संजय संगवई

१९८८-८९. कोल्हापूर. साहेबांनी बोलावलं म्हणून त्यांच्या कक्षात गेलो.

समोर कृष शरीरयष्टीचा एक तिशीतील गृहस्थ बसला होता. अत्यंत बोलके डोळे. चेहऱ्यावर पसरलेली खुरटी दाढी. माझी वर्षानुवर्षांची ओळख असावी तसं त्यांच्या त्या बोलक्या डोळ्यांनी माझ्याकडं पाहून ते ओळखीचं हसले.

`शास्त्रीय संगीत असा विषय घेऊन यांना काही लिहायचं आहे…’

त्यांची माझी ओळखही करून न देता साहेब बोलले. मी पाहू लागलो. माझा आणि त्या विषयाचा काहीही संबंध नव्हता. तेच पुढं म्हणाले, `यांना बेळगाव, हुबळी, धारवाड, गोवा असा दौरा करायचाय. तुमचे त्या भागातील काही संपर्क असतील म्हणून बोलावलं तुम्हाला.’

डोक्यात प्रकाश पडला. माझी मदत त्यांना त्यांच्या विषयात नको होती याचं बरं वाटलं. मी नेमकी काय मदत केली ते आत्ता आठवत नाही. बहुदा बेळगावची मला माहित असलेली रामभाऊ विजापुरे आणि सुधांशू कुलकर्णी ही नावं मी त्यांना दिली असावीत. राहण्याची सोय आणि या मंडळीना भेटण्याची ठिकाणं याविषयी काही बोललो असेन.

इकडच्या-तिकडच्या चार गोष्टी झाल्या आणि मी माझ्या जागेवर परतलो. पाचेक मिनिटांनी ते गृहस्थ माझ्याकडं आले. नमस्कार करून म्हणाले, `मी संजय संगवई.’

काय करता वगैरे चौकशी झाली आणि ते गेलेही.

काही महिन्यांनी त्यांच्या नावानं एक लेख दिसला. `गाणारा मुलुख.’ झपाटल्यासारखा वाचून काढला. बेळगाव, हुबळी, धारवाड, गोवा, मिरज, सांगली, कोल्हापूर हा भाग केंद्रीभूत ठेवून त्यांनी त्या भागाचं `गाणारा मुलुख’ असं वर्णन केलं होतं. या भागानं शास्त्रीय संगिताला दिलेल्या भरभक्कम कलाकारांची नावं टाकून आपला मुद्दा त्यांनी मांडला होता, इतकंच कळण्याचं ते वय होतं.

***

१९९०. धुळे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांना भेटायला तिथले मित्र हेमंत मदाने यांच्या सोबत गेलो होतो. ओळख करून घ्यायची होती म्हणून. आंदोलनाच्या कार्यालयात पाऊल ठेवलं आणि समोर वर्षापूर्वी पाहिलेली तीच ती मूर्ती आली. एकदम ओळख दाखवून त्यांनी माझंही स्वागत केलं. `अरे ये. इथं आलाहेस?’

तेच बोलके डोळे. दाढीही तशीच. खादीचा झब्बा. साधीच स्वच्छ पँट. शेजारी शबनम पडलेली. समोर लिहिण्याचं एक छोटं डेस्क. काहीतरी लिखाण सुरू असावं.

एका बाजूला मेधा पाटकर बसल्या होत्या. हेमंतनं ओळख करून दिली. त्यांचं बोलणं सुरू झालं. आंदोलन हाच विषय होता.

माझ्यासमोर एक कात्रण पडलं होतं. हेमंत आणि त्यांचं बोलणं सुरू झाल्यानं मी ते वाचू लागलो. सरदार सरोवर प्रकल्पाविषयी त्यात काही महत्त्वाची माहिती होती म्हणून ती टिपून घेऊ लागलो. संजयचं माझ्याकडं लक्ष गेलं. एकदम तो म्हणाला, `माफ करा. इथं जे चालू आहे ते ऑफ द रेकॉर्ड आहे ना?’ मित्रानं होकार भरला आणि माझ्याकडं पाहिलं. मी एकदम कावराबावरा झालो. टिपणांची वही पुढं करत म्हणालो, `छे. मी या कात्रणातल्या नोंदी करतोय.’ विषय संपला. त्यांची चर्चाही संपली. आम्ही निघालो.

संध्याकाळी त्यांची पावलं माझ्या कार्यालयाकडं आली. तासभर ते बसले होते. तेवढ्या वेळात त्यांनी मला सरदार सरोवर हा विषय तेंव्हाच्या परिस्थितीपर्यंत समजावून दिला होता. कुठंही कसलाही अभिनिवेष नाही. बोलण्याच्या ओघात केंव्हातरी त्यांच्या लक्षात आलं की मी त्यांचं म्हणणं जसंच्या तसं घेण्यास तयार नव्हतो.

