नदी

त्या धरणावर ज्या-ज्या वेळी गेलो त्या-त्या वेळी न चुकता मी तो उंचवटा गाठायचो. धरणाची भिंत जिथं सुरू होते, तिथंच तो होता. तिथं थांबलं की नदी अशी सामोरी यायची. तिथून तिचं दर्शन घेण्याची उर्मी मला कधीही आवरता आली नव्हती. जितक्या वेळेस इथं आलो त्या प्रत्येक वेळी ही इच्छा मी हट्टानं पूर्ण करून घ्यायचो. याहीवेळी अपवाद होणार नव्हता. मला जायचं होतं पुढं गावांमध्ये. तरीही वाट थोडी वाकडी करून मी तिथं गेलोच.

असं म्हणतात की, तिच्या केवळ दर्शनानंच पापक्षालन होते. मी त्यावरून गंमतही करायचो. वर्षाकाठी एक-दोनदा इथं येऊन तिचं दर्शन घ्यावं म्हणजे पापक्षालन होईल आणि आपण पुन्हा नवी पापं करण्यास सज्ज होऊ, असं म्हणायचो. `बदमाष आहेस,’ असा एका मित्राचा रागही त्यावरून मी झेलला होता. ती नदी काहीतरी करायची हे नक्की. कारण इथं येऊन गेलं की मी ताजातवाना व्हायचो. उत्साह यायचा नवं काही करायला.

पहिल्याच भेटीत या नदीशी काही नातं जुळल्यासारखं झालं होतं. असं वाटायचं की तिच्याशी आपल्याला बोलता येतं. ती आपल्याला तिची कहाणी सांगते. कहाणी मी वाचलेली असायची. इथं नदीपाशी आलो की ते शब्द मनात जागे व्हायचे आणि नदीच्या रुपानं, तिच्या प्रवाहाच्या खळखळाटातून माझ्याशी बोलू लागायचे. तिची वळणं मला त्या कहाण्यांतील तिच्या जीवनप्रवासातील चढ-उतारांची याद द्यायची.

तिची सगळी वळणं दोनी बाजूना असणाऱ्या पहाडांमुळं होती. पहाड फोडूनच ती बाहेर पडते, असं म्हंटलं जायचं. धरणाच्या बाजूनं प्रवास सुरू करून मागं जाऊ लागलो की ते किती खरं आहे हे पटायचं. डाव्या बाजूचा पहाड उंचीनं कमी होता तर उजव्या बाजूचा तसा थोडा मोठा.

मागच्या दिशेनं प्रवास सुरू झाला की डोळ्यांपुढं एक प्रतिमा नेहमी उभी रहायची. विवाहाच्या प्रसंगी मामा आणि वडील किंवा भाऊ यांच्या मधून अधोमुखानं येणारी वधू! हे दोन्ही पहाड त्याच भूमिकेत असावेत असं वाटायचं. नदीही तशी अधोमुखच वाटायची; फक्त त्या वधूच्या चालीत असणारा संथपणा मात्र इथं नसायचा. एवितेवी ती नदी तिच्या जीवनसाथीला, म्हणजेच सागराला, भेटण्यासाठीच असोसून निघालेली एक कहाणी होतीच. तिची त्यासाठी तिच्या बहिणीशीच स्पर्धा होती, असंही ती कहाणी सांगायची. त्यामुळं तिचं चालणं नसायचं तर धावणंच असायचं. त्या कहाणीत त्या पहाडांना तशी काही भूमिका नव्हती; पण इथं मात्र ते वधूला घेऊन येणाऱ्या मामा आणि वडील किंवा भावासारखे भासायचे.

धरणाच्या आणखी थोडं पुढं गेलो की नदीनं डावीकडं घेतलेलं एक बाकदार वळण होतं. ते घेतलं की पुढं उजवीकडं डोंगरातून टुमदार घरं डोकं वर काढायची. एकाद्या लहान मुलाला `भुक’ करण्यासाठी आपण दरवाजामागून जितकं डोकं बाहेर काढू तेवढीच. पुढं गेलं की ती मोठी होत जायची आणि डोळ्यांसमोर गाव उभा राहायचा. घरं, शेतं दिसायची. क्वचित आपण नशीबवान असलो तर ढोल वाजवत, पावे फुंकत फेर धरून सुरू असलेला निसर्गाच्या मुलांचा मन गुंगवून टाकणारा नाचही दिसायचा. ती गावं आणि ते जीवन म्हणजे त्या पहाडांची आभूषणंच. अगदी विवाहाप्रसंगी जशी गळ्यांत साखळी असते, बोटात अंगठ्या असतात तशीच.

