दिवसातील घटनांचा…

***

पहाडात त्यावेळी घनदाट जंगल होतं. दिवसाही सूर्य दिसायचा नाही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. ऊन्हाळ्यात पानगळ व्हायची; पण त्याही काळात झाडांच्या फांद्यांची जाळी जिथं विरळ असायची अशाच भागातून सूर्याचं दर्शन व्हायचं.

आपल्या दोन्ही कुशींना दोन नद्या घेऊन बसलेल्या त्या पहाडातील जीवन त्या काळात कसं होतं? जंगलाचं राज्य येण्याआधी ते सुखीच होतं. जे हवं ते तिथं जंगलात मिळायचं. शेतीत खूप काही पिकायचं. एकाद्या साली पाऊस कमी पडला तर शेतीचं जे नुकसान व्हायचं ते जंगल भरून काढायचं. जंगलात कंद होते, मुळं होती, मोहाची फ्ळं होती, चारोळ्या होत्या. नदी होतीच. ओहोळही होते. तिथं मासे मिळायचे. कपडे आणि मीठ, क्वचित तंबाखू याच काय त्या गोष्टी होत्या ज्यासाठी गाव सोडून बाहेर जावं लागायचं, बाजारपेठेत.

उन्हाळा आला की, जंगलात जायचं आणि मोहाची फुलं, फळं गोळा करायची हा एक नित्यक्रम असायचा. पेवली तशीच त्या दिवशी जंगलात गेली होती. ती गेली तेव्हा सूर्य डोक्यावर आला होता. जाताना तिच्यासोबत तिच्या दोन-चार सख्याही होत्या. जंगलात शिरेपर्यंत त्या एकत्र होत्या, जंगलात शिरल्यावर आपापल्या मार्गानं त्या गेल्या. सूर्य मावळतीला लागल्या की पुन्हा त्या जंगलाच्या सीमेवर एक येणार होत्या आणि मग गावात परतणार होत्या.

पेवली असेल तिशीची. गावात तिचं कोणी नव्हतं. आई-बाप गेले त्याची आठवणही आता तिच्या मनात अगदीच पुसटशी राहिली होती. जगण्याचा साथीदार म्हणून जो निवडला होता तोही गेला होता. जीवनसाथी गेला तो अचानकच. काही कळण्याआधीच. सकाळी ओहोळावर ती गेली होती, दुपारी परतली तर शेतात तो पडलेला होता. काहीही करण्यासारखं नव्हतं शिल्लक.

त्याच्याशी संबंधीत आठवणी तिनं मनाच्या एका कोपऱ्यात जपून ठेवल्या होत्या. जंगलात त्याची पहिल्यांदा तशी भेट झाली ते ठिकाण मोहाची फुलं-फळं गोळा करता-करता आलं की तो कोपरा खुला होऊन समोर यायचा. एरवी तोही तिनं बंदच करुन ठेवला होता. आत्ताही हे विचार येण्याचं कारण तेच झाड पुन्हा समोर आलं होतं. पाठीच्या झोळीत बाळ कुरकूर करू लागलं होतं. तिनं त्याला पाजायला घेतलं.

एक बरं झालं होतं, हे कोपरे बंद करून ठेवल्यानं. त्यानंच गावच्या संमतीनं जंगल काढून केलेलं घर आणि शेत, आणि दोन मुलं यांची साथ घेत बाकी जगणं तरी सुखानं सुरू होतं. शेतीची जितकी कामं करता येतात, तितकी ती करायचीच. बाकीच्या कामांसाठी मग लाहा२ करावा लागायचा. त्यात मग त्याचे भाऊबंद यायचे मदतीला. एका भावाचं शेत हिच्या बांधाला लागूनच होतं. पेवलीला माहिती होतं की, जमलं तर त्याला ते शेतच हवंय. पण कारभारी जोवर आपल्या बाजूला आहे तोवर त्याला फारसं काही करता येणार नाही याची खात्री असल्यानं ती तशी निर्धास्त होती. कारभाऱ्याचे हे तिच्यावर उपकारच होते.

कारभाऱ्याचे उपकार तरी किती मानायचे हाही प्रश्नच होता. आई-बाप गेल्यानंतर ती जे जगली होती ते त्याच्याच आश्रयानं. त्यानं तिला मुलगी मानायचा वगैरे प्रश्नच कधी येऊ नये, असं तिचं आणि त्याचं नातं होतं. तिचं लग्नही त्यानंच करून दिलं होतं. त्या लग्नासाठी तिला जे देज मिळालं, तेही त्यानं घेतलं नव्हतं; ते तिच्याच पदरात टाकून तो म्हणाला होता, हे तुझंच आहे.

