पाणी

सलग तिसऱ्या वर्षी पावसानं हुलकावणी दिली तसा गिरधर चिंतेत पडला. असं नव्हतं की, पावसानं सायखेड्याला कधीच हुलकावणी दिली नव्हती. त्याच्या पस्तीस वर्षांच्या आयुष्यात तशी वेळ दोन-चारदा आली होती. पण त्यात पीक-पाण्याचं फारतर दोन-तीन आण्याचंच नुकसान व्हायचं. आत्ता मात्र तसं नव्हतं. दोन वर्षांच्या आधीच्या वर्षी पाऊस पडला; पण कमी. पीकं कशीबशी तगली. गेल्याच्यागेल्या वर्षी पीकं आठ आणेच आली. त्याच्यानंतरही तशीच स्थिती. यावर्षी तर तीही नाही. सगळी रानं करपून गेली पार. बीसुद्धा राहिलं नाही.

यंदा ढग येत होते आणि वाकुल्या दाखवून जात होते. पाण्याची धार कधीच लागली नव्हती. सरपंच जीताबाच्या शब्दात सांगायचं तर, `छ्या, ह्ये काय खरं नाही गड्या. ह्ये काय पाणी म्हणायचं? कुत्रंच मुतयलंय जनू’! त्याचे शब्द त्याच्याच बोलीतले होते; पण खरेही होते.

गेल्या वर्षी गावाला टँकर लागला. याहीवर्षी तीच गत होती.

गिरधर म्हणाला जीताबाला, `सरपंच, आत्ता आहे तोच टँकर पुढं कायम करावा म्हणून अर्ज करून टाका आत्ताच. नदी कोरडी ठाक झालीय.’

सरपंचानं मान डोलावली आणि म्हणाला, `गिरा, ह्ये काय ठीक दिसत नाय माला. तू बग काय करता येतं का ते. येवडा लेका पुन्याला कालीजात व्हतास. तितं असंल की कोनी अशा येळी काय करायचं त्ये सांगनारा.’

गिरधर म्हणाला, `त्याची काय गरज नाय. आपल्याला ठाऊक आहे काय करावं लागनार आहे ते. नदी वरच्या अंगाला अडवावी लागंल. बंधाऱ्याची मागणी करावी लागंल. त्याशिवाय खैर नाही आपली.’

`आरं त्ये करूच. पन बंधारा कायी आसा एका झटक्यात थोडाच व्हनार आहे? त्याचा इतिहास काय तुला माहित नाय?’

`असं म्हणून आपण गप्प बसलो ना तर तेही व्हायचं नाही. असं समज की दोन वर्षं बंधाऱ्याला लागतील. पण आत्तापासूनच मागणी लावून धरायला हवी. ती वर्षं कशीही काढावी लागतील. पाणी टँकरनं मिळेल; पण पोटासाठी काम करावंच लागेल. त्यासाठी गावातच काम काढावं लागेल. खरं तर, गेल्या वर्षीच हालचाल करायला हवी होती आपण. पण असेल एकादं वर्ष त्याचंही खाड्याचं असं म्हणून गप्प बसलो तेच चुकलं.’

`मंग कसं करायचं म्हंतोस?’ जीताबानं विचारलं.

गाव होतं दोनशे उंबऱ्याचं. सगळीच काळ्या आईची लेकरं. त्यामुळं तिथं काही काम असेल, हात राबले तरच पोटात चार घास जातील अशी स्थिती. गिरधरला ही स्थिती सलत होती. त्यावरचा उपायही त्याच्या मनात गेल्याच वर्षी येऊन गेला होता. पण त्यावेळी तोच थोडा बेसावध राहिला होता. जीताबासमोर त्यानं ते कबूलही करुन टाकलं होतं आत्ता.

गावाच्या दक्षिणेकडून तिवई नदी वहायची. तिथं बंधारा करायचा एक जुना प्रस्ताव होताच. तोच आत्ता पुढं करून घ्यावा, असं त्याचं म्हणणं होतं. गिरधरचं आणि सरपंचाचं जमायचं. पुण्यात शिकून आलेला, त्यातही गावाचा पहिलाच ग्रॅज्युएट म्हणून सरपंचाला त्याचं कौतुक होतं. शिवाय बाप गेल्यानंतर गिरधरनं ज्या पद्धतीनं शेती सांभाळली होती, तेही पंचक्रोशीत कौतुकाचं ठरलं होतं. त्यामुळं आता त्यानं जे सांगितलं होतं ते मनावर घ्यायचं सरपंचानं ठरवून टाकलं.

`येतो मी. संध्याकाळला भेटू’ असं म्हणत कट्ट्यावरून जीताबा उठला. गिरधर मात्र विचार करत बसून राहिला. काय करायचं यावर्षी या एकाच प्रश्नानं त्याच्या डोक्यात ठाण मांडलं होतं. बघता-बघता त्या प्रश्नाचं आभाळ झालं, कोरडंच, उत्तर नसलेलं. प्रश्नाची रुपं अनेक होती. प्रश्न फक्त पाण्याचा नव्हता. त्यावर अवलंबून असलेल्या प्रत्येक बाबीचा होता. पोटाचा होता, मुख्य म्हणजे. लोकांसाठी अन्नाचं काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. ती काही त्याची अगदी प्राथमिक जबाबदारी नव्हती; पण गावात तो काहीही पदावर नसला तरी कोणत्याही पदावरच्या व्यक्तीपेक्षा त्याला गावात अधिक मान होता आणि तोच त्याच्यावर त्या जबाबदाऱ्या टाकून जात होता.