प्रवाहात मधूनच महाकाय कातळ डोकं वर काढून बसलेले असायचे. त्यांचं एक असायचं. नेहमीच. `या, बसा’ हे आमंत्रण! त्यामुळं आपण केंव्हाही त्यांच्या अंगावर स्थानापन्न होऊ शकायचो. एकाद्या नातवानं लाडात येत आजोबांच्या पोटावर बसावं तसं. बसूनच आपला त्यांच्याशीही संवाद व्हायचा. तेही सांगायचे मग तिची कहाणी. बसल्याबसल्याच आपण एकादा खडा तिच्या पात्रात फेकला की मग जी आवर्तनं सुरू व्हायची ती लांबपर्यंत जाताना आपलं लक्ष वेधून घ्यायची. सूर्यही मावळताना तिच्या पात्रात आपलं प्रतिबिंब टाकून जायचा. त्याच्याकडं थेट पाहण्यापेक्षा ते प्रतिबिंबच पाहाण्यासारखं असायचं. `प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ची ती वेगळीच अनुभूती असायची.

नदीचा उगमापासून इथंपर्यंतचा प्रवास हजार-एक मैलांचा तरी असावा. अशा प्रवासानंतर येणारा थकवा तिच्या हालचालीत कुठंही दिसायचा नाही. वेग तोच, आवेगही तोच. पण या थकव्यानं चेहऱ्यावर एक संयत भाव आणलेला असतो. तो इथं दिसायचा तो तिच्या पात्राच्या आटोपशीरपणात. पात्र होतं आटोपशीर, पण त्याची खोली वरूनही जाणवायची. ती खोली म्हणजेच तिची प्रगल्भता असावी. प्रगल्भ माणसं जशी पहिल्याच दर्शनात तुमच्या मनत एक कायमचा ठसा उमटवून जातात, तशी ती नदीही ठसा उमटवून जायची.

पहिल्या दर्शनानं निर्माण केलेल्या तिच्या या प्रतिमा नंतर मात्र टिकल्या नाहित.

धरण पूर्णत्वाकडं चाललं होतं. मागं नदीचा मूळ प्रवाह आता कोणालाही समजणार नव्हता. कारण साठलेल्या पाण्यालाच इतका फुगवटा आला होता की, नदीचं मूळ पात्र जितकं होतं त्याच्या दहा पट तरी त्या फुगवट्याची रुंदी झाली होती.

धरणाची भिंत जशी-जशी वर सरकत गेली होती, तसा तिच्या प्रवाहातील जीवंतपणा कमी-कमी होत गेला. बांधच घातला म्ह्टलं की ते होणारच होतं. पण मला त्याचं अधिक वैषम्य वाटायचं ते तिच्या त्या थांबण्यानं तिचा माझ्याशी होणारा संवाद थांबत जातोय यामुळं. तिचा तो मीटर-मीटरनं होणारा `मृत्यू’ मीही सोसतच होतो.

आजही मी जसा त्या उंचवट्यावर गेलो तसं वेगळं काहीही झालं नाही. तिचं माझ्याशी बोलणं आणखी काही काळानं खुंटणारच होतं. ते वास्तव मला स्वीकारावंच लागणार होतं. कदाचीत त्याचीच मानसीक तयारी आपली बदलती रूपं दाखवून ती माझ्याकडून करून घेत असावी. तिचं रूप बदललं होतं. सळसळ किंवा पहिल्यांदा अनुभवलं होतं ते चैतन्य आता दिसत नव्हतं. मला माझ्या आजीची आठवण झाली. आजोबा गेल्यानंतर हिनं एकटीच्या जीवावर सारं काही केलं होतं. शेताचा खटला एकटीनं लढवला होता. त्याच्या कथा ऐकल्या होत्या. नंतर आमचे लाड करताना तिला पाहिलं होतं. कष्ट उपसून आम्हा नातवंडांचा आनंद आपल्या नजरेत साठवून घेतानाही तिला अनुभवलं होतं. या नदीचं पहिलं दर्शन तसं होतं.