`तू असं कर. एकदा त्या भागात जा. शक्यतो कार्यकर्त्यांना केवळ मार्गदर्शक म्हणूनच ठेव. समजून घे अगदी तिथल्या लोकांकडूनच. मग मत बनव. मी सांगतो म्हणून नको मत बनवू.’

केंव्हातरी आम्ही एकेरीवर आलो होतो. आणि तेंव्हा सुरू झाला आमच्या मैत्रीचा प्रवास.

मी तिथं कसा आलो हे त्यानं काढून घेतलं, पण तो तिथं कसा आला होता हे मात्र विचारूनही फारसं सांगितलं नव्हतं त्यानं. नंतर गेल्या पंधरा वर्षात माझ्या लक्षात आलं की तो स्वतःविषयी बोलायचाच नाही. पुण्यातलं पत्रकारितेतलं किंवा अध्यापन क्षेत्रात त्याला सहजी उपलब्ध असणारं करियर सोडून तो त्या आदिवासींच्या लढ्यातला शिलेदार झाला होता, हे नंतर असंच कोणाकडून तरी कळलं.

***

१९९१. सोमावल. पुनर्वसनासाठी सरकारनं ठरवलेलं जंगल या गावाच्या भोवती होतं. त्यावरूनही वादंग सुरू झाला होता. मी आणि हेमंत तिथं गेलो होतो. परिस्थिती काय आहे ते पाहण्यासाठी. संजय तिथं भेटणार होता. सोमावलपासून मुख्य रस्त्यानं आम्ही आत शिरलो आणि पहिली वसाहत होणार होती तिथं पोचलो.

घरांसाठी आखणी केलेली दिसत होती. भलेमोठे वृक्ष कापण्याचा आरंभ झाला होता. रस्त्यापासून आम्ही काही अंतर आत गेलो. एका भल्या मोठ्या झाडाखाली काही माणसं बसली होती. घोळक्यात संजय होता. आम्हाला पाहून पुढं आला. लोकांशी चर्चा सुरू झाली. हे सगळे लोक स्थानिक होते. संजय काहीही बोलत नव्हता. लोकांचं म्हणणं आम्हाला समजावून देत होता त्यांच्यातीलच एक जण. विषय इतकाच होता की, ही जमीन त्यांची आहे. तिथं पुनर्वसन झालं तर त्यांनी काय करायचं?

सुमारे तासाभरानंतर केंव्हातरी आम्ही निघालो. मुख्य रस्त्यापर्यंत संजय आमच्यासोबत होता. तेव्हढ्या काळात त्यांनं नेमक्या शब्दात त्या प्रश्नाची मांडणी, अर्थातच त्याच्या संघटनेच्या दृष्टीकोणातून, केली. खरं तर त्याचं काम संपलं होतं. पण तो तिथंच थांबला नाही. त्यांनं मग त्याला ठाऊक असलेलं तिथलं सत्तेचं राजकारण, त्यात गुंतलेले त्या समुदायाचे प्रश्न, त्यांच्यावर वर्षानुवर्षं लागलेला अतिक्रमणदार हा धब्बा हे सारं आमच्यासमोर खुलं करून मांडलं. हेमंतला त्यातलं बऱ्यापैकी आधीही माहिती होतंच. माझ्यासाठी मात्र ते ज्ञानसत्रच ठरलं. जाता-जाता संजयनं त्या विषयाचे अनेक पैलूच उघड केले होते.

***

१९९२. धुळे. संजयची पत्रकं हा एक वेगळा विषय आहे. तिरका झोक दिलेल्या अक्षरात सरळ रेषेत जाणारी त्याची ओघवती वाक्यं माणसाला ते पत्रक वाचण्यास भागच पाडायची. एक तर त्याचा त्या-त्या मुद्द्याचा अभ्यास स्पष्ट असायचा, मांडणी नेमकी असायची. एकच वैशिष्ट्य सांगतो. नर्मदा बचाव आंदोलनाचं लेटरहेड संजयला कधीही लागलं नाही. कागदाच्या वरील उजव्या कोपऱ्यात तो हातानंच `नर्मदा बचाव आंदोलन’ हे शब्द असे काही लिहायचा की त्यापुढं बाकी सारं झूट. आणि त्याच्या त्या अक्षरांचा प्रामाणिकपणा असा होता की पुढं कधीतरी असंच एक पत्रक लिहिताना मी अभावितणे त्याची नक्कल करून गेलो. त्या काळात केंव्हा तरी एक मित्र मला म्हणाला होताही, ही पत्रकं संजयचीच वाटतात. मी म्हणालो होतो, `नक्कलच आहे ती. पण फक्त अक्षरांची. त्याच्या इतका अभ्यास आणि प्रामाणीकपणा यांची नक्कल जरी जमली तरी खूप झालं.’