मनाशीच काही निर्णय करून गिरधर उठला आणि त्याची पावलं घराकडं वळली. आधी क्षणभर त्यानं रानाकडं जावं असा विचार केला होता. पण तिथं जाऊन सुकलेली, भेगा पडलेली जमीन पाहण्याची कल्पना त्याला घाबरवून गेली आणि त्यानं पावलं घराकडं वळवली.

***

राजपूर तालुक्याच्या रेस्ट हाऊसवर त्यादिवशी गर्दी होती. पालकमंत्री बाबासाहेब देशमुख आले होते. तिथं जमलेल्या प्रत्येकाचं काही – ना – काही गाऱ्हाणं होतं त्यांच्याकडं. ते आले होते खरं तर एका क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन करण्यासाठी. अशा दौऱ्यात नेहमीच एक किंवा दोन तास राखीव ठेवला जात असतो. लोकांना भेटता यावं यासाठी. साधारणपणे ही वेळ दुपारची असते. मंत्र्यांचं जेवण झालं की. बऱ्याचदा लोकांचा असा समज असतो की या काळात ते वामकुक्षी घेत असावेत. बाबासाहेब तर त्याविषयी खेदही व्यक्त करायचे जाहीर भाषणात. कारण ते कधीच वामकुक्षी घेत नसत. `या मधल्या वेळेत मी लोकांना भेटतो. त्यामुळं मला त्यांच्या जगण्याची माहिती होते,’ असं ते म्हणायचे. आजही त्याच शिरस्त्याप्रमाणे ते लोकांना भेटत होते.

`सायखेड्याचे काही लोक आलेत.’ स्वीय सहायकानं बाबासाहेबांना सांगितलं आणि त्यांच्या कपाळावरच्या रेषा जरा अधिक स्पष्ट झाल्या. या गावानं कधीही त्यांना `साथ’ दिली नव्हती. तिथली मतपेटी त्यांच्यासाठी कोरी पाटीच असायची.

`काय काम आहे? टँकरचं असेल तर तुम्हीच पाहून घ्या. मला त्यांना भेटायची इच्छा नाहिये.’ बाबासाहेब म्हणाले.

`साहेब तसं नको. भेटून घ्या. प्रश्न नुसता टँकरचा असावा असं मला वाटत नाहिये. तिथं यंदा टिपूसही पडलेलं नाहीये.’

`ते मला माहिती आहे. मी काय करणार त्याला? टँकरची सोय करू आपण. हवं असेल तर चतुरसिंगला सांगून थोडं धान्यवाटपही करू. आपल्या पुण्यात थोडी भर पडेल हवी तर. बाकी त्याचा फायदा काहीही होणार नाही. त्यांचा कल बापूंकडेच राहणार.’

बाबासाहेब एरवी कधीही त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा असा उल्लेख करीत नसत. यावेळी त्यांनी तो केलाय म्हणजे खचितच त्यांच्या मनात या लोकांना भेटायचं नसणार हे स्वीय सहायकानं ओळखलं. त्यांच्याबरोबर सुमारे बारा वर्षं काढल्यानं आता त्यालाही राजकीय चुका कशा आणि कुठं होऊ शकतात हे कळू लागलं होतं. त्यामुळं अधुनमधून तो आपली स्वीय सहायकाची भूमिका थोडी विस्तारून घेत असे. स्वतःच. तसंच आत्ताही त्यानं केलं.

`साहेब असं नको करायला. भेटून घ्या; काय म्हणणं आहे हे तरी समजेल आपल्याला. तुम्ही म्हणता तेवढीच कामं असतील तर ती मी करून टाकेन. पण जर वेगळं काही असेल तर तुम्हालाच विचार करता येईल. पुन्हा असंही आहे की, त्याच कामांसाठी त्यांना आपल्याकडं येण्याची तशी गरज नाहिये. बापूंकडूनच ती त्यांना करून घेता येतील.’

कधी-कधी असं होतं, एखादी तपशीलाची गोष्ट आपल्या लक्षात येत नसते, हे बाबासाहेबांना उमजत होतं. आपला स्वीय सहायक आपण समजतो त्यापेक्षा थोडा अधिक स्वबळावर विचार करणारा आहे असं त्यांच्या अलीकडं लक्षात येऊ लागलं होती. आत्ताही त्यानं त्याच हुशारीचा त्यांना प्रत्यय दिला होता. याचं काही तरी करावं लागेल! त्यांनी स्वतःशीच विचार केला. असं करताना हमखास ते आपल्या दाढीवरून हात फिरवायचे. पण घाई नको. आपण सीएम होऊ तेंव्हा आपोआप त्याचाही फायदा होईलच असं त्यांच्या मनानं घेतलं. म्हणजे त्याला आपल्याच बरोबर ठेवूया; ओएसडी करता येईल, त्यांनी पुढची दिशा ठरवून टाकली. त्यातच सीएमचा विचार डोक्यात आल्यानं त्यांची कळी खुलली.

`ठीकाय. तुम्ही म्हणता आहात इतकं तर घेऊ भेटून.’ त्यांनी संमती दिली. लगेचच विचारून घेतलं, `आणेवारी१ किती आलीय तिथली?’

`मी परवाच कलेक्टरांशी बोललो. चोपन्न आहे, असं म्हणालेत.’

`आणि तुम्ही ऐकून घेतलं?’ त्यांच्यातला मंत्री जागा झाला होता. `पाण्याचा टिपूसही नाही म्हणताय; मग इतकी आणेवारी कशी असेल?’ इतकी आणेवारी असेल तर त्या गावात विशेष वेगळं काही करता येणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं.

`तेही बोललो मी त्यांच्याशी. ते म्हणालेत की पुन्हा तपासून घेता येईल.’

`ती मंडळी येण्याच्या आधी कलेक्टरांशी फोन जोडून द्यायला सांगा.’ त्यांनी फर्मावलं.

दोन मिनिटांतच त्यांच्या सूटमध्ये फोन वाजला. पलिकडं कलेक्टर होते.

`काय म्हणतीये साहेब आमच्या जिल्ह्याची स्थिती?’ बाबासाहेबांनी विचारलं. सरकारी अधिकारी असला तरी त्याच्याशी थेट कामाचं बोलायचं नाही हा त्यांचा एक शिरस्ता होता. त्यानुसारच कलेक्टरांना पुढं काही बोलण्याची संधीही न देताच ते म्हणाले, `तुमच्या कामाविषयी मी रावसाहेबांशी बोललो आहे. मुलाची ऍडमिशन होऊन जाईल, असा शब्द त्यांनी दिलाय. तुम्ही एक-दोन दिवसात त्यांना फोन करून घ्या.’ बाबासाहेबांनी सांगितलं.

पलीकडं कलेक्टर खूश झाले. मुलाला पुण्यात शिकायची संधी हवी होती. तो नागपूरला कंटाळला होता. जिल्हा कसा आहे, हे ते सांगू लागले. त्यांना एक-दोन बाक्यं पूर्ण करू देऊन बाबासाहेबच म्हणाले,

`ते असो. तुम्ही आहात म्हटल्यावर आम्हाला जिल्ह्याची चिंता नाही. पाऊस आहे बरा हीही एक कृपाच. पण मी म्हणतो, आणेवारी थोडी जास्तच वाटतीये. नजर आणेवारी आपण चाळीसच्या आसपास जिथं काढली होती, तिथं ती एकदम चोपन्न वगैरे झालेली दिसते. काही तरी गडबड आहे असं वाटत नाही तुम्हाला.’

कलेक्टरांच्या ध्यानी आला तो विषय. सायखेडा आणि परिसराचा मुद्दा आहे. त्यांनी क्षणात निर्णय केला आणि म्हणाले, `साहेब, तिथं फेरतपासणी करण्याचा आदेश मी आजच काढणार आहे. प्रांत आज येताहेत. आले की लगेच तोच विषय घेतोय…’

त्यांना रोखत बाबासाहेब म्हणाले, `ते तर करालच तुम्ही; पण माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. जिथं आणेवारी पन्नासच्या खाली येईल, तिथं आपल्याला काही करावं लागेल. मला वाटतं तुम्ही थोडं कामांचं नियोजन करून घ्यावंत. काही कामं रोहयोखाली वेगळी काढता आली तर त्याचा विचार करुया. मी उद्या तिथं येतोय. आल्यावर माझ्या काही कल्पना आहेत, त्या बोलतो तुमच्याशी.’

बाबासाहेबांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून स्वीय सहायकाकडं पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटू लागलं होतं.

फोन बंद झाला आणि त्यानं सायखेड्याच्या लोकांना आत बोलावलं. जीताबा आणि गिरधर पुढं होतं. जिताबाला पाहून बाबासाहेब उठले.

`या, या, जिताबा. काय म्हणतोय आमचा गाव? आणि ही जवान पोरंसुद्धा?’ त्यांनी विचारलं.

गिरधरकडं त्यांचा निर्देश होता. आमचा गाव असा शब्दप्रयोग त्यांनी मुद्दाम केला होता. एकेकाळी हे गाव त्यांच्या घराण्याचं मांडलीक असल्यासारखं होतं. बाबासाहेबांनी या गावाला तसं कधीही वागवलं नव्हतं…; पण ती आठवण नकोच, असं मनाशी म्हणत त्यांनी तो विषय बाजूला सारला.

बाबासाहेबांनी आमचा गाव असा उल्लेख करतानाच ही जवान पोरंसुद्धा असंही म्हटलं होतं. त्यामागंही हेतू होता. गिरधरला माहिती होतं की बाबासाहेबांचा आपल्या गावावर जितका राग आहे त्यापेक्षा कांकणभर जस्ती राग गिरधर, शिवाजी, लक्ष्मण यांच्यासारख्यांवर होता. ही पोरंच हे गाव आपल्या मागं येऊ देत नाहीत, हे बाबासाहेबांना माहिती होतं. बापुसाहेबांवर या मुलांची श्रद्धा होती, ते आमदार असल्यापासून. त्यांची आमदारकी बाबासाहेबांनी हिसकावून घेतल्यानंतरही ती टिकून होती. राज्यातली काही मोजकीच गावं अशी होती ज्यांची एकगठ्ठा निष्ठा एखाद्या नेत्याच्या मागं असते. त्यात सायखेडा एक होतं. हे गाव बापुसाहेबांच्या मागं होतं आणि मंत्री झाल्यानंतरही ते आपल्या मागं येत नाही याची खंत बाबासाहेबांच्या मनात होती. कधी-ना-कधी हे गाव मागं आणायचंच असं त्यांनी केंव्हाच ठरवलं होतं; पण त्यात त्यांना यश येत नव्हतं.