अखेरच्या दिवसात आजी एकदम शांत झाली होती. अनेकदा ती मोजकंच बोलायची. नदीचं आत्ताचं रूप तसं होतं. ती शांत होती. निशब्दही. पण अजून प्राण होतेच. ते जाण्याची वेळ आली नव्हती. ती येण्यास अजून किमान चार वर्षं आहेत हे मला महिती होतं. तिला ते माहित होतं का? असेलही कदाचित. तिनं ते मला काही बोलून दाखवलं नाही. माझीच काळजी ती अधिक करत असावी, म्हणून. तिचा तो हळुहळू होत जाणारा मृत्यूच मी पचवू शकेन असं तिला वाटत नसावं. एकदम मृत्यू सहन करणं कदाचित मला शक्य झालं नसतंही.

आजी गेली तेंव्हा मी त्या नदीच्या किनारीच होतो. आजी गेल्याचं मला तिथं माहितही होणं शक्य नव्हतं. त्यावेळी नदीनं एक वेगळं रूप दाखवलेलं मला आठवतंय. कधी नव्हे असा पाऊस त्या काळात झाला होता. एरवीही पावसात तिला पूर यायचाच. पण यावेळी गोष्ट थोडी वेगळी वाटली मला. धरण पूर्ण होणार हे आता नक्की झालं होतं. त्यामुळं तो पूर वेगळा होता. महाप्रचंड वृक्ष वाहून आणताना ती भयंकर वेगानं सुसाट सुटली होती. तिचा तसा वेग पूर्वी कधीही मी अनुभवला नव्हता. सागराला भेटण्याची जणू ही शेवटची संधीच असेल हे, हे तिला कळलं होतं. पुढच्या वर्षीपासून ही भेट शक्य होणार नव्हती. धरण तिला त्याच्यापासून तोडणार होतं; कायमचंच! त्यामुळेच शक्य तेवढ्या लवकर सागराच्या कुशीत जाऊन पडण्याची तिची तगमग त्या सुसाट वेगामागं असावी. तिची ती असोशी समजून घेण्यापलीकडं माझ्या हातीही काही नव्हतं. कहाण्यांमध्ये तिच्या बहिणीनं तिला हरवलं होतं. आता पुन्हा हार डोळ्यांसमोर होती. ही हार तर कायमच्या ताटातुटीची होती. तेही त्या आवेगाचं एक कारण असावं.

तिथून परतलो आणि आईच्या पत्रातून आजी गेल्याचं कळलं. मला पुन्हा त्या नदीपाशीच जावंसं वाटत होतं; पण ते शक्य नव्हतं.

आत्ता मी तिथं पुन्हा गेलो; असं कळलं की तेंव्हा अनुभवलेला तिचा वेग गेल्या काही वर्षात कायम होता. ती त्याच वेगानं तिच्या लाडक्या सागराकडं जात होती. यावेळी तिची आणि त्याची कायमची ताटातूट झाल्याचं दु:ख तिच्या अंगांगांवर दिसून येत होतं. ती ताटातूट होती. काही काळाचा विरह नव्हता तो. तिच्या नि:शब्द असण्यातून तेच कळायचं. बोलणं तिला शक्यच नव्हतं. मी कितीही प्रयत्न केला तरीही. वीस वर्षांच्या झुंजीत तिला हार पत्करावी लागली होती आणि थकून नि:शब्द होत तीही थांबून गेली होती. सतरा वर्षांपूर्वी सुरू झालेला माझा एक संवादही थांबून गेला होता.

आता पुन्हा तिथं जाताना मी, नि:शब्द राहण्याचीच तयारी ठेव, असं मनाला बजावतो. ते ऐकून घेतं आणि मग स्वतःशीच बोलत बसतं, तिच्याशी झालेले संवाद स्वतःलाच सांगत बसतं!

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s

%d bloggers like this: