आझमचाचा! – २

सत्तरी ओलांडलेल्या चाचाच्या आयुष्यात वर्ज्यविषय कोणता असा प्रश्न मला त्या रात्री आम्ही दीड वाजता मैफिलीतून उठलो तेव्हा पडला. मी खरं तर तिथं गेलो होतो ते चाचाशी बोलायला. म्हणजे प्रश्न विचारण्याची भूमिका माझ्यासाठी असावी हे माझ्यादृष्टीनं गृहित होतं. प्रत्यक्षात मला प्रश्न विचारावेच लागले नाहीत. मी अनुभवलेली ती अशी पहिली मुलाखत होती, जिथं मुलाखत देणारा मुलाखत घेणाऱ्यासच प्रश्न विचारायचा आणि त्याचं अज्ञान दूर करण्याचं काम करत स्वतःचं जीवन मांडून ठेवायचा. सुरवात झाली तीच मुळी गंमतीदार. विषय भाईंच्या मूळ गावाचा निघाला. तिथली राष्ट्रीय शाळा वगैरे. गुरूजींच्याही नावाचा उल्लेख झाला. यातलं थोडं फार कानावर पडलं होतं ते मी आठवू लागलो आणि अचानक चाचानं तीरासारखा मला प्रश्न विचारला तो त्या शाळेच्या इतिहासाविषयी. माझं अज्ञान उघडं पडण्यास वेळ लागला नसताच. त्यामुळं मी ते कबूल करून टाकलं आणि सुटका करून घेतली. पण तेवढ्यात माझ्या लक्षात येऊन गेलं की भाईंनी चाचांविषयी जे सांगितलं होतं, ते पुरेसं नव्हतं. म्हणजे भाईंनी सांगितलं होतं त्यापेक्षा चाचाचा व्यासंग मोठा आहे, या अर्थानं.

चाचाची रसवंती सुरू झाली ती त्या शाळेच्या स्थापनेच्या इतिहासातून. भारतीय स्वातंत्र्याचा लढा, ब्रिटिशांचा काळ, महायुद्ध, गांधीजी, राष्ट्रीय शिक्षणाचा विचार, त्यातून काही शाळांची स्थापना, त्या शाळेचा प्रवास, स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्या शाळांची झालेली स्थिती हे सगळं सांगत चाचानं भारतीय माणूस इतिहासाची हेळसांडच करतो, असं सांगून टाकलं. मी ऐकत गेलो. त्या पलीकडं काही करण्यासारखं नव्हतं. मध्ये फक्त भाईंची एखाद-दोन वाक्यं असायची. सांधेजोड म्हणावीत अशी. भाईंच्या त्या शाळेत कला या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व होतं. त्या अनुषंगानं बोलताना चाचाला कलांची माहिती किती आहे हे समजलं तेव्हा मी थोडा चकीत झालो. संगीताची बऱ्यापैकी जाणकारी असणारी माणसं भेटणं तसं दुर्मिळ नसतं. चित्रकलाही कळणारी भेटतात. तसं एकेका कलेतील माहिती असणारी माणसं भेटतातच. पण एकाच वेळी अशा प्रत्येक कलेविषयीची माहिती जाणकारीनं मांडणारी माणसं विरळाच.

चाचानं तो विषय संपवताना पुन्हा मलाच प्रश्न केला. ब्रिटिशांच्या काळच्या कोणा कलेक्टरचा उल्लेख त्यानं केला. ‘माहिती आहे का?’ त्यानं विचारलं होतं. मी अज्ञानीच. ‘तुम जहां काम करते हो उस जिलेका कलेक्टर था ये.’ मग सुरू झाली त्या कलेक्टरनं केलेल्या कामाची माहिती. आणि त्यानिमित्तानं चाचानं मला फिरवून आणलं त्या काळाच्या, म्हणजे साधारण विसाव्या शतकाच्या पहाट-सकाळीच्या, प्रहरांमध्ये. अगदी लीलया चाचा जुन्या पिढीतल्या आणि समकालीन इतिहासलेखकांची नावं घ्यायचा. तो जे सांगत होता, त्यात ब्रिटिशांचं गुणगान नव्हतं. किंबहुना कोणताही आविर्भाव किंवा पवित्रा त्यात नव्हता. चाचा सांगत होता ते फक्त त्या-त्या काळात काय घडलं आणि कसं घडलं हेच. त्यात रंगभरणी नव्हती. इतिहास, इतिहास म्हणतात तो हाच हाही आविर्भाव नव्हता हे आणखी एक विशेष.

हे एक बरं झालं होतं. चाचाकडं इतिहासाचा आरंभ एकदम काही शतकं मागं झाला नव्हता. अगदी आपल्यापासूनच सुरवात करत चाचा हळुवार मागं गेला होता. मग मागं जाता-जाता त्यानं त्याचीही कहाणी मध्येच पेरून सांगून टाकली होती. बहुदा त्यानं सांगितली नसावी, ती त्याच ओघात आली असावी. कारण त्याच्या काळात चाचा स्वतःला वेगळं ठेवून विचारच करू शकत नसावा. पण तो स्वतःचाच विचार करतोय, असंही नव्हतं. ‘उस वक्त हम फलाणा-फलाणा काम करते थे… फलाणे जगह थे… फलाणा स्थिती थी…’ असलाच काय तो त्याचा स्वतःचा तपशील असायचा. (फलाणा हा त्याचा आवडीचा शब्द असावा, असं वाटावं इतक्या वेळा तो संवादात यायचा.) मग त्याही पलीकडं त्यानं जावं यासाठी आपल्यालाच एखादा प्रश्न विचारावा लागायचा. त्यातून तो बोलला तर बोलला.

मध्ये केव्हा तरी रोट्या झाकून ठेवल्या आहेत, असं सांगून चाची झोपी गेली होती. आम्ही उठलो तेव्हा चंद्र माथ्याकडं सरकू लागला होता. चांदण्यांचा प्रकाश आणखी स्वच्छ झाला होता. माझ्याही डोक्यात पुढच्या सकाळपासून आपल्या पदरी काय पडणार आहे याचा प्रकाश पडू लागला होता.

चाचा बिडी प्यायचा. ती पिण्याचीही एक पद्धत होती. चाचा अनामिका आणि अंगठ्यानं बिडी ओठात धरायचा. झुरका घेऊन झाला की, मग बिडी एरवी सिगरेट पकडली जाते तशी त्या दोन्ही बोटांच्या बेचक्यात यायची. त्याच्यासमोर मी माझं सिगरेटचं पाकीट केलं तेव्हा त्यानं ते हलकेच बाजूला सारलं. उलट आपलं बिडीचं बंडल आमच्यासमोर केलं. मग पाचेक मिनिटं त्यानं बिडी आणि सिगरेट यांचे (नसलेलेच) फायदे आणि खूप तोटे याविषयीही बोलून घेतलं होतं. दुसऱ्या दिवशी आम्ही सिगरेट बॅगेत ठेवल्या आणि बिडीलाच जवळ केलं.

आझमचाचा. गावातील त्याच्या घरी पहिली सकाळ उजाडली तेव्हा आमचा कार्यक्रम ठरला होता. आदले दिवशी चाचा म्हणाला होता की जीप किंवा बसनं जाऊ. एम-८० वर त्रास होण्याची भीती त्याला वाटत होती. पण सकाळी त्यानंच कार्यक्रमात बदल करून एम-८० वर येण्यास मान्यता दिली होती. कार्यक्रम किमान तीन दिवसांचा होता. तो ठरण्याचं कारणही तसंच होतं.

अजिंठ्यात गाईड करण्याचं काम चाचानं थांबवलं त्याला काही वर्षं झाली होती. ‘अब लोगोंको एक दिनमें सब चाहीये. अजिंठाका इतिहास एक दिनमे कैसे पुरा होगा?’ चाचाचा बिनतोड सवाल होता. एका दिवसात अजिंठ्याचा इतिहास सांगणं हा त्याच्यावरच अन्याय असायचा. त्यानं ते बोलूनही दाखवलं. चाचा गाईड झाला होता तो परिस्थितीमुळं. पण त्याला मुखोद्गत असणारा इतिहास त्या विषयाच्या काही प्राध्यापकांना (मी जबाबदारीनं हा शब्द वापरतोय. खऱ्या अर्थानं प्राध्यापक. अधिव्याख्याता पदावर राहून प्राध्यापक हे बिरुद मिरवणाऱ्यांचा तर चाचाच्या संदर्भात विचारही होऊ शकत नाही) चाचानं लाजवलं असतं. इतिहासाचा असा चालता – बोलता कोश तो. एकेका दिवसात काही रुपये कमावण्यासाठी गाईडगिरी करणं शक्यच नव्हतं त्याला. पोपटपंची करीत इतिहास सांगणाऱ्यांचा त्याला संताप होता. त्यामुळं त्यानं ते काम थांबवून दिलं. आता तो गाईड म्हणून काम करायचा ते फक्त मोजक्या लोकांसाठीच. हे मोजके लोक म्हणजे कोणा-ना-कोणा तज्ज्ञाच्या शिफारशीसह आलेले चोख संशोधक. शिफारस हा शब्द चुकला. चाचानं अशा लोकांसाठी लावलेली ती चाळणी असायची. त्याचे हे सुहृदच एखाद्या संशोधकाला चाचा गाईड करेल की नाही याचा अंदाज घेऊन त्या व्यक्तीला पुढं पाठवायचे. मग त्यांच्यासाठी चाचा आठ दिवसांचा अजिंठा अभ्यासवर्ग चालवायचा. एकावेळी बहुदा एकच संशोधक. कोणी गट करून आलंच आणि तितका वेळ देणार असेल तर त्यांच्यासाठी. रोज गुंफा गाठायच्या. दिवसभर त्याचं बोलणं चालू असायचं. एकेका गुंफेत किमान अर्धा ते पाऊण तास. काही खास ठिकाणी चाचा तास ते सव्वातास घ्यायचा. संध्याकाळी घरी. दुसऱ्या दिवशी पुन्हा लेण्यांची वाट. आठ दिवसांपेक्षा कमी काळासाठी संशोधकांना गाईड करणार नाही, हा नियम त्या काळात चाचानं जीवापाड जपला होता. चाचाचं हे अजिंठाप्रेम लेण्यांपाशी आमची एम-८० आली तेव्हाच मला दिसून आलं. गाडी पार्क केली आणि मी लेण्यांच्या दिशेनं वळलो. चाचानं रोखलं. ‘ऐसे नही,’ त्यानं मला बाजूला नेलं. लेण्यांकडं जाणारी वाट उजव्या हाताला ठेवून तो थोडं मागं गेला. आणि म्हणाला, ‘इथून उंची पाहून ठेव. बाकी रात्री सांगेन.’ मग तिथंच उभं राहून त्यानं लेण्यांविषयी प्राथमिक माहिती सुरू केली.

(क्रमशः)

आझमचाचा! – १

आझमचाचा! – ३

उत्तर नोंदवा