बाबासाहेब त्यांच्याकडे पाहात होते. गिरधर म्हणाला,

`काय म्हणणार गाव? टिपूस नाही. तीन वर्षं झाली. कसं करायचं हाच प्रश्न आहे. म्हटलं सरकारलाच विचारावं.’

बाबासाहेबांच्या लक्षात आलं. ही मुलं काही आपल्याला दाद लागू देणार नाहीत. त्यामुळं त्यांनी सूर बदलला आणि मुद्द्याचं बोलण्यास सुरूवात केली. `तेही खरंच. पण त्यासाठी टँकर कायम करून हवा असेल तर देऊ ना! धान्याची सोयही करता येईल.’

जीताबा त्यांना थांबवत म्हणाला, `धान्याची काळजी नाय साहेब, प्रत्येक घरच्या धन्याची हाय. टँकरचं म्हणाल तर तहसीलदार साहेबांनी तेही कबूल करून टाकलंय आत्ता, यांच्यासमोर.’ त्यानं स्वीय सहायकाकडं खूण केली. बाबासाहेबांना हा त्याचा आगाऊपणा वाटून गेला. पण जीताबाच्या पुढच्याच शब्दांनी येऊ पाहणारा राग मावळलाही. `त्ये काम तुमच्याकडून व्हनार ह्ये माहित व्हतंच. आत्ता येगळं काम घ्यून आलोय.’

बाबासाहेबांनी त्यांच्याकडं फक्त प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहिलं. आता गिरधर बोलू लागला.

`साहेब, गावच्या मागं नदीवर आपण बंधारा ठरवला होता. त्याचं काम सुरू करावं असं आमचं म्हणणं आहे. ते झालं तरच आमच्या आणि रायगावच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.’

हा बंधारा बापूसाहेबांच्या काळातच मंजूर झाला होता. तो अडवला गेला होता बाबासाहेबांच्याच काळात. बंधाऱ्याच्या मागच्या वडगावच्या लोकांचा त्याला विरोध होता म्हणून. बंधाऱ्याच्या पाण्यात तिथल्या पाच जणांची जमीन जात होती. त्यांचा त्यामुळं बंधाऱ्याला विरोध होता. त्या पाचही लोकांच्या मागं तकद होती बाबासाहेबांचीच. आणि त्यामागं रायगाव किंवा सायखेड्यातून त्यांची मतपेटी कोरी जात होती ते कारण होतं. खरं तर त्या लोकांना त्यांची जितकी जमीन जाते तितकी काढून द्यायला, तीही बंधाऱ्याखालीच आणि सलग, सायखेड्याची मंडळी तयार होती. त्यासाठी त्यांनी एक वेगळाच निर्णयही केला होता. प्रत्येकाच्या जमिनीतून वाटा काढायचा आणि त्यांना सलग जमीन दिल्यावर आपले बांध सरकवून घेत जायचं. हा निर्णय सोपा नव्हता. तो झाला असूनही वडगावची मंडळी विरोध कायम ठेवून होती.

सौदा सरळ होता. बाबासाहेबांना तरी तो तसा सरळ वाटत होता. रायगाव आणि सायखेड्यानं निष्ठा वहावी, प्रश्न चुटकीसारखा सुटेल. त्यांनी तसं सूचीतही केलं होतं. पण ही दोन्ही गावं त्याला तयार नव्हती आणि बंधारा मात्र अडून पडला होता.

बाबासाहेब म्हणाले, `गिरधरराव, त्या लोकांचं तुम्ही समाधान करा; त्यांचा विरोध संपला की आपण काम सुरू करूच. एवीतेवी त्याचे पैसे आहेतच पडलेले. उलट ते काम सुरू झालं तर माझा तो पैसा मागं जाऊ नये यासाठी होणारा सव्यापसव्य वाचेल.’

त्यांच्या या दांभीकपणाचा गिरधरला प्रचंड संताप आला, पण तो काही करू शकत नव्हता. सरकारनंच त्या लोकांना पटवायचं असतं हे त्याला माहित होतं. त्यानं ते बोलूनही टाकलं.

`ती गोष्ट साहेब तुम्ही मनावर घेतलीत तर अवघड नाही. ती मंडळी तुमच्या ऐकण्यातलीच आहेत.’

मुद्दा आपल्याला हवा तिथंच येतोय हे बाबासाहेबांच्या ध्यानी येण्यास वेळ लागण्याचं कारण नव्हतं. ते म्हणाले, `तसं असतं नं गिरधरराव तर खूप बरं झालं असतं. मग त्यांना सांगणं सोपं गेलं असतं. पण सगळीच मंडळी आमच्या ऐकण्यातली नाहीत ना. हेच तर आमचं दु:ख आहे.’

त्यांना काय म्हणायचं आहे हे लक्षात यायला जीताबा किंवा गिरधरला वेळ लागला नाही. विषय तिथंच येऊन थांबेल असं त्यांना वाटून गेलंही होतं. त्यामुळं त्यांचा जोर ओसरल्यासारखाच झाला होता.

`तरीही तुम्ही मनावर घ्या साहेब. त्यांची – आमची एकदा भेट करून द्या. मार्ग निघेल. आत्ता नाही काढला तर येती वर्षं आम्हाला जगणं कठीण जाईल.’ गिरधर म्हणाला.

`आम्ही तेच म्हणतोय गिरधरराव, तुम्हीही काही गोष्टी मनावर घ्या. मार्ग निघतात.’

गिरधरच्या समोर हा विषय थेट काढायचा नाही असंच बाबासाहेबांनी ठरवलं होतं. त्यामुळं ते तेवढंच सूचक बोलले आणि म्हणाले, `पाहू आपण काय करता येईल ते. मी त्यांच्याशी परत बोलतो. आणखी काही हवंय का?’

गिरधरला, जीताबाला सुटका झाल्यासारखं वाटलं. जीताबा म्हणाला, `गावात यंदा रोजगार लागेल. कामं जवळच मिळाली तर लोकांना सोयीचं होईल.’

`हां, तेही करून टाकू आपण. आत्ताच मी कलेक्टरांशी बोललो आहे. त्यांना उद्या बाकी सांगतोय. पण मला वाटतंय की बंधारा होणार हे गृहीत धरूनच आपण कामांचा विचार करुया. डिस्कोंशी२ मी बोलतो. मृदसंधारणाची कामं काढू काही. ती येत्या वर्षी पुरतील. पुढच्या वर्षीचं त्यावेळी पाहू.’

हे थोडं अनपेक्षीत होतं मंडळींना. इथं त्यांना `पाहू, करू’ असा प्रतिसाद अपेक्षीत होता. बाबासाहेबही आधी त्याच मनस्थितीत होते; पण पाणीच नसल्यानं हे गाव आपल्या बाजूला ओढून घेण्यास हीच योग्य वेळ आहे आणि त्यासाठी आपण पुरता जोर लावायचा हे ठरवूनच ते कलेक्टरांशी बोलले होते. त्यांच्या त्या बोलण्याचा योग्य परिणाम झालेला समोर दिसत होता. मंडळींचे ताणलेले चेहरे आता थोडे सैल झाले होते. ती संधी घेत बाबासाहेबांनी पुढचा डाव केला,

`गिरधरराव, जीताबा, ते बंधाऱ्याचंही मनावर घेतो; पण थोडं इकडं-तिकडं करण्याची तुम्ही तयारी ठेवा. तो बंधारा हे बापूसाहेबांचं स्वप्न आहे; ते आमचे राजकीय विरोधक असले तरी इथं आमची दृष्टीही त्यांच्यासारखीच आहे. त्यामुळं ते काम आपण त्यांच्या डोळ्यांदेखतच पूर्ण करायचं आहे. त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यात आम्हाला आनंदच आहे, हे ध्यानी घ्या.’

गिरधरच्या सैलावलेल्या चेहऱ्यावर पुन्हा ताण आला. तो किंचित कडवट हसला आणि मागं वळला. त्याला हाक मारत बाबासाहेब म्हणाले, `तुम्ही बापूसाहेबांशीही बोलून घ्या. बंधारा झाला की त्यांच्याच हस्ते जलपूजन करावं म्हणतोय आम्ही.’

आता तिथं थांबणं गिरधरला केवळ अशक्य होतं. अर्थात वेळही संपलेली होती. त्यामुळं मंडळी निघाली.

***

सायखेडा कोरडं झालं होतं. टँकरनं यायचं ते पाणी पिण्यापुरतंच होतं. नदी होती सहा मैल लांब. त्यामुळं तिथून पाणी आणण्याची काही सोयही नव्हती. पाईप टाकायचा झाला तरी मोटरची सुरक्षा कशी करायची हा प्रश्न होता. तोच उपस्थित करत गावात तशी पाणीयोजना करायची झाली तर लोकवर्गणी द्यावी आणि मोटरच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी अशी अटच जिल्हा परिषदेनं टाकली होती आणि त्या योजनेच्या दहा लाखासाठी एक लाख रुपये लोकवर्गणी भरण्याचीही गावाची कुवत नसल्यानं तो प्रस्ताव बारगळून गेला होता. नदीत पाणी असून तहानलेलं राहण्याची वेळ सायखेडाकरांवर आली होती. रायगावकर त्या मानानं सुखी होते. तिथं वापराच्या पाण्याची सोय एका देवस्थानाची एक जुनी विहिर करीत असे. अर्थात सायखेड्याची स्थिती पाहून तेही हादरले होतेच.

काय करावं याचा विचार करत गिरधर कट्ट्यावर बसला होता. सोबत पाच-सहा जण होते.

`मोर्चा काढू बंधाऱ्यासाठी’, भडक माथ्याचा साहेबराव बोलला.

`उपयोग नाही. बंधारा अडला आहे तो वडगावकरांमुळं. सरकार हात वरून मोकळं होतंय.’

`त्यांच्याशी बोलणं करायचं काय ठरलं?’

गिरधरनं मग त्यातलीही पंचाईत सांगितली. बाबासाहेबांनी सांगितल्याशिवाय ती मंडळी पुढं येणारच नव्हती. आपापसातील चर्चा असल्यानं एकानं धाडस केलं.

`काय हवंय बाबासाहेबांना? मतंच ना? देऊ असं सांगू, निवडणूक आली की पाहून घेऊ.’

प्रश्न निष्ठेचा होता. बाबासाहेबांना गावाचा विरोध होता, कारण त्यांच्या बापानं देशमुखीच्या काळात या गावावर केलेल्या अत्याचारांच्या आठवणी कायम होत्या. स्वातंत्र्यानंतरही ती मुजोरी बराच काळ कायम होती. गावाची सारी जमीनच देशमुख सावकारांकडून घेतलेल्या कर्जावर त्यांच्याचकडं अडकलेली होती. थोरले देशमुख असतानाच गावातल्या गिरधरच्या आधीच्या पीढीनं एकदा ठरवलं. `असं पन मरायचं आणि तसं पण मरायचं; मंग मरायचंच असेल तर मान खाली घालून कशापायी?’ स्वतःलाच विचारत एकदा काही जण उठले; पंधरा मैलांवर असलेल्या देशमुखांच्या वाड्यावर चालून गेले. व्हायचं तेच झालं; तिथं गोळीबार झाला त्यांच्या रक्षकांकडून. इकडचे दोघे गेले, संतापून यांच्यातल्या एकानं वाड्यावरच्या एका रखवालदाराच्या डोक्यात दंडुका हाणला आणि तो झाला जखमी पण कलम लागलं खुनाच्या प्रयत्नाचं. सोबत दरोड्याच्या प्रयत्नाचा गुन्हा या गावकऱ्यांवर नोंदवला गेला. तिथून सुरू झाली ती एक लढाई. गावाव्र पोलिसी अत्याचार झाले. देशमुखांनीही काहीही करायचं बाकी ठेवलं नाही. अब्रू राखणंही गावासाठी मुश्किल होऊन गेलं. हे सारं-सारं त्याला आठवू लागलं. त्या अन्यायात नदी जवळ केलेल्या काही तरण्या मुलींची आठवण आली तसं त्याला पुन्हा स्वतःचीच लाज वाटून गेली. त्या गोष्टींची कुठं दाद होती, ना फिर्याद.

बापूसाहेबांनी त्यावेळी गावकऱ्यांना साथ दिली. सरकारदरबारी रदबदली करून खुनाच्या प्रयत्नाऐवजी मारहाणीचा गुन्हा करून घेतला, दरोड्याची कलमं वगळली गेली; गावाचा एक फायदा या साऱ्यात झाला. देशमुखांच्या अन्यायाविरुद्ध काही होऊ शकतंय म्ह्टल्यावर बाकी गावंही उठली. दरम्यान, थोरले देशमुख गेले आणि त्यांच्या जागी आलेल्या बाबासाहेबांनी बदलता काळ ओळखून जमीन मोकळी केली. सुमारे हजार एकर शेती मूळ मालकांना मिळाली. बाबासाहेबांची अपेक्षा एकच होती, गावानं आता पुढल्या राजकारणात साथ द्यावी, हा विषय मागं टाकावा. पण गावानं त्यांना दुश्मन ठरवलं ते कायमचंच. एक पिढी संपली तरी ती दुश्मनी राजकीय विरोधाच्या रूपात कायम होती.

बाबासाहेब राजकारणात. ते करताना त्यांनी देशमुखीच्या काळाचा जुना दरारा पुन्हा निर्माण केला होता तो नव्या सत्तेच्या जोरावर. सायखेडा त्यांना वळलं नव्हतं. त्यामुळं त्यांना हे गाव काहीही करून पाठीशी आणायचंच होतं. संधी मिळेल तिथं ते गावाला आडवे येत होते. `मी सगळं देतो, माझ्या मागं या. तो कलंक धुवून निघेल,’ असं ते म्हणायचे. ते सारं माहिती असल्यानं, गिरधरला ती सूचना पसंत पडणं शक्य नव्हतं.

`तुला काय इतिहास माहितच नाही का? तू म्हणतो तसं करण्यासाठी गाव मोठं लागतं तातो; आपण तेवढे मोठे नाहित. बंधाऱ्यावर त्यांचंच नियंत्रण असतंय. मतं दिली नाही की समजायचं पाणी बंद. मग काय कराल? बोंबलत बसायचं?’

गिरधरच्या या प्रश्नावर काय उत्तर देणार कोण? सारेच शांत बसले.

***

फेब्रुवारी उजाडला आणि उन्हाची तलखी सुरू झाली. शेतांमध्ये तर आता भेगाच दिसत होत्या. गावाच्या बाहेरचा झाडोरा मरू घातला होता. माणसांनाच प्यायला पाणी नाही तर त्यांना कुठनं पाणी मिळणार? गावातली कुत्री मिळेल त्या रस्त्यानं नदीकडं जायला लागली होती. गुरांचे हाल पाहवत नव्हते. अनेकांनी सोयऱ्यांकडं त्यांना धाडून दिलं होतं. हे फक्त गुरांपुरतंच नव्हतं. एक-दोघांनी घरंही सोडून देण्याची भाषा सुरू केली होती. छोट्या गावांचं हे एक दुर्दैव असतं. एकानं जरी शेत विकायला काढलं असतं तर त्याची मालीका सुरू झाली असती आणि पाहता-पाहता जमिनीचे भाव कोसळून गेले असते. दुष्काळ म्हणजे काय याची ती नुसती नांदीच होती.

बायकांच्या संयमाचा अंत जवळ येऊ लागला होता. घरोघरी पाण्याची बोंब होत होती. बायका तर सरळ सांगायच्या, `हो म्हणा त्याला. पाणी तर येईल. निष्ठा घेऊन काय तहान भागवता येतीय?’

उत्तर नसायचं. येसूबाईनं एके दिवशी कट्ट्यावर येऊन गिरधर आणि जीताबा यांना सगळ्यांच्या समोर विचारलं, `काय ठरवलंय तुम्ही? उन्हानं पोरं पडू लागली आहेत. गावात चार बाळंतीणी आहेत. दुधं आटण्याची वाट पाहताय काय?’

जीताबा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला तेंव्हा ती उसळलीच. `एवढी निष्ठा जपायची असेल तर हिंमतबी हवी. मग सायकली घेऊन नदीवरून पाणी आणायची हिंमत ठेवायची. टँकरवर आम्हाला जावं लागतंय, तुम्हाला नाही. दोन दिवसांत तुम्ही काय ते ठरवा नाही तर आम्ही बांगड्या उतरवतो, त्या तुम्ही भरा. आम्ही बघतो पुढचं.’

तिचा अवतार पाहूनच कट्ट्यावरील मंडळी हबकली. बहुतेकांनी काढता पाय घेतला. गिरधरला ते लागून गेलं होतं. आपण खरंच हिंमत नसलेलेच आहोत, असं त्याला वाटून गेलं. येसूबाई म्हणते ते खरंच आहे. सगळं काही जपायचं असेल तर हिंमत लागते खरी. आपल्याकडं ती नाही. पुन्हा तो विचारात पडला. मार्ग तर काही दिसत नव्हता.

येसुबाई गेली, डोकं फिरवून, असं त्याला वाटलं. या परिस्थितीतून मार्ग सांगू शकणाऱ्या एकाच माणसाचा चेहरा त्याच्यासमोर आला. आणि त्याला थोडी उभारी आली. जीताबाशी त्यानं ती कल्पना मांडली. त्यानंही ती मान्य केली.

***

`तुमची अडचण मला कळते गिरधर; पण तुम्हाला माहित आहे की त्याच्या शब्दाच्या बाहेर जाण्याची हिंमत कोणीच दाखवत नाही. पुन्हा तो टँकर चालू ठेवतोय. दोनच का असेना! त्याची ती पद्धतच आहे. झोडपायचं; पण रक्तबंबाळ होऊ द्यायचं नाही. गावात त्यानं कामंही मंजूर केली आहेत; म्हणजे त्याच्यावर आरोप नाही करता येत. या परिस्थितीत मला दिसतोय तो मार्ग म्हणजे, त्याचं म्हणणं तुम्ही मान्य करायचं. तो म्हणतो ना, झालं गेलं विसरून जा, विसरून जायचं.’

बापूसाहेबांकडूनच हा सल्ला आला म्हणताना बोलणंच खुंटलं असं गिरधरला वाटलं. गावात आपण जे काही सांगतो, त्याच्या नेमकं विरुद्ध ही गोष्ट होती.

`आम्ही तत्त्वांशी तडजोड करणार नाही बापूसाहेब. मी उद्याच टोळी करतो आणि नदीवरून पाणी आणण्याची व्यवस्था करतो.’ गिरधर म्हणाला.

नदीवरून पाणी आणण्याजोगी गावात येऊन-जाऊन सहा-सात जणंच होती हे बापूसाहेबांनाही माहिती होतं. त्यामुळं त्यांना वाटलं एका दिवसातच या कल्पनेचा निकाल लागेल आणि गाव देशमुखांच्या मागं जाईल. बापूसाहेबांना त्याचं दु:ख नव्हतं. अशा पद्धतीनं लोकांना नमवता येतं हे त्यातून सिद्ध होतं याची त्यांना चिंता अधिक होती. आणि त्याहीपेक्षा त्यांना गावची तहान भागणं महत्त्वाचं वाटत होतं.

त्यांना वाटलं होतं तसं झालं नाही. गिरधरनं खरंच टोळी केली आणि ती नदीवरून पाणी आणू लागली. आठवडा गेला आणि मग मात्र उन्हाच्या तडाख्यानं टोळीतील एकेक जण आजारी पडू लागल्याचं कळलं तसं बापूसाहेब विचारात पडले. देशमुखीविरुद्धच्या लढ्यात सायखेडा इतकं तत्त्वनिष्ठ होण्यास आपणच जबाबदार आहोत, असं त्यांना वाटून गेलं. हा लढा आपणच निवडणुकीच्या आखाड्यात नेऊन देशमुखांना पाणी पाजलं होतं ते याच गावांच्या बळावर, याच्या आठवणी जशा डोळ्यांसमोरून सरकू लागल्या तसे ते अधिकच अस्वस्थ होत गेले.

एक-दोन टँकरवर गाव तगू शकणार नाही हे ध्यानी आलं तसं त्यांच्या डोक्यात रक्त उसळू लागलं. आपण या गावाचा बळी तर देत नाही ना, असा प्रश्न त्यांच्या मनात आला. देशमुखीच्या अन्यायाविरुद्धचा लढा असा जिवंत ठेवण्यात आपली काही चूक तर होत नाही ना, असंही ते स्वतःला विचारू लागले. `जुने गेले, नवे आले,’ असं आपण म्हणतोय खरं; पण या नव्यांशी लढण्याची ताकद आपल्याकडं नाही, असं त्यांना वाटून गेलं.

या अशा उद्विग्न विचारातच दिवस गेला. रात्रही गेली; पहाटे त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकली. या गावाला संकटातून बाहेर काढायचं असेल तर आपल्यालाच हात-पाय हलवावे लागतील हे त्यांना पटलं होतंच. नेमकं काय करायचं हे मात्र त्यांना उमजत नव्हतं, ते त्यावेळी डोक्यात चमकून गेलं. त्यांनी गिरधरला निरोप पाठवला. `दोन दिवसांत तुझा प्रश्न सुटेल.’

***

बापूसाहेबांच्याच हस्ते बंधाऱ्याचं काम सुरू झालं त्यावेळी व्यासपीठावर बाबासाहेब होते. जिल्हाधिकारीही होते. भाषणात बापूसाहेबांनी घोषणा केली, `मी आता निवडणुकीच्या राजकारणात पडणार नाही.’

आणि त्या क्षणी गिरधरला समजलं बंधाऱ्याचा मार्ग कसा मोकळा झाला ते. वडगावच्या लोकांनी त्यांचा विरोध एका दिवसात कसा गुंडाळून घेतला ते. बंधाऱ्याच्या कामाला युद्धपातळीवर कशी सुरुवात होतेय तेही त्याला कळलं.

बापूसाहेबांनी गिरधर आणि त्याच्या गावाची सुटका केली होती; पण स्वतःचा बळी देऊन. त्या तालुक्यात त्यांच्याशिवाय कोणीही बाबासाहेबांना विरोध करणारा नव्हताच. पुढची निवडणूक बिनविरोध जिंकण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण होणार होतं, त्या एका निर्णयासरशी. त्यांच्या माथी असलेला घराण्याच्या अन्यायाचा कलंकही, कदाचीत, पुसला जाणार होता, त्याच निर्णयामुळं; पण तो निर्णय होता बापूसाहेबांचा. सायखेडा आणि त्या तालुक्यात केवळ बापूसाहेबांच्या मागं निष्ठा असल्यानं वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत बसलेल्या गावांसाठी घेतलेला.

***

टँकरवर पाच वर्षे काढलेल्या सायखेड्यात त्या दिवशी दिवाळी होती. बंधाऱ्याचं काम सुरू झाल्यापासून गेली तीन वर्षं गावात दहा-दहा टँकर येत होते खरे, पण तूट होतीच. लोक गावांत टिकून राहिले होते ते केवळ तिथं निघालेल्या रोजगाराच्या कामांमुळं. त्या पार्श्वभूमीवर त्या दिवशी पाईपलाईननं गावात येणाऱ्या पाण्याचं अप्रूप प्रत्येकाला होतं. शेतं पाच वर्षांनी प्रथमच पाणी पिणार होती.

मुख्यमंत्री बाबासाहेब देशमुखांच्या हस्ते तो बंधारा आणि सिंचन व्यवस्था राज्याला अर्पण करण्यात आली तेंव्हा गिरधर गावात जिथं नळकोंडाळं करण्यात आलं होतं तिथं बसला होता. पलीकडंच जीताबाच्या जमिनीत पाईप पोचले होते. दुपारी दोनच्या सुमारास पाणी त्या पाईपमधून पाणी आलं तसा गावात आनंदोत्सव सुरू झाला. `हिंमत लागते’ म्हणणारी येसुबाई पेढे घेऊन आली होती. तो पेढा गिरधरला घेववेना. त्यानं मान वळवली. बंधाऱ्याचं काम सुरू झाल्यापासून हा असाच येडेपणा करतोय असं म्हणून तिनं त्याचा नाद सोडला. ती गेली.

गिरधरला आठवण झाली ती बापूसाहेबांची. आजच्या कार्यक्रमात ते कुठंही नव्हते. त्यांच्याच हस्ते जलपूजन करण्याचं बाबासाहेब विसरूनही गेले होते. मधल्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडूनही आले होते. आता ते सीएम होते. सारं सारं गिरधरला आठवू लागलं. गेली पाच वर्षं, त्याआधीचीही; देशमुखांशी लढण्यात गेलेली. पाहता-पाहता त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. समोर पाईपमधून पाणी कोसळत होतं आणि ते पाहून गिरधरला आठवलं आपली अशी स्थिती होण्याचं कारण. बाहेर जसं पाणी नव्हतं तसंच आपल्या डोळ्यांमध्येही या काळात पाणी नव्हतंच. टिपूसही बाहेर पडला नव्हता गेल्या पाच वर्षात. आभाळातूनही आणि डोळ्यातूनही. आठवलं आणि त्याच्या डोळ्यातून त्यालाही नकळत पाणी येऊ लागलं. मग त्यानं तो बांध फोडून टाकला. डोळे घळघळा वाहू लागले. गावात आलेल्या पाण्यानं ओठ ओले होण्याआधी याच पाण्यानं ते करून टाकले होते.

***

१. आणेवारी – अनेकांना माहिती असेलही; तरीही खुलासा करतो. या शब्दालाच पैसेवारी असाही शब्द आहे आणि अनेकदा तोही वापरला जातो. पीक साधारण किती आलं आहे याचा अंदाज पूर्वी `बारा आणे’, `सोळा आणे’ अशा शब्दांत शेतकरी देत, तेथे या `आणेवारी’चा संबंध असावा. सरकारही पीकाचा अंदाज काढतं. तो असतं पैशात; खरं तर टक्केवारीत. त्यामागं, पाऊस किती आहे, कोणी कसं पेरलंय, बी कोणतं आहे, खतं किती वापरली आहेत, पाऊस संपल्यानंतर पाण्याची उपलब्धी किती आहे आदी घटक असतात, अशी माझी माहिती आहे. बोलीत ज्यावेळी आणेवारी `चोपन्न’ आहे असं म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ झालेल्या पेऱ्यातून कमाल उपज क्षमतेच्या ५४ टक्के पीक येणार असा सर्वसाधारण होतो.

२. डिस्को – डिस्ट्रिक्ट सॉईल काँझर्वेशन ऑफिसर या शब्दाचं सरकारी बोलीतील लघुरूप. अर्थात, हे सर्वत्र वापरलं जातंच असं नाही.

यावर आपले मत नोंदवा