आठवणीत हरवलेल्या पेवलीला सूर्य मावळतीकडे झुकल्याचं भानही नव्हतं. तिच्याबरोबर आलेली सीता बोलवायला आली तेंव्हाच तिला ते कळलं. ठरल्याप्रमाणे त्या मग परतल्याही. पेवलीकडं इतर कोणाहीपेक्षा मोहाचा साठा जास्त झाला होता, त्यामुळे ती खूष होती.

पण ही खुषी फार काळ टिकणारी नव्हती हे पेवली किंवा तिच्या कोणाही सखीला माहित नव्हतं. कारण गावात त्यावेळी हाहा:कार उडालेला होता. पेवली किंवा तिच्या सख्या जंगलात गेल्या तेव्हा मजेत खेळत असणारी किंवा खाली ओहोळावर डुंबत बसलेली चार मुलं थोड्या वेळानं घरी परतली तिच मुळी झाडा३ होत असल्याची तक्रार करत. त्यांच्या आया किंवा घरात जे कोणी असेल त्यानं मग बुडव्याचं४ घर गाठलं.

पेवली आणि तिच्या सख्या गावात परतल्या तोवर सारं चित्र बदललं होतं. ती चार मुलं अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेली होती आणि आणखी सहा मुलं अंथरुणावर पडलेली होती. बुडव्याचे प्रयत्न सुरू होते; पण त्याला यश येत नव्हतं. आधी तो नुसता जडी-बुटीचाच वापर करीत होता. दुसरा दिवस उजाडला तशी या आजाराची गावात साथच पसरली होती. तोवर आणखी तीन मुलं गेली होती. झाडा झालेल्या मुलांची संख्याही आता दहावर गेली होती.

हे अरिष्ट चौथ्या दिवशी थांबलं तेंव्हा गावातील बळींची संख्या अकरा झाली होती. गेलेल्या मुलांमध्ये पेवलीचा पुतण्याही होता. अरिष्ट थांबलं होतं त्या मुलांपुरतं. पेवलीच्या शांत आयुष्यात ते वावटळ उठवून गेलं.

पाहता-पाहता गावाची नजर बदलली. पेवलीनंच त्या मुलांना काही केलं असं लोक म्हणू लागले. ती चेटूक करते असं म्हटलं जाऊ लागलं. आणि सारं गावच तिचा दुश्मन झालं. बुडव्यानं सांगितलं, `संकट संपलेलं नाही. पेवली आहे तोवर संकटं येत राहतील.’ बहिष्कृत पेवलीनं कारभाऱ्याकडंच दाद मगितली होती. पण तो काही करू शकला नाही. सगळं गाव एकीकडं आणि तो एकीकडं असं झालं. त्याला आणि पेवलीलाही माहिती होतं की या हालचालींमागं पेवलीचा दीरच आहे. जमीन हेच त्याचं कारण होतं, हेही उघड होतं. पण आता पेवलीला डाकीण ठरवल्यानंतर जमीन देऊन प्रश्न सुटणार नव्हता. तिच्या जीवावरच सारं काही बेतलं होतं.

सकाळी दीर आला तेंव्हा पेवली शेतात होती. त्यानं तिच्याशी वाद उकरून काढला तो तिच्या नवऱ्याला पैसे दिले होते ते परत मागत. थोडी बोलाचाली झाली आणि कारभाऱ्याक्डं खबर गेली. तो आला. त्याला पाहून थोडा धीर आलेल्या पेवलीनं मग दीरावर सरळ आरोप केला की तिच्या जमिनीसाठी तो हे सारं नाटक करतोय.

आपलं बिंग थेट फुटल्यानं संतापून त्यानं घरी जाऊन धारा घेतला आणि तो पेवलीला मारण्याच्याच हेतूनं परतला. कारभारी मध्ये आला आणि जीव वाचवून पेवली आता इथं पोचली होती.

***

कारभाऱ्याला निरोप कसा द्यायचा याचाच विचार करत पेवली उठली तेव्हा प्रकाश पसरू लागला होता. दोन्ही मुलं अजून उठली नव्हती. सूर्य जसा वर येईल, तशी ती जागी होतील हे ध्यानी घेऊन पेवली नदीकडं गेली. आंघोळ उरकून ती बाहेर आली तेंव्हा पूर्वेच्या बाजूनं दोन माणसं येताना तिला दिसली. या निर्जन भागात कोण असावं याचा विचार करत असतानाच तिच्या लक्षात आलं की हे यात्रेचे भाविक असणार आणि क्ष्णात तिच्या डोक्यात कल्पना चमकून गेली. कारभाऱ्यासाठी त्यांच्याकडून निरोप पाठवता येऊ शकेल.

पेवली त्यांच्या दिशेनं चालू लागली. थोड्या अंतरावर ते सामोरे आले तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही आश्चर्य होतं. या भागात एकटीच स्त्री कशी याचं. पुढं होत त्यांच्यातल्या प्रौढानं पेवलीची चौकशी सुरू केली; बोलावं की नको असा क्षणभरच विचार करून पेवलीनं अखेर आपण गावातून का बाहेर पडलोय ते थोडक्यात सांगितलं. डाकीण हा भाग सोडून. सांगण्याखेरीज तिच्याकडं पर्यायही नव्हता. ऐकून दोघंही सुन्न झाले होते.

पेवलीनं मग त्यांना सांगितलं की ती इथं असल्याचं तिच्या गावच्या कारभाऱ्याला सांगा. दोन्ही बाजूच्या गावांची नावं देऊन तिनसाच्या झाडाची खूणही तिनं दिली.

दोन दिवसांनी कारभारी आला तेंव्हा पेवलीनं घराचा सांगाडा उभा केला होता. त्या दोन दिवसात तिनं जीवापाड कष्ट उपसले होते. नदी, जंगल अशा फेऱ्या ती करायची. मूल सांभाळण्याची चिंताही होतीच. त्या निर्जन भागात रात्री काळीज थरकापवून गेल्या होत्या. मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात दडलेली जगण्याची दुर्दम्य इच्छाच तिला धीर देऊन गेली होती.

घराचा सांगाडा उभारण्याच्या कामात तिच्या मोठ्या, पण कामासाठी चिमुरड्याच असणाऱ्या, मुलानंही हातभार लावला होता. घाराच्या त्या सांगाड्यात त्यानंच एकेक काठी रोवून भिंतही तयार केली होती. काठ्या जंगलातून पेवली घेऊन यायची. तिनं त्याला घराचं छत करण्यासाठी पानं, गवत कसं विणायचं हे शिकवलं होतं. त्यानं एकट्यानं दोन खोल्यांसाठी पुरेल असं छत केलं होतं. ते वर चढवण्यासाठी मात्र पेवलीला कोणा-ना-कोणाची मदत लागणारच होती आणि त्याचा ती विचार करत असताना कारभारी पोचला होता.

पेवलीनं केलेलं काम पाहून तोही अचंबीत झाला होता. साठीच्या त्या वृद्धाला त्या भागात वसलेल्या गावांच्या अनेक कहाण्या माहिती होत्या; डोळ्यांसमोर उभं राहू पाहणारं ते घर म्हणजेही एक गावच असेल ही कल्पना मनात येताच तोही हरकून गेला. या पोरीत निश्चितच काही आहे, असं त्याला वाटून गेलं. मनोमन त्यानं काही ठरवलं.

येताना आणलेलं दादर आणि कोद्रूचं पोतं त्यानं खाली ठेवलं. पेवलीच्या पाठीवर थाप मारत शाबासकी देत त्यानं कमरेची धोती सावरून घेतली आणि वयाला लाजवेल अशा चपळतेनं तो घराच्या सांगड्याला भिडला. काही वेळात त्यानं ते छत उभं केलं आणि पेवलीच्या घराला रुपडं आलं. समाधानानं ती घराकडं पाहू लागली.

कारभारी तिला म्हणाला, `बाये, इथं तुझ्यासोबत राहण्यासाठी मी एक-दोघांना पाठवतोय. तुझं शेत आखून घे. जंगलापर्यंतच्या सपाटीवर आणखी चार जणांची शेतं होतील. पुढं वाढ करावी लगली की जंगल काढता येईल.’

`कोणाला पाठवणार आहेस?’ पेवलीनं विचारलं.

`डोंगऱ्या आणि त्याची बायको-पोरं येतील. त्यांच्या गावात नाही तरी आता शेत राहिलेलं नाहिये त्यांचं. त्याच गावातल्या वेस्ताशीही बोललोय. तोही जंगल काढण्याचाच विचार करत होता. तोही येईल. यात्रेकरूंनी निरोप दिल्यावर आधी मी त्यांनाच भेटलोय.’

पेवलीला बरं वाटलं. असं कोणी आलं तर सोबत होईलच. त्यातही डोंगऱ्याची बायको तिच्याच गावची. वेस्ता तिचा भाऊच लागत होता. म्हणजे मंडळी विश्वासाची होती. तिनं होकार भरला.

कारभारी म्हणाला, `या गावाला तुझंच नाव लागेल. तुझं मूल मोठं झालं की तोच कारभारी होईल. तोवर फारसा प्रश्न येणारच नाही कारण इथं तुम्ही फार लोकं असणारही नाही. कोणी यायला तयार असेल तर तिघं मिळून ठरवत जा.’

पेवलीनं आठ दिवसांत शेत आखून घेतलं. तिनं एकटीनंच ते काम केलं. महिन्यानं आधी वेस्ता आणि मग डोंगऱ्याही आला. तोवर पेवलीच्या घराची उभारणी झाली होती. त्या निर्जन भागात ती एकटी राहातीये आणि एकटीनंच तिनं घर उभारलंय हे पाहूनच त्यांना घाम फुटला होता. याआधी एकाही गावाच्या कहाणीत असा पराक्रम कोणी केल्याचं त्यानी ऐकलं नव्हतं. बहुतेक कहाण्यात गावांचे जनक पुरूषच होते आणि श्रेय कोणा एकालाच दिलं जात असलं तरी त्यात किमान चार-पाच जणांचा हातभार लागलेला असायचा. पेवलीच्या गावाचा आरंभ मात्र तिनं एकटीनंच केला होता.

***

एक वर्ष झालं तेंव्हा पेवली या गावात आठ घरं झाली होती. पेवलीच्या शेताचं काम लाहा करून गाव करून देऊ लागलं होतं. जंगल काही भागात काढलं गेलं होतं. आणखी तीन वर्षांनी गावाचा घेर वाढला. पेवली आली तेंव्हा जिथं जंगल होतं त्या टेकडीच्या पुढं गाव सरकला होता. तीन पाडे झाले होते. गावातून बाहेर पडल्यावर एकटीच्या बळावर एका गावाची मुहूर्तमेढ रोवण्याचं पेवलीचं कर्तृत्वच असं अचाट होतं की गावात येणारा तिच्या शब्दाबाहेर जात नव्हता. गाव गुण्या-गोविंदानं नांदू लागलं.

***

एक किंवा दोन शतकांहून अधिक काळ लोटला असेल या घटनेला. वीस वर्षांपूर्वी ते गाव तिथून उठलं, एका धरणाला जागा करून देण्यासाठी. त्यावेळी गावात चाळीस घरं होती. प्रत्येक जण पेवली, वेस्ता किंवा डोंगऱ्याशी संबंधीत होता.

प्रकल्प झाला. गाव उठलं. पेवलीची आठवणही आता त्या गावाच्या काही लोकांच्या मनात असलेल्या इतिहासातच राहिली होती.

***

आपल्या बुडालेल्या गावाची ही कहाणी सांगून तो वृद्ध डोळ्यातून पाणी काढू लागला तेंव्हा मी निशब्द झालो होतो. त्याच्यासोबत मी त्याच्या त्या मूळ गावाच्या भागात गेलो होतो. पेवलीनं केलेल्या घराची जागा मला पहायची होती म्हणून. मला दिसलं ते फक्त पाणी. पाण्याला जीवन म्हणतात हे लहानपणी शिकलेलं मला आठवलं. जीवन या शब्दाचा पेवली आणि तिच्या पेवली या गावाच्या संदर्भात काय अर्थ असावा हे तेंव्हापासून शोधतोय!

***

१. धारा: तलवारीसारखं शस्त्र. तलवारच म्हणा.

२. लाहा: सगळ्या गावानं एकत्र येऊन एकाद्याचं घर बांधायचं किंवा शेताचं काम करण्याची प्रथा. त्या बदल्यात त्या सगळ्यांना जेवण आणि ऐपतीप्रमाणे बिडी-काडी देण्याची प्रथा.

३. झाडा: अतिसार.

४. बुडवा: गावचा वैदू. हाच मंत्र-तंत्रही करतो.