***

१९९३-९४. धुळे. मधल्या काळात संजय अनेकदा भेटत गेला होता. त्याचं लेखनही वाचण्यात येत गेलं. धुळ्यात निर्मलकुमार सूर्यवंशी यांच्याकडून सुरू असलेल्या खटल्याच्या निमित्तानं त्या प्रकरणाची व्याप्तीही ध्यानी येत गेली आणि संजय हा तिथल्या माझ्या वास्तव्याचा या संदर्भातील आधार होत गेला. एव्हाना आमच्यात आंदोलन हा विषय राहिलेला नव्हता. इतर अधिक व्यापक मुद्दे त्यात येत गेले. देश, राजकारण, समाज, धोरणं असे. काहीनाकाही सांगत संजय देत जायचा. अशाच एका भेटीत त्यांनं माझ्यासमोर वर्णन केलं होतं घाटीतल्या जगण्याचं. तिथल्या एका गावाचं त्यांनं केलेलं वर्णन आजही मनात घर करून आहे. शब्दांची श्रीमंती, ज्ञानाची श्रीमंती त्याच्याइतकी नसल्याची खंत बोचावी असं ते वर्णन होतं.

नर्मदेच्या किनाऱ्यावर सातपुड्याच्या कुशीत उंचावर वसलेलं एक गाव. पाठिशी गर्द जंगल. गावच्या कारभाऱ्याचं घर सगळ्यात उंच पहाडावर. तिथं संजय जाऊन आला होता. त्या तिथल्या पहाडावर तो बराच काळ बसला होता. तिथं त्याला बासरीचे सूर आठवले होते. मी मनात म्हंटलं होतं, पहाड आणि बासरी यांचा नाही तरी ऋणानुबंधच. संजय म्हणाला होता की, कुठून तरी कानात शिरणाऱ्या त्या सुरात तो इतका तल्लीन झाला होता की, `मी माझं जगणं विसरलो होतो. पहाडाची ऊंची अफाट होती. अगदी टोकावर ते घर होतं. समोर खाली खोलवर नर्मदा वहात होती. संध्याकाळ झाली तसा चंद्र माझा नजरेला समांतर उजव्या हाताला उगवला होता. वाटायचं की थोडा हात पुढं केला तर तो गवसेल. काही काळानं चांदणं पडलं, हे कळलं तेंव्हा माझ्या कानातून ते सूर निघून गेले होते. मागं वळून पाहिलं तर कारभारी उभा होता. जंगलातून आवाज येऊ लागले होते. कारभाऱ्यानं मला बोलावलं. उठलो. कधीही विसरू शकणार नाही अशी ती मैफल झाली होती, एकट्याचीच.’

संजयच्या वर्णनातील ताकद या शब्दांत नाही, त्यावेळी ते ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले होते.

***

१९९६-९७. नाशीक. संजय त्यावेळी अभिव्यक्ती या नियतकालीकाच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळत होता. कॅनडा कॉर्नरवर भेट झाली. संजयनं एक अंक दिला. त्याच्यातल्या संपादकाचा ठसा त्यावर होता. म्हणाला, `पत्ता दे. तुला अंक पाठवत जाईन. लिहित जा. आमच्यासाठी.’ ते लिहिणं काही जमलं नाही. माझ्याच आळसामुळं. पण त्यावेळी झालेल्या चर्चेची परवा तो गेल्यानंतर आठवण झाली. काही जण म्हणाले, `संजय पत्रकारितेत राहिला असता तर खचितच संपादक झाला असता.’ त्यातील सदिच्छा समजून घेऊनही मला हसू आलं. जिल्हादैनिकांच्या या जमान्यात संजय एका जिल्ह्यात कसा काय सामावला असता हा प्रश्न मला पडला. आणि एखाद्या समुहाचा संपादक तो झाला असता का हा प्रश्नच आहे. त्यासाठी आजच्या `नेटवर्किंग’ या शब्दांतून व्यक्त होणारे `गुण’ त्याच्याकडं होते का? नाही. शिवाय त्याला करायची असलेली पत्रकारिता संपादक होऊनही त्याला जमली नसती. तो भलताच कोंडमारा झाला असता त्याचा.

नाशीकच्या त्याच भेटीवेळी सरदार सरोवर धरणाविरुद्धचा लढा सर्वोच्च न्यायालयात गेला होता. त्यावरुन बोलणं झालं. मी कुणाशी तरी बोलताना, `हा या लढाईच्या अखेरीचा आरंभ आहे’ असं म्हंटलं होतं. ते त्याच्या कानावर गेलं होतं.

`तू खूप धाडसी विधान केलं आहेस असं वाटत नाही तुला?’ तीरासारखा त्याचा प्रश्न येऊन माझ्यावर आदळला.

पुढं पाच-सहा वाक्यात मी ते विधान का केलं होतं त्याची कारणं सांगितली. सर्वोच्च न्यायालय ही अखेरची पायरी, तिथं युक्तीवाद हरला की सारं काही संपतं वगैरे.

`मोहवणारा युक्तिवाद आहे तुझा, पण त्यात बरीच गृहितकं आहेत आणि ती सारी खरी होतातच असं नाही. शिवाय लोकलढ्यात लोकच सर्वोच्च असतात.

आज मागं वळून पाहताना संजयचंच म्हणणं मोहवणारं होतं असं म्हणू शकतो मी (कुणी तरी म्हंटलं आहेच, हाईंडसाईट इज पर्फेक्ट सायन्स)! पण त्यावेळी त्यानं दिलेला धडा होता, आपला मुद्दा योग्य असेल तर त्याच्याशी प्रामाणिक राहण्यासाठी आशावाद जिवंत ठेवण्याचा. ते त्याचं वैशिष्ट्य होतं. तो तसा हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. अखेर वयाच्या आठव्या वर्षापासून तो मृत्यूला झुंजवत आला होता.

***

२००७ मे. नर्मदेचं पाणी आता वाहायचं थांबलंय. पण घडामोडी चालूच आहेत. संजयची भेट आता पुण्यातच दोघंही असूनही निमित्तानंच होत होती. निमित्त मात्र त्याच्या क्षेत्राचं असायचं. आता तो सेझविरोधी लढ्याचा शिलेदार झाला होता. खरं तर हेही चुकीचं आहे. तो या सगळ्याच लढ्यांचा शिलेदार होताच; कारण त्याची ती धारणा होती. सामाजिक न्याय, समता, सहिष्णुता हे सगळे त्यानं जगलेले मुद्दे होते. सेझ किंवा विस्थापन हा त्यांचा एकेका रुपातला आविष्कार होता फक्त.

याच काळात सर्वोच्च न्यायालयात नर्मदा बचाव आंदोलनाविरोधात परदेशी मदत घेतल्याच्या आरोपावरून खटला झाला, त्याविषयी एक चुकीचं वृत्त प्रसृत झालं. त्यानंतर त्याचा एक संदेश आला, `हा ताण कसा काढू? बोलून की काहीही न करता? हे सारं मी का करतोय?’ अशा आशयाचा. ठरवून मी भेटायला गेलो. खूप बोललो. आपल्या झुंजिची अखेर आली आहे हे त्याला कदाचित जाणवलं असावं. त्याची भाषा निरवानिरवीची होती. `मी गोळा केलेले हे संदर्भ, ही पुस्तकं यांचं काय करावं आता?’ तो विचारत होता. त्याची समजूत काढणं मला शक्य नव्हतं. नव्हे ती माझी पात्रताच नव्हती. पुन्हा भेटू असं काहीसं बोलून मी निघालो. भेटायचं ठरलंही, पण ठरलेलं बहुतेक सारं बारगळतं तसंच हेही बारगळलं. संजय केरळला गेला तो परत न येण्यासाठी.

***

संजय संगवई! नर्मदा बचाव आंदोलनाचा पूर्णवेळ कार्यकर्ता, लेखक, पत्रकार, शास्त्रीय संगीताचा मर्मज्ञ रसीक, राज्यशास्त्राचा अभ्यासक, संस्कृतचा `विद्यार्थी’… संजयची रुपं अनेक होती. त्याच्या त्या-त्या प्रत्येक रूपाचा अनुभव मिळणं हा एक आनंद असायचा. हा आनंद काही भिंती घालून घेता येण्याजोगा नव्हता. असा आनंद देता-देता तो गेल्या बुधवारी हे जग सोडून गेला.

संजय कोण होता? परवा त्याला श्रद्धांजली वाहताना अतुल देऊळगावकर म्हणाले, `तो समोर आला की, वाटायचं आपण गुन्हेगार आहोत.’

खरं होतं ते. तो आरसा होता. सदसदविवेकबुद्धी अशी माणूस होऊन समोर आली की आपल्या गुन्ह्यांची नाही तर कशाची जाणीव होणार?

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: